गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
1 Feb 2022 - 1:41 pm

आधीचा भाग येथे वाचा
गुजरात सहल २०२१_भाग ५- सासन गीर

सहलीचा सातवा दिवस पुढे सुरु
साडे अकराला गीर रिसॉर्ट सोडले आणि जुनागडकडे रवाना झालो.
अंतर जास्त नाही फक्त दीड तासाचा प्रवास (५७किमी). सहलीच्या आधी काही गोष्टींचा विचार केला होता. गीरहुन निघून थेट गिरनारला जायचे का? दुपार होणार होती. सगळ्यांना शक्य नसले तरी काहींची गिरनार चढाईची तयारी होती. दुपारनंतर उन्हाचा त्रास होऊ शकतो या कारणाने आज जुनागड स्थानिक स्थळे पाहणे व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच गिरनारला जायचे ठरवले होते.
गेले दोन दिवस गीर विहार रिसॉर्टला खूप मजेत गेले होते. त्याच उत्साहात जुनागडच्या हॉटेलला पोहचलो. पण आम्ही बुक केलेल्या सहा रूम पैकी एकही रूम तात्काळ मिळणे शक्य नव्हते. रात्री बहुतेक कुण्या बड्या धेंडाकडची वाढदिवस किंवा अशीच कुठलीतरी पार्टी झाली असावी व सकाळी त्यांनी खूप उशिरा चेक आऊट केले असावे. सगळ्या रूम अस्वच्छ व अस्ताव्यस्त होत्या त्या स्वच्छ करून आम्हाला ताब्यात मिळेपर्यंत खूप वेळ गेला.
हॉटेलमधून दिसणारा चौक व महाबत मकबरा

जेवण आटोपून बाहेर पडलो. आज आमच्या भटकंतीत उपरकोट किल्ला व महाबत मकबरा हि दोन ठिकाणे पाहायचे ठरले होते. चौकशी केली असता ही दोन्ही ठिकाणे नूतनीकरण चालू असल्याने पर्यटकांसाठी बंद आहेत असे समजले. इतर काय बघता येईल त्याची चौकशी केली. प्राणी संग्रहालय पाहता येईल असे कळले. तेथेही संध्याकाळी पाच पर्यंतच प्रवेश मिळतो. घाई करून पोहचलो "सक्करबाग झूआलॉजिकल पार्क" ला.
सक्करबाग हे गुजरातमधील सर्वात जुने प्राणी संग्रहालय असून ते सन १८६७ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. येथे आपणास विविध प्राणी/पक्षी पाहावयास मिळतात .

दुसरे ठिकाण महाबत मकबरा नूतनीकरणासाठी बंद असला तरी जवळून एक फेरी मारण्याचे ठरविले. गेटवर विनंती केली असता फक्त बाहेरूनच पाहण्यासाठी आवारात प्रवेश मिळाला.येथे नबाब महाबत खान दुसरा (१८५१ ते ८२) यांची कबर आहे. हिंदू-इस्लामिक-युरोपिअन स्थापत्यकलेची झलक या मकबऱ्यात दिसते. मकबऱ्याच्या दोन्ही बाजूचे मिनार व त्यांना वेढून वर जाणारे चक्राकार जिने मकबऱ्याची शोभा वाढवतात, महाबत खान यांचे उत्तराधिकारी बहादूर कानजी यांच्या काळात सन १८९२ मध्ये या मकबऱ्याचे काम पूर्ण झाल्याचे कळते,

नूतनीकरणाच्या पूर्वीचा फोटो

आज इतर काही बघायचे नसल्याने महिला वर्ग खरेदीसाठी जुनागढच्या बाजारपेठेकडे वळला. बाकीची मंडळी हॉटेलवर परत गेली.
रात्री जेवण झाल्यावर थोडा वेळ सातव्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूल जवळ जाऊन बसलो. गार हवा सुरु होती. छान वाटले. थोडा वेळ गप्पा मारून झोपायला गेलो.

आज सहलीचा आठवा दिवस.
सकाळी नाश्ता करून साडेसातलाच हॉटेल सोडले. गिरनार रोपवेचे सकाळी आठ ते नऊच्या स्लॉटचे ऑनलाईन बुकिंग केलेले होते. वेळेवर पोहचलो.

गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेले तलेटी ते अंबा माता मंदिर यांना जोडणारा हा २.३ किमीचा आशिया खंडातील सर्वात मोठा रोप आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सुरु झालेल्या या रोपे वे मुळे अंबे माता मंदिरापर्यंत पाच हजार पायऱ्या चढायचा त्रास वाचून अनेकांना दर्शन घेणे सुलभ झाले आहे. गिरनार पर्वत चढून दत्तात्रय मंदिरापर्यंत जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या लागत. आता रोप वे मुळे अर्धे अंतरच म्हणजे पाच हजार पायऱ्या चढाव्या लागतात,
रोप वे प्रवासासंधार्बत काही माहिती.
रोप वे चे आगाऊ तिकीट बुकिंग https://udankhatola.com/ या संकेत स्थळावर करता येते.
* रोपवेची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५
* एका बाजूचे तिकीट रु.४०० व जाऊन येऊन रु.७००/-
* अंतर २.३ किमी. वेळ साधारण आठ मिनिट
* तीन वर्षांच्या वरील सर्वांना तिकीट लागू.
* एकदा बुक झालेले तिकीट रद्द होत नाही/परतावा मिळत नाही.
* एक पाळणा /केबल कार /गंडोल्यात आठ प्रवासी बसू शकतात,

गंडोला

गंडोल्यातून दिसणारा नजारा

अंबा माता मंदिर
अंबे मातेचे मंदिर हे ५१ शक्ती पीठांपैकी एक आहे. मंदिरात मातेची सुंदर मूर्ती आहे,

मंदिर पाहून झाल्यावर आमच्याकडे दोन पर्याय होते. एक म्हणजे अठराशे पायऱ्या उतरून जैन मंदिर संकुल पाहून परत रोप वेला येणे. दुसरा पर्याय म्हणजे पाच हजार पायऱ्या चढून गोरक्षनाथ व गुरुशिखर यांना भेट देणे व परत रोपवेला येणे. आम्ही गुरुशिखर जाण्याचा निर्णय घेतला. ग्रुपमधील अर्ध्या जणांनी इतके अंतर चालणे शक्य नसल्याने रोप वेच्या वेटिंग रूममध्येच थांबण्याचे ठरविले. आम्ही पर्वत चढायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने पर्वतराजीचे अतिशय मनोहर दृश्य दिसत होते.

आधी लागते गोरक्षनाथ शिखर. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. गुरुचे स्थान नेहमी उच्च असते परंतु गोरखनाथांनी दत्तगुरूंना विनंती केली की आपले चरण दर्शन मला सतत होत रहावे.गुरूंनी हि विनंती मान्य केली.म्हणून गोरक्ष शिखर उंचावर आहे.

येथून थोडे पुढे गेल्यावर दोन कमानी आहेत . उजव्या कमानीपासून ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या कमानीतून प्रवेश करत आपण गुरुशिखराला जातो. या शिखराला जाण्यासाठी प्रथम हजार पंधराशे पायऱ्या उतराव्या लागतात व परत हजार पायऱ्या चढून आपण या शिखराला पोहचतो. असे मानतात कि श्री दत्तात्रेयांनी येथे बारा हजार वर्षे तपश्चर्या केली व त्यांच्या चरण पादुका येथे उमटलेल्या आहेत. सुळक्यावर अतिशय छोट्याशा जागेत चरण पादुका, दत्त मूर्ती यांचे दर्शन घेता येते. मंदिरात फोटो घेण्यास मनाई आहे. येथे येणारे बहुतेक भाविक महाराष्ट्रातीलच होते.

उतरताना एके ठिकाणी पायऱ्यांच्या बाजूला बसलेल्या फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतला.

फोटोग्राफर एक वयस्क माणूस होता व रेडिओवर गाणे ऐकत बसला होता. आशा-महेंद्रच्या आवाजात एक सुरेल गाणे ओ नीले पर्बतों की धारा.. सुरु होते. त्याच्याकडून कळले की आजचा ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन असल्याने गाण्यांमध्ये पर्वत हे बोल असलेली अतिशय चांगली गाणी सुरु आहेत. किती छान योगायोग. ध्यानीमनी नसतांना आज आमचे पर्वतारोहण झाले होते.
अंबे माते मंदिराजवळ परत आलो. दोन तासात दोन्ही शिखरांवर जाऊन आलो होतो. येथे जाणे खूप कठीण आहे असे आधी वाचले होते पण थोडीशी चालण्याची सवय असेल व मनाचा निश्चय असेल तर सहज शक्य आहे.

प्रतीक्षालयाजवळून घेतलेला एक फोटो

वेळेअभावी जैन मंदिराला भेट देणे शक्य होणार नव्हते. परत कधीतरीयेऊ असे म्हणून परतीच्या गंडोल्यात बसलो.
गंडोल्याातूनच जैन मंदिर संकुलाचे दर्शन . मुख्य मंदिर २२ वे जैन तीर्थांकर नेमिनाथांचे आहे. नेमिनाथांनी येथे ७०० वर्षे तपश्चर्या केली होती असे मानतात.

उतरल्यावर एक डिजिटल फोटो काढून घेतला. एकच फोटो वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या सात प्रती आपल्या मोबाईलवर मिळतात.

दुपार झाली होती. चहा घेऊन अहमदाबादसाठी प्रवास सुरु केला. आजचा प्रवास खूप जास्त (३०० किमीचा) होता. दुपारचे जेवण, चहापाणी, व शेवटी अहमदाबाद शहरातील रहदारी यामुळे मुक्कामाचे हॉटेल गाठण्यास रात्रीचे अकरा वाजले.

क्रमश:
पुढचा भाग : अडालज वाव आणि अहमदाबाद स्थानिक भटकंती

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

1 Feb 2022 - 6:17 pm | कर्नलतपस्वी

वाचतोय, बरेच ठिकाणी देवी गडावर आसते आता भक्तांच्या सोई साठी उडन खटोला बांधण्यात आला आहे. मस्त फोटो आहेत.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Feb 2022 - 6:33 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान भाग. फोटोही सुंदर आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

1 Feb 2022 - 7:28 pm | प्रसाद_१९८२

छान माहिती व फोटो.

निनाद's picture

2 Feb 2022 - 4:32 am | निनाद

वा! जुनागढपासून सौराष्ट्रावर राज्य करणाऱ्या वीर चुडासामा घराण्याच्या गावात गेला तुम्ही. सुमारे सातशे वर्षे राज्य केले यांनी जुनागढवर. मुस्लिम आक्रमकांशी कडवट लढा दिला. जुनागढ हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा ही भाग होता. येथे तसे शिलालेख आहेत असे म्हणतात. येथील जुने श्री स्वामिनारायण मन्दिर पण सुरेख आहे असे म्हणतात.
बाकी वर्णन सुरेख. सर्व छायाचित्रे अप्रतिम आहेत. ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन असतो हे नवीनच कळले. योगायोग अगदी छान जुळून आला. गिरनार पर्वतावर जाण्याची ईच्छा आहे. पण पाहू कधी बोलावले जाते ते!

गोरगावलेकर's picture

2 Feb 2022 - 9:45 am | गोरगावलेकर

येथे जाणे झाले नाही. सकाळी लवकरच रोपवेला पोहचायचे होते. परतीच्या वेळीही पुढच्या प्रवासासाठी निघायचे असल्याने जास्त चौकशीही केली नाही. माहितीबद्दल धन्यवाद .

Bhakti's picture

2 Feb 2022 - 6:57 am | Bhakti

मस्त चालू आहे सहल!

प्रचेतस's picture

2 Feb 2022 - 9:12 am | प्रचेतस

हा भागही सुरेख.
महाबत मकबर्‍याची वास्तूशैली आवडली.
गिरनारच्या पायथ्याला जवळच जुनागडचा सुप्रसिद्ध शिलालेख आहे ज्यावर अशोकाचा (मौर्यकालीन), रुद्रदामनाचा (क्षत्रप) आणि स्कंदगुप्त (गुप्तकालीन) अशा तीन भिन्न राज्यकर्त्यांचा शिलालेख एकाच विशाल खडकावर कोरलेला आहे.
गिरनारच्या पायर्‍या एकदम भारीच आहेत.

गोरगावलेकर's picture

2 Feb 2022 - 9:48 am | गोरगावलेकर

मोठ्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या आवडी निवडी सारख्याच असतील असे नाही. त्यामुळे काही ठिकाणे सोडावी लागतात. गिरनारचे जैन मंदिर संकुल बघायला परत कधीतरी जाणे झाले तर तेथपर्यंत पायी जाण्याचा विचार आहे. त्यावेळी या माहितीचा निश्चितच उपयोग होईल व हे ठिकाण बघता येईल

गोरगावलेकर's picture

2 Feb 2022 - 9:44 am | गोरगावलेकर

@ कर्नलतपस्वी, ॲबसेंट माइंडेड ..., प्रसाद_१९८२, Bhakti आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

सौंदाळा's picture

2 Feb 2022 - 10:41 am | सौंदाळा

हा भागसुध्दा मस्तच.
महाबत मकबरा भारीच दिसतोय.
तुमचे जुनागढमधले हॉटेल लोकेशन पण सुंदरच.

धर्मराजमुटके's picture

2 Feb 2022 - 11:28 am | धर्मराजमुटके

छान चालली आहे सहल. तुम्ही ज्या ज्या हॉटेलांमधे राहिला त्यांचे पत्ते आणि दरपत्रक / जमल्यास संकेतस्थळाचा पत्ता इथे दिले तर भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो.

कंजूस's picture

2 Feb 2022 - 12:30 pm | कंजूस

हॉटेल्स चांगली दिसताहेत.
फोटो नेहमीप्रमाणे मोजके आणि चांगले.
लेखन वर्णन आणि फोटो यांची चांगली सांगड घातली आहे.
राजकोट/गोंडाळ/मोरवी यांपैकी एखादे ठिकाण वाढवायला हवे होते. महाल आहेत.

गोरगावलेकर's picture

3 Feb 2022 - 2:24 pm | गोरगावलेकर

राजकोट/गोंडाळ/मोरवी यांपैकी एखादे ठिकाण वाढवायला हवे होते. महाल आहेत.
आधी कल्पना असती तर निश्चित वाढवता आले असते. पण ठीक आहे. परत कधी जाणे झाले तर या ठिकाणांना प्राधान्य राहील

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Feb 2022 - 11:46 am | राजेंद्र मेहेंदळे

छान चालली आहे ट्रिप. तुम्ही राहिलेल्या हॉटेल्सची माहिती दिल्यास कधीतरी ट्रिप प्लॅन करता येईल.

जाहिरात--मी २०१६ फेब्रुवारीमध्ये गिरनार्/सोमनाथ भटकंती केली होती. पण तेव्हा रोपवे झाला नव्हता.

गिरनार

गोरगावलेकर's picture

3 Feb 2022 - 2:26 pm | गोरगावलेकर

आपला लेख वाचला. सविस्तर माहिती आवडली.
काही हॉटेलची नावे दिली होती. तरीही खाली परत देत आहे.
कच्छ चे रन : मेहफील ए रन रिसॉर्ट
जामनगर : हॉटेल हायवे हरी
द्वारका : तोरण टुरिस्ट बंगलो
सोमनाथ :सरोवर पोर्टिको
गीर : गीर विहार रिसॉर्ट .
जुनागड : हॉटेल क्लीक
अहमदाबाद :अलका इन

वर दिलेली हॉटेल्स जरा महाग वाटली,

सोमनाथ मध्ये श्री सोमनाथ ट्रस्ट ची चांगली सोय आहे
गिरनार पायथा म्हणजे "भवनाथ तलेटी" येथे खूप म्हणजे खूपच धर्मशाळा आणि ट्रस्ट आहेत. तिथे दोन वेळ जेवण म्हणजेच प्रसाद आणि राहण्याची सोय होते काही ट्रस्ट मध्ये अतिशय शांत वातावरण आहे

Bharti Aashram - गोशाळा, आंब्यांची बाग, अतिशय शांत अशी ट्रस्ट आहे रुपये ८०० मध्ये Non AC दोन जेवणासह (प्रसाद)
GORAKSHNATH AASHRAM - तीन चार माजली AC आश्रम आहे, जेवण बेष्ट  - रुपये १५०० मध्ये AC दोन जेवणासह (प्रसाद)

अनिंद्य's picture

3 Feb 2022 - 12:12 pm | अनिंद्य

झकास सहल ! मागचा गीर आणि आता हा भाग आवडला. उर्वरित गुजरातसारखे ज्यात त्यात साखर-गोड नसल्यामुळे जुनागड-राजकोट भागातले सोरठी भोजन आवडले असेल :-)

महाबत मकबऱ्याचे 'नूतनीकरण' जसे केले आहे त्यापेक्षा न केलेले जास्त सुंदर दिसले असते. असो.

गोरगावलेकर's picture

3 Feb 2022 - 2:32 pm | गोरगावलेकर

सर्वच ठिकाणी जेवण खरोखरच चांगले मिळाले . सुशोभीकरण केलेला मकबराही छानच वाटतो.

गोरगावलेकर's picture

3 Feb 2022 - 2:29 pm | गोरगावलेकर

सौंदाळा, धर्मराजमुटके, प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@धर्मराजमुटके हॉटेल बाबत वर एका प्रतिसादात माहिती दिली आहे. जालावर तपास केल्यास सहज सापडतील. दर बदलते असतात. ग्रुपमध्ये बहुतेक ठिकाणी सवलत मिळाली

विकास...'s picture

3 Feb 2022 - 11:50 pm | विकास...

जय गिरनारी

रोपे वे अतिशय छान आहे

खालील माहितीचा उपयोग सर्वांना व्हावा म्हणून देत आहे

पण १० Sep २१ ला आम्ही Online बुक करून गेलो होतो. वरती वातावरण खराब असल्याने रोप वे नि फक्त खाली येणं चालू होते. विनंती आहे आधी फोन करा वेब साईट वरचे नंबर्स चालू आहेत
आम्हाला वर जाऊ दिले नाही आणि बुकिंग पण कॅन्सल होत नव्हते. आत आणि बाहेर बराच राडा चालू होता. त्यांच्या वेब साईट वरच्या ई-मेल वर सविस्तर मेल करून बुकिंग कॅन्सल केले. दुसऱ्या दिवशी नवीन तिकीट काढून वर जावे लागले

रात्री खूप मुसळधार पाऊस पडला, सकाळी लवकर ०६:३० ला रोपे वे साठी जाऊन नंबर लावला तिकीट मिळाले आणि ०७:३० पर्यंत वर पोहोचलो
आम्ही ११:३० पर्यंत दर्शन, प्रसाद आणि भरपूर फोटो विडिओ काढून खाली taleti ला आलो होतो, सोमवार होता, संध्याकाळी श्री सोमनाथ मंदीरामध्ये दर्शन पण झाले

Visa2Explore हरीश बाली आणि मुंबई चे राणे गुरुजी यांच्या विडिओ मधील माहितीप्रमाणे आंम्ही गेलो होतो, छान प्रवास आणि दर्शन झालं.

जय गिरनारी

गोरगावलेकर's picture

4 Feb 2022 - 10:00 am | गोरगावलेकर

आपले दोन्ही प्रतिसाद वाचले. नवीन जाणाऱ्यांना या माहितीचा निश्चितच चांगला उपयोग होईल. आमचा अशी हॉटेल्स निवडण्यामागचा हेतू वेगळा होता. पूर्वी कुठल्यातरी प्रतिसादात याबद्दल सांगितले आहेच.