जाधवगड,जेजुरी व मयुरेश्वर एक धावती भेट 

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
14 Feb 2021 - 10:44 pm

बरोब्बर एक वर्षांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारीला मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने मोरगावला जाणे झाले होते. लग्नाची वेळ थोडी वेगळीच होती. ना सकाळचा ना संध्याकाळचा असा दुपारी ४ वाजून ११ मिनिटांचा मुहूर्त होता. मुंबईहून गाडीने साडे तीन चार तासात पोहचणे शक्य होते. पण असाही संपूर्ण दिवस तर जाणारच होता म्हणून आमच्याबरोबर येणाऱ्या स्नेह्यांशी चर्चा करून सकाळी लवकरच निघून वाटेत जमेल ती ठिकाणे बघत मोरगावला पोहचायचे ठरवले.

मार्ग ठरला नवी मुंबई-पुणे-सासवड-जाधवगड-जेजुरी-मोरगाव व रात्री परत माघारी. सकाळी सातला मुलीने लॅपटॉपवर लॉग आउट करत रात्रपाळी संपवली आणि जाहीर केले की केवळ लग्नाला न जाता वाटेत पर्यटन स्थळे बघणार असाल तर मीही येते. तासाभरात तिचीही तयारी करून सकाळी आठला प्रवासाला सुरुवात केली. खालापूर टोल नाक्याजवळ नाष्टा करून पुढे निघालो. पुण्याला वाकडच्या पुढे गेल्यावर गुगल मॅपवर मरीआई घाट मार्गे सासवडला जाण्याचा कमी वेळाचा मार्ग दिसला . मुख्य रस्त्यापासून घाटाकडे जाणारा रस्ता सुरुवातीला थोडा खराब होता पण घाट व त्यापुढे खूपच चांगला होता. घाटाच्या पलीकडे एका रसवंतीवर रस घेऊन पुढे निघालो.

रसवंतीवाल्याची परी

थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी फुलांची शेती केलेली दिसली. मस्त बहरलेली फुले बघितल्यावर गाडीला ब्रेक लावावेच लागले. राखणदार कोणीही नव्हते. विचारल्याशिवाय शेतात कसे जायचे? पण फुलांसोबत फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. फुलाची एक पाकळीसुद्धा तोडायची नाही व कुठलेही रोप पायदळी तुडवायचे नाही अशी स्वतःलाच ताकीद देत घुसखोरी केलीच.

सासवडजवळील जाधवगड बघायचे ठरविले होते. पिलाजीराव जाधवांनी इ.स. १७१० मध्ये बांधलेल्या या ऐतिहासिक गडाचे एका हॉटेलमध्ये रूपांतर केल्या गेले असून महाराष्ट्रातील हे एकमेव हेरिटेज हॉटेल आहे. हा किल्ला कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सला देण्यात आलेला असून लग्न समारंभ वगैरेसाठी तो इ.स.२००८ पासून भाडे तत्वावर दिला जातो.
मुख्य रस्त्यातून गडाकडच्या रस्त्याकडे वळण घेतानाच दोन्ही बाजूला दोन चौक्या दिसतात ज्यावर मराठी व इंग्रजी असे जाधवगडाचे बोर्ड दिसतात व त्यावर हॉटेलचे ब्रीद वाक्य आहे "लढ, झगड, आगे बढ..... "

गडापाशी पोहचताच मावळ्याच्या वेशातील एक जण तत्परतेने गाडीजवळ आला व तुम्ही उतरा मी गाडी कुठे लावायची ते बघतो असे म्हणून गाडी ताब्यात घेतली. गड पाहण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपयाचे कुपन घ्यावे लागते असे कळले होते. आम्ही काही पायऱ्या चढून गडाच्या मुख्य दरवाजातील स्वागत कक्षाकडे निघालो.

लांबूनच आम्हाला पाहिल्यावर तुतारी वाजवून कोणीतरी येत असल्याची वर्दी दिल्या गेली.

मुख्य दरवाज्यापाशी पोहचल्यावर नगारा वाजवण्यास सुरुवात झाली.

सुवासिनी ओवळण्याचा तबक हातात घेऊन उभ्या होत्या. त्यांनी ओवाळून आमचे स्वागत केले. खूपच वेगळा अनुभव होता आमच्यासाठी.

प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर दोन्ही बाजूस देव्हड्या आहेत. येथे काही पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत.

यापुढे मात्र थोडी निराशा झाली. कुठल्यातरी शाही कुटूंबातील लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल व किल्ला चार दिवसासाठी आरक्षित केलेला असल्याने किल्ल्याच्या आतील भागात प्रवेश बंद होता. आम्ही लांबून आलो आहोत निदान थोडे तरी पुढे जाऊन बघू द्या अशी विनंती केल्यावर आम्हाला विनाशुल्क काही भाग बघायला परवानगी मिळाली .पाच जणांचे मिळून २५००/- वाचले यातच आनंद मानत जेव्हडे मिळाले तेव्हडे खूप झाले म्हणत परत फिरलो.

सासवडला जेवण करून तीन वाजता जेजुरीला पोहचलो. वेळ कमी होता. अक्षरशः पळतच पायऱ्या चढून खंडोबाचे मंदिर गाठले. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मंदिर तीन शतकांपूर्वी बांधलेले असून येथील दीपमाळा खूप सुंदर आहेत. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. खूप सुंदर मंदिर आहे.

जेजुरी गडावर शंकर व पार्वती हे खंडोबा व म्हाळसेच्या रूपात असल्याने जेजुरीला येऊन नवविवाहित दाम्पत्यांनी देवकार्य करण्याची प्रथा अनेक पिढय़ांपासून चालू आहे.
अशी अनेक जोडपी देवाला भंडारा उधळीत होती.

वरून दिसणारी जेजुरी

दर्शन घेऊन पायथ्याशी पोहचेपर्यंत चार वाजले होते. एका हॉटेलवाल्याला चहाची ऑर्डर दिली व विनंती करून बाजूच्याच खोलीत लग्नासाठीचे कपडे बदलण्यासाठी परवानगी मिळवली . अवघ्या दहा मिनिटात पुढे निघालो . जेजुरी ते मोरगाव रस्ता अगदी चकाचक. २०-२५ मिनिटात मोरगावला लग्नाच्या ठिकाणी पोहचलो. वरात हॉलच्या दरवाज्याशी पोहचतच होती. तासाभरात लग्न समारंभ आटोपला. लग्नाला हजेरी लावल्याचा पुरावा म्हणून नवदाम्पत्याबरोबर एक ग्रुप फोटो काढून घेतला. मैत्रिणीला म्हटलं तू आता खूप गडबडीत असशील तेव्हा नंतर सवडीने बोलू आणि निरोप घेतला.
लगेच मयूरेश्वराच्या मंदिराकडे धाव घेतली. कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या मोरगाव येथे हे मंदिर आदिलशाही कालखंडात बांधलेले आहे. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर म्हणजे एक गढीच आहे. मंदिराला चारही उंच संरक्षक भिंत आहे. तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठे दगडी कासव नजरेस पडते. मंदिराच्या समोरच एक नंदिचीही मूर्ती आहे. असे सांगितले जाते कि शंकराच्या मंदिरासाठी मूर्ती रथातून नेली जात असताना येथे रथाचे चाक तुटले त्यामुळे मूर्त्ती येथेच ठेवण्यात आली. अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून श्री मयुरेश्वर ओळखला जातो. सुदैवाने आम्ही पोहचलो तेव्हा गर्दी अजिबात नव्हती. आरामात दर्शन झाले.

सात वाजले होते. मंदिराच्या बाहेर चहा घेतला.
जय मयुरेश्वर, जय मल्हार, "लढ, झगड, आगे बढ....." म्हणत परतीचा प्रवास सुरु केला व रात्री साडे अकराला घरी पोहचलो आणि लेकीने रात्रपाळीसाठी लॉगिन करत ऑफिसकाम सुरु केले.

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

14 Feb 2021 - 10:56 pm | सौंदाळा

मस्तच,
जाधवगडची माहिती, फोटो मिळतील म्हणून सरसावून बसलो तोच गड आरक्षित झाल्याचे वाचले आणि थोडी निराशा झाली.
पण बाकी लेख फुलांचे, जेजुरीचे फोटॊ छानच

जाधवगढी वर पेठकरकाकांनी मागेच फोटोसकट आपला अनुभव असा लेख लिहिला आहे तो देतो

http://misalpav.com/node/37728

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2021 - 12:24 pm | चौथा कोनाडा

हेच ल्हिणार होतो !

शशिकांत ओक's picture

15 Feb 2021 - 12:08 am | शशिकांत ओक

एक हरवलेला संत सोपानदेव काका...
सासवडजवळ चांगळी नदीच्या किनाऱ्यावर संत सोपान काकांची समाधी आहे. रम्य पण आडवाटेला ते असल्याचे जाणवते.
पुढच्या वेळी आपल्या पैकी कोणी जरूर जाऊन मार्गदर्शन करावे हा विनंती...

https://www.discovermh.com/saint-sopanadeva-sanjivan-samadhi-saswad/

लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांनीही हळद लावून घेण्याची कल्पना आवडली.
ते कासव बनवलेले आहे. चौथरा नर्तिकेसाठी असावा. पण कुर्मावतारातल्या कासवाचे रूप पाण्यातले असते. जमीनीवरच्या कासवाचे धसते हे चित्रकारास माहिती नाही. त्याने पाय जाडजूड रंगवले.
अधिकृत अष्टविनायक दर्शनाचा आराखडा बघून हसायला आले.

प्रचेतस's picture

15 Feb 2021 - 9:30 am | प्रचेतस

मस्त लिहिलंय एकदम.

हा परिसर म्हणजे यादवकालीन, शिवकालीन वास्तूंनी नटलेला आहे. इकडील अगदी लहानसहान गावांतदेखील काही ना काही आढळून येतेच. खुद्द मोरगावात मयुरेश्वर मंदिराच्या थोडं पुढं गेल्यास यादवकालीन मंदिर आहे, तिथल्या द्वारपालांची शिल्पं भारी आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2021 - 11:02 am | श्रीरंग_जोशी

उत्तम वर्णन व फोटोज.

मोरगावचे फोटो सुरु होण्याअगोदरचा फोटो मस्तानी तलावाचा दिसत आहे. मी तेरा वर्षांपूर्वी पाहिलं त्यापेक्षा भोवताली बरंच बांधकाम झालेलं दिसत आहे.

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2021 - 12:28 pm | चौथा कोनाडा

मस्त भटकंती वृतांत! भारी लिहिलंय. फोटो +१

सासवड परिसर आहेच सुंदर ! तिथली तिन्ही मंदिरे अप्रतिम आहेत.

गोरगावलेकर's picture

15 Feb 2021 - 10:26 pm | गोरगावलेकर

प्रतिसादांबद्दल सौंदाळा, मनो, चौथा कोनाडा, शशिकांत ओक, कंजूस, प्रचेतस, श्रीरंग_जोशी यांचे तसेच सर्व वाचकांचे आभार

बाप्पू's picture

16 Feb 2021 - 12:00 am | बाप्पू

मस्त वर्णन.
फुलांचे फोटो बोपगाव परिसरात काढलेले दिसतायेत... !!

नेक्स्ट टाइम जेव्हा प्लॅन कराल तेव्हा कानिफनाथ मंदिर आणि भुलेश्वर मंदिर बघायला विसरू नका.
आणि हो.. यायच्या आधी मला व्यनि करा. आमच्या शेतातील ताजी भाजी आणि पाहुणचार घेऊन जा. :) :)

गोरगावलेकर's picture

16 Feb 2021 - 2:04 pm | गोरगावलेकर

कानिफनाथ मंदिर नाही पहिले अजून पण सहा वर्षांपूर्वी भुलेश्वरला गेलो होतो त्याची ही आठवण. पुण्यात एक भाचा व एक भाची यांची घरे आहेत. दोघांनाही मुलं झालेली पण बघायला जाणे काही ना काही कारणाने राहूनच जात होते. बरं जायचं म्हटलं कि प्रत्येकाकडे एक दोन दिवस तरी राहणे आलेच. शेवटी त्यांना सांगितले कि एखाद्या सुटीच्या दिवशी आपण सर्व बाहेरच कुठेतरी एकत्र भेटू. भेटणेही होईल आणि एक कौटुंबक सहलही.
भुलेश्वरला जाण्याचा प्लॅन ठरला. आम्ही मुंबईहून निघालो ते सिंहगड रोडच्या आसपास आम्हाला येऊन मिळाले. खूप मस्त कट्टा झाला. जेवण सोबत आणलेले होते त्यातच रविवार असल्याने देवस्थानातर्फे डाळ-भाताचा गरमागरम महाप्रसाद मिळाला होता.

काही फोटो


अतिशय सुंदर पण भग्न शिल्पे

स्त्री गणेश

कळसाच्या मूळ काळ्या दगडातल्या सुंदर रूपाचे रंगरंगोटीकरण

भुलेश्वर मंदिर तर माझ्या खूपच आवडीचे आहे :)

हो. अत्यंत सुंदर बांधकाम आणि शिल्पे.

गोरगावलेकर's picture

20 Feb 2021 - 10:18 pm | गोरगावलेकर

माझ्या वरील प्रतिसादात मी "स्त्री गणेश" लिहिले पण त्याखाली फोटो मात्र द्यायचा राहिला होता तो देत आहे

प्रचेतस's picture

21 Feb 2021 - 7:01 am | प्रचेतस

ही वैनायकी किंवा गणेशीनीची प्रतिमा.

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2021 - 1:29 pm | चौथा कोनाडा

प्रचेतस,
या प्रतिसादांमुळे मला तुमचा " भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट " हा धागा हमखास आठवला !

किल्लेदार's picture

7 Mar 2021 - 9:01 pm | किल्लेदार

रंगरंगोटी ...!!!
या जुन्या शिल्पांची रंगरंगोटी बघितली की काळजात चर्रर्र होतं. ज्या डोक्यातून नूतनीकरणाची कल्पना निघाली त्या डोक्यात तिथेच पडलेला एखादा चिरा उचलून घालायची तीव्र इच्छा होते.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 12:08 pm | मुक्त विहारि

आवडले...

गणेशा's picture

20 Feb 2021 - 11:46 pm | गणेशा

अप्रतिम...

अथांग आकाश's picture

21 Feb 2021 - 9:32 am | अथांग आकाश

वा! छान झाली धावती भेट!

सिरुसेरि's picture

21 Feb 2021 - 2:11 pm | सिरुसेरि

प्रवास वर्णन आणी सर्वच फोटो खुप छान . "रसवंतीवाल्याची परी" हा फोटो अप्रतिम . +१००

एक_वात्रट's picture

24 Feb 2021 - 7:08 pm | एक_वात्रट

प्रवासवर्णन सुंदर. जाधवगड हॉटेल आवडले नाही. रहायच्या खोल्या ठिगळ लावल्यासारख्या वाटतात. जुन्या आणि नव्याची विचित्र सरमिसळ वाटते. ५०० रुपयांत काय मिळते? निदान चहा तरी? का फक्त हॉटेल पहायचे ५०० रुपये?

मोरगावचे आणि जेजुरीचे मंदिर सुंदर. मागे पाहिली आहेत, पण फोटो पाहून आता परत जावेसे वाटते आहे.

गोरगावलेकर's picture

24 Feb 2021 - 9:39 pm | गोरगावलेकर

धन्यवाद प्रचेतस, बाप्पू, मुवि, गणेशा, अथांग आकाश, सिरुसेरि
एक_वात्रट: आम्हाला किल्ल्यात प्रवेश मिळालाच नाही त्यामुळे रहायच्या खोल्या बघायला मिळाल्या नाहीत. उपहारगृहात काही पदार्थ विकत घेतल्यास तिकिटाचे पैसे वजा होतात असे समजते. अनुभव नाही. पेठेकर काकांचा लेख वाचल्यास इथे राहणे किती खर्चिक आहे ते कळते. त्याऐवजी पाचशे रुपयात एकदिवशीय सहल होत असेल तर माझ्यासारखीच्या दृष्टीने ठीकच.

Ajit Gunjal's picture

24 Feb 2021 - 10:11 pm | Ajit Gunjal

Nice Images

फोटो छान
Sai Baba Images

अनिंद्य's picture

26 Feb 2021 - 8:23 pm | अनिंद्य

झकास.
एका दिवसात बरीच मजल गाठलीत !