उतरत्या संध्याकाळी....

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
15 Nov 2021 - 8:53 am

उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये.
हरवल्या नजरेला काही काही दिसू नये.
चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची,
धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये.

उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू,
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी.
हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी.

उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती.
जपताना धागा धागा धर थोडी राख हाती.
मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात,
इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Nov 2021 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार

उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती.
जपताना धागा धागा धर थोडी राख हाती.

अचुक भावना पकडली आहे.

किनखापी आभाळाच्या पार्श्वभूमीवर ही कविता एकदम चटका लावून गेली.

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 4:44 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद पैजारबुवा!

चित्रगुप्त's picture

16 Nov 2021 - 12:22 am | चित्रगुप्त

कविता अतिशय भावली.
'उतरती संध्याकाळ' एवढ्याच दोनच शब्दात भावनांच्या अनेक छटा, अनेक आंदोलने, व्याकुळता, उदासी वगैरे निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. माझ्या आवडीची अनेक अप्रतिम निसर्गचित्रेही 'उतरत्या संध्याकाळ'चीच आहेत. उदाहरणार्थ खालील चित्रे:
.

.

.

प्राची अश्विनी's picture

29 Dec 2021 - 12:34 pm | प्राची अश्विनी

क्या बात! किती समर्पक चित्रं आहेत. धन्यवाद.
( खूप उशिराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल माफी.)

अप्रतीम चित्रे! खूप आवडलीत. :-)

अवांतरः आपली इ-गॅलरी वगैरे काही नाही काय?

प्रज्ञादीप's picture

19 Nov 2021 - 2:01 pm | प्रज्ञादीप

उतरती संध्याकाळ म्हणजे कातरवेळ ...
छान वर्णन केलयं

प्राची अश्विनी's picture

29 Dec 2021 - 12:36 pm | प्राची अश्विनी

प्रज्ञादीप, धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

19 Nov 2021 - 3:44 pm | चांदणे संदीप

आवडली.

उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.

इथे 'काळजाचा' ऐवजी चुकून 'काजळाचा अस वाचलं मी. तेही चालेल असं वाटून गेल. बाकी कविता उत्तमच आहे.

सं - दी - प

प्राची अश्विनी's picture

29 Dec 2021 - 12:35 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद.
आधी काजळाचा असंच लिहिलं होतं. नंतर बदललं. कारण काही नाही .:)