आधी लेखाच्या शीर्षकाचा उलगडा करतो.
“मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहित नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे…….
.....
.....
आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी उचकी लागते. ती अचानक येते व थांबतेही. अशा अचानक १-२ उचक्या लागल्या की, “कोण माझी आठवण काढतंय आज” असा पारंपरिक सुखद काल्पनिक विचार मनात चमकून जातो खरा. जशी ही उचकी थांबते तसे आपण तिला विसरून आपल्या कामात गढून जातो. सटीसामाशी अशा किरकोळ उचक्या येणे व थांबणे हा एक सामान्य प्रसंग असतो. घटकाभर तो आपल्या आजूबाजूच्यांची करमणूकही करतो ! मात्र कधी कधी एखाद्याला लागलेली उचकी थांबता थांबत नाही. अक्षरशः ५-१० सेकंदांमागे एक अशा गतीने त्या उचक्या येतच राहतात. त्यातून उचकी लागलेला माणूस त्रासून जातो. मग त्या थांबण्यासाठी बरेच घरगुती उपाय करून पाहिले जातात. बऱ्याचदा त्यांना यश येते. काही वेळेस मात्र हे प्रकरण एवढ्यावरच निवळत नाही. उचक्यांवर उचक्या येतच राहतात आणि संबंधित माणूस अगदी अत्यवस्थ होतो. या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेक आजारांचे उचकी हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. न थांबणाऱ्या उचकीचे निदान होणे आवश्यक ठरते. ते झाल्यावर गरजेनुसार वैद्यकीय उपचार केले जातात. अशा या आपल्याला अधूनमधून ‘उचकवणाऱ्या’ उचकीचे अंतरंग या लेखात समजून घेऊ.
लेखाची विभागणी अशी करतो :
• व्याख्या व मूलभूत माहिती
• वैशिष्ट्ये
• कारणमीमांसा
• रुग्णपरीक्षा व तपासण्या
• उपचार
व्याख्या व मूलभूत माहिती
उचकीची शास्त्रशुद्ध व्याख्या अशी आहे :
‘कंठामध्यें सशब्द असा आचका बसणे’.
आपली छाती व पोट यांच्या सीमेवर श्वासपटल (diaphragm) हा स्नायू असतो. तो जेव्हा अचानक वेगात आकुंचन पावतो, तेव्हा हवा तोंडाने आत खेचली जाते आणि स्वरयंत्र बंद होते. त्यातून जो ‘हिक’ असा आवाज येतो त्याला उचकी म्हणतात. योग्य इंग्लिशनुसार तो शब्द hiccup असा आहे (hic-cough हा चुकीचा अपभ्रंश आहे, कारण या घटनेचा खोकल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. सामान्य शब्दकोशांत हा फरक लक्षात घेत नाहीत). बरेचदा उचकी काही मिनिटात थांबते. जेव्हा ती ४८ तासांहून अधिक काळ चालू राहते तेव्हा ती ‘टिकून राहणारी’ म्हटली जाते. त्याहून पुढे, जर ती एक महिन्याहून अधिक काळ चालू राहिली तर तिला ‘अनियंत्रित’ म्हणतात. वैद्यकाच्या इतिहासात नोंदलेला प्रदीर्घ काळ उचकी टिकून राहण्याचा विक्रम तब्बल ६८ वर्षांचा आहे !! चार्ल्स ऑसबॉर्न नावाचे हे गृहस्थ तब्बल ९६ वर्ष जगले. त्यांच्या वयाच्या ९५व्या वर्षी त्यांच्या उचक्या अचानक थांबल्या. या अभूतपूर्व घटनेमुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदलेले आहे.
वैशिष्ट्ये
जेव्हा एखाद्याला उचकी लागते तेव्हा दर मिनिटाला ४ ते ६० इतक्या प्रमाणात उचक्या लागू शकतात. दोन उचक्यांमधले अंतर संबंधित व्यक्तीसाठी साधारण समान असते. उचकीचे प्रमाण आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण यांचे नाते व्यस्त (inverse) असते. उचक्या जास्ती करून संध्याकाळी अधिक लागतात. तरुण स्त्रियांना येणाऱ्या उचक्या बर्याचदा मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच्या १-२ दिवसांमध्ये येतात.
कारणमीमांसा
उचकी या लक्षणावर वैद्यकाच्या इतिहासात अनेक शतकांपासून अभ्यास चालू आहे. परंतु आजही आपल्याला त्याची परिपूर्ण कारणमीमांसा समजलेली नाही. सन १८३३ मध्ये Shortt या वैज्ञानिकाला तिचा कार्यकारणभाव शोधण्यात प्रथम यश आले. श्वासपटलाला संदेश देणारी जी नर्व्ह असते तिच्या अतिरिक्त उत्तेजनामुळे (irritation) आपल्याला उचकी लागते. या मूलभूत शोधानंतर पुढे त्यावर अधिक अभ्यास होऊन 1943 मध्ये एक थिअरी मांडली गेली. त्यात संबंधित चेतातंतू, मज्जारज्जू व मेंदूतील विशिष्ट केंद्र यांची सांगड घातली गेली. या सर्व घटकांच्या समन्वयातून उचकीची प्रतिक्षिप्त क्रिया घडते. उचक्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकतात. एक नवलाईची गोष्ट म्हणजे गर्भातील जिवालासुद्धा त्या अधूनमधून येत असतात !
आता उचकीनिर्मिती होण्यास जबाबदार असलेल्या घटकांचा आढावा घेतो.
A. अल्पकाळ टिकणाऱ्या उचक्या :
प्रौढांमध्ये याची महत्त्वाची कारणे अशी :
१. अतिरिक्त खाद्य अथवा हवा जठरात जाऊन ते फुगणे
२. तापमानात अचानक झालेले मोठे चढ-उतार
३. बेसुमार मद्यपान अथवा तंबाखूसेवन
४. ताणतणाव अथवा अतिउत्तेजित अवस्था.
B. दीर्घकाळ टिकणाऱ्या उचक्या : विविध आजारांमध्ये वर उल्लेख केलेल्या चेतातंतूंवर परिणाम होतो. त्यामुळे उचक्या लागून राहतात. या संदर्भात 100 हून अधिक आजारांचा अभ्यास झालेला आहे. तरीसुद्धा एखादा आजार व उचकी लागून राहण्याचा कार्यकारणभाव अद्यापही अस्पष्ट आहे.
काही प्रमुख आजार/ स्थिती अशा आहेत:
१. विविध मनोविकार
२. मेंदू व मज्जारज्जूचे आजार
३. काही हृदयविकार
४. घसा व पचनसंस्थेचे दाहजन्य आजार
५. चयापचयातील बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम कमी होणे, किंवा ग्लूकोजची पातळी वाढणे
६. काही औषधांचे दुष्परिणाम : विशेषतः गुंगी आणणारी औषधे आणि स्टिरॉइड्स.
आजारांमुळे येणाऱ्या उचक्या जर अनियंत्रित राहिल्या तर त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामध्ये मुख्यतः हे आहेत :
१. जठरातील अन्न व रस वारंवार अन्ननलिकेत येणे
२. हृदयताल बिघाड
३. निद्रानाश व शरीराचे वजन कमी होणे.
रुग्णपरीक्षा व तपासण्या
रुग्णाला लागलेल्या उचक्या तर सहज दिसतात. मग त्याची अंतर्गत तपासणी कशासाठी हा प्रश्न पडू शकेल. परंतु अनियंत्रित उच्चक्यांची असंख्य कारणे बघता बारकाईने रुग्णतपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये डोके, कान, डोळे, तोंड, मान, छाती व पोट हे सगळे बारकाईने पाहिले जाते तसेच मज्जासंस्थेची रीतसर तपासणी होते.
अशाप्रकारे रुग्णतपासणी केल्यानंतर डॉक्टरांना एक प्राथमिक अंदाज येतो. त्यानुसार खालीलपैकी योग्य तेवढ्या चाचण्या केल्या जातात :
१. प्रयोगशाळा चाचण्या : सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम व ग्लुकोज यांची रक्तपातळी, यकृतासंबंधीच्या चाचण्या, रक्तातील पेशींची मोजणी, लघवी, थुंकी तपासणी इत्यादी.
२. प्रतिमा चाचण्या : छातीचा एक्स-रे, फ्लुओरोस्कोपी, गरजेनुसार मज्जासंस्थेच्या सखोल अभ्यासासाठी सिटीस्कॅन व एमआरआय तपासण्या.
उपचार
कोणत्याही आजाराविना आलेल्या सौम्य ते मध्यम प्रमाणातील उचक्यांसाठी घरगुती उपाय जरूर करावेत. या पारंपरिक उपायांमुळे उचकी प्रक्रियेच्या काही चेताघटकांवर परिणाम होऊन ती थांबू शकते. अशा सोप्या उपायांची यादी देखील भरपूर मोठी आहे ! ३ गटांत तिचा विचार करू :
१. सोपे उपाय : बारीक केलेली खडीसाखर चघळणे, पाण्याने गुळण्या करणे, बर्फाचे पाणी पिणे, पेल्यात पाणी घेऊन त्याच्या पलिकडील बाजूने पिणे, लिंबू चावत बसणे.
२. श्वसनासंबंधी उपाय : श्वास रोखून धरणे, जोरजोरात श्वास घेणे व सोडणे, वेदना झाल्यागत मोठा आ वासणे, कागदी पिशवी तोंडाभोवती बांधून त्यात श्वासोच्छ्वास करणे ( या कृतीने रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते)
३. लक्ष विचलित करण्याचे उपाय : प्रेमळ व्यक्तीची अथवा घटनेची आठवण काढणे, ध्यान, मनन, प्रार्थना, संमोहन उपचार, इत्यादी.
व्यक्ती आणि प्रकृतीनुसार वरीलपैकी १-२ उपाय करून पाहावेत. हे सर्वच उपाय जरी काटेकोरपणे शास्त्रोक्त नसले तरीदेखील त्यांचा उपयोग झाल्याचे अनुभव आहेत.
अन्य काही उपचार प्रशिक्षित व्यक्तीकडून करवून घेता येतात. ते असे :
१. मानेच्या मागच्या भागावर विशिष्ट पद्धतीने चोळणे
२. तोंडातील पडजीभेला चमचा अथवा कापूसकाडीने चेतवणे
३. उलटी करायला लावून जठर रिकामे करणे
४. बर्फगार पाण्याने जठर धुऊन काढणे
५. गुदद्वारात बोट घालून मसाज करणे.
वरीलपैकी एक अथवा अधिक उपायांनी रुग्णास गुण न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या मते जर एखाद्या विशिष्ट आजारामुळे उचक्या येत असतील तर त्या आजारावर प्रथम उपचार केले जातात. तरीही उचक्या न थांबल्यास गरजेनुसार डॉक्टर विविध प्रकारचे औषधोपचार करू शकतात. यासाठी खालील प्रकारची औषधे वापरली जातात:
• मेंदूतील चेतारासायनिक क्रियांवर परिणाम करणारी
• ताणतणाव कमी करणारी
• पचनसंस्थेचे नियमन करणारी
• गुंगी आणणारी व भूल द्यायची औषधे
• स्नायूंचा ताण कमी करणारी
अशाप्रकारे उचकी-नियंत्रणासाठी अनेकविध उपाय उपलब्ध आहेत. तरीसुद्धा एक गोष्ट वैद्यकशास्त्राने मान्य केलेली आहे. या विषयावरील ज्ञान आणि माहितीचा साठा प्रचंड जमा झालेला आहे. परंतु, त्या तुलनेत प्रभावी उपचारांच्या बाबतीत मात्र अद्यापही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
समारोप
तर अशी ही उचकीगाथा. अचानक कुणीतरी आपली आठवण काढल्याने आपल्याला उचकी लागते, हा सुंदर कल्पनाविलास आहे ! लेखाच्या शीर्षकातील लावणीनुसार त्याकडे मनोरंजन म्हणून पाहता येते. प्रत्यक्षात उचकी लागण्यामागे बरीच शास्त्रीय कारणे आहेत. त्यांचा उहापोह या लेखात केला. सामान्य स्वरूपातील उचकीसाठी पारंपरिक घरगुती उपाय मोलाचे आहेत. ते सर्वांना नीट माहिती व्हावेत या उद्देशाने त्यांचे विवेचन केले. मात्र अनियंत्रित उचकी हा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. त्याप्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
…………………………………………………………………………………..
प्रतिक्रिया
20 Sep 2021 - 7:46 am | गॉडजिला
उचकीपुराण बरेच गहन आहे की… आणी अन्य काही उपचारही.
20 Sep 2021 - 7:55 am | प्रचेतस
उत्तम आणि माहितीपूर्ण लेख. ६८ वर्ष उचक्या येत राहणे हे भयंकर आहे.
20 Sep 2021 - 9:29 am | Bhakti
ह्याचा संबंध Tourettes सिंन्ड्रोमशीपण आहे का?
यावर एक हिंदीमध्ये 'हिचकी 'नावाचा सिनेमा आला होता.
https://www.wltx.com/mobile/article/news/lo
cal/fyi/hiccup-girl-diagnosed-with-tourettes-syndrome/101-381554285
20 Sep 2021 - 9:29 am | Bhakti
https://www.wltx.com/mobile/article/news/local/fyi/hiccup-girl-diagnosed...
20 Sep 2021 - 9:52 am | कुमार१
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
भक्ती, चांगला प्रश्न.
हा एक चेतासंस्थेचा अनुवंशिक आजार आहे. याची लक्षणे बालपणात दिसू लागतात. यामध्ये रुग्णाला छोटे झटके येताना दिसतात त्याला tics असे म्हणतात. मुळात याचा अर्थ, चेहऱ्याच्या किंवा डोळ्याच्या स्नायूंची स्वनियंत्रण नसलेली हालचाल असा आहे.
अशा रुग्णात डोळे मिचकावणे, नाकाने मुसमूसणे, गुरगुरणे, खोकणे, फूंकर मारणे किंवा चोखल्याचे आवाज काढणे अशी लक्षणे दिसून येतात.
उचकी हा त्या दृष्टीने लेखात लिहिल्याप्रमाणे वेगळा प्रकार आहे. तो कुठल्याही वयात कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो.
20 Sep 2021 - 9:53 am | कुमार१
हिचकी चित्रपटात राणी मुखर्जीने काम सुंदर केले आहे ! मी पाहिलेला आहे.
20 Sep 2021 - 10:21 am | Bhakti
माहितीसाठी धन्यवाद!
हो राणी मुखर्जीने खुप सुंदर काम केले आहे.
20 Sep 2021 - 10:07 am | मित्रहो
उचकीची खूप छान शास्त्रोक्त माहिती.
मी कमी तिखट खातो. थोड जरी तिखट खाल्ले तरी उचकी लागते. चहात आले जास्त झाले तरी उचकी लागते. पाणीपुरी तिखट असो वा नसो दोन तीन पाणीपुरीनंतर उचकी लागतेच. मला उचकी लागणं हे आमच्या घरातले तिखटाचे प्रमाण आहे. त्यापुढची स्टेप म्हणजे घाम येणे. पाणी पिल्यानंतर उचकी जाते तेंव्हा हे सारं नॉर्मल असावे असे वाटते.
20 Sep 2021 - 10:37 am | कुमार१
मित्रहो,
तुम्ही आणि मी एकाच गटातले आहोत ! ज्या लोकांना जठाराम्लता-अधिक्याचा त्रास असतो, किंवा जठरातील अन्न थोडेफार वर अन्ननलिकेत येण्याची प्रवृत्ती असते, त्यांच्या बाबतीत अशा उचक्या येतात.
जर बाहेर कुठे जेवायला बोलावले असेल, तर तिथे मी प्रथम लिंबाच्या अतिरिक्त फोडी मागून घेतो. मग त्या रस्सा किंवा कालवण असेल त्यात प्रथम पिळतो. आणि मग हळूच चाखून पाहतो.
जर का चुकून एखादा ‘तांबडा रस्सा’ अनवधानाने एकदम पिला गेला तर मग मात्र कम्बख्तीच !
…..
सर्व नियमित वाचकांचे आभार !
20 Sep 2021 - 9:44 pm | मित्रहो
अतिरीक्त माहितीसाठी मनापासून धन्यवाद
त्रास काही होत नाही पण इतरांसाठी चेष्टेचा विषय होतो. मला आता त्याची सवय झाली.
21 Sep 2021 - 10:56 pm | तर्कवादी
मला घसा कोरडा असताना तिखट आणि कोरडा पदार्थ खाल्ला की (जसे तळलेली मिरची सोबत घेवून खाल्लेला वडापाव ) उचकी लागते. पण पाण्याचा एक घोट पिउनही ही उचकी लगेच थांबते
20 Sep 2021 - 10:27 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान माहिती.
20 Sep 2021 - 11:20 am | प्राची अश्विनी
सोप्या भाषेत छान माहिती. शास्त्रीय माहितीपर लेखन सोपं सुटसुटीत लिहिणं कठीण असतं.
20 Sep 2021 - 11:41 am | टर्मीनेटर
वाह! बर्याच दिवसांनी आज तुम्हाला होम पिच वर खेळताना बघुन आनंद झाला.
तुमचे आरोग्य विषयक लेखन मिस करत होतो. ह्या छान माहितीपुर्ण लेखासाठी आभार!
दिवाळी अंकासाठीही असाच उत्तम माहितीपुर्ण लेख लिहावात अशी तुम्हाला आग्रहाची विनंती 🙏
माझ्या बाबांनाही उचकी लागण्याचा त्रास अधुन मधुन होत असतो, कधी तास दोन तास तर कधी संपुर्ण दिवसभर. मी सध्या बाहेर असल्याने त्यांना Whatsapp वर ह्या लेखाची लिंक पाठवली होती, "अप्रतिम माहिती" असा त्यांचा रिप्लाय आलाय!
वरती मित्रहो म्हणालेत तसा उचकी लागण्याचा प्रकार आले आणि काळी मिरी किंचीत जास्त प्रमाणात घातलेले कुठलेही पदार्थ खाताना मला पण होतो, फरक एवढाच की मला रोजच तिखट खाण्याची सवय आहे तरीही 😀
20 Sep 2021 - 11:58 am | कुमार१
अभिप्राय दिलेल्या वरील सर्वांचे मनापासून आभार !
...
टर्मिनेटर,
सर्वप्रथम तुमच्या वडिलांचा उचकीचा त्रास कमी होवो यासाठी शुभेच्छा. त्यांना जरूर कळवाव्यात.
>> होय, हे मलाही स्वतःला जाणवलं होतं. आता जर का एखादा आरोग्यलेख लिहिला नसता, तर काही लोक नक्की म्हणाले असते, “अरे, हा माणूस शब्दखेळांमध्ये वाया चाललाय !” 😀
म्हणून संपूर्ण गणेशोत्सवात इथे प्रतिसादमात्र राहिलो आणि एकीकडे मन लावून उचकीवाचन केले.
.......
दिवाळी अंकाचे म्हणाल तर यंदा फक्त वाचन आणि प्रतिसादमात्र राहणार आहे. गेली तीन वर्षे सलग मी दिवाळी अंकासाठी लिहिलेले आहे. यंदा मात्र विश्रांती ! याचे कारण म्हणजे गेली दीड वर्षे कोविड लेखमाला आणि प्रश्नोत्तरांमुळे खरोखर शीण आलेला आहे. त्यामुळे लेखनविश्रांतीची नितांत गरज आहे. पुढल्या वर्षी त्याची कसर भरून काढेन असे म्हणतो.
धन्यवाद !
20 Sep 2021 - 12:38 pm | सरिता बांदेकर
खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
माझं काही वर्षांपूर्वी पोटाचं ॲापरेशन झालं तेव्हा डॅा. नी सांगितलं होतं आतड्याची अडिझन्स झाली होती म्हणून पोटात दुखत होतं.आता तुम्हाला बरं वाटेल.
पण ॲापरेशन नंतर मला खूप उचक्या लागल्या तेव्हा डॅा.नी मला गॅसेक्सच्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं होतं, गोळ्या नेहमी जवळ ठेवा.
त्यामुळे मी अजूनही जर उचकी बऱयाच वेळ थाबली नाही तर गोळी घेते.मग उचकी थांबते.
शास्रीय कारण मला माहित नाही.पण तुमचा लेख वाचून तुम्हाला सांगावेसे वाटले.
कदाचित तुम्हाला कारण माहित असेल.
मला उचकी लागण्याचं प्रमाण तसं खूपच कमी झालेय आता.
20 Sep 2021 - 12:57 pm | कुमार१
धन्यवाद.
तुम्ही तुमची व्यक्तिगत आरोग्यमाहिती इथे लिहीलीत हे चांगले झाले. इतरांनाही त्याचा उपयोग होत असतो.
जेव्हा जठरकार्यात काही प्रकारचा बिघाड होतो त्यातून उचकी लागते, हे वर लेखात दिलेले आहे. इथे अजून एक रोचक भाग आहे. जठरकार्यातील बिघाड हे उचकीचे कारण आणि परिणाम असे दोन्ही असू शकते ( कॉज & इफेक्ट). त्यामुळे तुमचे पचनकार्य नियंत्रणात ठेवणारे औषध घेतले की त्याचा फायदा उचकी कमी होण्यासाठी सुद्धा होतो.
20 Sep 2021 - 12:39 pm | सुरिया
भारीच लेख, खरोखर तुमचे हेच होम पीच आहे आणि ह्यात तुम्ही तेंडल्या आहात.
उचकी आणि ठसका ह्यातला अॅक्चुअल फरक काय आहे?
एकदम तिखट रस्सा खाताना/भुरकताना/ओरपताना जो एकदम जहाल ठसका बसून डोळ्यात पाणी वगैरे येते ते उचकी टाईपच का?
ते "वर बघ, वर बघ" असे म्हन्तात किंवा पाठीवर थोपटतात त्याने काय होते?
20 Sep 2021 - 2:37 pm | कुमार१
उत्साहवर्धनासाठी धन्यवाद.
>> चांगला प्रश्न.
या दोन्ही क्रिया अर्थातच भिन्न आहेत. उचकीबद्दल लेखात सविस्तर लिहिले आहे. आता ठसका समजून घेऊ.
जेव्हा अन्नाचा घास घशात येतो तेव्हा तो गिळण्यापूर्वी क्षणभरासाठी श्वसन थांबते. या क्रियेमध्ये तिथल्या अनेक स्नायूंचा परस्परसंवाद (coordinated interaction) होतो. आणि त्यामुळे अन्न हे अन्ननलिकेतच जाते. स्वयंचलित निसर्गनियमनाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे !
मात्र कधीतरी खाताना अनवधानाने अन्नाचे कण आपल्या श्वासनलिकेत शिरतात - विशेषता जर पण घासभरल्या स्थितीत बोलत राहिलो, तर हे व्हायची शक्यता बरीच वाढते. ज्या क्षणी अन्नकण श्वसनमार्गात जातात त्या क्षणी स्वसंरक्षणार्थ एक प्रतिक्षिप्त क्रिया उमटते (gag reflex). त्यामुळे ते अन्नकण बाहेर फेकले जातात व श्वसनमार्गाचे संरक्षण होते या क्रियेला आपण ठसका म्हणतो.
पुढे चालू.....
20 Sep 2021 - 2:48 pm | कुमार१
समजा, ठसका लागूनही अस्वस्थ वाटत राहिलंय.
याचा अर्थ श्वसनमार्गात घुसलेले अन्नकण पूर्णपणे बाहेर फेकले गेले नाहीत.
हे काम सुरळीतपणे होण्यासाठी वर बघणे, दुसऱ्याने पाठीत थोपटणे, इत्यादी कृती केल्या जातात.
त्यामुळे आपली श्वासनलिका किंचित खालच्या दिशेने तिरपी (tilt) होते, जेणेकरून तिच्यातले अन्नकण पूर्णतः बाहेर फेकले जातात.
21 Sep 2021 - 6:26 pm | कुमार१
रच्याकने,
माझीही एक शंका आहे.. कोणीही उत्तर द्यावे.
(आपण खाताना लागतो तो) ठसका यासाठी असाच अल्पाक्षरी इंग्लिश शब्द कोणाला सुचतोय का ? शब्दकोशात मी पाहिले तेव्हा ...
The sudden sensation arising in repercussion from the gullet…
एवढे लांबलचक वर्णन दिलेले आहे. माझ्या अंदाजानुसार इंग्लिश मध्ये ठसका हा cough मध्येच धरला जातो. त्यामुळे वेगळा अल्पाक्षरी शब्द नसावा.
तरीपण जाणून घेण्यास उत्सुक.
25 Sep 2021 - 8:40 pm | स्मिताके
डॉ कुमार१, नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेखासाठी आभार.
“कोण माझी आठवण काढतंय आज” असा पारंपरिक सुखद काल्पनिक विचार >> हा विचार
३. लक्ष विचलित करण्याचे उपाय : प्रेमळ व्यक्तीची अथवा घटनेची आठवण काढणे, >> यासाठी निर्माण झाला असेल बहुतेक!
Gagging, Choking, Gasping हे शब्द "ठसका" या अर्थी असावेत असा माझा अंदाज होता. पण आपण दिलेली माहिती वाचून वाटले, कदाचित या तिन्ही क्रिया एकत्र घडणे याला ठसका म्हणता येईल.
25 Sep 2021 - 8:56 pm | कुमार१
धन्यवाद.
तुम्ही म्हणताय तसं त्या ३ इंग्लिश शब्दांचा संगम म्हणजे ठसका असे म्हणायला हरकत नाही !
20 Sep 2021 - 6:59 pm | उगा काहितरीच
मी लहान असताना एकदा अजोबाला उचकी लागण्याचा त्रास झाला होता असं अंधुक अंधुक आठवतंय. ३-४ दिवस सलग उचक्या लागल्या होत्या असं आठवतंय. त्यांना बहुतेक मोरपीस जाळून मधामध्ये मिक्स करून दिलं होतं.
माझ्यासाठी श्वास बंद करायचा उपाय बहुतेक वेळा पडतोच लागू. बाकी लेख छान आहे.
20 Sep 2021 - 7:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या होमपीचवर बॅटींग करताना बघुन फार बरे वाटले
हा उपाय काही निटसा लक्षात आला नाही
जरा विस्कटून सांगता का?
पैजारबुवा,
20 Sep 2021 - 8:01 pm | कुमार१
उका, बुवा, धन्यवाद.
अपेक्षित प्रश्न !
थोडक्यात हा द्राविडी प्राणायाम असतो. पेल्यात पाणी घेऊन तो उजव्या हातात धरायचा. असे धरल्यावर पेल्याची अंगठ्याकडेची, म्हणजे जवळची बाजू टाळायची. उलट, जिथे पेल्यावर तर्जनी टेकली आहे तिकडे तोंड न्यायचे.
त्यासाठी डोके खूप झुकवावे लागते. त्यातून पोटाचे स्नायू जोरकसपणे आकुंचन पावतात >> उचकी थांबू शकते.
https://lifehacker.com/cure-the-hiccups-by-drinking-water-from-the-oppos...
21 Sep 2021 - 6:33 am | सुधीर कांदळकर
अति मद्यपानानंतर काही जणांना उचकी लागते. रात्री उशिरा मद्यालयात असा असा एखादा तरी बहुतेक वेळा दिसतो. मद्यपींना हे नवे नाही.
घरगुती उपाय आवडले. पिशवीतले श्वसन माझ्यासाठी नवे आहे.
बर्याच काळाने वैद्यकीय विषयावर लिहिलेत. आरोग्यदायी वाचनरंजन झाले. आवडले. आपल्या लेखनविश्रांतीनंतर एखादी भन्नाट लेखमाला वाचायला मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.
21 Sep 2021 - 10:12 am | सुसदा
माहिती बद्दल धन्यवाद. मला पोहे किंवा भाकरी खातांना हमखास उचकी लागते, काहीवेळा पाणि पिउन पण थांबत नाही.मग मी तसेच खाते, कधीतरी थांबते.
21 Sep 2021 - 10:46 am | वामन देशमुख
माहितीपूर्ण आणि मनोरंजक असा हा लेख अगदी फक्कड (हा शब्द उच्चारताना उचकी लागते का? 😉 ) जमलाय. एकाहून एक माहितीपूर्ण वैद्यकीय लेख लिहून तुम्ही ऑनलाइन मराठी साहित्यात नक्कीच मोलाची भर घातलीय.
---
BTW, उचकीहूनही त्रासदायक प्रकार म्हणजे शिंका! शिंकांवरही असाच एक माहितीपूर्ण लेख लिहाल का?
---
विशेषकरून जुनी धूळ, जाळी, जळमटे इत्यादींशी संपर्क आला तर मला काही वेळा अगदी जोरदार शिंका येतात. म्हणजे एकदा सुरु झाल्या की शे-दोनशे शिंका तरी येतातच. मग त्यानंतर नाकाडोळ्यातून पाणी, तात्काळ सर्दी, डोके जड पडणे, सुन्न वाटणे, काहीही काम करू न शकणे असे प्रकार सुरु होतात. Metaspray नाकपुड्यांत फवारल्यावर लगेच आराम पडतो, पण त्या औषधाचा वारंवार उपयोग करणे योग्य आहे का अशी शंका मनात येते.
---
कदाचित बावळट प्रश्न: अगदी जोरदार शिंक येणे म्हणजे volume आणि speed इतरांपेक्षा अधिक असणे (Analogy: सर्वसाधारण शिंक ही क्स असा आवाज करत असेल तर क्ष्क्षऽ असा आवाज करणे) हे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम असल्याचे लक्षण मानता येईल का?
21 Sep 2021 - 11:31 am | कुमार१
सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
•
>> अगदी बरोबर. हे जठरदाहामुळे होते.
>>>> अनेकांचे अनुभव रोचक आहेत. अजूनही उचकीची कारणमीमांसा हा संशोधनाचाच विषय आहे !
……..
•
याआधी मिपावर हा लेख इथे लिहिला आहे :
‘आ..आ... च्छी ! अर्थात अॅलर्जिक सर्दी’
…
वामन
शिंकेसंबंधित तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जरा वेळाने…
21 Sep 2021 - 4:46 pm | कुमार१
हा प्रश्न चांगला आहे काही संदर्भ चाळून आणि संबंधित तज्ञांशी चर्चा करून याचे उत्तर देतोय. शिंकण्याच्या आवाजाचा जोरकसपणा संबंधित व्यक्तीच्या नाकाची अंतर्गत रचना (anatomy) आणि उच्छ्वास करण्यास जबाबदार असलेले छातीचे स्नायू, यांच्यावर अवलंबून असते.
शिंकेची कारणे सुद्धा भिन्न असतात. ज्या प्रमाणात नाकाच्या आतल्या भागाचे इरीटेशन होते त्या प्रमाणात शिंकेचा जोर ठरतो.
त्यामुळे मोठी शिंक म्हणजे चांगले फुफ्फुसांचे कार्य असे काही म्हणता येत नाही.
21 Sep 2021 - 5:44 pm | वामन देशमुख
शिंकेबद्धल लिंकेबद्धल धन्यवाद डॉक्!
;)
हा लेख माझ्या नजरेतून कसा काय सुटला बरे?
बाकी शिंकेच्या जोरकसपणाचे स्पष्टीकरण पटले.
21 Sep 2021 - 4:27 pm | शानबा५१२
दररोज उचकी येणे हे 'मुळधारा चक्र' कमकुवत झाल्याचे एक लक्षण आहे. 'लिंगमुद्रा करा' व जास्त बसु नका, बसल्यास आसनामध्ये बसा.
21 Sep 2021 - 4:46 pm | अथांग आकाश
मस्त लेख! बरिच नवीन माहिती मिळाली!!
21 Sep 2021 - 5:25 pm | कुमार१
शानबा,
पूरक माहितीबद्दल आभार.
अथांग,
नेहमीप्रमाणेच सुंदर चित्र ! आज तुमचे बर्याच दिवसांनी येणे झाल्यामुळे मिपाकरांना 'चित्रपंचमी' बघायला मिळणार यात शंका नाही. 😀
धन्यवाद
21 Sep 2021 - 6:49 pm | श्रीगुरुजी
खूप वर्षांपूर्वी कोणत्या तरी इन्फेक्शनमुळे पोटाला (म्हणजे आतड्याला) सूज आली होती. त्यामुळे एक दिवस अचानक उचक्या सुरे झाल्या व नंतर सलग ३-४ दिवस उचक्या येत होत्या. श्वास रोखणे, काहीतरी गरम पिणे, आईस्क्रीम खाणे असे सर्व उपाय करून झाले. परंतु उचक्या थांबत नव्हत्या. शेवटी एका डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सुरूवातीला नाकाभोवती प्लॅस्टिकची पिशवी घट्ट धरून त्यात जोरजोरात श्वासोच्छ्वास करण्यास सांगितला. एक-दोन मिनिटांनंतर उचकी थांबली, पण काही वेळाने परत सुरू झाली. असे ३-४ वेळा झाले. नंतर त्यांनी बहुतेक एक झोपेची गोळी देऊन झोपण्यास सांगितले. ती गोळी घेऊन ७-८ तास सलग झोपल्यानंतर उचकी थांबली होती.
पिशवीत श्वासोच्छ्वास करताना त्यातील प्राणवायू कमी होऊन कर्बवायू वाढून श्वासात गेल्याने उचकी थांबते असे म्हणतात. श्वास रोखल्याने तोच परीणाम होतो. डोक्यावरून गच्च पांघरूण घेऊन झोपल्यानेही तोच परीणाम होतो.
कंबरेत पूर्ण वाकून डोके पूर्ण खाली करून पाणी पिण्याचा प्रयत्न केल्याने उचकी थांबते असेही ऐकले आहे.
22 Sep 2021 - 2:46 am | चामुंडराय
छान माहिती कुमार१ सर !
तुमचे वैद्यकीय लेख वाचून नवनवी माहिती मिळते.
तुम्ही "शहाणे करावे सकल मिपाजन" हे व्रत घेतले आहे त्या बद्दल आभार.
"जांभई" बद्दल तुम्ही या आधी लिहिले आहे काय? नसल्यास लिहावे ही विनंती.
22 Sep 2021 - 6:12 am | कुमार१
"जांभई"
~> विषय रोचक आहे!
प्रतीक्षा यादीत ठेवतोय :))
22 Sep 2021 - 4:33 am | सुक्या
लक्ष विचलीत केल्याने उचकी थांबते याचा अनुभव आहे. मला एकदा अशीच उचकी लागली होती जी काही केल्या थांबत नव्हती. पाणी पिणे, मध खाणे सारे प्रकार करुनही जवळ्पास ३ ते ४ तास उचकी चालु होती. सगळा मित्रपरीवार काय काय करायला सांगत होता तितक्यात एक मित्र जोरात किंचाळला "अबे तेरी शर्ट की कोलर मै स्पाईडर है". मी पण तो कोळी झटकायचा प्रयत्न करु लागलो. त्या झटापतीत चांगली ३ / ४ मिनीटे पुर्ण रुमभर पळापळी करुन झाली ...
त्याचा फायदा असा झाला की ४ तास चालु असलेली उचकी मात्र थांबली. नंतर त्या मित्राने घाबरल्याने मेंदुत जी काही हार्मोन तयार होतात त्याने उचकी थांबते असे सांगीतल्याचे आठवते.
नंतर बायकोला उचकी लागली तेव्हा हाच प्रयोग "ते बघ झुरळ" म्हणुन केला .. उचकी थांबली पण नंतर किचेन मधला सारा पसारा मला आवरायला लागला होता. नशीब असे की बायको नेमकी चपातीचे कणीक मळत होती .....
तेव्हा हा प्रयोग स्वतःच्या जबाबदारी वर करावा ...
22 Sep 2021 - 8:14 am | कुमार१
अनुभव आणि पूरक माहिती लिहिल्याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !
वरील चर्चेत जे घरगुती उपाय सांगितलेले आहेत ते रोचक आहेत. डोक्यावरुन पांघरूण घेणे असो की कोळी अथवा झुरळाची भीती दाखवणे असो, या सर्व उपायांनी लक्ष विचलित केले जाते हा त्यांचा महत्त्वाचा फायदा.
अशीच एक वाचलेली रोचक माहिती लिहितो. एका माणसाला सतत ८ वर्षे उचक्या चालू होत्या. विविध लोकांनी सुचवलेल्या उपचारांची संख्या तब्बल ६०,००० पर्यंत जाऊन पोहोचली होती ! डॉक्टरांनीही हात टेकले होते. शेवटी त्याला एकाने सांगितले की तू तुझ्या आवडत्या व्यक्तीचे ध्यान कर. शेवटी हा उपाय लागू पडून त्याच्या उचक्या थांबल्या.
23 Sep 2021 - 7:20 am | सुधीर कांदळकर
तरुणाईत आमचा एक कॉन्व्हेन्टातल्या इंग्रजाळलेल्या पोरांचा कंपू होता. एका श्रीमंत गुजराती मुलाचे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीवर प्रेम बसले. त्यांनी जेव्हा लग्न करायचे ठरवले तेव्हा एकाची प्रतिक्रिया होती
"यॉर मॉम इज शॉरली गोइंग टु गेट हिकप व्हेन यू टेल हर."
याला दुसर्याने पुस्ती जोडली होती:
"टेल फास्ट अदरवाईज शी विल हिकप हार्डर इफ शी लर्न्स फ्रोम आउटसाईड."
हे ध्यानात आहे कारण हा प्रसंग ठळक आहे.
पण माझ्या वाचनात मात्र हिकप शब्द अशा अर्थाने आलेला नाही.
23 Sep 2021 - 8:11 am | कुमार१
धन्यवाद.
मथितार्थ समजला !
प्रत्येक भाषेचे सौंदर्य वेगळे हे खरे
दरवेळेस संबंधित प्रतिशब्द मिळतोच असे नाही.
26 Sep 2021 - 8:34 pm | Nitin Palkar
नेहमी प्रमाणेच अतिशय सुरेख, माहितीपूर्ण लेख. 'उलट बाजूने पाणी पिणे' याबद्दल मलाही शंका आली होती, सर्व प्रतिसाद वाचत येताना तिचे निरसन झाले. केवळ वैद्यकीय विषयांवरील लेखन हेच तुमचे 'होम पिच' आहे असे मात्र मला वाटत नाही. तुम्ही हाताळलेले सर्वच विषय पुरेपूर होमवर्क करून लिहिले आहेत असं मला वाटतं. खूप खूप लिहीत रहा याच शुभेच्छा/विनंती.
_/\_
26 Sep 2021 - 8:52 pm | कुमार१
नेहमीप्रमाणेच तुमच्या आपुलकीने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार !
तुम्ही म्हणताय ते खरे आहे. आरोग्य आणि ललितगद्य अशा दोन्ही प्रकारच्या लेखनाची मला आवड आहे. हे दोन्ही प्रकार माझ्या नकळत एकमेकांशी स्पर्धा करीत असतात !
वाचकांच्या उत्साहवर्धनामुळेच दोन्ही प्रकारचे लिहिण्याचा हुरूप येतो.
27 Sep 2021 - 12:39 am | गॉडजिला
कुमार सरांचा प्रत्येक लेख हा फक्त आणि फक्त होम पीचवरच असतो.. यात शंका नाही.
नाका समोर चालणारे व्यक्तिमत्व नसते तर सर्वोत्कृष्ट मिपाकर असा गौरव मी तरी नक्कीच केला असता :)
2 Oct 2021 - 7:38 am | लई भारी
4 Oct 2021 - 5:52 am | लई भारी
4 Oct 2021 - 5:52 am | लई भारी
4 Oct 2021 - 5:55 am | लई भारी
प्रतिसाद देताना खालील एरर येतेय आणि काहीच मजकूर पोस्ट होत नाही आहे.
4 Oct 2021 - 8:20 am | कुमार१
तांत्रिक समस्येमुळे तुम्हाला प्रतिसादासाठी झटावे लागलेले असले तरी तुमच्या भावना पोहोचल्या
धन्यवाद.!
2 Oct 2021 - 7:58 am | कुमार१
सर्व सहभागींचे चांगल्या चर्चेबद्दल आभार .
उचकी संदर्भातील एक वेगळा प्रकार लिहितो. शरीरातील घडामोडींमुळे लागणाऱ्या उचक्या आपण लेखात पाहिल्या. याव्यतिरिक्त मुद्दामून ‘उचक्या काढणे’ असाही एक प्रकार असतो. तो काही मनोरुग्णांत आढळतो. इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे किंवा सहानुभूती मिळवणे हा त्याचा हेतू असतो. अशा रुग्णाच्या बाबतीत डॉक्टरांना कौशल्याने त्या उचकीचा शोध घ्यावा लागतो.
यासंदर्भातील एक प्रसंग आठवतो.
असाच एक उचक्या काढणारा रुग्ण आमच्या रुग्णालयात आला होता. इतरांनी बरेच सांगून पाहिले होते. पण त्या उचक्या काढण्यात काही फरक नव्हता. शेवटी तज्ञांनी एक युक्ती केली.
तो रुग्ण साधारण अर्ध्या मिनिटाच्या अंतराने एक याप्रकारे उचक्या काढत होता. तज्ञांनी त्याला सांगितले, की तुझ्यासाठी मी एक बक्षीस ठेवणार आहे. त्याची अट अशी असेल,” तुला एकदा उचकी लागली की अजिबात न थांबता लागोपाठ १० उचक्या काढून दाखवायच्या. प्रत्येक उचकीमागे शंभर रुपये बक्षीस !”
मग काय, याचा अपेक्षित परिणाम लगेच दिसून आला. लागोपाठ उचक्या काढणे त्याला न जमल्याने त्या थांबल्या.