अवयवदान : श्रेष्ठतम दान !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
9 May 2018 - 12:41 pm

मागच्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या पुरुष लिंगाच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर सामान्यजनांची एकंदरीत या विषयाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (संबंधित धागा : http://www.misalpav.com/node/42508 ).

यानिमित्ताने असे वाटले की ‘मानवी अवयवांचे प्रत्यारोपण’ या विषयाचा आढावा वाचकांना उपयुक्त वाटेल. जिवंतपणी अथवा मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काय काय दान करता येते आणि त्यापैकी कशांचे प्रत्यारोपण यशस्वी होते, हे आपण आता जाणून घेऊ यात.

शरीरातील जे भाग दान करता येतात त्यांची ढोबळ मानाने गटांत विभागणी करता येईल :

१. अवयव (organs) :
यांची दोन गटांत वर्गवारी करतो:

अ) मृत्यूनंतरचे दान : २ मूत्रपिंडे, यकृत, २ फुफ्फुसे, हृदय, स्वादुपिंड, जठर, आतडे, हात, चेहरा आणि गर्भाशय. आता यात पुरुष लिंगाची भर नुकतीच पडली आहे पण ते अजून अधिकृत यादीत यायचे आहे.

आ) जिवंतपणीचे दान: १ मूत्रपिंड, १ फुफ्फुस आणि यकृत, स्वादुपिंड आणि आतडे या तिघांचा काही अंश, गर्भाशय.

२. डोळ्याचे भाग : यात बाहुलीचा पडदा (cornea) आणि श्वेतमंडल (sclera) यांचा समावेश आहे. corneaच्या प्रत्यारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारात दाता आणि प्राप्तकर्ता यांचे कुठल्याही प्रकारे ‘matching’ करावे लागत नाही.

३. शरीरातील इतर tissues : यात कानाचा मधला भाग, त्वचा, हृदयाच्या झडपा (valves), रक्तवाहिन्या (veins), हाड, कुर्चा (cartilage), स्नायुबंध (tendon) आणि अस्थिबंध (ligament) यांचा समावेश आहे. हे सर्व साठवण्यासाठी ‘tissue banks’ ची सोय असते.

४. रक्तातील मूळ पेशी (stem cells) : १८ – ६० वयोगटातील व्यक्ती हे दान जिवंतपणी करू शकतात. या पेशी ३ प्रकारच्या असतात:
अ) Bone marrow तील पेशी
आ) नवजात बालकाच्या नाळेतील मूळ पेशी , आणि
इ) रक्तप्रवाहातील मूळ पेशी (विशिष्ट प्रक्रीयेनंतर)

५. रक्त व रक्ताचे घटक : “संपूर्ण” रक्तदान हे सर्वपरिचित आहे. विशिष्ट परिस्थितीत रक्ताचे ३ घटक स्वतंत्रपणे दान करता येतात. ते असे: लालपेशी, बिम्बिका(platelets) आणि रक्तद्रव (plasma).

अवयवदान हे सर्व प्रकारच्या दानांमध्ये श्रेष्ठतम दान म्हणता येईल. साधारण असे म्हणता येईल, की यातील एक दाता सुमारे ५० प्रकारचे दान करून त्या प्राप्तकर्त्यांच्या आयुष्यात मोलाची भर घालतो.

काही टिपणे
:

१. एखाद्याच्या शरीरातील विशिष्ट भागाचे प्रत्यारोपण त्याच्याच शरीरात अन्यत्र करता येते (autografts).
२. Cornea वगळता अन्य अवयवदानांमध्ये दाता व प्राप्तकर्ता यांचे matching आवश्यक असते. Cornea च्या दात्यांना ‘सार्वत्रिक दाते’ (universal) असे म्हणता येईल.

३. प्राप्तकर्त्याच्या शरीरात एखादे प्रत्यारोपण झाल्यावर त्याचे शरीर तो नवा अवयव “स्वीकारते” का नाही हा यक्षप्रश्न असतो. त्यासाठी विशिष्ट औषधे द्यावी लागतात.
४. प्रत्यारोपणाची यशस्वीता अवयव आणि देशानुसार वेगवेगळी आहे. cornea व मूत्रपिंड–प्रत्यारोपण हे सर्वात यशस्वी म्हणता येतील.

५. गर्भाशय प्रत्यारोपणावर तज्ञांमध्ये मतांतरे आहेत. ते “जीवनावश्यक” नसल्याने तो खटाटोप कशासाठी असे काहींना वाटते.
६. पुरुष लिंगाचे प्रत्यारोपण ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्याची लैंगिक सफलता अद्याप सिद्ध व्हायची आहे.

७. काही प्रत्यारोपणाच्या बाबतीत विज्ञान आणि नैतिकता यांतील द्वंद्व नेहमी चर्चेत येते.
८. विशिष्ट अवयवदानांसाठी दात्यामध्ये विशिष्ट रोग नसल्याची खात्री करावी लागते.

९. मृत दात्यांच्या बाबतीत “मृत” च्या वेगवेगळ्या व्याख्या असतात. उदा. ‘ब्रेन डेड’ वगैरे. ते ठरवण्याचे कायदेकानू देशानुसार वेगळे असू शकतात.
१०. काही जन्मजात जनुकीय आजारांसाठी ‘जनुकोपचार’ उपलब्ध आहेत. यांत निरोगी व्यक्तीतील एखादे जनुक रोग्यात ‘प्रत्यारोपित’ केले जाते. याला अतिसूक्ष्म प्रकारचे प्रत्यारोपण म्हणता येईल.

तर वाचकहो, हा आहे या महत्वाच्या विषयाचा थोडक्यात आढावा. प्रत्यारोपण ही आधुनिक वैद्यकाची अति-अतिविशिष्ट शाखा आहे. मी अर्थातच त्यातील तज्ञ नाही. माझ्या वैद्यकीय सामान्यज्ञानानुसार हे लिहीले आहे. त्यामध्ये काही त्रुटी असू शकतील. येथील अन्य डॉ. यात पूरक माहितीची भर घालू शकतील. अशा सर्वांचे स्वागत.

***********************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

9 May 2018 - 12:52 pm | पिलीयन रायडर

देहदान हा ही एक पर्याय आहे ना? त्याबद्दल थोडे सांगू शकाल का? मला देहदान करायचे आहे, पण त्यात सर्व अवयव वापरून पुढे काही रिसर्चसाठी देहाचा उपयोग होतो की संपुर्ण शरीर आहे तसेच अभ्यासासाठी वापरले जाते की आणखी काय हे नक्की माहिती नाही.

शक्य तेवढे सर्व अवयव दान व्हावेत अशी माझी इच्छा आहे. निवड करावीच लागली तर अभ्यासापेक्षा जास्त महत्व मी एखाद्या व्यक्तीला अवयव दान करण्याला देईन.

ह्यासाठीची फॉर्मल प्रोसिजर नक्की काय आहे?

अगदी हाच प्रश्न मला विचारायचा होता. याबद्दन माहीती हवी आहे. अभ्यासाकरता मला देहदान करायची ईच्छा नाही. कुणाला ऊपयोग होत असेल तर नक्कीच देहदान करेन. दुसरे म्हणजे, मी देहदान केल्यानंतर माझ्या मृत्यूपश्चात माझे नातेवाईक विरोध करु शकतात का?

एक लक्षात घ्या. या दोन्ही दानांमध्ये आपली इच्छा, इच्छापत्र, वगैरे गोष्टी गौण ठरतात. आपल्या पश्चात घरच्यांच्या भावना आणि तातडीच्या हालचाली हेच आपले मरणोत्तर भवितव्य ठरवते !

कुमार१'s picture

9 May 2018 - 2:29 pm | कुमार१

निव्व्वळ देहदानाची प्रक्रिया सोपी आहे. कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुम्ही अर्ज भरू शकता. जरी भरला नाही तरी मृत्युनंतर नातेवाईक लगेच निर्णय घेऊ शकतात.
अवयवदान करून मग देहदान करायचे असल्यास त्याची प्रक्रिया मला माहित नाही.

उत्तम माहिती युक्त लेख. चर्चेतून येणार्‍या माहितीच्या प्रतिक्षेत.

माहितीपूर्ण लेख. प्रत्यारोपित अवयव शरीराने स्वीकारणे - न स्वीकारणे हे कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? सुरुवातीला अवयवरोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नवीन अवयवाला नाकारू नये यासाठी काही औषधे दिली जातात का? त्यांचे साईडइफेक्ट्स होतात का?

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2018 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

मायबोलीवर या विषयवार असलेले धागे ही उपयुक्त आहेत.
http://www.maayboli.com/node/23686

https://www.maayboli.com/node/38727

पिलीयन रायडर's picture

10 May 2018 - 10:41 am | पिलीयन रायडर

पहिला धागा बघता येत नाही (सदस्य नसल्याने असेल)

दुसरा धागा मात्र अत्यन्त उपयुक्त आहे. विशेष करून इब्लिस ह्यांचे प्रतिसाद. (मिपावर आहेत का ते? काही प्रश्न विचारले असते.)

त्यात लिहिलंय त्या प्रमाणे कॅन्सर वगैरे झालेल्या लोकांना अवयव दान करता येत नाही. देहदान सुद्धा करता येत नाही का? किमान अभ्यास करण्यासाठी तरी शरीराचा उपयोग होत असेल तरी चालेल.

बाकी त्या धाग्यातली देहाच्या dignity विषयीची चर्चा चांगली आहे. अगदी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी केलेली अतिरंजित विधानं दुर्दैवाने माहिती आहेत तेव्हा त्याचे आश्चर्य वाटले नाही.
पण त्यानंतर मी कन्फर्म करायला माझ्या संपूर्ण शिक्षण शासकीय कॉलेज मध्ये झालेल्या MD मैत्रिणीला विचारले असता तिने देहदान कराच असा सल्ला दिला. शेवटी आपले दान कोणाच्या हाती पडेल हे आपण नाही ठरवू शकत. एखाद्या संस्थेत पैशाचा गैरव्यवहार होऊच शकतो की. आपण जास्तीत जास्त दान हे योग्यरित्या वापरले जाते असाच विचार करून असे निर्णय घेणे आवश्यक आहे. मेडिकल शिकणाऱ्या लोकांना किंवा एखाद्या अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पेशंटला आपला देह किती आवश्यक आहे ह्याचा विचार एकदा प्रत्येकाने करायला हवाय.

@ एस,
प्रत्यारोपित अवयव शरीराने स्वीकारणे - न स्वीकारणे हे कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? >>>>>

प्रत्यारोपित अवयव हा अन्य व्यक्तीकडून आलेला असतो. त्यामुळे त्यातील काही प्रथिने ही उत्तेजक (antigen) म्हणून काम करतात. त्यांना प्रतिसाद म्हणून प्राप्तकर्त्याचे शरीर antibodies तयार करते. मग या दोन घटकांची ‘मारामारी’ होऊन प्रत्यारोपित अवयवाच्या पेशींचा नाश होतो. ही झाली मूलभूत theory.

आता हा antigen म्हणून होणारा हल्ला कमीत कमी व्हावा म्हणून आधीच दाता व प्राप्तकर्ता यांच्यात जास्तीत जास्त ‘matching’ केले जाते. पण, त्यालाही काही मर्यादा असतात. यामागे काही जनुकीय भेदही असतात. त्यामुळे काही प्रमाणात तरी ‘rejection’ ची प्रक्रिया अपरिहार्य असते.
प्राप्तकरत्याच्या शरीरात काही प्रमाणात immune tolerance निर्माण होतो आणि त्यामुळे rejection थोपवायला मदत होते.

सुरुवातीला अवयवरोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नवीन अवयवाला नाकारू नये यासाठी काही औषधे दिली जातात का? त्यांचे साईडइफेक्ट्स होतात का? >>>>

होय, त्या औषधांना immunosuppressants म्हणतात. अर्थातच त्यांचे साईडइफेक्ट्स आहेत. ते असे:
१. मूत्रपिंडावर दुष्परिणाम
२. उच्च रक्तदाब
३. उच्च कोलेस्टेरॉल व TG
४. रक्तक्षय, तसेच रक्तातील पांढऱ्या पेशी व बिम्बिका कमी होणे .

नवनवीन औषधांच्या संशोधनातून हे साईडइफेक्ट्स कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

प्रकाश, दुव्यांबद्दल आभार.

अवयवदान व देहदान : काही विचार :

१. अवयवदान केव्हाही श्रेष्ठ. लेखात म्हटल्याप्रमाणे १ दाता ५० रुग्णांचे भले करू शकतो. नेत्रदान तर प्रत्येकाने कराच. श्रीलंकेत मरणोत्तर नेत्रदान सक्तीचे आहे, हे ऐकून मला त्या देशाचा हेवा वाटला.

२. अवयवदानाचा अर्ज वगैरे दुय्यम गोष्टी आहेत. आपल्या मृत्युनंतर घरच्यांनी तातडीने हालचाली करणे सर्वात महत्वाचे. त्यामुळे अर्ज केलेला नसला तरी बिघडत नाही.

३. देहदानाबाबत काही मतांतरे आहेत. वैद्यकाचा पहिल्या वर्षाचा ‘शरीररचनाशास्त्र’ विषय देह-विच्छेदन करून शिकवला जातो. हा पारंपरिक प्रकार आहे. भारतात बेवारस मृतदेह हा प्रकार बऱ्यापैकी मिळतो. त्यात काही लोक देहदान करतात. त्यामुळे हे पारंपरिक शिक्षण जमते.
प्रगत देशांत परिस्थिती तेवढी सोपी नसते. त्यामुळे तिकडे विच्छेदनावरचा भर कमी करून ‘शरीर-प्रतिकृती’ वर शिकवण्याचा भर वाढला आहे. त्रिमितीय संगणक तंत्रज्ञानाने ते अजून सोपे होत आहे. त्यामुळे “देहदान हवेच” हा आग्रह जगभर कमी होत आहे. प्राध्यापकांत मतभेद राहतीलच, पण आता सारासार विचार महत्वाचा.

पिलीयन रायडर's picture

10 May 2018 - 12:21 pm | पिलीयन रायडर

अवयवदान श्रेष्ठ ह्याच्याशी सहमत.

काही वर्षांपूर्वी हे विधान खरे होते. अलीकडच्या काळात बदललेल्या कायद्यांमुळे, वाढत्या Medico Legal केसेस मुळे मुंबईसारख्या शहरात वैद्यकीय महाविद्यालयांना शिकवण्यासाठी पुरेसे मृतदेह उपलब्ध होत नाहीत.

शब्दबम्बाळ's picture

10 May 2018 - 12:18 pm | शब्दबम्बाळ

चांगला विषय!
मध्यंतरी साताऱ्यातल्या एका मुलीवर हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि तिला जणू पुनर्जन्म मिळाला!
उत्तम डॉक्टर, अपघातात गमावलेल्या मुलाचे अवयव दान करणारे पालक, समाजातून झालेली आर्थिक मदत आणि अर्थात तिची जगण्याची जिद्द या सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्यामुळेच हे शक्य झाले असे म्हणता येईल!
अशी काही चांगली उदाहरणे बघितली कि जरा बरं वाटत!
अवयवदानामुळेच कोमलला पुनर्जन्म!

बातमीत म्हटले आहे कि "जगात पहिले हृदयासह फुफ्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले"... पण नक्की माहित नाही.
आंतरजालावर शोधल्यास Heart lung ट्रान्सप्लांट च्या शस्त्रक्रिया बऱ्याच ठिकाणी झालेल्या दिसत आहेत, कोणाला खरे काय माहिती असेल तर सांगा...

कुमार१'s picture

10 May 2018 - 2:14 pm | कुमार१

चांगला व स्फूर्तीदायक अनुभव.

चौकटराजा's picture

13 May 2018 - 6:44 am | चौकटराजा

ज्याला आपला बायोलोजिकल " भाऊ" म्हणता येईल असा देह दीड ते दोन लाखात एखादा असतो असे वाचल्याचे आठवत आहे. असा ३६ गुण जुळवून आणणारा भाऊ मिळणे दुरापास्त सबब काही प्रमाणात " नकार " हा आलाच. अशावेळी समजा बोन मेरो बदलायचा झाला तर इम्यूनो सप्रेशन करावे लागते ना ?

कुमार१'s picture

13 May 2018 - 9:09 am | कुमार१

बरोबर. Marrow च्या बाबतीत म्याचिंग सर्वात अवघड असते. त्यामुळे इम्मुनो सप्रेशन काही प्रमाणात लागणारच.

डिसेंबर २०१७ मध्ये जगातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणा ला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या अभूतपूर्व घटनेची काही वैशिष्ट्ये रोचक आहेत:
१. ते प्रत्यारोपण डॉ बर्नार्ड यांनी द. आफ्रिकेत केले होते.

२. या कृतीसाठी जगभरात तीव्र स्पर्धा होती. मुद्दा होता मृत दाता मिळण्याचा. “मृत” याची व्याख्या द आफ्रिकेत तुलनेने सोपी होती. त्याचा पुरेपूर लाभ बर्नार्डनी उठवला.

३. नंतर हृदय-प्राप्तकर्त्यास जालीम immunosuppressants देण्यात आली.

४. त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती खूप खालावली. १८ दिवसात तो तीव्र न्यूमोनिया ने वारला.

५. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे बर्नार्डना त्या देशात क्रमांक २ ची व्यक्ती मानले गेले.

अलीकडे प्रत्यारोपण-विश्वात क्रांतिकारक घटना घडत आहेत. त्यापैकीच ही एक.

श्वासनलिकेच्या (trachea) कर्करोगाने पिडीत रुग्णांसाठी नवीन श्वासनलिका बसवण्याचे प्रयोग या दशकात चालू आहेत. सुरवातीस त्यासाठी कृत्रिम नलिका वापरली जाई. परंतु असे रुग्ण दगावले.

मग फ्रेंच सर्जन E Martinod यांनी एक अभूतपूर्व प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी मृताच्या शरीरातून महारोहिणी (Aorta) काढली व तिचे रूपांतर श्वासनलिकेत करून त्याचे प्रत्यारोपण केले.

आतापर्यंत 12 रुग्णांवर हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या रुग्णांना प्रत्यारोपणा नंतरची suppressant औषधे कायम घ्यावी लागत नाहीत असेही दिसले आहे.

कुमार१'s picture

10 Jun 2018 - 2:21 pm | कुमार१

आज जागतिक नेत्रदान दिन.
आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान केले जाईल यासाठी आपण आपल्या माणसांचे प्रबोधन करूयात.

अंधांसाठी भरीव काम करणाऱ्या सर्व संस्थांना मानाचा मुजरा आणि शुभेच्छा.

१८/५/१८ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या Georgia Bowen या बालिकेला जन्मतःच हार्ट अटॅक आला होता. तिच्यावर या अभूतपूर्व प्रत्यारोपणाचा प्रयोग केला गेला.

तुम्हाला वाटेल की लगोलग दुसरे हृदय मिळाले काय ? नाही ! हे एक आगळेवेगळेच प्र आहे.

तिच्याच पोटाच्या स्नायूतून १ अब्ज mitochondria काढण्यात आले आणि मग ते अधू हृदयात सोडण्यात आले. अन मग काय तिचे हृदय लागले की धकधक करायला !

काय प्रकार आहे हा mitochondria ? हे अतिसूक्ष्म अवयव म्हणजे आपल्या पेशींची ऊर्जानिर्मिती केंद्रे होत. त्यामुळे एखाद्या मरत्या पेशींना जर ती पुरवली तर त्या पेशींना संजीवनी मिळू शकते.

आतापर्यंत असे सुमारे 11 प्रयोग बालकांवर झाले आहेत.
Georgia सध्या तरी बरी आहे पण कदाचित तिला दुसरे हृदय बसवावे लागू शकेल. बघायचे काय होतेय ते.

तूर्त Boston येथील संबंधित डॉ च्या चमूचे अभिनंदन !

कुमार१'s picture

29 Aug 2018 - 9:20 am | कुमार१

शरीरातील एखाद्या अवयवापासून ते एखाद्या जनुकापर्यंतचे प्रत्यारोपण आता नित्याचे आहे. त्यात आता भर पडली आहे ती एका निरोगी व्यक्तीची विष्ठा दुसऱ्या आजारी व्यक्तीस औषध म्हणून द्यायची.

आपल्या विष्ठेतील उपयुक्त जिवाणू हे खालील रोगांवर उपचारासाठी वापरता येतात:
१. पचनसंस्थे चे आजार
२. allergies
३. मज्जासंस्थेचे आजार.
४. कर्करोग

या दानासाठी ‘दाता’ निवडायचेही काही निकष आहेत. एखाद्या निरोगी व्यक्तीची 3 महिने पूर्ण तपासणी करून मगच तिची निवड होते. यासाठी दाता मिळवणे वाटते तितके सोपे नसते. लोक सहजासहजी तयार होत नाहीत !
सध्या असे ‘दान’ आपल्या जवळच्या नातेवाईकासाठी करताना लोक आढळतात.
वैद्यकीय संशोधनातील हा एक नवा टप्पा आहे ज्यात नैसर्गिक ‘टाकाऊ’ गोष्टीचा औषध म्हणून वापर केला जात आहे.

कुमार१'s picture

1 Oct 2019 - 10:14 am | कुमार१

मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण आता मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी बरेचदा जिवंत व्यक्तीही आपले एक मूत्रपिंड दान करते. अशा दात्यांना पुढील आयुष्यात काही समस्या येतात का यावरही संशोधन चालू असते. त्यातून एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे.

अशा दात्यांमध्ये उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो असे काही अभ्यासांत आढळून आले आहे. त्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा प्रकारे जेव्हा रक्तदाब वाढतो त्याचा उरलेल्या मूत्रापिंडावर अधिकच दुष्परिणाम होतो. एकदा हा तो होऊ लागला की मूत्रपिंड आजाराची शेवटची स्थितीही लवकर येऊन ठेपते.

काही ठराविक अभ्यासांतून काढलेला हा प्राथमिक निष्कर्ष आहे. अधिक संशोधनाची अर्थात गरज आहे.

........ भविष्यात या प्रत्यारोपणासाठी मृत की जिवंत दाता यावर विचारमंथन करावे लागेल.

रोमन व नितीन या दोन्ही रुग्णांना त्यांच्या आजारामुळे नव्या मूत्रपिंडाची आवश्यकता होती.
या प्रत्येकाच्या बायकोची त्यासाठी दानाची तयारी होती. पण, या दोन्ही जोड्यांत नवरा व बायकोचे रक्तगट व अन्य घटक जुळत नव्हते.

आता पुढचा योगायोग पहा. रोमन ची बायको व नितीन यांचे घटक एकमेकांशी जुळले. तसेच नितीनची बायको व रोमन यांचेही जुळले !

त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकमेका साह्य करू याप्रकारे बायकांनी दुसऱ्या पुरुषांना हे अवयवदान केले.
सदर शस्त्रक्रिया २ महिन्यांपूर्वी मुंबईत पार पडल्या.

हो... आजच ही बातमी वाचली...

Nitin Palkar's picture

2 Nov 2021 - 8:52 pm | Nitin Palkar

अवयवदानासंबंधी अलीकडे जन जागृती होऊ लागली आहे.

कुमार१'s picture

23 Nov 2021 - 9:48 pm | कुमार१

इंद्रिय प्रत्यारोपण तंत्रज्ञानात अलीकडे कृत्रिम अवयवांचे रोपण हाही एक पर्याय उपलब्ध आहे.

कृत्रिम हृदयाचे चित्र :
ok

मानवी हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी दाते गरजेपेक्षा कमीच पडतात. त्यादृष्टीने अन्य प्राण्यांची हृदये जनुकीय बदल करून माणसात प्रत्यारोपण करण्याचे प्रयोग गेले काही वर्षे चालू आहेत.

नुकतेच अशा एका प्रयोगाला अमेरिकेत यश आलेले आहे. डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल.
जर असे हृदय मानवी देहाने चांगल्यापैकी स्वीकारले तर तो एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.

Bhakti's picture

12 Jan 2022 - 10:25 am | Bhakti

जनुकीय बदल शोधत होते.

Three genes—responsible for rapid antibody-mediated rejection of pig organs by humans—were "knocked out" in the donor pig. Six human genes responsible for immune acceptance of the pig heart were inserted into the genome. Lastly, one additional gene in the pig was knocked out to prevent excessive growth of the pig heart tissue, which totaled 10 unique gene edits made in the donor pig.

दिलेल्या दुव्यावर सापडले.धन्यवाद!
ते डुकरं GMO होत का?

कुमार१'s picture

12 Jan 2022 - 10:44 am | कुमार१

त्या बातमीत "genetically-modified animal heart " असे दिलेय.

पूर्ण डुक्कर ? माहित नाही.

कुमार१'s picture

18 Mar 2022 - 4:41 pm | कुमार१

**डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल.
>>>
दोन महिन्यांच्या कालावधीतच सदर रुग्णाचे निधन झाले.
दीर्घकालीन प्रयत्नांमधील हा एक टप्पा म्हणता येईल.

कुमार१'s picture

22 Jan 2022 - 10:13 am | कुमार१

डोळ्याच्या काही गंभीर आजारांमध्ये दृष्टीसंवेदना असलेला पडदा (retina) निकामी होतो. परिणामी संबंधित व्यक्तीची दृष्टी खूप कमजोर होते. अशा काही रुग्णांसाठी कृत्रिम रेटिनाचे प्रत्यारोपण हे नवे संशोधन प्रगतिपथावर आहे.

इथल्या बातमीनुसार संबंधित रुग्ण या प्रकारचे प्रत्यारोपण स्वीकारणारी जगातील पाचवी रुग्ण आहे.

संशोधक डॉक्टरांचे अभिनंदन आणि भावी प्रगतीसाठी शुभेच्छा !

सुधीर कांदळकर's picture

22 Jan 2022 - 12:09 pm | सुधीर कांदळकर

कादंबरी वाचली होती. त्यात माकडाच्या एका प्रजातीतील एका माकडावर एखाद्या व्यक्तीच्या जीन्सशी जुळणार्‍या पेशींचे रोपण करतात. मग त्या माकडाचा कोणताही अवयव त्या व्यक्तीला चालतो. अशी माकडे संस्करण करून भरपूर पैसे घेऊन पुरवणारी कंपनी एका निर्जन बेटावर काम करते. पण मानवी जीन्समुळे त्या माकडांची बुद्धी पण विकसित होते. मग काय होते ते सारे वाचनीय आहे. अर्थातच सारे काल्पनिक पण मनोरंजक.

Nitin Palkar's picture

18 Mar 2022 - 7:25 pm | Nitin Palkar

देहदान आणि अवयवदान हे दोन्ही शब्द अनेकदा एकत्रच वापरले जातात. पण या दोहोंमध्ये एक मुलभूत फरक आहे. देहदानाची इच्छा कोणीही व्यक्ती स्वतःच्या हयातित व्यक्त करुन तशी माहिती आपल्या नजीकच्या नातेवाईकांना (पती/पत्नी, मुले) देऊ शकतो. त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर देहदानाचा निर्णय या नातेवाईकांनी घ्यायचा व पूर्णत्वास न्यायचा असतो.
नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यानंतर केवळ नेत्रदान, त्वचादान व देहदान ही तिन्ही अथवा यापैकी काहीही दान करता येते. नेत्रदान त्वचादान यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स मृत व्यक्तीच्या घरी येऊन आवश्यक त्या शस्त्रक्रिया करतात. तसेच या दानांनंतर मृतदेह कोणत्याही प्रकारे विद्रूप दिसणार नाही याची खबरदारी घेतली जाते. देहदानासाठी मृत्युनंतर सहा तासांच्या आत मृत देह वैद्यकीय महाविद्यालयात न्यावा लागतो. अधिक वेळ जाणार असेल तर 'शीत शवपेटी'/सुका बर्फ यांची व्यवस्था करावी लागते.
अवयवदान मात्र फक्त ब्रेन डेड (मस्तिष्क मृत) व्यक्तींचेच केले जाऊ शकते. यामध्ये मूत्रपिंडे, हृदय, यकृत, फुप्फुसे, मोठे आतडे यांचा समावेश होतो. वैद्यकीय शास्त्रात अलीकडेच झालेल्या प्रगतीनुसार संपूर्ण हाताचे देखील प्रत्यारोपण होऊ शकते.
https://news.abplive.com/videos/news/india-mumbai-s-first-hand-transplan...
अवयवदानाच्या बाबतीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे काटेकोर कायदे आहेत. त्या संबंधी माहिती नंतर कधीतरी....

कुमार१'s picture

18 Mar 2022 - 7:33 pm | कुमार१

धन्यवाद !
जरूर लिहा
या महत्त्वाच्या विषयावर सामाजिक अंगानेही इच्छुकांनी जरूर लिहावे.

कुमार१'s picture

30 Sep 2022 - 3:44 pm | कुमार१

कृत्रिम कॉर्नियाचे प्रत्यारोपण : नवे उत्साहवर्धक संशोधन

कॉर्नियातील दोषामुळे अंधत्व येते. अशा प्रकारचे सुमारे 1.30 कोटी लोक जगभरात मानवी कॉर्निया मिळण्याच्या प्रतीक्षा यादीत आहेत.
परंतु सध्याच्या मानवी नेत्रदानातून ७० गरजूंपैकी फक्त एकाची गरज भागते.

हा प्रश्न सोडवण्यासाठी वैज्ञानिकांनी कृत्रिम कॉर्निया बनवण्याचे अन्य प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. त्यापैकी एका प्रयोगात डुकराच्या त्वचेपासून एक प्रथिन वेगळे काढून त्यापासून कॉर्निया तायार करण्यात आला. त्याचे प्रत्यारोपण भारत व इराणमधील मोजक्या रुग्णांवर करण्यात आले. ते यशस्वी झालेले आहे. यातून पुढील संशोधनास गती मिळेल.
सर्व संबंधित वैज्ञानिक व डॉक्टरांचे अभिनंदन !

https://www.nature.com/articles/s41587-022-01408-w

कुमार१'s picture

1 Oct 2022 - 4:03 pm | कुमार१

अजून एक मुद्दा आहे.

काही रुग्णांत रसायनांमुळे डोळे भाजल्यास किंवा काही autoimmune आजारांमुळे मूळचा कोर्निया खराब झालेला असतो. अशांमध्ये जर मानवी कोर्नियाचे प्रत्यारोपण केले तर तो शरीराकडून नाकारला जाण्याची शक्यता असते.

अशांच्या बाबतीतही या कृत्रिम कोर्निया चा विचार करता येतो.

कुमार१'s picture

5 Nov 2022 - 8:01 am | कुमार१

गेल्या दोन वर्षात कोविडमुळे अवयवदान थंडावले होते. आता या प्रक्रियेने पुन्हा वेग घेतलेला आहे.

पुण्यातील ही एक बातमी:
38 मृतमेंदू रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवयवदानाला परवानगी मिळाली. त्यातून शंभर अन्य रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

(छापील सकाळ : 5 नोव्हेंबर, 2022)

कुमार१'s picture

21 May 2023 - 4:51 pm | कुमार१

एक अत्यंत वाईट बातमी लिहिताना दुःख होत आहे.

ok

विरार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनीत दंडवते यांचा मुलगा साकेत याचे मोटरसायकल अपघातात निधन झाले. त्यानंतर कुटुंबाने स्वतःचे दुःख मनात ठेवून साकेतच्या विविध साकेत चे गरजूंना दान केलेले आहे.
त्यातून 11 गरजूंना असा लाभ झालेला आहे:
३ : यकृत, २ मूत्रपिंडे, २ डोळे,
२ मुलांना हृदयाच्या झडपा आणि
अन्य २ : त्वचा.

अवयवदानाच्या या श्रेष्ठतम दानाबद्दल संबंधित कुटुंबाचे कौतुक.
साकेतला आदरांजली !

कुमार१'s picture

21 May 2023 - 4:53 pm | कुमार१

विविध साकेत चे >>> अवयवांचे
असे वाचावे.

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2023 - 6:55 pm | प्रकाश घाटपांडे

अनुकरणीय

कुमार१'s picture

19 Oct 2023 - 4:15 pm | कुमार१

सुरतेत ५ दिवसाच्या बाळाचे अवयवदान

भारतातील पहिली आणि जगातील दुसरी घटना

या लेखावर पुनः एकदा प्रतिसाद देतोय...
'मला अवयव दान करायचंय...' असं अनेकांना वाटतं. हा लेख आणि त्यावरील सर्व प्रतिसाद ज्यांनी वाचले असतील त्यांच्या हे लक्षात आलेच असेल की अवयवदान फक्त मेंदुमृत व्यक्तींचेच करता येते. रुग्णालये करतात. या साठी शासनाच्या रोटो, सोटो, नोटो या संस्था काम करत असतात.

'अमुक तमुक यांचे अपघातात निधन झाल्याने ** ग्रुपच्या दोन किडण्या उपलब्ध आहेत. कृपया हा मेसेज सर्वांना पाठवा. कुणाचा तरी फायदा होईल.' असा संदेश WhatsApp वर अधून मधून फिरत असतो. हे संदेश केवळ खोडसळपणे पाठवलेले असतात. कृपया लक्षात घ्या
किडनी (मूत्रपिंड) किंवा कोणताही अवयव टी व्ही किंवा फ्रीज चा जुना पार्ट बदलून नवीन बसवावा अशा प्रकारे बदलता येत नाही.
अवयव दान, अवयव प्रत्यारोपण (transplant) या साठी केंद्र व राज्य सरकारचे अतिशय काटेकोर कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी देशातील सर्वच रुग्णालयांना करावी लागते.
केवळ मेंदूमृत (Brain dead) व्यक्तींच्या अवयवांचे दान व प्रत्यारोपण होऊ शकते.
या साठी 'अवयवदान गरजू' रुग्णांची प्रतीक्षा सूची राज्य शासकीय रुग्णालयात केलेली असते त्या नुसारच ही कार्यवाही होते.
जिवंत व्यक्तीचे अवयव दान केवळ नजीकच्या नातेवाईकांमध्येच (पती -पत्नी; आई, वडील - त्यांचे अपत्य; भाऊ - बहीण) नियमांनुसार शक्य असते.य
या बाबत अधिक माहिती पुढील संकेतस्थळांवर मिळू शकेल.
https://v4organs.org/
https://www.rottosottokem.in/pledgeform

कुमार१'s picture

22 Oct 2023 - 8:30 am | कुमार१

उपयुक्त माहिती दिलीत आणि गैरससमज दूर केलेत.

आठ वर्षाच्या मुलाचे अवयवदान केल्यानंतर मृत्युपश्चात त्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अभिवादन व आदरांजली !

चित्रगुप्त's picture

8 Mar 2024 - 9:40 pm | चित्रगुप्त

माझे वडील बंधू - वय सुमारे ८५ - गेल्या आठवड्यात मृत्यू पावले. त्यांच्या इच्छेनुसार आर्मी हॉस्पिटलास देहदान केले गेले आहे.
सध्या एवढेच समजले आहे. जास्त माहिती काही दिवसांनी विचारून कळवू शकतो. (काही प्रश्न असल्यास इथे सांगितले तर विचारेन).