ही कसली हळवी गीते
मज स्मरति मागोमाग
नात्यांवर जमली राख
आतून देतसे ऊब
ही असली कसली खेळी
तू खेळून जासी सहजी
हरताना जख्मी होतो
तरी वाटे लावू बाजी
स्मरणारे जुनेच डाव
मी करतो अलगद चाल
अन पहाता पहाता देही
व्रण उठती लाले लाल
या खेळाचे मैदान
जरी भासे अंगण वाडी
पण नियती लागता मागे
पळता भुई वाटे थोडी
हे नियम उलटे सुलटे
मज कळो लागले जेव्हा
बळ सरले त्राणांमधले
संपला वेळहि तेव्हा
सरले जरी अंतर आता
परी देणे टळले नाही
तो फेडून घेतो आधी
जे दिलेच नव्हते काही
प्रतिक्रिया
24 Sep 2020 - 11:06 pm | राघव
चांगलंय. लिहित रहा. :-)