पुण्य

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
16 May 2020 - 10:32 pm

माझा कातर स्वर आज गातो भेसूर लयीत
वाट चालतो घरची काटा-काचा तुडवीत.

स्वप्न पाहून मोठाली सोडला मायेचा मी गाव
आलो शहराच्या खुराड्यात घालून पंखावर घाव.

राब राब राबलो आटवून रक्त आणि पाणी
सटवाईने लिहिली भाळी जिंदगी दीनवाणी.

हात राठ झाले आणि तळव्याची चप्पल
पिलं मोठी झाली त्यांना देऊ कोणती अक्कल.

जग वैरी आपलं आपण जगाचे पोशिंदे
गाड्या-माड्या घडवून आपल्या जगण्याचेही वांदे.

कामाचं दाम फक्त जीवाचं मोल शून्य
माणसासारखं जगायला काय वेगळं लागतं पुण्य?

(स्थलांतर करणाऱ्या कष्टकऱ्यांना समर्पित)

कविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

16 May 2020 - 10:34 pm | जव्हेरगंज

सुंदर!! जमलीये कविता!!

मन्या ऽ's picture

16 May 2020 - 11:06 pm | मन्या ऽ

सुंदर..

गणेशा's picture

16 May 2020 - 11:39 pm | गणेशा

सुंदर