गोकुळ अष्टमी  ..स्त्रीला भेटत राहतो कान्हा

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
30 Aug 2021 - 7:16 am

कृष्णा ..सावळा..बासुरीवाला..राधेचा सखा..अगदी लहानपणापासून आपण याची अनेक रूपे पाहत मोठे होत आलो आहोत.मुलींना त्याच बासारीधारक रूप आवडतं.
लहान असताना कान्ह्याच्या रम्य नटखट गोष्टी ऐकल्या आहेत.अजूनही छोटा कान्हा माती खातो तेव्हा यशोदामय्या त्याला दरडावून तोंड उघडायला सांगते  तिला विश्वरूप ब्रम्हांड दिसते आणि तिला भोवळ येते.हि गोष्ट फार फार आवडते. कालिया मर्दन ,सखे सवंगडी जमवत लोण्यावर मारलेला डल्ला,करंगळीवर तोललेला पर्वत असो बालपण या गोष्टींनी समृद्ध झाले आहे.
गोकुळ अष्टमीला शाळा लवकर सुटायची.घरी येऊन आजीला मातीचा गोकुळ बनवायला मदत करायची लगबग असायची.आजी खूप सुरेख गोकुळ बनवायची.चौरंगावर मातीने चार भिंती,प्रवेशद्वार तयार करायचा .मग चार भाग पाडत कृष्णाच्या आयुष्याचे चार वेगवेगळे प्रसंग मातीने बनवायचे.पहिल्या भागात बालपण जन्म,दुसऱ्या भागात बाळलीला त्याचे पराक्रम,तिसऱ्या चौथ्या भागात गोकुळचे प्रसंग मातीच्या वेगवेगळ्या मुर्त्या बनवायच्या.
छोटे छोटे प्रसंग मांडताना चिखलाने भरलेले हात .ज्वारीच्या दाण्याने त्याना सजवायचे.मग सहा वाजले की,पंजरी,खिरापत कधी हातावर पडतेय अस व्हायचं.
राधा होत दांडिया खेळ.रास धरत फिरत राहाण आजपण राधा बनण्याचा मोह आपण सोडू शकत नाही.
थोड मोठ झाल की कृष्णसखी समजायला लागते.”राधे कृष्ण” म्हणताना राधेचे नाव आधी का ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समजते.प्रेमाची तल्लीनता अनुभवायला मिळते.प्रेमात वाहून जाणे,रासक्रीडा सार सार काही आनंद देत. राधा कृष्ण हे नात अमर आहे.त्याची पवित्रता प्रेमाला चारचांद लावते.
आई झाल्यावर इतक्या दिवस न कळलेली यशोदा समजते.कृष्ण किती भाग्यवान आहे.वात्सल्याच्या दोन मूर्तिमंत  “यशोदा-देवकी” माता त्याला लाभल्या.जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणारी यशोदा आवडायला लागते.निरागस माया लावणे हेच आईपण आहे.आई होताना “कृष्णाचा फोटो रोज पाहत जा,असे हसरे बाळ होईल” म्हणून प्रत्येकीने नऊ महिने हा फोटो मनात जपला असतो.

या जगात कसे वागायचे,संकटांवर,कपटीपणावर कशी मात करायची.याचे न कळत  संस्कार महाभारत आपल्या आणि येणाऱ्या पिढीला देत आला आहे.गीतेचे अध्याय आपल्या मुलांना शिकवताना आपणही पुन्हा घडत राहतो.
गोकुळकाल्याला मटकी फोडणाऱ्या साहसी मुली पाहिल्या की साहसाचे बाळकडू मुलींना देणे किती गरजेचे आहे याच भान येत.
असा कान्हा भेटतो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या रुपात,पूजन करीत राहुया.
“देवकी का पुत्र कान्हा
यशोदा घर सजाये
गिरिधर मुरली बजावे
सांज तटपर राधाको बुलावे
पुकारो मनसे तुम जब जब
पाप को मिटाने आये तब तब”
-भक्ती
गोकुळष्टामी २०२०.

मुक्तक

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Aug 2021 - 7:56 am | कंजूस

छोटेसे छान स्फुट.
मातीचे गोकुळ हे नवीन आहे. हे ऐकले नव्हते.
लहानपणी आवडणारे दोन देव म्हणजे कृष्ण आणि मारुती. जिथे दैवताचा कडकपणा नाही, भीती नाही आणि प्रसाद नक्की.

Bhakti's picture

30 Aug 2021 - 12:47 pm | Bhakti

अपलोड होत नाहीये, ब्लॉगची लिंक देतेय, शेवटी मागच्या वर्षीचा मोठ्या घरचा फोटो आहे.चार भाग आणि कृष्णाच्या आयुष्यातले लहानपणीचे प्रसंग मातीच्या साहाय्याने केले आहेत.

शाम भागवत's picture

30 Aug 2021 - 8:10 am | शाम भागवत

लेख आवडला.
आतून आलाय असं वाटलं.
🙏

कुमार१'s picture

30 Aug 2021 - 8:30 am | कुमार१

नेहमीप्रमाणेच छान भक्तीमय लेखन

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2021 - 9:54 am | प्राची अश्विनी

वाह! प्रसन्न वाटलं वाचून.

छान लिहलंय... आज महाराष्ट्रात दहीहांडी साजरा होत नाही, कारण सरकार परवानगी देत नाही. उत्साह आणि आनंदाच्या सोहळ्याला मुकलो असे फार वाटते.
दर वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहणे आणि जमल्यास फोटो काढणे होत असे, आता ते नाही. :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Bhagavad Gita Chapter 2 (Full) | The Teaching In Brief | Sankhya Yoga

Bhakti's picture

30 Aug 2021 - 12:44 pm | Bhakti

सर्वांचे आभार!
मदनबाणजी फोटो छान आहेत.

रंगीला रतन's picture

30 Aug 2021 - 1:00 pm | रंगीला रतन

छान लिहिलंय.

कंजूस's picture

30 Aug 2021 - 1:16 pm | कंजूस

ही कृष्णाची मावशी लागते दुरून. असं वाचलंय.

प्रचेतस's picture

30 Aug 2021 - 1:30 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
बाकी वास्तविकरित्या राधा ही महाभारतात, हरिवंशात, भागवतात नाही, जयदेव कवीने 'गीतगोविंद' द्वारे राधेला कृष्णसखी बनवले तिचा पगडा मात्र जनमानसावर अजूनही आहे.

नागनिका's picture

31 Aug 2021 - 11:01 am | नागनिका

साधारण ७व्या शतकातील साहित्यामधून राधेचा उल्लेख केलेला आढळतो. तो हि प्रतीकात्मक भक्तिरूप म्हणून. पण मनुष्यरुपात राधा कधी आली ते नाही सांगता येत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Aug 2021 - 2:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

देवकी वसुदेव बंदीमोचन त्वा केले
नंदाघरी जाउनी निजसुख गोकुळा दिधले
गोरस चोरी करीत नवलक्ष गोपाळ मिळवीले
गोपिकांचे प्रेम पाहुनी श्रीकृष्ण भुलले

श्रीकृष्णाची आरती म्हणताना या श्रीकृष्णाचा बरेच दिवस हेवा वाटायचा , कारण चौफेर प्रेम प्राप्त झालेला हा एकमेव देव आहे,

पैजारबुवा,

Bhakti's picture

30 Aug 2021 - 5:19 pm | Bhakti

सर्वांचे आभार
चौफेर प्रेम प्राप्त झालेला हा एकमेव देव आहे
...हो :)

गॉडजिला's picture

31 Aug 2021 - 4:44 am | गॉडजिला

-भक्ती
गोकुळष्टामी २०२०.

इथे २०२१ हवे होते. बाकी लेखन सुरेख. लिहीत रहा...

हो की असाच भेटत राहिल कान्हा जन्मभर कशाला पाहिजे वर्षाच लेबलं :)

तर्कवादी's picture

1 Sep 2021 - 11:33 pm | तर्कवादी

हे Tokyo 2020 सारखं झालं :)

Bhakti's picture

2 Sep 2021 - 9:21 am | Bhakti

हे हे :)

Bhakti's picture

31 Aug 2021 - 5:53 am | Bhakti

रंग सावळा तव कांतीचा
परि मुखी हास्य
उजळले शतसूर्यांचे...

सखा,प्रेमी,मुक्तीस्थान
माझे इवलेसे तू घर...

तुझ्या या सौंदर्याला मी शरणागत
व्यापला कण कण
ज्याने काळाच्या वाळूचा...
-भक्ती
(अनुवादित)

टर्मीनेटर's picture

31 Aug 2021 - 10:57 am | टर्मीनेटर

छानच लिहिलंय!
वरती कंजूस काकांनी लिहीलंय तसे मातीच्या गोकुळाबद्दल मी पण पहिल्यांदाच वाचतोय, ते बघण्यास ऊत्सुक असल्याने त्याचा फोटो द्याच अशी आग्रहाची विनंती.

नागनिका's picture

31 Aug 2021 - 11:04 am | नागनिका

साधारण ७व्या शतकातील साहित्यामधून राधेचा उल्लेख केलेला आढळतो. तो हि प्रतीकात्मक भक्तिरूप म्हणून. पण मनुष्यरुपात राधा कधी आली ते नाही सांगता येत.

सर्वांचे आभार! तूर्तास हा फोटो देतेय यात कृष्णाची मातीने हाताने बनववलेली बाहूली आहे व ज्वारीच्या दाण्यांची टोप व इतर सजावट आहे.त्याला पाळण्यात झोपवले असून यशोदा त्याला झोका देते आहे हा प्रसंग आहे.मातीची दोरीपण आहे.
पलीकडे कालिया नाग आहे.असे पुतना वध,गोकूळ गवळणी प्रसंग या साध्याशा​ मुर्ती चौरंगावर बनवून सायंकाळी सहा वाजता पुजा करतात.
A

छान आहे पण एका फोटोने समाधान झाले नाही 😀 चारही भाग बघायचे आहेत! शक्यतो लवकर फोटो द्या…

गणेशा's picture

31 Aug 2021 - 8:49 pm | गणेशा

छान लिहिले आहे..
मातीचे वगैरे माहित नव्हते.. पाहिल्यान्दा कळाले

Bhakti's picture

31 Aug 2021 - 10:12 pm | Bhakti

धन्यवाद गणेशा!

टर्मीनेटर's picture

31 Aug 2021 - 11:01 pm | टर्मीनेटर

गणेशाभाऊ आज खुप दिवसांनी दिसलात… सब कुशल मंगल?

S
भाग एकमध्ये कृष्णजन्म
भाग दोनमध्ये यशोदा पाळण्यात त्याला झोपवतेय
तीनमध्ये पुतना वध
चारमध्ये गोकूळमधील हंड्या,पाटा वरवंटा इतर भातुकली (जी नंतर मुलांना खेळायला मिळायची)
चार चौकटीमध्ये जी मोकळी जागा आहे ती यमुना नदी आहे,त्यात कालिया दाखवला आहे.
यातल्या दोन मूर्ती कोणत्याही कपाटात वा धान्यात ठेवल्या असता भरभराट राहते असा समज आहे.
गेली ५-६ वर्षे मी गोकूळ पाहिलाही नाही आणि केलाही नाही.

प्रचेतस's picture

1 Sep 2021 - 9:10 am | प्रचेतस

मस्त आहे हे.

खेळ आहे. विरंगुळा ही.
या फोटोमुळे गंमत वाढली.

-----------------------
लहानपणी मी मातीचा गणपती करत नसे कारण तुटला तर भीती. मग मारुती केलेले. मातीमध्ये जुना कापूस मळून ( तुटु नये म्हणून) द्रोणागिरी नेणारा उडणारा मारुती. चार इंच *चार इंच चौकोनावर ते उठावदार चित्र, गेरूने लाल रंगवलेले आणि भिंतीवर टांगायला एक कडी. बहिणीकडे बरेच वर्ष होता.

दुसरं एक म्हणजे मातीचा नाग श्रावणातल्या नागपंचमीसाठी. नागाच्या उभारलेल्या फण्यात स्प्रिंग टाकायचो. त्यामुळे तो डोलत राहायचा.

मजा.

सुमो's picture

1 Sep 2021 - 7:14 pm | सुमो

तुम्ही भक्ती.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहोळा आठ दिवस साजरा केला जातो आमच्या घरी. तुम्ही म्हटलंय तसं मातीचं गोकुळ, त्यात एक उखळाला बांधलेला कान्हा, गोपिका, बलरामदादा (हे नेहमी झोपलेलेच दाखविले जातात), गाय वासरू अशा मातीच्या मूर्ती करुन त्यासभोवती पाना फुलांची सजावट केली जाते. गोकुळपूजन करून जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी त्याचं नदीमधे विसर्जन केलं जातं.

पूर्वी सम्पूर्ण मातीचं बनवलं जायचं गोकुळ. आता मात्र काही तयार चित्रं ठेवतो. कालाय तस्मैं नमः

या वर्षीच्या गोकुळाष्टमीचे हे काही फोटो.

१. गाभारा

२. गोकुळ

३. गोकुळ -२

४. राधाकृष्ण

५. पाळणा

गॉडजिला's picture

1 Sep 2021 - 7:40 pm | गॉडजिला

देवालय बांधीयले सुंदर,
कलाकुसरी ही साकार,
मुख्य पाहावा तो कळस, हो कळस, कsळssसsss
पिका आला ब्रम्ह रस....

सुंदर मूर्ती... कुठे आहे हे मंदिर?

शाम भागवत's picture

1 Sep 2021 - 7:35 pm | शाम भागवत

🙏
🙏
🙏
🙏
🙏

कंजूस's picture

2 Sep 2021 - 9:45 am | कंजूस

आवडले फोटो आणि उत्सव.