तहान

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
13 Sep 2020 - 11:36 pm

झाडांचे उंच पिसारे
वारा हलतो जरासा
माझ्याही ओठावरती
थिजली शुष्क पिपासा

पेटले आभाळ वरती
दूरस्थ शीतल जाळ
पाण्यावर मंद लहरींच्या
पायी बांधले चाळ

पोकळीत वैशाखाच्या
तरंगते उष्ण हवा
डोंगरात झाडामध्ये
शोधते शांत विसावा

दगड झाड अन पाणी
मी याहून वेगळा नाही
कोलाहलातून शहराच्या
अलगद निसटू पाही

बुडता सूर्य मावळतीला
घरट्यात परतती रावे
कणाकणात या सृष्टीच्या
अलगद मिसळून जावे

जाग झोपेमधुनी येता
जाणीव याची व्हावी
आकाशी डुलत्या फांद्या
मुळे जमिनीत असावी

रोकडा क्षण आत्ताचा
जाणिवेत पूर्ण भरावा
साजरे पुरे अस्तित्व अन
जगण्याचा उत्सव व्हावा

-अनुप

कविता

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2020 - 4:10 pm | प्राची अश्विनी

कविता आवडली.

अन्या बुद्धे's picture

16 Sep 2020 - 6:13 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

राघव's picture

18 Sep 2020 - 1:07 pm | राघव

डोंगरात झाडामध्ये
शोधते शांत विसावा

ही कल्पना खास आवडली! :-)

अन्या बुद्धे's picture

18 Sep 2020 - 1:20 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)