एक प्रवास -असाही

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
12 Nov 2020 - 12:03 pm

*एक प्रवास- असाही*

आठवडाभराच्या रजेनंतर आज ऑफिसला निघाले. अजून ट्रीपचा शीण गेला नव्हता. जरा जड मनाने आणि जड पायानेच निघाले. पावणेआठ वाजले होते. शेअर ऑटो मिळाली नशिबाने पटकन. रिक्षा अलिकडच्याच चौकात थांबते..पटापट चालत कसली पळतच प्लॅटफाॅर्मला आले. आठ-चौदा उभीच होती. पटकन फर्स्टक्लासच्या डब्यात चढले. सिटस् तर फुल झाल्या होत्या. या ट्रेनने कधीकधीच जाते त्यामुळे या ट्रेनला ओळखीचं कोणी सहसा भेटत नाही. दाराजवळच्या पॅसेजमधे टेकुन उभी राहिले. सहजच पर्स मधे हात घालून पाकिट तपासलं. कार्ड कव्हर काढून पास वगैरे सगळं आहे ना व्यवस्थित बघायला लागले. अन् एकदम दचकले. अरे देवा !! दरदरून घामच फुटला. आतल्या पाकिटात फक्त पन्नासची नोट होती. आणि पास बघितला तर पासाची डेट संपून तीन दिवस झाले होते. आता ? आता काय करावं ट्रेन सुटण्याची वेळ झालीय. उतरून तिकीट विंडो पर्यंत जाऊन तिकीट काढू पण नंतरची ट्रेन दहा मिनीटांनी आहे ती पण स्लो लोकल. ऑफिसला आठवडाभराच्या रजेनंतर जातोय तर वेळेत नाही गेलो तर फार वाईट प्रभाव पडेल त्यात नविन साहेब आलेत. अजून कसे काय आहेत माहितही नाहीत. त्यांचं मत वाईट होईल आपल्याबद्दल. असं कसं आपण विसरलो. दरवेळी अगदी लक्षात ठेऊन पास काढतो. रडकुंडीला आले.
काल प्रवासातून यायलाही उशीरच झाला..त्यात सगळी ऑफीसची तयारी नीट न करताच, पाकिट पैसे चेक न करताच ऑफीसची पर्स उचलली. एटीएम कार्डही प्रवासात नेलेल्या पर्स मधे राहिलय.
आज डबा पण नाही घेतलाय. लेक पण काॅलेजच्या कॅन्टीनला खाईन म्हणाला आणि शरद पण ऑफिस जवळच्या अन्नपूर्णातून पार्सल घेईन म्हणाला. मग फक्त पोहे करून, खाऊन, आवरून घाईतच निघाले. आठवडाभर भरपूर दमवणूक झाली होती. पण आज ऑफिसला जाणं भागच होतं. कामांचा पण ढीग साचून राहिला असेल.
काय करावं सेकंड क्लास लेडीज पर्यंत तरी जाऊ शकू का या विचारात मी चुळबुळत होते तर शेजारच्या मिनी स्कर्टने फोनवर बोलताना एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकला. मी पुढे जरा दाराशी आले...वाकुन पाहिलं. तर थोड्याच अंतरावर दोन काळे कोटधारी टीसी उभे दिसले. मी अजूनच कासावीस झाले. हातापायांना कंप सुटला. काय करू काही समजेना. परत वाकुन पाहिलं..माझी चुळबूळ बघून अजून एकदोघींनी भुवया उंचावून निषेधात्मक दृष्टीक्षेप फेकला. अजून सिग्नल नव्हता....शेवटी पटकन उतरून तीन डबे ओलांडून जाऊ शकू असं वाटल्यावर पटकन उतरले नी धावतच तीन डबे ओलांडून मीडल लेडीजला चढले. चढले अन् गाडी सुटली. चढताना दाराजवळ मोठे हारे घेऊन बसलेल्या कामकरी, कोळी बायकांना धक्का लागला म्हणून त्या बायकांच्या चार शेलक्या शिव्या ऐकाव्या लागल्या. त्यांना साॅरी म्हटलं पण असहायतेने ...डोळ्यातून पाणीच आलं. कसली गर्दी होती पॅसेजमधे साईडला पण जागा नव्हती. तशीच मधेच लटकत, धक्के खात, डोळ्यातलं पाणी थोपवत उभी राहिले. विक्रोळी घाटकोपरच्या गर्दीने तर पर्स आणि ओढणीची पार वाट लागली. आजूबाजुला घामट गर्दी, ढकला ढकली, भांडणं. तो पंचवीस मिनीटांचा जीवघेणा प्रवास लवकर संपावा अशी प्रार्थना करत होते मनोमन देवाची. कधीच असा प्रवास केला नव्हता. एकदाचं दादर आलं. गर्दीच्या लोंढ्याबरोबर कशीतरी ढकलत बाहेर पडले. अगदीच भयानक होता प्रथमच घेतलेला अनुभव त्या कामाठी कोळी बायकांच्या धक्क्यांचा नी घामट गर्दीचा.
दादरला उतरून ब्रीजकडे निघाले...पापभीरू मन खूप बावरलं होतं चक्क W T प्रवास करून आले होते मी आणि कावरीबावरी होऊन इकडे तिकडे काळे कोट दिसत नाहीएत ना बघत होते.
ब्रीज चढून वर आले नी उजवीकडे दोघे तीघे टीसी दिसले तिकीट चेक करत होते. मी बावरल्या मनाने पण चेह-यावर बेफीकीरी घेऊन त्यांच्या बाजूने हळूच पुढे गेले. दोन पावलं गेले असेन तोच मागून "ओ मॅडम" अशी हाक आली. माझं ह्रदयच बंद पडलं जणू. पाय जागीच खिळले. आता काय?, तिकीट नाही. पास संपलेला. पाकीटात पैसे जेमतेम. एटीएम पण नाही. दंड पण भरू शकणार नाही. सगळं ब्रम्हांड आठवलं. एका क्षणात सगळे देव आठवून झाले. त्याने परत हाक मारली "ओ मॅडम अहो थांबा ".. मी कसंबसं आवंढा गिळून मागे वळून बघीतलं. हाक मारणारा टी सी च होता. माझी पर्स त्याच्या हातात होती ती दाखवत होता. मी गडबडून बघीतलं तर माझ्या खांद्याला फक्त बेल्ट लटकत होते. त्याने पर्स पुढे केली म्हणाला,"बघा काही गेलं नाहीए ना त्यातलं.. आत्ता ब्रीज चढून आलात आणि इथे तुमची पर्स पडली आणि तुमचं लक्षही नाही. कसली घाई हो एवढी ".
मी हुश्श केलं. घाम टिपत हसले. त्याला "थॅक्यु" म्हटलं. आता माझी भीड चेपली होती. म्हणून पुढे "अहो किती गर्दी आज. गर्दीतच तुटला वाटतं बेल्ट. ऑफिसला उशीर झाला ना, घाईत समजलं नाही. साॅरी आणि खूप खूप आभार हं साहेब", म्हटलं
आणि मनातच देवाचेही आभार मानले. एका क्षणात मनावरचं मोठ्ठं दडपण गेल्याने रिलॅक्स होऊन ऑफिसच्या दिशेने उत्साहाने माझी पावलं चालू लागली.
© वृंदा मोघे.
23/8/18

कथा

प्रतिक्रिया

विदाउट तिकीट जायचे म्हणजे टेन्शन येते खरे
छान लिहिला आहे अनुभव,
लिहित रहा
पैजारबुवा,

VRINDA MOGHE's picture

12 Nov 2020 - 4:39 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद

टर्मीनेटर's picture

12 Nov 2020 - 5:28 pm | टर्मीनेटर

हे थ्रिल अनुभवण्यासाठी किमान एकदातरी लोकलने WT प्रवास करण्याचा संकल्प सोडला आहे 😀
लघुलेख आवडला 👍

VRINDA MOGHE's picture

14 Nov 2020 - 9:37 am | VRINDA MOGHE

धन्यवाद

पाषाणभेद's picture

13 Nov 2020 - 11:17 pm | पाषाणभेद

लगेच ओळखलं मी. मिपाकरीण आहे म्हणून सोडले हो तुम्हाला.
:-)
छान आले प्रसंगलेखन! तुमची झालेली धावपळ रंगवलीय. कितीही तयारी केली तरी शेवटी घाई होतेच अशा वेळी. वाटेत येणार्‍या अडचणींच्या अनेक शक्यता असल्याने त्या तितक्या वेळा गुणीत (मल्टीफोल्ड) होत असतात. त्यात लोकलचा प्रवास!

VRINDA MOGHE's picture

14 Nov 2020 - 9:36 am | VRINDA MOGHE

धन्यवाद हो !

रस्त्याच्या कडेने ( बाय द वे) हि घटना काल्पनिक आहे. मी कधीही WT प्रवास नाही केलाय