अदा बेगम - भाग ६

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
1 Apr 2021 - 10:01 pm

अदा बेगम - भाग ६
------------------------
बरकतखान रात्रीच्या विजयाने खुश झाला होता. त्याला नाहीतरी मराठ्यांची भितीच वाटत होती. शैतान लोग ! पण तो कामयाब झाला होता. त्यांच्यावर त्याने फत्ते हासिल केली होती. त्याला दरबाराची स्वप्नं पडत होती. बादशहा कसा खुश होईल ? आपल्याला किती हजारी मनसबदारी मिळेल ? याच विचारात तो गढून गेला होता.
तोफा आणि दारुगोळ्याचं वजन वाहणं सोपं नव्हतं. हलक्या असल्या तरी त्या तोफाच ! त्यात आदल्या रात्रीची लढाई. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभरात जेवढं जाता येईल तेवढी मजल मारून त्याने छावणी टाकायचा आदेश दिला. त्यांनी काही कोस मजल मारली व तळ ठोकला.
आणि सोनेपे सुहागा ! तळावर एक मुजरेवाली दाखल झाली. तिच्या बरोबर तिचे साथीदार होते. एक तबलजी आणि एक सारंगिया. तीनच माणसं ? म्हणजे काई फिकर नव्हती . काई गनीमत नव्हती.
आणि बरकतखानाने लढाईचा विजय साजरा करण्यासाठी रात्रीचा जश्न मनवायचा ठरवला.
मोगली फौज त्यासाठी अंधार पडायची वाट पाहत होती.
आणि मराठी फौजही अंधार पडायची वाट पाहत होती.
ती मुजरेवाली -अदा होती. सारंगिया बाबुलजी होता; तर तबलजी बनलेला गोविंदजी होता. त्या बिचाऱ्याला कफनी सोडून साधे कपडे चढवावे लागले होते. तबलजी म्हणजे त्याला वाजवायचा होता मृदूंगच . तिथे तबला कुठून मिळणार होता ? दुसरा पर्याय नव्हता . सुरत सोडतानाही अदाने काही कपडे बरोबर ठेवलेले होते आणि बाबुलजीने त्याची प्राणप्रिय सारंगी.
बरकतखान अदाला ओळखत नव्हता. पण त्याच्या हाताखालच्या एका माणसाने जो , सुरतचा होता, सांगितलं की ही सुरतची अदाबेगम कोठेवाली आहे. ओळख पटल्यामुळे अदा चमकली. पण त्यामुळे फायदाच झाला. तिचं स्वागत झालं. मनापासून. बरकतखानला वाटलं आपली श्याम रंगीन होण्यासाठी खुदानेच तिला पाठवलंय.
वर तिनेही तिखटमीठ लावून तिच्या ह्या परिस्थितीला मरगठ्ठे कसे जबाबदार आहेत, ते सांगितलं .
तळावरचे लोक खुश झाले. आज जोरात जश्न होणार होता. अदाचा नाच, अदाचं गाणं ! ... जे लोक सुरतेहून आले होते त्यांना तिचं दर्शन घेणं त्या शहरात असताना दुरापास्त होतं. आज ते तिच्या मैफलीचा आनंद लुटणार होते. त्यांनी अदाचं आणिकच कौतुक सांगितल्याने बरकत खान तर उतावीळ झाला होता.
बरकतखानाला आज एवढी घमेंड चढली होती की त्याला वाटत होतं , आता प्रवास संपेपर्यंत परत कधी मराठ्यांचा हल्ला होणारच नाही. काल त्यांना चांगलीच धूळ चारलेली आहे. त्यात त्यांचा सरदार लापता !
तरीही काही टेहळ्यांना आसपास लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं. ते नाराजीनंच त्यांचं काम करीत होते. थोड्यावेळाने तेही मैफलीत सामील होणार होते …काम सोडून . गनिमांवर नजर ठेवायची सोडून अदाला नजरेत सामावणार होते.
तयारी झाली आणि अदा समोर आली. तिच्या अंगात फिक्या गुलाबी रंगाचा घागरा असलेला पोशाख होता . साज शृंगारात नटलेली अदा तर जन्नतची एखादी परीच भासत होती . सारखी मोहिमेवर असलेली फौज तिला पाहून खुळावली .
मैफल सुरु झाली. बरकतखानाने मद्याचा चषक उंचवला . अदाचा मखमली स्वर वातावरणात गुंजला .
दिल मेरा फितूर तुमसे
करता है मोहब्बत दगाबाजसे
जान रख दी तेरे कदमोंमे
दिल मेरा फितूर मुझसे
फौज गाफील झाली. टेहळे काम सोडून मैफिलीचा आनंद लुटू लागले.सारे पागल झाले होते. तिच्या गळ्यातून निघणाऱ्या मखमली स्वरांनी , तिच्या दिलखेचक अदांनी अन तिच्या घायाळ करणाऱ्या नेत्र विभ्रमांनी…
मैफल संपली आणि अदा बरकतखानाच्या तंबूत शिरली.
गाण्याचा आवाज संपला तशी आजूबाजूला दबा धरून बसलेल्या मराठी फौजेला इशारे गेले. फौज कूच करू लागली. पुढे हिरोजी-माणकोजी दौडत होते.
बरकतखानाचं नशीब जोरावर होतं. म्हणजे असं त्याला वाटत होतं. अदासारखी अस्मानी हूर त्याच्या आगोशमध्ये येणार होती. रात्र चढली होती. हवेत गारवा होता.
छावणी हळूहळू सुस्तावत होती.
अदाच्या एकेक अदेने तो पागल होत होता. त्याच्या दिलातला शोला भडकत होता. ती त्याला स्वतः मद्य पाजत होती तेव्हा तर त्याच्या पिण्यालाच बरकत आल्यासारखं त्याला भासत होतं.
एवढंच नाही तर ती मादकपणे एक प्रेमगीत गुणगुणत होती-
तू डूब जा नशेमें
और मै तेरी आंखोमें
त्या दुगन्या नशेने बरकतचे डोळे धुंदावले होते. त्याने तिला जवळ ओढलं. ती त्याच्याकडे पाहून कातिल हसली. त्याचे डोळे गरागरा फिरले. जन्नत -खुद्द जन्नत त्याच्या कवेत होती.
त्याच्या मिठीचा जोर वाढला तेव्हा अदा न राहवून सुस्कारली . आधीची गोष्ट वेगळी होती पण आता ती हिरोजीची होती.
जशी त्याने मिठी आणखी कसली , ती रागाने तिरमिरली. आणि -अदाने पोटापाशी लपवलेली ,तिची छोटीशी, नाजूक पण सोन्याची नक्षीदार मूठ असलेली कट्यार काढली आणि त्याच्या छातीवर वार केला. वार बसला पण वर्मी नाही. एवढं पिल्यानंतरही बरकत भानावर होता. त्याने पुढचा वार होण्याआधी तिचा हात धरून पिरगाळला. ती कळवळली. नाजूक नार ती. पण संधी मिळताच तिने शेजारच्या मेजावरली ,दारूच्या प्यालातली दारू त्याच्या तोंडावर उडवली. त्या उग्र कडवट दारूने त्याचे डोळे चुरचुरले. तो डोळे चोळू लागला.
तिचा डाव फसला होता. पण तरीही तो अर्धाच डाव होता ...
संधी साधून ती पळाली. तिचं मन हिरोजीचा धावा करत होतं. तो यायला हवा होता; पण अजून आला नव्हता. देरी झाली होती .कुठं अंधारानं त्याच्या पायात खोडा घातला होता ,कोणास ठाऊक ?
बाहेर तंबूच्या खुंट्या- दोर चुकवत ती पळत होती. आता तळ शांत झाला होता .पण बरकतखान तिच्या मागे आलाच.
त्याच्या ओरडण्याने काही जण सावध झाले.
गोविंदजी आणि बाबुलजीही पुढे आले . अदावर काही वाईट प्रसंग ओढवलाच , तर त्यासाठी ते सावधपणे लपून बसले होते . पळणाऱ्या अदाला एका तलवार उंचावलेल्या सैनिकाने अडवलं.
" मारो ! गनीम कहींकी ," बरकतखान ओरडला.
त्यावर बाबुलजी आणि गोविंदजी अदा आणि त्या सैनिकाच्या मध्ये आले. त्याने बाबुलजीवर वार केला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. बुढ्ढ्या बाबुलजीने राम म्हणला व तो खाली पडला.
" बाबुलजी ,” अदा दुःखातिरेकाने किंचाळली .
सैनिकाने गोविंदजीवर पुढचा वार केला . एक कोवळा तरुण तो, नि :शस्त्र . तोदेखील इहलोक सोडून परमात्म्याच्या भेटीला निघून गेला.
सैनिक पुन्हा पुढे आला. तोच -
बरकतखानाच्या भेजामध्ये काही आलं.
तो ओरडला," ठहरो -"
त्याला शंका आली होती. जिने इतका वेळ मनोरंजन केलं, जी एक मुजरेवाली आहे, तिने आपल्यावर वार का करावा ? ही खरोखरची गनीम तर नाही ? यांची काय चाल आहे ?
थांबलेल्या सैनिकाला त्याने आज्ञा केली, " पकडो और बांधो इसे ! "
त्या सैनिकाने तिला एका झाडाला बांधलं.
" अब बताओ, कौन हो तुम ? क्या चाल है तुम्हारी ? " बरकतखानाने विचारलं .
ती गप्प उभी राहिली. हिरोजीची खबर नव्हती. तिला तिचं भवितव्य कळून चुकलं होतं .
त्याचवेळी बाहेर गलका उठला, " गनीम-गनीम ! "
बरकतखानाची बत्ती पेटली. त्याची उरली सुरली उतरली. त्याच्या लक्षात सारं आलं. तो आणि त्याचा सैनिक मागे हटले. बरकतखानाने तलवार शोधली व एका घोड्यावर स्वार होऊन तो लढायला तयार झाला .
हिरोजी-माणकोजीचा बेत ठरलेला होता. त्यांनी कामं वाटून घेतलेली होती .
माणकोजी दारूगोळ्यापर्यंत पोचणार होता. त्याच्या पथकात एक खास माणूस होता - बजाबा. तो दारुगोळ्यातला दर्दी होता. तो उडवण्याचं काम त्याचं होतं.
तो उडवण्याआधी खूण म्हणून शिंग वाजवलं जाणार होतं. ते वाजताच मराठी फौजेने माघारी फिरायचं होतं. कारण गनिमी काव्याने तीच मुख्य कामगिरी पार पडायची होती.
हिरोजी गनिमाला अंगावर घेणार होता . शक्य तितका शत्रू कापून काढणार होता. गरज पडल्यास त्याने माणकोजीलाही संरक्षण द्यायचं होतं.
. . . आणि त्याच्या अदाला हुडकून काढायचं होतं .
माणकोजीचं पथक दारूगोळ्याचा शोध घेत होतं.
हिरोजीने शत्रू सैन्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्या हातघाईच्या लढाईने वातावरण बदललं. थंडीही घाबरून दूर पळाली .
लढता लढता त्याची नजर अदालाही शोधत होती. पण ती नजरेस काही पडत नव्हती.
तिकडे बरकतखान माणकोजीला आडवा आला. दोघांची जुंपली.
हिरोजी ओळीने लावलेल्या तंबूची एक रांग ओलांडत होता. त्याला अदा दिसली नाही. तो पलीकडच्या रांगेत घुसला. एका मोकळ्या जागी त्याला झुंजणारे बरकत व माणकोजी दिसले.
" माणकोजी, मी बघतो ह्याच्याकडं, तू जा. तू तुझी कामगिरी बजाव, " हिरोजी म्हणाला.
बरकतखानाला हिरोजीने अंगावर घेतलं.
माणकोजी मोकळा झाला व पुढे गेला. त्याच्याबरोबर निवडक शूर मावळे होते आणि बजाबा होता .
हिरोजीने तलवार सरसावली. तलवारींची खणखण सुरु झाली. तलवारीच्या घर्षणाने ठिणग्या उडू लागल्या. बरकतही कसलेला तलवारबाज होता. वार-प्रतिवार सुरूच होते. पलित्यांच्या फरफरत्या नारिंगी प्रकाशात ते दृश्य भयाण वाटत होते. दोघांपैकी एकजण मेल्याखेरीज त्याला विराम मिळणार नव्हता.
बरकतचा एक घणाघाती वार हिरोजीने चुकवला व त्याची तलवार त्याच्या छाताडात घुसली.
बरकतखान पडला.
तो पडताच मोगली फौजेचं बळ सरलं.
अजूनही दारूगोळ्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. माणकोजीने एका मोगल सैनिकावर तलवार रोखली व त्याला अभय देण्याच्या बदल्यात ते जाणून घेतलं. सरदार पडल्यामुळे त्यानेही ते लगेच सांगितलं .
माणकोजी आणि बजाबा तेथे पोचले. दारूगोळ्याचा मोठा साठा आणि खास तोफा तिथे होत्या. बजाबाने दारू शोधून तिला वात जोडली.
माणकोजीने शिंग फुंकलं व बजाबाने वात पेटवली.
परतीचा इशारा झाला होता .मागे फिरायची वेळ आली होती. मराठी फौज मागे हटू लागली . माणकोजी सुद्धा. तरी त्याची नजर हिरोजीला शोधत होती. पण हिरोजी ?
तो अदाला शोधत होता. त्याला माघारी फिरायचं कळलं होतं. पण अदाशिवाय तो कसा माघारी फिरणार होता ?...
त्याने खूप शोधलं . आणि शेवटी त्याला झाडाला बांधलेली अदा दिसली. तो तिच्या जवळ पोचला. त्याने तलवारीच्या वाराने दोर कापले. तिला मोकळं केलं. आता थांबायला वेळच नव्हता.
अदा हिरोजीच्या पुढ्यात घोड्यावर चढून बसली. त्याने घोडा सोडला.
तिकडे एकच दणका झाला. अग्नितांडव सुरु झालं. जळलेल्या दारूचा वास सुटला . त्या दारुगोळ्याची होळी पेटली होती; पण बोंब मारायला बरकतखान जिवंत नव्हता.
उरलेली मोगली फौज आता भाजून निघत होती . त्यांची पळापळ सुरु झाली.
तोफगोळे फुटत होते. त्यांच्या दणक्याने तोफाही फुटत होत्या. नंतर सगळ्या दारूगोळ्याचा मिळून एकच धमाका झाला. लाल केशरी ज्वालांचा जणू सागरच उसळला !...
हे सारं क्षणार्धात घडलं होतं. गोळे फुटून, उडून फेकले जात होते.
त्यातून उडालेला एक गोळा हिरोजीच्या घोड्यावरच फुटला. आणि त्याच्या प्रकाशात ते दोन्ही जीव लखलखून उठले.
अंधाराने जहरी फुत्कार टाकावेत तसा काळा धूर आसमंत वेटाळत पसरला.
आणि त्या दोन अभागी जीवांची तिथे नामोनिशाणीसुद्धा उरली नाही.
====================================================================================

समाप्त

ही ऐतिहासिक कथा काही संदर्भ सोडता पूर्णपणे काल्पनिक आहे .

© बिपीन सांगळे

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 Apr 2021 - 10:02 pm | बिपीन सुरेश सांगळे

इति लेखनसीमा

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Apr 2021 - 10:14 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सुंदर झाली कथा.

फारच छान !! चित्रपटा साठी योग्य फक्त डिसक्लेमर सगळ्यात आधी आणि ठळक द्यावा लागेल.

एकही भाग वाचला नाहीये.. लवकरच वाचुन प्रतिक्रिया देईल..

सुंदर कथा आणि चुटपूट लावणारा शेवट

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 Apr 2021 - 3:07 pm | बिपीन सुरेश सांगळे

रसिक वाचक हो खूपच आभारी आहे .

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Apr 2021 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी वेगवान कथा अतिशय आवडली
पैजारबुवा,

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 Apr 2021 - 12:16 am | बिपीन सुरेश सांगळे

अबसेन्ट मा.

सौंदाळा

धन्यवाद

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 Apr 2021 - 12:17 am | बिपीन सुरेश सांगळे

| सुसदा
फारच छान !! चित्रपटा साठी योग्य
विशेष आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 Apr 2021 - 12:19 am | बिपीन सुरेश सांगळे

पैजारबुवा खूपच आभारी आहे

आता एकसाथ सर्व भाग वाचले..

कथा.. इतिहास.. भाषा.. नावे.. सुरत आणि इतर घटना ह्यांचा मेळ अतिशय अभ्यास पुर्ण घातलेला आहे..

उद्या याच्यावर 'अदा बेगम ' नावाचा सिनेमा बनवला तरी तो सुपर डुपर हिट होईल..आणि अदा नायिका म्हणुन उमराव जान पेक्षा पुढचे पाऊल ठरेल असे वाटते..

कथेचा शेवट मध्ये, फक्त अदा बेगम मरेल असे वाटले होते.. पण तसे झाले नाही..

पुढील लिखाणास मनापासुन शुभेच्छा..

कर्नलतपस्वी's picture

8 Apr 2021 - 4:08 am | कर्नलतपस्वी

सुंदर खिळवून ठेवणारी गोष्ट, शेवट पर्यंत कळलेच नाही की कथा काल्पनिक आहे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Apr 2021 - 7:33 am | बिपीन सुरेश सांगळे

गणेशा
योग्य न विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Apr 2021 - 7:37 am | बिपीन सुरेश सांगळे

कर्नलजी

कथा काल्पनिक वाटली नाही -
आपली ही प्रतिक्रीया छान वाटली .
न वाचनखुण म्हणून आपण साठवली आहे
खूपच आभार

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

व्वा, जबरदस्त कथा !
भाषा आणि लेखनशैली अर्थातच आवडली !
मजा आली खुप, वाचायला !
यावर सुंदर सिनेमा किंवा वेबसिरि़ज होऊ शकेल !

टॉप क्लास

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Apr 2021 - 11:50 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा

8 Apr 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा
व्वा, जबरदस्त कथा !
भाषा आणि लेखनशैली अर्थातच आवडली !
मजा आली खुप, वाचायला !
यावर सुंदर सिनेमा किंवा वेबसिरि़ज होऊ शकेल !

देवाच्या मनात असेल तर तसं होईल सुद्धा !

आपल्या मन:पूर्वक दिलेल्या, हुरूप वाढवणाऱ्या प्रतिसादांसाठी खूपच आभारी आहे आपला .
मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं .
रसिक वाचक असले की लिहायला आणखी स्फूर्ती येते .
लोभ असावा

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 1:24 pm | बिपीन सुरेश सांगळे

सर्व वाचकांचा मी खूपच आभारी आहे
आणि
मिपाच्या तर मी ऋणातच आहे .
त्यांच्यामुळे तर ही एवढी संधी प्राप्त होते .

शानबा५१२'s picture

27 Oct 2024 - 10:44 pm | शानबा५१२

नमस्कार,
आपल्या सर्व कथा वाचत आलो आहे. हि कथा सुध्दा फार आवडली. पहिल्यांदा प्रतिसद देत आहे आपल्या धाग्यावर. आपले कथा लेखन फार छान आहे, खिळवुन ठेवणारे आहे.
पण..........शेवटी तो आगीचा गोळा त्यांच्यावर का पाडलात? बाजुला पाडायचा ना!

बिपीन सुरेश सांगळे's picture

30 Oct 2024 - 8:30 am | बिपीन सुरेश सांगळे

शानबा
छान वाटलं .
खूप आभार