काळ्या झालरीची नक्षी
नभी लोलक विजांचे
वाजे चौघडा नगारे
वाऱ्यासंगे हे ढगांचे
आला,आला म्हणताना
दारी येउनी ठाकला
वर्षातला नवा ऋतु
माझ्या डोळ्यात साठला
किती किती त्याचा दंगा
किती रूपे, किती रंग
काळ्या फत्तराला देई
एक ओलसर अंग
त्याचे थेंब, त्याच्या सरी
येती धावून धावून
आर्त तापल्या भुईला
भेटी कवेत घेऊन
कोसळल्या धरेवरी
जशा धारांवर धारा
काळी माय झाली सर्द
बिलगून लेकराला
मग धावले बाहेरी
तिच्या अंतरीचे काही
वाहे भरून भरून
जाऊ दश दिशा पाही
मंद गंध जीवघेणा
कसा पसरे भरारा
गेला दाटून कोंदून
ओल्या सृष्टीचा गाभारा
वाटे हवासा हवासा
पाहुणा हा अनाहूत
निथळूनी गेले मन
पाहुनी हा वर्षा दूत
प्रतिक्रिया
16 Sep 2020 - 4:09 pm | प्राची अश्विनी
कविता आवडली.
18 Sep 2020 - 9:57 am | चांदणे संदीप
एकदम लयदार.
सं - दी - प