...पाहिले म्यां डोळा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 11:10 am

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Oct 2020 - 11:25 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली असे म्हणवत नाही
पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

5 Oct 2020 - 12:00 pm | अनन्त्_यात्री

अनुपम्य.
नुकताच तो सोहळा अनुभवून परतलोय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Oct 2020 - 12:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

आता ठणठणीत आहात ना?

अजून एक जवळचा मित्र गेले १५ दिवस व्हेंटीलेटरवर झोका खेळतो आहे. त्याची आठवण झाली आणि अस्वस्थ झालो

पैजारबुवा,

कविता वास्तवदर्शी झाली आहे.