आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३
रात्री लवकर झोपल्याने सकाळी जाग देखील लवकर आली. सुर्योदयानंतरच्या प्रसन्न वेळी बंगल्याच्या मागे असलेल्या विहीरीच्या बाजुला खुर्चा टाकुन चहापान झाल्यावर कुडाळला जाण्यासाठी तयारी करायला घेतली.
नऊच्या सुमारास बाहेर पडुन चावी शेजाऱ्यांच्या हवाली केल्यावर नाश्ता करण्यासाठी कोळंबे फाट्यावरचे स्नॅक्स कॅार्नर गाठले. घावन चटणीच्या जोडीला गरमागरम बटाटा भजी असा भरपेट नाश्ता झाल्यावर शेजारच्या पेट्रोल पंपावर गोव्याला पोचण्यापुरते पेट्रोल भरून प्रवासाला सुरूवात केली.
आजचा कुडाळ पर्यंतचा प्रवास १४३ किलोमीटर्सचा होता.
पावस, पुर्णगड, कशेळी गाव, अडीवरे अशी ठिकाणे मागे टाकत राज्य महामार्ग क्रमांक ४ वरून राजापुर पर्यंतचा प्रवास सुरू होता. भरपूर चढ-उतार आणि अगदीच तुरळक रहदारी असलेला हा रस्ता फारसा रूंद नसला तरी आजुबाजुचा परिसर न्याहाळत त्यावरून मार्गक्रमण करायला मजा येत होती.
पन्नासेक कि.मी. अंतर पार केल्यावर साडे अकराच्या सुमारास राजापुरात उतररण्यासाठी असलेल्या घाट रस्त्याच्या फाट्यावर लिंबु सोडा पिण्यासाठी एक थांबा घेतला.
त्या फाट्यावर उजवीकडे वळून किमान अंतरात भरपूर उंचीवरून समुद्रसपाटीवर आणणाऱ्या, अतिशय धोकादायक वळणांच्या आणि तीव्र उताराच्या रस्त्यावरून घाट उतरायला सुरूवात केली.
रस्ता उतरत असताना थोड्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर नव्याने बांधण्यात येत असलेल्या अर्जुना नदीवरच्या ह्या मार्गावरील सर्वात उंच पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसत होते.
घाट उतरल्यावर राजापुर गावातल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ लागल्यावर पुढचा प्रवास कॅांक्रिटीकरण झालेल्या प्रशस्त चौपदरी रस्त्यावरून सुरू झाला.
नव्याने बनलेला झकास रस्ता आणि तुरळक रहदारी असल्याने आज मुक्काम करायचा असलेल्या कुडाळ एम.आय.डी.सी. तल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विश्रामगृहापर्यंतचा ९० कि.मी. चा प्रवास अवघ्या सव्वा तासात पुर्ण करून आम्ही दुपारी दिडच्या सुमारास रेस्ट हाऊसवर पोचलो.
काल रात्री केलेल्या फोनाफोनीत भाऊजींना (मोठ्या बहिणीच्या मिस्टरांना) आज आम्ही ह्या रेस्ट हाऊसवर मुक्कामाला येत असल्याचे कळवल्यावर त्यांनी इथला एक सुईट (Suite) आम्हाला उपलब्ध करून देण्याची सूचना इथल्या अधिक्षक अभियंता साहेबांना फोन करून देउन ठेवली होती.
रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्याने उघडून दिलेल्या एक्झिक्युटीव्ह सुईट मध्ये सामान ठेउन फ्रेश झालो.
मा. नारायण राणे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कुडाळ औद्योगिक क्षेत्रात निर्माण होउन नऊ-दहा वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेल्या सामाईक सुविधा केंद्रातल्या (Common Facility Centre) ह्या रेस्ट हाऊसमध्ये कोकण-गोवा भेटीत अनेकदा मुक्काम केलेला असल्याने रेस्ट हाऊसची व्यवस्था बघणारे काही निवासी/स्थानिक कर्मचारी, आचारी परिचयाचे झाले होते.
आपल्या पसंतीनुसार चांगले शाकाहारी/मांसाहारी जेवण ॲार्डर प्रमाणे मिळण्याची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध असली तरी भटकंतीच्या काळात जेवणाच्या वेळा अनिश्चित असल्याने एखाद दुसरा अपवाद वगळता इथे जेवण्याचा योग सहसा येत नाही.
आज आम्ही किती वाजता पोहोचू ह्याचा आगाऊ अंदाज नसल्याने आमचे जेवण बनवायला सांगितले नव्हते तरी पॅंट्रीची व्यवस्था बघणाऱ्याने ते तासाभरात बनवून देण्याची तयारी दाखवली होती पण भुक लागलेली असल्याने जवळच्या एका रेस्टॅारंट मधे जाऊन पंजाबी थाळी खाणे पसंत केले.
साडेतीनच्या सुमारास जेवण करून परतलो तेव्हा रेस्ट हाऊसच्या आवारात, डाव्या बाजुच्या मोकळ्या जागेतील लॅानवर छोटासा स्टेज उभारून कुठल्यातरी कार्यक्रमासाठी सजावट करण्याचे काम चालू असलेले दिसले.
रूममध्ये जात असताना तिथल्या परिचयाच्या एका कर्मचाऱ्याने अधिक्षक अभियंता साहेब कार्यालयात आले असल्याची माहिती दिली. मगाशी आम्ही इथे पोचल्याचे आणि रूम ताब्यात मिळाल्याचे कळवुन त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन करण्याची औपचारिकता पुर्ण केली होती पण आता ते इथे आलेच आहेत तर त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी ह्या विचाराने कार्यालयात गेलो.
नमस्कार चमत्कार आणि भाऊजींची वास्तपुस्त करून झाल्यावर अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. दिड-दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या इथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यावेळी कोविड निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेली रिटायरमेंट पार्टी आज संध्याकाळी इथे होणार असुन त्याची तयारी बाहेर चालु असल्याचे त्यांच्या कडुन समजले आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रणही त्यांनी आम्हाला दिले.
आमच्या कुटुंबातली मंडळी दत्तोपासक असल्याने विविध दत्त क्षेत्री जाणे नित्याचे आहे. २०१९ च्या कोकण भेटीत श्री दत्तांचे चौथे अवतार मानले जाणारे, घोरकष्टोधरणस्तोत्र रचीते श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) ह्यांचे जन्मस्थान असलेल्या, कुडाळ पासुन चौदा-पंधरा की.मी. अंतरावरच्या माणगाव (सिंधुदुर्ग जिल्हा) इथल्या श्री दत्त मंदिरात सहकुटुंब सह परिवार दर्शनासाठी आलो असताना ह्या रेस्ट हाऊसवर तीन दिवस मुक्काम केला होता.
त्या दौऱ्यात भाऊजीही सोबत असल्याने एम.आय.डी.सी. च्या रिजनल ॲाफीसमधल्या अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. आजच्या रिटायरमेंट पार्टीचे ‘उत्सवमुर्ती’ हे त्यावेळी ओळख झालेल्या अधिकाऱ्यांपैकीच एक होते. इतकेच नव्हे तर त्या रात्री मी भाच्याला गोव्यातला कॅसिनो दाखवायला घेऊन जाणार असल्याचे कळल्यावर रात्रभराच्या जागरणानंतर (आणि अर्थातच मी मद्यपान केलेले असणार हे गृहीत धरून 😀) सकाळी परतीच्या प्रवासात मला गाडी चालवावी लागु नये म्हणुन त्यांनी ड्रायव्हरसहीत त्यांची गाडी आम्हा दोघांना देण्याचे सौजन्यही दाखवले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यात अवघडलेपणा वगैरे वाटणार नसला तरी मला रिटायरमेंट पार्टी हा प्रकारच मुळात आवडत नाही.
अधिकारी पदावरून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीची रिटायरमेंट पार्टी असली तर खाण्या-पिण्याची आणि थोडीफार मनोरंजनाची उत्तम व्यवस्था ह्या जमेच्या बाजु असल्या तरी पाठीमागे शिव्या देणाऱ्या सहकाऱ्यांनी / हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दांभिकपणे स्तुतिसुमने उधळत ठोकलेली भाषणे आणि काही नातेवाईक मंडळींची काव्यप्रतिभा जागृत होउन त्यांनी प्रसवलेल्या कविता ऐकणे हे प्रकार फार डोक्यात जातात.
अशा प्रसंगी केक कशासाठी कापतात हा प्रश्नही मला नेहमी पडतो. पुर्वी वाढदिवसा पुरतां मर्यादीत असलेला हा प्रकार आता बारसे, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, उद्घाटन समारंभ, रिटायरमेंट पार्टी अशा कार्यक्रमांत पहायला मिळतोच आहे पण त्यापुढे जाउन काही अतिउत्साही मंडळी अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानात आणि तेराव्यालाही केक कापण्याचा पायंडा पाडतील की काय असेही वाटु लागले आहे 😀
उच्चपदस्थांचं एकवेळ ठिक आहे त्यांच्यासाठी अशा रिटायरमेंट पार्टीज थ्रो करणे हा स्टेटस सिंबॅाल असु शकतो आणि त्यांना प्रायोजकही असतात. पण हल्ली पेन्शन नसलेले नगरपालिका/महानगरपालिका/बॅंकेतले लिपिक, शिपाई, सफाई कर्मचारीही अंधानुकरणातून उत्पनाचा प्रमुख स्त्रोत बंद झाला असताना शंभर-सव्वाशे टाळकी जमवून निवृत्तीनंतरची गुजराण व्यवस्थीतपणे चालावी म्हणुन मिळालेल्या रकमेतुन लाखभर रूपये अशा अनावश्यक सोहळ्यांवर खर्च करताना बघीतले की थोडं विचित्र वाटतं.
असो, फारच विषयांतर झालंय 😀
तर आजच्या पार्टीला जाणे टाळण्यासाठी बहाणा शोधताना सहज पटण्यासारखे एक जेन्युईन कारण सापडले. आम्ही गोव्याला सहलीसाठी म्हणुन चाललो असल्याने अशा समारंभात घालण्यासाठी योग्य असे कपडे आम्ही बरोबर आणले नसल्याने कार्यक्रमस्थळी येऊ शकत नाही पण शुभेच्छा देण्यासाठी त्यांना खाजगीत नक्की भेटुन जाऊ असे सांगुन वेळ मारून नेली आणि चहापान झाल्यावर त्यांचा निरोप घेऊन तिथून निघुन चारच्या सुमारास रूमवर परतलो.
आता उरलेल्या वेळात आराम करणे आणि टिव्ही वर पिक्चर/गाणी बघणे एवढेच काम होते.
सह-सव्वा सहाच्या सुमारास “हॅलो माईक टेस्टींग वन…टु…थ्री…फोर…” असा आवाज बाहेरून आल्यावर लवकरच कार्यक्रमाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज आला.
रिकाम्या हातांनी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जायला नको म्हणुन आम्ही तयार होऊन बाहेर पडलो आणि तिथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडाळ बस स्टॅंड जवळच्या दुकानातून एक पुष्पगुच्छ घेऊन परतलो.
कमी आवाजात संगीत वाजत असलेल्या कार्यक्रमस्थळी बऱ्यापैकी निमंत्रीत मंडळी जमलेली दिसत होती. रेस्ट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ कोणाशीतरी बोलत उभा असलेला, आमच्याबरोबर गोव्याला आलेला साहेबांचा ड्रायव्हर भेटला. जवळपास पावणे दोन वर्षांनी आमची अशी अचानक भेट झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
किती नंबरच्या रूम मधे उतरला आहात आणि किती दिवसांचा मुक्काम आहे वगैरे चौकशी करून झाल्यावर त्यानेही पार्टीला येताय ना असे विचारल्यावर अभियंता साहेबांना दिलेले कारण पुढे करून तिथे येणार नसल्याचे सांगितल्यावर साहेब अत्ता कुटुंबासह अमुक नंबरच्या रूममध्ये तयार होत असुन तिथे त्यांची भेट घेता येईल अशी उपयुक्त माहिती त्याने दिली.
त्याच्या सांगण्याप्रमाणे करून रूममध्येच साहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचा आग्रह झाल्यावर पुन्हा तीच कॅसेट वाजवून पार्टीला येण्याबद्दलची असमर्थता व्यक्त केल्यावर त्यांनी आमच्या रूममध्येच खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था करून देण्याची सूचना त्यांच्या मुलाला व आमच्या बरोबर असलेल्या त्यांच्या माजी ड्रायव्हरला देऊन ते बाहेर कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर आम्हीही रूममध्ये येऊन आमचा टि.व्ही बघण्याचा कार्यक्रम कंटीन्यु केला.
साडेसातच्या सुमारास रेस्ट हाऊसचा कर्मचारी पार्टीस्थळाहून व्हेज मंचुरियन, चिकन लॅालीपॅाप, वेफर्स असे स्टार्टर्स आणि ड्रायव्हर महाशय एक VAT 69 ची बाटली घेऊन आले.
पुर्वीच्या सिनेमातल्या व्हिलन, स्मगलर वगैरे मंडळींकडे किंवा कुठल्या राय साहब, बिझनेसमनची श्रीमंती दाखवण्यासाठीच्या दृष्यांमध्ये हटकून दिसणारी आणि जवळपास सगळ्याच परमीट रूम्स, पब्ज मधल्या बार काउंटरवर गडद हिरव्या रंगाच्या व आकर्षक आकाराच्या बाटलीत दिमाखात मिरवणारी, क्वचीत प्रसंगी पार्टीज वगैरे मध्ये दिसणारी, उंची मद्यात गणना होणारी, पण नियमित सेवन करणारा अतिशय कमी ग्राहकवर्ग असलेल्या VAT 69 ह्या ब्लेंडेड स्कॅाच व्हिस्की विषयी “हा ब्रॅंड इतकी वर्षे भारतात कसा काय टिकुन आहे?” हा प्रश्न पंधरा एक वर्षांपूर्वी मला नेहमी पडायचा.
पुढे मित्रमंडळींपैकी काहीजण राजकीय क्षेत्रात तर काहीजण सरकारी नोकरीत अधिकारी पदावर स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
देशभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शासकीय विभागांकडुन निघणाऱ्या निविदांवर कामे करणारी छोटी-मोठी कंत्राटदार मंडळी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, महापौर, तहसीलदार, जिल्हधिकारी, अभियंता आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना टेंडर पास झाल्यावर तसेच कामाचे पैसे मिळाल्यावर आणि दिवाळी तसेच ३१ डिसेंबरला नववर्षाच्या निमित्ताने कृतज्ञतापूर्वक भेट म्हणुन देत असलेल्या वस्तुंमध्ये VAT 69 चा क्रमांक फार वरचा आहे.
दर वर्षी हजारोंच्या संख्येने टेंडर्स निघत असतात आणि तीची विक्री बिनबोभाट होत असते.
असो, आधी विषयांतर आणि आता फारच अवांतर झालंय 😀
आमचा खानपानाचा कार्यक्रम सुरू असताना पूर्वीचे साहेब निवृत्त झाल्यावर आता त्यांच्याजागी आलेल्या नवीन साहेबांच्या सेवेत रूजू झालेले ड्रायव्हर महाशय तास-दिड तास रूममध्ये आमच्याशी गप्पा मारत बसले होते. त्याच्या बोलण्यात आमच्या मागच्या भेटीत त्याला घडवलेल्या गोव्यातल्या कॅसिनो वारीचा विषय सातत्याने येत होता.
त्याने केलेले कॅसिनोचे, तिथल्या वातावरणाचे मौजमजेचे कौतुकमिश्रीत रसभरित वर्णन ऐकल्यावर भावाची तेथे जाण्याची इच्छा जागृत झाली नसती तरच नवल वाटले असते!
मग काय, एकट्याने तिथे जाण्यात अजिबात मजा नसल्याने गेल्या सहा वर्षांतल्या प्रत्येक गोवा भेटीत एक रात्र कॅसिनोत घालवण्याची परंपरा मोडत, आधी ठरवलेल्या सोलोट्रिपमधल्या गोवा भटकंतीच्या कार्यक्रमातून वगळलेल्या कॅसिनो भेटीचा समावेश करणे क्रमप्राप्त झाले.
बाटलीतले अर्ध्याहुन थोडे अधिक मद्य रिचवुन झाल्यावर शिष्टाचाराचे पालन (आणि त्यांची अव्यक्त अपेक्षापुर्ती) करीत उरलेला ऐवज ड्रायव्हर आणि रेस्ट हाऊसच्या आचाऱ्यासाठी म्हणुन त्यांच्या हवाली केला आणि पार्टीस्थळाहुन आलेल्या मालवण स्पेशल कोंबडी वडे, व्हेज पुलाव, आणि सोलकढी असे छान जेवण झाल्यावर थोडावेळ टि.व्ही बघत टाईमपास करून साडेदहाच्या सुमारास झोपलो.
सकाळी साडे नऊ पर्यंत मस्त झोप झाल्यावर रेस्ट हाऊसच्या आचाऱ्याने काल देऊन ठेवलेल्या सुचनेप्रमाणे बनवलेल्या मालवणी पद्धतीच्या आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी असा नाश्ता आणि चहा झाल्यावर आरामात अंघोळी वगैरे उरकुन साडे अकराच्या सुमारास करमळीला जायला निघालो.
NH-66 वरून प्रवास सुरू होता. झाराप, सावंतवाडी, इंसुली अशी ठिकाणे मागे टाकत बांद्याला महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर पत्रादेवीचा चेकपोस्ट पार करत तासाभरात सुमारे ५० कि.मी. अंतर कापल्यावर पेडण्याजवळ चहापान आणि पेट्रोल भरण्यासारख एक थांबा घेतला. महाराष्ट्रापेक्षा जवळपास अकरा रूपयांनी स्वस्त दरात पेट्रोल भरून टाकी फुल केली आणि पुढचा प्रवास सुरू केला.
रेस्ट हाऊस पासुन ८६ कि.मी. अंतराचा प्रवास पुर्ण करत तीनच्या सुमारास करमळी रेल्वे स्टेशनजवळ रहाणाऱ्या मामे बहिणीच्या घरी पोचलो.
कुडाळहुन निघताना फोन करून अंदाजे पोचण्याची वेळ कळवुन ठेवलेली असल्याने बहिणाबाईंनी साग्रसंगीत स्वयंपाक करून ठेवला होता.
फ्रेश झाल्यावर कोवीड परिस्थितीमुळे गेल्या वर्षी भेट न होऊ शकल्याने बऱ्याच साठलेल्या गप्पांचा कोटा संपवत जेवण झाल्यावर रात्री कॅसिनोमध्ये जाण्याचा कार्यक्रम ठरल्याने जागरण होणार होते त्यामुळे साडे चार ते साडे सहा मस्तपैकी झोप काढुन चहापान उरकल्यावर आम्ही तीघंजण बहिणीच्या कारने वीस कि. मी. वर असलेल्या दोना पावला (Dona Paula / डोना पॅाला) बीचवर पोचलो.
पणजीला खेटुन असलेल्या ह्या खेडेगावाचे नाव स्थानिक ग्रामस्थांनी १७८२ साली निवर्तलेल्या तत्कालीन पोर्तुगीज व्हॅाइसरॅायची मुलगी ‘दोना पावला’ हिच्या नावावरून ठेवले गेले असे म्हणतात. पण तिच्याबद्दल अनेक दंतकथा असल्याने नक्की इतिहास काय होता हे कळायला मार्ग नाही!
एक दंतकथा सांगते की पोर्तुगीज व्हॅाइसरॅायची मुलगी असलेली ‘दोना पावला’ नावाची तरूणी एका स्थानिक मच्छिमाराच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्याची तीची इच्छा तीच्या बापाला पसंत नसल्याने तीने दोना पावलाच्या टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे हे ठिकाण आज गोव्यातील प्रेमी जीवांचा स्वर्ग (Lover’s Paradise) म्हणून ओळखले जाते. ‘एक दुजे के लिये’ ह्या कमल हसन आणि रती अग्निहोत्रीची प्रमुख भुमिका असलेल्या हिंदी चित्रपटाचे बरेचसे शुटींग इथेच झाले होते. पण दुसरी कहाणी काही वेगळेच सांगते.
इतिहास काही का असेना पण मुंबईच्या मलबार हिल सारखा उच्चभ्रू दर्जा प्राप्त असलेल्या ह्या ठिकाणचा सुंदर बांधीव समुद्र किनारा, 'इमेज ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे शिल्प, गोव्याच्या राज्यपालांचे (किल्लेवजा महालरूपी) भव्य निवासस्थान असलेले ‘राजभवन’ (पुर्वीचे पोर्तुगीज नाव Palacio do Cabo) अशी आकर्षणे असल्याने दोना पावलाला पर्यटकांची लक्षणीय उपस्थिती असते.
आम्ही ह्या ठिकाणी पोचलो त्यावेळी बऱ्यापैकी अंधार पडला असल्याने काढलेले फोटो चांगले नाही आले म्हणुन जालावरचे तीन फोटोज खाली देत आहे.
दोना पावला बीच
इमेज ऑफ इंडिया शिल्प
राजभवन
इथल्या बांधीव धक्क्यावरच्या बेंचवर बसुन निवांतपणे समोरचा समुद्र आणि आसपासचा परिसर न्याहाळत असताना आमच्या शेजारच्या बेंचवर, खालती समुद्रात गळ टाकुन बसलेल्या एका साठ-पासष्टच्या आसपास वय असलेल्या गृहस्थाला मासा पकडण्यात यश आलेले दिसले.
त्यानंतर कितीतरी वेळ ते गृहस्थ उभे राहुन सतत आपली जागा बदलत, आपण पतंग उडवताना कधी हापसतो तर कधी ढील देतो त्याप्रमाणे हातातल्या फिशींग रॅाडच्या रिलचे लिव्हर उलट सुलट फिरवून कधी वाईंड तर कधी अनवाइंड करत असल्याचे बघुन कुतुहल वाटल्याने त्यांच्याजवळ जाउन हा काय प्रकार आहे ते बघु लागलो. माझी उत्सुकता पाहील्यावर आज चांगलाच मोठा मासा गळाला लागल्याने उत्तेजीत झालेल्या त्या काकांनी स्वत:हुन माहिती द्यायला सुरूवात केली.
गळाला लागलेला मासा पंधरा ते वीस किलो वजनाचा आणि ताकदवान असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मला त्यातले काही कळत नसल्याने त्यांच्या सांगण्यावर अविश्वास दाखवण्याचा उद्देश नव्हता पण माझ्याकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी “Hold this rod and feel it” असे सांगीतल्यावर तो फिशींग रॅाड हातात धरला तेव्हा त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे जाणवले!
पंधरा -वीस मिटर अंतरावर असलेल्या गळाच्या टोकाला नक्की काय लागलंय ते अंधारात दिसत नव्हते पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो कुठला मासा असेल तो पाण्याच्या पृष्ठभागावर न येता आपली सुटका करून घ्यायच्या प्रयत्नात ताकद पणाला लावत ज्यावेळी समुद्रात पाच-दहा मीटर आत जात होता त्यावेळी रिल अनवाइंड करायचे आणि तो थोडा दमल्यावर डावी किंवा उजवीकडे वळला की आपणही त्या दिशेने सरकत हळू हळू रिल वाइंड करत त्याला जवळ आणायचे.
पाच-सात मिनीटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खटाटोप केल्यावर मात्र मला कंटाळा आला आणि हातालाही रग लागल्यावर रॅाड त्यांच्या हाती सुपुर्द केला.
खरंतर जे काही गळाला लागलं होतं ते बघायची उत्सुकता होती पण त्या माशाची पुर्ण दमछाक होउन तो सुटकेचे प्रयत्न करणे सोडुन देईल तोपर्यंत त्याला बाहेर काढता येणार नाही तसे केल्यास धागा तुटण्याची शक्यता असुन सर्व मेहनत पाण्यात जाईल तसेच ही प्रक्रिया पुर्ण व्हायला अजुन पाऊण एक तासाचा वेळ लागु शकतो असे त्यांनी सांगीतल्यावर मात्र त्यांना शुभेच्छा देउन तिथुन काढता पाय घेतला.
गळ टाकुन मासे पकडणे संयमाची कसोटी पहाणारे काम असते हे माहिती होते पण त्यात इतक्या भानगडी असतात ह्याची कल्पना नव्हती.
असो, त्या निमित्ताने थोडी नवीन माहीती व एक वेगळा अनुभव मिळाला आणि वेळही मजेत गेला.
साडे आठच्या सुमारास तिथुन निघुन मिरामार बीचवर आलो. कोवीड कालीन निर्बंधांमुळे इथल्या चाट, भेळपुरी व अन्य खाद्यपदार्थांचे स्टॅाल्स, हातगाड्या बंद ठेवण्यात आल्याने इतर वेळी प्रकाशात न्हाऊन निघणारा, पर्यटक आणि स्थानिकांच्या गर्दीने फुलुन जाणारा हा बीच त्यावेळी अंधारात बुडालेला पाहुन कसेसेच वाटले. आल्यासारखे पाच-दहा मिनीटे तिथे वाळुत बसुन निघालो.
अंधारात बुडालेल्या मिरामार बीचवर बसलेली भावंडे
नऊच्या सुमारास आम्हाला मांडवी नदीच्या किनाऱ्यावरच्या ‘कॅसिनो प्राईड’ च्या तिकीट काउंटरपाशी सोडुन बहिण घरी निघुन गेली.
कॅसिनो प्राईड (फोटो जालावरून साभार)
प्रवेशाची तिकीटे घेऊन आम्ही मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटीवर असलेल्या कॅसिनो पर्यंत पोचवणाऱ्या लॅांचची वाट बघत जेट्टीवरच्या खुल्या प्रतिक्षालयात जाऊन बसलो.
पुढील भागः
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५
प्रतिक्रिया
11 Feb 2022 - 5:08 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान. कॅसिनो विषयी आकर्षण आहे. पुढचा भाग लवकर टाका.
11 Feb 2022 - 5:12 pm | कंजूस
कसीनो पुन्हा चालू केला काय क्रूझवर? ३ वर्षांपूर्वी विदेशी पर्यटक कमी होण्याचे कारण कसीनो बंदी आणि किनाऱ्यांवर बाटल्या नेणे बंद केले हे होते.
12 Feb 2022 - 12:55 pm | टर्मीनेटर
प्रतिसादासाठी आभार 🙏
महाराष्ट्र सरकारला जसा मद्य विक्रीतून प्रचंड महसूल मिळतो तसा गोवा सरकारला कॅसिनोतुन फार मोठ्या प्रमाणात मिळतो.
आपल्या इथे जशी मायबाप सरकारने दारूची दुकाने उघडण्याची घाई केली तशी घाई गोवा सरकारला कॅसिनो उघडण्याची झाली होती पण त्या आधी पर्यटन सुरु होणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना २०२० च्या सप्टेंबर पर्यंत वाट बघावी लागली. पुढच्या भागात त्याविषयी काही माहिती येईलच!
11 Feb 2022 - 5:37 pm | चौथा कोनाडा
जोरदार भाग, जणू ७० एमएमचा मोठा सिनेमाच !
तपशील रोचक आहेत. किती आनंद लुटला असेल याची कल्पना येतेय !
काही सांगता येत नाही ... हे ही घडेल .... हा... हा... हा... !
11 Feb 2022 - 6:19 pm | जेम्स वांड
टांगलेल्या दह्याचा चक्का होतो, इथं तर प्रॉपर दगड झाला टांगणीला लागून, पुढील भाग जरा लवकर टाका, काय ? (दमदाटी समाप्त)
तर, नेहमीप्रमाणे टीपीकल संजुभाऊ वर्णन तर आवडलेच. ह्या भागातील मुक्त विचार करणे पण आवडले तुफान. रिटायरमेंट पार्टी बद्दल तुमचे म्हणणे पटले. हल्लीच आमच्या ऑफिसमध्ये एक खतरुड म्हातारं रिटायर झालं तेव्हा मी त्यांनी मला परिविक्षा काळात दिलेला असह्य त्रास आठवून त्यांच्या रिटायरमेंट पार्टीला जाणे अन त्यासाठी काँट्रिब्युशन देण्यास पण स्पष्ट मना केले होते. ज्या माणसाने अपमान करायची एकही संधी सोडली नाही, केवळ वयाचा दाखला वापरून शष्प काम येत नसताना तरुण कामसू पोरांना "आजकालच्या पोरांना काय पगार दाबून, वीकएंडला पार्ट्या अन पोरी म्हणलं का काम आठवत नाही" म्हणत टोमणे मारले त्याच्या पार्टीत डालडा तोंडावर थापून तुपाळ हसत हॅ हॅ करणे तसेही मला मानवणारे नव्हतेच. तुम्ही कपड्यांचा बहाणा केला तसाच मी "अर्जंट कस्टमर मीटिंग्जचा" बहाणा करून सटकलो होतो.
व्हॅट ६९ बद्दल ऐकलं ते नवलच वाटलं एकदम मला तरी च्यायला. जनरली असे "ट्रॅडिशन" आर्मी, इंजिनिअरिंग कॉलेज, सिंगल सोंडगी पोरे अन ओल्ड मॉंक असे काहीसे कायम डोक्यात फिट होते, जोवर देशात फौज, पोलीस इतर गणवेषधारी सेवा, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि सडेफटींग पोरे आहेत तोवर ओल्ड मोंकास मरण नाही, तसेच आता जोवर देशात नोकरशाही, सरकारी टेंडर अन सरकारे आहेत तोवर व्हॅट ६९ च्या बाटलीस मरण नाही असे म्हणल्यास हरकत नसावी.
बाकी, लेखन सस्पेन्सच्या समेवर आणून क्रमशः करण्याची कला तेवढी बरी साधली आहेत हो संजुभाऊ, आता कॅसिनो बाहेर ताटकळत उभे आहोत, चला लवकर आत जाऊया, लास वेगासच्या गॅम्बलिंग संस्कृतीचे हे भारतीय भावंड कसे असेल त्याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.
12 Feb 2022 - 1:01 pm | टर्मीनेटर
प्रतिसादासाठी आभार 🙏
मध्यंतरी काही दिवस ओमायक्रॉन मुळे वाया गेल्याने हा भाग लिहायला उशीर झाला. पुढचे भाग लवकर लिहिण्याचा प्रयत्न करणार 😀
12 Feb 2022 - 7:01 pm | जेम्स वांड
मला पण झालता, काही जाणवलंच नाही हो, फ्लू सारखा आला अन फट म्हणता संपला पण ! जाऊद्या, हल्लीच बुलेटवर मस्त रपेटी सुरू झाल्याने मूड फ्रेशच असा ! तुम लवकर लिखो, अपुन इधर में रोज खाली फुकट झाडी मार के थक गयेला हैं अभी.
11 Feb 2022 - 6:58 pm | मुक्त विहारि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
12 Feb 2022 - 1:05 pm | टर्मीनेटर
ॲबसेंट माइंडेड, चौथा कोनाडा & मुवि काका
प्रतिसादासाठी आभार 🙏
12 Feb 2022 - 1:47 pm | प्रचेतस
हा भागही झक्कास. सरकारी विश्रामगृहे एकदम भारी आणि अतिशय सुंदर जागी असतात. मजा येते राहायला.
दोना पावलाच्या जेट्टीच्या पायाचे खांब झिजले असल्याने मध्यंतरी तिथे पर्यटकांना मज्जाव करण्यात आला होता, आता परत सुरु केलेले दिसतेय.
पणजीतल्या मांडवीच्या किनार्याने जाणार्या बांदोडकर मार्गावरील बाकड्यांवर बसून कॅसिनोच्या झगमगत्या बोटी पाहाणे मोठे मौजेचे असते.
12 Feb 2022 - 2:42 pm | कंजूस
भानगडीचा व्यवहार आहे.
तुम्ही खोली ताब्यात घेतली आणि रात्री सरकारी अधिकारी राहायला आला तर ताबडतोब रिकामी करावी लागते.
हा नियम ब्रिटिशांनी केलेला. त्याचा फटका केनेथ अ़डरसेनला ( शिकारकथा, मुदुमलाई जंगल भाग) बसला. वरांड्यात झोपण्याची त्यास परवानगी मिळाली हेसुद्धा कृपाच झाली. मग त्याने कानाला खडा लावला आणि संभाव्य जंगलांजवळ गावात घरे घेतली. ही इष्टापत्तीच ठरली कारण भारत सोडताना त्या जागेंचे पैसे मिळाले. पुस्तकात उल्लेख आहे.
नांदूर माध्यमेश्वर येथे पाणी खाते ( शेतीचा, इरिगेशन डिपा. )चे खूप छान दोन सुइट आहेत. तिथे मला जागा मिळाली नाही पण कर्मचाऱ्यांच्या खोलीत राहावे लागले. त्यानेही हीच माहिती दिली.
13 Feb 2022 - 11:29 am | टर्मीनेटर
केनेथ अँडरसनचा किस्सा रोचक आहे.
MIDC हे (निम सरकारी) महामंडळ आहे. त्यांच्या रेस्ट हाऊसचा वापर केवळ महामंडळाचे कर्मचारी आणि लोक प्रतिनिधीपुरता (आमदार/खासदार) मर्यादित असूनआपल्याला दिल्या गेलेल्या सुइट / रूमची नोंद संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या नावावरच होत असल्याने अशी रूम रिकामी करण्याची वेळ येत नाही.
13 Feb 2022 - 11:12 am | टर्मीनेटर
प्रतिसादासाठी आभार 🙏
+१११
दोना पावलाची जेट्टी अजूनही सुरु झाली नाहीये, तीच्या पुनरबांधणीचे काम अद्याप सुरुच आहे.
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर आताची काय परिस्थिती आहे हे चेक केले तेव्हा गुगल आणि tripadviser वर Temporary Closed असेच दाखवतंय आणि युट्युब वर एकानी अपलोड केलेल्या ह्या व्हिडिओतली ऑक्टोबर २०२१ मधली परिस्थिती बघता काम पूर्ण व्हायला अजून दीड दोन वर्षे तरी लागतील असं वाटतंय.
त्यावेळी आम्ही जेट्टी पर्यंत गेलो नव्हतो, टेकडीवरून जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर जेट्टीच्या थोडे अलीकडेच, पब्लिक पार्किंगच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या समुद्रकडील बाजूच्या संरक्षक भिंत किंवा तटबंदी सारख्या बांधकामावर असलेल्या सिमेंटच्या बेंचवर बसलो होतो. हा भाग समुद्रपेक्षा थोडा उंचावर असून इथे पाणी समुद्रकिनाऱ्यासारखे उथळ नसून थोडे खोल आहे त्यामुळे हा स्पॉट गळ टाकून मासे पकडणाऱ्यांसाठी नैसर्गिकरीत्या अनुकूल आहे.
अशा बांधकामाला समर्पक शब्द न सुचल्याने 'बांधिव धक्क्यावर' असा (अर्थातच चुकीचा 😀) शब्द मी लेखात वापरला आहे. त्यासाठी काही विशिष्ट शब्द असल्यास जरूर सुचवा लगेच दुरुस्ती करून टाकतो.
+१

आता ह्या मार्गावरून मांडवी नदीवरचा सुंदरसा नवीन पूल वापरासाठी खुला झाल्यापासून तिथपर्यंतचे दृष्य रात्री आणि दिवसाही बघायला मजा वाटते.
14 Feb 2022 - 9:11 am | प्रचेतस
अगदी इथेच आम्ही समुद्र बघत बसलो होतो. बाकड्याच्या पाठीमागेच किंचित उंचावर एक हॉटेल आहे. मात्र आपण म्हणता तसा इकडचा समुद्र खोल नाहीये. इथे काही स्थानिक मासेमार पाण्यात उतरुन खेकडे मासे पकडताना कायम दिसतात. मात्र इकडील समुद्र अस्वच्छ आणि गढूळलेला दिसतो.
15 Feb 2022 - 10:53 am | टर्मीनेटर
हो, बाकड्याच्या पाठीमागेच किंचित उंचावर एक हॉटेल कि रिसॉर्ट आहे.
वाळूचा किनारा नसलेला इथला समुद्र थोडा खोल आहे म्हणण्यापेक्षा इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे भरतीच्या वेळी लाट ओसरल्यावर पाणी जसे मागे जाते तसे न होता एका पातळी पर्यंत कायम राहते असे माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणणे योग्य ठरले असते.
त्यावेळी सर्वसाधारण परिस्थितीत असतात त्याच्या दहा टक्केही पर्यटक गोव्यात नव्हते त्यामुळे असेल किंवा कोविड काळात लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत वाढलेल्या जागृततेमुळे असेल, पण कधी नव्हे एवढी स्वच्छता इथे आणि सगळीकडे आढळून आली होती.
गढूळपणामागे एकप्रकारचा साचलेपणा आणि इतर किनाऱ्यांवर वाळूमुळे होते तशा नैसर्गिक फिल्टरेशनचा आभाव ही कारणे असावीत असा माझा अंदाज आहे.
12 Feb 2022 - 2:12 pm | कुमार१
***दोना पावला’ नावाची तरूणी एका स्थानिक मच्छिमाराच्या प्रेमात पडली *"
रोचक !
13 Feb 2022 - 7:50 am | Bhakti
भारीच!!
13 Feb 2022 - 11:32 am | टर्मीनेटर
कुमार१ & भक्ती
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
13 Feb 2022 - 7:03 pm | श्रीगणेशा
छान लिहिलं आहे, अगदी गप्पांच्या स्वरूपात!
तळ कोकण पाहायचं मनात आहे.
14 Feb 2022 - 11:59 am | स्मिता श्रीपाद
मस्त लिहिलं आहे..... बरेच दिवसांनी भाग आला असा विचार करतच होते... तेव्हा कोविड बद्दल कळले.. काळजी घेणे...
तुमची सर्व प्रवासवर्णने मला फार आवडतात....
पुढचे भाग लवकर येउदेत...
15 Feb 2022 - 11:04 am | टर्मीनेटर
@ श्रीगणेशा & स्मिता श्रीपाद
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@श्रीगणेशा -
जरूर पहा, खूप सुंदर आहे. मालिकेतील पुढच्या काही भागात तिथल्या ठिकाणांबद्दलही लिहिणार आहे.
@ स्मिता श्रीपाद
हो, नक्की 👍
हे वाचून आनंद झाला 🙂
14 Feb 2022 - 2:16 pm | गोरगावलेकर
तेवीस वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात राहिलो होतो त्याची आठवण ताजी झाली.
नव्या मुंबईच्या काही भागास पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाचे काम सुरु होते. तेव्हा वावर्ले येथील निम शासकीय विश्राम गृहात राहिलो होतो.
फोटोत डाव्या बाजूस दिसणाऱ्या माझ्या दोन्ही मुली. आज थोरलीचे लग्न होऊन चार वर्षेही होऊन गेली.
आणि हे माझ्या २०१६ च्या भटकंतीतले डोना पावला शिल्प
15 Feb 2022 - 11:19 am | टर्मीनेटर
अरे वाह! छान आहे आठवण, Excavator वरचा फोटोही छान 👍
मोरबे धरण आणि तिथून जवळ असलेला एन. डी. स्टुडिओ बघण्यासारखे आहेत. जोधा अकबर चित्रपटच्या चित्रीकरणासाठी तिथे उभारलेला लाल किल्ल्याचा सेट फार छान आहे. त्या रस्त्यावरून जाताना अजूनही तो तसाच ठेवलेला दिसतोय.
हा फोटो दिसत नाहीये.
14 Feb 2022 - 2:24 pm | कर्नलतपस्वी
गणपतीपुळे ञणार आहोत राहण्यासाठी चांगले ठिकाण सुचवाल काय
14 Feb 2022 - 2:44 pm | सौंदाळा
एम टी डी सी - गणपतीपुळे बीचला लागुनच.
आभिषेक रिसॉर्ट : आरे-वारे रोड - थोडे लांब आहे पण उत्तम जागा, जेवण
15 Feb 2022 - 11:27 am | टर्मीनेटर
कर्नल साहेब गणपतीपुळे येथील वर सौंदाळा साहेबांनी सुचवलेले MTDC रिसॉर्ट सर्वोत्तम पर्याय आहे. २ दिवस तिथे मुक्काम करा, मस्त वाटेल एकदम.
16 Feb 2022 - 9:32 am | श्रीगणेशा
२०१७ मधे गणपतीपुळे येथे एमटीडीसीच्या रिसॉर्टमधे राहिलो होतो सहकुटूंब. ऑफ सीझन असल्याने अगदी वेळेवर बुकिंग मिळाले.
किनाऱ्याला लागून असलेल्या इमारतीत राहता आले तर उत्तमच.
एवढं आठवत नाही पण सिनियर सिटिझन्सना बहुतेक सवलतही आहे.
(त्या कोकण प्रवासातील दुसऱ्या भागावर लिहित आहे सध्या, फोटो स्वरूपात. या आठवड्यात मिपावर पोस्ट करेल)
16 Feb 2022 - 12:42 pm | टर्मीनेटर
जरूर लिहा, वाचायला आवडेल!
17 Feb 2022 - 8:37 am | कर्नलतपस्वी
यावेळी माडचे बन ,मुलांना हवे आहे, नंतरच्या वेळे वर बघू.
14 Feb 2022 - 2:27 pm | कर्नलतपस्वी
माडाच्या बनात एकदा राहीलो होतो चांगले होते
15 Feb 2022 - 1:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
सगळे फोटो आवडले आणि ओघवते प्रवासवर्णनही,
पुभाप्र,
पैजारबुवा,
16 Feb 2022 - 12:43 pm | टर्मीनेटर
धन्यवाद माऊली 🙏
17 Feb 2022 - 2:45 pm | अनिंद्य
झकास !
सा. बा. आणि वनखात्याची रेस्ट हाउसेस फार सुंदर लोकेशनला असतात याला सहमती.
स्वच्छता आणि टापटीप मात्र तुमच्या नशिबावर :-)
17 Feb 2022 - 3:01 pm | टर्मीनेटर
😀 😀 😀
बरोबर आहे, आता बहुतांश रेस्ट हाऊसेस च्या व्यवस्थापनाची कंत्राटे दिली जात असल्याने परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. आधी थोडा भोंगळ सरकारी कारभार दिसायचा.
17 Feb 2022 - 3:01 pm | सौंदाळा
हा भाग पण भारीच
सरधोपट प्रवासवर्णनांपेक्षा या सफरीचे वर्णन तुम्ही खूपच वेगळ्या प्रकारे करत आहात आणि वाचायला मजा येतेय.
17 Feb 2022 - 3:39 pm | टर्मीनेटर
प्रतिसादासाठी आभार 🙏
ही रिक्रिएशनल ट्रिप असल्याने स्वछंद भटकंती करणे हा मुख्य उद्देश होता.
प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम पूर्वनियोजित नसल्याने कसेही बदल करणे शक्य झाले. अर्थातच त्यामुळे मजाही खूप आली आणि त्याचा इफेक्ट वर्णनावरही पडला असावा!
17 Feb 2022 - 7:35 pm | सरिता बांदेकर
स्वच्छंद भटकंती करायला खूप मजा येते. तुम्ही छानच लिहीलं आहे.आम्ही पण असेच फिरायचो.गाडीत सामान टाकायचं. म्हणजे फक्त आपलं स्वत:चं सामान नाही तर चटई,चादरी आणि उशा पण घ्यायच्या.
आवडेल तिकडे रहायचं.काही वेळा लोकांच्या पडवीत पण राहिलो आहे.
तुम्ही जयगड आणि विजयदुर्गच्या रेस्टहाऊसमध्ये राहून बघा कधी तरी.
हॅारर पिक्चरमधल्या सारखं वाटतं रात्रीच्या वेळी.
मजा येते.
असंच वेगवेगळी ठिकाणं फिरा आणि वर्णन लिहीत रहा.
18 Feb 2022 - 11:02 am | टर्मीनेटर
😀 😀 😀
बघायला पाहिजे एकदा तिथे राहून.
जयगड, विजयदुर्ग अशा आणि रत्नागिरी परिसरातल्या अन्य ठिकाणच्या भटकंती दरम्यान आम्ही रत्नागिरी एम. आय. डी. सी. रेस्ट हाऊस मध्ये मुक्काम करणे पसंत करतो. ते सर्क्युलर आकाराची इमारत असलेले रेस्ट हाऊस खूप छान आहे. पण त्याचा वापर त्यावेळी कोविड सेंटर म्हणुन केला जात असल्याने कोळंब्या जवळ मामाच्या घरी मुक्काम केला होता.
फक्त बसल्या जागी आयतां तयार नाश्ता, जेवण आणि चहा तिथे मिळत नव्हता एवढंच. ते एकतर स्वतः बनवायला लागायचे किंवा कोळंबे फाट्यापर्यंत जावे लागायचे. बाकी हे हक्काचे ठिकाणही उत्तमच होते.
18 Feb 2022 - 8:31 pm | Nitin Palkar
सुरेख वर्णन.... नेहमी प्रमाणेच. पुभाप्र.
21 Feb 2022 - 7:00 am | नचिकेत जवखेडकर
व्वा ! ओमिक्रोन मधून बरे झालात हे वाचून बरं वाटलं.
लेखाबद्दल म्हणायचं झाला तर छान वर्णन नेहमीप्रमाणेच! अवांतर वगैरे काळजी न करता बिनधास्त लिहा. तुमचे लेख म्हणजे नुसती भटकंती नसून एक डॉक्युमेंटरी वाचतोय असं वाटतं :)
22 Feb 2022 - 1:04 pm | टर्मीनेटर
@ Nitin Pallkar & नचिकेत जवखेडकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
22 Feb 2022 - 5:43 pm | MipaPremiYogesh
हा भाग पण मस्त झाला आहे.. आता येउद्यां नवीन भाग लवकरत lavkar