चोर आले तर ? ( बालकथा )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विजूने डोक्यावरचं पांघरूण बाजूला केलं ,तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते . त्याचा विश्वासच बसेना. कारण एवढा वेळ काका त्याला काही झोपू देत नसत . ' मग काका ? '
आईने हाक मारली " उठला का विजूराजा ? "
“ हो आई . काका कुठे आहेत गं ? "
काकू आईबरोबर होती . तिला हसू आलं. ती म्हणाली , “ विजूराजा , आज तुझी मज्जा ! काका आणि बाबा गेले आहेत दुसऱ्या गावाला. पण काकांनी तुला अभ्यास दिलाय बरं .”
विजूचं घर शेतात होतं. ते सगळे एकत्र रहायचे . विजू सगळ्यांचा लाडका होता . अगदी काकांचासुद्धा. फक्त काका कडक होते एवढंच .
दिवाळीची सुट्टी संपत आली होती. अजून त्याला खूप मजा करायची होती. बाबा आणि काका उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी येणार होते.
हवेत गारवा होता. थंडीचा वास येत होता जणू. त्याने आवरलं . मित्रांची घरं लांब होती . तरी त्यांच्याकडे जाऊन तो खूप खेळला .
दुपारी जेवण झाल्यावर त्याला वाचायची लहर आली . बाबांनी एक मुलांचा दिवाळी अंक आणला होता . तो अंक घेऊन विजू खिडकीजवळ वाचायला बसला . सुट्टी असूनही काकांनी केस बारीक करायला लावले होते . त्यावरून हात फिरवत तो वाचू लागला. पुस्तक वाचण्याची वेगळीच मजा असते . तो वाचनात गुंगून गेला .
हवा छान होती. लांबवर त्यांचं शेत दिसत होतं . बांधावरचं वाकलेलं आंब्याचं झाड दिसत होतं . खूप लांबवर दुसरी घरं . त्यामागे निळे- जांभळे , धुरकट डोंगर . एका घरामागून धूर येत होता . पांढरा पांढरा . आकाशाकडे वेटाळत जाणारा . मूड बनवणारंच ते वातावरण . मग अशा वेळी डोकं पळायला लागतं .
वाचताना त्याचे डोळे लकाकले . काय असावं त्या पुस्तकात असं ?
बर्गलर अलार्म !
त्या अंकात मुलांना करण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या होत्या . त्यामध्ये एक होता , बर्गलर अलार्म . बर्गलर म्हणजे घरात घुसणारे चोर . ते आल्याची सूचना देणारं यंत्र . ते बनवायच्या कल्पनेने तो झपाटला आणि कामाला लागला .
सोपा होता तो अलार्म. एका बाजूला आवाज करणारी झाकणं, भांडी वगैरे लावायची . त्याला एक दोरी बांधायची . ती दोरी दुसऱ्या बाजूला न दिसेल अशी लावायची . येण्याच्या वाटेत . कोणी आलं तर त्याला ती दोरी दिसणार नाही . तो तिला अडखळणार. मग ती ओढली जाऊन भांडी पडणार . मोठा आवाज होणार. चोर दचकणार अन घरातल्या लोकांना सूचना मिळणार .
भारी !
त्याने अंगणातल्या फाटकाला ती व्यवस्था केली. तेलाचे रिकामे ,पत्र्याचे चौकोनी डबे रचले . डब्यांची भिंतच जणू. त्याला दोरी बांधून ती त्याने पलीकडच्या बाजूला दगडाला बांधली . झाला अलार्म तयार . किती सोपा !
आता त्याला त्याची ट्रायल घ्यायची होती . तोच मनी पळत आली. तिच्यामागे मोत्या. धडपडला की तो शहाणा . की ती दोरी ओढली गेली अन धाSSड ! पण एक झालं . ट्रायल भारी झाली. कारण मोत्याने तर विजूलाही पाडलं .
धडधड करत सगळे डबे पडले. काहीतर विजूच्या अंगावर . एवढ्या मोठ्या आवाजाने आई दचकली,ओरडली. काकू तोंडाला पदर लावत हसली .
मग विजूचं टाळकं फिरलं . तो मोत्याच्या मागे लागला . तो पळाला गोठ्यात. विजू त्याच्या मागे. मनी गेली पत्र्यावर , तर मोत्या गायीच्या चार पायांखालून दुसऱ्या बाजूने बाहेर पळूनही गेला . त्याने त्याचा नाद सोडला .
पण गोठ्यामुळे त्याच्या डोक्यात वेगळीच आयडिया आली .
नुसती आयडियाच नाही तर भीतीसुद्धा !
आपल्या घरीही चोर येऊ शकतात . आले तर ?... आपल्या जवळपास दुसरी घरं नाहीत. आज बाबा आणि काकाही नाहीत . ते उद्या येणार . बाप रे ! आपल्यालाच काहीतरी करावं लागणार. आईची आणि काकूची जबाबदारी आता आपल्यावर आहे .
त्यात गावाकडचं घर . रस्त्यावर दिवे वगैरेचा पत्ताच नव्हता .
त्याने त्याचा तो अलार्मचा सगळा उद्योग पूर्ण केला तेव्हा अंधार पडला होता . आईचा अर्धा स्वयंपाक झाला, त्याच वेळी दिवेही गेले . काळाकुट्ट अंधार अन शांतता . ती शांतता भेदणारी लांबवर एखादी कोल्हेकुई .
दिव्याच्या प्रकाशात त्यांच्याच हलणाऱ्या सावल्या भीतीदायक वाटत होत्या . काळ्या- काळ्या , हलणाऱ्या सावल्या . त्यात काकूची सावली भली मोठी !
मोबाईलचा टॉर्च होता . पण आई म्हणाली की तो फार वापरू नको म्हणून .
जेवणाची तयारी करताना आई काकूला म्हणाली , " अगं , खूप उशीर झाला . आता हे येत नाहिसं वाटतंय ".
जेवणं झाली . अंथरूणं पडली . विजू आईच्या कुशीत शिरला .
त्याला आता भुतांची गोष्ट ऐकायची होती . निदान चोरांची तरी ! पण छे ! काकू कुठलीतरी पंचतंत्रातली गोष्ट सांगू लागली .
काकूची गोष्ट ऐकता ऐकता तो झोपून गेला . गाढ ! आता समजा चोर आले , त्याचा तो अलार्म वाजला , तरी तो काही उठणार नव्हता !
अशा वेळी अंधारात दोन काळ्या आकृत्या त्यांच्या घराच्या दिशेने येत होत्या . भीती वाटेलशा . छातीत धडधड वाढवणाऱ्या अशा . एक आकृती तर भली दांडगट होती. त्यांनी तोंडं फडक्याने बांधलेली होती . त्यांच्या हातामध्ये सोटे होते .
दरोडेखोर ?...
त्यातल्या एकाने फाटकाचं दार ढकललं , तो काय ? छे छे छे ! वरून शेणाने भरलेलं गाडगं त्याच्या अंगावर उपडं झालं. गारगार हिरवं ओलं शेण ! अंधारात रंग दिसत नसला तरी वास काय लपतोय होय ? ती व्यक्ती शेणाने भरली . अन ते शेण झटकायला नाचत सुटली . वाकून थू थू करू लागली.
दुसऱ्या व्यक्तीने पूर्ण दार ढकललं आणि पत्र्याचे डबे दणादणा आवाज करत तिच्या डोक्यावर ,तिच्या अंगावर पडले . अंहं ! एवढंच नाही त्या डब्यातली माती आणि त्यातल्या लाल लाल मुंग्यासुद्धा . त्या कडकडून चावू लागल्या . वाट्टेल तिथे वाट्टेल तशा .
अन त्या मुंग्या झटकायला ती व्यक्तीही नाचत सुटली . हवेत हातवारे करू लागली .
एवढ्या शांततेत ,एवढ्या भयंकर आवाजाने आई आणि काकू उठल्या . घाबरलेल्या ! काकूने विजूच्या अंगावर हात ठेवला . त्याही परिस्थितीत . तो उठू नये म्हणून .
पुढे काय घडणार होतं ? देवाला माहिती .
पण आले ते चोर नव्हते . ते बाबा आणि काका होते. थंडीमुळे दोघांनी तोंडाला मफलर बांधला होता . अन रात्रीची वेळ म्हणून हातात सोटे बाळगले होते .
बाबांनी मफलर फेकला. त्याला मुंग्या होत्या . काकांनी मफलर फेकला . त्याला शेण होतं. ते आत आले ,ओरडले . तेव्हा त्यांना विजूची करामत कळली.
“उद्या बघतोच तुमच्या विजूराजाकडे “, काका कडाडले . पण तो तर मजेत झोपला होता . अलार्मपेक्षा काकांचा आवाज दणक्या होता. पण विजू तो कुठला ऐकायला ?
त्यावर आई आणि काकू तोंडाला पदर लावून हसत सुटल्या .आवाज न करता . नशीब ! अंधारात काकांना ते दिसलं नाही …
----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
23 May 2021 - 6:38 pm | कुमार१
छान आहे
23 May 2021 - 6:38 pm | बिपीन सुरेश सांगळे
मंडळी ,
सध्याच्या वातावरणात एक बदल म्हणून ही हलकीफुलकी कथा देतोय.
मुलांसाठी तरआहेच पण मोठ्यांनीही आनंद घ्यावा .
आभार
24 May 2021 - 4:47 am | सोन्या बागलाणकर
मस्त !
हलकीफुलकी कथा आवडली.
23 May 2021 - 6:40 pm | बिपीन सुरेश सांगळे
कुमारजी
इतक्या फास्ट प्रतिक्रिया पण
ग्रेट
अन आभार
23 May 2021 - 7:37 pm | गॉडजिला
=))
23 May 2021 - 11:18 pm | सरिता बांदेकर
मस्त. मला लहान मुलांच्या कथा वाचायला नेहमीच आवडतात.
मजा आली वाचताना.
24 May 2021 - 9:00 pm | बिपीन सुरेश सांगळे
कुमार
सोन्या
गॉडजीला
सरिता
खूप आभार
24 May 2021 - 10:13 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्त, खुसखुसीत !
👱
बिपीन सांगळे, बालकथात चांगलाच हातखंडा आहे !
24 May 2021 - 10:14 pm | विजुभाऊ
मस्त आहे गोष्ट. खूप आवडली.
आम्ही असा प्रयोग शाळेत असताना केला होता.
वर्गाचे दार अर्धवट लावून दारावर केरसुणी ठेवली होती. दार उघडून कोणी आले तर त्याच्या अंगावर केरसुणी पडेल अशी व्यवस्था होती.
आमचे दुर्दैव म्हणजे आमचे गणीताचे सरच वर्गात आले. आणि त्याम्च्या अंगावर केरसुणी पडली.
तो तास अख्ख्या वर्गाला उभे राहून शिकावा लागला.
24 May 2021 - 10:58 pm | Bhakti
गोष्ट छान आहे.
डोळ्यासमोर उभी राहिली अगदी :)
25 May 2021 - 12:28 am | श्रीरंग_जोशी
बालकथा आवडली. या निमित्ताने किशोर मासिकात लहानपणी वाचलेल्या कथा आठवल्या.
25 May 2021 - 1:14 pm | बिपीन सुरेश सांगळे
चौथा कोनाडा
विजुभाऊ
भक्ती
श्रीरंग
खूप आभार
25 May 2021 - 1:19 pm | बिपीन सुरेश सांगळे
विजुभाऊ
आभारी आहे .
तुम्ही धमाल प्रसंग सांगितला
त्या क्षणासाठी डेंजर प्रसंग आणि आता साठी छान विनोदी प्रसंग
किती मजा असते शाळेच्या वयात .
एखादी गोष्ट कोणाला कशी रिलेट होईल , याचीही मजा वाटते . कळावे
25 May 2021 - 2:56 pm | सिरुसेरि
मस्तच .
25 May 2021 - 5:09 pm | सौंदाळा
छान गोष्ट,
लहानपणी गोट्या सिरियल होती त्यात पण अशा गमतीजमती होत्या. नंतर अल्फा मराठीवर नायक, दे धमाल या पण मस्त होत्या.
रविवारी वर्तमानपत्रात पुरवणीत पण मस्त गोष्टी असायच्या.
आता अशा गोष्टी, सिरियल्स का बनत नाहीत? असो
लिहित रहा.
26 May 2021 - 1:55 am | शलभ
आवडली गोष्ट.
26 May 2021 - 7:12 am | चित्रगुप्त
गोष्ट मजेशीर आहे, मुख्य म्हणजे खरोखरच लहान मुलांना सांगण्यासारखी आणि त्यांना समजेल, मजा वाटेल अशी आहे. नाहीतर मी मागे पुण्याहून मुद्दाम बालसाहित्य म्हणुन आणलेली बहुतांश पुस्तके नीरस, बोजड भाषेतली होती आणि "लाकुडतोड्या त्या राजकन्येवर मोहित झाला. त्याला काही सुचेनासे झाले रात्रंदिवस तो तिच्याच विचारात राहू लागला" छाप गोष्टी त्यात होत्या. "थ्री मस्केटियर्स" चे भाषांतर तर इतके भिकार होते की मला वाचवले सुद्धा गेले नाही. असो.
मात्र या कथेतले "मूड बनवणारंच ते वातावरण" हे बालकथेत विसंगत वाटणारे वाक्य जरा खटकले.
26 May 2021 - 7:24 am | चित्रगुप्त
"पुण्याहून आणलेल्या पुस्तकांबद्दलचा आमचा वरील प्रतिसाद हा वस्तुस्थितीवर आधारित असून त्यात पुणे (पिंपरी-चिंचवडसकट) किंवा/आणि पुणेकर यांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही. तीच पुस्तके आम्ही डोंबिवली, नागपूर, बेळगाव, खामगाव, चाळिसगाव, सोलापूर, नाशिक वगैरेहून आणली असती तरी असेच लिहीले असते. (उगाच भावना दुखावल्या वगैरे गळे काढू नयेत.)- - आज्ञेवरून.
4 Jul 2021 - 1:15 pm | चौथा कोनाडा
चित्रगुप्त साहेब ....
हा .. हा .... !
सही पुणेरी पाटी !
26 May 2021 - 8:35 am | कॉमी
बालकथा छान आहे. लाल मुंग्या लै डेंजर खरं. अलर्जीक रिऍक्शन येऊ शकते.
17 Jun 2021 - 11:22 pm | गणेशा
वा मस्त गोष्ट...
मुलीला वाचुन दाखवली..
खुप आवडली तिला...
3 Jul 2021 - 11:34 pm | बिपीन सुरेश सांगळे
सिरुसेरी
सौंदाळा
शलभ
चित्रगुप्त
कॉमी
गणेशा
आभारी आहे