- डॉ. सुधीर रा. देवरे
भाषेतले जुने शब्द टिकवत नव्या शब्दांसाठी आपण कायम स्वागतशील असलं पाहिजे. मग ते नवे शब्द भाषेत अगदी नव्याने तयार होणारे असोत की इतर वा परक्या भाषेतील असोत.
आपल्या जुन्या पारंपरिक ग्रामीण शेतीविषयक शब्द आज मोठ्या प्रमाणात हरवू लागले आहेत. त्या शब्दांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच बैलांच्या सावळा, शेतीची मेर म्हणजे काय, वगैरे आपल्याला असं कोणाला कधी विचारावं लागू नये. जुवाडं, जोतं, शेल, धाव बसवणं, साटली, वंगन, झ्याप, च्याहूर, उपननं, पाथ, सारवनं, भोद, बांध, सारंग, गव्हान, बंधनी, कंबळकाच, बटवा, पिसोडी, सोला, साकरू, सरकी, तन, बोचकं, शिवळा, वैचा जायेल, लसूनचोट्टा, चोखांडभर, उल्हानं देनं, शिळागार, कडीजखडीना, वरमाड, मोचडं, गागा बसनं, डाभुर्ल, आबगा, जथापत, गेदू, डांजनं, ल्हाव करनं, व्हका घेनं, पघळनं, फसकारा, बाशी, याळ, चिपडं पडनं, आखठं करनं, दिवाबत्ती करनं, कठान, मुचकं, जुवाडं, गेज, काठोख, खुशाल आदी अहिराणी शब्दसंपदा आपण अर्धनागरी लोक आजही समजू शकतो.
उद्या म्हणजे आपल्यानंतरची पिढी हे शब्द वापरेलच असं नाही. कोणी हे शब्द वापरले तर नव्या पिढीला ते समजतीलच असं नाही. म्हणून भाषेतले- परंपरेतले जुने शब्द मोठ्या प्रमाणात हरवले तर मराठी भाषेचा सांगाडा ढळायला लागेल. भाषा जीवंत असणं वेगळं आणि जुन्या संचितासह अस्तित्वात असणं वेगळं. संस्कृत भाषेच्या ढळढळीत उदाहरणाने जागृत होत भाषा कशी प्रवाही आणि सर्वसमावेशकपणे टिकवता येईल याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे.
आजच्या भाषेत रुढ होणारे परकीय शब्द आपल्या भाषेतले भाषिक हिस्सा झालेले आहेत, ते स्वागतार्हच आहे. इतर भाषेतून आलेल्या अनेक शब्दांना मराठी विभक्तीो वा प्रत्यय लावून नव्याने तयार होणार्यात शब्दांचे भाषेत स्वागत केले पाहिजे. उदाहरणार्थ, आज भाषेत सर्रास वापरला जाणारा ‘परवडेबल’ हा शब्द मराठी आहे का? नुसता इंग्रजी आहे का? परवडणे या मूळ मराठी शब्दाला इंग्रजीतला एबल प्रत्यय लावलेली ही संज्ञा, संकरीत असली तरी आज तो मराठी शब्द म्हणून रुढ होऊ शकतो.
‘नो उल्लू बनावींग’ अशा वाक्याची एक जाहिरात आहे. नो हा इंग्रजी शब्द. उल्लू हा मराठी आणि हिंदीही असलेला शब्द. बनावींग मध्ये इंग इंग्रजी प्रत्यय. बनव (बनवणे तला) मराठी आणि हिंदीतही वापरला जाणारा शब्द. ही कोणती भाषा आहे? इंग्रजी, मराठी की हिंदी? ही भाषा आपली नाही? खरं तर ही चालता बोलता सहज तयार होणारी प्रवाही लोकभाषा आहे. आपल्या रोजच्या भाषेत ही गरज असलेली भाषा आपोआप तयार होत समाजभाषेत मुरत असते. अशी भाषा कोणत्याही भाषेला मारत नाही. उलट आजची आपली भाषा अजून सजग सशक्तक करीत असते. ‘ऑफिसात’ हा शब्द आज पूर्णपणे मराठी झाला आहे. (ऑफिस या मूळ इंग्रजी शब्दाला मराठी विभक्तीब लागून तो ऑफिसात होताना पूर्णपणे मराठी होतो.) इतर भाषेतल्या शब्दांना मराठी विभक्ती - प्रत्यय लावून तो भाषेत रुढ होणे ही प्रक्रिया आपोआप सुरु असते. त्यासाठी खास प्रयत्न करावा लागत नाही आणि यात वावगंही काही नाही. आजच्या जागतिक इंग्रजी भाषेतसुध्दा जगातील अनेक बोलीतले- भाषेतले शब्द रूढ झाले. अशा शब्दांची भाषेत रोज भर पडत आहे.
आतापर्यंत अनेक भाषा मरून गेल्यात, त्यांचे उत्थापन- संवर्धन करता येणार नाही. काही मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत आणि उद्या मरण्यासाठी ज्या रांगेत उभ्या आहेत, त्या भाषा कोणत्या? असा प्रश्न कोणी उपस्थित करू शकतो. अनुमानाने या भाषा जातीय, जमातीय आणि भटक्या भाषा असू शकतात. कारण भाषा बोलणारा समाज वाटला जाणे, समाज कमी होणे, स्थलांतरीत होणे, भाषेबद्दल न्यूनगंड असणे आणि भाषेबद्दल भयगंड- अपराधगंड असणे हे त्या भाषेच्या अस्तित्वाच्या मूळावर येऊ शकते. उदाहरणार्थ म्हणून कोळी समाजाची भाषा.
जे कोळी लोक पारंपरिक पध्दतीने मासेमारी करत आले, ते आपल्या समुहासह समुद्र काठावर आसपास वस्ती करून पिढ्यांपिंढ्यापासून राहत होते. आपल्या व्यवसायाशी संबधीत आपली कोळी भाषा ते बोलत होते. मात्र आज मासेमारी हा प्रचंड मोठा व्यवसाय झाला. भारतातही आपल्या कोळी समाजापुरता तो मर्यादित राहिला नाही. मोठमोठ्या बोटींनी समुद्राच्या तळापर्यंत आधुनिक पध्दतीने आज मासेमारी केली जाते. समुद्र काठावर वास्तव्य करून कोळी बांधव जो ऋतूनुसार मासेमारीचा छोटा व्यवसाय करत होते तो ही या व्यापारी हल्ल्याने संपुष्टात आला. कोळ्यांचा व्यवसाय इतरांनी पळवला. हा व्यवसाय करणारे लोक ग्लोबल व्यापारी झाले. या व्यावसायिकांशी टक्कर घेणे कोळ्यांना शक्य नाही. ते मोठ्या यंत्राशी स्पर्धा करू शकत नाहीत. इतके भांडवल आणि व्यावसायिकतेचे ज्ञानही त्यांच्याकडे नाही. पारंपरिक पध्दतीच्या विशिष्ट जाळ्याने मासे पकडण्याचा हा व्यवसाय करत ते आज जगू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आता हा समूह दुसरा व्यवसाय करणार. त्यासाठी ते समुद्र काठावरून स्थलांतरीत होणार. जसाचा तसा समूह केवळ आपली जागा बदलून विस्थापित होईल असं नाही. ते सुट्यासुट्याने कुठल्यातरी वेगवेगळ्या शहरात विस्थापित होत आपल्या रोजीरोटीसाठी विविध व्यवसायात मजूरी करणार. आजपर्यंत जो समाज समूहाने रहात होता तो फुटणार. भिन्न भिन्न व्यवसायात नव्हे, व्यवसायातील मजुरीत गुंतणार. अर्थातच यासाठी ते तडजोड करत आपली भाषा सोडून स्थानिक बोलली जाणारी अन्य भाषा मोडकी तोडकी बोलणार. मराठी, हिंदी, कन्नड, तेलगु, मल्ल्याळम वगैरे. म्हणूनच कोळी लोकांची भाषा कालांतराने संपुष्टात येऊ शकते. कोळी लोक आपली भाषा कालांतराने विसरून जाऊ शकतात. ही मांडणी करणे जीवावर जात असले तरी वस्तुस्थिती अशी आहे.
अशा पध्दतीने कोळी भाषेला समांतर असणार्याु अनेक भटक्या लोकांच्या भाषांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दर पंधरा दिवसातून जगातली एक बोली मरते. लयाला जाणार्याा बोली कोणी वाचवू शकत नाही. आपण फक्तक अशा भाषांचे डॉक्युमेंटेशन करू शकू. असे दस्तावेजीकरण मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. भाषांच्या अस्तित्वासाठी ही काळाची गरज आहे.
(‘मराठी संशोधन पत्रिका’ जानेवारी- फेब्रुवारी- मार्च 2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या चार लेखांपैकी हा एक. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
16 Feb 2020 - 11:32 am | डॉ. सुधीर राजार...
147 वाचक धन्यवाद
16 Feb 2020 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाची चिंता करु नये. बाकी आपण उल्लेखलेले कित्येक शब्द आता नव्या पिढीला माहिती असणार नाहीत.
पण मराठी भाषेचं वैशिष्ट्येच असं की ती नवनवे बदल स्विकारते म्हणूनच मराठी भाषा प्रवाही आणि टीकून राहिलेली आहे.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2020 - 4:11 pm | डॉ. सुधीर राजार...
खरं आहे. धन्यवाद.
17 Feb 2020 - 4:33 am | विजुभाऊ
डॉ गणेश देवी https://www.bbc.com/news/world-asia-india-41718082 यानी जवळपास ७८० भारतीय भाषांचे दस्तैवजीकरण केले आहे.
त्यांचे या विषयातील कार्य खूप मोठे आहे.
17 Feb 2020 - 4:13 pm | डॉ. सुधीर राजार...
भाषा केंद्राशी 1997 पासून मी म्हणजे सुरूवातीपासून जोडला गेलो. ढोल चा मी संपादक.
खूप काम केले. शक्य होईल तेवढे. त्यांच्या कामात माझा खारीचा वाटा आहे
20 Mar 2020 - 12:15 pm | डॉ. सुधीर राजार...
त्या दस्तावेजीकरणासाठी राबणारे आम्ही अनेक लोकआहोत
17 Feb 2020 - 7:01 am | सनईचौघडा
खूप नवीन शब्द कळले.
17 Feb 2020 - 4:13 pm | डॉ. सुधीर राजार...
धन्यवाद
17 Feb 2020 - 2:21 pm | माहितगार
दस्तबंद संशोधनांना नंतर बंद कपाटात वाळवीच लागणार असेल तर काय कामाची संशोधने आणि ते खर्च? भाषा विषयक संशोधने पब्लिक मनीच्या बळावर होतात पण आंतरजालाच्या माध्यमातून पब्लिकसाठी सहज उपलब्धता मात्र नसते. त्या पेक्षा एखाद्या शेती किंवा वस्तूत्पादकाचा कर्जाचा बोजा हलका केल्यास तेवढाच रोजगार तरी येतात. भाषा तशाही आपल्या नशिबाने येतात आणि जातात.
जरासा निराशावादी सूर आळवण्यासाठी क्षमस्व
17 Feb 2020 - 4:16 pm | डॉ. सुधीर राजार...
आपल्या म्हणण्यात तथ्य असले तरी असं करता येणार नाही. हे सर्व ऑन लाईन असावे हे बरोबर. भारतासारख्या देशात वीस कोटी लोक उपाशी राहतात म्हणून अवकाशात आपण उपग्रह पाठवायचाच नाही का?
17 Feb 2020 - 5:32 pm | माहितगार
प्रतिसादाची दखल घेण्यासाठी अनेक आभार.
उपग्रहांचा शिक्षणात उपयोग होतो, बोली भाषा संशोधनाचा प्राथमिक शिक्षणात सुद्धा उपयोग केला जाताना दिसत नाही. उप्रग्रह पाठवले जाताना विज्ञान संशोधन कपाटाच्या बाहेर येते, भाषा संशोधन कपाटात धूळ खाण्यासाठी बंदीस्त होत नाही ना ?
मी बोली भाषा संशोधनाच्या विरोधात आहे असे नाही पण जशी संस्कृत जनते पासून दूर ठेवली गेली तसे आज बोली भाषा संशोधन ज्यांची बोली आहे अशा जनतेपासूनच दूर आहे त्यांना त्याचा काही फायदा पोहोचवला जाण्याचे कोणते उद्दीष्टही वाच्यता साधा उल्लेख उद्गार ही कुठे दिसत नाहीत ?
18 Feb 2020 - 9:29 am | डॉ. सुधीर राजार...
मला तमिळच्या मर्यादा आहेत, तश्या आदिवासी बालकांना मराठीच्या मर्यादा आहेत.त्यांना त्यांच्या भाषेत किमान प्राथमिक शिक्षण तरी दिलं जायला हवं म्हणजे ते पुढे ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.म्हणून बोली उपयोजित होणे डाक्युमेंटेशन होणे महत्वाने. मराठी काढून घेतली आणि आपल्यावर इंग्रजी लादली तर जसे चालणार नाही.
18 Feb 2020 - 11:04 am | चौकस२१२
"इतर भाषेतून आलेल्या अनेक शब्दांना मराठी विभक्तीो वा प्रत्यय लावून नव्याने तयार होणार्यात शब्दांचे भाषेत स्वागत केले पाहिजे".....
ह......म........एवढी "सहिष्णुता " दाखवता येईल का जरा शंका वाटते साहेब... बाकी लेख मस्त अनेक शब्द खास करून अहिराणी शब्दसंपदा वाचून चांगलं वाटलं ( जमलं तर काही शब्दांचा अर्थ जरूर सांगा )
जसा राहणीमानात बदल तसा भाषेत पण बदल होणार पण त्यात काहीतरी तारतम्य , असावे असे वाटते... पण हि लक्ष्मण रेषा ठरवायची कशी? उगाचच बदल नको किंवा ओढून ताणून संकुचित वृत्तीने जुने जपासावे हि दोन टोके पण नकोत .. पण साध्य कसे करायचे ?
जसे ओढून ताणून उगाच फॅक्स मशीन ( कि ज्याचा जमीन मराठी भाषिक भूमीत झाला नाहीये ) त्याला "दळणवळण चित्र प्रवास यंत्र " असं म्हणू नये तसेच ‘परवडेबल’ असला शब्द वापराने हे पण उगाचच बदल असे वाटत्ते
पण असे म्हणले कि दुसरी बाजू काय म्हणणार " मग तुम्हाला माफ, दवाखाना हे शब्द कसे चालतात ?"
.
बरं दुसरे असे कि नवीन शब्द तयार होऊ लागले आणि खास करून मिश्र भाषेचे तर मग असलेल्या आणि क्लिष्ट नसलेल्या मराठी शब्दांचे काय करायचे ? त्यांना का अडगळीत टाकायचे ?
रांगेत उभा राहिलो आणि कंटाळा आला असे म्हणता येत असताना मग "लाईनीत उभा राहलो आणि बोअर झालो" हे कशाला?
19 Feb 2020 - 11:00 am | डॉ. सुधीर राजार...
सहमत. धन्यवाद
19 Feb 2020 - 1:06 pm | माहितगार
भाषा बोलणारा समुदाय आर्थिक दृष्ट्या किती समृद्ध / अवलंबित्वात आहे, भाषा आणि आर्थिक समृद्धी विषमतेस पुरक नसून रयतेसाठी राबल्या जातात का ? भाषा ज्ञानभाषा म्हणून वृद्धींगत ठेवण्याची भाषिकात जिद्द किती ? समुदायाचा भाषाभिमान भाषा निष्ठा किती घट्ट किंवा पातळ आहे? आणि समुदायाचा भाषाभिमान निष्ठा असलेल्या अनुवादक आणि अनुवादांना प्रोमोट करणारी भक्कम आणि स्वयंपूर्ण आर्थिक प्रणाली अस्तित्वात आहे का?
नसेल तर किल्ल्यांच्या मोडकळीस आलेल्या भिंतीं जाऊन नवीन भिंती त्यांची जागा घेणे जगण्यात सर्वाधिक सक्षम टिकतो या नैसर्गिक नियमानुसार नैसर्गिक असावे.
20 Mar 2020 - 12:20 pm | डॉ. सुधीर राजार...
कोणतीच भाषा येत नाही म्हणून जे लोक आपलीच भाषा बोलतात ती त्यांच्यासाठी टिकवणे महत्वाचे. अशा बोलीतून स्थानिक लोकसंस्कृती कळते. पण आपल्याला इंंग्रजी येते म्हणून ती अधून मधून पेरणे हे वेगळे
19 Feb 2020 - 2:35 pm | चौकस२१२
"...या नैसर्गिक नियमानुसार नैसर्गिक असावे.." एक सर्वसाधारण विधान म्हणून ठीक पण क्षमा करा हे असलं वागणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या हाताने आपली भाषा नामशेष करण्यात जमा आहे... या tarka नुसार "लाईनीत बोअर झालो" हे जर नवीन "प्रमाण मराठी"असेल तर बोलणंच खुंटलं...
म्हणजे कुस्ती खेळण्या अगोदरच पैलवान हरलो असे धरण्यासारखे आहे ! धन्य
हि तर चक्क भाषेची भेसळ आहे ,
हे लिहिणायमागचा हा हेतू नाही कि अमुक एका भागातील मराठी शुद्ध वगैरे ... फक्त असली मराठी मुद्दामून वापरणे हा एक तर अति सहिष्णुतेचा प्रकार वाटतो... किंवा आळशी पणाचा किंवा स्वतःला उगाचच आपण कसे "नेटिव्ह" नाहीत किंवा "राखाडी साहेबांच्या " वृत्तीचा नमुना वाटतो
आज अनेक दशके महाराष्ट्र्र आणि भारताबाहेर राहून जर लोकं चांगली प्रामाणिक ( भागाशी प्रामाणिक या अर्थाने नाशिक चा नाशिक पद्धतीने, कोल्हापुरे कोल्हापूर पद्धतीने वैगरे ) मराठी बोलू शकतात तर महाराष्ट्रात राहणाऱ्यांना काय धाड भारतीय ते समजत नाही ?
एक कल्याण मध्ये वाढलेला मला एकदा म्हणाला होता " अर्रे मी कॉस्मोपोलिटिन वातावरणात वाढलो ना म्हणून असं मराठी .." मला हसू आलं तो ज्याच्या समोर बोलत होता तो अनेक वर्षे नुसतातच महाराष्ट्रा बाहेर नाही तर लंडन मलबोर्न, अमेरिकेतील काही शहरे अश्या खऱ्या अर्थाने "कॉस्मो " शहरातून राहिलेला पण उत्तम मराठी बोलणारा होता...
20 Mar 2020 - 12:21 pm | डॉ. सुधीर राजार...
सहमत