अनेक वर्षांपासून गिरनारला जायचे मनात होते.आम्ही २-३ मित्र भेटलो कि गप्पांमध्ये गिरनार चा विषय हटकून निघायचा.मग त्यातला एक जण परस्पर गिरनारला जाऊन आला आणि एकटाच जाऊन आल्याबद्दल त्याने आमच्या शिव्या खाल्ल्या. मग काही महिने आम्ही त्याच्या मागे लागायचो कि आम्हालापण गिरनारला घेउन चल आणि तो हि जाऊ जाऊ करायचा पण ते काही जमत नव्हते. कधी सुट्टी नाही, कधी कोणीतरी परदेशी गेलाय कधी कोणी आजारी आहे अशी काही न काही कारणे निघायची.असे करता करता अनेक वर्षे गेली.मी जमेल तशी गिरनार बद्दल माहिती गोळा करतच होतो. जे लोक जाऊन आले त्यांच्याशी बोलत होतो.१-२ पुस्तकेही आणून वाचली. पण माझा गिरनार ला जाण्याचा योग काही येईना.
अशातच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मित्राचा, तुषारचा फोन आला.रत्नागिरीहून ८-१० जणांचा त्यांचा ग्रुप गुजराथ दर्शन साठी जाणार आहे आणि त्यांचा पहिलाच मुक्काम गिरनारला असणार असे त्याने सांगितले. थोडक्यात म्हणजे त्यांचा सर्व प्लान तयार होता .आणि मला जमल्यास त्यांच्याबरोबर गिरनारला जाता येणार होते.चला "एक से भले दस " असे मनात म्हणून मी तयारीला लागलो.प्रथम ऑफिसमधील उत्साही मंडळींना विचारले . हो ना करता करता शेवटी एकच जण तयार झाला.म्हणजे पुण्याहुन आम्ही दोघे आणि रत्नागिरीहून ते दहा जण असा १२ जणांचा ग्रुप होणार होता. त्या लोकांची सगळी बुकिंग झाली होती. त्यामुळे आम्ही प्रथम पुणे जुनागढ प्रवासासाठी पर्याय शोधू लागलो.
जुनागढ हे गिरनारच्या सर्वात जवळचे शहर आहे. तिथून राजकोट हे दुसरे मोठे शहर सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. पुणे राजकोट थेट बस आहेत. पण बस पेक्षा रेल्वे प्रवास आरामदायक होइल असे वाटल्याने आम्ही रेल्वेचे बुकिंग बघू लागलो.पण फेब्रुवारीतील पुणे राजकोट किंवा जुनागढ ची रेल्वे बुकिंग फुल झाली होती. दुसरा पर्याय म्हणजे पुणे मुंबई आणि मुंबई राजकोट/जुनागढ . पण त्या ट्रेन सायंकाळी फार लवकर असल्याने आम्हाला एक दिवस जास्त सुट्टी घ्यावी लागली असती.शेवटी पुणे -मुंबई-अहमदाबाद-जुनागढ असा रूट ठरवून आम्ही ट्रेनची तिकिटे काढली.मुंबई-अहमदाबाद दुरान्तो एक्स्प्रेस रात्री ११.३० ला मुंबई सेन्ट्रल हुन सुटते आणि सकाळी ६ वाजता अहमदाबादला पोचते. त्यामुळे दिवसा ऑफिसात जाऊन रात्रीची ट्रेन पकडणे शक्य होते आणि रात्रीची झोपही पूर्ण झाली असती.अहमदाबाद-जुनागढ सतत बस चालू असतात असे कळल्याने त्याचे बुकिंग आधी केले नाही.
येताना दमलो असणार असे गृहीत धरून राजकोट-पुणे थेट बसचे बुकिंग करून टाकले. अशा तऱ्हेने मुख्य जाण्याचे व येण्याचे बुकिंग झाले आणि तुषारला फोन करून कळवून टाकले.गिरनार पायथ्याशी अनेक धर्मशाळा आहेत.ते लोक सनातन हिंदू धर्मशाळेत राहणार होते.(टिप-> या धर्मशालेचा सनातन संस्थेशी काही संबध नाही.)त्यामुळे जुनागढला उतरल्यावर सनातन धर्मशाळा गाठायची आणि तेथेच सर्वांनी भेटायचे ठरले. अशा तऱ्हेने बर्यापैकी तयारी झाली आणि आम्ही गिरनार ला जायला सज्ज झालो.
२३ तारखेला संध्याकाळची इंटर सिटी पुण्याहून एकदम वेळेत निघाली पण पुढे काहीतरी गडबड झाली आणि गाडी ३० मिनिटे उशीरा दादरला पोचली.आमची पुढची गाडी मुंबई सेन्ट्रल हून ११.३० ला असल्याने मध्ये बराच वेळ हाताशी होता. त्यामुळे तशी काही घाई नव्हती.दादर ला बाहेर पडलो आणि मामा काणे हॉटेल गाठले . रात्रीचे ९ वाजले होते. बाजूचे कामत हॉटेल पूर्ण भरून ओसंडून वाहत होते.पण इथे मात्र लोकांना अडवायला एक वेटर शटर धरून उभा होता जेणे करून नवीन माणसे आत येऊ नयेत आणि होटेल बंद करता यावे. तरीही आत गेलो.आत एकदम १९६० चे जुनाट वातावरण, पु.लंच्या कथेत म्हटल्याप्रमाणे हॉटेलातील सगळ्यात उपेक्षित व्यक्ती म्हणजे आलेले ग्राहक. त्यातच जणू काही पुण्याची कमतरता भासू नये म्हणून तिकडच्या वेटरने हे संपलाय ते संपलायची टेप लावली.शेवटी त्याला विचारले की जे काय आहे ते आण. मंगळवार असल्याने उपासाचे पदार्थ होते.त्यातले एक दोन पदार्थ आणि पियुष मागवले.पोट भरले पण जेवल्याचे समाधान काही मिळाले नाही.असोच.
पुन्हा ट्रेन पकडली आणि मुंबई सेन्ट्रल ला गेलो. स्टेशन वर मस्त पैकी फ्री वाय फाय आणि मोबाईल चार्जिंग सुविधा असल्याने वेळ मजेत गेला. त्यातच इतर लांब पल्ल्याच्या गाड्या येत जात असल्याने शेकडो लोकांचे वर्दळ होती. ती बघण्यातसुद्धा वेळ जात होताच.ठरल्याप्रमाणे ११.३० ला दुरांतो ट्रेन लागली आणि आम्ही बर्थवर स्थानापन्न झालो.करण्यासारखे काही नव्हतेच.३ टायर असल्याने सरळ बसताही येत नव्हते.ए.सी. असल्याने थंडावा मात्र चांगला होता.गाडी स्टेशन वरून हलली आणि सरळ झोपी गेलो.मध्ये मध्ये कोणीतरी लहान मुले रडत होती पण दिवसभराचे श्रम आणि ए.सी. मुळे डोळे गपागप मिटत होते. एकुणात झोप मस्त झाली.६ वाजता अहमदाबाद आले आणि पहाटेच्या गारव्यात फलाटावर उतरलो.डोळे चोळत बाहेर पडलो.एक रिक्षा पकडली आणि गीता मंदिर बस स्टॅन्डला गेलो.
डेपो एकदम स्वच्छ आणि मोकळा वाटला.आपल्याकडचे गचाळ एस.टी. डेपो आठवून जराशी शरम वाटली वगैरे. पण सर्व पाट्या गुजराथी मधून असल्याने खात्रीपूर्वक माहिती समजत नव्हती.मधेच एक नाशिक- अहमदाबाद बस दिसल्याने एकदम महाराष्ट्रात असल्यचा फील आला. शेवटी चौकशी खिडकीवर गेलो आणि समजले की जुनागढला जाणारी बस अर्ध्या तासाने आहे.मग तिकडेच पोहे फाफडा चहा वगैरे नाश्ता उरकला आणि ७ ची वेरावळ बस पकडली. ही बस लीम्डी -राजकोट-जुनागढ अशी जाणार होती. ७ तासांचा प्रवास होता.त्यमुळे जागा पकडली आणि झोपून गेलो.बसमध्ये फारशी गर्दी नव्हती.पण नंतर नंतर लोक चढू लागले आणि बस पूर्ण भरली.एक झोप झाली तोवर नाश्त्याला एका धाब्यावर बस थांबली .पुन्हा थोडा नाश्ता करून बसमध्ये बसलो.आता उन जाणवायला लागले होते. दोन्ही बाजूला हिरवी शेते दिसत होती.कापूस,गहू,ज्वारी अशी पिके दिसत होती.पण एकूणच दुष्काळ जाणवत नव्हता.उन्हे चढू लागली तसतसा प्रवास कंटाळवाणा होऊ लागला.मध्येच झोप मध्येच गप्पा असे करत करत चाललो होतो.दुपारचे २ वाजले होते आणि सगळीकडे सपाट जमीन दिसत असताना अचानक डाव्या बाजूला २-३ उंच पर्वत दिसू
लागले.गिरनार पर्वताचे ते प्रथम दर्शन होते.उद्या सकाळीच आपण या पर्वतावर असू या विचाराने अंगावर रोमांच उभे राहिले.
यथावकाश बस जुनागढला पोचली.आम्ही बस डेपोच्या बाहेर पडलो आणि एका बर्यापैकी हॉटेलमध्ये जेवलो.मग रिक्षा पकडून गिरनार पायथ्याशी पोचलो.सनातनची धर्मशाळा मिळायला फार अडचण आली नाही. तेथे जाऊन ऑफिसमध्ये श्री. दवे यांच्याकडे चौकशी केली तर रत्नागिरीकर आधीच पोचले आहेत असे समजले. चला...फोनाफोनी करायची कटकट वाचली.लगेच रूम घेऊन टाकली आणि मित्र मंडळींना भेटून ओळखी वगैरे करून घेतल्या .जर फ्रेश होऊन चहा पाण्याला बाहेर पडलो.गिरनारच्या पायथ्याशी फार मोठी बाजारपेठ वगैरे नाही. ५-१० मिनिटात फेरफटका उरकला .चहा पिउन आल्यावर धर्मशाळेतच रात्रीच्या जेवणाची ऑर्डर देऊन टाकली आणि रूम वर जाऊन सरळ ताणून दिली. उद्या सकाळी ४ वाजता उठून ५ वाजता पायर्या चढणे चालू करायचे होते.त्यामुळे आज आराम करणे आवश्यक होते. तासभर झोपलो असेन तोवर दरवाजावर थापा ऐकू येऊ लागल्या.क्षणभर मला कळेचना दिवस आहे कि रात्र ...की पहाट झाली म्हणून कोणीतरी दरवाजा वाजवत आहेत.अर्थात प्रवासाचा शीण असल्याने गाढ झोप लागली होती त्यामुळे जरा घोटाळा झाला.
संध्याकाळचे ७ वाजले होते.मंडळी फ्रेश होऊन गप्पा टप्पा करायला बाहेर पडली होती. तासाभरात जेवणही येणार होते. त्यामुळे उठणे भाग होते.बाहेर आलो तर आकाशात मस्त चंद्र उगवत होता.
धर्मशालेच्या आवारातून गिरनारचा पर्वत अगदी नाकासमोर दिसत होता.त्याच्या आडूनच चंद्र उगवत होता.शुक्राची चांदणी पण दिसत होती.
मग थोडा वेळ मोबाईल वरची वेगवेगळी अॅप्स वापरुन ग्रह तारे ओळखण्यात गेला.फोटोग्राफी वाल्यांनी आपापले कॅमेरे बाहेर काढून आपली कला दाखवायला सुरुवात केली.मग तुझा कसा माझा कसा(कॅमेरा) , काय काय फॅसिलिटि आहेत कितीला मिळाला वगैरे चर्चा झडली.
यथावकाश जेवायची वेळ झाली आणि गरम गरम जेवण आलेले पाहून चर्चा थांबली आणि सर्वांनी आलेल्या जेवणावर ताव मारला.पुन्हा गप्पा सुरु झाल्या.बाहेर एक फेरफटका मारून पाय मोकळे केले. बाहेर सगळ्या दुकानात काठ्या विकायला ठेवल्या होत्या.२० रुपये काठीचे भाडे आणि काठी परत केल्यास १० रुपये परत देणार.सकाळी काठी घ्यायचीच असे ठरवून झोपी गेलो.
सकाळी ४ वाजता गजराच्या ठणाणाने जाग आली.पटपट अंघोळी वगैरे उरकून सगळे जण तयार झाले.बाहेरची दुकाने उघडली होती. बहुतेक जण सकाळी लवकर गिरनार वर चढाईला सुरुवात करत असल्याने सकाळी ४ ते ७ हाच त्यांचा मुख्य धंद्याचा टाईम असावा.त्यामुळे सर्वजण दुकाने उघडून तयारीत बसले होते. चहा पिउन ताजेतवाने झालो आणि दत्तगुरूंच्या नावाचा जयघोष करून सगळेजण उत्साहात गिरनारवर चढाई करू लागले.मध्ये मध्ये डोलीवाले कोंडाळे करून येणाऱ्या लोकांना डोलीसाठी विचारत होते. पण त्यात फार आग्रह किवा मागे लागणे असे काही नव्हते.एकूणच इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे बजबज पुरी वाटली नाही कुठे.
हळूहळू चढण तीव्र होत होती. एक दोन शाळांचे ग्रुप ट्रीपसाठी आलेले दिसले.लहान लहान मुले टणाटण उद्या मारत पायऱ्या चढत होती.काही काठेवाडी वेशातले यात्रेकरू ग्रुपने वर जात होते.तर काही जोडपी ४-६ महिन्याच्या लहान बाळांना घेऊन नवस पूर्ण करण्यासाठी गिरनार दर्शनाला आलेली होती.एकूणच पहाटेचे ५ वाजले आहेत असे सांगूनही खरे वाटले नसते इतकी गर्दी होती.
वाटेत कुठे कुठे पाणी चहा लिंबू सरबत विकणारी दुकाने लागत होती.पण हवेत अजून छानपैकी गारवा होता आणि चंद्र प्रकाशात पायऱ्या चढणे फार त्रासदायक वाटत नव्हते. त्यामुळे सर्वांनीच न थांबता पुढे चालत राहायचे ठरवले.
जसा जसे वर जाऊ लागलो तसे आपोआप हळू मध्यम व जास्त गतीने चालणार्यांचे वेगवेगळे ग्रुप्स पडत गेले.काही जण पुढे तर काही जण मागे राहिले आणि गर्दी तुरळक होऊ लागली.वाटेत सर्वत्र लावलेले पथदिवे आणि चंद्राचा प्रकाश यामुळे दिसायला अडचण येत नव्हती.वाटेत काही मराठी लोकही भेटत होते.काही जैन लोक मध्यावर असणाऱ्या जैन मंदिरात सेवा करण्यासाठी राहायच्या उद्देशाने आलेले होते. त्यापैकी एक काका तर रत्नागिरीचेच निघाले. घ्या ..मग तर रत्नागिरीकरांच्या उत्साहाला उधाणच आले.असे रमत गमत चालता चालता उंची वाढत होती.
किंचित उजाडू लागले आणि सभोवताल पसरलेल्या जुनागढ शहरचे सुंदर रुप नजरेस पडू लागले.न धड उजेड न धड अंधार अशा वेळेस शहरातील विजेच्या दिव्यांमुळे जुनागढ झगमगत होते.
हळूहळू एक एक खाणा खुणा स्पष्ट होत होत्या. हौशी फोटोग्राफर लोक दर थोड्या वेळाने थांबून क्लिक क्लिक करत होते आणि बदलत्या दृश्यांना आपल्या केमेर्यामध्ये कैद करू बघत होते.जशी उंची वाढत चालली आणि उजाडत चालले तसे सभोवतालच्या कातलांचे रौद्र भीषण स्वरूप लक्षात येऊ लागले.पूर्वीच्या काळी जेव्हा ह्या पायर्या नसतील तेव्हा यात्रेकरू हा पर्वत कसा चढत असतील या नुसत्या विचारानेच अंगावर काटा आला.पूर्वी एक दोन वेळा यात्रेच्या वेळी चेंगरा चेंगरी होऊन आणि पर्वतावरून पडून लोक मेले सुद्धा आहेत.पण आता या पायर्या आणि योग्य ठिकाणी कठडे बांधले असल्याने तसा काही धोका वाटत नाही.
आता आम्ही एका दरवाज्यातून आत प्रवेश केला आणि जैन मन्दिर समूहाचे दर्शन झाले.इतक्या उंचीवर एव्हढी मोठीआणि सुंदर मंदिरे उभारायला कसे जमले असेल ह्या विचाराने सारेजण आश्चर्य चकित झाले होते.सर्व मंदिरांवरील कोरीवकाम खरोखर सुंदर आहे.आणि काही मंदिरे अजूनही उत्तम प्रकारे आपले सौंदर्य टिकवून आहेत.
ह्या टप्प्या नंतर येतो गोमुखी गंगेचा उगम.इथे गोमुखातून नदीचा उगम होतो आणि बाजूच्या कोनाड्या मध्ये अनेक शिवलिंगे स्थापन केलेली आहेत.इथे दोन साधू बसले होते. पण त्यांची पैशांची अपेक्षा दिसली त्यामुळे आम्ही तिथून लवकर काढता पाय घेतला.थोडे वरच्या टप्प्यावर गेलो आणि तिथून जैन मंदिरांचे अजून सुंदर दृश्य दिसू लागले.
पण आता उन वाढू लागले होते त्यामुळे फार न थांबता आम्ही पुढे निघालो.साधारण ७.३० च्या सुमारास आम्ही पहिले शिखर म्हणजे अंबाजी सर करून देवीच्या देवळाशी पोचलो.आतमध्ये देवीची आरती चालू होती त्यामुळे कोणाला आत सोडत नव्हते.आरती झाल्यावर सर्वांनी दर्शन घेतले आणि पुढे निघालो.
आता चांगलेच उजाडले होते.आणि पुढचे गोरक्षनाथ शिखर नजरेस पडत होते.पण आता खडा चढ नव्हता.दोन शिखरांना जोडणाऱ्या पुलावरून आम्ही पुढे निघालो.गोरक्षनाथ शिखरावर एक बाजूला गोरक्षनाथांची धुनी तर समोरच नाथ पंथी साधूंचे राहायचे ठिकाण आहे.
आम्ही गोरक्षनाथांचे दर्शन घेण्यासाठी डोके झुकवून छोट्या देवळात शिरलो.पाठोपाठ नाथ पंथी साधूही आला.त्याने प्रथम आम्हाला हात धुवायला सांगितले आणि मग थोडा धूप देऊन धुनीत अर्पण करायला सांगितला.फक्त धुनीत हात घालू नका असे बजावले.आम्ही त्याची आज्ञा पाळली आणि धूप वाहून बाहेर आलो.
पण नंतर आत शिरलेल्या एका माणसाने धुनीत हात घातला आणि त्या साधूने त्याला जे काही शिव्या द्यायला सुरुवात केली आणि मारायलाच धावला.त्याचा रौद्र अवतार बघून आम्हीपण सर्दच झालो.मग तो जरा शांत झाल्यावर आम्हाला सांगू लागला. धुनी मे गोरखनाथ जी की हाजरी होती है.वो कायम रखने के लिये हम इतना सावधान राहते है. आप लोग इतने दूर से दर्शन करने आते हो.अगर उनकी हाजरी नही है तो इतने दूर अनेक क्या फायदा? यहाकी उदी लेके जाव तो बिगडे काम भी बन जावे. लेकिन ये गधे लोग समझे तब ना?तो एकदम गंभीर पणे बोलत होता. मुख्य म्हणजे त्याची पैशाची वगैरे अपेक्षा दिसली नाही .
आम्हीही तिकडून उदी घेतली आणि पुढे निघालो. गुरुशिखराचे प्रथम दर्शन इथुनच होत होते.
आता पायर्या खाली उतरत होत्या आणि पुढे पुन्हा वर चढत होत्या .
पुढचा टप्पा कमंडलू कुन्डचा होता. इथे एक डबल कमान लागली.
उजवीकडील कमानीतून खाली उतरणारा रस्ता कमंडलू कुंड कडे जात होता तर डावीकडच्या कमानीतून वरच्या दिशेने जाणारा रस्ता गुरु शिखराकडे जात होता.कमंडलू कुंड येथे सर्व भाविकांना मोफत चहा आणि प्रसाद दिला जातो.प्रथम गुरु शिखराचे दर्शन घेऊन मग प्रसाद घेण्यासाठी कमंडलू कुंड कडे यायचे होते.त्यामुळे डावीकडील कमानीतून वर निघालो.रस्ता आता डावीकडे वळत चालला होता आणि खडी चढणं होती.
गुरु शिखर हे इतर शिखरा पासून वेगळे आणि उंच उठवलेले आहे त्यामुळे पायर्या दमछाक करत होत्या पण त्याचवेळी आपले ध्येय नजरेच्या टप्प्यात आलेले बघून छाती धडधडत होती.आता अजून एक खडा चढ चढलो आणि थेट मंदिरात प्रवेश झाला .मंदिर फार तर १०X१० फुटाचेच असेल तिथे एक दोन साधू कायम पूजा अर्चा करायला असतात तर बाकीचे कमंडलू कुंड येथे भाविकांची सेवा करत असतात.मध्यभागी एका खडकावर श्री दत्तगुरूंच्या पादुका उमटल्या आहेत.आणि एक मूर्ती ठेवली आहे एका बाजूने मंदिरात प्रवेश करून दर्शन घेउन लगेच दुसर्या बाजूने उतरावे लागते .तिथे फार वेळ थांबू देत नाहीत.अर्थात ते येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षे साठीच आहे.
दर्शन घेतले आणि मनात भरून पावल्याची एकच भावना आली.अतिशय साधे ,काही सुद्धा बडेजाव नसलेले ,नीटशी रंग रंगोटी सुद्धा नसलेले, भिंती आणि पत्र्यांचा तात्पुरता वापर करून अडचणीच्या शिखरावर बांधलेल्या या मंदिरात या जागी शेकडो हजारो भाविक वर्षानुवर्षे दर्शनाला का येतात त्यामागचे कारण शोधण्याच्या पलीकडे गेलो होतो.अनेक वर्षे मनात घर करून बसलेल्या गिरनारचे दर्शन आज पूर्ण झाले होते.जाता येता काही अनुभवही पदरी पडले होते.
जड पावलांनी पण समाधानी मनाने गिरनारच्या पायर्या उतरू लागलो. कमंडलु कुंडला जाउन दत्त धुनीचे दर्शन आणि प्रसाद घेतला आणि आमची गिरनारची यात्रा सुफळ झाली.
टिप- सर्व छायाचित्रे माझा मित्र श्री. प्रविण पाटील याच्या सौजन्याने घेतली आहेत.
प्रतिक्रिया
11 Mar 2016 - 5:42 pm | जगप्रवासी
फोटू दिसत नाहीयेत, वर्णन एकदम छान आहे.
11 Mar 2016 - 5:49 pm | राही
गुरुशिखराची कष्टप्रद अशी यात्रा घडली आपल्याला. नमस्कार.
वर्णन ओघवतं आहे.
11 Mar 2016 - 6:56 pm | प्रचेतस
सहज सुंदर वर्णन. छायाचित्रेही सुरेख. मात्र शेवटची काही छायाचित्रे दिसली नाहीत.
जुनागडचा सुप्रसिद्ध प्रस्तरलेख पाहिलात का? एकाच विशाल प्रस्तरावर सम्राट अशोक, रुद्रदामन क्षत्रप आणि स्कंदगुप्त अशा तीन महान राजांचे विभिन्न कालखंडातील लेख आहेत.
11 Mar 2016 - 11:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
वेळेचे गणित जमत नव्हते ना, त्यामुळे या वेळी फक्त गिरनार जमवले. आता नंतरची ट्रिप जुनागढ/गुजराथ दर्शनची करु त्यावेळी लक्षात ठेवीन नक्की.माहितीबद्दल धन्यवाद बर का!!
11 Mar 2016 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर वर्णन !
फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिलेला दिसत नाही... तो दिल्यास फोटो दिसू लागतील असे वाटते.
11 Mar 2016 - 11:13 pm | राजेंद्र मेहेंदळे
फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिला आहे. आता दिसायला पाहिजेत.
12 Mar 2016 - 9:14 am | यशोधरा
सगळे फोटो भन्नाट. ह्या स्थळी एकदा जायचे आहे.
12 Mar 2016 - 9:34 am | नाखु
वर्णन आणी दत्तगुरू कृपेने या धाग्यावरचे (तरी) सगळे फोटो दिसले आणि मी पुण्यवान(?) असल्याचा भास दृढ झाला.
गुरुदेव दत्त !
ल्हान मुलांनी चालण्याइतपत सोपा आहे का जास्ती अवघड आहे ?
पालक नाखु
12 Mar 2016 - 1:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
हुश्श दिसले तर एकदाचें
लहान मुले जाऊ शकतील हो,
24 Sep 2017 - 1:31 am | चाणक्य
नाखु, मी स्वतः ५ वीत असताना गिरनार पूर्ण चढलो आहे. त्यावेळी आई वडिल चांगलेच दमले होते पण मी पूर्ण चढून उतरून आल्यावरही हाॅटेलात पळापळी करत असल्याचे आठवते मला. लहान मुलांचा स्ट्रेंथ तो वेट रेशो चांगलाच असतो. त्यामुळे टणाटण चढतात.
12 Mar 2016 - 9:44 am | कंजूस
फोटो भारी आहेत.चांगली यात्रा घडवलीत.गिरनारची उंची फार नसावी ( फारतर ४०० -५००मिटर्स ) परंतू पायवाटेपेक्षा पायय्रा फार त्रासदायक असतात.वरती थांबण्यासाठी जागाही नसल्याने हात लावून परत यावे लागत असावे.
12 Mar 2016 - 6:32 pm | श्रीगुरुजी
मस्त वर्णन आणि प्रकाशचित्रेही सुंदर!
12 Mar 2016 - 8:59 pm | मूकवाचक
ओघवते प्रवासवर्णन आणि सुंदर प्रकाशचित्रे!
23 Sep 2017 - 10:57 pm | संग्राम
असेच म्हणतो _/\_
21 Mar 2016 - 2:53 am | हकु
वर्णन अतिशय छान! छायाचित्रे अप्रतिम!!
घरबसल्या यात्रा घडली.
आता प्रत्यक्षात कधी घडेल बघू.
शेवटी गुरुदत्तांची इच्छा!
21 Mar 2016 - 5:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
संदीप चौधरींना भेटा आणि विचारा पुढच्या ट्रेकला :)
21 Mar 2016 - 2:55 pm | रॉजरमूर
सुंदर वर्णन
फोटो छानच ,
पहाटेच्या अंधारात चमकणारे जुनागड तर एकदम मस्तच.
एकंदर पायऱ्यांची संख्या किती आहे पायथ्यापासून ते वर मंदिरापर्यंत ?
ही कोणती अॅप्स असतात ? माहिती द्यावी .
21 Mar 2016 - 5:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी "ईंडीयन स्काय मॅप" हे अॅप वापरतो. मोबाईल सरळ हव्या त्या तार्याकडे रोखायचा आणि तो ग्रह/ तारा कोणता ते आपल्याला दाखविणारे हे अॅप आहे. तसे तर पीसीवर "स्टेलारियम" म्हणुन एक सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल केले तर ऑफ लाईन पण ग्रह तारे बघु शकाल.
30 Dec 2017 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ईंडीयन स्काय मॅप बेश्ट अॅप आहे, आवडले. मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
5 Jan 2018 - 5:14 pm | राजेंद्र मेहेंदळे
अॅप वापरुन आभिप्राय दिल्याबद्दल
21 Mar 2016 - 3:25 pm | तर्राट जोकर
ह्याला म्हणतात भटकंती. :-)
जबरदस्त वर्णन आणि फोटो.
21 Mar 2016 - 4:25 pm | विअर्ड विक्स
@ रा मे नमस्कार …
ओळखल असेलच ( १२ जुलै )
गिरनार चे फोटो पाहून आनंद झाला. मागचे वर्षी गिरनार दर्शन झाले. आम्ही भर उन्हात चढलेलो होतो त्यामुळे त्रास जास्त झाला. तेथील पायर्या ९९९९ आहेत व दम काढणाऱ्या आहेत.
परंतु त्या त्रासापेक्षा अन्नाछत्रातील व्यवस्थेचा त्रास झाला . जेवण समाधानकारक होते पण तेथील व्यवस्थापकाची भाषा सभ्य माणसास साजेशी बिलकुल नव्हती.
21 Mar 2016 - 5:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
येस...ओळखले तर!!
कमंडलु कुंडला उर्मटपणा जाणवला का तुम्हाला? आमचे तिकडे फार कोणाशी बोलणे झाले नाही त्यामुळे मला तरी तसा अनुभव आला नाही. बाकी सगळीकडे सर्व प्रकारची माणसे भेटतातच. दत्तगुरु त्यांना क्षमा करोत. :)
21 Mar 2016 - 9:01 pm | विअर्ड विक्स
उर्मट पणा एक वेळ चालू शकतो परंतु व्यवस्थापक भगव्या कपड्यात अत्यंत शिवराळ भाषेत बोलत होते अन्नछत्र दानधर्माचा विषय नसून धंदा असल्यासारखे बोलत होते. जेवण चालू असतांनाच शिव्यांचा उद्घोष चालू होता. लोक येतात नि फुकट जेवून जातात. आमचे नशीब असे कि आम्ही देणगीची पावती फाडून बसलो होतो. अन्यथा आम्हास हि मौखिक प्रसाद मिळाला असता. असो. त्यावेळेस मुंबई तून दोघेजण तेथे सेवेसाठी गेले होते . सामान्यतः महाराष्ट्र व गुजरातेतील लोकांचा तेथे सेवेसाठी जास्ती राबता असतो.
21 Mar 2016 - 5:12 pm | स्वाती दिनेश
वर्णन आणि फोटो दोन्ही सहजसुंदर.
स्वाती
21 Mar 2016 - 7:14 pm | दिपक.कुवेत
छान फोटो आणि वर्णन
21 Mar 2016 - 9:18 pm | आदूबाळ
जबरदस्त! ठिकाण, फोटो आणि वर्णन तिन्ही भारी!
22 Mar 2016 - 10:07 am | मदनबाण
श्री गुरुदेव दत्त ! _/\_ _/\_ _/\_
लेखन आणि फोटो दोन्ही आवडले... मलाही इथे जायची इच्छा आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne
22 Mar 2016 - 11:49 pm | जयन्त बा शिम्पि
फार वर्षापुर्वी ( अंदाजे छत्तीस वर्षापुर्वी ) आम्ही बारा वर्षाच्या अंतराने दोनदा गिरनार पर्वत चढुन आलो आहोत. पण दुर्दैवाने त्यावेळी फोटो घेता आले नाहीत, पण लेखातील फोटो पाहुन , आठवणी जाग्या झाल्यात. वर्णन सुध्दा मस्तच जमले आहे.
6 Apr 2016 - 6:09 pm | शंतनु _०३१
सुरेख वर्णन आणि फोटोग्राफी. वाचत असताना माझेही दर्शन झाल्यासारखे वाटले.
धन्यवाद ___/\___
7 Apr 2016 - 2:20 am | रेवती
खूपच मस्त फोटू व वर्णन. जुनागढमधील पहाटेचे फोटो तर लाव्हा रसासारखे आलेत. खूपच आवडले.
12 Jun 2016 - 1:17 am | prasadranade
मी स्वतः 3 वेळा गिरनारला जाऊन आलो आहे. पायऱ्या १०००० नाहीत साधारण 7 हजार आहेत. असं मला तिथल्या एका साधूने सांगितलं. लोक फुशारकी मारायला दहा हजार सांगतात. तरीपण एकंदरीत कठीण काम आहे. सर्वात उत्तम वेळ म्हणजे रात्री 2 वाजता चढायला सुरवात करायची 7 वाजता दत्त शिखर आणि दुपारी जेवायच्या वेळेला आपण खाली येतो. येताना ऊन लागत नाही. खाली उतरलं की भवनाथ मंदिर, दामोदर आणि रेवती कुंड, मुचकुंद महादेव गुंफा जिथे कालयवन याला कृष्णाने मुचकुंद राजा करवी मारले ते ठिकाण पाहण्या लायक आहे. उपरकोट किल्ला जो कृष्णाच्या काळात उग्रसेन याने बांधला तो पण पाहण्या सारखा आहे. तिथे एक बुद्ध गुफा आहे. एक खूप खोल विहीर आहे. जुनागढ मध्ये शक्करबाग झू मस्त आहे. एकंदरीत 2 ते 3 दिवस फिरायला छान आहे. जेवायला आवर्जून गीता डायनिंग हॉल जुनागड स्टेशन समोर जावे.
12 Jun 2016 - 1:17 am | prasadranade
मी स्वतः 3 वेळा गिरनारला जाऊन आलो आहे. पायऱ्या १०००० नाहीत साधारण 7 हजार आहेत. असं मला तिथल्या एका साधूने सांगितलं. लोक फुशारकी मारायला दहा हजार सांगतात. तरीपण एकंदरीत कठीण काम आहे. सर्वात उत्तम वेळ म्हणजे रात्री 2 वाजता चढायला सुरवात करायची 7 वाजता दत्त शिखर आणि दुपारी जेवायच्या वेळेला आपण खाली येतो. येताना ऊन लागत नाही. खाली उतरलं की भवनाथ मंदिर, दामोदर आणि रेवती कुंड, मुचकुंद महादेव गुंफा जिथे कालयवन याला कृष्णाने मुचकुंद राजा करवी मारले ते ठिकाण पाहण्या लायक आहे. उपरकोट किल्ला जो कृष्णाच्या काळात उग्रसेन याने बांधला तो पण पाहण्या सारखा आहे. तिथे एक बुद्ध गुफा आहे. एक खूप खोल विहीर आहे. जुनागढ मध्ये शक्करबाग झू मस्त आहे. एकंदरीत 2 ते 3 दिवस फिरायला छान आहे. जेवायला आवर्जून गीता डायनिंग हॉल जुनागड स्टेशन समोर जावे.
23 Sep 2017 - 4:27 pm | खुशि
नर्मदे हर.अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा दर्शन करण्यसाठी जाणार आहोत.आपला लेख वाचुन स्फुर्ति मिळाली. फोटो खुपच सुंदर आहेत.
24 Sep 2017 - 3:35 pm | बोलघेवडा
फार सुंदर वर्णन केलंत साहेब. अगदी तिथे जाऊन आल्यासारखा वाटलं. धन्यवाद. ।।श्री गुरुदेव दत्त।।
25 Sep 2017 - 1:41 pm | कविता१९७८
धागा नेमका वेळेवर वर आलाय, या 1 आॅक्टोबरला गिरनार चढतीये
3 Oct 2017 - 11:27 am | कविता१९७८
मी स्वतः 3 वेळा गिरनारला जाऊन आलो आहे. पायऱ्या १०००० नाहीत साधारण 7 हजार आहेत. असं मला तिथल्या एका साधूने सांगितलं.
१ तारखेला चढले गिरनार , पायर्या १०००० आहेत. ५००० पायर्यांवर जैन मंदिर आहे आणि तिथुन बरोबर 2000 पायर्यांवर पर्वताच्या शिखरावर अंबाजी मंदिर आणी नंतर दत्ताच्या मंदिरात जायला मोजुन ३००० पायर्या आहेत. गिरनार पर्वताची उंची जवळपास 4200—4500 फुट आहे म्हणजे जवळपास भंडारदराच्या रतनगड एवढी. गिरनारच्या अंबाजी माता मंदिरानंतरच्या ३००० पायर्यांचा प्रवास खरोखर कठीण आहे आणी त्या रस्त्यात पाणी मिळत नाही
6 Oct 2017 - 5:30 pm | arunjoshi123
हे फारच अप्रतिम आहे.
30 Dec 2017 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूप सुरेख छायाचित्रे आणि वर्णनही. आत्ताच आमची एक मैत्रीण गिरनारला जाऊन आली. सर, एकदा जायलाच हवे म्हणाली खूप आनंद मिळतो. पण, दहाहजार पाय-या कसे चढणे होईल, हिम्मत इथे कच खाते आहे. बाकी, धाग्यावरील वर्णन वाचून इच्छा होत आहे, बघुया दत्तगुरु केव्हा बोलवतात ते...!
ओम नमो भगवते दत्तात्रय नमो नम:
-दिलीप बिरुटे
7 Jan 2018 - 8:06 pm | कंजूस
कोणी altitude app वापरून पायथ्याची आणि वरच्या जागांची उंची मोजली आहे का?