http://www.misalpav.com/node/47611
या धाग्यावर मधेच मराठी अभिजात भाषा आहे का या विषयावर चर्चा सुरु होती.ती स्वतंत्रपणे व्हावी यासाठी हा धागा.
मराठी भाषा ही अभिजात व्हावी यासाठी काहीजण प्रयत्न करत असतानाच ती अभिजात होऊ नये यासाठी काही मराठी लोकच प्रयत्न करत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होते.याची दोन प्रमुख कारणे म्हणजे मराठी ही संस्कृतोद्भव नाही हे सिद्ध झाल्यास त्यातला आर्य प्रभाव कमी होईल म्हणून काही ब्राह्मणद्वेष्टे साहित्यिक आणि संघटना यासाठी प्रयत्न करत असल्याचे काही साहित्यिकांना विशेषत: संस्कृतप्रेमी साहित्यिकांना वाटते आहे.हे एक कारण.
अभिजात करण्याला विरोध करणार्यांचे दुसरे कारण म्हणजे एखादी भाषा अभिजात झाल्यास तिच्या विकासासाठी, संवर्धनासाठी, प्रसारासाठी मिळणारा कोट्यावधी रुपयांचा निधी. हा निधी मराठीच्या संवर्धनापेक्षा तो काही लोकांच्या खिशात जाणार असल्याचा संशय.अर्थात ही शक्यता अगदीच फेटाळता येत नाही.भारतातले विविध आर्थिक घोटाळे पाहता हे क्षेत्र त्यापासून लांब राहील याची खात्री कशी द्यावी?
मराठी भाषा ही अभिजात होऊ शकते का याबद्दलची ही एक सविस्तर चर्चा इथे आहे.
https://www.google.com/amp/s/www.inmarathi.com/41423/classical-status-to...
ही मिपावरचीच एक जुनी चर्चा
https://www.misalpav.com/node/23896
दुसरा मुद्दा असा की खरंच मराठी ही अभिजात भाषा आहे का? कारण भाषाशास्त्राच्या बर्याचशा पुस्तकांमधे आजची मराठी ही संस्कृत,माहाराष्ट्री प्राकृत, शौरसेनी, मागधी, पाली, प्राकृत,पैशाची अशा विविध भाषांमधून बनली असल्याचे आणि ती कोणत्याही एका भाषेपासून बनली नाही असे लिहिले आहे.मग असे असताना ती अभिजात असल्याचे म्हणजे किमान दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचे किंवा ती अोडिया भाषेसारखी न बदलल्याचे कोठून सिद्ध करणार? कसे सिद्ध करणार? कारण मराठी किमान १५०० वर्षांपूर्वी असल्याचे सज्जड पुरावेही नाहीत आणि ती तिच्या मूळ स्वरुपापासून आजतागायत बर्यापैकी आहे तशी असल्याचेही सिद्ध होत नाहीये.
इथे नितीन श्री. जोगळेकर यांनी दिलेला प्रतिसाद वाचण्यासारखा आहे.
https://mr.quora.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A...
अभिजात म्हणून सिद्ध करताना त्या राज्यातला राजकीय लोकांचा दबाव हा सुद्धा महत्वाचा ठरत असावा का? याचं कारण पहा.मल्याळम् ही सुद्धा एक अभिजात भाषा आहे.पण खाली दिलेला फोटो पहा.
१६ व्या शतकात केरळात छापलेल्या एका पुस्तकाचा हा फोटो आहे.त्यावर मलबार तमिळ असा उल्लेख आहे.आता परदेशी धर्मप्रचारक केरळच्या स्थानिक भाषेला मल्याळम् न म्हणता मलबार तमिळ का म्हणत असतील? जर हे तमिळचंच एक स्वरुप स्वरुप असेल तर ती अभिजात कशी बनली? तर याची एक शक्यता अशी की त्यांनी मल्याळम् आणि तमिळचा सांस्कृतिक वारसा एकच आहे हे दाखवून दिले असण्याची शक्यता आहे.जोडीला मल्याळी राजकारण्यांचा रेटा! कारण १२ व्या शतकापासून मल्याळमने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे.त्याआधी ती तमिळची बहीण याच अर्थाने प्रचलित होती.
अलिकडच्या काळात हा फरक अधिकाधिक दिसावा,मल्याळम् ही तमिळपासून बरीच वेगळी आहे हे दाखवण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आणि जात आहेत.संस्कृतोद्भव शब्दांचा अधिकाधिक वापर,तमिळोद्भव शब्द शक्यतो टाळणे हे प्रकार होत आहेत. ४०च्या किंवा त्या आधीच्या दशकात जन्मलेल्या बर्याचशा मल्याळी लोकांना तमिळ सहज समजते.बोलायलाही बर्यापैकी जमते.पण आजच्या मल्याळी तरुणांना तमिळ सहज जमत नाही.कारण मधल्या काळात शाळा-कॉलेजात वगैरे ठरवून तमिळोद्भव शब्द टाळून शुद्ध मल्याळम् शब्द किंवा संस्कृतोद्भव शब्द वापरण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत.म्हणजे मल्याळीला अभिजात म्हणवून घेण्यासाठी मल्याळी लोकांनी किती खटाटोप केला आहे ते पहा.हा इतका खटाटोप मराठी अभिजात व्हावी यासाठी होतो आहे का? मराठी लोक,मराठी राजकारणी,मराठी इतिहासकार एक होऊन काम करताना दिसत आहेत का? नक्की कोण आणि कुठे कमी पडत आहे?
प्रतिक्रिया
13 Oct 2020 - 7:30 pm | Gk
पोलिटिकल स्टंट आहेत
केंद्र सरकार फ़ंड देते
13 Oct 2020 - 9:52 pm | साहना
मी मराठी माणूस नसले तरी विविध भाषांची जाणकार आणि विविध देशांत आणि संस्कृतीत राहून आले आहे आणि समस्त मराठी परिवाराला हा अनाहूत सल्ला देते कि अभिजात दर्जा वगैरेंच्या नादांत मराठी भाषा प्रेमींनी पडू नये.
मराठी भाषेला कुठल्याही सरकारी दर्जाची आणि शिक्क्याची काहीही गरज नाही. ज्या भाषेची धुरा ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांनी वाहिली, ज्याला कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे ह्यांनी सुशोभित केले त्याला देण्यासारखी काहीही गोष्ट सरकारी खेचरां कडे नाही.
अभिजात भाषा वगैरे शिक्के हे जनतेचा पैसे वळवण्याचे साधन आहे. एकदा हे पैसे हाती आले मग मंत्री संत्री लोक निकृष्ट दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या आपल्या भाट मंडळींना ते वाटून मोकळे होतात. मग साहित्य संमेलने, अकादमी, सरकारी छापखाने, प्रकाशक इत्यादी मंडळी ह्या पैश्यांचे लचके तोडण्यासाठी अतिशय खालच्या दर्जाला जातात. ह्याचे पर्यवसान शेवटी निकृष्ट दर्जाचे साहित्य, नालायक लेखकांची पब्लीसीटी, शालेय पाठयक्रमात लुडबुड ह्यांत होते आणि मराठी भाषा हि एक बोरिंग आणि आऊटडेटेड भाषा बनते.
ह्या ऐवजी अभिजात साहित्य निर्मितीवर भर द्यावा.
अभिजात दर्जा मिळविलेल्या कुठल्या भाषेने त्या शिक्क्याच्या जोरावर प्रचंड प्रगती केली आहे ? ह्या दर्जाने काय त्यांच्या साहित्यसंपदेत भर पडली ?
14 Oct 2020 - 11:07 am | सामान्यनागरिक
ही चर्चा करवणार्यांचे उद्देश वेगळेच आहेत. उगीच आपण आपला वेळ घालवु नये.
19 Oct 2020 - 12:09 pm | उपयोजक
मराठीत अभिजात साहित्यनिर्मितीवर भर द्यायला हवा.
हे झाल्यास चांगलेच आहे.पण वास्तव तसे आहे का हे आधी पहायला हवे.मुळात सध्या सर्व भारतीय भाषिकांमधे त्यांच्या मातृभाषेतील वाचनाचे प्रमाण कमालीचे घटले आहे.सध्याच्या झटपट युगामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सलग वेळ हा कमी होत होत ९ सेकंद इतक्यापर्यंत आला आहे.असं असताना मराठीत साहित्यनिर्मितीत वाढ कशी व्हावी? कारण वाचायला पुरेसे वाचकच नसतील तर मराठीत भाषेत पुस्तके छापून उपयोग काय?
कोणत्याही मराठी पुस्तकांच्या प्रकाशकाला विचारलंत तर तो सध्या मराठी पुस्तक व्यवसायाची हालत काय आहे हे उलगडून सांगू शकेल.
कोणत्याही पुस्तक प्रदर्शनात गेलात तर ग्रामीण/अल्पशिक्षित/संधी हुकलेले/जगण्याच्या लढाईत अपयश आलेले लोक हे धार्मिक/प्रेरणादायी/व्यक्तिमत्व विकास याप्रकारची पुस्तके घेताना दिसतील.पुस्तक विकत घेऊन वाचणारा हा गट मोठा आहे.त्यामुळे धार्मिक/प्रेरणादायी/व्यक्तिमत्व विकास या तीन प्रकारातली पुस्तकेच मोठ्या प्रमाणात खपतात.या लोकांना ही पुस्तके वाचल्यानंतर आपल्या संघर्षमय जीवनात काही बदल घडून चांगले सुखाचे क्षण येतील अशी आशा असते.त्यामुळे ही पुस्तके ते लोक घेतात.
श्रीमंत किंवा अतिश्रीमंत मराठी लोक मराठी पुस्तके विकत घेऊन वाचत जरी असली तरी मुळात अशा लोकांची संख्या फार नाही.शिवाय सगळे श्रीमंत किंवा अतिश्रीमंत मराठी लोक मराठीतलं साहित्य वाचत असतील की नाही याबद्दलच शंका आहे.त्यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती चांगलीच स्थिर आहे अशा वाचकांवरुन मराठी पुस्तकांना चांगले दिवस आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
खपत नसलेल्या/पुरेशी मागणी नसलेल्या विषयावरची पुस्तके छापून ती विकण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर ती खपत नाहीत म्हणून अस्वस्थ होणे हा प्रकार मराठी प्रकाशनविश्वात फार आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्वे , इतिहासातल्या घडामोडी ,कथा , कादंबर्या यांना भविष्यात फार ग्राहक नसेल असे वाटते.कारण या विषयावरच्या पुस्तकांचा रोजच्या जीवनात तसाही फारसा उपयोग नाहीये.
पुस्तकाचे 'उपयोगिता मूल्य' हा निकष लावण्यात यापुढे वाढ होईल. कारण इतका वेळ देऊन ,वाचून फायदा फारसा होत नसेल तर का वाचावं?
चकचकीत कव्हर,दर्जेदार कागद,उत्कृष्ट छपाई यामुळे फक्त पुस्तकाची किंमत वाढते.ग्राहक वाढत नाही.म्हणूनच अजबवाल्यांची ६० रुपयात पुस्तक ही योजना 'थोड्या प्रमाणात' चालते आहे.या पुस्तकांचा तांत्रिक दर्जा चांगला नसला तरी बर्याच लोकांना तो चालतो आहे.
युट्यूब,वेबसिरिजसारखा व्हिडिओ स्वरुपातला कंटेंट सध्याच्या पिढीला खुलवत आहे.तो सुद्धा पुस्तकांच्या किंमतीच्या तुलनेत कितीतरी कमी किंमतीत.नवी पिढी ही टेकसॅव्ही आहे.पुस्तकांपेक्षा गॅजेटसमधे रमणारी आहे.WhatsApp किंवा facebook वर सुद्धा त्यांच्या अावडीचा विषय नसेल तर लांबलचक मजकूराखाली प्रतिसादात TLTR म्हणजे 'टू लेन्ग्दी टू रिड' असा चार अक्षरी शब्द टाकून पळणारी आहे.
कोणाच्या जीवावर टिकणारेय मराठी साहित्यसंपदा? घ्यायला पुरेसे ग्राहक नकोत का?
19 Oct 2020 - 12:52 pm | चौथा कोनाडा
मराठी भाषेच्या अभिजाततेच्या चर्चेतच मराठी कशी टिकून राहिल हा विचार दडलेला आहे. आभिजात साहित्य, छापिल साहित्य या गोष्टी बाजुला ठेवल्यातर अधुनिक माध्यमांतुन मोबाईल, संगणक, आंजा यातून मराठी कशी झळकत राहिल हे पाहिले पाहिजे. जर निधी मिळणार असेल आणि योग्य प्रकारे नियमन केलं तर या माध्यमांतून देखील मराठी टिकून राहिल. या साठी मराठीत अभिजात आहे या बोंबा आणि प्रखर राजकिय सामाजि़क दबाव गट कार्यरत व्ह्यायला हवा. मा. राज ठाकरे अशी भुमिका घेताना दिसतात. बाकी सर्व नेते या बाबतीत निष्क्रिय असल्याचे वारंवार जाणवते.
19 Oct 2020 - 12:53 pm | साहना
एके काळी मी स्वतः प्रकाशन व्यवसायाशी संलग्न होते आणि प्रकाशन व्यवसायाविषयी तुम्ही जे काही लिहिले आहे ते १०१% खरे आहे. तुम्हालाही ह्या विषयांतील अनुभव आहे असे जाणवते.
५० वर्षे आधी जशी लोक पुस्तके वाचत होते तशी ते आज काल वाचणार नाहीत हे सुद्धा सत्य आहे. इंग्रजी भाषेची सुद्धा हीच हालत आहे पण एकूण भाषिक जास्त असल्याने त्यांना ती विशेष जाणवत नाही. बहुतेक मराठी भाषिक द्विभाषिक असल्याने ते इतर भाषेंतील सुद्धा कन्टेन्ट वाचू शकतात त्यामुळे विविध विषयावरील मराठी पुस्तके ते वाचतील असे नाही. त्यामुळे मराठी माणसाला काहीतरी नवीन क्लुप्ती लढवावी लागेल आणि मराठी माणूस ती लढवेल ह्यांत शंका नाही.
मराठी प्रकाशन व्यवसाय चालणार नाही. पण त्याच वेळी मराठी ब्लॉग्स, संकेतस्थळे, बुक्सट्रक, प्रतिलिप इत्यादी सेवा नवीन पद्धतीने प्रकाशन व्यवसाय चालू ठेवू शकतील. कदाचित ytube, इंस्टाग्राम इत्यादी सुद्धा ह्यांत उपयुक्त ठरेल. उत्तर माझ्याकडे नाही पण सरकारी बळावर काहीही होणार नाही.
13 Oct 2020 - 10:10 pm | चित्रगुप्त
साहना यांचा प्रतिसाद खूपच भावला. दिल्लीत चाळीसहून जास्त वर्षे वास्तव्य असल्याने सरकारी पैसा कुठल्याकुठे कसा गडप होतो, आणि मूळ हेतु/काम जसे च्या तसेच रहाते, हे चांगलेच अनुभवलेले आहे.
13 Oct 2020 - 10:19 pm | चौथा कोनाडा
अभिजात भाषा म्हणून ठराविक भाषिकांचे तुष्टीकरण करण्यापेक्षा इतर भाषांतही बोली स्थानिक शब्द कसे वाढतील या साठी संबंधितांनी राज्यांना खास निधी द्यावा आणि अभिजात भाषा म्हणून कौतुकाचे लाड थांबवावेत.
महाराष्ट्राचे पक्षी मराठीचे उत्तरे कडील हिंदी भाषिक राज्ये आणि दक्षिणेकडील संघटित राज्ये यांच्या मध्ये सॅण्डविच झालेले आहे.
दक्षिणेकचे उपद्रव मुल्य जास्त असल्याने केंद्रिय सत्ता त्यांना वचकून असते.
महाराष्ट्राने मराठीने एकी दाखवून उपद्रव मुल्य दाखवल्यास अपॉप मराठीसाठी निधी खेचून मराठीसाठी खरोखरच काहीतरी भरीव करता येईल.
..... ..... पण, घोडं इथंच पेण्ड खातंय !
14 Oct 2020 - 1:06 am | गामा पैलवान
मराठीसाठी काही भरीव करायचं असेल तर निधीची कितपत गरज आहे ?
-गा.पै.
14 Oct 2020 - 12:34 pm | चौथा कोनाडा
निधीची भरपूर गरज असते.
उदा. पुस्तकांचे गाव "भिलार" ही संकल्पना मुर्त रुपात आणण्यासाठी निधीची गरज भासलीच ना !
मराठी ग्रंथालये, त्यांच्या वास्तू तेथील कर्मचारी वर्ग तुटपुंज्या निधीवर काम करत असतात,
त्यांना वेळोवेळी आर्थिक टॉनिकची गरज असते. ते नाही मिळाले तर कुपोषण होऊन दगावणे नक्की.
भाषा विषयक उपक्रम करायला निधी हवाच. उदा, मराठीतील उत्कृष्ट साहित्य इंग्लिश अथवा इतर भाषांमध्ये आणायचं तर लेखकांपासुन ते पुढील साखळीसाठी निधी अत्यंत उपयुक्त राहिल. फक्त त्यात भ्रष्टाचारी राजकारण नको.
14 Oct 2020 - 6:20 pm | उपयोजक
निधीची भरपूर गरज असते.
याच्याशी सहमत. जुन्या मराठी ग्रंथांचे त्याच्या प्रसारासाठी डिजिटायझेशन करणे, मोडीतील ग्रंथ वाचून मराठ्यांचा इतिहास उलगडायला मदत करणार्या मोडीवाचकांना मानधन देणे , त्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करणे याला निधी लागतो. फक्त एक तंजावरचे सरस्वती महाल ग्रंथालय बघितले तरी याची कल्पना येईल. साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर कितीतरी शब्दकोश आहेत.ते अद्यापही epub स्वतरुपात नाहीत.
19 Oct 2020 - 1:03 pm | साहना
निधीची गरज असते ह्यांत शंका नाही आणि माझ्या मते मराठीसाठी पैसे गोळा करण्याची क्षमता मराठी लोकांत नक्कीच आहे. मराठी साठी पैसे देण्याची ऐपत जर मराठी माणूस बाळगून नसेल तर काय करायचे आहे हि भाषा टिकवून ?
पण सरकारी पैसे हे इथे उत्तर नाही. एकदा पैसा सरकार कडून आला कि तो कुठे जाईल हे सरकारी खेचरे ठरवतील आणि त्यातून चुकीचे लोक आणि चुकीच्या संस्था गब्बर होतील आणि शेवटी मराठी भाषेचे प्रचंड नुकसान होईल. कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने आधीच हजारो मराठी पुस्तकांचे स्कॅनिंग केले आहे. हे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे आहे तर archive.org हि अमेरिकन खाजगी संस्था नसती तर आज काल हे सर्व साहित्य गायब झाले असते. हेच काम मराठी लोकांनी स्वतः निधी गोळा करून केले असते तर जास्त चांगल्या प्रकारे केले गेले असते.
14 Oct 2020 - 1:29 am | गामा पैलवान
साहना,
तुमच्या इथल्या संदेशाशी हजार टक्के सहमत आहे.
मराठीचा विकास अभिजात नसतांनाही होऊ शकतो. एखादा विचार मनात आला तर तो अचूकपणे व्यक्त करायला मराठीचा आधार घ्यावासा वाटणे, हे माझं लक्ष्य आहे. ही गोष्ट मला मराठी वाचकांच्या मनात ठसवायची आहे. त्याकरिता ज्ञानोबा, तुकाराम यांच्यापासनं आज घडीला पुल, गोळवलकर, सावरकरादि लेखकांची व साहित्यकारांची मांदियाळी उपलब्ध आहे. प्रश्न फक्त मराठी मनांत आत्मविश्वास उत्पन्न करण्याचा आहे. मराठी इंग्रजीहून कोणत्या बाबतीत कमी आहे?
वर लेखकाने दिलेल्या दुव्यात शेवटी शेवटी काही रोचक तथ्ये सापडतात :
मला वाटतं की मराठीस इतकी शिदोरी पुरेशी आहे.
आ.न.,
-गा.पै.
14 Oct 2020 - 6:09 pm | उपयोजक
म्हणजे नक्की कसं?
14 Oct 2020 - 11:13 pm | गामा पैलवान
उपयोजक,
प्रश्नाबद्दल आभार! :-)
असं बघा की, 'लायनीत उभं राहून जाम बोअर झालं'. हे वाक्य मराठीत 'रांगेत उभं राहून फार कंटाळा आला' असं म्हणायला हवं. पण नेमकं काय 'झालं' ते मराठी वाक्यातनं दिसून येत नाहीये. अशा वेळेस बोअर ला प्रतिशब्द शिणवटा आहे. तर, हे वाक्य 'रांगेत उभं राहून अगदी शिणायला झालं' असं म्हणता येईल.
हे असे अनेक पर्याय उत्पन्न करण्याची क्षमता जसजशी वाढेल, तसतसा अचूकपणे विचार व्यक्त करता येईल. मराठीच्या पर्यायांची श्रीमंती वाढवायलाच हवी.
विचारमंथनास चालना दिल्याबद्दल पुनश्च आभार.
आ.न.,
-गा.पै.
15 Oct 2020 - 1:01 am | उपयोजक
चालतंय की मग! जरुर प्रयत्न व्हावेत अशा मराठीसाठी! : )
14 Oct 2020 - 5:20 am | साहना
दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे भाषा अभिजातच हवी हा अट्टाहास का ? मराठी भाषेने जर आगरी, कोंकणी, शौरसेनी आणखीन इतर भाषांतून लोकांना, लोकसाहित्याला आपलेसे करून स्वतःचा तसेच इतर समाजाचा विकास घडवून आणला असेल तर त्यांत गर्वाची गोष्ट आहे.
हे "अभिजात" प्रकरण मला थोडेफार ख्रिस्ती किंवा युरोपिअन प्रभावित वाटते. फक्त बायबल म्हटले म्हणून चालत नाही नक्की "खरे" बायबल वाचले पाहिजे, इथे बदलाव किंवा रिटेलिंग करायला वाव नाही. किंवा इंग्रज वगैरे मंडळी ज्या प्रमाणे "racial purity" ह्या विषयावर भर देत होती रयाच प्रकारचा हा प्रकार वाटतो. "आमच्या कुटुबांत शेकडो वर्षे कुणीच जाती बाहेर विवाह केला नाही हो" ह्यांत वावगे काही नसले तरी गर्व वाटावा असेही काही नाही. ख्रिस्ती धर्म ज्या प्रमाणे २००० वर्षे होता त्याच पद्धतीने फ्रोझन आहे तसा प्रकार भारतीयांत नाही.
मराठी हि शिवाजी महाराजांची भाषा आहे. कुठलाही "राज वंश" नसताना एका लहानग्या पोराने महाशक्तिशाली मुघल साम्राज्याला नष्ट करण्याचे स्वप्न पहिले आणि भविष्यांत निव्वळ स्वतःच्या हिमतीवर स्वतःला छत्रपती घोषित केले. ह्याच वेळी इतर मोठे मोठे "राजे" आपल्या मुलींना मुघलांच्या जनानखान्यात ढकलून मुघलांची चापलुसी करत आपल्या मिशेला पीळ देत होते. आज काल "राजा" म्हटले कि शिवाजी महाराजांची आकृती डोळ्यापुढे येते त्या इतर राजांची येत नाही. "स्वयमेव मृगेंद्रता" म्हणतात ते अक्षरशः हेच. मुघलांनी मराठी साम्राज्याला "राजे" म्हणून ओळखण्यास पुढील १०० एक वर्षे नकार दिला, पण काहीही फरक पडला नाही. मुघल मंडळी गायब झाली, इथे छोटे मोठे पोर सुद्धा सायकलीवर "राजांचा मावळा" स्टिकर लावतात.
भारतीय संस्कृतीत तत्वज्ञानिक दृष्टिकोनातून classical/modern असे प्रकार नाहीत म्हणूनच आम्ही "सनातन" हा शब्द वापरतो. एखादी गोष्ट नवीन सुद्धा असली तरी असंख्य धाग्यांनी ती आमच्या भूतकाळाशी संबंधित आहे हे आम्हाला ठाऊक असते त्यामुळे मराठी भाषेंतून गाथा लिहिणारे तुकाराम सुद्धा वेदांचा वारसा सांगतात आणि आदी शंकराचार्य सुद्धा. श्रीकृष्ण सुद्धा वेदांचा संदर्भ देतात आणि पाणिनी, पतंजली सुद्धा. वेद आहेत आणि नंतर उपनिषदे आणि नंतर इतिहास पुराणे नंतर संत साहित्य. आपण वाचायला गेल्यास कुठलाही लेखक/कवी कुणी आपणच एक नवीन तरी ज्ञान आणले असा आव कुणीहि आणत नाही. ज्ञान हे सगळीकडे आधीपासून आहे आणि आपल्या द्वारे ते लोकांपुढे येत आहे असाच अविर्भाव बहुतेक ऋषी मुनींचा आहे. भारतीय तत्वज्ञानात "नव वेद" असे काहीच नाही पण त्याच वेळी सर्व ज्ञान आमच्या पुस्तकांत असल्याने नवीन काहीच ज्ञानाची गरज नाही असेही नाही. पण नवीन काही लिहिताना सुद्धा आपण एक अत्यंत जुन्या परंपरेची पाईक आहोत हि भावना ठीक ठिकाणी भारतीय साहित्यांत जाणवते. हि जाणीव अत्यंत महत्वाची भाषा आहे.
classical modern हा प्रकार आणि त्यांत क्लासिकल ला वरचा दर्जा द्यायचा हा प्रकार भारतीय नाही. क्लास हाच शब्द मुळांत रोमन प्रांतातील नागरिकांच्या दर्ज्यावरून आला आहे. उच्च दर्जाचे नागरिक, सरकारी बाबू मंडळी वगैरे इथे "क्लास" होती. ह्यांची भाषा, ह्यांचे लेखन आणि ह्यांची कविता आणि नाट्य ह्याला सरकारी मान्यता आणि पैसा. उलट सामान्य जनता, त्यांची भाषा, काव्य, नाट्य हे तितकेच समृद्ध असले तरी त्याला मान्यता नसल्याने इतिहासांत त्याची विशेष नोंद होत नाही आणि "क्लास" वाले लोक त्याला दुय्यम दर्जाने पाहतात. मग भविष्यांत "क्लासिकल" शिकून "क्लास" मध्ये घुसायचा प्रयत्न सगळेच लोक करतात. (ह्यांत वावगे काहीही नाही, पण क्लास वाली भाषा इतर भाषांपेक्षा कुठल्याच अर्थाने श्रेष्ठ ठरत नाही.).
भारतात आज इंग्रजी खऱ्या अर्थाने 'क्लास' वाली classical आहे. बद्धकोष्ठ झाल्याप्रमाणे चेहरा करून सुला वाईन, निकृष्ट दर्जाचे चीज आणि आलापिन्यो (जलपेनो नव्हे) डीप वगैरे घेऊन पार्टीला जाणाऱ्यांची भाषा आहे. तो आहे खरा "अभिजात दर्जा".
भाषातज्ञ म्हणून मला अशी भाषा प्रिय आहे जिथे दळण दळणाऱ्या महिलेच्या ओव्या शेकडो वर्षे जिवंत राहतात, धंदा बुडालेल्या वाण्याचे अभंग साहित्याचा कळस म्हणून ओळखले जातात, जिथे मुलांना पाळण्यात ठेवताना मानण्याचा आपला एक विशेष काव्य प्रकार आहे, जिथे लग्नात सुद्धा वर-वधूला काव्य म्हणावे लागते, इथे चकवा चांदणं हा शब्द आदिवासी भागांतील असल्याने अपभ्रंश किंवा "चुकीचा" म्हणून ओळखला जात नाही तर तर शब्दसंग्रहांत आणि आमच्या ज्ञानात भर घालणारा ठरतो.
उगाच "अभिजात" वगैरे म्हणून मक्ख चेहेऱ्याच्या लोकांचा कॉन्फरन्स मध्ये मराठी भाषेवर "पेपर", "प्रेसेंट" करण्याऐवजी माझ्या मते रिक्षा ड्रॉयव्हरांची शिव्या प्रचुर संभाषणे ऐकण्यांत जास्त मजा आहे आणि त्यांत मराठी भाषेचे भवितव्य सुद्धा सुरक्षित आहे. मराठी अभिजात म्हणून सरकारी पैश्यावर उगाच तामिळ, तेलगू ह्या भाषांची बरोबरी करण्यापेक्षा, अ - अभिजात म्हणून कोंकणी, आगरी आणि तर ज्या छोट्या भाषा आहेत, बोली भाषा आहेत, ज्या बोलणार्यांना कदाचित क्लास वाले लोक कमी लेखत असतील, अश्या भाषांबरोबर मराठी भाषेने मैत्री केलेली मला जास्त आवडेल.
खालील एक वाक्य आठवते :
Do not try to win an argument, try to win.
त्याच प्रमाणे मराठी भाषेंत नवीन नवीन साहित्य कसे निर्माण होईल, वाचकवर्ग, लेखक वर्ग इत्यादी कसा वाढेल, ह्या सर्वाना पोषक असे आर्थिक वातावरण कसे निर्माण होईल ह्यावर भर द्यावा आणि भाषेचे भविष्य आमची मुले पाहून घेतील !
14 Oct 2020 - 6:20 am | कानडाऊ योगेशु
अतिशय सुंदर प्रतिसाद!
14 Oct 2020 - 8:26 am | Gk
कायच्या काय प्रतिसाद
14 Oct 2020 - 9:26 am | चौकस२१२
साहना
आपला प्रतिसाद वाचनीय होता १००% टक्के मला कळला असे नाही पण विचार करायला लावणारा होता
त्याबद्दल १-२ प्रश्न ( आपण भाषा तद्न्य आहात असे वाटले म्हणून )
- आपण म्हणता तसे आगरी / कोकणी इत्यादी बोली आणि स्वत्रंत पण मराठीशी जवळीक असणारी भासेन बरोअबर " मराठी भाषेने मैत्री केलेली नाही" असं काहीस तुमचं म्हणणं दिसतंय... पण त्याशी वैर कुठे केलाय ...? उलट या बद्दल कुतूहलच आहे .. उलट दुर्दैवाने कोकणी शी जवळीक असताना गोवे राज्यात उगाचच कोकणी मराठी वाद वाढवला गेले यात कोकणी च्या बाजूने फक्त रोमन कथोलिक नवहते तर गोव्याचे हिंदू पण होते ... मग त्यानां मराठी का उपरी वाटली?
दुसरा प्रश्न:
मराठी मध्ये कारण नसताना उगाच इतर भाषेतील शब्द जोडले जातात त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
किती तरी उदाहरणे -जीजू / साली / तसेच इंग्रजीतील तर किती तरी
हा आता यावर उलट वाद घातला जातो कि मराठीत अगोदर पासून किती तरी फारसी शब्द आहेत तर मग नवीन इंग्रजी किंवा हिंदी का नकोत
प्रश आहे मूळचे काहीतरी जिवंत ठेवण्याचा ...
रांगेत उभा राहिलो आणि कंटाळा आला
या ऐवजी का लोक म्हणतात लायनीत उभे राहिलो बोअर झालो !
कशाला? स्वतःच्या मूळ जी काही संस्कृती / भाषा याची लाज का वाटते ?
२४ तास इंग्रजी मुलखात राहिलेले मूळ मराठी जर चांगले मराठी बोलणे आचरणात आणू शकतात तर मग मराठी भागातील का नाही?
गोरा साहबे गेला पण राखाडी रंगाचा राहील मागे हि ती वृत्ती का
एकदा कमरेचे सोडले कि ते डोक्यावर बांधलं काय किंवा नाही काय फरक पडतो! हि वृत्ती
14 Oct 2020 - 9:58 am | साहना
> " मराठी भाषेने मैत्री केलेली नाही"
माझे मत ह्याच्या अगदी उलट होते. लिहिताना कदाचित ते स्पष्ट पणे लिहू शकले नाही. जर मराठी भाषा हि इतर अनेक बोलीभाषांपासून बनली असेल किंवा त्यावर अनेक भाषांचा प्रभाव असेल तर त्यांत गैर काहीही नाही असे मला म्हणायचे होते.
गोवा खरे तर फार चांगले उदाहरण आहे. उगाच मराठीला उपरी ना मानता गोवेकरांनी मराठीला जवळ केले असते तर कोकणी आणि मराठी दोन्ही भाषांचा फायदा झाला असता. उलट गोवेकरांना विनाकारण कोंकणी आणि मराठीत दुजा भाव पहिला ! ह्याचा फायदा चर्च ला झाला आहे आणि काही काळांत ते रोमी लिपी हि अनौरस संतती हिंदूंच्या गळ्यांत बांधतील.
> मराठी मध्ये कारण नसताना उगाच इतर भाषेतील शब्द जोडले जातात त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
हे वैयक्तिक मत आहे. भाषा शुद्धी महत्वाची आहे पण त्याच वेळी नवीन काळांत नवीन शब्द, नवीन व्याकरणाचे नियम, नवीन लिपी सौकर्य इत्यादी गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. माझ्या मते सावरकर ह्यांचे ह्या विषयावरील विपुल लेखन दिशा दर्शक ठरेल.
दुसरे मत कदाचित लोकांना आवडणार नाही पण आता ज्या जगांत राहतो तिथे "मी मराठी" सारख्या ओळखीना काहीही अर्थ राहिला नाही. मराठी माणूस आज जगांत सगळीकडे व्यवहार करतो त्यामुळे इतर भाषांतील शब्द मराठी भाषेंत घर करून राहतील हे नक्कीच आणि तिथे आपण काहीही करू शकत नाही. पण बोलताना इतर शब्द वापरले ह्याचा अर्थ मराठी प्रदूषित होत असे नाही, मराठी संस्कृतीने चांगला गोष्टी निर्माण केल्या तर काळाच्या ओघात मराठी शब्द इतर ठिकाणी प्रवेश करते होतील.
आज लंडन, कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क इत्यादी लोकांचे बोलणे ऐकले तर त्यांच्या इंग्रजीत अनेक स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, उर्दू, फारसी, जापनीज शब्द घर करून आहेत.
14 Oct 2020 - 10:26 am | Gk
गोवेकरनि मराठीला जवळ करायचे म्हणे
मग मराठीने कोकणीला जवळ करावे आणि गोवा त्यांना देऊन टाकावे
14 Oct 2020 - 11:56 am | साहना
भाषा आणि राजकीय सीमा ह्यांचा संबंध जो पर्यंत आहे तो पर्यंत अश्या प्रकारची खोटी भांडणे होत राहतील. गोवा वेगळे राज्य झाल्याने महाराष्ट्राच्या दारिद्र्यापासून वाचले पण भाषिक दारिद्र्य गोव्याच्या नशिबाला आले. आजची गोवेकर कोंकणी हि पूर्णपणे सरकारी असून अतिशय सुमार दर्जाच्या राजकारण्यांनी पोसलेल्या कवी आणि लेखकांना पुढे ठेवत आहे.
मराठी भाषा आणि राजकीय सीमा ह्यांची दुर्दैवाने सांगड घातल्याने भविष्यांत महाराष्ट्राचे विभाजन करून छोटी छोटी राज्ये करणे बहुतेक करून असंभव ठरणार आहे.
14 Oct 2020 - 12:24 pm | Gk
महाराष्ट्राची लोकसंख्या किती , गोव्याची किती
तुमच्याकडे तुकाराम , पुलं झाले म्हणून त्यांच्या साहित्यातही त्या दर्जाचे झालेच पाहिजे का ?
भाषेचा उपयोग करून वीज मंडळाला पत्र लिहिता आले किंवा एखादा सिनेमा बघता आला की झाले , ह्याच्यापलीकडचे बाकी सगळेही माझ्याच भाषेत असावे हा अट्टाहास छोटे राज्य कसे धरू शकेल ?
14 Oct 2020 - 3:20 pm | चौकस२१२
भाषा शुद्धी महत्वाची आहे
मला काही शुद्ध अशुद्ध या अर्थाने विचारायचे नव्हते ( १२ कोसांवर भाषा बदलते ती त्या त्या ठकाणाशी प्रामाणिक असावी त्यामुळे कोल्हापुरात आ"मच्यात या" आणि पुण्यात "आमचयकडे या" असे म्हणणे म्हणजे शुद्ध अशुद्ध असे काही नाही
आणि जगातील उत्तम ते घेतले पाहिजे / सहिष्णू असावे ( भाषेच्या बाबतीत ) हे हि सर्व खरे असले तरी आपले ते असे उगाचच का सोडायचे?
माझा मूळ प्रश्न तो आहे ..
आज लंडन, कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क इत्यादी लोकांचे बोलणे ऐकले तर त्यांच्या इंग्रजीत अनेक स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, हे जरी खरे असले तरी असे करताना तेथील मूळ इंग्रजी भाषिकांना आपल्या इंग्रजी ची लाज वाटतं नाही याउलट "मराठीत इतर आलं इतर चालेले काय फरक पडतो " या विचारसरणीत एक प्रकारःचा nunagand म्हणा किंवा स्वतःविषयीची कमी पणा चा "वास " मला जाणवतो !
माझ्यसारखे अनेक लंडन,न्यू यॉर्क सारखया खऱ्या अर्थाने बहू भाषिक शहरात / देशात अनेक दशके राहून सुद्धा मला जर हे दिसते तर मग महाराष्टार्त राहणाऱ्याला ते का जाणवत नाही ?
बरं असे नाही कि ओढून ताणून मराठीत प्रतिशब्द आणावा पण साधे साधे शब्द असताना जीजू कशाला? मेहुणी हा शब्द असताना साली का?
मला तरी हे उगाच एकतर सोंग वाटते किंवा ढोंग वटते किंवा आपण काय भेसळ करतोय याचे भान नासाने आणि पर्वा नसणे याचे लक्षण वाटते .. असो शेवटी सगळंच वयक्तिक असल्यामुळे बोलणार काय ?
14 Oct 2020 - 6:04 pm | चौथा कोनाडा
बरोबर ! अगदी योग्य मत !
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर राज्यकर्त्यानी मराठी भाषेत झालेली परकिय शब्दांची भेसळ काढून टाकून, त्या जागी समर्पक मराठी शब्द योजण्यात यावेत म्हणून मराठी राजव्यवहार कोष तयार करण्याचा आदेश दिला होता.
पुढे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या द्रष्ट्या ज्ञानवंतांनी भाषाशुद्धी साठी प्रयत्न करून शेकडो नविन मराठी शब्द मायबोलीला दिले !
काही घरचेच लोक आपल्याच खाल्ल्या घराचे वासे मोजतात हे इथं आलेल्या काही प्रतिसादावरून दिसतेच आहे.
पारतंत्र्याची हौस, दुसरं काय म्हणणार !
14 Oct 2020 - 6:37 pm | Gk
महाराजांच्या काळात मोघल येऊन 100 वर्षेच झाली होती , त्यामुळे हिंदी , उर्दू शब्द हे सगळे नवीन आहे , हे फील होणे स्वाभाविक होते
आता ह्या सगळ्याला 600 वर्षे झालीत , खुद्द त्या काळची मराठी आणि आताची मराठी ह्यात जमीन आस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे काही शब्द तसेच राहू शकतात.
महाराजांकडे ओथोरिटी होती , आज हे कोण करणार ? त्यात एकवाक्यता असते का ?
काल परवाच व्हाट्सपवर कोणत्या तरी मराठी प्रेमी संघटनेचा फोटू होता , त्यांनी पोलीस स्टेशन्स ना अर्ज दिले आहेत की स्टेशन हा शब्द बदला व ठाणे लिहा.
मग त्या पोलीस शब्दाचे काय करणार ? की तो आता मराठी आहे आणि स्टेशन मात्र अजून इंग्रजी आहे ?
( जमीन आस्मान उल्लेख हे उर्दू शब्द राहुदेत की त्याऐवजी गीत रामायणातील धरणी आकाश शब्द वापरू ? )
14 Oct 2020 - 6:28 pm | उपयोजक
याच्याशीही सहमत.
पण हे थांबवणार कसं? अमुक शब्द वापरायचा नाहीये तर तमुक वापरायचा आहे हे सतत लक्षात कसं ठेवणार? किती जणांना थांबवत बसणार? यासाठी केवळ सांघिक प्रयत्नच हवेत.कट्टर तमिळप्रेमी लोकसुद्धा तमिळ भाषेतून संस्कृतोद्भव शब्द हाकलायचा सतत प्रयत्न करतात.पण ते त्यांनाही साध्य झालेले नाही. रोजच्या बोलण्याच्या तमिळमधे आजही काही प्रमाणात संस्कृतोद्भव शब्द आहेत.
14 Oct 2020 - 2:58 pm | शा वि कु
सुरेख प्रतिसाद.
14 Oct 2020 - 9:25 am | Gk
फडणवीस सरकार मराठी भाषेचे व शाळांचे नुकसान करत आहे , अशा आशयाचे अनेक धागे तुम्ही काढले होते, उदा
http://www.misalpav.com/node/42865
आताची परिस्थिती काय म्हणते ?
14 Oct 2020 - 12:06 pm | साहना
काँग्रेस पार्टी नेहमीच "शिक्षण खाते" ह्या खात्याचे महत्व ओळखून आहे त्यामुळे कुठेही युती केली कि शिक्षण आणि गृह ह्यांच्या हातांत असते. सध्या उद्धव हे फक्त खुर्ची गरम करणारे मुख्य मंत्री आहेत हे शिवसैनिक सुद्धा बोलून दाखवतात. भाजपचे तावडे आणि आताची काँग्रेस ची महिला मंत्री वर्षा ह्या दोघांत काडीचाही फरक नाही असेच जाणवते. तावडे हे काँग्रेस सरकारने घालून दिलेलाच कित्ता जास्त प्रामाणिक पणे चालवत होते तर वर्षा गायकवाड ह्यांनी कुठल्याही महत्वाच्या मुद्यावर विशेष तोंड उघडलेले नाही.
माझ्या माहिती प्रमाणे ह्या वर्षी हजारो RTE सीट्स रिक्त जाणार असून ह्या सीट्स चा भुर्दंड इतर ७५% विद्यार्थ्यांच्या पालकांना भरावा लागणार आहे. आधीच्या सरकारनी आणि फडणवीस सरकारनी विविध शाळांचे सुमारे १००० कोटींचे बिल थकवले होते, तावडे ह्यांनी पैसे असून सुद्धा हे बिल भरण्यास नकार दर्शवला होता, काँग्रेस सरकार कडून तर अपेक्षा सुद्धा नाही. त्यामुळे शाळांची गळचेपी होणार आहेच.
14 Oct 2020 - 1:35 pm | Gk
लोक नारळाचे झाड नारळ मिळावेत म्हणून लावतात , पण काही रिकामटेकडे लोक नारळाच्या फांद्या काढून त्याची लांब पाने गुंफून कलात्मक शो च्या आकर्षक वस्तू तयार करतात,
तशी भाषा ही नारळाच्या झाडांगत आहे , रोजच्या व्यवहाराला भाषा उपयोगी पडणे हे म्हणजे नारळ मिळण्यागत आहे
आणि लेखक , कलावंत , कवी , अभिजात साहित्य वगैरे म्हणजे त्या पानाच्या वस्तू आहेत,
संस्कृत म्हणजे बिन नारळाचे झाड आहे , रोजच्या उदर भरणाला 0 उपयोग आहे ,
तुम्ही मराठी आणि कोकणी साहित्याची तुलना करताय म्हणजे त्या पानाच्या वस्तूंची तुलना करतात , नुसत्या पानाला भुलून लोक बिना नारळाचे झाड लावणार नाहीत
कदाचीत त्यांच्या व्यवहाराला ते कोकणी भाषा , आपण मराठी वापरतो त्यापेक्षा कितीतरी जास्त वापरत असतील
आहे त्या महाराष्ट्रात भाषा चालवा , उगाच बेळगाव अन गोव्यात काड्या कशाला करायच्या ?
14 Oct 2020 - 3:24 pm | चौकस२१२
आहे त्या महाराष्ट्रात भाषा चालवा , उगाच बेळगाव अन गोव्यात काड्या कशाला करायच्या ?
बेळगाव चे म्हणाल तर : तिथे माताही भाषिक मोठ्या संख्येने आहेत म्हणून maharashtrane विचार केलं तर त्या काड्या?
गोव्याचे म्हणाल तर : ख्रिस्ती लोकांनी मुद्डमून मराठी म्हणजे हिंदूंची आणि कोकणी म्हणजे ख्रिस्ती लोकांची असे रान उठवले आणि त्यात काही हिंदू हि भुलले
महाराष्ट्राला गोव्या बद्दल प्रेमच आहे
14 Oct 2020 - 3:56 pm | Gk
https://en.m.wikipedia.org/wiki/Goa
कोकणी बोलणारे 66 %
मराठी 10 % आहेत
धर्म - हिंदू 66%
ख्रिश्चन 25 %
म्हणजे कोकणी भाषा हिंदू ख्रिश्चन सगळेच बोलतात , ऑफिशयल लॅंग्वेज ही कोकणीच आहे , पण ऑफिसात मराठी बोलले तरी चालते , असे लिहिले आहे , रोमन स्क्रिप्ट ला पाठिंबा मिळाला नाही. कोकणी भाषा व देवनागरी लिपीच मुख्य आहे
म्हणजे तिथे कोकणीचेच प्राबल्य रहाणार , मग भले त्यांच्या भाषेत तुकाराम , पुलं आणि वपु न का जन्मेनात .
14 Oct 2020 - 7:00 pm | उपयोजक
https://www.facebook.com/100000189940970/videos/2996951156987853/?t=35
क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची मुलगी सारा हिला मराठी जवळपास येतच नाही म्हटलं तर चालेल. यावर मल्लिनाथी काय? तर "अहो सचिनचं क्रिकेटमधलं कौशल्य बघा.त्याच्या मुलीला मराठीत बोलता येत नाही हे कशाला बघता?"
पण हे म्हणताना याच साराचे आजोबा रमेश तेंडूलकर हे मराठीतले नामवंत कवी/लेखक होते याचा विसर पडतो. कदाचित तुलना होत असावी.सचिन तेंडूलकर जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.रमेश तेंडूलकर काय फक्त मराठी साहित्यवर्तुळात प्रसिद्ध आहेत असा तर्क असावा. साराला हिंदी आणि इंग्रजीतून व्यवस्थित बोलता येतं पण ज्या राज्यात राहतेय तिथली स्थानिक भाषा जी तिची मातृभाषासुद्धा आहे ती येत नाही. असे बरेच नग महाराष्ट्रात आहेत. काय करणार अशा मराठीकडे कस्पटासमान बघणार्यांकडे?
हा दुसरा व्हिडिओ बघा.
https://youtu.be/s5279_LEIxg
'महाराष्ट्राचे' माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीला मराठी वृत्तवाहिनीचा वार्ताहर हिंदीत प्रश्न का विचारत असावा? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच मराठी संवाद साधता येत नसेल तर याला काय म्हणावं?
यावर मल्लिनाथी काय? तर "अहो विदर्भात पूर्वीपासून हिंदीसुद्धा आहे.नागपूर ही मध्यप्रदेशची राजधानी होती."
पण हा इतिहास झाला ना? भाषावार प्रांतरचनेनुसार आलात ना महाराष्ट्रात? मग अजूनही हिंदीचा अनुनय कशासाठी? विदर्भातल्या राज्यसरकारच्या शाळांमधे आणि खाजगी शाळांमधे मराठी हा विषय असेल आणि तरीही १९५६ पासून आजपर्यंत विदर्भात मराठीसोबत तितक्याच प्रमाणात हिंदीसुद्धा बोलली जात असेल तर विदर्भातल्या लोकांना अजूनही मराठीसोबत हिंदीत संवाद का साधावासा वाटतो आहे.फक्त मराठीत संवाद साधण्यात अडचणी कोणत्या याचाही विचार व्हायला हवा. विदर्भ महाराष्ट्राचा एकतृतीयांश भाग असेल आणि तो हिंदीला इतका पाठिंबा देत असेल तर नक्कीच काहीतरी चुकतंय ना? मुंबईतही हीच अवस्था आहे.पण तिथे मराठीप्रेमी लोक वेळोवेळी याबद्दल आवाज उठवत,तक्रार करत असतात.विदर्भात हिंदी बोलण्याविरुद्ध आजपर्यंत किती आंदोलने झाली आहेत? १९५६ नंतर ६४ वर्षे झाली, राज्यभाषा मराठी झाली , शिक्षण मराठीतून आलं तरी हिंदीप्रेम संपत नसेल किंवा ती रोजच्या व्यवहारात वापरावी लागत असेल तर याला काय म्हणणार? दिव्याखाली अंधार?
उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो.पण मराठीत नाही.हे मला एका नागपूरच्याच वकीलांनी सांगितले.हे खरे आहे का?
15 Oct 2020 - 11:36 am | साहना
तुम्ही जे म्हणताय ते मला मान्य आहे. कूल किड्स मराठी बोलत नाही, त्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्याच न्यायाने इतर कूल किड्स सुद्धा मराठी बोलणे कमी पानाचे समजतात. इथे काही तरी ग्रँड कन्स्पिरसी नाही आणि कुठलेही सरकारी कायदे, पंचवार्षिक योजना, कुठली तरी चळवळ इत्यादी काहीही प्रभावी ठरणार नाही. मराठी समाजाने वेगाने प्रगती केली, आर्थिक समृद्धी आली, मराठी माणसाचा स्टिरिओ टाईप बदलला कि आपसूक हे चित्र सुद्धा पालटेल. सध्या मराठी माणसाचा स्टिरीओटाईप म्हणजे कामवाली बाई गंगू बाई नाहीतर पाटील किंवा कांबळे पोलिसवाला अशीच आहे. हे चित्र बदलायला पाहिजे. कसे बदलेल हे मला ठाऊक नाही !
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अत्युच्च दर्जाचे साहित्य मराठी भाषेंत निर्माण झाले पाहिजे. हे साहित्य कुणा पोटार्थी लेखकानेच लिहिले पाहिजे असे नाही तर मिपा सारख्या संकेतस्थळाचे सुद्धा फार मोठे योगदान इथे आहे . हॅरी पॉटर ह्या एका पुस्तकाने संपूर्ण इंग्रजी मुलांत वाचनाची गोडी पुन्हा निर्माण केली. आधी फेंटासि म्हणजे नर्ड आणि अन-कुल मुलांचे साहित्य होते. पण एकदा टिन मुलींनी हॅरी पॉटर वाचायला सुरुवात केली कि आपसूक सर्व कुल किड्स हॅरी पॉटर वाचू लागली. हीच मुले आज मोठी झाली आहेत आणि सुपरहिरो चित्रपटांचे चाहते झाले आहेत. मराठीला सुद्धा अश्याच प्रकारच्या साहित्य आणि कलाकृतींची गरज आहे. ( पुरंदरे ह्यांचा जनता राजा हे नाटक अश्याच प्रकारचे होते )
टीप : अंबानींचा सर्व परिवार अस्सलखीत गुजरातीत बोलतो. दक्षिण बोंबे मधील तथाकथित उचभ्रु व्यक्ती मध्ये जे कोणी गुजराती आहेत ते घरी गुजराती बोलतात, गुजराती पेपर आणतात आणि गुजराती नाटक सुद्धा पाहायला जातात.
15 Oct 2020 - 1:12 pm | Gk
बोंबे नाय हो मुंबई
14 Oct 2020 - 11:36 pm | गामा पैलवान
साहना,
तुमचा इथला प्रतिसाद पूर्णपणे पटला. काही विधानं कायमस्वरूपी कोरून ठेवायला हवीत. उदा. :
१. भाषा अभिजातच हवी हा अट्टाहास का ?
२. ख्रिस्ती धर्म ज्या प्रमाणे २००० वर्षे होता त्याच पद्धतीने फ्रोझन आहे तसा प्रकार भारतीयांत नाही.
३. स्वयमेव मृगेंद्रता" म्हणतात ते अक्षरशः हेच.
४. भारतीय संस्कृतीत तत्वज्ञानिक दृष्टिकोनातून classical/modern असे प्रकार नाहीत म्हणूनच आम्ही "सनातन" हा शब्द वापरतो
५. एखादी गोष्ट नवीन सुद्धा असली तरी असंख्य धाग्यांनी ती आमच्या भूतकाळाशी संबंधित आहे हे आम्हाला ठाऊक असते
६. भाषातज्ञ म्हणून मला अशी भाषा प्रिय आहे जिथे दळण दळणाऱ्या महिलेच्या ओव्या शेकडो वर्षे जिवंत राहतात, ....
७. मराठी भाषेंत नवीन नवीन साहित्य कसे निर्माण होईल, वाचकवर्ग, लेखक वर्ग इत्यादी कसा वाढेल, ह्या सर्वाना पोषक असे आर्थिक वातावरण कसे निर्माण होईल ह्यावर भर द्यावा आणि भाषेचे भविष्य आमची मुले पाहून घेतील !
धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
15 Oct 2020 - 5:15 pm | चौथा कोनाडा
छान निष्कर्ष काढला आहे गा.पै. साहेब.
क्रमांक ७ तर अगदी समर्पक, वादविवाद करण्यापेक्षा आपला यात सहभाग कसा वाढेल ते पाहिले पाहिजे.
15 Oct 2020 - 5:59 pm | कानडाऊ योगेशु
नुसतेच खळ्ळ खट्ट्याक करुन वा मराठीची जबरदस्ती करुन मराठी टिकुन ठेवण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होणार नाही असे वाटते. वर जो हॅरी पॉटरचा उल्लेख आला आहे त्याप्रमाणे जोपर्यंत वाचनीय साहित्य निर्माण होत नाही तोपर्यंत भाषावृध्दी होणे कठीण आहे. चंद्रकांता कादंबरीबद्दल असेही ऐकले आहे कि तिची लोकप्रियता इतकी होती कि काही अ-हिंदी भाषिक केवळ ती कादंबरी वाचता यावा म्हणुन हिंदी शिकले.अश्या प्रकारचे साहित्य जर एखाद्या भाषेत सातत्याने निर्माण होत राहिले तर भाषावृध्दी आपोआपच होत राहिल.
15 Oct 2020 - 8:54 pm | चौथा कोनाडा
यातून मराठीत वाचनीय साहित्य निर्माण होत नाही असे म्हणावयाचे आहे काय ? मला नाही वाटत असे.
आणि याच साठी तर मराठीचा प्रचार आणि प्रसार करायला हवा जेणे करून अ-मराठी भाषिक देखील मराठी शिकायला प्रवृत्त होतील,
१९८० पुर्वी परप्रांतीय व्यापारी शेठ लोक व्यवहारिक कामासाठी मराठी शिकून घ्यायचे, त्यांच्या पुढील पिढ्या देखील मराठी उत्तम लिहितात, बोलतात.
गेल्या दोन तीन दशकांपासून हिंदी-इंग्रजीमुळे मराठीची अवस्था बिघडत चालली आहे.
16 Oct 2020 - 10:06 am | कानडाऊ योगेशु
बहुदा मुद्दा मांडण्यात माझ्याकडुन काही गफलत झाली असावी.
जे काही वाचनीय साहित्य होते आहे ते बहुदा मराठीचा परिघ भेदुन बाहेर जाऊ शकत नसावे. साहित्यच असे नाही तर इतरही माध्यमे आहेत ज्यातुन मराठी आपला परिघ भेदु शकते.
काही वर्षापूर्वी बिनधास्त हा चित्रपट आला होता. ऑल वुमन कास्ट असा प्रयोग प्रथमच केला गेला होता तेव्हा मी जिथे काम करायचो तिथले अ-मराठी भाषिकांचीही उत्सुकता चाळवली गेली होती व काहींनी तो पाहिलाही होता. तिच गोष्ट सैराटची. बर्याच अ-मराठी भाषिकांनी तो पाहिला व त्यांना आवडला सुध्दा. इथे दर्जा/गुणवत्ता हा मुद्दा बाजुला ठेवु. पण प्रचार/प्रसार करायचाच असेल तर लोकांना असे काही द्यावे लागेल कि ते तत्सम कलाकृतींचा आस्वाद घ्यायला प्रवृत्त होतील.
19 Oct 2020 - 12:14 pm | उपयोजक
हे फॉरवर्ड आले आहे.यातून ग्रामीण जनता काय वाचते आहे हे कळेल का?
----------------------------------------------
मराठी लोक काय वाचतात किंवा वाचत नाहीत याबद्दल काहीच माहितीच उपलब्ध नाही, अशी एक कुरकुर गेल्या काही दिवसांमध्ये नोंदली होती. त्यावर सकारात्मक कृती करण्यासाठी एक सर्वेक्षण - किंवा शुद्ध मराठीत सर्व्हे - आखला आहे. लोकांच्या वाचनसवयीचं निरीक्षण करण्याचा हेतू त्यामागे आहे. तुम्ही तर त्यात भाग घ्याच. तुमच्या मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना, नातेवाइकांना, कुटुंबीयांना... जमेल त्या सगळ्यांना धाडा. एका महिन्याच्या कालावधीत किमान १००० प्रतिसाद मिळवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे...
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdH9lA1Rr5qz_5EhZZrs4STVoWBiYcN...