टाळ्यांचा प्रचंड कडकडाट !! तिचं आजचं भाषण अतिशय गाजलं. कायक्रमाचा समारोप करताना आयोजकांनी अगदी भरभरून कौतुक केलं तिचं. त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या तोंडी तिचंच नाव! ती स्वतःवरच जाम खूश झाली. एक धडाडीची फेमिनिस्ट म्हणून ती ओळखली जात होती. अतिशय धीट विचारांची होती ती. अल्पावधीतच तिने नाव कमावले होते.
तिने नवर्याला कॉल केला. 'मी पार्किंगजवळ पोहोचतेय, लवकर ये'. वीस मिनिटे ती वाट बघत होती. एकदाचा तो आला. 'कुठे होतास? मी कधीची थांबलेय ईथे.' 'मग काय झालं? आलो ना? माझ्या फिल्डमधले लोक आले होते, त्यांच्याशी बोलत असताना तुझा मधेच कॉल!', त्याचा त्रासिक चेहरा. ती काहीच न बोलता गाडीत बसली.
थोड्याच वेळात ते रेस्टॉरंटमधे पोहोचले. 'येताना घरी जाऊन मिनूला घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं, तिला ईथली पावभाजी खूप आवडते.'
'काही नको! नाही आणलं तेच बरं! एक तर तिचं आवरण्यात वेळ गेला असता, वर तिला खायला तास लागतो, त्यात ती सगळं कपड्यांवर सांडून अवतार करणार आणि त्या अवतारात आपल्याबरोबर चार लोकांत फिरणार , त्यापेक्षा घरी मावशी तिला चारून ,आपण जायच्या आत तिचं आवरून ठेवतील. तिला आणून नसते उपद्व्याप कशाला करायचे?' त्याचा मुद्दा बिनतोड होता.
ती सहज ईकडेतिकडे पाहत होती, ईतक्यात बाजूच्या टेबलवर एक विवाहित जोडपे आपल्या तान्ह्या बाळाला येऊन घेऊन बसले. बहुतेक जवळच्या एखाद्या खेडेगावातील असावे. त्यांचे राहणीमान, पेहराव त्या रेस्टॉरंटच्या वातावरणाशी अगदीच विजोड होता. तिला थोडीशी दया आली त्या बाईची. बिचारी बाळाला घेऊन अवघडून बसली होती. पण दोघेही एकंदर खूष दिसत होते.
वेटर मेनूकार्ड घेऊन आला. तो,'आधी मला एक कॉफी पाठव.मग नंतर बघू. तूला काय पाहिजे ते मागव लवकर. परत आणि काय मागवायचं यावर वेळ घालवू नको. मला एक मिटींग आहे संध्याकाळी.' तरीपण ती विचारात पडली, पावभाजीच खायची होती तिला, पण जाऊदे नंतर मिनूबरोबर असताना खाऊ. मग तिने एक सॅडविच आणि कॉफी मागवली.
वेटर निघून गेला, तशी तिची नजर आपसूकच पुन्हा त्या शेजारच्या टेबलवर गेली. वेटरने मेनूकार्ड द्यायच्या आतच तो जरा हसून म्हणाला, 'दोन पावभाजी आणि दोन चहा, आमच्या हिला तुमच्या ईथली पावभाजीच आवडते'. आणि तीही त्याच्याकडे पाहून जरा लाजल्यासारखी हसली.
दोन्ही टेबलवर आपापल्या ऑर्डर आल्या. ईतक्यात तो उठला आणि तिच्याकडे जाऊन म्हणाला, 'आण त्याला ईकडे, मी घेतो. तू खा सावकाश. मी नंतर खातो, तुझं झाल्यावर.' ती नको नको म्हणत असताना त्यानं बाळाला घेतलं अन त्याची चड्डी बदलू लागला. शेजारच्या टेबलवरून ही कौतुकाने पाहू लागली, ईतक्यात 'अगं ये, लक्ष कुठंय? मला मिटिंग आहे, टाईमपासला वेळ नाही!' ती तुटल्यासारखी पाहतच राहिली. परत एक नजर शेजारच्या टेबलवर वळलीच. तिच्यासमोर क्षणभर मिनूचाही चेहरा तरळून गेला. काहीतरी आतमधे हलल्यासारखं झाल. कुठेतरी चुकत होतं, पण ते नेमकं काय हे तिला नीट समजंत नव्हतं!!
प्रतिक्रिया
14 May 2022 - 5:44 am | nutanm
सोप्पय , नवरर्याच्या वसावसा वागण्याने ती दुःखी होत होती व शेजारच्या टेबलवरचे जोडपे मात्र खेड्यातले एखादा गरीबही असू शकते ,पण नवरा प्रेमाने वागणाारा मूल तिच्या हातात असल्यामुळे तिच्या अवघडलेपणाचा व मूलाची अडचण न वाटणारा होता व विरूद्ध तिचा नवरा काही नको मूल जवळ घेऊन फिरण्याच्या विरूद्ध. ह्या तुलनेने तिचा जीव तुटत होता. तिच्या कुठल्याही भावनांची कदर न करणारा होता, पैसा, ,मोठ्या post वर असूनही म्हणूनही तिला वाईट वाटत होते.
14 May 2022 - 5:55 am | nutanm
तिची सतत स्वताःचा नवरा व बाजूच्या टेबलवरचा नवरा यांची सतत तुलना चालू होती व तो जास्त तिला प्रेमळ , समजूतदार ,बायकोला समजून घेणारा वाटत होता व तिचा नवरा या सर्वां विरूद्ध. होता वम्हणून ती सारखी तुटत होती मनातल्या मनात.
17 Jun 2022 - 2:32 pm | वेलांटी
धन्यवाद nutanm.
17 Jun 2022 - 6:56 pm | तर्कवादी
छान लिहिलंय
बहुतेक शशक स्पर्धेमुळे थोडं दुर्लक्षित राहिलं असावं.
17 Jun 2022 - 10:12 pm | चित्रगुप्त
नवरोबाची वागणूक हेच तिच्या फेमिनिस्टत्वाचे कारण ?
26 Jun 2022 - 1:03 pm | श्वेता व्यास
छान लिहिलं आहे.
26 Jun 2022 - 1:39 pm | कॉमी
भाषण देणाऱ्या बाईंनी आणखी फेमिनिस्ट व्हायला हवे हा संदेश आवडला.
7 Nov 2024 - 11:05 am | वामन देशमुख
म्हणजे नेमके काय?
उदाहरणार्थ:
"एक आघाडीची दंतवैद्यक म्हणून ती ओळखली जात होती. अतिशय निष्णात चिकित्सक होती ती. अल्पावधीतच तिने नाव कमावले होते."
यातून, तिचे "दातांची डॉक्टर" हे शिक्षण, कार्यक्षेत्र, अर्थप्राप्तीचे साधन, सामाजिक ओळख इ. आहे हे दिसते.
"फेमिनिस्ट" म्हणजे यातील काय काय?
---
बाकी, तिची सामाजिक ओळख व कौटुंबिक वास्तव यातील तफावतीवर मी काही भाष्य करत नाही.
7 Nov 2024 - 8:13 pm | सुबोध खरे
मागच्या पिढीने मुलींनी उत्तम शिक्षण घ्यावे स्वतःच्या पायावर उभे राहावे स्वावलंबी व्हावे याची शिकवण दिली
परंतु
अशा सुशिक्षित मुलींशी कसे वागावे याचे शिक्षण मुलांना दिले नाही
हि दुर्दैवाची गोष्ट आहे
यामुळे असे प्रसंग वारंवार येताना दिसतात.