मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हॉटेल जाधवगड

प्रभाकर पेठकर · · लेखमाला
हॉटेल जाधवगड हॉटेल जाधवगड हे सासवड-नारायणपूर रस्त्यावर पुण्यापासून ४० कि.मी.वर आहे. ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे. जाधवरावांच्या इतिहासात खोलवर उतरल्यावर जाणवते की हे मूळचे यादव राय. देवगिरी आणि सिंदखेड ह्या दोन्ही ठिकाणी यादवरायचे उल्लेख आहेत. पुढे सिंदखेडच्या यादवरायचे जाधवराव झाले. ह्याच कुळातील पिलाजीराव जाधवराव हे शाहू महाराजांच्या सैन्यात सरदार होते. अंगचे शौर्य आणि तलवारीचे पाणी ह्याच्या जोरावर त्यांनी शाहूराजांच्या सेवेत बरीच मर्दुमकी गाजवून ते राजांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात पोहोचले. २१ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढून आलेल्या शाहूराजांना गादीवर बसविण्यात पिलाजीरावांचा सिंहाचा वाटा होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना सासवड, मल्हारगाव(?) आणि आसपासची काही गावे जहागीर म्हणून मिळाली. सरदार पिलाजी जाधवरावांनी १७१० साली सासवडपासून जवळच हा गड बांधला. आपले कुटुंब आणि खजिना शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला. जाधवगडाचे आजचे मालक श्री. सूरसिंह जोत्याजीराव जाधवराव आणि श्री. अमरसिंह जोत्याजीराव जाधवराव. पैकी श्री. सूरसिंह हे महाराष्ट्र सरकारात आमदार होते, तर श्री. अमरसिंह हे गोवा मुक्तिसंग्रामात सक्रिय होते. तर हा जाधवगड श्री विठ्ठल कामत ह्यांनी विकत की लीजवर घेतला आणि तिथे महाराष्ट्रातील एकमेव हेरिटेज हॉटेल विकसित केले. अशाच एका मित्राने शिफारस केली, तेव्हा ह्या भारतभेटीत निवांतपणासाठी जाधवगडला भेट द्यायचे ठरवले. वाटेत दिवेघाटात मस्तानीच्या तलावाचे दर्शन झाले. 1 ऐतिहासिक स्थळ. दूरवर तलाव तर दिसत होता. पण पुण्यापासून इतक्या दूर मस्तानी आंघोळीसाठी का यायची? असा उगीच एक प्रश्न मनात आला. पण असेही ऐकले आहे की तिथल्या आजूबाजूच्या गावांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मस्तानीने स्वखर्चाने हा तलाव बांधला, म्हणून ह्याला मस्तानीचा तलाव असे नाव पडले. खरे-खोटे कळत नाही, पण पुढच्या भेटीत 'मस्तानीचा तलाव' हे नाव यादीत जोडले गेले, एवढे मात्र खरे. सासवडकडून नारायणपूरकडे जाताना उजव्या हाताला एक रस्ता लागतो. तिथे फलक आहे 'फोर्ट जाधवगडकडे-->'. ह्या रस्त्याने गेले की तुम्ही थेट जाधवगडावर पोहोचता. जाधवगडावर हा फलक तुमचे स्वागत करतो... 1 हॉटेलच्या आवारात शिरल्यावर तिथले 'मावळे' तुमच्या गाडीचा आणि सामानाचा ताबा घेतात. तुम्ही मोकळ्या हाताने गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे प्रस्थान ठेवता. 1 महाद्वारावर तुतार्‍यांनी आणि ढोल-ताशांनी तुमचे स्वागत होते. लई भारी वाटते, राव! आत शिरल्यावर तुमच्या कपाळी कुंकुमतिलक लावला जातो आणि तुमच्या मनावर राजेशाही मूड राज्य करू लागतो. आंतरजालावरून आरक्षण केल्यामुळे स्वागतिकेने अगतिक न होता आम्हाला आमच्या खोलीच्या किल्ल्या आणि खोली दाखवायला, सामान वर न्यायला एक साहाय्यक दिला. (ते बरे झाले. पायर्‍या फारच उंच आहेत). खोली नीटनेटकी आणि स्वच्छ होती. बाथरूम, सामान ठेवण्याची व्यवस्था, तिजोरी वगैरे व्यवस्था चांगली आहे. सर्व सामान व्यवस्थित लावून तिथेच सेवेसाठी ठेवलेल्या चहा-कॉफीचा आस्वाद घेऊन जरा विश्रांती घेतली आणि हॉटेलच्या तरणतलावाकडे प्रस्थान ठेवले. फारच नयनरम्य वगैरे म्हणता येईल असे तरणतलावाचे दृश्य होते. 1 तास-दीड तास स्वच्छंद डुंबून झाल्यावर जड अंगाने आणि मनाने तलावातून बाहेर पडलो. भूक सपाटून लागली होतीच. त्यामुळे कपडे वगैरे बदलून कॅफेटेरियाकडे मोर्चा वळवला. वाफाळता चहा, मिश्र भजी, चीज चिली टोस्ट तुडुंब खाऊन घेतले. 1 समोर आलेली गरमगरम मिश्र भजी पहिल्याच धडाक्यात संपली आणि नंतर छायाचित्र काढायचे लक्षात आले. त्यामुळे, खाद्य मॉडेलिंगसाठी, चीज चिली टोस्ट फक्त उरले. संध्याकाळचा फेरफटका मारायला गेलो. बाजूलाच व्यवस्थित निगा राखलेली आणि आकर्षक रचना केलेली हिरवळ आहे. 1 1 हिरवळीवर व्हॉलीबॉल, क्रिकेट यासारखे खेळ तिथले कर्मचारी खेळत असतात. रोजचा व्यायाम होतो, टीमवर्क अंगी बाणवते आणि कार्यस्थळी उत्साही वातावरण टिकून राहते. व्यवस्थापनाचा हा प्रयोग अत्यंत सकारात्मक आहे. ह्या कर्मचार्‍यांच्या खेळात तुम्हीही सामील होऊ शकता. किंवा तुमच्याजवळ पूर्ण संघ असेल, तर तुम्ही स्वतंत्र सामना खेळू शकता. आता हळूहळू अंधारू लागले होते. संध्याकाळी मिश्र भजी आणि चीज चिली टोस्टचा भरपेट नाश्ता केल्यामुळे रात्रीचे जेवण हलकेच घेतले आणि सुखासीन खोलीवर परतून मस्त ताणून दिली. रोजच्या वेळे आधीच झोपल्याने जागही लवकर आली. हॉटेलचे पहाटेचे व्यवहार सुरू झाले होते. 1 नाश्त्याला इडली, डोसा, पोहे, उपमा वगैरे पदार्थ होते. शिवाय फळे आणि फळांचे ताजे रससुद्धा होते. चहा-कॉफी तर असतेच असते. 1 भरपेट नाश्ता करून भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने पुन्हा एकदा भटकंतीला निघालो. आमचे लेकरू (वय वर्षे ३१) ट्रेकिंगला गेले असल्याने आम्ही देवळाकडे आमचा मोर्चा वळवला. ३०० वर्षे जुने देऊळ आहे. 1 आत एक पुजारी होते. काकूंनी देवळात जाऊन आरती वगैरे केली. मी दीवारमधल्या अमिताभसारखा कट्ट्यावर बसून वाट पाहात बसलो. काकूंची आरती वगैरे आटोपल्यावर आम्ही हिरवळीवर अनवाणी फेरफटका मारला. तेव्हा तिथेच मागच्या बाजूला हॉटेलचे तंबू आहेत ते दिसले. 1 हे तंबूही तुम्हाला हवे असल्यास मिळतात. पण भाडे तेवढेच आहे, जेवढे हॉटेलच्या खोलीचे. फरक काही नाही. शिवाय वरील छत वगळता बाकी भिंती सिमेंट-काँक्रीटच्याच आहेत त्यामुळे तंबूचा म्हणावा तसा आभास निर्माण होत नाही. हॉटेलात ४२ खोल्या आणि १२ तंबू आहेत. ट्रेकच्या वाटेवर हरणे, माकडे दिसतातच, शिवाय कोल्हे दिसतात, शिवाय केकारवही कानावर येतो. भरपूर फूलझाडांनी आणि इतर विविध वनस्पतींनी वेढलेला परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि देवळातील घंटानाद - शहरातील धावपळीच्या दैनंदिन जीवनातून तुम्हाला एका अफलातून निवांत आणि प्रसन्न जगात घेऊन जातो. 1 1 1 सुगरणीची घरटी सर्वत्र दिसतात आणि बहिणाबाईंची कविता आठवते. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला हे सर्व दृश्य पाहताना मन अंतर्मुख होते. खरेच सुगरणीला देवाने फक्त चोच दिली आहे. तेच दात, तेच ओठ आणि तेच हात. पण देवाने आपल्याला दोन हात, दहा बोटे दिली असताना प्रसंगी आपण निराश का होतो? सुगरणीने, तुटपुंज्या ताकदीनेही काडी काडी जमवून अतिशय सुंदर घरटे बांधण्याची हिंम्मत बाळगलेली दिसते. माणूस येता जाता निराश का होतो? असो. तिथेच झाडांना झोके बांधलेले आहेत. मस्त झोके घ्या, हिरवळीवर लोळा, देवदर्शन घ्या, नाहीतर पक्षी, फूलपाखरे ह्यात मन रमवा. खर्‍या अर्थाने मन आणि शरीर ताजेतवाने होऊन जाते. ताज्यातवान्या शरीराला मात्र सारखी भूक लागते. जेवणाची वेळही होत आली असते. जेवणाच्या टेबलवर पुन्हा एकदा सामिष आणि निरामिष जेवण तुमचे जिव्हालौल्य शमविते. काकूंच्या अनेक उपवासांपैकी त्या दिवशीही कुठलातरी एक होता. त्यांनी फलाहार आणि दूध ह्यावरच गुजराण केली. 1 आम्ही दोघांनी (लेकरू आणि स्मादिक) पिठले, भाकरी, वांग्याची झणझणीत भाजी, बटाट्याची भजी आणि चविष्ट ताक असा बेत झोडला. हॉटेलच्या सज्जातून, जिथे आम्ही सकाळ-संध्याकाळ नाश्ता आणि जेवायला बसायचो, आजूबाजूचा परिसर मस्त दिसायचा. थंड वारा शरीराचे लाड करायचा. आपण जेवत असताना पक्षिगण येतात. पण आमच्या नशिबात फक्त आणि फक्त कावळाच होता. यायचा बिचारा. काव काव करून त्याला जमेल तितक्या कोमल आवाजात आमचे मन रिझवायचा प्रयत्न करायचा. बिदागी स्वरूपात पोळीचे दोन तुकडे अगदी नम्रतेने स्वीकारून निघून जायचा. समोरच्या झाडावर खारी असायच्या. त्या चिमण्यांशी खेळत राहायच्या. 1 नवीन ठिकाणची पहाट पाहायला मला खूप आवडते. पहाटेचे जगच वेगळे. सर्व पक्षी, प्राणी सूर्योदयालाच जागे होतात. मनुष्यप्राणीच फक्त उशिरापर्यंत गादीवर लोळत राहण्यात सुख मानतो. पक्षी-प्राणी सूर्यास्ताबरोबर झोपतात आणि सूर्योदयाला जागे होतात. त्यांच्या लेट नाइट पार्ट्या चालत नाही. सगळ्या पार्ट्या दिवसाउजेडीच. निसर्गगान गात गात स्वच्छंद जीवन जगतात. मनुष्यप्राण्याच्या संरक्षणार्थ रात्रभर जागणारा माणसाचा प्रामाणिक मित्रच कधीकधी उशिरापर्यंत झोपतो. ह्या पक्षी-प्राण्यांची दिनचर्या जवळून अनुभवता येते. आपण निसर्गाच्या समीप जातो. तो अनुभव फार रोमांचकारी असतो. निसर्गाशी समरस होता होताच, पहाटेच्या वेळी दगडमातीचा गडाचा अंतर्भागही प्रसन्नतेने जागा होत आहे असा भास होतो. 1 गड उतरून बाहेर गेल्यावर गडाच्या बाहेरील भिंतीला लागून एक रस्ता जाधववाडीत जातो. इथे रस्त्याच्या एका बाजूला जाधवगडाची बाह्य भिंत, तर दुसर्‍या बाजूला झेंडूच्या फुलांचे मळे दिसतात. ठरावीक अंतरावर असणार्‍या ग्रामीण घरांच्या अंगणात गायींचे गोठे आहेत. सकाळ उजाडताना अर्ध्यामुर्ध्या अंधार-उजेडात गावकरी चरव्या भरभरून गायीचे दूध काढत असतात. शहरातील हे दुर्मीळ दृश्य इथे पावलापावलावर दिसते. एखादा ग्लास धारोष्ण दूध (विकत) घेऊन प्यावे असे फार फार वाटले, पण संकोच आड आला. आता पस्तावतो आहे. आज जेवणात शाकाहारात भरली वांगी, पिठले-भाकरी, मसालेभात होता, तर मांसाहारात सावजी कोंबडी, कोल्हापुरी तांबडा रस्सा मटण वगैरे चविष्ट पदार्थ होते. मिष्टान्न म्हणून अतिशय सुंदर, माफक गोड बासुंदी होती. अप्रतिम. श्रीखंड-पुरीसुद्धा स्वतःचा ठसा मनावर (आणि पोटावर) उमटविण्यात यशस्वी होते. जाधवगडावर खाण्यापिण्याची रेलचेल आहे. कमरेचा कसा जरा ढिला करावा लागतो. (जरा?.... असो.) गडाच्या पायथ्याला श्री. विठ्ठल कामत ह्यांचे खाजगी संग्रहालय आहे. खाजगी असले, तरी पाहण्यासाठी सर्वांना उपलब्ध असते. छायाचित्रणाला मनाई आहे. संग्रहातील वस्तू, शिरस्त्राणे, अडकित्ते, स्वयंपाकघरातील भांडी, वगैरे वगैरे अनेक वस्तू पाहावयास मिळतात. पैकी पितळेचा उभा कुकर, दगडी खल, पितळी देव-देवता इ.इ. मी माझ्या लहानपणी हाताळलेले असल्याने मला त्याचे विशेष कौतुक वाटले. तीन दिवस राहून मन प्रचंड प्रसन्न झाले. नवा उत्साह नसानसातून उसळत होता. जड अंतःकरणाने रोजच्या रूक्ष शहरी दिनश्चर्येकडे वाटचाल सुरू झाली. पण मन अजून तिथून पाय काढायला तयार नव्हते. डोळे मिटले रे मिटले की ह्या अभिनव अनुभवाचा स्मृतिपट मनःपटलावर उलगडायचा. टीकाटिप्प्णी:- जाधवगड अत्यंत देखणा आहे. हॉटेलचा कर्मचारिवर्ग आदबशीर आहे. गडावरील वास्तव्याचा अनुभव येतो. संपूर्ण निवांतपणा लाभतो. नाश्ता-जेवण चविष्ट आहे. पण..... फार महाग आहे. आम्हा तिघांचे एका खोलीचे ३ दिवसांचे ५३०००/- रुपये झाले. (जायचा-यायचा खर्च वेगळा). तुलनेने युरोपातील हॉटेल्स मला स्वस्त वाटली. पण तिथे आपले जेवण मिळत नाही. गडाच्या बाह्य आणि अंतर्भागातल्या दगडी पायर्‍या ८ ते १० इंच उंच आहेत. आधारासाठी हँडरेलसुद्धा नाहीत. तुमचे वजन जास्त आणि गुडघ्यांचे दुखणे असेल (माझ्यासारखे), तर जाता-येता, चढता-उतरता ब्रह्मांड आठवते. आम्हाला मिळालेली खोली ही गडावर कोठी (धान्य साठवण्याची) किंवा युद्धकैद्यांना ठेवण्याची कोठडी असावी. खोलीला एकही खिडकी नव्हती. ४ इंच X ६ इंच आकाराचे झरोके काचेने बंद केलेले आहेत. त्यामुळे खोलीत चांगला एसी असूनही घुसमटल्याची भावना होते. तरणतलावात संगीत नाहीये, तसेच वेळ समजण्यासाठी भिंतीवर घड्याळही नाही. साळुंख्या पाणी प्यायला येतात, तेवढीच तरणतलावाला जाग. बाकी स्मशानशांतता होती. तरणतलावाकाठी खानपान सेवाही नाही. अल्कोहोल मनाई आहे. पाण्याचे तापमान नियंत्रित आहे, ते एक सुख म्हणायचे. हॉटेलच्या स्पा, इंटरनेट आदी सेवा सशुल्क आणि महाग आहेत. राहायची व्यवस्था आम्ही हाफ-बोर्ड (नाश्ता आणि राहणे) घेतली होती. त्याऐवजी फुल बोर्ड (राहणे, नाश्ता, दोन वेळचे जेवण आदी) घेतली असती तर बरे झाले असते. गडाबाहेर खाण्यापिण्याची कुठेही व्यवस्था नाही. भरपूर खर्च करायची मानसिक तयारी असेल, तर जरूर जरूर भेट द्यावी असे आहे....... 1

वाचन 42889 प्रतिक्रिया 0