डिसेंबर हा आला, चालला
जाता हाती काय उरेल ? ,
तारखा वार ते तसेच असतील,
आयुष्यही हे असेच सरेल !!
अशीच वर्षे येतील जातील,
एकवीस गेले बावीस येईल,
आयुष्य असेच वाहत राहील
न कळे कुठे मुक्कामी नेईल !!
कशास हवे मनावर ओझे,
नकोशा चिंतांचे वाहणे,
आयुष्य सरण्याआधी आपली
पुण्याची ती झोळी भरणे !!
आपुल्या न हाती काही,
तरीही फुकाचे 'मी' मीपण,
आनंद वाटत जगताना ,
मनात असावे ईश स्मरण !!
-वृंदा
प्रतिक्रिया
28 Dec 2021 - 7:44 pm | राघव
कल्पना चांगल्या आहेत. काही गोष्टी सुचवाव्याशा -
- लयबद्ध आणि मुक्तछंद असा गोंधळ झालेला वाटला: चुभूद्याघ्या.
- तुम्ही लयबद्ध लिहू शकाल चांगले. फक्त मीटर थोडे सांभाळून, किंचित शब्दांचा फेरफार करून खूप फरक पडेल. जसे -
एक जाऊनी दुसरे येणे..
वर्षे येती.. तशीच जाती..
आयुष्याचा याग मागतो,
अनुभवांच्या यज्ञ आहुती!
मनांत माझ्या कसले ओझे?
चिंतांच्या त्या चिता जाळणे..
आयुष्याच्या सरण्यामाजी,
पुण्य मोजूनी झोळी भरणे!
अपुल्या हाती नसता काही,
फुका कशाचे "मी-माझे" पण..
आनंदाने जगणे व्हावे,
मनी रहावे ईश स्मरण !!
--
राघव.
30 Dec 2021 - 12:59 pm | VRINDA MOGHE
खुप छान सुचना. धन्यवाद !
29 Dec 2021 - 10:15 am | कर्नलतपस्वी
तुमघा प्रतीसाद म्हणजे एका सुंदर ललनेला साज शृगांरा़ला करून अधिक सुंदर बनवण्या सारखे आहे.
दोन्ही कवीता आवडल्या.
29 Dec 2021 - 4:32 pm | पाषाणभेद
@वृंदा: हिरा शोधला
@राघवः पैलू पाडले
30 Dec 2021 - 1:00 pm | VRINDA MOGHE
धन्यवाद