एक सूचना - सध्याच्या काळात , नकारात्मक , कोरोनाची पार्श्वभूमी असलेलं लेखन वाचू नये असं वाटू शकतं . त्यांनी कृपया ही कथा वाचू नये .
----------
जोडीदार
---------
रूमवर लोळत पडलो होतो. बाकीची पोरं लॉकडाऊनला कंटाळून घरी गेलेली . उन्हाळ्याची दुपार . गरमीने नुसता जीव चाललेला . वर पंखा नावालाच फिरत होता . वारंच लागत नव्हतं .
एकटं पडल्यासारखं वाटत होतं .
पश्याचा फोन आला . लय जुना रूममेट . त्याचं नाव स्क्रीनवर बघून जीवाला बरं वाटलं .
आणि मग डोकं फिरलं !...
त्याने एक निरोप दिलेला. त्याचा एक मावसभाऊ याच शहरात राहायचा. त्याची आई गेलेली . मदतीला कोणी नाही अन अशावेळी कोणी येतही नाही . म्हणून मला जायला सांगितलं होतं .
आता आली का पंचाईत !
तसा मी स्मशानभूमीत बऱ्याचदा गेलेलो आहे . पण मुळात तिथे जायलाच नको वाटतं - ते काय कॉलेज कॅन्टीन असतं का तरुण पोरा-पोरींनी भरलेलं ? आणि आत्ता या परिस्थितीत तर नकोच वाटतं . त्यात कोरोनाची भीती !
नाईलाजाने उठलो . मनात म्हणालो - पश्याचा भाऊ म्हणजे आपली आवडती मैत्रीण आहे असं समजू .
खरं तर मी पश्याच्या भावाला कधी भेटलो नव्हतो की त्याचा नंबर माझ्याकडे नव्हता . पश्याने माझा नंबर त्याला दिला होता .
परत पश्याचा फोन आला , ' डायरेक्ट स्मशान भूमीतच पोच . ते अजून अर्ध्या-एक तासाने तिथे येतील . ‘
आता थेट तिथेच जायचं तर मग मी कशाला पाहिजे ? तिथे माझी काय मदत होणार ? ... पण म्हणलं जाऊ दे . सध्या लोक मयतालाही येत नाहीत . जवळचेसुद्धा लोक टाळतात , घाबरतात जिवाला . काय करणार ? जो गेला तो सुटतो बाकीचेच अडकतात .
मी निघालॊ . रस्ते सामसूम . माणसंच नाहीत . रस्त्यांवर स्मशानशांतता .
स्मशानभूमी लांबूनच लक्षात येत होती .साऱ्या परिसरात धूरच धूर ! साला ! किती बॉड्या जळत असतील ? ...
ते आत गेल्यावर कळलं .
त्या वर वेटाळत पसरणाऱ्या धुराकडे पाहून डोक्यात काहीबाही वाटायला लागलं . स्पर्धा परीक्षांमुळे डोक्यात इतिहास घोळत असतो . आपल्या देशात कधी काळी सोन्याचा धूर निघायचा अन आता ? ...
आत गेलो तर हे गर्दी ! एकदम माणसात आल्यासारखं वाटलं . माणसात ? ... की ?
नकोसा वाटणारा घाण आवाज करत , सतत येणाऱ्या अँब्युलन्स , त्यांचे फटाकफट दार उघडण्याचे , स्ट्रेचर खाली ठेवण्याचे आवाज .
कुठे नातेवाईकांचे आक्रोश तर कुठे सुकलेले अश्रू . नातेवाईक कमी असले तरी बॉड्याच एवढ्या की स्मशानभूमी भरून गेलेली . लसीकरणाला वेटिंग तसं इथं जाळून घ्यायलाही वेटिंग ! ... जे जिवंतपणी तेच मेल्यानंतरही ! ...
संध्याकाळ वाढत चाललेली . वर झाडांवर वटवाघळं . घराकडे परतणारी पाखरं . कावळ्यांची कावकाव . पण ती पाखरं स्थिर नव्हती . धुरामुळे त्यांना नको होत असावं . पण आपलं घरटं सोडून ती जाणार तरी कुठे ?
कोरोनामुळे माणसं घरात दडली होती . अन त्याच कोरोनामुळे ह्या पाखरांना घर सोडावं लागणार होतं .
मी एका जागी बसून कंटाळलो . हा पश्याचा भाऊ कुठं मेला होता कोणास ठाऊक ? आपल्या तोंडात हे असे शब्द बसलेले असतात , कुठे मेलाय ? - पण त्या जागेत माझे ते शब्द मलाच आवडले नाहीत .
पुढे गेलो . एक तरुण मुलगी . एकटीच . रडणारी .तिला विचारलं, तर म्हणाली ," आई गेलीये . वडील दवाखान्यात आहेत . मदतीला कोणीच येत नाही . पण इथली व्यवस्था स्वयंसेवक बघताहेत . "
मी सुन्न होऊन पुढे गेलो . भिंतीवर रंगवलेले तुकाराम महाराज अन त्यांचे अभंग दोन्ही काळवंडलेले होते . पण माणुसकी अजून पूर्ण काळवंडलेली नव्हती . बऱ्याच संस्था कामासाठी पुढे सरसावलेल्या .
कट्ट्याला टेकून एक आजोबा एकटेच बसलेले. पांढरी गांधी टोपी. पांढरंच धोतर . नजर शून्यात , कसंतरीच झालं म्हाताऱ्याकडे बघून . आज्याचीच आठवण झाली .
मी जवळ गेलो , म्हणालो , " बाबा " .
त्याने नजर वर उचलली .
" काही मदत पाहिजे का ? "
" नगं , काय नगं ".
" कोण गेलंय तुमचं ? "
" आमची मंडळी गेली दादा, " त्यांनी लांबवर बोट दाखवलं, " संस्थेचे लोक करत्यात सगळं ” . त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं ," शेवटच्या टायमालाबी कोणच नाय ! "
मी म्हणालो , " बाबा, रडू नका , तुम्ही तरी आहात ना ! "
" मला तर यायलाच लागणार . माझी मंडळी म्हंजे जन्माची जोडीदार . शेवटपर्यंत साथ द्यायलाच हवी ना . "
मला पुढे काय बोलावं ते सुचेना .
तेच पुढे म्हणाले , "आत्ता दोन आठवड्यांपूर्वी मी गेलो ,त्या टायमाला ती आली होती . आता ती गेली तर , मला तर यायलाच हवं ना ! " ...
=\=\=\=
प्रतिक्रिया
11 May 2021 - 10:14 am | आनन्दा
धक्का भारी होता.
11 May 2021 - 10:27 am | Bhakti
हो ना..किती आत्मे असेच अतृप्त फिरत असतील.
11 May 2021 - 3:16 pm | वकील साहेब
जबरदस्त
11 May 2021 - 8:43 pm | बिपीन सुरेश सांगळे
आनंदा
भक्ती
वकील साहेब
आणि इतर वाचक
धन्यवाद
11 May 2021 - 9:15 pm | भीमराव
रुम वरचा पोऱ्या पण भुत आहे, ती पोरगी पण भुतं आहे, पशा पण मेलाय. संस्थेची माणसं तेवढी जिवंत आहेत.
11 May 2021 - 9:35 pm | तुषार काळभोर
आपल्याला दिसत नाही, या अज्ञानात सुख मानायचं.
12 May 2021 - 9:48 pm | बिपीन सुरेश सांगळे
मंडळी
लेखनाचा आनंद आहे पण विषयाचा नाही .
काही विचित्र संवेदना ...
12 May 2021 - 9:48 pm | बिपीन सुरेश सांगळे
तुषार
आभारी आहे
12 May 2021 - 9:49 pm | बिपीन सुरेश सांगळे
भीमराव
आभारी आहे
फक्त एक - आपली प्रतिक्रिया नीटशी कळली नाही .
13 May 2021 - 10:09 am | चौथा कोनाडा
खतरनाक ..... !
😨
13 May 2021 - 6:44 pm | सौंदाळा
लिखाण अत्यंत वास्तवदर्शी
धूर, पाखरं, काळवंडलेले अभंग वगैरे वर्णन वाचून अगदी परीस्थिती डोळ्यासमोर उभी राहीली.
पण खरं सांगु शेवटचा धक्का आवडला नाही. लेख इतका प्रत्ययकारी आहे की या कलाटणीची माझ्या मते तरी गरज नव्हती.
15 May 2021 - 10:09 am | संजय पाटिल
मलाही असेच वाटते....
13 May 2021 - 11:08 pm | सुरिया
अप्रतिम लेखन
14 May 2021 - 10:32 am | शानबा५१२
मानलं!
14 May 2021 - 9:32 pm | बिपीन सुरेश सांगळे
चौथा कोनाडा
सुरिया
शानबा
आणि सौंदाळा
आभारी आहे .
14 May 2021 - 9:35 pm | बिपीन सुरेश सांगळे
सौंदाळा
आभारी आहे .
अन थोडा सहमत ही
तुम्ही म्हणता त्या पद्धतीनेही कथा उभी राहू शकली असती .