चिजी - बटरी पिझ्झा.
ग्रीन पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य.
(चार मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १० पाकळ्या लसूण
- १.५ इंच आलं
- ३-४ हिरव्या मिरच्या
- थोडी कोथिंबीर
- अर्धे लिंबू
- १ टी स्पून मीठ
- १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
- ५० ग्रॅम अमूल बटर
वरील सर्व पदार्थ मिक्सर वर अगदी मुलायम पेस्ट तयार होई पर्यंत वाटून घ्यावे.
टॉपिंग्ज आणि स्टफिंग साठी लागणारे साहित्य.
(एका मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
- १ मध्यम कांदा.
- १ लहानसा टोमॅटो
- १ लहानशी भोपळी मिरची
- थोडे मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे
- थोडेसे ब्लॅक ऑलिव्ह्स
- १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
- ७५ ग्रॅम मोझरेला चिज (ग्रेटेड)
१.५ चिज क्युब्स वरच्या फोटोतल्या प्रमाणे लांबट आकारात कापून घ्यावेत.
एक पिझ्झा बेस ताटात घेऊन त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून घ्याव्या आणि त्यामध्ये कापलेले चिजचे तुकडे बोटाने दाबून दाबून भरावे.
एकीकडे मायक्रोवेव्ह ओव्हन , ओ. टी. जी. किंवा इलेक्ट्रिक तंदूर जे उपलब्ध असेल ते १५ मिनिटे प्री हिट करण्यासाठी लावून, आधी आपण तयार करून घेतलेला ग्रीन पिझ्झा सॉस चमच्याने पिझ्झा बेस वर व्यवस्थित लावून घ्यावा.
आता त्यावर टप्प्या टप्प्याने कापलेला कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची, मक्याचे दाणे आणि ब्लॅक ऑलिव्ह्स पसरून घ्यावेत.
आता ह्या सर्व टॉपिंग्स वर ७५ ग्रॅम ग्रेटेड मोझरेला चिज पसरावे. (माझ्याप्रमाणे भरपूर चिज असलेला पिझ्झा खायला आवडत असल्यास १५० ग्रॅमचे पूर्ण पाकीट त्यावर ओतावे 😀)
आता हा सुशोभित पिझ्झा बेस उचलून मायक्रोवेव्ह ओव्हन / ओ. टी. जी. किंवा इलेक्ट्रिक तंदूर मध्ये बेक करण्यासाठी ठेवावा.
पिझ्झा व्यवस्थित बेक होण्यासाठी लागणारा वेळ तुम्ही वापरत असलेल्या उपकरणानुसार वेगवेगळा असू शकतो, मी पिझ्झा इलेक्ट्रिक तंदूर मध्ये बनवत असल्याने जेमतेम ५ मिनिटांत तयार होतो. (शक्यतो काचेतून आत बघत राहावे म्हणजे आपला पिझ्झा करपणार नाही)
बेक झाल्यावर पिझ्झा बाहेर काढून त्यावर एक चिज क्यूब किसून घालावा आणि आवडीनुसार त्याचे चार किंवा सहा भाग करावेत.
त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो चवीनुसार भुरभुरावे.
मस्तपैकी तयार झालेला चिजी - बटरी पिझ्झा आवडत असल्यास टोमॅटो केचप घालून सर्व्ह करावा.
टीप: बाजारात तयार मिळणारे पिझ्झा बेस पातळ (आणि शिळे ) असतात त्यात चिज भरणे अवघड असल्याने शक्यतो बेकरीत ऑर्डर देऊन ताजे बेस घ्यावेत.
प्रतिक्रिया
12 Sep 2021 - 9:44 pm | तुषार काळभोर
अशा लोकांमुळे मी ब्याऐंशी किलो वरून पंच्यांन्नव कीलोवर आलोय. :D
असं काहीतरी जीवघेणं बनवतात, वर फोटोंसह धागे टाकतात!
12 Sep 2021 - 9:47 pm | गॉडजिला
हेच.. हेच म्हणतो.
13 Sep 2021 - 12:45 pm | टर्मीनेटर
पैलवान गडी तुम्ही... अभ्याच्या मनातले "हिंद केसरी".
ब्याऐंशी, पंच्याण्ण्व चा कसला हिशोब करता? किमान एकशे पाचचे उद्दिष्ट ठेवा 😂
तो टप्पा गाठण्यास सहाय्यक ठरतील अशा काही रेसीपीज आहेत माझ्याकडे... यथावकाश शेअर करीनच 🙂 🙂
13 Sep 2021 - 8:02 pm | तुषार काळभोर
नका हो असा अन्याव करू!
14 Sep 2021 - 12:45 pm | टर्मीनेटर
अन्याय नाहि हो... हे सगळ खाउन वजन वाढ्ते ही माझ्या मते अंधश्रद्धा आहे! स्वानुभव असा आहे कि असे भरपुर चिज-बटरयुक्त पदार्थ गेली कित्येक वर्षे मी नित्यनेमाने खातोय, पण गेल्या वीस वर्षंत ७३ च्या खाली आणि ७५ किलोच्या वर वजन कधिहि गेले नाही. त्यामुळे आवडतं ते बिनधास्त खावे त्रास होत नाही असे माझे मत बनले आहे.
अजुन काहि रेसिपिज घेउन येतोच तो पर्यंत "अस्ता लुएगो!"
14 Sep 2021 - 8:54 pm | तुषार काळभोर
माझ्या पण! :D
मागच्या वर्षी टोकाचं डाएट करून ८२ किलो झालो, ते सोडलं तर मी ९०-९२ च्या घरात आहे किमान पंधरा वर्षे.
12 Sep 2021 - 10:59 pm | Bhakti
पाककृती आवडली.
13 Sep 2021 - 5:03 am | कंजूस
पाकृ छान सादर केली आहे.
13 Sep 2021 - 6:03 am | प्रचेतस
क ह र
काय हे सकाळी सकाळी अत्याचार.
13 Sep 2021 - 9:23 am | कुमार१
पाककृती आवडली.
13 Sep 2021 - 9:40 am | सरिता बांदेकर
किती छान समजावून सांगत पाककृती मांडली आहे.
अशी सविस्तर पाककृती सांगणे ही सुद्धा एक कलाच आहे.
धन्यवाद.
येऊ देत आणखी पाककृती.
13 Sep 2021 - 11:32 am | ज्ञानोबाचे पैजार
पाकृ मस्त स्टेप बाय स्टेप सांगितली आहे
बाजारात तयार मिळणारे पिझ्झा बेस पातळ (आणि शिळे ) असतात त्यात चिज भरणे अवघड असल्याने शक्यतो बेकरीत ऑर्डर देऊन ताजे बेस घ्यावेत.
किंवा घरीच लाटून पिझ्झा बेस बनवावे (अर्थात मी घरी फक्त खाण्याचे काम करत असल्याने असे म्हणणे मला फार सोपे जाते) पण घरी लाटून बनवलेल्या ताज्या पिझ्झा सारखे स्वर्गिय सुख बेकरीच्या पिझ्झा बेस मधे नाही हे नम्रपणे नमुद करतो.
पैजारबुवा,
13 Sep 2021 - 1:01 pm | टर्मीनेटर
अशाच विचाराने भारावुन एकदा घरी पिझ्झा बेस बनवण्यचा प्रयत्न करुन पाहीला होता, पण तंदुर रोटी आणि नान च्या मधला म्हणता येइल असा एक भयंकर चिवट पदार्थ जन्माला आल्याने पुन्हा कधी त्या फंदात पडलो नाही 😀
आणि नशिबाने ऑर्डर प्रमाणे अगदी चांगल्या दर्जाचे बेस बनवुन देणारी बेकरी सापड्ल्याने तसा प्रयत्न करण्याची आवश्यकताच संपुष्टात आली आहे.
शेवटी त्या गुजराती म्हणी प्रमाणे "जेनु काम तेनु थाय... बिजा करेतो गोतो खाय..." हेच खरं
13 Sep 2021 - 12:03 pm | सोत्रि
पिझ्झा हा अतिशय ओव्हररेटेड आणि ओव्हरहाइप्ड खाद्यपदार्थ आहे. ना धड चव ना धड पोषणमुल्य!
मात्र, ह्या पाकृच्या मेहनतीला सलाम _/\_
- (पिझ्झा न आवडणारा) सोकाजी
13 Sep 2021 - 1:05 pm | टर्मीनेटर
@ गॉडजिल@, Bhakti, कंजूस काका
प्रतिसादासाठी आभार 🙏
13 Sep 2021 - 1:09 pm | टर्मीनेटर
@ प्रचेतस, कुमार१, सरिता बांदेकर, सोत्रि
प्रतिसादासाठी आभार 🙏
13 Sep 2021 - 3:14 pm | वामन देशमुख
रेसिपी काय मस्त समजावून सांगितली आहे!
पिझ्झं पण अगदी चविष्ट झाला असणार.
14 Sep 2021 - 12:19 pm | टर्मीनेटर
हो चांगला चविष्ट झाला होता 😊
धन्यवाद.
13 Sep 2021 - 9:23 pm | कंजूस
कडकडीत पाव आणि वर मऊ भाज्या?
कुरकुरीत पाव आणि वर खरपूस चीज?
14 Sep 2021 - 12:29 pm | टर्मीनेटर
ते क्रस्ट वर अवलंबुन आहे.
थिन क्रस्ट पिझ्झा असेल तर बेस पातळ व नाजुक असल्याने बेस कुरकुरित आणि वरचे पातळ टॉपिंग्स मउसर असावे.
थिक क्रस्ट पिझ्झा असेल तर बेस तसा मजबुत असल्याने बेस आणि त्यावरचे भरगच्च टॉपिंग्स हे दोन्हि लुसलुशित असावे.
अर्थात आपण स्वतः बनवत असल्यास वैयक्तिक आवडी नुसार हवा तसा बदल करु शकतो!
14 Sep 2021 - 8:59 pm | मदनबाण
पिझ्झा म्हणजे माझा विक पॉइंट !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watch
15 Sep 2021 - 2:46 pm | पियुशा
सॉल्लिड!
15 Sep 2021 - 6:45 pm | तर्कवादी
ओवनचे तापमान किती असावे ?
16 Sep 2021 - 12:58 pm | टर्मीनेटर
हा थिक क्रस्ट पिझ्झा असल्याने मायक्रोवेव्ह ओव्हन २००° C (४००° F) वर प्री-हिट करुन घेतल्यास १० ते १२ मिनिटांत पिझ्झा तयार होइल, पण करपु नये म्हणुन त्यावर लक्ष ठेवणे उत्तम.
16 Sep 2021 - 12:56 pm | टर्मीनेटर
@ मदनबाण, पियुशा, तर्कवादी
प्रतिसदासाठी आभार 🙏
16 Sep 2021 - 1:09 pm | चौकस२१२
- हायला .... हिरवी मिरची आलं कोथिंबीर असा "बेस" कधी केला नाही... करून बघितला पाहिजे एकदा
जसे असा घरी पिझ्झा बनवण्यात मज्जा आहे तसेच जर त्याचा बेस पण घरी बनवला तर अजून मज्जा येते ( इष्ट चे प्रमाण जम ल पाहिजे मात्र )
एक शंका : मायक्रोव्हेव ओव्हन "प्री हिट" कसा करणार बुवा?
पिझ्झा मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये " शिजेल" "भाजला" जाणार नाही! ... .. अर्थात आजकाल मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये भाजण्याची पण सोय असेल तर गोष्ट वेगळी .
16 Sep 2021 - 1:23 pm | टर्मीनेटर
जरुर करुन बघा, टेस्ट नक्की आवडेल.
खरं आहे! माझा तो प्रयत्न फसला असल्याने मी तो नाद सोडला 😀
हे उपयोगी पडु शकेल.
धन्यवाद.
16 Sep 2021 - 3:00 pm | चौकस२१२
हा म्हणजे तुम्ही कन्व्हेक्षन माइक्रोवेव्ह ओव्हन म्हणताय ,, मग ठीक.. मी सर्वसाधारण माइक्रोवेव्ह ओव्हन बद्दल म्हणत होतो त्यात भाजले जात नाही शिजते !
16 Sep 2021 - 3:33 pm | टर्मीनेटर
करेक्टो!
धागा विषय रेसिपी पुरता मर्यादित ठेवल्याने अवांतर तांत्रिक माहिती देण्याचे टाळले आहे 😀
16 Sep 2021 - 1:20 pm | अनिंद्य
रंगीबेरंगी आणि देसी फ्लेवरचा पिझ्झा.
झकास !
16 Sep 2021 - 1:24 pm | टर्मीनेटर
धन्यवाद अनिंन्द्य साहेब 🙏