शब्द तोकडे पडले
डोळ्या पाणी दाटले
भावनांची उंची मोठी
शब्द ओठीच थांबले
पसरली शांती चहूकडे
कोलाहल माजला
मना मनाच संवाद
मनाशीच ग थांबला
अशांत ही मने
फक्त डोळे बोलके
पाऊल झाले जड
पडे हलके हलके
लेक चालली सासुरी
शब्द तोकडे पडले
आई बापाच्या मनातले
बासुरीचे सुर
होते तिथेच थांबले
८-१२-२०
प्रतिक्रिया
27 Apr 2021 - 11:29 pm | रंगीला रतन
सुरेख!
27 Apr 2021 - 11:46 pm | श्रीगुरुजी
सुंदर कविता आहे. भावना छान मांडल्या आहेत.
परंतु कन्यादान हा शब्द अजिबात आवडत नाही. पोटची कन्या ही दान म्हणून देणे किंवा तसा उल्लेख करणे अयोग्य आहे.
28 Apr 2021 - 11:23 am | गॉडजिला
विचार करण्याजोगी बाब तर आहे पण मग पर्यायी शब्द काय असु शकतो ?
21 May 2021 - 3:54 pm | कर्नलतपस्वी
कन्यादान हा शब्द कन्या + दान नसून कन्या + आदान आसा आहे कुठेतरी वाचले होते. आदान एक संस्कृत शब्द आहे आणी त्याचा अर्थ म्हणजे ग्रहण करणे आसा आहे.
मी माझ्या कन्येचा इतके दिवस समाजीक रितीभाती प्रमाणे संभाळ केला आता तुम्हाला तीचा हात देत आहे तो ग्रहण करावा. जसा मी तीचा प्रेमाने, आदरपूर्वक लालन पालन केले तसे तुम्ही पण करावे आणी दोघांनी मिळून समाज उद्धारासाठी पुढील आयुष्य व्यतीत करावे. असा या विधी मागचा उद्देश असावा.
बदल हा प्रकृतीचा स्थाई भाव आहे. समय बदलला समाज बदलला. पुरूष प्रधान संस्कृती मध्ये पण बदलाव आला. मुली आत्मनिर्भर होऊ लागल्यात. शब्दांचा अर्थ आणी संधी विच्छेदन यामुळे मुळ अर्थ आणी भावना बाजुला झाली व कन्यादानाला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला.
कन्या ही अर्जित वस्तु नाही म्हणून तीचे दान करू शकत नाही. या बद्दल काही शंकाच नाही.