जाणीव ,नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
16 Mar 2022 - 4:01 pm

पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा सहा वाजले की तात्याचा मोबाइल तात्याला विसाव्या शतकातील गोड गोड गाणी ऐकवून जागा करतो. तुम्ही काहीही म्हणा पण तात्याला स्वतःला विसाव्या शतकातील गाणी फार आवडतात. त्या वेळी कोणी लता मंगेशकर नावाच्या एक गायिका होत्या त्यांचा गळा गोड होता. त्यांनी गायिलेल्या बऱ्याच गाण्यांचा संग्रह तात्याकडे आहे. हा गाण्यांचा संग्रह तात्याला कसा मिळाला? सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी.

सगळ्यांत आधी कॉफी! त्याशिवाय तात्याचा दिवस सुरु कसा होणार? तात्याने कॉफी मेकर स्विच ऑन केला. बरोबर तीन मिनिटांनी कॉफी मेकर बडबडायला लागला, “ चवीप्रमाणे साखर टाका. आमची सूचना पंधरा ग्रॅम साखर टाका.” आज तात्याला कॉफीत अजिबात साखर टाकायची इच्छा नव्हती.

“ पुढच्या साठ सेकंदांत साखर टाकली नाहीत तर आपल्याला कॉफी करायची इच्छा नाही असे मानून कॉफी मेकर शट डाऊन मोड मध्ये जाईल. उलटी आकडे मोजणी सुुरू होत आहे. एकोणसाठ ,अठ्ठावन, सत्तावन........”

तात्याने साखरेचे दोन तीन कण उकळणाऱ्या पाण्यांत टाकले. “ आपण पाण्यांत साखर टाकण्याचे फक्त नाटक केले आहे हे आम्ही नोट करत आहोत. कृपया काँट्रॅक्टचे कलम क्र. ५(ड) कडे आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्या लहरी प्रमाणे कॉफी करण्याचा प्रयत्न केल्यास आणि कॉफी बेचव झाल्यास आपण आमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकणार नाही .......... अरे देवा, कॉफी मेकर मध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे कॉफी मेकरच्या सुरक्षितेसाठी कॉफी मेकर ताबडतोब बंद करण्यांत येत आहे.”

आता तात्याला सर्व प्रक्रिया पुन्हा कराव्या लागणार. खरं तर कॉफी मेकर सुरु केल्यावर तो निरनिराळे सोळा पर्याय पडद्यावर दाखवतो.

“ खालीलपैकी एका पर्यायाची निवड करा .

१) प्रमाणित कॉफी

२) एस्प्रेसो

३) फिल्टर

४) फिल्टर – तामिळनाडू

५) एरोप्रेस

६) फ्रेंच प्रेस

७) ---------

८) --------

१६) कॉफीशिवाय कॉफी

कुठल्याही एका(च) पर्यायाची निवड करा. आमची शिफारस ४) फिल्टर – तामिळनाडू

जास्त माहितीसाठी एक दाबा. इत्यादी इत्यादी,”

समजा आपण “११) सायफन कॉफी” असा पर्याय निवडला. “ह्या पद्धतीला लागणारी कॉफी सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही.”

असा संदेश येईल. ‘ फिल्टर – तामिळनाडू ’ सोडून कुठलाही पर्याय निवडा हा कॉफी मेकर त्यांत मोडता घालेल.

हा सॉलिड अनुभव पाठीशी असल्यामुळे तात्या त्याच्या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वतःला पाहिजे तशी कॉफी करतो.

तुम्ही विचाराल की मग तात्याने हा कॉफी मेकर विकत कशाला घेतला. त्याचे काय आहे, आजकाळ बाजारांत साधा कॉफी मेकर मिळतच नाही. तात्याने सगळीकडे विचारले. अगदी लोहार चाळ देखील पालथी घातली. दुकानदार हसायचे.

“साधा कॉफी मेकर ? अस कधी ऐकले नाही बोवा. हा पहा. नवीन मॉडेल आले आहे. मायक्रोस्लॉथ कंपनीचे आहे किंवा हे बघा. मायाक्रोसोर कंपनीचे. हो हो, पूर्वी ती डायनासोर कंपनी होती तीच ती. कॉफी झाल्यावर हे मशीन तुम्हाला तुमचे भविष्य सांगते. हॅ हॅ हॅ. बघूया तुमचे भविष्य काय आहे. उजव्या हाताचा अंगठा इथे दाबून धरा.” मशीन भविष्य सांगू लागले. “आपले नाव आहे दिनेस मेथा. वय चौतीस. आज धंदेमे बरकत आयेगी.” दिनेस मेथा चक्रावला. लगेच सावरून म्हणाला,

“ह्याला रिसेट नाही केले. माझच भविष्य सांगतो आहे.”

तात्याच्या घरी असलेल्या एकूण एक गॅजेट्सना तात्याच्या भविष्याची चिंता असल्यामुळे त्यांत अजून एक भविष्यवेत्त्याची भर टाकायची गरज नव्हती. इच्छाही नव्हती.

“ मला साध्या मूर्ख कॉफी मेकरची गरज आहे.” तात्याने त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.

“ मिळेल, माझ्या माहितीप्रमाणे असा कॉफी मेकर आपल्याला “ ग्यानिमिड ” वरून मागवावा लागेल. त्याला इथे यायाला जवळ जवळ आठ महिने लागतील. वर तुम्हाला इंटरस्टेलर ड्युटी भरावी लागेल. एकूण तो खूप महाग पडेल साहेब म्हणजे ह्यापेक्षा दहा पट. वर काही प्रॉब्लेम झाला तर सर्विस कोण देणार इथं पृथ्वीवर? तुम्ही असं करा. कॉपर बॉटम पातेली विकत घ्या. लई सस्तांत होऊन जाईल.” तात्या थॅंक्यू म्हणून बाहेर पडला.

त्यामुळे तात्याकडची गॅजेट स्मार्ट आहेत. त्याला इलाज नाही.

कॉफी मेकरच्या धमक्यांना आणि निषेधाला भीक न घालता तात्याने जशी पाहिजे तशी कॉफी बनवून घेतली. कॉफी मेकरच्या थयथयाटाचा एक फायदा होता. मधून मधून निरनिराळ्या कंपन्यांच्या कॉफी बियांच्या जाहिरातीपासून सुटका मिळाली.

रोबो जागृत व्हायला अजून थोडा वेळ होता. तो पर्यंत अंघोळीचा कार्यक्रम उरकून टाकावा म्हणून गरम पाण्याने टब भरून घेतला. हे होत असताना वॉटर सिस्टीमने आगामी सिनेमाच्या जाहिराती, गाणी आणि ट्रेलर लावले होते. पाणी भरेस्तोवर, तात्याने शेविंग क्रीमच्या जाहिराती ऐकत ऐकत दाढी उरकून टाकली.

तो पर्यंत रोबो जागा झाला होता.

तात्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा होतकरू तरुण होता. त्याच्या पिढीतले सर्व तरुण जे करायचे तेच तात्याने केले. म्हणजे तो इंजिनिअर झाला होता. ( नाहीतरी दुसरे काय होणार?) त्याचे नशीब जोरांत असल्याने त्याला ‘ स्टार ट्रेक फेडरेशन ’ मध्ये स्टारशिप मेंटेनन्स विभागांत चांगली नोकरी होती. पगार ही बराच बरा होता. तारुण्य सुलभ भावनांचा कहर झाल्यामुळे आता तो जीवनसाथीच्या शोधांत होता. पुरुषाने पुरुषाबरोबर किंवा स्त्रीने स्त्री बरोबर संबंध ठेवण्याच्या प्रथा आता जुनाट झाल्या होत्या. स्वतःने स्वतःशी लग्न करणे ह्यातही काही नाविन्य उरले नव्हते. सध्याची फॅशन म्हणजे “ बंधन तोडफोड मंडळ ” चे सभासद होऊन स्त्री पुरुष विवाहाचा पुरस्कार करणे. काही क्रांतिकारी तरुण तरुणी बुरसटलेल्या जुनाट सामाजिक चालींवर लाथ मारून एकमेकांशी विवाह करून समाजाला नवी दिशा दाखवण्याचे महत्कार्य करत होते.

ह्यांत सगळ्यांत कमी कटकटीचा मार्ग म्हणजे आपल्या आवडत्या गॅजेटबरोबर आयुष्य व्यतीत करणे. काहीजण आपल्या रोबोबरोबरच लग्नाची गाठ बांधत होते. बरेच जण आपल्या मोबाइलशी लग्न करत. जागतिक लोकपरिषदने अश्या संबंधांना कायदेशीर मान्यता दिली होती. असे रोबो/गॅजेट अत्यंत समजूतदार होते. ते आपल्या साथीदाराला पूर्ण सहकार्य देतात. आपल्या सहचराला स्वतःचे खाजगी जीवन असते याची त्यांना पूर्ण जाणीव असते. पुरुष किंवा स्त्री सहचराची अपेक्षा असते की रात्रंदिवस आपल्या सहचराने आपली खुषमस्करी करावी. आपल्या भोवती पिंगा घालत बसावे. आपल्याबरोबर झिम्मा फुगडी खेळत बसावे. रोबो/गॅजेट कधीही अशी अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांची एवढीच माफक अपेक्षा असते कि वेळेवर चार्ज केलंं जावंं. रोबोविवाह हा सर्व विवाहोत्सुक स्त्री पुरुषांचा फर्स्ट प्रेफेरंस होता.

ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला होता की मानव जातीची लोकसंख्या कमी कमी होत चालली होती. पोटांत नउ महिने गर्भ कोण सांभाळणार? नंतर त्यांची हगेरी मुतेरीची उस्तवार कोण करत बसणार? त्यांना मोठे करा, वाढवा, शिकवा ! छ्या ! मानवाने प्रजननाच्या उपजत अंतःप्रेरणेचा त्याग केला होता.

अर्थात सगळे मानव अश्या विचारसरणीचे नव्हते. आपला तात्या त्यापैकी एक होता. त्याने जेव्हा सुशी ला प्रथम बघितले तेव्हा त्याला “ कुछ कुछ होता है ” नावाच्या विसाव्या शतकांत लिहिलेल्या महाकाव्याची आठवण झाली. त्याच्याही हृदयांत कुछ कुछ हो गया. आनंदाची गोष्ट अशी की सुशीला पण अश्या संबंधांत रुची होती.

आज तात्याने सुशीला मुद्दमहूनच आपल्या घरी बोलावले होते. घर म्हणजे जरा जुनाट शब्द झाला प्लस त्यामध्ये भावनांची उगाचच गुंतागुंत असते. कोंडो किंवा अपार्टमेंट म्हणणे चपखल! दोघेही “ सामाजिक बंधन तोड फोड मंडळा ” चे सभासद होते. तेथेच त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर आता भेटण्या फिरण्यात झाले होते.

“किती गरम होतय, ” सुशी प्रिन्सिपिया मॅॅथेमॅॅटिका ने (म्हणजे त्या नावाच्या पुस्तकाने) वारा घेत म्हणाली.

“अरे बाळा एसी, सुशीला गरम वाटतंय. जरा सेटिंग कमी करून थंड कर ना,” तात्याने एसी ला विनंती केली.

“हम्म, तापमान कमी करत आहे. ब्युरो ऑफ एनर्जी आणि एआयएसीआरए ह्या दोघांनी प्रमाणित केलेली सेटिंग आम्ही वापरतो. सेटिंग कमी केल्यामुळे, संयंत्र जास्त ऊर्जा खाते, अंततः पृथ्वीच्या हवामानात बदल होतात त्यामुळे पृथ्वीचा विनाश जवळ येत आहे हे आपण लक्षांत घ्या.” एसीची बकबक सुरु झाली.

ती ऐकून सुशी खवळून उठली. “कोण बोलले हे? होऊ दे मानवजातीचा विनाश. मी तयार आहे. आत्ता ह्या क्षणी. कम ऑन यु ब्लडी टू पेनी कार्टून ऑफ एसी. हे काय जगणे आहे का जोक? काही करायला गेले की सुरू ह्यांची लेक्चरबाजी. जणू काय ह्यांनाच फक्त जगाची काळजी. अरे तात्या, साधे आईसक्रीम सुद्धा सुखाने खाऊ देत नाहीत.”

तात्या सुशीची समजूत काढायला लागला, “अग सुशी. एवढे रागवायचे नसते. गॅजेट बिचारी त्यांच्या प्रोग्रॅमचे गुलाम असतात. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही. अश्या सूचना देणे हे त्यांच्यावर कायद्याने बंधनकारक आहे.”

सुशी जरा शांत झाली. “तात्या ,मी अंमळ तुझे बाथरूम वापरू का?”

तात्या बोलणार होता, “ सुशे हे सगळे तुझेच आहे. खुशाल वापर.” त्याऐवजी तो म्हणाला, “ वापर की. तवर मी चहा बनवतो.” तात्याला माहीत होते की तिला बाथरूम किती स्वच्छ ठेवली आहे ते बघायचे असणार.

तात्या चहाकडे वळणार इतक्यांत सुशीची कर्णभेदक किंकाळी ऐकू आली. तात्याने हातातले काम बाजूला टाकून सुशीकडे धाव घेतली. दोनी हातांनी तिने आपला चेहरा झाकून घेताला होता आणि ती मुसमुसत होती.

“ सुशे काय झाले बोल तरी. एवढी का घाबरली आहेस?”

सुशीने न बोलता बाथरूमकडे बोट दाखवले.

तात्याने बाथरुममध्ये डोकावले. आतील दृश्य पाहून त्याची पण क्षणभर भीतीने बोबडी वळली. बाथटबमध्ये पाण्यांत एका तरुणीचा निष्प्राण देह तरंगत होता. तात्याच्या लक्षांत सगळा प्रकार आला. हा होलोग्राफिक प्रोजेक्टरचा फाजिलपणा असणार!

“तात्या यू मर्डरर! कोण आहे ही बिचारी. तू हिचा खून केला असशील पण माझा नाही करू शकणार.” तिने आपल्या पर्स मधून छोटे टेझर पिस्तुल काढले. तात्यावर पिस्तुल रोखून ती म्हणाली, “ चांडाळा, दुष्ट, नराधमा मी ९११ ला फोन करून पोलिसांना......”

“सुशे असे काही वेड्यासारखे वागण्याच्या आधी मी काय सांगतो ते ऐक,” होलोग्राफिक प्रोजेक्टरचा स्वीच बंद करून तात्या सुशीला समजाउ लागला, “हे बघ, ती तरुणी गायब झाली. तो केवळ आभास होता. मी गंमत म्हणून हा प्रोजेक्टर बाथरुममध्ये बसवून घेतला होता. अंघोळ करताना कधी झुळूझुळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यांत डुंबत आहोत, तर कधी समुद्राच्या लाटेवर लहरत आहोत, तर कधी पावसाळ्यांत फुलणाऱ्या धबधब्याखाली स्नान करण्याची मजा लुटत आहोत. असे आभास निर्माण करण्यासाठी!”

सुशीने आपले टेझर पिस्तुल पर्समध्ये म्यान करून टाकले, “आय अॅम सॉरी तात्या,” सुशी खालच्या आवाजांत पुटपुटली.

“माझ्या सदनिकेत -आय मीन फ्लॅट मध्ये - काही खरं नाही. सगळकाही खोटं खोटं. लुटूपुटू! जगण्याचे केवळ आभास! मगाचा तो उंदीर. तो पण रोबो. सुशे, जिवंतपणा आपल्यासारख्यांना परवडणारा नाही. इट इज अ लक्झुरी वुइ कॅन नॉट अफोर्ड. त्याला खूप किंमत मोजावी लागते.”

सुशी आता वरकरणी तरी शांत झालेली दिसत होती. तात्याने तिचा हात हातांत घेतला आणि तिला हळुवारपणाने टेबलाकडे नेले. पण संध्याकाळचा मूड मात्र खराब झाला होता. आता काही बोलण्यांत काही अर्थ नव्हता. आयुष्यांत प्रथमच त्याला गॅजेट्स राग आला होता.

वरून आकाशातून कुठूनतरी गणप्या आणि दगडी हा खेळ बघत बसले होते. गणप्याने दृश्य कित्येक पट मोठे केले होते. त्यामुळे ते जणू काय तात्याच्या अपार्टमेंट मध्ये तात्याच्या बाजूला बसून तात्याच्या आणि सुशीच्या गप्पा गोष्टी ऐकू शकत होते. तात्याने टेबलावर चहा आणि केक ठेवले होते.

“आई, आता ते चहा पीत आहेत. आम्हाला पण चहा आणि केक देना.” दगडीने बसल्या बसल्या आईला ओरडून सांगितले. आई शेजारच्या खोलीत वर्क फ्रॉम होम करत बसली होती. गणप्या आणि दगडी! तिची मैत्रीण तिला नेहमी म्हणायची, “ गणप्या आणि दगडी किती क्युट अन मॉड नावं आहेत तुझ्या मुलांची. कुणी सजेस्ट केली ही नावं तुला, आवडाक्का?”

नुसती नावच नाही तर मुलही किती गुणाची आहेत. आवडाक्काचा ऊर प्रेमाने भरून आला. आवडाक्का! माझे नाव काय कमी क्युट आहे ?

मुलांची चहाची वेळ झाली होती. जरा जरी उशीर झाला असता तर मग त्यांनी तात्याच्या टी पार्टीत सामील व्हायला कमी केले नसते.

गणप्या आणि दगडीचा खेळ रंगात आला होता. तात्या भावूक होऊन सुशीला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता, “ सुशे, तू, मी, आणि माझी गॅजेट्स असे आपण एकत्र नाही राहू शकत? का नाही?” सुशी ऐकायच्या मूडमध्ये नव्हती, ती अस्वस्थ होती. “तात्या, तुझी ही आवडती गॅजेट्स ओंगळ खुनशी आहेत. आय हेट देम. अॅंड दे हेट मी. ते आपल्या दोघांमध्ये बिब्बा घालत आहेत. इतकी साधी गोष्ट तुला समजत नाही? तू म्हणजे अगदी साधा भोळा आहेस. तुला मी किंवा तुझी गॅजेट्स ह्यापैकी एकाची निवड करावी लागेल.”

“सुशे, तू इतकी टोकाची होऊ नकोस. तुला पाहिजे असेल तर मी सगळ्या गॅजेट्सचे पासवर्ड तुला देईन. ओनरशिप पण तुझ्या नावावर ट्रान्स्फर करेन मग तर झाले.” सुशी ऐकायच्या मूड मध्ये नव्हती.
Glorified Truth
1 year ago

"The universe has rigged the game against me." I've known this all my life... SIGH.

Truth is, the game was rigged from the start."

“आई ग, ही सुशी रागावून निघून गेली बघ.” बिचारा तात्या हवा गेलेल्या फुग्यागत लोळा गोळा होऊन खुर्चीवर पसरला होता. गणप्याला तात्याची दया आली. हातातले काम सोडून आई तिथे आली.

“नाही आवडला हा शेवट माझ्या बाळाला? एक मिनिट हं. आत्ता शेवट बदलून देते.” तिने आपला संगणक उघडला. की बोर्ड थोडा बडवला. दिली पाठवून प्रोग्रामची नवीन व्हर्शन पृथ्वीवर.

तात्याच्या अपार्टमेंटची बेल वाजली. तात्या आता सॉलिड वैतागला होता. ह्या मनहूस क्षणी कोण आला दार ठोठावत? असेल कोणी फिरता विक्रेता. जर विषाची कुपी घेऊन आला असेल तर अवश्य विकत घेईन. नाखुषीने तात्याने दरवाजा उघडला. पाहतो काय, सुशी रडत रडत समोर उभी!

“तात्या मला माफ कर. माझे मन थाऱ्यावर नव्हते मगाशी.” सुशी सरळ तात्याच्या मिठीत सामावली.

“गणप्या, दगडी चला या. चहा रेडी झाला आहे. यायच्या आधी खेळ बंद करून पॅक करून पेटीत भरून ठेवा.” आईने त्यांना बोलावले. दगडीने खेळ स्विच ऑफ केला. तात्याच्या आणि सुशीच्या जीवनांत अंधाराची काळोखी पसरली. त्यांचा खेळ बघणारे --गणप्या, दगडी-- कोणी नसल्याने त्यांचे अस्तित्व काळोखांत विरून गेले. प्रतिसाद देणारा, किमानपक्षी तटस्थपणे ऑब्झर्व करणारा कोणी नसेल तर तुम्ही असू शकत नाही. तुम्ही असलात काय की नसलात काय कुणाला काय समजणार? कुणाला काय फरक पडणार?

If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound? Is the moon there when nobody looks?

बिचारा तात्या. सुशीबद्दलच्या त्याच्या कोमल भावना त्याच्याबरोबरच काळोखांत विरघळून गेल्या. गणप्याने तात्या आणि सुशीच्या विश्वाची नीट दुमडून घडी केली बॉक्स मध्ये भरली आणि ते चहा प्यायला गेले.

“आई, हा तात्या आणि सुशीचा खेळ आता बोअर व्हायला लागला आहे. उद्या तू मार्वलचा सुपरहिरोचा गेम लाव ना.”

“बघते, वेळ मिळाला तर कॅप्टन अमेरिकाचे प्रोग्रॅमिंग करेन. त्या आधी मी तात्याच्या कथेचे थोडे निराळे वेरीएशन केले आहे. ते उद्या पहा. आवडेल तुम्हाला.”

“हा तात्या म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातला सेंटी हिरो आहे. सुशीशी त्याला नीट बोलता पण येत नाही. आई, तू त्यांत अजून काय मसाला टाकणार आहेस?” (पहा म्हणजे शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड तशातली गत. तिकडे तात्या भोग भोगतो आहे आणि इकडे बघणारे नाकं मुरडतात.)

“माझ्या नवीन कथेत एक आग ओकणारा ड्रॅगन सुशीला पळवून नेऊन त्याच्या किल्ल्यावर कैद करून ठेवतो. मग तात्या एका मांत्रिकाच्या सहाय्याने ड्रॅगनचा वध करून सुशीची सुटका करतो. शेवटी सुशीचे आणि तात्याचे ........ओह मला ऑफिसमधून कॉल आहे वाटते.”

पहा, ते महत्वाचे वाक्य अर्धवट राहिले. “शेवटी सुशीचे आणि तात्याचे.......” अरे पुढे काय? कधी होणार त्यांचे गोड मिलन? का कधी होणारच नाही?

चला, उद्या तात्या आणि सुशीचा युगानुयुगे चालणारा खेळ पुन्हा सुरु होईल. हे असेच आहे, ह्या कथेचा शेवट नाही, तात्या आणि सुशी तरी काय करणार. जसे आवडाबाईंनी प्रोग्रामिंग केले असेल तसेच वागायला पाहिजे. एका सुप्रसिद्ध लेखकाने म्हटले आहेच की. घोडा अडीच घरे चालणार हत्ती सरळ जाणार आणि उंट तिरकस वागणार! इस नाईलाज का कोई इलाज नाही. सो सॅड !!!

कथा

प्रतिक्रिया

ही माझी सिम्युलेशन हायपोथेसिस वर आधारीत कथा

चित्रगुप्त's picture

24 Jul 2024 - 1:27 pm | चित्रगुप्त

वाचतो आता.

शाम भागवत's picture

16 Mar 2022 - 6:24 pm | शाम भागवत

आवडली.
अशा कल्पना फुलवता येणे सोपे काम नाही.
If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound? Is the moon there when nobody looks?
ही दोन्ही वाक्ये आवडली.

भागो's picture

16 Mar 2022 - 7:07 pm | भागो

हे वाक्य माझे नाही सर.
पहा
https://en.wikipedia.org/wiki/If_a_tree_falls_in_a_forest

भागो's picture

16 Mar 2022 - 7:24 pm | भागो

मी दुसऱ्या कथेत लिहिलेले हे वाक्य मात्र थोडेफार माझे आहे.
Descartes: ‘I Think Therefore I Am’
I see you Therefore you are.!

कर्नलतपस्वी's picture

16 Mar 2022 - 7:04 pm | कर्नलतपस्वी

"दिवाळी काल आज आणी उध्या", या १९८० मधल्या दूरदर्शन वरील दिवाळी मधे दखव्लेल्या कर्यक्रमाची आठ्वण झाली.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2022 - 7:30 pm | मुक्त विहारि

आवडलं

सस्नेह's picture

17 Mar 2022 - 9:42 pm | सस्नेह

भारीच आहे , आवडली मला.
स्नेहा

सुखीमाणूस's picture

17 Mar 2022 - 11:33 pm | सुखीमाणूस

छान खुलवली आहे कथा.