झटपट न्याहारी

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in पाककृती
18 Feb 2008 - 8:35 pm

दही बटर

घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.

मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित् मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा.

दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार. सर्व साहित्य असेल तर हा पदार्थ सातव्या मिनिटाला तयार.

वि. सू. : १) बटर शक्यतो मध्यम आकाराचे चांगल्या प्रतिचे असावेत (जिरे बटर). २) पाणी जास्त गरम असले तर हात भाजतो आणि कमी गरम असेल तर ४-५ बटर मऊ होईपर्यंत थंड होते. ३) पहिला प्रयत्न मनाजोगा झाला नाही तर नाउमेद होऊ नये. २ र्‍या -३ र्‍या वेळेपासून सर्व नीट जमून येते. ४) लहान मुलांना आवडते. पण बरेचदा करू नये कारण बटर मैद्यापासून बनविलेले असतात. मजा म्हणून महिन्यातून १-२ वेळा हरकत नाही. ५) पाहुण्यांना देताना थोडी बुंदी, लाल डाळिंबदाणे पेरून द्यावी. ६) बटर फार वेळ पाण्यात किंवा दह्यात ठेऊ नयेत. लगेच पोटात टाकावेत नाही तर ते पाणी शोषून घेतात आणि फुगून पानचट लागतात.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2008 - 8:42 pm | प्रभाकर पेठकर

पाककृती मस्तच आहे.

माझी पाककृतीही अशीच आहे....
दह्यात आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार मिसळून वरून जिर्‍याची फोडणी द्यावी. किंचीत पातळसर करुन एका काचेच्या पसरट सटात जीरा बटर मांडून त्यावर ओतावे. वरून बारीक चिरलेली कोथींबिर, लाल तिखटाची आणि जिरे पावडरची रांगोळी काढावी.
एकदम झटपट.

सृष्टीलावण्या's picture

18 Feb 2008 - 9:30 pm | सृष्टीलावण्या

तसेच एका खाद्यवेड्याने केलेल्या कौतुकाचे मोल दुसर्‍या खाद्यवेड्यालाच माहित.

आता तुमची पण पाककृति उद्याच करून पाहते [कारण मनोहर बिस्किट मार्ट ८.३० लाच बंद झाले असेल ना म्हणून नाही तर खाण्याच्या बाबतीत आपले धोरण आज आत्ता ताबडतोब असे आहे (कामाच्या बाबतीत ते थोडे वेगळे म्हणजे उद्या, परवा, केव्हातरी असे आहे)].

ह्यावरून सहज सुचले म्हणून सांगते की थळला माझी एक दूरची मावशी राहत होती तिने एकदा फर्मान काढले की तुम्ही लोक पुढच्यावेळी ज्यावेळी कोकणप्रवासाला निघाल त्यावेळी पहिला टप्पा आमच्याकडे मुक्काम करून करावा. आम्ही लगेच हो म्हटले.

मामा, माम्या, मावश्या आणि पुढची पिढी वैगरे एकूण १७ जण त्यावेळी आम्ही कुटुंबसहलीला निघालो. पोहोचल्यावर सगळ्या लहानांनी गिल्ला केला भूक लागली. तिने उत्साहाने पहिला चेंडू टाकला, "काय घेणार, थंड का गरम?"

त्यावर आमच्यापैकी एकाने निरागसपणे सांगितले, गरम होईपर्यंत गार चालेल. तिचा भांबावलेला
चेहरा पाहून खुलासा केला की चहा होईपर्यंत सरबत चालेल. तिला पुढे काय वाढून ठेवलय याची अंधुक कल्पना आली.

तिने जर नंतर उपमा की पोहे असे विचारले असते तर उत्तर मिळाले असते उपमा होईपर्यंत कोळाचे पोहे चालतील असे तिला उत्तर मिळाले असते. जेवणाला वेळ होता म्हणून आम्ही ओले पोहे हाणले आणि समुद्रावर पळालो.

परत आल्यावर पंगत तयारच होती. तिने आनंदाने सांगितले की तांदळाची खिचडी आणि पोह्याचे पापड असा बेत आहे आणि खिचडी तयार असून निवायला ठेवलेली आहे. "आत्ता आणते" असे म्हणून ती माजघरात गेली. तेव्हढ्यात आम्हा बकासुर वंशजांना हाताला लोणच्याची बाटली लागली. तिची खिचडी निवून येईपर्यंत (२-३ मिनिटे) ते किलोभर लोणचे सफाचट.

रात्रीपर्यंत राहिलो असतो तर बिचारीला कांदाच हुंगवावा लागला असता.

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2008 - 4:43 pm | प्रभाकर पेठकर

कारण मनोहर बिस्किट मार्ट ८.३० लाच बंद झाले असेल ना म्हणून नाही तर खाण्याच्या बाबतीत आपले धोरण आज आत्ता ताबडतोब असे आहे

क्या बाऽऽऽऽत है| ह्यालाच खवय्येगिरी म्हणतात. मनसोक्त खा, आत्ताच, उद्याचा कोणी भरवसा द्यावा?

संजय अभ्यंकर's picture

18 Feb 2008 - 9:45 pm | संजय अभ्यंकर

एकंदर मि.पा.वर खादाडांना तोटा नाही.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2008 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर

चुकीची दूरूस्ती:
वरील वाक्य 'एकंदर मि.पा.वर खवय्यांना तोटा नाही.' असे वाचावे.

खादाड पोट भरून खातो, खवय्या मनभरून खातो.

संजय अभ्यंकर's picture

20 Feb 2008 - 1:03 pm | संजय अभ्यंकर

खादाड पेक्षा खवय्ये जास्त बरोबर!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सृष्टीलावण्या's picture

25 Feb 2008 - 6:48 pm | सृष्टीलावण्या

खवैय्या हा खादाड असू शकतो पण खादाड हा खवैय्या असतोच असे 
नाही.

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 9:55 am | विसोबा खेचर

झकास पा कृ!

सृष्टीलावण्य, आता पेठकरशेठ आणि स्वाताताईच्या संगतीने तुम्हीही मिपाच्या रसोईघरात दाखल झालात याचा आनंद वाटला...

अरे कुणीतरी पानं घ्या रे, मंडळी जेवायची खोळंबली आहेत! :)

आपला,
(भुकेलेला) तात्या.

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 2:00 pm | राजमुद्रा

वा ! सृष्टीलावण्य,
एकदम झकास पाकक्रुती :)
अश्याच साध्या सोप्या पाकक्रुती आणखी येवू देत.
वेळखाऊ पाकक्रुती करायला मला मुळातच कंटाळा येतो
बाकी खाण्याचा कधीच कंटाळा नाही हो :)

राजमुद्रा :)

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 5:09 pm | सृष्टीलावण्या

अशी समजूत आहे की भरपूर वस्तु घातलेले (मुख्यत: सुकामेवा इ.) आणि वेळकाढू पदार्थ चांगले पण महाराष्ट्रात मात्र साधे सोपे, झटपट पदार्थ करण्याकडे जास्त कल असतो अपवाद अनरसे,
केळफूलाची भाजी इ. चा.

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 5:21 pm | राजमुद्रा

अनरसे,केळफूलाची भाजी दोन्ही माझ्या आवडीच्या गोष्टी.
केळफूलाच्या भाजीची रेसिपी असल्यास नक्की कळवा.
आईकडून करून घेईन. एकदा गावाकडे एका काकूंकडे खाल्ली होती.

राजमुद्रा :)

सृष्टीलावण्या's picture

21 Feb 2008 - 10:10 am | सृष्टीलावण्या

आणि ती अस्सल कोकणी 'पोलं आणि केळफुलाची भाजी' करते. ती मला पाकृ सांगेल पण माझा सल्ला ऐका बापु, हा केळफुलाच्या भाजीचा स्वत: करण्याचा नाद सोडा...

कारण केळफुलाच्या भाजीची सुरवात केळफुलाच्या पेरातील विशिष्ट तंतु काढण्यापासून होतो
.
.
.
आणि
.
.
आमच्या कडे पाकृ सांगण्याची सुरुवात भांड कुठल्या आकाराचे घ्यायचे, कुठल्या धातुचे, जाड बुडाचे की पातळ बुडाचे, फोडणीत कुठल्या पदार्थानंतर किती वेळाने कुठला पदार्थ टाकायचा इ. ने होते.

मला पाकृ लिहायला ४ तास आणि ती वाचून पचायला तुम्हाला ८ तास. ...

पाकृची शेवटची ओळ वाचेपर्यंतच तुम्हाला धाप लागेल. म्हणून हा नाद सोडा आणि संसिद्ध (readymade) केळफुलाची भाजी खा.

राजमुद्रा's picture

21 Feb 2008 - 12:59 pm | राजमुद्रा

पण readymade कुठे खायला मिळेल?
कारण माझ्या आईलाही ती करता येत नाही :(

राजमुद्रा :)

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 1:04 pm | विसोबा खेचर

केफूच्या भाजीची पाकृ आईला विचारून मी लवकरच येथे देईन..

आमची म्हातारी ही भाजी फार सुरेख करते...

आपला,
(केळीच्या बनातला) तात्या जळगावकर.

राजमुद्रा's picture

21 Feb 2008 - 1:20 pm | राजमुद्रा

तुमच्या आईच्या पाकक्रुतीची (वाचून आईला फक्त सांगण्यासाठी)मनापासून वाट पाहत आहे.
कारण आईच्या हातची केफूची भाजी खाणेच सोयीस्कर आहे. मी केलेली भाजी माझ्याच आरोग्यास अपायकारक होऊ शकते.

राजमुद्रा :)

ऋषिकेश's picture

21 Feb 2008 - 9:59 pm | ऋषिकेश

मधे मला इथे अमेरिकेत केळफुलाची खूप आठवण येत होती. एका गोर्‍या अमेरिकन स्नेह्याच्या घरी केळ्याचं झाड आहे. त्याला केळफूल लागलं होतं. आपल्याकडे त्याची भाजी करतात हे त्याला सांगितल्यावर त्याने ते चक्क काढून मला दिलं :) आणि म्हणाला उद्या करून आण भाजी :) आता आली का पंचाईत करता कोणाला येतेय..
मग मी घरी फोन करून टप्प्या टप्प्याने भाजी करायला लागलो. आधी ते तंतु (त्याला आम्ही कावळे चिमण्या म्हणतो ;) ) काढले मग हळद-मिठाच्या पाण्यात केळफूल चिरून ठेवले. मग पुन्हा आईला फोन आणि मग ट्प्प्या टप्प्याने भाजी बनली.. पण काय झकास बनली म्हणून सांगू..तेहि इथे आम्रिकेत केळफूल खाण्याचा आनंद काय सांगावा.
पण आता पूर्ण कृती आठवत नाहि :( (पुढच्या विकांताला)भारतात गेलो की आईला पुन्हा विचारून सांगतो :)

-ऋषिकेश

धनंजय's picture

21 Feb 2008 - 11:33 pm | धनंजय

हे आग्नेय आशियाई दुकानांत (किंवा पूर्व/ईशान्य आशियाई/कोरियन दुकानांत) मिळते. केळफूल मी जास्तीत जास्त वर्षातून एकदा आणतो. त्यातल्या प्रत्येक फुलाचा स्त्रीकेसर आणि एक बाहेरचा पदर वेगळा काढून टाकून द्यावा लागतो (कावळे चिमण्या). तासाभराच्या कामानंतर झालेली मूठभर भाजी बघून दर वेळा म्हणतो "पुन्हा कधी नाही!" मग पुन्हा कधी दुकानातले केळफूल मला त्याच्या मोहजालात पकडते...

केळीची पाने मेक्सिकन दुकानांत मिळतात. पण ही बर्फात थिजवलेली असतात, म्हणून दिसायला सुंदर नसतात. अशा केळ्याच्या पानांचे हे उपयोग मला सुचले आहेत (मी करून बघितले आहेत) :
१. एका थाळीत पाने पसरायची, वर कढत भात पसरायचा, मग त्यातून भात डिशमध्ये वाढायचा. केळीच्या पानांचा मंद सुवास (काही प्रमाणात केळीच्या पानातच जेवल्यासारखा) येतो.
२. थालीपीठ थापायला प्लास्टिकच्या कागदाऐवजी (किंवा तुम्ही प्लास्टिकचा कागद वापरत नसला तर मुद्दामून) वापरायची. पानासकट थालीपीठ तव्यावर टाकायचे (म्हणजे थाळीपीठाच्या एका बाजूला तवा, दुसर्‍या बाजूला केळीचे पान. पानाच्या "झाकणा"मुळे थालीपीठ वाफेत शिजते, त्याला केळीच्या पानाचा सुरेख वास येतो.
३. माशाच्या तुकड्यांना चटणी माखून ते केळीच्या पानांचे पुडे करून बांधायचे. मग ते पुडे वाफवायचे/किंवा ओव्हनमध्ये भाजायचे.

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 1:43 pm | राजमुद्रा

केळीच्या पानात वाफवलेले मासे!

राजमुद्रा :)

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 1:49 pm | राजमुद्रा

धन्यवाद ऋषिकेश !
तुम्ही एवढ्या प्रयत्नपूर्वक, कष्टाने रेसिपी सांगणार आहात, तर माझीही भाजी करण्याची तयारी आहे.

राजमुद्रा :)

मोहन's picture

20 Feb 2008 - 2:00 pm | मोहन

विसरल्यागेलेल्या पाककृतीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
एक व्हेरिएशन - "दहीवड्यांवर" वरुन फोडणी टाकल्यास गंमत येते

आपला

मोहन

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 5:04 pm | सृष्टीलावण्या

तुपाची की तेलाची (ढोकळ्यावर टाकतो तशी)?

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 7:37 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या मते तुपाची.

कारण दहिवड्यावरील फोडणीत चवीच्या दृष्टीने 'जीरे' असणे आवश्यक आहे आणि 'जीरे' म्हंटले की तुपाची फोडणी, हे समीकरण चवदार आहे.

मोहन's picture

20 Feb 2008 - 5:20 pm | मोहन

बरोब्बर ! तेलाचीच.

आपला

मोहन

स्वाती राजेश's picture

21 Feb 2008 - 11:42 pm | स्वाती राजेश

मी केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून करते.
तात्यांच्या मातोश्रींची कशी पद्धत आहे?
वाट पाहात आहे लवकर पाठवा भाजी नव्हे कृती.:)

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 11:51 pm | विसोबा खेचर

मी केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून करते.

करेक्ट! आमच्या आईचीही तीच पद्धत आहे. मी पाकृ द्यायला विसरूनच गेलो! आत्ता म्हातारी झोपली आहे गुडुप! उद्या सकाळी विचारतो तिला! :)

(मातृभक्त) तात्या.

बेसनलाडू's picture

22 Feb 2008 - 3:30 am | बेसनलाडू

आमच्या घरीही अशीच होते. मस्तच!
(खवय्या)बेसनलाडू

प्राजु's picture

22 Feb 2008 - 2:33 am | प्राजु

आजी (आईची आई) अतिशय सुंदर करते केळ फुलाची भाजी. फणसाची भाजी आणि केळफुलाची भाजी... उत्तम करते ती.

इथे, भारतीय दुकानातून मी, टिन्ड कच्च्या फणसाचे तुकडे आणले होते. त्याची शेंगदाणे घालून भाजी केली. चवीला खूप छान झाली होती. पण व्हिनेगर मधल्या फणसाच्या तुकड्यांमुळे घसा खवखवू लागला.. चालायचेच.
तात्यांच्या मातोश्रींच्या केफू च्या भा़जीच्या पाकृ ची मी ही वाट पहाते आहे.
- प्राजु

स्वाती दिनेश's picture

22 Feb 2008 - 1:38 pm | स्वाती दिनेश

हं...केळफूलाची भाजी...काय आठवण करून दिलीत.. केळफुलाच्या भाजीत आमच्याकडे डाळिंब्या घालतात.आधीच त्या कावळेचिमण्या वेगळे करा, डाळिंब्या सोला..भरपूर आटापिटा...पण काय झकास भाजी होते...
केळफुलातील पुकेसर वेगळा काढून टाका, नंतर ती चिरा,चिरताना विळी/सुरीला आणि हातालाही तेलाचे बोट लावा म्हणजे राप चढणार नाही.डाळिंब्या (कडवे वाल)सोलून,वाफवून घ्या.केळफूलही वाफवून्/उकडून घ्या.तेलाची फोडणी करून त्यात वाफवलेले केळफूल घाला,नंतर त्यात आधी वाफवलेल्या डाळिंब्या घाला. ओले खोबरे जरा सढळ हस्ते घाला,:) शिजत आल्यावर मीठ,गूळ ,तिखट घाला.कोथिंबीर घाला.
(काही जण यात गोडा मसाला घालतात,आमच्याकडे नाही घालत ह्या भाजीत.)

धनंजय's picture

22 Feb 2008 - 9:04 pm | धनंजय

केळफूल चिरताना तुकडे आंबट ताकात टाकले तर त्यांचा रंग काळा पडत नाही. (काळा पडला तरी हरकत नाही, भाजी छानच लागते.)

ऋषिकेश's picture

23 Feb 2008 - 7:28 pm | ऋषिकेश

हो आमच्याकडेही केळफुलाच्या भाजीत डाळिंब्या घालतात :)

-ऋषिकेश

माझी दुनिया's picture

26 Feb 2008 - 11:08 am | माझी दुनिया

आमच्याकडे डाळींब्यांच्या ऍवजी मुगाची डाळ वापरतात. रात्री भिजवून ठेवायची. फोडणीत ...तिखटावर....आधी ती भिजवलेली डाळ घालून मग वरून उकडून ,निथळवलेले केळफूल घालायचे. फक्त मीठ घालून चांगलीपरतायची. साखर.....खोबरे.....या भाजीकरता वापरत नाही.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

सुधीर कांदळकर's picture

23 Feb 2008 - 10:20 pm | सुधीर कांदळकर

पाणी सुटले. आता काहीतरी खावेच लागणार.

उद्याचा मेनू दहीवडे. आमच्याकडे पण काळे वटाणे घालून केफू ची भाजी करतात.

आनंद घारे's picture

23 Feb 2008 - 11:30 pm | आनंद घारे

कशी करायची हे ही कुणीतरी सांगावे म्हणजे हरिदासाची कथा मूळ पदावर येऊन आणखी कांही झटपट पदार्थ चाखायला मिळतील.

स्वाती राजेश's picture

26 Feb 2008 - 12:58 am | स्वाती राजेश

साहित्यः१ केळ्फुल५० ग्रॅम काळे वाटाणे२ हिरव्या मिरच्या२ टी.स्पून गोडा मसाला/ भाजीचा मसाला१/२ टी.स्पून हळद१/२टी.स्पून साखर१ कांदा १ वाटी ओले खोबरेचवीनुसार मीठतेल केळ्फुल सोलून बारीक चिरावे.सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतीलजाडसर कावळा(केसर) काढून टाकावा. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा म्हणजे त्यातील चीक निघून जाईल. धुवून निथळतठेवावा.काळे वाटाणे रात्रभर भिजत घालावेत्.कुकरमध्ये वाटाणेशिजवून घ्यावेत. एका पतेल्यात तेल घेऊन तेल टाकावे. तेल तापल्यावर थोडा हिंग, चिरलेलाकंदा वमिरची घालून परतावी. कांदा गुलाबी झाल्यावर त्यातचिरलेले केळ्फुल, शिजलेले वाटाणे,हळद, मसाला, थोडी साखर, मीठ घालूनझाकणीवर पाणी ठेऊन भाजी शिजवून घ्यावी. वरून ओले खोबरे पेरावे.तात्यांच्या मातोश्रींनी केलेली भाजीची रेसिपीची वाट पाहात आहे.......

राजमुद्रा's picture

26 Feb 2008 - 10:11 am | राजमुद्रा

धन्यवाद स्वाती!
मी तुझी खूप खूप आभारी आहे, मी नक्की सांगेन तुला भाजी कशी झाली ते. अर्थात तुझी रेसिपी म्हणजे भाजी छानच होणार.
खरच तुझे खूप खूप आभार :)
राजमुद्रा :)

विजुभाऊ's picture

26 Feb 2008 - 5:13 pm | विजुभाऊ

"पानगे " हा काय प्रकार आहे ? कोणी सांगेल क? मी श्री ना पेंडसेंच्या कादम्बरीत वाचले आहे हे नाव.
खास कोकणी...ते ही तळकोकणात बनव्तात म्हणे....