छोटा बाहुबली

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
2 Apr 2021 - 3:06 pm

छोटा बाहुबली
-----------------
माझी लाडकी खाट अगदी खिडकीजवळ आहे . तिच्यावर बसायचं अन बाहेर पहात राहायचं . केसांमध्ये बोटं घालून गोल फिरवत . हा माझा आवडता उद्योग . काय मस्त वाटतं ! लांबवर नजर जाते . समोर नुसतं मोकळं माळरान आहे आणि निळं निळं आकाश . जोडीला भरभरणारा भन्नाट वारा !
आमचं घर मला खूप आवडतं . मोठं. मातीचं.बैठं . भरपूर अंगण असलेलं . खूपखूप जुनं ! अगदी माझ्या नऊ वारी नेसणाऱ्या , थकलेल्या आजीसारखं ! ते अगदी एकटं आहे . गावापासून लांब. आजूबाजूला एकही घर नाही. तशी वस्ती आहे. पण जवळ नाही . आई - अप्पा शेतात जातात . शेत लांब आहे घरापासून .
मी शाळेत जाते . मी सातवीत आहे आता . मला खूप मार्क पाडायचे असतात . म्हणजे मला कित्ती अभ्यास असेल , कल्पना करा . म्हणून मी शेतावर कामाला काही जात नाही . पण गंमतच आहे ! - पुस्तक घेऊन फिरत असते पण डोक्यात काही शिरत नाही . बाहेर पाखरं अन फुलपाखरं ! तऱ्हेतऱ्हेची ! रंगीबेरंगी ! माझं अभ्यासातलं लक्ष सारखं मोडतं ना मग .
पावसाचे दिवस असूनही पाऊस नीटसा काही नव्हता . अप्पा काळजीत होते. गणपती गेले आणि आकाश काळं होऊ लागलं .
त्यादिवशी अशीच खिडकीतून बाहेर पहात होते , तर समोर एक खोपटं उभं . कालपर्यंत नव्हतं अन आज एकदम ! ते एका पाथरवटाचं घर होतं . पाथरवट म्हणजे दगड फोडणारे . दगडाच्या वस्तू बनवणारे लोक . पाटा - वरवंटा अन काही काही .
काळे कभिन्न नवरा - बायको अन त्यांचा तसाच , पण छोटासा गोड मुलगा . थोड्या वेळाने त्यांची चूल पेटली . स्वयंपाक चालला असावा . नुसता पांढरा धूर धूर झालेला . तो कमी झाला अन काय दिसलं असेल ? ...
तो छोटा मुलगा हातामध्ये प्रचंड जड हातोडी घेऊन दणादण दगडावर चालवत होता . बाप रे ! मला कमालच वाटली . माझ्यापेक्षा छोटा असलेला तो मुलगा सहजपणे घण चालवत होता . भारीच ! मी त्याला लगेच नाव देऊन टाकलं - बाहुबली , छोटा बाहुबली !
माझी बाहुबलीशी लगेच मैत्री झाली . मी त्याला खाऊ द्यायचे . आम्ही खेळायचो . खिडकीच्या बाजूला दोन-तीन मोठी झाडं होती . खाली फुलांची छोटी झाडं . तिथे एक सुका ओंडका पडलेला होता . सुबाभळीच्या झाडाचा . ती आमची छोटीशी होडी होती . शेजारी सोडलेलं सांडपाणी म्हणजे आमची नदी होती. त्या होडीत बसून आम्ही जगात फिरून यायचो . मी एकेक गावांची -देशांची नावं त्याला सांगायचे . त्याला काहीच माहिती नसायचं . ही एक गंमतच होती . पण त्याचा तो घण ! ... तो मात्र तो सहज उचलायचा ; पण मला ? बाप रे ! अवघड . अति अवघड !
एकदा तो म्हणाला , त्यांचं काम झालं की ते दुसरीकडे जाणार आहेत . मला खूप वाईट वाटलं . माझा तो चांगला मित्र झाला होता एवढ्यात . अन पुन्हा हे ? ...
मग एके दिवशी ...
सकाळपासून खूप उकाडा होता . पण आकाश स्वच्छ होतं . मला सुटी होती. पण आई - अप्पांना कसली सुट्टी रविवारची ? ते शेतात कामाला गेले होते .
घरात मी आणि आजीच . खिडकीतून बाहेर पाहिलं . बाहुबली आणि त्याची आई काम करत होते . त्याचे वडील बाजारात गेले असावेत .
खरं तर मला त्याच्याबरोबर खेळायचं होतं . पण - आमची कट्टी झाली होती .
थोड्याच वेळात आकाश काळंकाळं झालं . रिपरिप पाऊस सुरु झाला. नंतर पावसाला जोर चढला . हत्तीचा पाऊस होता जणू !
आडवा-तिडवा पाऊस होता . बाहुबली आणि त्याची आई खोपटात गेले . मी खिडकीतुन पहात होते . त्यांच्या झोपडीभोवती तळं साठलं होतं . जणू तलावात एका जागी थांबलेली काळीशी होडीच ! मला वाटलं , आत्ता त्याच्याशी बट्टी असती तर तिथे जाऊन होडी-होडी खेळता आलं असतं. पण नाही .
मीही रागाने खिडकी लावून घेतली आणि एक कसलासा आवाज आला , कर्रर्रर्र धडाड ... !
मला संकट जाणवलं. मी मला जे सुचलं ते केलं . मी आजीचा हात धरून ओढला आणि दोघी खाटेखाली शिरलो . दुसऱ्या मिनिटाला आमचं जुनं मातीचं घर थोडं कोसळलं . पण माझ्या लाडक्या खाटेने आम्हाला आधार दिला . वरचे पत्रे न माती खाटेवर पडली. पण-आम्ही बचावलो. बचावलो असं वाटलं ... पण उलट आता आम्ही सगळीकडून अडकलो होतो. बाहेर काही पडू शकत नव्हतो .
भिजलेल्या मातीचा वास येत होता . मातीचा वास मला ना खूप आवडतो . पण आत्ता या क्षणाला ? ... श्वास कोंडू लागला . आजी ओरडू लागली . मी रडू लागले . आई - अप्पांची आठवण येऊ लागली . ते कुठं अडकले असतील , असंही वाटायला लागलं . त्याच वेळी भर पावसात बाहुबली आणि त्याची आई आमच्या घराकडे धावले . त्याच्या आईच्या हातात एक बांबू होता तर बाहुबलीच्या हातात घण होता.
बाहुबली मला हाका मारू लागला … आमची कट्टी विसरून !
मी ' ओ ' दिली .
त्याच्या आईला कळलं , आम्ही कुठे आहोत ते . ती दगड - माती बाजूला करू लागली . थोडं मोकळं झालं . श्वास घेता येऊ लागला. फक्त एक वासा खाटेमध्ये अडकला होता . तो होता म्हणून खाट बाजूला सरकत नव्हती . अन आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं . मी मोकळं होण्यामध्ये फक्त तो एक वासा होता - फक्त एक ! बाहुबलीच्या आईने त्याला हात घातला . सगळी शक्ती लावली . तो ओढला आणि हाय ! ...
तो तिच्या हातातून निसटला . ती घसरली आणि धडपडली . तिचं डोकं एका दगडावर आपटलं अन ती बेशुद्ध झाली . झालं ! आता तर मी सुटकेची आशाच सोडली . बाहुबलीचा 'आई आई' , असं ओरडण्याचा आवाज आला. मग तोही शांत झाला. एकेक क्षण सरत नव्हता .
अचानक दाणदाण आवाज येऊ लागला . छोटा बाहुबली हिंमत हरला नव्हता . त्याच्या छोट्याशा हातामध्ये आता विलक्षण बळ संचारलं होतं . तो वासा त्याला ढकलून सरकवता येईना , म्हणून तो त्याच्या घणाने त्याचे तुकडे-तुकडे करायला लागला होता .
थोड्याच वेळात त्या लाकडी मजबूत वाशाचे दोन तुकडे झाले . त्याने मला हात दिला व मी बाहेर आले. मी छोटी असल्याने ते जमलं पण आजीला बाहेर येता येईना. तिला बाहेर घेणं आम्हा दोघांनाही जमेना .
तेवढ्यात बाहुबलीचे वडील आले . त्याची आईही शुद्धीवर आली . त्याच्या वडलांनी शक्ती लावून ती खाट ढकलली व दाबून धरली .
त्यांची शक्ती केवढी ? - बाहुबलीचे वडीलच की ते !
त्याच्या आईने आजीला अलगद बाहेर काढलं. त्या दोघींनाही फार काही झालं नव्हतं .
पाऊस कमी झाला . आई - अप्पाही आले . पुढे सगळं नीट झालं . अप्पा म्हणाले , ' बाहुबली देवासारखाच धावून आला ! ' अन ते खरंच होतं .
मग आम्ही दोन घरं बांधली . एक आमचं आणि शेजारी बाहुबलीचं . आता ते आमच्याकडे कामासाठीच राहिले आहेत . आणि छोटा बाहुबली माझ्याबरोबर शाळेत येतो .
त्याच्या घण चालवणाऱ्या हातात आता पेन्सिल आहे . या पेन्सिलचं वजन त्याला घणापेक्षा जास्त वाटतं . डोकं चालवावं लागतं ना ! ... पण शिकेल हळूहळू !
-------------------------------------------------------------------------------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 Apr 2021 - 3:06 pm | बिपीन सुरेश सांगळे

आज जागतिक बाल पुस्तक दिन आहे . मिपाच्या सदस्यांच्या सर्व बाळगोपाळांना त्याच्या शुभेच्छा !

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 Apr 2021 - 3:06 pm | बिपीन सुरेश सांगळे

आज जागतिक बाल पुस्तक दिन आहे . मिपाच्या सदस्यांच्या सर्व बाळगोपाळांना त्याच्या शुभेच्छा !

ज्योति अळवणी's picture

4 Apr 2021 - 3:30 pm | ज्योति अळवणी

फारच सुंदर कथा

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 Apr 2021 - 12:24 am | बिपीन सुरेश सांगळे

ज्योतीजी
तुमचा प्रतिसाद मोलाचा आहे
खूपच आभारी आहे .

कारण बालकथा फार कोणी वाचत नाही किंवा प्रतिक्रिया तरी देत नाही - कल्पना नाही

शलभ's picture

5 Apr 2021 - 8:42 pm | शलभ

खूप सुंदर गोष्ट.
तुमच्या बालकथा आवडतात. माझ्या मुलाला वाचून दाखवतो. त्यालाही आवडतात.
तुम्ही लिहीत रहा. आणि अशा सुंदर गोष्टींसाठी धन्यवाद.

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Apr 2021 - 7:42 am | बिपीन सुरेश सांगळे

शलभ
तुमची प्रतिक्रिया मोलाची
खूप आभार
मुलगा काय वयाचा आहे आपला ?
कळावे

शलभ's picture

9 Apr 2021 - 10:28 am | शलभ

वय वर्षे 6.

अजून एक, तुम्ही नावातच बालकथा असं लिहिलं तर आवर्जून वाचले जाईल.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Apr 2021 - 11:30 am | ॲबसेंट माइंडेड ...

सुरेख बालकथा.
मनोरंजक आणी बालमनावर चांगले संस्कार घडवण्यास सहाय्यक अशी बालकथा.

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 1:26 pm | बिपीन सुरेश सांगळे

शलभ
आणि
| ॲबसेंट माइंडेड ...
आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 1:26 pm | बिपीन सुरेश सांगळे

शलभ
आणि
| ॲबसेंट माइंडेड ...
आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 1:28 pm | बिपीन सुरेश सांगळे

शलभ
बालकथा असं टाकायला पाहजे खरं तर
चुकून राहीलं