शोधायला गेले एक, अन......

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
7 Feb 2022 - 10:29 am

अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत.

ok

अन्य काहींच्या बाबतीत शोधाची कथा अजून वेगळी आणि विस्मयकारक आहे. एखाद्या विशिष्ट आजारावर गुणकारी औषधाचा शोध चालू असायचा. त्यासाठी अभ्यास करून एखादे रसायन शोधले जायचे. पण प्रत्यक्षात जेव्हा त्याचे रुग्णावर प्रयोग सुरू व्हायचे, तेव्हा त्या औषधाचा भलताच व अनपेक्षित गुणधर्म दिसून यायचा. मग मूळ आजार राहिला बाजूलाच आणि ते औषध एका नव्याच आरोग्य समस्येसाठी प्रस्थापित होऊन बसले. औषधांच्या इतिहासात डोकावता अशा सुमारे डझनभर औषधांची शोधकथा रंजक आहे. त्यातील काहींचा आढावा या लेखात घेतो. त्यापैकी काही औषधे 19 आणि 20 व्या शतकापर्यंत वापरात होती. परंतु पुढे त्यांना अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने ती आज वापरात नाहीत. तर अन्य काही औषधे आजही वापरली जातात.
या लेखात खालील औषधांची शोधकथा पाहू :

• पोटॅशियम ब्रोमाइड
• लिथियम
• पेनिसिलिन
• मेप्रोबामेट
• डायझेपाम (काम्पोज)
• सिल्डेनाफिल (वायाग्रा)

१. पोटॅशियम ब्रोमाइड
एकोणिसाव्या शतकात प्रौढांमधील फीट्स येण्याच्या विकारावरील (अपस्मार) औषधाचे शोध जोमाने सुरू होते. फीट्स येण्याची नक्की कारणेही अस्पष्ट होती. तत्कालीन बहुतेक डॉक्टरांनी एक मजेशीर गृहीतक मांडले होते ते म्हणजे, अतिरिक्त हस्तमैथुन आणि फीट्स येणे यांचा घनिष्ठ संबंध असतो ! लैंगिक उर्मी कमी करण्यासाठी ब्रोमाइडचा वापर प्रचलित होता. म्हणून Charles Lockock यांनी अपस्माराचे रुग्णांना हे औषध द्यायला सुरुवात केली. त्याच्या प्रभावामुळे फीट्सचे प्रमाण कमी झाले. त्याचबरोबर या औषधाने रुग्णास गुंगी येते हेही लक्षात आले. मग त्यातून पुढे या औषधाचा चिंताशामक म्हणून वापर सुरू झाला. पुढे बरीच वर्ष तो सुरू होता. परंतु या औषधाची मर्यादित परिणामकारकता आणि दुष्परिणाम यांचा विचार करता त्याहून अधिक योग्य औषधांचा शोध लवकरच लागला. परिणामी हे औषध कालबाह्य झाले.

२. लिथियम
मुळात या धातूचा शोध १८१७मध्ये लागला. नंतर १८६०च्या दरम्यान लिथियम कार्बोनेटचे प्रयोगशाळेत विविध प्रयोग करत असताना असे लक्षात आले की, त्याच्या प्रभावामुळे यूरिक ॲसिडचे खडे विरघळतात. या ऍसिडच्या अधिक्याने होणारा गाऊट हा प्राचीन आजार माहित होताच. मग या रुग्णांसाठी त्यांचा वापर सुरू झाला. दरम्यान विविध मनोविकारांच्या उपचारांचा अभ्यास चालू होता. त्यातून एक गृहीतक असे मांडले गेले की यूरिक ॲसिडचे अधिक्याने मेंदूवर परिणाम होतो आणि त्यातूनच मनोविकार निर्माण होतात.
मग १९४०मध्ये लिथियमचे काही मनोविकारांसाठी (mania) प्रयोग केले गेले. परंतु लिथियमचे शरीरात दुष्परिणामही बर्यापैकी असतात. ते समजण्यासाठी रक्तातील लिथियमची पातळी समजणे आवश्यक होते. 1960 च्या दरम्यान लिथियमची पातळी मोजण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. त्यानुसार लिथियमचा शरीरासाठी सुरक्षित डोस ठरवता आला. तेव्हापासून ‘बायपोलर’ या मनोविकारांसाठी लिथियम हे औषध प्रस्थापित झाले. आजही त्याचा काही प्रमाणात वापर होतो. अशातऱ्हेने गाऊटच्या सांधेदुखीसाठी योजलेले औषध शेवटी विशिष्ट मानसोपचारांच्या यादीत जाऊन बसले.

३. ‘पेनिसिलिन’
जिवाणूनाशक औषधांचा शोध घेण्याचे काम अगदी प्राचीन काळापासून चालू होते. असे संशोधन प्रयोग सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळांत होत असत. त्यासाठी निरनिराळे सूक्ष्मजीव culture च्या रुपात वाढवावे लागत. बऱ्याचदा अशी cultures डिशमध्ये पडून राहिली की त्यावर बुरशीचा थर चढे. त्यातून एक गंमत होई. एकदा का अशी बुरशी चढली की त्यानंतर तिथली जीवाणूंची वाढ बंद होई. हे काहीसे आश्चर्यकारक वाटे. सन १८७१मध्ये Joseph Lister यांनाही असा एक अनुभव आला. ते रुग्णांच्या लघवीच्या नमुन्यांचे निरीक्षण करीत होते. टेबलावर बराच काळ पडून राहिलेल्या नमुन्यांत बुरशी चढू लागे आणि मग त्यांच्यात पुढे जीवाणूंची वाढ होत नसे. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी या बुरशीचा (mold) अभ्यास सुरु केला. त्यातील एका प्रकाराला त्यांनी Penicillium असे नाव दिले. ‘Penicillus’ चा शब्दशः अर्थ ‘रंगकामाचा ब्रश’ असा आहे. त्याच्या दिसण्यावरून तसे नाव पडले. मग त्याचे प्रयोग काही सुट्या मानवी पेशींवर केले गेले. त्याकाळी घोडे हे वाहतुकीचे एक महत्वाचे साधन होते. त्या घोड्यांना बऱ्याच जखमा होत. त्यावर बुरशी चोपडणे हा एक घरगुती उपचार तेव्हा रूढ होता. पुढे लुई पाश्चर आणि अन्य बऱ्याच संशोधकांनी असे प्रयोग करून Penicillium ला जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मत मांडले. इथपर्यंतचे संशोधन हे डॉ. फ्लेमिंग यांच्यासाठी पायाभूत व मार्गदर्शक ठरले.

ok

डॉ. फ्लेमिंग हे १९२०च्या दशकात लंडनमधील एका रुग्णालयात सूक्ष्मजीव विभागात काम करीत होते. त्यांच्या टेबलावर जीवाणू culture केलेल्या डिशेस कायम पडलेल्या असत. एकदा ते सुटी घेऊन स्कॉटलंडला गेले होते. तिथून परतल्यावर ते कामावर रुजू झाले. त्यांचे सगळे टेबल पसाऱ्याने भरले होते. मग त्यांनी एक डिश कामासाठी उचलली. त्यात त्यांनी Staphylococcus हे जंतू वाढवलेले होते. आता ते बघतात तर त्या डिशमध्ये बऱ्यापैकी बुरशी लागली होती. त्यांना त्याचे कुतूहल वाटले. मग त्यांनी त्या डिशचे सूक्ष्मदर्शकाखाली बारकाईने निरीक्षण केले. हाच तो “युरेका’’ चा क्षण होता ! त्यांना असे दिसले की डिशच्या ज्या भागात बुरशी होती त्याच्या भोवताली जंतू बिलकूल दिसत नव्हते. अन्यत्र मात्र ते झुंडीने होते. याचा अर्थ स्पष्ट होता. त्या बुराशीतून जे काही बाहेर पडत होते त्यामुळे त्याच्या बाजूचे जंतू मरत होते. मग फ्लेमिंगनी या कामाचा ध्यास घेतला. त्यांनी त्या बुरशीस वेगळे काढून तिचे culture केले आणि त्यातून तो रासायनिक पदार्थ वेगळा केला. मग या पदार्थाचे नामकरण त्याच्या जननीस अनुसरून ‘पेनिसिलिन’ असे झाले.

४. मेप्रोबामेट व डायझेपाम
जिवाणूनाशक म्हणून पेनिसिलीनचा वापर सुरू झाल्यानंतर लक्षात आले की ते औषध काही ठराविक प्रकारच्याच जिवाणूंचा नाश करते. मग अन्य प्रकारच्या जीवाणू संसर्गासाठी वेगळ्या औषधांचा शोध सुरू झाला. त्यावेळेस असा गुणधर्म असणारे phenoxetol हे एकच रसायन विचाराधीन होते. मग त्याचा कसून अभ्यास सुरू झाला. त्याची पहिली पायरी म्हणजे प्राण्यांवर प्रयोग. त्यातून एक आश्चर्यकारक निरीक्षण समोर आले. या औषधाच्या प्रभावाने प्राण्यांना गुंगी आल्यासारखे होई आणि त्यांचे ताणलेले स्नायू शिथील (relaxed) पडत. 1950 मध्ये या औषधाचे पृथक्करण करून त्यापासून एक सुधारित असे मेप्रोबामेट औषध बनवले गेले. पुढे मानवी प्रयोगांती असे सिद्ध झाले की हे औषध ताणतणाव कमी करते आणि स्नायूंनाही आराम देते. या संशोधनावरून लक्षात येईल की इथे तर अगदी ‘शोधायला गेले एक’ हा प्रकार झालाय. वेगळ्या प्रकारच्या जिवाणूनाशकाच्या शोधाच्या प्रयत्नात चक्क एक तणावमुक्तीचे औषध सापडून गेले !

नंतर या औषधाच्या सुधारित स्वरूपासाठी प्रयत्न चालू झाले. त्यात एका संशोधकाला थोडे यश आले. त्याने ते औषध तात्पुरता शोध म्हणून प्रयोगशाळेच्या फडताळात ठेवून दिले. दरम्यान त्याचे अन्य काही प्रकल्प चालू असल्याने तो याबद्दल विसरून गेला. पुढे 1957 मध्ये त्या प्रयोगशाळेची साफसफाई चालू असताना अचानक ते बाजूला ठेवून दिलेले औषध सापडले. आता त्याच्यावर अधिक काम करून त्यापासून डायझेपाम हे औषध विकसित झाले. 1960-70च्या दशकात हे औषध तुफान लोकप्रिय झाले आणि संबंधित औषध उद्योगाला त्यातून अभूतपूर्व नफा झाला. आजही हे औषध वापरात आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये ‘काम्पोज’ या व्यापारी या नावाने परिचित असलेले हेच ते औषध.

सिल्डेनाफिल (वायाग्रा)
या औषधाची कथा ही तर या लेखाचा कळसाध्याय शोभावी अशी आहे. या रसायनाचा शोध 1989मध्ये लागला. त्याच्या प्राण्यांवरील प्रयोगादरम्यान लक्षात आले की, त्याच्या प्रभावाने रक्तवाहिन्या रुंदावतात (dilate). या निरीक्षणावरून फायझर औषधउद्योगाने हे औषध करोनरी हृदयविकार आणि उच्चरक्तदाब यांच्या उपचारासाठी विकसित करण्याचे ठरवले.

ok

त्यानुसार रुग्णप्रयोग सुरू झाले. त्यात असे लक्षात आले की ज्या आजारांसाठी ही चाचणी चालू आहे त्याचे निष्कर्ष असमाधानकारक आहेत. पण त्याचबरोबर या रुग्णांमध्ये एक अजब प्रकार आढळला. असे पुरुष रुग्ण जेव्हा संशोधन कक्षात तपासणीसाठी येत, तेव्हा ते पलंगावर पडताक्षणी पटकन पोटावर झोपणे पसंत करीत ! ही गोष्ट एका चाणाक्ष परिचारिकेच्या लक्षात आली. मग तिने या रुग्णांची बारकाईने चौकशी केली तेव्हा त्याचे कारण उमगले. या रुग्णांना चांगल्यापैकी लिंग ताठरता येत होती आणि ती बराच काळ टिकत असे. त्यामुळे लज्जित होऊन ते पटकन पोटावर झोपत असत.
या मुद्द्यावर अधिक अभ्यास करता हे समजले की, या औषधामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांऐवजी पुरुष लिंगाच्या रक्तवाहिन्याच चांगल्यापैकी रुंदावत आहेत. परिणामी मूळ संशोधनाची दिशा पूर्णपणे बदलण्यात आली. ज्या पुरुषांना संभोगसमयी लिंग ताठरतेची दुर्बलता येते त्यांच्यावर याचे नव्याने प्रयोग सुरू झाले. त्या प्रयोगांना यश येऊन 1996 पर्यंत हे औषध पुरुषांच्या लैंगिक दुर्बलतेवरील ( Erectile Dysfunction) एक उपाय म्हणून प्रस्थापित झाले.

ok
....

सन 1857 ते 1996 या दीर्घ कालखंडात आधुनिक वैद्यकात योगायोगाने शोधल्या गेलेल्या काही औषधांच्या कथा आपण पाहिल्या. विज्ञानामध्ये अशा प्रकारच्या शोधाला “serendipity” हे वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. या शब्दाची व्युत्पत्ती मोठी रंजक आहे.
‘serendip’ याचा अरबी भाषेतील अर्थ म्हणजे श्रीलंका(सिंहलद्वीप) ! पर्शियन भाषेत एक परीकथा आहे. सेरेंदीपचे तीन राजपुत्र सतत भ्रमण करीत असत. त्यांचे भ्रमण हे कुठल्याही विशिष्ट हेतूने नसायचे. परंतु त्या दरम्यान त्यांना विविध गोष्टींचे शोध निव्वळ योगायोगाने लागत. त्यामध्ये त्यांच्या कष्टापेक्षा चातुर्याचा भाग अधिक असे. या कथेतून आलेला तो शब्द पुढे भाषेत रूढ झाला.

अनेक प्रकारचे वैज्ञानिक शोध आणि नव्या उत्पादनांच्या कल्पना याप्रकारे उगम पावतात. त्याचाच एक भाग म्हणजे वैद्यकातील काही औषधांचे शोध. काही निवडक औषधांच्या वर सादर केलेल्या शोधकथा वाचकांना रंजक वाटतील अशी आशा आहे.
कुठल्याही क्षेत्रातील अशा प्रकारच्या शोधांबद्दल वाचकांनी प्रतिसादांमध्ये जरूर लिहावे.
…………………………………………………………………………………………………………………

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

अत्यंत रोचक लेख. धन्यवाद.

याप्रमाणेच उलट: खास तर्कशास्त्र वापरुन विशिष्ट परिणाम साधायचा हे ध्येय पक्के करुन त्यानुसार वेगवेगळ्या रेण्विक रचना तयार करणे, टेस्टिंग करणे हाही एक मोठा कौतुकास्पद भाग असतो. मला वाटते रक्ताच्या कर्करोगावरील imatinib हे औषध हे असे एक उदाहरण आहे.

कुमार१'s picture

7 Feb 2022 - 12:01 pm | कुमार१

धन्यवाद ! छान उदाहरण दिलेत.

imatinib हे औषध त्याच्या शोधापासून आणि नंतरही बरेच गाजले.
मुळात ते विशिष्ट प्रकारच्या उच्चरक्तदाबासाठी म्हणून विचारात घेतले होते. परंतु त्यात मात्र संशोधकांना यश आले नाही.

नंतर ते काही कर्करोगांच्या बाबतीत जादूची कांडी वाटावी असे उपयुक्त ठरले होते. पुढे या औषधाच्या भारतातील स्वामित्व हक्कासंबंधीचा खटलाही खूप गाजला आणि पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता.

विजुभाऊ's picture

7 Feb 2022 - 1:23 pm | विजुभाऊ

हल्ली बरीचशी औषधे ही अगोदर रेणू ची रचना ठरवायची , ती रचना कसे वागेल हे ठरवायचे आणि त्यानुसार मोल्यूक्यूल बनवायचे . ती रचना औषध म्हणून जाहीर करून त्याच्या ट्रायल घ्यायचा असा ट्रेंड दिसतो.
( काय शोधायचे आहे ते अगोदर ठरवायचे आणि त्या नंतर शोधायचे)

कुमार१'s picture

7 Feb 2022 - 1:55 pm | कुमार१

म्हणजे ते असं झालं:
संगीताच्या रचना आधीच तयार असतात. त्यात गीतकाराचे शब्द नंतर जमेल तसे बसवून टाकायचे
:))

तयार रचनेत जमेल तसे बसवून टाकायचे ही तुलना चपखल वाटत नाही.

काहीतरी अन्य प्रयोग करताना, किंवा असेच काही कोम्बिनेशन्स ट्राय करताना अपघाताने लागलेले शोध हा एक रोचक प्रकार. पण समस्येचा नीट खोलवर अभ्यास करुन त्यावर संपूर्ण कार्यकारणभाव जाणत नेमके काय आकाराचे रेणू काम करतील हे आडाखे आधीच बनवून त्या आकाराचा रेणू कसा बनेल हे पाहणे हा मार्गही अत्यंत कष्टाचा, बुद्धीचा आणि सर्जनशील आहे.

माझ्या माहितीनुसार आधी उल्लेखलेले औषध हे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे कारण असणारा जनुकीय बिघाड (उदा. एखादी जागा रिकामी राहणे आणि त्यामुळे पेशी विभाजनावरचे नियंत्रण सुटून कर्करोग होणे या कार्यकारणभावाच्या अनुषंगाने नेमकी त्या आकाराची पाचर बसेल अशा आकाराचा रेणू शोधून जणू त्या दोषामुळे अनियंत्रित झालेल्या विभाजनाला ब्रेक लावला जावा असे करणे हा विलक्षण शोध वाटतो.

यावर माहितीपूर्ण लेख वाचायला आवडेल गवि

तो डॉ कुमारेकच लिहू शकतील. त्यातील बारकावे आवश्यक आहेत.

छान लेख आहे...अजून वाचायला आवडेल

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Feb 2022 - 2:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुमच्या वैद्यकिय लेखनप्रपंचामधील एक अजुन वैशिष्ट्य् पुर्ण लेख. बरीच माहिती मिळते तुमचे असे लेख वाचुन. पुलेशु.

कुमार१'s picture

7 Feb 2022 - 2:56 pm | कुमार१

प्रतिसाद आणि चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे आभार !
...


औषध हे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे कारण असणारा जनुकीय बिघाड


>>>
हा मुद्दा चर्चेला चांगला आहे. काही दिवसांपूर्वी एका कर्करोग परिषदेला गेलो होतो. भविष्यातील कर्करोग उपचारांची दिशा ही कशी असेल हे त्यात छान समजले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा लिहितो.
बहुतेक महत्त्वाच्या कर्करोगांच्या बाबतीत संबंधित रुग्णाचा जनुकीय अभ्यास केला जातो. त्यानुसार उपचारांची दिशा ठरते आणि बदलू शकते.

पुढच्या पंचवीस-तीस वर्षात यामध्ये एक महत्त्वाची घडामोड होईल. एखाद्या व्यक्तीला झालेला कर्करोग हा कुठल्या अवयवाचा आहे हा भाग तसा दुय्यम राहील. परंतु त्या रुग्णामध्ये कुठल्या प्रकारचा जनुकबदल आढळून आला आहे याला अधिक महत्त्व असेल. त्यानुसारचे उपचार हे अधिक महत्त्वाचे ठरतील.

गवि's picture

7 Feb 2022 - 2:59 pm | गवि

रोचक.

भागो's picture

7 Feb 2022 - 5:46 pm | भागो

“Nature makes penicillin, I just found it; one sometimes finds what one is not looking for" Fleming.
मी इंग्लिश भाषेचा अभ्यासक असल्याने serendipitous ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल वाचत होतो. serendipitously माझ्या वाचनात एक लेख आला.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2323527/
https://newhumanist.org.uk/articles/4852/science-and-serendipity-famous-...
वरील ncbi च्या लेखात पेनिसिलीन आणि विअग्रा ह्यांच्या शोधाबद्दल जरा निराळी माहिती आहे. ती निदर्शनास आणावी एवढाच हेतू.
जिज्ञासूनी जरूर वाचावे.

कुमार१'s picture

7 Feb 2022 - 6:30 pm | कुमार१

पेनिसिलीन आणि विअग्रा ह्यांच्या शोधाबद्दल

>>>
दुवे वाचले. थोडाफार फरक समजला.

कुमार१'s picture

9 Feb 2022 - 7:55 pm | कुमार१

अलेक्झांडर फ्लेमिंग आणि चर्चिल यांच्या संदर्भातील ही बोधकथा रंजक आहे:

https://m.youtube.com/watch?v=EW1GyDKaLoY&feature=youtu.be

कर्नलतपस्वी's picture

7 Feb 2022 - 7:42 pm | कर्नलतपस्वी

रोचक व रंजक माहीतीपुर्ण.
संशोधन हा एक खूप वेळ काढू आणी खर्चिक बाब आहे.आपल्या देशात पुरेसे प्राधान्य आणी पैसा नसल्यामुळे खास करून वैद्यकीय क्षेत्रात हवे तेवढे संशोधन होत नाही म्हणून भारतीय फारमाकोपिया एवढा समृद्ध नाही. त्याचे कारण कदाचित हे ही असेल तो इतरांच्या मानाने वयाने खुपच लहान आहे. दुसरे कारण उपचार पद्धती आयुर्वेदिक आणी अँलोपँथी ही साहेबांनी आणली. परंतू चालू असलेल्या महामारी मध्ये भारतीय संशोधकांनी कमालच केली. माझी मुलगी सध्या मिशिगन विद्यापीठात संशोधन टीम मधे काम करतेय, तीच्या अनुभव प्रमाणे संशोधना करता लागणारी सामुग्री जर भरपूर प्रमाणात उपलब्ध झाली तर आपले शास्त्रज्ञ कमालच करतील.
भारतीय फारमाकोपिया समृद्ध झाला तर मेडिसीन ची उपलब्धता आणि कीमंत यावर खुप फरक पडू शकेल.
डाँक्टर यावर प्रकाश टाकाल काय, धन्यवाद

कुमार१'s picture

7 Feb 2022 - 8:12 pm | कुमार१

कर्नल, धन्यवाद.
तुमच्या मुद्द्याशी मी तत्वतः सहमत आहे. अर्थात मी संशोधक नसल्यामुळे अनुभवजन्य काही लिहू शकणार नाही. अनौपचारिक गप्पांमधून आणि वाचनामधून जे काही जाणवलं ते लिहितो.

सुमारे वीस वर्षांपूर्वी एका डॉक्टरांनी आयुर्वेदात पीएचडी मिळवल्याची बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ठळकपणे आली होती. त्यात त्यांनी भावी देशी संशोधकांना एक सल्ला दिला होता की, भारतात आपण संशोधन करताना आधुनिक संशोधन पद्धतींचा अवलंब केलाच पाहिजे. तसे न केल्यास आपण जगाच्या नजरेत भरणार नाही आणि मागेच पडू. हा मुद्दा अगदी पटण्यासारखा आहे. आपल्या देशातील पारंपारिक वैद्यक संशोधनात बऱ्याचदा असे ऐकू येते की, पारंपरिक औषध शास्त्रांच्या आपापल्या संशोधन पद्धती आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधन पद्धतींचा आपण अवलंब केलाच पाहिजे का ?

असे काही उलटसुलट वाचनात येते. प्रत्यक्ष देशी संशोधकाने त्याबाबत काही लिहिल्यास सर्वांना उपयुक्त ठरेल.

कर्नल, कुमार१ ..रोचक विषय आहे .. अजून माहिती मिळाली तर आवडेल

मदनबाण's picture

7 Feb 2022 - 9:22 pm | मदनबाण

जागतिक अर्थकारणावर वाचन करताना माझ्या वाचनात आणि क्लिप्स मधुन पाहण्यात The Wolf Of Wall Street हा चित्रपट आला होता. यात लियोनार्डो डिकैप्रियो याने जॉर्डन बेलफोर्ट च्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारीत ही भुमिका साकारली आहे. यावर अधिक माहिती घेताना Quaaludes बद्धल माहिती मिळाली होती. हा पार्टी ड्रग आहे आणि याची एका काळी अमेरिकेत क्रेझ निर्माण झाली होती आणि नंतर ते बॅन करण्यात आले होते, पण याची उत्पत्ती हिंदुस्थानात झाली होती ही रोचक माहिती मिळाली होती. युफोरिया अनुभवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपल्या देशात आजही अवैध्य पद्धतीने सेवन केले जाते आणि त्यासाठी अ‍ॅडिक्ट मोठी किंमत देखील मोजतात.
याची निर्मीत अनावधानानेच झाली का ? ते नक्की मला समजले नाही.
The Wolf of Wall Street मधला एक सीन :-

या विषयावरच जॉर्डन बेलफोर्ट ची मुलाखत देखील पाहिली होती :- Jordan Belfort reveals THE TRUTH about Quaaludes!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.

कुमार१'s picture

8 Feb 2022 - 7:51 am | कुमार१

मबा
बरोबर. या औषधाचे शास्त्रीय नाव Methaqualone हे असून ते 1951 मध्ये सर्वप्रथम भारतात शोधले गेले.

त्या संशोधनाचा मूळ हेतू एक मलेरियाविरोधी औषध शोधणे हा होता. हे झोप आणणारे औषध असून त्यावर भारतात बंदी आहे.

शेखरमोघे's picture

8 Feb 2022 - 10:22 am | शेखरमोघे

नेहेमीसारखाच माहितीपूर्ण, उपयोगी आणि सर्वन्गसुन्दर लेख. अभिनन्दन.

आपण लिहिले आहे - ‘serendip’ याचा अरबी भाषेतील अर्थ म्हणजे श्रीलंका(सिंहलद्वीप)- . पण ‘serendip’ हा शब्द "सिन्दबादच्या सफरी"मध्ये श्रीलंका(सिंहलद्वीप) करता वापरला गेला आहे. म्हणजे मुम्बईला जसे इन्ग्रज बॉम्बे म्हणत असल्यामुळे त्या जागेचे नाव सगळ्या जगाकरता बॉम्बे हे झाले, तसे अरबी जग श्रीलंका(सिंहलद्वीप) करता ‘serendip’ हा शब्द सगळे अरब व्यापारी/खलाशी वापरत म्हणून वापरू लागले असावे.

आयुर्वेदात जास्त सन्शोधन करताना येणारे मोठे प्रश्न म्हणजे आयुर्वेदातील बरीचशी नैसर्गिक औषधे non-standardised प्रमाणात असणे आणि म्हणून standardised dose देता न येणे. उदा. जेव्हा हळद ही औषध म्हणून वापरली जाते त्यावेळी ती जितकी "तयार' असेल (पक्व, वाळलेली, साफ केलेली) तितके त्यातील Curcumin (active ingredient) जास्त असेल आणि म्हणून जर शास्त्रोक्त आणि काटेकोर सन्शोधन करायचे असेल तर ते Curcumin वापरून करावे लागेल (की जे मग आयुर्वेदिक ठरणार नाही). आणखी एक उदाहरण - बरीच आयुर्वेदिक औषधे मधातून दिली जातात पण मधाचे हजारो प्रकार असू शकतात. त्यामुळे आयुर्वेदातील सर्पगन्धा (Rauvolfia serpentina) ही भारतात मिळणारी/वापरली जाणारी वनस्पती अभ्यासून पाश्चिमात्य शास्त्रज्ञानी त्यातील reserpine या मूल घटकाचा (active ingredient) anti-hypertensive drug म्हणून वापर सुरू केला (की ज्या करता सर्पगन्धा या नैसर्गिक वनस्पतीचा उपयोग करायचा असेल तर जगभराकरता standardised dose देता येणे कठीण झाले असते).

शेखरमोघे's picture

8 Feb 2022 - 10:27 am | शेखरमोघे

serendip’ हा शब्द "सिन्दबादच्या सफरी"मध्ये श्रीलंका(सिंहलद्वीप) करता वापरला गेला आहे जिथे सिन्दबाद दुसर्‍या वेळी गेल्यावर त्याला आपण तेथे एकदा येऊन गेल्याचे लक्षात येते आणि त्यामुळे "पुनर्भेट", "पुन्हा अनुभव येणे" अशासारखाही serendipity हा शब्द वापरला जातो

कुमार१'s picture

8 Feb 2022 - 10:37 am | कुमार१

छान प्रतिसाद !
रंजक पूरक माहितीबद्दल आभार !
serendipity या शब्दाचा अभ्यास करतानाच हा वैद्यकीय लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

चौकस२१२'s picture

10 Feb 2022 - 4:29 am | चौकस२१२

आयुर्वेदात जास्त सन्शोधन करताना येणारे मोठे प्रश्न म्हणजे आयुर्वेदातील बरीचशी नैसर्गिक औषधे non-standardised प्रमाणात असणे आणि म्हणून standardised dose देता न येणे.
अग्दि बरोबर पन हलु हलु त्यात बदल झालाय ? कि त्यासाठी लागणारी प्रयोगशाळेतील उपकरणे अजूनही महाग असल्यामुळे अवघड आहे ?
अनेक वर्षे पडलेले प्रश्न
१) ऍलोपॅथी ची औषधच्या मुळाशी गेले तर ती कोणत्या न कोणत्या नैसर्गिक वस्तू पासूनच बनवलेली असतात ना? मग आयुर्वेदिक म्हणजे शुद्ध आणि ऍलोपॅथी म्हणजे एकप्रकारची "कृत्रिम" असे का मानले जाते ? उदाहरण : परसिटॉमाल ची गोळी नक्की कशाची बनलेली असते?
२) इतर खायद्यपदार्थ टिकावेत म्हणून त्यात इतर रसायने घातली जातात तसे औषधांना करावे लागते का ? परत परसिटॉमाल चे उद्धरण घ्या

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 8:40 am | कुमार१

चांगल्या चौकस प्रश्नाबद्दल धन्यवाद !

आयुर्वेदिक औषधाच्या निर्माणसंबंधी संबंधित तज्ञाने बोलल्यास बरे. मी आधुनिक वैद्यकातील एक उदाहरण देतो - Aspirin हे औषध. यावर माझा मिपाच्या दिवाळी अंकात एक विस्तृत लेख येथे आहे :

https://www.misalpav.com/node/43382

त्यातील काही निवडक भाग उद्धृत करतो:

"Salicylic acidच्या वेदनाशामक उपयोगाची पहिली नोंद सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेरिअन संस्कृतीत झालेली आढळते. हे आम्ल अनेक झाडांच्या खोडात असते. त्यात प्रामुख्याने ‘विलो’ या झाडाचा समावेश आहे.

यापुढील टप्प्यात विलोपासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ वेगळा करण्यात यश आले आणि त्याला Salicin हे विलोचे लॅटिन नाव दिले गेले. पुढे Salicin हे शुद्ध स्फटिक स्वरूपात तयार केले गेले आणि मग जर्मनीतील एका कंपनीने Salicylic acidचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले.

पुढे Felix Hoffmann या तंत्रज्ञाने विचारांती Salicylic acid च्या रेणूत एक रासायनिक बदल केला. तो म्हणजे त्यात Acetyl group घालून Acetylsalicylic acid हे नवे रसायन तयार केले.= Aspirin"

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 9:15 am | कुमार१

२.
**इतर खायद्यपदार्थ टिकावेत म्हणून त्यात इतर रसायने घातली जातात तसे औषधांना करावे लागते का ?

>>>> होय, मूळ औषधाचे संरक्षण करण्यासाठी अन्य अनेक पूरक रसायने औषधांमध्ये घातली जातात.

इथे विस्तृत माहिती पाहता येईल:
https://pharmapathway.com/preservatives-used-in-pharmaceutical-industry/

अनिंद्य's picture

8 Feb 2022 - 12:07 pm | अनिंद्य

रोचक !

serendipity शब्दाची उगमकथा पूर्वी कोठेतरी वाचली होती पण वैद्यकातल्या शोधांमागच्या कहाण्या रंजक आहेत.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2022 - 1:00 pm | मुक्त विहारि

वेगळी माहिती....

तंत्रज्ञाना बाबतीत सांगायचे तर, X-Ray फोटो, हा एक असाच लागलेला शोध आठवतो

आणि तर्कशुद्ध विचारसरणी असेल तर, माझ्या गाडीला, व्हॅनिला आइस्क्रीम आवडत नाही. इतर आइस्क्रीम घेतले की, गाडी लगेच सुरू होते,.... अशी तक्रार आल्यावर, जनरल मोटर्स इंजिनीयर लोकांनी केलेली मेहनत आठवते...

https://youtu.be/ZvEB_ZoR9o0

कुमार१'s picture

8 Feb 2022 - 2:49 pm | कुमार१

माझ्या गाडीला, व्हॅनिला आइस्क्रीम आवडत नाही. इतर आइस्क्रीम

>>>
मस्त ! ज-ब-रा-ट ....
लै आवडले 😀

मुक्त विहारि's picture

11 Feb 2022 - 6:38 pm | मुक्त विहारि

मी नेहमी हेच उदाहरण देत होतो ....

एका व्हेवर कंट्रोल व्हाॅल्वचा CV बदलला गेला होता, त्यामुळे प्राॅडक्शन टाईम दुप्पट झाला होता. मुळ कारण शोधतांना, हाच फंडा उपयोगी पडला होता...

RCA सारखी मजा कधीच आली नाही

मुक्त विहारि's picture

11 Feb 2022 - 6:39 pm | मुक्त विहारि

व्हेपर कंट्रोल, असे वाचावे

कुमार१'s picture

11 Feb 2022 - 6:50 pm | कुमार१

तो कार व आइस्क्रीमचा किस्सा ही संपूर्ण सत्य घटना आहे की त्याला तिखट मीठ लावलेले असावे ?
तुम्हीच सांगू शकाल :)

मुक्त विहारि's picture

11 Feb 2022 - 7:03 pm | मुक्त विहारि

खूप आधी ह्यावर, एक अधिकृत लेख वाचनांत आला होता ..

कुमार१'s picture

8 Feb 2022 - 1:56 pm | कुमार१

अनिंद्य, मुवि >> आभार !
...
,

X-Ray फोटो, हा एक असाच लागलेला शोध

>>>
यावरून हे पुन्हा आठवले :
डिसेंबर १८९५ मध्ये वैज्ञानिक Roentgen यांनी त्यांच्या बायकोच्या हाताचा एक्स-रे काढला. हा जगातील जिवंत माणसाचा पहिला एक्स-रे होता. या क्रांतिकारक घटनेचे वैज्ञानिक जगतात स्वागत झाले खरे. परंतु तत्कालीन सामान्यजनांनी या घटनेकडे साशंकतेने पाहिले होते.

लंडनच्या मार्च १८९६च्या Pall Mall Gazette मधल्या संपादकीयात याचे प्रत्यंतर येते. ते संपादक म्हणतात,

“मानवी शरीराच्या आतील गोष्टी अशा ‘फोटो’ काढून चव्हाट्यावर आणणे हे असभ्य आहे ! अशा अनैतिक तंत्रज्ञानावर राज्यकर्त्यांनी बंदी घालावी !! “

Nitin Palkar's picture

9 Feb 2022 - 8:48 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर लेख.... नेहमी प्रमाणेच. वायग्राचा शोध ज्या प्रकारे लागला त्याची गम्मतच वाटली.
आणखी एक गोष्ट आठवली.... विंचू दंशावर संशोधन करताना प्रसिद्ध डॉ. बावसकर यांना असे आढळले होते, 'विंचू दंशावरील उपचारासाठी आलेल्या पुरुष रुग्णांमध्ये शिस्न ताठरता येते'. सहज आठवले म्हणून...

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 4:17 am | कुमार१

धन्यवाद व सहमती.

विंचू, साप आणि अन्य काही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विषाचा यासंदर्भात बराच अभ्यास झालेला आहे. त्यातील रासायनिक घटक शुद्ध करून काही औषधनिर्मिती करता येईल का, यासंदर्भात संशोधन चालू असते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Feb 2022 - 8:57 am | ज्ञानोबाचे पैजार

लेख आवडला

पैजारबुवा,

निनाद's picture

10 Feb 2022 - 9:49 am | निनाद

इम्प्लांट करण्यायोग्य पेसमेकरचा शोध असाच लागलेला आहे असे वाचल्याचे स्मरते. हृदयाची लय रेकॉर्ड करणारे उपकरण तयार करण्याचा प्रयत्न चाललेला असतांना हे उपकरण तयार झाले.

क्ष-किरण, लाफिंग गॅस, अँटी-डिप्रेसंट आणि एलएसडी हे पण अपघाताने सापडलेले आहेत. यांच्या कथापन रोचक आहेत. डॉक्टरांनी त्या ही भाग दोन मध्ये घ्याव्यात अशी नम्र विनंती!

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 11:23 am | कुमार१

धन्यवाद ! सूचना चांगली आहे
वैद्यकीय उपकरणे किंवा तंत्रज्ञान यावर आधारित भाग 2 चा विचार सवडीने करता येईल.

MipaPremiYogesh's picture

10 Feb 2022 - 10:29 am | MipaPremiYogesh

Chan mahiti Dr.

औषध संशोधन शास्त्रात फार्मसी ( औषध निर्माण शास्त्राचा) फार मोठा वाटा आहे. त्यात एक PHARMACEUTICAL CHEMISTRY हा एक विषय येतो. ज्यात रसायनांच्या रेणूची रचना आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो. याला structure activity relationship म्हणतात.

मूळ औषधाच्या रेणूच्या संरचनेत बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो हे यात तपासले जाते.

उदा. नॉर फ्लोक्सासिन या रेणूला एक सायक्लोप्रोपेनचा रेणू जोडल्यामुळे तयार होणारे सिप्रो फ्लोक्सासिन हे औषध नॉरफ्लोक्सासिन पेक्षा कितीतरी अधिक जिवाणूंवर उपयोगी ठरले.

सिप्रोफ्लोक्सासिन च्या सायक्लो प्रोपेन च्या जागी एक ऑक्सिजनचा रेणू टाकल्यावर तयार झालेले ओफ्लोक्सासिन हे ( सेकंड जनरेशन) औषध जास्त काळ शरीरात राहते आणि शिवाय ते अधिक जास्त जिवाणूंवर गुणकारी ठरते.

ओफ्लोक्सासिन हे लेव्हो आणि डेक्सट्रो अशा दोन रेणूंचे मिळून बनलेले असते त्या पैकी केवळ लेव्हो आयसोमर हे प्रतिजैविक म्हणून काम करते त्यामुळे डेक्सट्रो आयसोमर काढून टाकून लेव्होफ्लोक्सासिन हे औषध तयार केले गेले ज्याचा गुण तितकाच येतो परंतु डेक्सट्रो आयसोमर काढून टाकल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स अर्धे झाले.

याच तर्हेने पेनिसिलीन केफॅलोस्पोरीन सारख्या प्रतिजैविकांसह डॉक्सोरुबीसीन सारख्या कर्करोग प्रतिबंधक औषधांच्या रेणूत बदल करून अनेक औषधांच्या रेणूत थोडासा बदल करून जास्त गुणकारी किंवा कमी साईड इफेक्टस असणारी औषधे शोधण्यात येतात.

उदा डॉक्सोरुबीसीन मध्ये बदल करून डॉनोरुबीसीन एपीरुबीसीन आयडारुबीसीन यतयार करण्यात आली.

मूळ पेनिसिलीन मध्ये अमायनो फेनीलअमायडो गट अंतर्भूत करून अँपिसिलीन हे औषध निर्माण करण्यात आले. याचअमायनो फेनीलअमायडो ऐवजी हैड्रोक्सि अमायनो फेनीलअमायडो गट अंतर्भूत करून ऍमॉक्सीसिलीन हे औषध निर्माण करण्यात आले.

याचा औषधात क्लोरीनच्या रेणूचा अंतर्भाव करून क्लॉक्सासिलीन हे प्रतिजैविक रोधक जिवाणूंविरोधी (semisynthetic modifications of natural penicillins that are resistant to bacterial enzyme beta-lactamase, which accounts for typical penicillin resistance) पेनिसिलीन निर्माण करण्यात आले

अशा अनेक कहाण्या आहेत.

आयुर्वेदिक औषधातील उपयुक्त रेणू विलग करून त्याचे मूळ गुण काय आहेत त्या वर संशोधन करून त्यातून उपयुक्त औषध कसे विकसित करता येईल याचे संशोधन सतत चालू असते. उदा अडुळसा या औषधात असलेले व्हॅसिसीन हे औषध विलग करून त्याच्या वरून ब्रॉमहॅक्सिन हे कफ पातळ करणारे औषध विकसित करण्यात आले.

फार्मा कंम्पन्याना कोणतेही औषध वर्ज्य नसते. त्यांचा मूळ हेतूच औषध निर्मिती करून नफा कमावणे हाच असल्यामुळे आयुर्वेदिक युनानी सिद्ध अशा कोणत्याही पॅथीती लौषधे त्यांना वर्ज्य नाहीत.

होमिओपॅथी मध्ये मूलभूतच गृहीत चूक असल्याने (औषध जितके विरळ कराल तितके ते जास्त गुणकारी होईल- मीठ अगदी क्षुल्लक मात्रेत घातले तर पदार्थ खारट होईल का?) फार्मा कंम्पन्या यांच्या नादाला साधारणपणे लागत नाहीत.

आजही असे अनेक पारंपरिक औषधी ज्ञान जगभरात अनेक ठिकाणी उपलब्ध आहे ज्याचा वापर करून मानवजातीला उपयुक्त अशी औषधे निर्माण करता येतील हि खात्री आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Feb 2022 - 9:20 am | रावसाहेब चिंगभूतकर

जनरीक औषधांमध्ये आणि त्यांच्या मूळ औषधांमध्ये असे काही बदल असतात का? मूळ औषध अधिक प्रभावी होण्यासाठी औषध कंपन्या काही गोष्टी दडवून ठेवू शकतात का?

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 12:49 pm | कुमार१

अभिप्राय आणि पूरक माहितीबद्दल सर्व सहभागी यांचे आभार !
…..
पारंपरिक पद्धत आणि आधुनिक वैद्यक यांची सुरेख सांगड घातलेले अजून एक उदाहरण म्हणजे मलेरियावर शोधलेले हे औषध. यासाठी 2015 चे वैद्यकीय नोबेल पारितोषिक दिले गेलेले आहे.

पारंपरिक चिनी वैद्यकामध्ये sweet wormwood हा एक पदार्थ असतो. त्यातून artemisinin हे रसायन संबंधित वैज्ञानिकाने वेगळे काढले आणि पुढे त्याचा मलेरियाविरोधी औषध म्हणून विकास केला.

व्हलकनायझेशन म्हणजे नैसर्गिक रबराला अधिक टिकाऊ बनविण्याची पद्धत अशीच अपघाताने सापडली. नैसर्गिक रबर फार लवकर झिजते. ते टिकाऊ बनविण्याची पद्धत काही केल्या सापडत नव्हती. अशातच संशोधनाच्या ठिकाणी रबराच्या भट्टीत चुकून गंधक पडले. गंधक बाजूला करण्याच्या प्रयत्नांत असे जाणवले की ते मिश्रण अधिक लवचिक पण टिकाऊ बनले आहे. अशा तऱ्हेने नैसर्गिक रबर आणि गंधक यांचे संयुग बनविण्याच्या पद्धतीचा शोध लागला.

बेनझीन चे रासायनिक सूत्र समजले पण सहा कार्बनचे अणु आणि सहा हायड्रोजनचे अणु यांच्या संयुगाची रचना काही केल्या कल्पिता येत नव्हती. अशातच फ्रेडरिक केक्युल विचार करता करता शेकोटी जवळ झोपी गेला. गाढ झोपेत त्याच्या स्वप्नात साप आले आणि ते समोर येऊन गुंडाळी करून आपलीच शेपूट तोंडात कोंबतयात असे त्याला दिसले. त्या वरून बेंझिन ची संयुग रचना बंदिस्त, गोलाकार असावी असे त्याला सुचले.

ग्रॅहॅम बेलच्या टेलिफोनच्या उपयुक्ततेची कुणाला फारशी महती वाटली नाही. फारशी ये जा न करता आणि न ओरडता थोड्या अंतरावरील माणसं एकमेकांशी बोलतात झालं, अशी त्या संशोधनाची समीक्षा झाली होती.

पहिल्यांदा जो मुलगा टीव्ही वर झळकला तो त्याच्यावर टाकलेल्या प्रकाश झोत, तारांची भेंडोळी यामुळे घाबरून पळून गेला. त्या अगोदर निर्जीव वस्तू व्यवस्थित दिसत होत्या, पण मग मुलगाच का नाही दिसत या चिंतेने जेव्हा तो संशोधक स्टुडिओ मध्ये आला तर तो मुलगा जागेवर नाहीच असे त्याला दिसले. कशी तरी परत त्याची समजूत काढून त्याला बसविले आणि तो प्रयोग यशस्वी झाला.

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 3:27 pm | कुमार१

सुरेख विवेचन.
सर्व शोधांचे किस्से आवडले.
असेच विविध क्षेत्रातील किस्से जरूर यावेत

टर्मीनेटर's picture

11 Feb 2022 - 11:26 am | टर्मीनेटर

रोचक माहिती 👍
ह्या विषयावर आणखीन वाचायला आवडेल! येउद्यात पुढचा भाग.

श्रीगणेशा's picture

11 Feb 2022 - 5:46 pm | श्रीगणेशा

खूप छान माहिती.
व्हॅनिला फ्लेवर आईसक्रीमची ॲलर्जी असलेली कार तर भारीच!

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2022 - 8:48 am | श्रीरंग_जोशी

औषधांच्या शोधांवरचा हा माहितीपूर्ण लेख अन त्यावरचे प्रतिसाद आवडले. तीन वर्षांपूर्वी Serendipity हा टिव्हीवर चित्रपट पाहिला होता. त्यावेळी या शब्दाबाबत प्रथमच कळले होते. या लेखानिमित्ताने ती आठवण जागी झाली.

कुमार१'s picture

12 Feb 2022 - 9:04 am | कुमार१

अभिप्राय व प्रोत्साहनाबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार.!

**Serendipity चित्रपट >>>
माहितीबद्दल धन्यवाद
माझ्याकडे नेटफ्लिक्स नसल्यामुळे पाहता येणार नाही. झलक तेवढी बघेन.

कुमार१'s picture

5 May 2022 - 7:47 am | कुमार१

औषधे, औषधनिर्माण शास्त्र आणि आरोग्य यासंबंधीच्या काही घडामोडींचे संकलन या धाग्यावर करीत राहीन.

ही एक बातमी :
सध्या निर्माण होणाऱ्या औषधांपैकी तब्बल 88 % औषधांमध्ये कच्चामाल म्हणून वापरले जाणारे आयसोप्रोपील अल्कोहोल हे नॉन-आयपी दर्जाचे असून ही औषधे सेवन करणाऱ्याबरोबरच निर्माण करणाऱ्या लोकांनाही धोकादायक आहेत

( संदर्भ : छापील सकाळ मुख्य अंक पान 2, ५ मे २०२२ )

कुमार१'s picture

5 May 2022 - 7:48 am | कुमार१

अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई
(डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय)

https://marathi.abplive.com/crime/case-against-e-commerce-portal-amazon-...

कुमार१'s picture

11 Jun 2022 - 9:06 pm | कुमार१

28 वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या मनाने वायग्राचा प्रचंड मोठा डोस घेतला आणि हा आचरटपणा चांगलाच अंगाशी आला.
त्यातून सुटका होण्यासाठी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

कुमार१'s picture

28 Jun 2022 - 9:43 am | कुमार१

Thalidomide या औषधाचा इतिहास रंजक आहे. 1960 मध्ये हे औषध गरोदरपणातील मळमळ कमी करण्यासाठी वापरात होते. परंतु त्याचा अत्यंत विपरीत परिणाम गर्भावर दिसून आला. अशा अनेक स्त्रियांना जन्मजात व्यंग असलेली मुले झाली. परिणामी 1961 मध्ये या औषधावर बंदी घातली गेली.

पुढे सुमारे 25 वर्षांनी या औषधाचे अन्य गुणधर्म लक्षात आले. 1998 मध्ये त्याला एक प्रकारच्या कुष्ठरोगाच्या उपचारासाठी मान्यता मिळाली.

त्याही पुढची प्रगती पुढील दशकात दिसून आली. 2012 मध्ये त्याला अस्थिमज्जेच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी मान्यता मिळाली.

गरोदर स्त्रिया वगळता हे औषध वरील आजारांसाठी वापरले जाते.

कुमार१'s picture

25 Jul 2022 - 9:06 am | कुमार१

निरोध : शोध लावलाय कशासाठी आणि तरुण वापरत आहेत कशासाठी !
एक भारी बातमी :

नशेसाठी निरोधचा वापर

कुमार१'s picture

3 Oct 2022 - 11:56 am | कुमार१

औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती.
ही योजना सरकारच्या विचाराधीन :

https://www.esakal.com/desh/indian-government-planning-to-start-tress-an...

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 3:26 pm | कुमार१

एक चांगला लेख : https://www.loksatta.com/chaturang/patent-law-on-breast-cancer-medicine-...

पेटंट कायदा जागते रहो!

.....जयंती मुरलीधरन या एक सेवानिवृत्त बँक कर्मचारी होत्या. त्यांना महिन्याला २८,००० रुपये निवृत्तिवेतन मिळत होते. ‘मासिक उत्पन्न इतके असताना त्याच्या दुप्पट किमतीचे औषध मला परवडणेच शक्य नाही. माझा आणि माझ्यासारख्या अनेक कर्करोगग्रस्त स्त्रियांचा जीव वाचावा म्हणून सरकारने हे औषध स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत,’ असा विनंती अर्ज जयंती यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह औषध आणि व्यापारविषयक विविध विभागांना केला. त्यावर पुढे काही विशेष घडले नाही. सरकारने या बाबतीत लक्ष घालावे आणि पेटंट कायद्यातील सोयी वापरून या औषधाच्या किमती कमी कराव्यात, असे केरळ उच्च न्यायालयाने जून २०२२ मध्ये सरकारला सांगितले. दुर्दैवाने दरम्यान जयंती यांचा कर्करोगाने बळी घेतला. हे केरळ उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला येताच १६ सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयाने स्वत:हून याची दखल घेतली आणि सरकारला औषधाच्या किमती कमी करण्यास बजावले.....

कुमार१'s picture

8 Nov 2022 - 8:45 am | कुमार१

Paracetamol च्या गोळ्या ऑस्ट्रेलियामध्ये सुपर मार्केटमध्येही विकण्यास ठेवलेल्या असतात. परंतु या गोळ्यांची घाऊक खरेदी करून लोक घरी साठवतात. त्यातून आत्महत्येचे प्रकार वाढतात असे लक्षात आले.

म्हणून तज्ञांच्या एका समितीने अशा विक्रीवर निर्बंध घालावेत आणि अठरा वर्षाखालील मुलांना ती सुपर मार्केटमधून घेता येऊ नयेत अशी शिफारस केली आहे. त्यावरील उलट सुलट प्रतिक्रिया

कुमार१'s picture

23 Nov 2022 - 12:51 pm | कुमार१

'Goodyear टायर्स' आपल्याला परिचित आहेत. ते व्यापारी नाव Alan Goodyear यांच्यावरून दिलेले आहे. त्यांनी संशोधन करून तयार केलेले विशिष्ट रबर हे serendipity चे एक उत्तम उदाहरण आहे.

इंडियन रबर कमी चिकट करण्याचे Goodyear सातत्याने प्रयत्न करीत होते पण त्यांना यश येत नव्हते. एकदा त्यांच्या हातून गंधक लावलेले रबर चुकून विस्तवात पडले आणि त्यातून त्यांना अपेक्षित दर्जाचे रबर मिळाले. हे नवे रबर करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी vulcanization असे नाव दिले. Vulcan ही रोमच्या लोकांची अग्निदेवता आहे.

कुमार१'s picture

25 Nov 2022 - 11:58 am | कुमार१

Saccharine, cyclamate, aspartame & Sucralose हे रासायनिक पदार्थ नैसर्गिक साखरेला पर्याय म्हणून अस्तित्वात आले. त्यांचे शोधही वैज्ञानिकांना योगायोगानेच लागले आहेत. प्रत्यक्षात काही वेगळी रसायने किंवा औषधांचा शोध चालू असताना एखाद्या वैज्ञानिकाने आपले बोट चुकून चाटले आणि त्याला एकदम तीव्र गोड चव जाणवली ! त्यावर अधिक संशोधन करता एका वेगळ्याच गोड रसायनाचा शोध लागून गेला.

अशी काही रसायने आणि प्रत्यक्षात चालू असलेले संशोधन असे होते :

1. Saccharine : दगडी कोळशावरील प्रयोग.
2. Cyclamate : तापशामक औषधाचा शोध.

3. Aspartame : जठराच्या अल्सरवरील औषधाचा शोध. हा चालू असताना संबंधित वैज्ञानिकाने एक कागद उचलण्यासाठी म्हणून बोटाला थोडीशी थुंकी लावली होती.

4. Sucralose : याच्या शोधाची कथा अजूनच मजेशीर. Sucrose व chlorine या दोन रसायनांचे संयोग करण्याचे प्रयोग चालू होते. त्यातील वरिष्ठ वैज्ञानिकाने अन्य एकाला तोंडी सांगितले, की आता हे रसायन “test” करून बघ. पण संबंधित व्यक्तीच्या ऐकण्यात “taste” अशी गफलत झाली !
त्याने ते “टेस्ट” करून बघितले आणि त्याला अतिशय गोड चव जाणवली.

कुमार१'s picture

7 Feb 2023 - 5:58 pm | कुमार१

लेखात उल्लेख केलेल्या औषधांच्या यादीत अजून एकाची भर घालतो.
छातीच्या अंजायनासाठी नायट्रोग्लिसरीन (NTG) या औषधाची गोळी जिभेखाली ठेवतत. हा एक तातडीचा प्रथमोपचार असतो. या औषधाचा शोधही खूप रंजक आहे.

सुरुवातीस Sobrereo या वैज्ञानिकांनी त्याचा शोध लावला परंतु त्यांना त्याचा उपयोग काही माहीत नव्हता. त्यानंतरच्या काळात अनेक बांधकामाच्या मोठ्या कामांसाठी विविध स्फोटकांचे शोध घेणे सुरू होते. या कामी अल्फ्रेड नोबेल यांचा पुढाकार होता. त्यांनी या रसायनामध्ये अन्य रसायन मिसळले आणि त्यातून त्यांना एक स्फोटक मिळाले. त्याला डायनामाइट असे म्हटले गेले. त्याचा अनेक बांधकामांमध्ये वापर केला गेला. याच घटकाचे पुढे औषधे कसे बनले हेही रंजक आहे.

Sobrereo यांनी एकदा ते जिभेवर ठेवून त्याची चव घेतली होती. त्यांना ते खूप गोड लागले आणि त्यानंतर प्रचंड डोकेदुखी झाली. यावर अधिक संशोधन करून पुढील वैज्ञानिकांनी असे शोधले की हे औषध ठराविक प्रमाणात पोटातून दिले असता रक्तदाब कमी होतो आणि हृदयाच्या आणि अन्य रक्तवाहिन्या देखील प्रसरण पावतात. अशा तऱ्हेने हे औषध अंजायनावरील प्रथमोपचार म्हणून प्रस्थापित झाले
अजून एक मजेदार गोष्ट.
या औषधाचा मोठा साठा जर एखाद्या बॅगेत भरून विमानतळावर नेलेला असेल आणि तो जर तिथल्या बॉम्बशोधक यंत्रणा व कुत्री यांच्या संपर्कात आला तर स्फोटक असल्याचा सिग्नल येतो !
अशा एक दोन घटना विमानतळांवर घडल्यात.

विनापरवाना औषधं विकणं महागात, ई-फार्मसींना DCGI ची कारणे दाखवा नोटीस

DCGI ने शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी Tata 1 MG, Amazon आणि Flipkart सह अनेक ऑनलाईन फार्मसींना नोटिसा बजावल्या आहेत.