आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे?
म्हणजे
विलायती
देशी
पहिल्या धारेची (हातभट्टी)
ह्या मधली कुठली निवडायची?
कुणाला आईस जास्त लागतो
कुणाला कमी
कुणाचा चिअर्स
तर कुणाचा चांगभलं
कुणाचा चखना काजू
तर कुणाचा चकली
फारच घोळ आहे बुवा.
कुणाचा एक पेग पुरतो
तर
कुणाचे दोन शिवाय मजा नाही
....
....
....
कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे
प्रेर्ना अर्थातच लघुत्तम साधारण विभाजकाची
प्रतिक्रिया
6 Dec 2020 - 5:37 am | टवाळ कार्टा
"कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे" याऐवजी "कुणी तरी बसायला* बोलवा रे" यात जास्त आपलेपणा आहे :)
*इथे "तो" अर्थ घेउ नये ;)
6 Dec 2020 - 10:58 pm | चामुंडराय
आधी कुणीतरी बसायला बोलवा रे असंच लिहिलं होतं परंतु "ह्या" बसायच्या ऐवजी "त्या" बसायचा विचार लोकांच्या मनात यायची शक्यता होती तेव्हा उगा गैरसमज नको म्हणून बदललं.
7 Dec 2020 - 4:55 am | टवाळ कार्टा
=))
6 Dec 2020 - 4:07 pm | कंजूस
विडंबन लसावि मसावि काढा रे.
7 Dec 2020 - 10:20 am | गड्डा झब्बू
काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन.....
######
जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई पियक्कड माणूस. त्यांच्या बाटलीतुन आज्जी पण प्यायची. आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. एवढे बेवडे येणार म्हणजे महीन्याचं दारूचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा गुत्तेवाला पास्कल उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही. बेवडे म्हणजे जीवाला घोर. तोंड दाबून चखण्याचा मार.
आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही. आत्या येणार म्हणजे सकाळी लवकर प्यायला मिळणार. आत्याचा नवरा मोठ्ठा पेताड. घरची दारूभट्टी. मराठवाड्यात अट्टल दारुड्याला पेताड म्हणायचे. बुधवारपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चमेलीच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा. पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात.
बेवडे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा.
बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या. आईच्या मदतीला सैपाकघरात. दप्तरं गुंडाळून ठेवायची. शाळेला नाही गेलं तरी चालायचं.
जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. गावठी दारूची ट्यूब एकाच्या हातात , दुसर्याच्या हातात इंग्लिशच्या बाटल्यांची पेटी. मग आत्याचा पेताड नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची. वडील आपल्या हातानं पहिल्या धारेची पावशेर पाजून आत्याच्या नवर्याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची.
आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. अफूची बोंडं आणि तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड चखणा बाहेर पडायचा. दारूच्या ट्यूबला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक नौटाक कपात भरून आमच्या हातात दयायची. थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबुस दारूनी ओठ चुरचुरायचे. पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
दारूचे ग्लास बाहेरच्या खोलीत गेले की पिण्यासाठीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर विडी ओढत बसायची. हातात मशेरी घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी ताटात गरम वजडी काढायची. चखण्यासाठी वजडी. कलेजी, नळ्या असा काही प्रकार नसायचाच. दादासाहेब प्यायला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर विड्या फुंकत बसायच्या.
आत्या बहीणींच्या हातात रिकामा ग्लास देऊन म्हणायची माझा पेग भरा गं पोरींनो. असली कामं करायला मुली नाराज असायच्या. पण सांगणार कुणाला?
घरात बाटली एकच. जी.एम संत्रा. आत्या फणफणायची.
काय बाई देशी दारू देता पाहुण्याला असं म्हणायची.
आपली पेटी उघडून व्हिस्कीची बाटली काढायची. पेग भरून झाल्यावर बाटली परत पेटीत जायची.
पेग भरण्यासाठी बाटली उघडली की व्हिस्कीचा सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन बाटली बंद करायची.
आता त्या वेळी नशा-पाण्यासाठी आमच्या घरात असणार काय. जी.एम संत्राची बाटली, मशेरी, तपकीर, तम्बाकुची पुडी आणि चुन्याची डबी, विडी बंडल. संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची.
8 Dec 2020 - 12:47 pm | आंबट चिंच
हायला पार बाजार उठवला की गड्डा झब्बू तुम्ही. सही विडंबन.
8 Dec 2020 - 2:07 pm | गड्डा झब्बू
शेपरेट प्रसिद्ध करतो याला...