कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
5 Aug 2022 - 6:07 pm

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ४

गोवा.
सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगिज अंमलाखाली राहीलेले आणि १९६१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेले भारताच्या नकाशावरील एक छोटेसे राज्य.

निसर्गाचा प्रचंड वरदहस्त आणि थोडासा वेगळाच सांस्कृतीक वारसा लाभलेल्या ह्या चिमुकल्या राज्यात देशी-विदेशी पर्यटकांचा कायम राबता असतो त्यामुळे राज्याच्या महसुलात पर्यटन व्यवसायाचा वाटा फार मोठा आहे.

गोव्याला भेट देणाऱ्या मंडळींपैकी कुणाला तिथले निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, पोर्तुगिज स्थापत्यशैलीतल्या पुरातन वास्तु बघण्यात रस असतो तर कुणाला तिथे स्वस्त दरात मिळणारे मद्य किंवा मत्स्याहार आकर्षित करत असतो. काहीजण फक्त आराम करायला येतात तर काहीजण निव्वळ कुठेतरी फिरायला जायचंय, तर गोव्याला जाऊ अशा विचाराने येतात.

प्रत्येक नावाजलेल्या पर्यटनस्थळाच्या काही काळ्या बाजु असतात त्याला गोवाही अपवाद नाही. पर्यटनाव्यतिरीक्त तिथला वेश्याव्यवसाय, अंमलीपदार्थांची तुलनात्मकरित्या सहज उपलब्धता आणि जुगाराला अधिकृत मान्यता प्राप्त असलेले कॅसिनो ह्या गोष्टीही मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांना वारंवार गोव्याला येण्यास आकर्षित करतात.

नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीपर्यंत गोव्यातील वास्को-द-गामा (वास्को) शहराजवळचा ‘बायना बीच’ वेश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून (कु)प्रसिद्ध होता.
खरंतर किनाऱ्यावरच्या एखाद्या शॅक मधुन बिअरच्या बाटल्या घेउन आम्हा कॉलेजकुमार मित्रमंडळींना वाळुवर निवांतपणे बसुन बियरचे घुटके घेत, गप्पा गोष्टी करत समोर पसरलेला समुद्र न्याहाळत बसण्यासाठी हे ठिकाण त्यावेळी फार मस्त वाटायचे, पण टपरीवजा बार काउंटर्सच्या सोभोवती डिजे साउंड सिस्टिमवर जोरदार संगीत वाजत असलेल्या ह्या समुद्रकिनाऱ्याचा वापर प्रामुख्याने ओपन एअर पिकअप जॅाईंट म्हणुन होत असल्याने इथे स्थानिक मंडळी आणि कुटुंबीयांसोबत आलेले पर्यटक मात्र फारसे फिरकत नसत.
पुढे तिथे अंमली पदार्थांचा व्यापार, लुटमार, परदेशी महिला पर्यटकांचा विनयभंग, हत्या वगैरेंसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आकडा वाढु लागल्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन सरकारने वेश्याव्यवसायाचे हे केंद्र उध्वस्त केले.
आता तिथे वॅाटर स्पोर्ट्स, आयुर्वेदीक मसाज वगैरेंसाठी बऱ्यापैकी पर्यटक सहकुटुंब येत असले तरी पुर्वीची मजा राहिली नाही त्यामुळे ह्या ठिकाणाचे चैतन्य हरवल्यासारखे वाटते 😀
माहीती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर व्यवसायांप्रमाणे ह्या व्यवसायाचे स्वरूपही बदलले असल्याने आता अशा विशिष्ट ठिकाणच्या ‘बाजारा’ ची गरजही उरली नाहीये त्यामुळे विकेंद्रीकरण झाले असले तरी केवळ ‘ह्या’ कारणासाठी गोव्याला भेट देणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

साठच्या दशकात अमेरीकेत उदयाला येउन सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत जगभर पोचलेली हिप्पी संस्कृती गोव्यात रूजली, फोफावली नसती तरच नवल!
उत्तर गोव्याच्या बारदेश तालुक्यातील हणजुणे (अंजुना) गांव तर त्यावेळी हिप्पी लोकांचे हक्काचे ठिकाण बनले होते.
स्थानिक लोकजीवनावरील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या ह्या प्रदेशाला सत्याऐंशी साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळेपर्यंत असलेली अकार्यक्षम पोलीस यंत्रणा व अंमलीपदार्थविरोधी कायद्यांचा अभाव अशी हिप्पी जीवनशैलीसाठी पोषक परिस्थिती असल्याने गोवा अमेरिका आणि युरोपातल्या हिप्पींना आकर्षित करत होता. ‘हिप्पी ट्रेल’ (Hippy Trail) अंतर्गत युरोप ते आशिया ६००० मैलांचा प्रवास जमीनीवरून करत फार मोठ्या प्रमाणावर ही मंडळी गोव्यात येत असत.
एकाच ठिकाणी दिर्घकाळ वास्तव्य करणे त्यांच्या विचारधारेत बसत नसले तरी त्यांच्यापैकी कित्येकजण गोव्यत कायमचे स्थाईक झाले आहेत.

ऐंशीच्या दशकात बदललेल्या भूराजकीय परिस्थितीमुळे हिप्पी ट्रेलचे इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातुन जाणारे प्रवासाचे मार्ग बंद झाल्याने आणि युरोप, अमेरिकेत हिप्पी चळवळीला उतरती कळा लागल्यावर पाश्चात्य देशांतुन येणाऱ्या हिप्पींचे प्रमाण घटत जात आज ते अत्यल्प झाले असले तरी गोव्याला जागतीक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यात हिप्पी लोकांनी दिलेले योगदान नाकारता येत नाही, त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.

आता हिप्पी गेले असले तरी त्यांच्या संस्कृती/जीवनशैलीचा प्रभाव इथे अजुनही दिसुन येतो. आपल्या परतीच्या प्रवासासाठी किंवा वास्तव्य कालावधी वाढणार असल्यास पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आपल्या बरोबर आणलेले परदेशी सामान/वस्तु विकण्यासाठी सत्तरच्या दशकात अंजुना बीचवर सुरू केलेले ‘Flea Market’ त्या परिसरात अजुनही टिकुन आहे. नोव्हेंबर ते एप्रिल ह्या कालावधीत दर बुधवारी भरणाऱ्या ह्या बाजाराचे स्वरूप आता बदलले आहे. हिप्पी विक्रेत्यांची जागा तिबेटी, नेपाळी, काश्मिरी, उत्तर आणि दक्षिण भारतीय तसेच स्थानिकांनी घेतली आहे. (कोविड निर्बंधांमुळे हा बाजार आमच्या ह्या गोवा भेटीच्यावेळी बंद होता.)

हिप्पी पर्वात अंजुना आणि आसपासच्या बागा, कळंगुट, हरमल (आरंबोल) अशा समुद्रकिनाऱ्यांवर विविध अंमली पदार्थांच्या नशेत पंग होऊन ट्रान्स मुझिकच्या तालावर रात्रभर रेव्ह पार्ट्या चालत.
आजही अशा पार्ट्या चालू आहेत फक्त ठिकाणे बदलली आहेत आणि पाश्चात्य देशांतून आलेल्या हिप्पींची जागा भारतीय नव-हिप्पींनी घेतली आहे.

Low-to-Medium BPM सायकॅडेलीक ट्रान्स संगीत आवडत असल्याने 2015 मध्ये पुण्यातल्या ‘ब्लु फ्रॅाग’ येथील पार्टीमुळे माहिती झालेल्या ‘गोवा गिल’ ह्या वयोवृद्ध डिजेच्या पुढे गोव्याला वॅगॅटोर येथील Origen Jungle Club मध्ये झालेल्या, तर ‘राजा राम’ ह्या डिजेच्या Hill Top Goa अशा दोन ओपन एअर क्लब्ज मध्ये रात्रभर चालणाऱ्या रेव्ह पार्टीजना आवर्जुन उपस्थितीही लावली आहे. गंमत म्हणजे ‘गोवा गील’ आणि ‘राजा राम’ ही नावे भारतीय वाटत असली तरी हे दोघे मुळचे अनुक्रमे अमेरिकन आणि ॲास्ट्रेलियन डिजे आहेत!

देशी- विदेशी डिजेंच्या अशा पार्टीजचे पास बुक माय शो आणि ॲानलाईन तिकीट विक्री करणाऱ्या तत्सम वेबसाईट्स, फेसबुक पेजेसवर राजरोसपणे उपलब्ध होत असल्याने मुंबई, पुणे, बंगरूळु, हैदराबाद ही महानगरे आघाडीवर असली तरी भारतातल्या जवळपास सर्व शहरांतुन अशा पार्टीजना तरूणाईचा भरघोस प्रतिसाद मिळतो तसेच विदेशी पर्यटकांची उपस्थितीही लक्षणीय असते.

व्यक्तिगत आयुष्यात अशाप्रसंगी "been there... done that..." असा दृष्टिकोन सदैव बाळगूनही का कोणास ठाऊक पण, गांजा पासुन कोकेन पर्यंत नानाविध प्रकारच्या नशा करून भोवताली सायकॅडेलीक संगीतावर थिरकणारी कोवळ्या वयातली कॉलेजवयीन मुलं-मुलीं, तरूण-तरूणी पाहुन येणारी खिन्नता व त्यांना जाणते-अजाणतेपणी हे अमर्याद स्वातंत्र्य आणि पैसा पुरवणाऱ्या त्यांच्या पालकांविषयी मनात उफाळून येणारा लाक्षणिक राग अशा भावना दूर सारून ह्या पार्टीज एंजॅाय करणे सुरूवातीला थोडेसे कठीण गेले असले तरी, 'शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न असुन आपल्याला कोणाच्या खाजगी/वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा वा ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही' ह्याची खूणगाठ मनाशी पक्की केल्यावर ते जमु लागले!

वेगवेगळ्या कारणांसाठी गोव्याला अनेकदा भेट दिलेली असल्याने तिथल्या काही स्मृती ह्या लेखाच्या निमित्ताने डोके वर काढत आहेत त्यामुळे बरंच अवांतर झाले आहे तेव्हा आता मालिकेतील ह्या भागाचा मुख्य विषय, म्हणजे कॅसिनोकडे वळतो 😀

"नऊच्या सुमारास आम्हाला मांडवी नदीच्या किनाऱ्यावरच्या ‘कॅसिनो प्राईड’ च्या तिकीट काउंटरपाशी सोडुन बहिण घरी निघुन गेली आणि आम्ही प्रवेशाची तिकीटे घेऊन मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटीवर असलेल्या कॅसिनो पर्यंत पोचवणाऱ्या लॅांचची वाट बघत जेट्टीवरच्या खुल्या प्रतिक्षालयात जाऊन बसलो…"

तिथे दहा-बारा मिनिटे वाट बघितल्यावर लॉंच आली आणि पुढच्या काही मिनिटांत आम्ही ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचलो!

casino pride
.

कित्येक हॅालिवुड चित्रपटांतुन विशेषत: बॅांड पटांतुन आपल्याला कॅसिनोंचे दर्शन घडत असते. त्यांतून कॅसिनोंची आकर्षक सजावट, तिथला ग्लॅमरस / स्टाईलीश स्री / पुरूषांचा सहज-बिनधास्त वावर, मद्यपान, वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारी खेळांत होणारी खेळाडूंची हार-जीत अशी दृष्ये आपल्या परिचयाची झालेली असतात.

अशा झकपक,चैतन्यमयी वातावरणाची आवड असल्यास किंवा ते अनुभवायची इच्छा असल्यास त्यासाठी अमेरिकेतील ‘लास वेगास’ (Las Vegas), चीनचा एक प्रांत असलेल्या मकाउ (Macau) अशा कॅसिनोंची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्या देशात जाण्याची गरज नाही, तो अनुभव आपल्याला गोव्यात अगदी सहज घेता येतो.

ग्लॅमरस माहौल, खाणे-पिणे, मनोरंजन, नाईट लाईफ, मौज-मस्तीची आवड/आकर्षण तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीविषयी खुला दृष्टीकोन बाळगणाऱ्यांनी आपल्या गोवा भेटीत एखाद्या कॅसिनोला आवर्जुन भेट द्यावी, त्यांच्यासाठी २४/७ सुरू असणाऱ्या ह्या ठिकाणी घालवलेले दिवसातले काही तास असोत की संपुर्ण रात्र असो, तो चांगल्या आठवणींच्या कप्प्यात जपला जाण्यासारखा एक यादगार अनुभव असेल हे नक्की! पण जर 'जुगार', 'मद्यपान', 'मौजमजा', 'छानछौकी', 'विलासीवृत्ती' विषयी घृणा, तिरस्कार, नावड अशा कुठल्या विशिष्ट किंवा नकारात्मक भावना मनांत असतील तर अशा व्यक्तींनी मात्र (विकतचा) मनस्ताप टाळण्यासाठी चुकुनही तिकडे फिरकू नये!

असो... भारताच्या भुमीवर जुगाराला कायदेशीर मान्यता नसल्याने कायद्यातल्या पळवाटा शोधून गोवा सरकारने मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटींवर ‘तरंगत्या’ कॅसिनोंसाठी परवानगी दिल्यावर १९९९ साली पहिला कॅसिनो सुरू झाला आणि आजघडीला गोव्यातल्या कॅसिनोंची संख्या पंधरा-सोळाच्या घरात पोचली आहे. त्यातले बरेचसे आकारमानाने भव्य असे कॅसिनो हे मांडवी नदित नांगरून ठेवलेल्या जहाजे/बोटी/यॅाट्सवर तरंगत्या स्वरूपात असले तरी नंतर कायदे आणखीन वाकवत / त्यातल्या आणखीन पळवाटा शोधत जमीनीवरच्या काही पंचतारांकीत हॅाटेल्स व रिसॅार्ट्स मध्येही लहान-मोठे कॅसिनो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली व ते यथावकाश सुरूही झाले. पण अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये ‘लाईव्ह टेबल्स’ ना परवानगी नाही, तेथे फक्त ईलेक्ट्रॅानीक/संगणकाधारीत मशिन्सवर जुगार खेळवला जातो आणि प्रवेश शूल्कही तरंगत्या कॅसिनोजपेक्षा कमी असल्याने त्याला पर्यटकांपेक्षा स्थानिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळु लागला.

"मध्यंतरी स्थानीक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी कॅसिनोत चालणाऱ्या जुगाराच्या नादाला लागुन आपले संसार उध्वस्त केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आणि त्यातुन लोकांमध्ये गोवा सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्यावर स्थानीकांना अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती."

आजघडीला गोवा सरकारच्या महसुलात कॅसिनोंपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा प्रचंड मोठा आहे. गोव्यातील खाण उद्योगावर प्रतिबंध आल्यानंतर महसुलात झालेली मोठी घट भरून काढण्यास ह्या कॅसिनोंनी सर्वात जास्त हातभार लावला आहे. कॅसिनोंमुळे स्थानिकांतही जुगारी वृत्ती वाढून कित्येक संसार उध्वस्त झाल्यामुळे बहुतांश स्थानिकांची मानसिकता कॅसिनोविरोधी असली आणि वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठवला जात असला तरी दुर्दैवाने ते बंद करण्याची हिंम्मत कुठलाही राजकीय पक्ष वा नेता दाखवू शकलेला नाही हि वस्तुस्थिती आहे. विरोधात असताना कॅसिनो बंद करण्याच्या घोषणा/आश्वासने सर्वच राजकीय पक्ष/नेते नेहमी देत असतात, पण सत्तेवर आल्यावर मात्र त्यांची भाषा बदलते. ह्याला आपल्या स्वच्छ चारित्र्य आणि साध्या रहाणीसाठी कित्येकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर हे देखील अपवाद नाहीत. त्यांनीही विरोधात असताना कॅसिनो वरून बरीच आग पाखड केली होती पण सत्तेत आल्यावर महसुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या विरोधात कारवाई करणे कसे अशक्य आहे वगैरे वगैरे असा सूर लावला होता. अर्थात ह्यात त्यांचा काही दोष आहे असेही नाही पण सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांची आगतिकता त्यातून स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे तर कॅसिनो बंद केल्यास गोव्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघेल अशी परिस्थिती आज आहे!

असो,
कॅसिनो म्हणजे ‘जुगारी अड्डा’ हे एक पक्के समीकरण आहे, किंबहुना जुगार हाच कुठल्याही कॅसिनोचा मुख्य व्यवसाय /उद्दिष्ट असले तरी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करूनही पर्यटकांना सहकुटुंब ह्याठिकाणी आपला वेळ मजेत घालवतां येतो.
जुगार खेळण्यासाठी असलेल्या गॅम्बलींग एरीया व्यतिरीक्त खान-पान आणि करमणुकीसाठी चांगले उपहारगृह, बार, बुफे लंच / डिनरसाठी डायनिंग एरिया, नाच-गाण्याचे व अन्य मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांसाठी विशेष विभाग, सेल्फी पॉईंट, निवांत बसण्यासाठी (आकारमानानूसार बोट/जहाज/यॅाट ज्यावर कॅसिनो असेल त्याचा) ‘डेक’ अशा अनेक गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे एका नव्या पैशाचाही जुगार न खेळता गॅम्बलींग एरीया पासुन ते कॅसिनोचे अन्य मजल्यांवरील इतर सर्व विभाग पहात फिरत, खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नाच-गाणे बघण्यात चार-पाच तास किंवा संपुर्ण रात्र कशी पसार होते त्याचा पत्ताही लागत नाही!

मांडवी नदीतल्या तरंगत्या कॅसिनोंसाठीचे प्रवेश शुल्क हे प्रत्येक कॅसिनोगणिक वेगवेगळे असते. सर्वसाधारणपणे किमान प्रवेश शुल्क सोमवार ते शुक्रवार प्रतिव्यक्ती १५०० रुपये तर शनिवार आणि रविवार साठी प्रतिव्यक्ती २००० रुपये एवढे असते. तिथे भेट देण्याआधी आपण प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क, उपलब्ध सेवा/सुविधा, नियमावली, ड्रेसकोड, त्या दिवसासाठीच्या विशेष ऑफर्स / पॅकेजेस विषयींची माहिती त्यांच्या वेबसाईटवर बघून, त्यांची तुलना करून आपल्यासाठी योग्य कॅसिनोची निवड करू शकतो. वर उल्लेख केलेल्या बुफे लंच / डिनर अशा खान-पान आणि करमणूकीसाठीच्या बहुतांश गोष्टी कॅसिनोच्या प्रवेश शुल्कात समाविष्ट असतात आणि तिथले उपहारगृह आणि बार त्याला अपवाद असले तरी गॅम्बलिंग एरियामध्ये टेबलवर विनामूल्य अमर्याद 'ड्रिंक्स' आणि 'स्नॅक्स' पुरवले जातात (त्यासाठी खेळण्याची सक्ती नाही, फक्त गॅम्बलिंग टेबलजवळ बसणे वा उभे राहणे आवश्यक असते.)

काही कॅसिनोजमध्ये सहसा (किंवा शनिवार/रविवार असल्यास) प्रवेश तिकिटासोबतच तर काहींमध्ये थोडेफार अधिकचे पैसे भरून खेळण्यासाठी ठराविक रकमेच्या OTP (one time play) चिप्स दिल्या जातात. कॅसिनोत 'जुगार' खेळण्यासाठी देण्यात आलेल्या अशा 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स रुपी कागदी कूपन्सचा उपयोग खरंतर अतिशय मर्यादित स्वरूपात करता येतो आणि त्या थेट 'एनकॅश'करता येत नाहीत. रुलेट (Roulette) आणि स्पिन व्हील (Spin Wheel / Wheel of fortune) अशाप्रकारच्या खेळांत आणि त्यातही फक्त 'एकास एक' चा (१:१) भाव देणाऱ्या 'बेट्स' खेळण्यासाठी काही निवडक टेबल्सवर त्यांचा वापर करता येतो. असे असले तरी संयम राखत 'टुकू टुकू' खेळून नशिबाची साथ मिळाल्यास आपण प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल करण्यात तरी यशस्वी होऊ शकतो, फक्त एक पथ्य मात्र पाळायचे, 'आपण इथे जुगार खेळण्यासाठी आलो नसून केवळ एक छानसा अनुभव घ्यायला आलेलो आहोत' हे कदापि विसरायचे नाही, आणि आपल्याला मिळालेल्या 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स जरी आपण गमावल्या तरी अधिकचे पैसे खर्च करून चुकूनही नवीन चिप्सची खरेदी करायची नाही. अगदी टेबलवर अन्य कोणी कितीही जिंकत असताना दिसत असले तरीही!
---
असो, तर ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचल्यावर आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये प्रवेशकर्ते झालो. दोघांना मिळालेल्या एकूण १००० रुपये दर्शनीमूल्याच्या ओटीपी चिप्स वापरून तिथे 'रुलेट' खेळत असताना माझे व्हिस्कीचे दोन पेग्स आणि भावाची दोन ग्लास बियर रिचवून झाली आणि मिळालेल्यापैकी ओटीपी 'पेपर कूपन्सना' सहाशे रुपये मूल्याच्या 'कॅश' करता येण्यायोग्य 'प्लास्टिक' प्लेयिंग चिप्स मध्ये परावर्तित करण्यात यश मिळवून आम्ही साडे दहा-पावणे अकराच्या सुमारास बुफे डिनरचा आस्वाद घेण्यासाठी लिफ्टने वरच्या मजल्यावरील डायनिंग हॉलकडे मोर्चा वळवला.

Roulette
Roulette
.
अगदी 'आहाहा' म्हणावे अशाप्रकारचे नसले तरी बऱ्यापैकी चांगल्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले जेवण झाल्यावर मनोरंजन कक्षात कोकणी भाषेतील गाण्यांवर झालेला समूहनृत्याचा कार्यक्रम बघून पुन्हा आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये आलो.
'बिगिनर्स लक' (Beginner's luck) म्हणतात त्याप्रमाणे आमच्या बंधुराजांचे नशीब जोरावर होते आणि आता जास्त परतावा देणाऱ्या बेट्स खेळण्यासाठी हातात प्लास्टिक चिप्सही होत्या. ह्या भांडवलाच्या जीवावर त्याने रुलेट मध्ये दीड-दोन तासात बऱ्यापैकी माया जमवल्यावर मग आम्ही 'Spin Wheel', 'Baccarat', 'Black Jack', अंदर बाहर, इंडियन फ्लश आणि स्लॉट मशिन अशा वेगवेगळ्या देशी-विदेशी जुगारी खेळांमध्ये नशीब आजमावत पहाटे चार पर्यंत टाईमपास केल्यावर मग 'कॅसिनो प्राईड २' ह्या त्याच ऑपरेटरच्या मांडवी नदीतील आकाराने थोड्या लहान असलेल्या दुसऱ्या कॅसिनोमध्ये जायला निघालो.

Baccarat
Baccarat
.
Black Jack
Black Jack
.
मी आतापर्यंत गोव्यातल्या पाच वेगवेगळ्या कॅसिनोंना भेट दिली आहे पण त्यातले 'कॅसिनो प्राईड' (Casino Pride), 'डेल्टीन रोयाल' (Deltin Royale) आणि 'डेल्टीन जॅक' (Deltin Jaqk) हे तीन माझ्या विशेष आवडीचे आहेत. ह्या तिघांची आपापली काही वैशिष्ट्ये आहेत. 'कॅसिनो प्राईड' मला आवडतो कारण त्याचे भव्य स्वरूप आणि सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असूनही ह्याचे प्रवेश शुल्क तुलनेने सर्वात किफायतशीर आहे आणि विशेष म्हणजे एकाच तिकिटात आपण ह्याच कंपनीच्या इथे असलेल्या दोन कॅसिनोंना भेट देऊ शकतो! 'कॅसिनो प्राईड' वर कंटाळा आला तर 'कॅसिनो प्राईड २' वर जायचे, तिथे कंटाळा आला तर पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर परत यायचे, त्यासाठी दोन्ही ठिकाणी विशेष लॉन्च सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.

अर्थात 'कॅसिनो प्राईड' ची शिफारस मी फक्त मित्रा-मित्रांचा ग्रुप जाणार असेल तरच करतो, पण जर बरोबर स्त्री/स्त्रिया असतील तर मात्र प्रवेश शुल्क बऱ्यापैकी जास्त असले तरी 'डेल्टीन रोयाल' किंवा 'डेल्टीन जॅक' अशा ठिकाणी जाण्याची आग्रही शिफारस करेन. बाकी गोष्टींत/सोयी-सुविधांमध्ये फारसा फरक नसला तरी ह्या दोन ठिकाणी येणारा क्राऊड तुलनेने 'क्लासी' असल्याने स्त्रियांना सहज/मोकळेपणी वावरण्यासाठी कॅसिनो प्राईडपेक्षा इथले वातावरण पोषक/अनुकूल असते. पण बरोबर जर सगळेच पुरुष असतील तर कॅसिनो प्राईड हे माझ्यामते 'बेस्ट' आणि एकदम 'पैसा वसूल' ठिकाण आहे.

असो, 'कॅसिनो प्राईड' वरून लॉंचने आम्ही पहाटे सव्वा चार-साडे चारच्या सुमारास 'कॅसिनो प्राईड २' वर पोचलो तेव्हा तिथली गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. चालू असलेल्या टेबल्सवर तुरळक खेळाडूंची उपस्थिती असल्याने ह्याठिकाणी निवांतपणे बसून, शेजारी लावलेल्या स्टूलवर पद्धतशीरपणे सर्व्ह केलेल्या मद्याचा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत, अधून मधून बेट्स टाकत रुलेट खेळण्याची मजा घेता आली. काही बेट्स मध्ये हार तर काहींमध्ये जीत असा सिलसिला चालू होता. साडे सहाच्या सुमारास बहुतांश टेबल्स खेळाडूंअभावी बंद होऊ लागल्यावर आम्हीही तिथून काढता पाय घेतला आणि बहिणाबाईंना आम्हाला पिकअप करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता काल आम्हाला सोडलेल्या ठिकाणीच परत यायला सांगितले असल्याने तो पर्यंतचा जवळपास दोन तासांचा वेळ घालवण्यासाठी पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर आलो.

आता इथलीही गर्दी ओसरल्याचे दिसले. गॅम्बलिंग एरियामध्ये तुरळक टेबल्स चालू होती आणि उपस्थितांपैकी बहुतांशजण पेंगुळलेले दिसत होते तर जुगारात बऱ्यापैकी पैसे हारलेले 'ग्रेट गॅम्बलर्स' झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करताना दिसत होते. एकंदरीत रात्री इथे असलेले उत्साही, चैतन्यमयी, जोशपूर्ण वातावरण आता मात्र अगदीच निरुत्साही, ढेपाळलेले वाटायला लागले होते. किनाऱ्यावर परतण्यासाठी पर्यटकांची लॉंचसाठीची रांगही वाढत चालली होती. हाताशी अजून जवळपास तासाभराचा वेळ होता म्हणून आतल्या उपहारगृहातून चहा खरेदी करून आम्ही बाहेर ओपन डेकवर टाईमपास करण्यासाठी येऊन बसलो.
एकंदरीत रात्र मजेत गेली होती, खाऊन पिऊन प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल होऊन बंधुराजांचे भाग्य बलवत्तर असल्याने २२०० रुपयांची अतिरिक्त कमाईही झाली होती!
कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो.

"कॅसिनोमध्ये फोटो काढण्यास मनाई असल्याने ह्या भागात फोटो खूपच कमी टाकले आहेत, हि कमतरता पुढील भागांतून, जे गोव्यातले किल्ले आणि समुद्रकिनारे ह्यावर असतील त्यातून भरून काढण्यात येणार आहे 😀 तसेच लेखात जे फोटो दिले आहेत ते 'कॅसिनो प्राईड'च्या वेबसाईटवरून साभार घेतले आहेत."

पुढील भागः
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

5 Aug 2022 - 7:28 pm | तुषार काळभोर

गोव्याच्या कॅसिनोविषयी इतकं विस्तृत आणि व्यावहारिक लेखन मराठीत क्वचितच असावं!!

या लेखमालेतील माझा सर्वात आवडता लेख!!

कंजूस's picture

5 Aug 2022 - 8:23 pm | कंजूस

प्रत्यक्ष अनुभव दिल्याने मजा आली. (लेखाची सुरुवात वाचून विकी लेख आहे का अशी शंका आलेली.) हलके घ्या, श्रावण आहे. 😀

टर्मीनेटर's picture

8 Aug 2022 - 12:33 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ कंकाका

हलके घ्या, श्रावण आहे.

नो प्रॉब्लेम! माझा श्रावण वगैरे काही नसतो 😀

जेम्स वांड's picture

5 Aug 2022 - 10:32 pm | जेम्स वांड

ही अशी एक लेखमाला पण सुरू होती होय ;)

++++

भाग आवडला हे वेगळे सांगणे न लगे, तुमचा प्रवास, अन् निरलस वर्णनाची हातोटी तर ईजिप्त पासूनच लक्षणीय वाटली अन् मनसोक्त आवडली होतीच.

गोवा, बिअर, रेव पार्टीज हे कँडिड एक्सपिरियंसेस आवडलेच, एकंदरीत आजवर गोवा बघितले ते shack पुढे नव्हते, तुम्ही वेगळे गोवा दाखवले, कॅसिनो वगैरे मांडवी नदीत. नांगरून ठेवलेली अजस्त्र जहाजे गलबते कशी असतात ह्याचे वर्णन पण आवडले.

कॅसिनो मधे फोटोज् न काढू देणे ही स्त्रेटेजी आवडली आहे कारण आता कॅसिनो आतून पहायची हुरहूर लागली आहे !

अन् हो,

प्रिय मित्र सांजुभाऊ,

पुढील भाग लवकर टाका महाराजा

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कॅसिनो मधे फोटोज् न काढू देणे ही स्त्रेटेजी आवडली आहे

ते लाख फोटो काढायला परवानगी देतील हो, पण तिथे नित्यनेमाने येणारी अट्टल जुगारी मंडळी त्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करतील त्याचे काय 😀

मुंबई, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि राजस्थानातील असंख्य व्यावसायिक, व्यापारी आणि बडी धेंडं खास खेळण्यासाठी म्हणुन संध्यकाळी विमानाने येऊन सकाळी परत घरी जातात तर काही जण आठवडाभरासाठी तळ ठोकून लाखो रुपयांची हार-जीत करतात! बरं घरी बायको-पोरांना काय थापा मारून येत असतील तो वेगळाच विषय आहे, पण कॅसिनोत 'लकी चार्म' म्हणुन मिरवायला बरोबर आणलेल्या कुणा 'टिक-टॉक क्वीन', 'इन्स्टा गर्ल' बरोबर त्यांचा टिपलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि चुकून त्यांच्या बायको-पोरांच्या पाहण्यात आला तर नसती आफतच ओढवायची की हो 😀 😀 😀

आता कॅसिनो आतून पहायची हुरहूर लागली आहे !

जरूर पाहून या... तुम्हाला नक्कीच मजा येईल!

पण कॅसिनोत 'लकी चार्म' म्हणुन मिरवायला बरोबर आणलेल्या कुणा...
यावरून गंमत आठवली
एकदा मी आणि मित्र असे आम्ही भटकंती करीत ऑस्ट्रेलयातील उत्तरेला गेलो असताना एक जंगलातील अगदी नयनरम्य आणि विशेष म्हणजे उत्तम लाकडी कोरीव काम असलेले ट्री टॉप रिसॉर्ट दिसले .. बघुयात कसे काय म्हणून बघत होतो आणि त्यावेळी मीत्र विडिओ घेत होता .. थोडयावेळाने तेथिल मॅनेजर आला आणि म्हणाला कि कृपया घेऊन नका विडिओ... मित्राने हो म्हणले आणि विडिओ घेणे थांबवले .. पुढे तो मॅनेजर गप्पा मारता मारता म्हणाला काही नाही वाईट वाटूनघेऊन नका पण काय आहे कि आमचे हे छोटेखानी हॉटेल फक्त "तो आणि ती" साठी खास असले तरी प्रत्येक तो च्या बरोबर येणारी "ती" हि त्याची बायकोच असते असे नाही >>>>>
असो हे ते ठिकाण https://www.booking.com/hotel/au/secrets-on-the-lake.html?activeTab=phot...

तरी प्रत्येक तो च्या बरोबर येणारी "ती" हि त्याची बायकोच असते असे नाही

😀 😀 😀
भारी किस्सा!

बाकी फोटोज बघून 'हे' ठिकाण इंटरेस्टिंग वाटतंय.

नंदन's picture

6 Aug 2022 - 5:28 am | नंदन

भाग आवडला हे वेगळे सांगणे न लगे, तुमचा प्रवास, अन् निरलस वर्णनाची हातोटी तर ईजिप्त पासूनच लक्षणीय वाटली अन् मनसोक्त आवडली होतीच.

असेच म्हणतो. योग्य तिथे डिस्क्लेमर्स देऊन, संयत शैलीत केलेलं वर्णन आवडलं. पुढील भागाची वाट पाहतो आहे.

अतिशय ओघवते वर्णन. कॅसिनोच्या अनोख्या आणि अनोळखी जगात तुम्ही अगदी सहजतेने फिरवून आणले. आतापर्यंत गोव्यात गेल्यावर बांदोडकर मार्गावर मांडवीच्या काठावरील बाकड्यांवर बसून चमचमते तरंगते कॅसिनोज पाहायला खूप आवडतं असे आता मात्र प्रत्यक्ष कॅसिनो बोटींवर जावेच असे वाटू लागले आहे.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2022 - 1:14 pm | टर्मीनेटर

@ नंदन & प्रचेतस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

आता मात्र प्रत्यक्ष कॅसिनो बोटींवर जावेच असे वाटू लागले आहे.

जरूर जाऊन या 👍

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Aug 2022 - 1:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

असेच म्हणतो. आतापर्यंत गोव्याला जाणे म्हणजे एक दिवस देवळे, एक दिवस समुद्रकिनारे, पणजी मार्केट, मांडवी नदी, आणि क्रुझ सफारी/वॉटर स्पोर्टस एव्हढेच समीकरण होते. आता मात्र हे वर्णन वाचुन पुढच्या वेळी कॅसिनोची भर पडेल :)

उपेक्षित's picture

6 Aug 2022 - 8:03 am | उपेक्षित

उपेक्षित साहेब, प्रतिसादात स्मायल्या टाकल्या की काय?
फक्त शीर्षकच प्रकाशित झालंय 😔

कर्नलतपस्वी's picture

6 Aug 2022 - 8:04 am | कर्नलतपस्वी

वर्णन मस्त आहे..आवडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Aug 2022 - 9:09 am | ज्ञानोबाचे पैजार

गोवा भेटीत या महाकाय नौका पाहिल्या होत्या, तिथे केलेल्या क्रूझ सफारी मधे या नौकांच्या थोडे जवळुन दर्शनही घेता आले होते. पण आम्हाला तुम्ही तर थेट आतून फिरवुन आणलेत.

हिप्पींबद्दलची माहितीही आवडली

पुभाप्र,

पैजारबुवा,

कुमार१'s picture

6 Aug 2022 - 9:45 am | कुमार१

नेहमीप्रमाणेच सुरेख ओघवते वर्णन

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Aug 2022 - 2:01 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान. कॅसिनोबद्दल आकर्षण आहे.
आता तिथे जावेसे वाटतय.

कॅसिनो या वेगळ्याच जगाची सफर घडवली, मस्त!

कर्नलतपस्वी, पैजारबुवा, कुमार१, ॲबसेंट माइंडेड ... & भक्ती

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कपिलमुनी's picture

6 Aug 2022 - 4:29 pm | कपिलमुनी

बिग डॅडी मध्ये साडेचार हजार किंवा जास्त चे तिकीट आहे तिथे पोल डान्स , बेली डान्स च्या शो ला एन्ट्री असते... डेक वरची एन्ट्री खूप महाग होती... सर्वात खाली एक कंपार्टमेंट होता ते नो लिमिट होता.. पण त्याची एन्ट्री काही सांगितली नाही..

टर्मीनेटर's picture

8 Aug 2022 - 3:50 pm | टर्मीनेटर

बिग डॅडी मध्ये साडेचार हजार किंवा जास्त चे तिकीट आहे

हे त्यांचे पॅकेज आहे, प्रवेश शुल्क इतर दिवशी २०००/ २५०० आणि विकएंडला ३०००/३५०० च्या आसपास असते. प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क आणि अन्य पॅकेजेस वेगवेगळी आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे 'इव्हेंट्स' आयोजित केले जातात त्यामुळेही शुल्क बदलत असते. सर्वसमावेशक पॅकेजेस खूपच महाग असतात त्यासाठीच जाण्या आधी त्यांच्या वेबसाईट बघणे श्रेयस्कर!

सर्वात खाली एक कंपार्टमेंट होता ते नो लिमिट होता.. पण त्याची एन्ट्री काही सांगितली नाही..

पर्यटकां व्यतिरिक्त त्यांचा आपला आपला नेहमीचा ग्राहकवर्ग असतो. मोठ्या स्टेक्स खेळणाऱ्या अशा VIP खेळाडूंसाठी/सभासदांसाठी अशी राखीव कंपार्टमेंट्स/टेबल्स असतात.
'बिग डॅडी' चे प्रवेशशुल्क हे एकंदरीत तिथल्या सेवा-सुविधांच्या मानाने 'ओव्हर प्राईस्ड' वाटल्याने मला आवडलेल्या ३ कॅसिनोंच्या यादीत त्याचा समावेश केला नाहीये.

कपिलमुनी's picture

8 Aug 2022 - 4:05 pm | कपिलमुनी

माझे साडे चार फक्त पोल डान्स बघून फिटले

टर्मीनेटर's picture

8 Aug 2022 - 5:04 pm | टर्मीनेटर

सही हैं... भावना पोचल्या 🙏 😀 😂

चौकस२१२'s picture

9 Aug 2022 - 7:23 am | चौकस२१२

कपिलमुनी हे असल काहि अस्त भारतात ?

कपिलमुनी हे असल काहि अस्त भारतात ?

चौकस साहेब काय समजता काय तुम्ही आमच्या भारताला 😀 ऑ?

राजमुंद्री (Rajahmundry/Rajamahendravaram) हे आंध्र प्रदेशातील गोदावरी तिरावरचे एक शहर तिथल्या इस्कॉन मंदिर आणि कोटिलिंगेश्वर ह्या प्राचीन मंदिरासाठी पर्यटक / भाविकांमध्ये प्रसिद्ध असले तरी एकेकाळी चालुक्यांची राजधानी आणि'तेलगु' भाषेचे जन्मस्थान मानले जाणाऱ्या ह्या शहरात काय काय गोष्टी चालतात हे समजले तर डोळे पांढरे व्हायची वेळ येईल 😀
अर्थात सगळ्या ऍक्टिविटीज अनधिकृत असल्या तरी 'एका रात्रीसाठी' देशभरातून तिथे येऊन जाणाऱ्यांच्या सोयीसाठी ४-५ लाख लोकसंख्येच्या ह्या शहरात 'एअरपोर्ट' सुद्धा आहे!

अर्थात राजमुंद्री हे फक्त नमुन्यादाखल एक उदाहरण झाले, अशी कितीतरी 'hidden secretes' विलासीवृत्तीच्या राजे, महाराजे, बादशहा, नवाबांचा इतिहास लाभलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेली आहेत ज्यांची माहिती गुगल/विकीपीडियावर मिळणार नाही, ती शोधून अनुभवावी लागतात 😀 😀 😀

सुबोध खरे's picture

24 Aug 2022 - 7:37 pm | सुबोध खरे

राजमुंद्री इतके लांब जायला नको

आपले आवडते तीर्थ स्थळ मुंबई पासून केवळ ६५ किमी अंतरावर असलेले टिटवाळा हे सुद्धा अशाच सुरस आणि चमत्कारिक कारणासाठी "माहितगार लोकांमध्ये" प्रसिद्ध आहे.

मुंबईहून दुपारी कामासाठी नाशिकला जाणारे व्यावसायिक वाट वाकडी करून टिटवाळ्यात येतात.

तेथे सर्व तर्हेची हॉटेल्स लॉजेस तासाचा बोलीवर किंवा रात्रीच्या बोलीवर उपलब्ध आहेत.

तेथे आपले "मित्र" आपल्याला "सुंदर आणि तरुण मैत्रिणीबरोबर" सहवास घडवून आणतात.

सकाळ झाली कि श्री महागणपतीचे दर्शन घयायचे आणिआपल्या व्यवसायासाठी कूच करायचे.

सात आठ वर्षांपूर्वी मी सहा महिने तेथे समाजसेवा म्हणून जात असताना मला हे विराट दर्शन झाले.

या आडवाटेच्या गावी इतकी हॉटेल्स कशी काय? या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून हि सुरस आणि चमत्कारिक माहिती बाहेर आली

आताची पिढी फार चोखंदळ आहे हो खरे साहेब, त्यांना 'ह्या' कारणासाठी टिटवाळ्याला जाणे डाऊन मार्केट वाटते. त्यापेक्षा ते सरळ खार, बांद्रा किंवा अंधेरीला जाणे पसंत करतात.
सिने/टेलिव्हिजन अभिनेत्री, मॉडेल बनण्याच्या इच्छेने मुंबईकडे धाव घेणाऱ्या सुंदर, तरुण मुलींची अजिबात कमी नाही. त्यामुळे एक फ्लॅट चार-पाच जणींत शेअर करणाऱ्या अशा बिच्चाऱ्या स्ट्रगलर्सना आपला अवाढव्य खर्च भागवण्यासाठी तास-दोन तास किंवा रात्रभरासाठी नवीन नवीन मित्रांची गरज पडत असते.
हा, पण तिथे जाण्यात टिटवाळ्याला जाण्याच्या तुलनेत खर्च चौपट-पाचपट होतो पण त्या बिच्चाऱ्या होतकरू स्ट्रगलर्सना आर्थिक मदत केल्याचे पुण्यही पदरात पडते आणि स्वप्नातही ज्यांना हात लावायची त्यांना हिम्मत होणार नाही अशा सौन्दर्यवतींचा त्यांच्याच फ्लॅटवर 'सहवासही' घडतो 😀

असो, वरील 'पोल डान्स' विषयीच्या प्रतिसादात आलेला 'राजमुंद्री' चा उल्लेख हा दोन-पाच हजारांचा खुर्दा खिशात खुळखुळवत टिटवाळ्याच्या चादरबदलू लॉज/हॉटेल्स मध्ये जाऊन आपला कार्यभाग साधणाऱ्या 'बालवाडी' कॅटेगरीतल्या कोणा आंबटशौकिन टॉम, डिक आणि हॅरीच्या संदर्भात केला नसून 'एका रात्रीत' किमान दोन-पाच लाख ते कमाल कितीही दौलतजादा करू शकणाऱ्या 'डॉक्टरेट' कॅटेगरीतल्या विलासीवृत्तीच्या राजे-महाराजे, बादशहा, नवाबांचे 'ऊंचे' शौक ठेवणाऱ्यांच्या संदर्भात केला होता.
दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या अ‍ॅक्टिव्हीटीज मध्ये 'स्त्रीदेह' हा कॉमन फॅक्टर असला तरी त्याच्या उपयोगातील 'वैविध्याच्या' बाबतीत राजमुंद्री आणि टिटवाळ्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याबाबतीत राजमुंद्री ह्या शेषनागापुढे टिटवाळा हे गांडूळ आहे! त्यामुळे विविक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्याची मनीषा बाळगणाऱ्यांसाठी मुंबईपासून सुमारे ११५० किमी लांब असले तरी राजमुंद्रीला जाणे त्यांना भागच 😀
अर्थात सगळ्या अ‍ॅक्टिव्हीटीज अनधिकृत असल्याने ह्या विषयावर सार्वजनिक असो वा खाजगीत, पण अधिक बोलणे मला योग्य वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो.

इति लेखनसीमा!

सतिश गावडे's picture

6 Aug 2022 - 5:45 pm | सतिश गावडे

जेव्हा जेव्हा गोव्याला जातो तेव्हा मांडवीच्या किनारी असलेल्या यांच्या काऊंटरच्या आसपास फेरफटका मारतो. कसिनोच्या तिकिटाच्या अडीच तीन हजारात नेमकं काय मिळणार आहे हे नेमकं कळत नसल्याने कधी कसिनोला गेलो नाही.

या लेखाने त्या अडीच तीन हजारात काय मिळते हे कळले. :)

टर्मीनेटर's picture

8 Aug 2022 - 3:58 pm | टर्मीनेटर

त्या अडीच तीन हजारात काय मिळते हे कळले. :)

धन्यवाद 🙏

एक राहिलंच... ह्या सगळयाच्या जोडीला बोनस म्हणुन रिअल लाईफ 'फॅशन शो' देखील अनायसे बघायला मिळतो 😀

नचिकेत जवखेडकर's picture

8 Aug 2022 - 12:34 pm | नचिकेत जवखेडकर

झकास!!

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 4:49 pm | मुक्त विहारि

वाखूसा....

राजेंद्र मेहेंदळे, नचिकेत जवखेडकर & मुविकाका
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

सौंदाळा's picture

8 Aug 2022 - 5:23 pm | सौंदाळा

गोव्यात अनेक वेळा जाउन कॅसिनोला कधी गेलो नाही.
खूप छान माहिती.
याच धर्तीवर मुंबईच्या समुद्रात कॅसिनो का चालू होत नाहीत म्हणजे एवढ्या लांब जायला नको.

महसुलात चांगलीच वाढ होईल ...

म्हणजे, महिना 100 कोटी उत्पन्न असेल तर, महिना 1000 कोटी तरी मिळायला हरकत नसावी ....

धर्मराजमुटके's picture

8 Aug 2022 - 6:27 pm | धर्मराजमुटके

हो ना.
मग लिस्ट बनवून दारोदार पैसे मागत हिंडावे लागणार नाही. पाण्यातून पाण्यासारखा पैसा कमविता येईल.

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 6:32 pm | मुक्त विहारि

शिवाय, अरबस्तानातून पैसा येईलच....

तसंही मुंबई वर राज्य WWW चेच आहे ...

एक W अशा मार्गाने आणि इतर दोन W, ह्या Wच्या हाता हात घालून ...

याच धर्तीवर मुंबईच्या समुद्रात कॅसिनो का चालू होत नाहीत

मध्यंतरी ह्यावर विचार चालू असल्याच्या बातम्या येत होत्या पण बारगळलेला दिसतोय तो विचार.
समुद्रात असे काही करायचे झाले तर केंद्राच्या अनेक खात्यांच्या/विभगांच्या परवानग्या लागतील, बिमारू राज्य नसल्याने महसूलाच्या मुद्द्यावर केंद्राकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यताही कमीच, निर्णय लाल फितीत अडकून पडण्याची शक्यता अधिक आणि लोकांचा विरोध होईल ते वेगळेच त्यामुळे महाराष्ट्रात कॅसिनो सुरु होणे एकंदरीत महाकठीण काम!

भारतात गोव्याबाहेर आजघडीला फक्त सिक्कीम मधील गंगटोक येथे 'Deltin Denzong' हा एकमेव कॅसिनो सुरु आहे. दमण येथे 'The Deltin' ह्या पंचतारंकित रिसॉर्टमध्ये तब्बल ६०००० चौ. फू. क्षेत्रफळावर आलिशान कॅसिनो बनवण्याचे काम चालू होते आणि तो २०१७ मध्ये सुरु होणार होता पण अजूनही लाल फितीत अडकल्याने कंपनीची शेकडो कोटींची गुंतवणूक अडकून पडली आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

8 Aug 2022 - 6:40 pm | ॲबसेंट माइंडेड ...

>> तसंही मुंबई वर राज्य WWW चेच आहे >>
म्हणजे काय ते समजले नाही.

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 6:51 pm | मुक्त विहारि

Wealth

Woman

Wine

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

8 Aug 2022 - 7:22 pm | ॲबसेंट माइंडेड ...

अच्छा ;)

जुगाराच्या नादाला लागुन आपले संसार उध्वस्त केल्याच्या अनेक घटना समोर आल्या
सिंगापोर ने यावर एक छोटा उपाय काढला आहे तोम्हणजे तेथील कसिनोत स्थानिक जर जाणार असेल तर त्याला १०० डॉलर आधी दयावे लागतात बाहेरील निवासी असले तर प्रवेश फुकट .. अर्थात सिंगापोर हा छोटा देश असल्यामुळे ते शक्य आहे
या निर्बंधांचा थोडा फार फायदा होत असावा !

टर्मीनेटर's picture

9 Aug 2022 - 12:03 pm | टर्मीनेटर

सिंगापोर ने यावर एक छोटा उपाय

चांगलाच दांडात्मक उपाय आहे हा 😀

सिंगापोर चा/चे कॅसिनो व्यस्त वेळापत्रकामुळे पाहण्याचा योग आला नव्हता, पण त्याच (सिंगापोर-मलेशिया) ट्रिपमध्ये आम्हाला मलेशियातील 'गेंटिंग हायलँडस' (Genting Highlands) इथला 'Casino De Genting' हा भव्य-दिव्य कॅसिनो (तिथे जाण्याचा विचारही केलेला नसताना) ३-४ तासांचा फावलावेळ मिळाल्याने अनपेक्षितपणे बघायला मिळाला होता!
तिथे पर्यटकांना प्रवेशशुल्क होते पण २१ वर्षांखालील व्यक्ती आणि स्थानिक मुस्लिमांना (Malaysian Muslims) मात्र प्रवेशबंदी होती.

MipaPremiYogesh's picture

9 Aug 2022 - 8:20 pm | MipaPremiYogesh

मस्तच लेख पण खूप वाट पाहायला लावली. पटापट येऊ द्यात पुढचे भाग.

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 9:38 am | रंगीला रतन

+१२०८२२
खूप वाट पाहायला लावली. हा भागही आवडलाच.

अथांग आकाश's picture

11 Aug 2022 - 10:41 am | अथांग आकाश

झ्क्कास! मस्तच लेख!! अवडला!!!
x
पुभाप्र.

मित्रहो's picture

11 Aug 2022 - 11:45 am | मित्रहो

छान ओळख करुन दिली.
माझ्या ओळखीतले काही दरवर्षी गोव्यात कसिनोला भेट देत असतात (यातले काही पित सुद्धा नाही). मी भारताबाहेरील कसिनोत गेलो आहे. ते चकचकीत वातावरण फेरफटका मारायला चांगले असते. गोव्यात कधी असे केले नाही. फार इच्छा नाही पण नाही असेही नाही. बघू

MipaPremiYogesh, अथांग आकाश, मित्रहो & रंगीला रतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

गोरगावलेकर's picture

16 Aug 2022 - 3:43 pm | गोरगावलेकर

कॅसिनोच्या विश्वाची खूप चांगली ओळख

एक_वात्रट's picture

24 Aug 2022 - 6:58 pm | एक_वात्रट

प्रवासवर्णन नेहमीप्रमाणेच ओघवते आणि चित्रदर्शी आहे. कॅसिनोंच्या विश्वाची ओळख करून देणारा हा मराठीतला बहुतेक पहिलाच लेख असावा. 'चल गोव्याला जाऊ आणि कॅसिनो पाहू' असं हा लेख वाचण्याआधी कुणी मला म्हटलं असतं तर मी त्याला निश्चितच नकार दिला असता, पण आता मात्र कॅसिनो पहायची उस्तुकता वाटते आहे. टर्मीनेटर, एक मात्र सांगतो, प्रत्येक क्षण आनंदानं जगण्याच्या आणि प्रत्येक गोष्टीची मजा घेणाच्या तुमच्या वृत्तीचं खरोखरंच कौतुक वाटतं! आयुष्य असं जगायला हवं, रसरशीतपणे, वेगवेगळे अनुभव घेत, प्रत्येक मिनिटाचा आनंद घेत! YOLO हा हॅशटॅग अनेक जण सर्रास वापरतात, पण तुम्ही तो खरोखर जगता आहात असं तुमच्याकडे पाहून वाटतं!

टर्मीनेटर's picture

25 Aug 2022 - 3:28 pm | टर्मीनेटर

गोरगावलेकर | एक_वात्रट
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ एक_वात्रट

'चल गोव्याला जाऊ आणि कॅसिनो पाहू' असं हा लेख वाचण्याआधी कुणी मला म्हटलं असतं तर मी त्याला निश्चितच नकार दिला असता, पण आता मात्र कॅसिनो पहायची उस्तुकता वाटते आहे.

'चल गोव्याला जाऊ आणि कॅसिनो पाहू' ह्यात यमक छान जुळ्ल्याने ओळ काव्यमय झाली आहे 😀
कॅसिनोला जरुर भेट द्या, तो एक छान अनुभव असतो.

बाकी तुमचा कौतुकयुक्त प्रतिसाद वाचल्यावर जर दोन चार-मुठी मांस अंगावर चढून माझे वजन वाढले तर त्याची सर्वस्वी जवाबदारी तुमची असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी 😀 😂
जोक अपार्ट, आपल्या दिलखुलास प्रतिसादासाठी दिलसे धन्यवाद.

कॅलक्यूलेटर's picture

25 Aug 2022 - 5:10 pm | कॅलक्यूलेटर

मस्त मालिका आणि वर्णन