हॉटेल जाधवगड
हॉटेल जाधवगड हे सासवड-नारायणपूर रस्त्यावर पुण्यापासून ४० कि.मी.वर आहे.
ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे.
जाधवरावांच्या इतिहासात खोलवर उतरल्यावर जाणवते की हे मूळचे यादव राय.
देवगिरी आणि सिंदखेड ह्या दोन्ही ठिकाणी यादवरायचे उल्लेख आहेत. पुढे सिंदखेडच्या यादवरायचे जाधवराव झाले. ह्याच कुळातील पिलाजीराव जाधवराव हे शाहू महाराजांच्या सैन्यात सरदार होते. अंगचे शौर्य आणि तलवारीचे पाणी ह्याच्या जोरावर त्यांनी शाहूराजांच्या सेवेत बरीच मर्दुमकी गाजवून ते राजांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात पोहोचले. २१ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढून आलेल्या शाहूराजांना गादीवर बसविण्यात पिलाजीरावांचा सिंहाचा वाटा होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना सासवड, मल्हारगाव(?) आणि आसपासची काही गावे जहागीर म्हणून मिळाली. सरदार पिलाजी जाधवरावांनी १७१० साली सासवडपासून जवळच हा गड बांधला. आपले कुटुंब आणि खजिना शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला.
जाधवगडाचे आजचे मालक श्री. सूरसिंह जोत्याजीराव जाधवराव आणि श्री. अमरसिंह जोत्याजीराव जाधवराव. पैकी श्री. सूरसिंह हे महाराष्ट्र सरकारात आमदार होते, तर श्री. अमरसिंह हे गोवा मुक्तिसंग्रामात सक्रिय होते. तर हा जाधवगड श्री विठ्ठल कामत ह्यांनी विकत की लीजवर घेतला आणि तिथे महाराष्ट्रातील एकमेव हेरिटेज हॉटेल विकसित केले. अशाच एका मित्राने शिफारस केली, तेव्हा ह्या भारतभेटीत निवांतपणासाठी जाधवगडला भेट द्यायचे ठरवले.
वाटेत दिवेघाटात मस्तानीच्या तलावाचे दर्शन झाले.
ऐतिहासिक स्थळ. दूरवर तलाव तर दिसत होता. पण पुण्यापासून इतक्या दूर मस्तानी आंघोळीसाठी का यायची? असा उगीच एक प्रश्न मनात आला. पण असेही ऐकले आहे की तिथल्या आजूबाजूच्या गावांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मस्तानीने स्वखर्चाने हा तलाव बांधला, म्हणून ह्याला मस्तानीचा तलाव असे नाव पडले. खरे-खोटे कळत नाही, पण पुढच्या भेटीत 'मस्तानीचा तलाव' हे नाव यादीत जोडले गेले, एवढे मात्र खरे.
सासवडकडून नारायणपूरकडे जाताना उजव्या हाताला एक रस्ता लागतो. तिथे फलक आहे 'फोर्ट जाधवगडकडे-->'. ह्या रस्त्याने गेले की तुम्ही थेट जाधवगडावर पोहोचता. जाधवगडावर हा फलक तुमचे स्वागत करतो...
हॉटेलच्या आवारात शिरल्यावर तिथले 'मावळे' तुमच्या गाडीचा आणि सामानाचा ताबा घेतात. तुम्ही मोकळ्या हाताने गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे प्रस्थान ठेवता.
महाद्वारावर तुतार्यांनी आणि ढोल-ताशांनी तुमचे स्वागत होते. लई भारी वाटते, राव! आत शिरल्यावर तुमच्या कपाळी कुंकुमतिलक लावला जातो आणि तुमच्या मनावर राजेशाही मूड राज्य करू लागतो. आंतरजालावरून आरक्षण केल्यामुळे स्वागतिकेने अगतिक न होता आम्हाला आमच्या खोलीच्या किल्ल्या आणि खोली दाखवायला, सामान वर न्यायला एक साहाय्यक दिला. (ते बरे झाले. पायर्या फारच उंच आहेत).
खोली नीटनेटकी आणि स्वच्छ होती. बाथरूम, सामान ठेवण्याची व्यवस्था, तिजोरी वगैरे व्यवस्था चांगली आहे. सर्व सामान व्यवस्थित लावून तिथेच सेवेसाठी ठेवलेल्या चहा-कॉफीचा आस्वाद घेऊन जरा विश्रांती घेतली आणि हॉटेलच्या तरणतलावाकडे प्रस्थान ठेवले. फारच नयनरम्य वगैरे म्हणता येईल असे तरणतलावाचे दृश्य होते.
तास-दीड तास स्वच्छंद डुंबून झाल्यावर जड अंगाने आणि मनाने तलावातून बाहेर पडलो. भूक सपाटून लागली होतीच. त्यामुळे कपडे वगैरे बदलून कॅफेटेरियाकडे मोर्चा वळवला. वाफाळता चहा, मिश्र भजी, चीज चिली टोस्ट तुडुंब खाऊन घेतले.
समोर आलेली गरमगरम मिश्र भजी पहिल्याच धडाक्यात संपली आणि नंतर छायाचित्र काढायचे लक्षात आले. त्यामुळे, खाद्य मॉडेलिंगसाठी, चीज चिली टोस्ट फक्त उरले.
संध्याकाळचा फेरफटका मारायला गेलो. बाजूलाच व्यवस्थित निगा राखलेली आणि आकर्षक रचना केलेली हिरवळ आहे.
हिरवळीवर व्हॉलीबॉल, क्रिकेट यासारखे खेळ तिथले कर्मचारी खेळत असतात. रोजचा व्यायाम होतो, टीमवर्क अंगी बाणवते आणि कार्यस्थळी उत्साही वातावरण टिकून राहते. व्यवस्थापनाचा हा प्रयोग अत्यंत सकारात्मक आहे.
ह्या कर्मचार्यांच्या खेळात तुम्हीही सामील होऊ शकता. किंवा तुमच्याजवळ पूर्ण संघ असेल, तर तुम्ही स्वतंत्र सामना खेळू शकता. आता हळूहळू अंधारू लागले होते.
संध्याकाळी मिश्र भजी आणि चीज चिली टोस्टचा भरपेट नाश्ता केल्यामुळे रात्रीचे जेवण हलकेच घेतले आणि सुखासीन खोलीवर परतून मस्त ताणून दिली.
रोजच्या वेळे आधीच झोपल्याने जागही लवकर आली. हॉटेलचे पहाटेचे व्यवहार सुरू झाले होते.
नाश्त्याला इडली, डोसा, पोहे, उपमा वगैरे पदार्थ होते. शिवाय फळे आणि फळांचे ताजे रससुद्धा होते. चहा-कॉफी तर असतेच असते.
भरपेट नाश्ता करून भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने पुन्हा एकदा भटकंतीला निघालो. आमचे लेकरू (वय वर्षे ३१) ट्रेकिंगला गेले असल्याने आम्ही देवळाकडे आमचा मोर्चा वळवला. ३०० वर्षे जुने देऊळ आहे.
आत एक पुजारी होते. काकूंनी देवळात जाऊन आरती वगैरे केली. मी दीवारमधल्या अमिताभसारखा कट्ट्यावर बसून वाट पाहात बसलो. काकूंची आरती वगैरे आटोपल्यावर आम्ही हिरवळीवर अनवाणी फेरफटका मारला. तेव्हा तिथेच मागच्या बाजूला हॉटेलचे तंबू आहेत ते दिसले.
हे तंबूही तुम्हाला हवे असल्यास मिळतात. पण भाडे तेवढेच आहे, जेवढे हॉटेलच्या खोलीचे. फरक काही नाही. शिवाय वरील छत वगळता बाकी भिंती सिमेंट-काँक्रीटच्याच आहेत त्यामुळे तंबूचा म्हणावा तसा आभास निर्माण होत नाही. हॉटेलात ४२ खोल्या आणि १२ तंबू आहेत.
ट्रेकच्या वाटेवर हरणे, माकडे दिसतातच, शिवाय कोल्हे दिसतात, शिवाय केकारवही कानावर येतो.
भरपूर फूलझाडांनी आणि इतर विविध वनस्पतींनी वेढलेला परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि देवळातील घंटानाद - शहरातील धावपळीच्या दैनंदिन जीवनातून तुम्हाला एका अफलातून निवांत आणि प्रसन्न जगात घेऊन जातो.
सुगरणीची घरटी सर्वत्र दिसतात आणि बहिणाबाईंची कविता आठवते.
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
हे सर्व दृश्य पाहताना मन अंतर्मुख होते. खरेच सुगरणीला देवाने फक्त चोच दिली आहे. तेच दात, तेच ओठ आणि तेच हात. पण देवाने आपल्याला दोन हात, दहा बोटे दिली असताना प्रसंगी आपण निराश का होतो? सुगरणीने, तुटपुंज्या ताकदीनेही काडी काडी जमवून अतिशय सुंदर घरटे बांधण्याची हिंम्मत बाळगलेली दिसते. माणूस येता जाता निराश का होतो? असो.
तिथेच झाडांना झोके बांधलेले आहेत. मस्त झोके घ्या, हिरवळीवर लोळा, देवदर्शन घ्या, नाहीतर पक्षी, फूलपाखरे ह्यात मन रमवा. खर्या अर्थाने मन आणि शरीर ताजेतवाने होऊन जाते. ताज्यातवान्या शरीराला मात्र सारखी भूक लागते. जेवणाची वेळही होत आली असते.
जेवणाच्या टेबलवर पुन्हा एकदा सामिष आणि निरामिष जेवण तुमचे जिव्हालौल्य शमविते.
काकूंच्या अनेक उपवासांपैकी त्या दिवशीही कुठलातरी एक होता. त्यांनी फलाहार आणि दूध ह्यावरच गुजराण केली.
आम्ही दोघांनी (लेकरू आणि स्मादिक) पिठले, भाकरी, वांग्याची झणझणीत भाजी, बटाट्याची भजी आणि चविष्ट ताक असा बेत झोडला.
हॉटेलच्या सज्जातून, जिथे आम्ही सकाळ-संध्याकाळ नाश्ता आणि जेवायला बसायचो, आजूबाजूचा परिसर मस्त दिसायचा. थंड वारा शरीराचे लाड करायचा. आपण जेवत असताना पक्षिगण येतात. पण आमच्या नशिबात फक्त आणि फक्त कावळाच होता. यायचा बिचारा. काव काव करून त्याला जमेल तितक्या कोमल आवाजात आमचे मन रिझवायचा प्रयत्न करायचा. बिदागी स्वरूपात पोळीचे दोन तुकडे अगदी नम्रतेने स्वीकारून निघून जायचा. समोरच्या झाडावर खारी असायच्या. त्या चिमण्यांशी खेळत राहायच्या.
नवीन ठिकाणची पहाट पाहायला मला खूप आवडते. पहाटेचे जगच वेगळे. सर्व पक्षी, प्राणी सूर्योदयालाच जागे होतात. मनुष्यप्राणीच फक्त उशिरापर्यंत गादीवर लोळत राहण्यात सुख मानतो. पक्षी-प्राणी सूर्यास्ताबरोबर झोपतात आणि सूर्योदयाला जागे होतात. त्यांच्या लेट नाइट पार्ट्या चालत नाही. सगळ्या पार्ट्या दिवसाउजेडीच. निसर्गगान गात गात स्वच्छंद जीवन जगतात. मनुष्यप्राण्याच्या संरक्षणार्थ रात्रभर जागणारा माणसाचा प्रामाणिक मित्रच कधीकधी उशिरापर्यंत झोपतो. ह्या पक्षी-प्राण्यांची दिनचर्या जवळून अनुभवता येते. आपण निसर्गाच्या समीप जातो. तो अनुभव फार रोमांचकारी असतो. निसर्गाशी समरस होता होताच, पहाटेच्या वेळी दगडमातीचा गडाचा अंतर्भागही प्रसन्नतेने जागा होत आहे असा भास होतो.
गड उतरून बाहेर गेल्यावर गडाच्या बाहेरील भिंतीला लागून एक रस्ता जाधववाडीत जातो. इथे रस्त्याच्या एका बाजूला जाधवगडाची बाह्य भिंत, तर दुसर्या बाजूला झेंडूच्या फुलांचे मळे दिसतात. ठरावीक अंतरावर असणार्या ग्रामीण घरांच्या अंगणात गायींचे गोठे आहेत. सकाळ उजाडताना अर्ध्यामुर्ध्या अंधार-उजेडात गावकरी चरव्या भरभरून गायीचे दूध काढत असतात. शहरातील हे दुर्मीळ दृश्य इथे पावलापावलावर दिसते. एखादा ग्लास धारोष्ण दूध (विकत) घेऊन प्यावे असे फार फार वाटले, पण संकोच आड आला. आता पस्तावतो आहे.
आज जेवणात शाकाहारात भरली वांगी, पिठले-भाकरी, मसालेभात होता, तर मांसाहारात सावजी कोंबडी, कोल्हापुरी तांबडा रस्सा मटण वगैरे चविष्ट पदार्थ होते. मिष्टान्न म्हणून अतिशय सुंदर, माफक गोड बासुंदी होती. अप्रतिम. श्रीखंड-पुरीसुद्धा स्वतःचा ठसा मनावर (आणि पोटावर) उमटविण्यात यशस्वी होते. जाधवगडावर खाण्यापिण्याची रेलचेल आहे. कमरेचा कसा जरा ढिला करावा लागतो. (जरा?.... असो.)
गडाच्या पायथ्याला श्री. विठ्ठल कामत ह्यांचे खाजगी संग्रहालय आहे. खाजगी असले, तरी पाहण्यासाठी सर्वांना उपलब्ध असते. छायाचित्रणाला मनाई आहे. संग्रहातील वस्तू, शिरस्त्राणे, अडकित्ते, स्वयंपाकघरातील भांडी, वगैरे वगैरे अनेक वस्तू पाहावयास मिळतात. पैकी पितळेचा उभा कुकर, दगडी खल, पितळी देव-देवता इ.इ. मी माझ्या लहानपणी हाताळलेले असल्याने मला त्याचे विशेष कौतुक वाटले.
तीन दिवस राहून मन प्रचंड प्रसन्न झाले. नवा उत्साह नसानसातून उसळत होता. जड अंतःकरणाने रोजच्या रूक्ष शहरी दिनश्चर्येकडे वाटचाल सुरू झाली. पण मन अजून तिथून पाय काढायला तयार नव्हते. डोळे मिटले रे मिटले की ह्या अभिनव अनुभवाचा स्मृतिपट मनःपटलावर उलगडायचा.
टीकाटिप्प्णी:-
जाधवगड अत्यंत देखणा आहे.
हॉटेलचा कर्मचारिवर्ग आदबशीर आहे.
गडावरील वास्तव्याचा अनुभव येतो.
संपूर्ण निवांतपणा लाभतो.
नाश्ता-जेवण चविष्ट आहे.
पण.....
फार महाग आहे. आम्हा तिघांचे एका खोलीचे ३ दिवसांचे ५३०००/- रुपये झाले. (जायचा-यायचा खर्च वेगळा).
तुलनेने युरोपातील हॉटेल्स मला स्वस्त वाटली. पण तिथे आपले जेवण मिळत नाही.
गडाच्या बाह्य आणि अंतर्भागातल्या दगडी पायर्या ८ ते १० इंच उंच आहेत. आधारासाठी हँडरेलसुद्धा नाहीत.
तुमचे वजन जास्त आणि गुडघ्यांचे दुखणे असेल (माझ्यासारखे), तर जाता-येता, चढता-उतरता ब्रह्मांड आठवते.
आम्हाला मिळालेली खोली ही गडावर कोठी (धान्य साठवण्याची) किंवा युद्धकैद्यांना ठेवण्याची कोठडी असावी. खोलीला एकही खिडकी नव्हती. ४ इंच X ६ इंच आकाराचे झरोके काचेने बंद केलेले आहेत. त्यामुळे खोलीत चांगला एसी असूनही घुसमटल्याची भावना होते.
तरणतलावात संगीत नाहीये, तसेच वेळ समजण्यासाठी भिंतीवर घड्याळही नाही. साळुंख्या पाणी प्यायला येतात, तेवढीच तरणतलावाला जाग. बाकी स्मशानशांतता होती.
तरणतलावाकाठी खानपान सेवाही नाही. अल्कोहोल मनाई आहे.
पाण्याचे तापमान नियंत्रित आहे, ते एक सुख म्हणायचे.
हॉटेलच्या स्पा, इंटरनेट आदी सेवा सशुल्क आणि महाग आहेत.
राहायची व्यवस्था आम्ही हाफ-बोर्ड (नाश्ता आणि राहणे) घेतली होती. त्याऐवजी फुल बोर्ड (राहणे, नाश्ता, दोन वेळचे जेवण आदी) घेतली असती तर बरे झाले असते. गडाबाहेर खाण्यापिण्याची कुठेही व्यवस्था नाही.
भरपूर खर्च करायची मानसिक तयारी असेल, तर जरूर जरूर भेट द्यावी असे आहे.......
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 8:57 am | प्रचेतस
एकदम शाही आहे.
काकांचा मिश्किल स्वभाव काही काही वाक्यांतून डोकावतोय.
मल्हारगाव म्हणजे जेजुरी किंवा जवळपासचेच सोनोरी असावे. सोनोरीला लागून असलेल्या डोंगरावर पेशव्यांचे सरदार भीवराव पानसे ह्यांनी मराठेशाहीतील शेवटचा किल्ला बांधला तो म्हणजे मल्हारगड. पण तो नन्तरचा, १७७५ सालातला. जाधवांची गढी खूप आधीची.
बाकी सोनोरी गावातही सरदार पानसे ह्यांची अशीच एक गढी आहे ज्यात अशोक सराफ-दिलीप प्रभावळकरांच्या 'एक डाव भुताचा' ह्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यातील भुताचा वाडा म्हणजे पानसेंची गढी.
29 Oct 2016 - 12:09 pm | मनिमौ
मला जाधवगड ला जायची फार ईच्छा आहे. पण पेठकर काका म्हणाले तस ईतक्या जवळपास च्या ठिकाणी ईतके पैसे खर्च करावे की नाही अस वाटत.कारण एवढ्या पैशां मधे जवळपास 8 दिवस बाहेरगावी जाऊन येतो येते
6 Nov 2016 - 2:57 am | नेत्रेश
दिसताहेत त्यांच्या वेबसाईट वर
link
29 Oct 2016 - 1:20 pm | यशोधरा
पेठकरकाकांचे लेखन आवडले पण कामतांच्या अप्रोफेशनलपणाबद्दल इतके ऐकले वाचले आहे. जाधवगड त्यांनी चालवायला घेतले आहे ना?
3 Nov 2016 - 12:52 am | प्रभाकर पेठकर
जाधवगड त्यांनी चालवायला घेतले आहे ना?
नक्की माहिती मिळत नाही. बहुतेक (उभारणीकरून) लिजवर चालवायला घेतले असावे.
29 Oct 2016 - 6:16 pm | पद्मावति
मस्तं वर्णन आणि फोटो, प्रभाकरजी.
29 Oct 2016 - 6:56 pm | कंजूस
चांगली ओळख करून दिली आहे पेठकरकाका.व्हॅल्यु फॅार मनि आहे का हे हेरिटेज अथवा थ्री स्टार हॅाटेल्सचा अनुभव घेतलेले पर्यटकच लिहू शकतात.
केरळ,राजस्थान,गुजरात,मप्रमध्ये या टाइपची /हेरिटेज हॅाटेल्स आहेत. पण तिथे पर्यटक फार दिसतात. हमरस्त्यालगत असल्यानेही वर्दळ वाढते. इतर हॅाटेल्सपेक्षा हेरिटेजना अधिक टॅक्स लावतात का सरकार ते माहित नाही.बिजापुरातल्या मयुरामध्ये तीन हजार रु रुम आहे असं कळलं.
3 Nov 2016 - 12:58 am | प्रभाकर पेठकर
व्हॅल्यु फॅार मनि आहे का हे हेरिटेज अथवा थ्री स्टार हॅाटेल्सचा अनुभव घेतलेले पर्यटकच लिहू शकतात.
मला वाटतं जेव्हढा खर्च होतो तो पुरेसे समाधान मिळवून देत नाही. शिवाय, स्पा, वाय-फाय ह्या सेवा सशुल्क आहेत. आणि कित्येक सोयी सुविधा, खेळ, करमणूक वगैरे वगैरे फक्त शनिवार-रविवारच असते. म्हणजे इतर दिवशी फारच रुक्ष आहे.
29 Oct 2016 - 10:42 pm | ज्योति अळवणी
वाचून एकदा जाऊन बघावे असे मनात येते आहे. पण इतके महाग आहे की कदाचित् फक्त मनात राहील हा विचार
3 Nov 2016 - 1:00 am | प्रभाकर पेठकर
खर्चावर जास्त विचार केला तर जाऊ नका, गेलाच तर खर्चाचा विचार करू नका.
7 Nov 2016 - 8:00 am | अगम्य
हा प्रतिसाद बेहद्द आवडला. एका प्रवचनाने साध्य होणार नाही ते सार एका वाक्यात!
30 Oct 2016 - 12:01 am | माम्लेदारचा पन्खा
गडाचं साठेखत केलं की काय मालकानं ???
30 Oct 2016 - 8:03 am | मित्रहो
वर्णन वाचताना आपण जाउ असे ठरविले. शेवटी बॉंब पडला. माणसासाठी दिवसाला सहा हजार जास्त होतात.
3 Nov 2016 - 1:01 am | प्रभाकर पेठकर
भारतात खुप ठिकाणी हॉटेलवास्तव्य महागच आहे. लोणावळ्यातही हॉटेलचे दर काहिच्या काहीच आहेत.
30 Oct 2016 - 10:14 am | इशा१२३
छान आहे जाधवगड! ओळख आवडली.
30 Oct 2016 - 10:26 pm | अत्रन्गि पाउस
इथे जेऊ म्हणून एकदा मोरगाव पुणे मार्गावर असतांना गेलेलो ...तुताऱ्या वगैरे ऐकून मजा आली पण १-१.५ हजार माणशी जेवणाच्या खर्चाचा अंदाज आल्यावर बजेट मध्ये नाही असे म्हणून बाहेर पडलो ...
30 Oct 2016 - 11:07 pm | चित्रगुप्त
लेख आवडला.
मध्यप्रदेशात स्वस्त आणि मस्त अनेक जागा आहेत. उदा. मांडवगड, ओरछा, चित्रकूट, महेश्वर, पचमढी, खजुराहो वगैरे.
30 Oct 2016 - 11:34 pm | रेवती
वृत्तांत आवडला. जाधवगडबद्दल बरेच ऐकले आहे. खर्चाबद्दल आत्ता समजले. महाग दिसतेय.
फोटू आवडले.
31 Oct 2016 - 11:18 am | उल्का
जाधवगड विषयी जाणून घ्यायचे होते. खूप ऐकले होते. तुम्ही दोन्ही बाजू नीट लिहिल्या आहेत. लेखनशैली आवडली. धन्यवाद.
31 Oct 2016 - 12:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
वृत्तांत आवडला. कंपनीच्या एका इव्हेंटसाठी इथे एक दिवस पूर्ण घालवलाय, सहकुटूंब. मज्जा आली होती.
31 Oct 2016 - 12:15 pm | नाखु
समाधान शेवटच्या वाक्याने कळाले (किमान ४ वर्षांमागे), बाकी वर्णन रोचक आणी सूचकही.
31 Oct 2016 - 12:45 pm | सर्वसाक्षी
अरेच्चा! ते का बरे? अन्य पेयाची चौकशी करताना संकोच वाटणे समजू शकते :)
ता क : सौंचा उल्लेख आपण काकू असा सर्रास करता. हे त्यांना माहित (आणि मान्य) आहे का? त्या बहुधा मिपावर येत नसाव्यात्
आपल्याला मजा आली तर खर्च वसूल झाला म्हणायचा. मस्त.
3 Nov 2016 - 1:12 am | प्रभाकर पेठकर
अन्य पेयाची चौकशी करताना संकोच वाटणे समजू शकते
अन्य पेये विनासंकोच हॉटेलातच मिळतात. पण इथे संकोच अशासाठी की तो माणूस दुग्धव्यवसाय करतो की फक्त त्याच्या बायकोमुलांसाठी त्याने गायी पाळल्या आहेत हे माहित नव्हते. तो विकत नसेल तर आपण पैसे देऊ करणं त्याला रुचेल किंवा कसे? आणि समजा त्याने पैसे न घेताच ग्लासभर दूध देऊ केले तर आपल्याला कानकोंडे वाटेल ह्या सर्व कारणांमुळे संकोच वाटला.
सौंचा उल्लेख आपण काकू असा सर्रास करता. हे त्यांना माहित (आणि मान्य) आहे का? त्या बहुधा मिपावर येत नसाव्यात्
मी 'काका' झालो तेंव्हापासून तीही 'काकूच' झाली नं. अर्थात मी जेव्हढा 'काका' दिसतो तेव्हढी ती 'काकू' दिसत नाही हे खरे आहे. पण असते कांही जणांची प्रकृती की सोने खाऊ घातले तरी अंगी लागत नाही तर कोणी नुसता श्वास घेतला तरी अंगाखांद्यावर दिसू लागते.
तिला मी काकू म्हणतो ते माहित आहे. (मान्य अर्थातच नाहीये पण त्यामुळेच जास्त मजा येते नं?) मिपावर येत वगैरे नाही पण माझे लेख तिच्यापासून लपून नाहीयेत. ती वाचते. मीच मिपा उघडून देतो.
3 Nov 2016 - 1:25 am | स्रुजा
हीहीहीही.. हे छान आहे ! काय त्या ताईंना ( नाही म्हणणार मी त्यांना काकु !!) त्रास द्यावा म्हणते मी.
आवडली ओळख. एक दिवसाची ट्रिप केली तर कदाचित एवढा खर्च येणार नाही.
जायचं मनात आहेच , तुमचा लेख वाचुन आता नक्की जाईन.
3 Nov 2016 - 11:15 am | प्रभाकर पेठकर
>>>>( नाही म्हणणार मी त्यांना काकु !!)
पण मी म्हणतो, 'काकू' म्हणण्यास का बरे 'का....कू' करावे?
3 Nov 2016 - 11:50 pm | स्रुजा
आज सुपात उद्या जात्यात वगैरे भानगड हो .. याचा नैतिक उपयोग मला काही वर्षांनी होणार आहे ;)
31 Oct 2016 - 12:53 pm | नंदन
खास पेठकरकाकांच्या शैलीतली नेमकी ओळख आवडली.
(वाचनखूण साठवता आली नाही या लेखाची)
31 Oct 2016 - 3:47 pm | त्रिवेणी
मायबोली वर निगेटिव्ह अनुभव जास्त वाचनात आले.म्हणून कधी जायचा विचार केला नव्हता.
जलसुरुष्टी छान आहे.
31 Oct 2016 - 5:42 pm | अनिंद्य
आदबशीर कर्मचारीवर्ग आणि जेवणाबद्दल तुमचे अनुकूल मत वाचल्यावर मीच चुकिच्या दिवशी गेलो असेल कदाचित असे वाटले.
ह्याच दोन कारणांनी पुन्हा न जाण्याचे ठरले होते माझे.
अर्थात पुन्हा जाण्याइतके स्वस्त नाहीच जाधवगड.
3 Nov 2016 - 1:14 am | प्रभाकर पेठकर
आदबशीर कर्मचारीवर्ग आणि जेवणाबद्दल तुमचे अनुकूल मत वाचल्यावर मीच चुकिच्या दिवशी गेलो असेल कदाचित असे वाटले.
कदाचित आता कर्मचारीवर्ग बदलला असावा. किंवा नशिबाचा भागही असू शकेल. माझा अनुभव चांगला होता.
31 Oct 2016 - 5:44 pm | कपिलमुनी
जाधवगडच्या वेबसाईटवर सिंगल डे पॅकेज आहे पण किंमत लिहिली नाही.
कोणि एकदिवसीय सहल कर्रोन आले आहे कय ?
31 Oct 2016 - 5:48 pm | खटपट्या
जाधवगडची ओळख आवडली. रेट कायच्या काय आहेत. मुक्काम न करता एकदा भेट द्यायला हवी.
31 Oct 2016 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
पेठकरकाकांच्या खास शैलितली रोखठोक ओळख आवडली ! मस्तं लेख, आणि तेवढाच माहितीपूर्ण !
3 Nov 2016 - 1:16 am | प्रभाकर पेठकर
का लाजवताय गुरु? तुमच्या प्रवासवर्णनांसमोर आमचा लेख म्हणजे अगदी शाळकरी निबंध आहे.
31 Oct 2016 - 6:34 pm | बोका-ए-आझम
कामतांवर भरपूर खर्च करायची अजिबात तयारी किंवा इच्छा नाही. त्यामुळे पास. प
31 Oct 2016 - 8:41 pm | अभ्या..
कामत गंडीव फशीव आहेत.
५३ हजार म्हणजे कैच्या कै.
जरा बुडाखाली केंदाळ असतं तर ह्याच्या वनफोर्थ रेटमध्ये नळदुर्गात सुरु करता येईल. अर्थात इतके पैसे देऊन इकडे येणार कोण हा प्रश्नच आहे म्हणा.
31 Oct 2016 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा
छान ओळख.
1 Nov 2016 - 7:59 am | मराठमोळा
ओळख आवडली..
मागे शिमला मनाली ट्रीप मधे हरयाणातल्या वाटेवर अशी बरीच भवदिव्य हॉटेल्स पाहिली आणि अनुभवली होती ते आठवले..
1 Nov 2016 - 2:17 pm | सुबोध खरे
फोटो आणि वर्णन उत्तम
1 Nov 2016 - 5:08 pm | वरुण मोहिते
त्यांचा म्हणजे मूळ मालकांचा पुतण्या माझा वर्गमित्र बारामतीला इंजिनिअरिंगला असताना त्यावेळी जाणं झालेलं 2-4 दा. पण तरीही थोडा महाग वाटतं आता. कारण नसताना खूप रेट वाढवले आहेत
2 Nov 2016 - 6:14 am | रुपी
ओळख आवडली. लेखनशैली मस्त :)
2 Nov 2016 - 12:16 pm | गौतमी
लेख वाचुन २-३ वर्षांमागचे दिवस आठवले. मी ज्या ओफ्फिस्मध्ये कामाला होते त्या कंपनीचा इव्हेंट होता 'फोर्ट जाधवगड' ला, तेव्हा जाणं झालं होतं. काय सुंदर आहे ती जागा. आम्ही सगळे त्या टेंट मध्ये राहिलो होतो. मस्त, खुप खुप धमाल केली होती तिकडे. ३ दिवस धमाल सुरु होती नुसती. खुप महाग आहे पण हे ठिकाण. आम्ही कंपनीच्या खर्चाने गेलो होतो त्यामुळे 'फुकट ते पौष्टीक'.... पैसा वसुल (अर्थात 'बॉस' चा)
2 Nov 2016 - 12:28 pm | अमृत
खर्च ऐकून धक्का बसला. ५३ हजार बा प रे !
2 Nov 2016 - 2:14 pm | स्वाती दिनेश
नेमकी सूचक ओळख आवडली, दोन्ही बाजू समजल्या.
स्वाती
2 Nov 2016 - 4:50 pm | पैसा
खास "पेठकर स्टाईल लिखाण" पण मराठी हॉटेल म्हणून फारच महाग वाटले.
2 Nov 2016 - 9:50 pm | अभिजीत अवलिया
काकूंनी देवळात जाऊन आरती वगैरे केली. मी दीवारमधल्या अमिताभसारखा कट्ट्यावर बसून वाट पाहात बसलो.
--- भारी वाक्यरचना.
आमच्याकडे पण जेव्हा बायको देवळात जाते तेव्हा मी दीवारमधल्या अमिताभसारखा बाहेर फिरत बसतो. :)
3 Nov 2016 - 1:21 am | प्रभाकर पेठकर
प्रचेतस, यशोधरा, पद्मावति, कंजूस, ज्योति अलवनि, माम्लेदारचा पन्खा, मित्रहो, इशा१२३, अत्रन्गि पाउस, चित्रगुप्त, रेवती, उल्का, मिसळलेला काव्यप्रेमी, नाखु, सर्वसाक्षी, नंदन, त्रिवेणी, अनिंद्य, कपिलमुनी, खटपट्या, डॉ सुहास म्हात्रे, बोका-ए-आझम, अभ्या.., आत्मबंध, मराठमोळा, सुबोध खरे, सुबोध खरे, रुपी, गौतमी, अमृत, स्वाती दिनेश, पैसा आणि अभिजीत अवलिया मनापासून धन्यवाद.
3 Nov 2016 - 12:05 pm | कंजूस
हॅाटेल व्यावसायिक म्हणून तुम्हाला नवीन ठिकाणंना भेट देणं गरजेचच आहे.इतरांच्या शेरेबाजीवर/अनुभवांवर अवलंबून नाही मत बनवता येणार.क्लब महिन्द्रा वगैरे सोयी देतात पण त्यांचं कारपोरेट गिह्राइक आहे.निमराणा (राजस्थान) असंच आहे.
3 Nov 2016 - 11:50 am | आतिवास
की तुम्ही व्यवसाय सुरू केलात की काय.
बाकी जागेचं वर्णन सर्वांगीण (गुण आणि दोष दोन्ही या अर्थाने) झालं आहे.
(अवांतर -सामान उचलणारे मावळ्यांच्या वेषात असतात हे वाचून कसंतरी वाटलं. असो. जमाना बदलतो आहे.)
4 Nov 2016 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे
बरीच दशके एअर इंडियाने चक्क "महाराजा"ला सगळ्यांना कुर्निसात करायला लावला होता ! ;) :)