- डॉ. सुधीर रा. देवरे
महाराष्ट्रात जवळ जवळ पासष्ट बोली बोलल्या जातात. अनेक बोलीभाषेत पुस्तकेही निघू लागलीत. त्या त्या बोलीतले बरेच व्यासंगी लेखक आहेत. ते सातत्याने आणि विपुल लेखन करीत असतात. शोध व संशोधनात्मक निबंध लिखाणही करीत असतात. विविध चर्चासत्रांतून सादर करत असलेल्या निबंधांसाठीही ते खूप मेहनत घेतात. विद्यावाचस्पती शिस्तीच्या अभ्यासातून त्यांची शैक्षणिक जडणघडण झालेली असल्याने त्यांच्या लिखाणाला वजन प्राप्त होते. त्यांची मातृभाषा जी बोलीभाषा असते त्या बोलीबद्दल साहजिकच त्यांना आत्मियता असते. आपल्या भाषेवर ते भरभरून प्रेम करतात. ते रास्तच आहे. आपल्या भाषेत प्रकाशित होणार्याष समकालीन पुस्तकांबद्दल त्यांना आस्था वाटणे स्वाभाविक आहे. याच आस्थेतून भाषेविषयी त्यांचे बरेच लिखाण प्रकाशित होत असते.
स्वत: लेखक वा इतर कोणाच्या आग्रहाखातर त्या त्या वेळी अशा दबदबा असलेल्या त्या बोलीतल्या ज्येष्ठ लेखकांकडून काही बोलीभाषा विषयक पुस्तकांची परीक्षणे केली जातात. पुस्तके प्रकाशित झालीत म्हणून कर्तव्याने नव्या लेखकाला दिलेली कौतुकाची थाप, असे हे लिखाण असते. लेखकाला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या लिखाणाचे केलेले गौरवीकरण असेही या लिखाणाला म्हणता येईल. नवीनच लिहू लागणार्यांेवर दोन शब्द कौतुकाचे बोलावे आणि त्याला प्रोत्साहीत करावे या चांगल्या व विशुध्द हेतूने त्यांच्या हातून ही परीक्षणे लिहून होतात. आपली मातृभाषा असलेल्या भाषेत उपयोजित झालेले लिखाण पाहून प्रेमाने त्या पुस्तकावर चार शब्द लिहून ते इतरांपर्यंत पोचावे ही इच्छा त्या बोलीतल्या लेखकाची असते. अशा लिखाणाच्या लेखांचा संग्रह पुढे पुस्तक रूपाने प्रकाशित होतो, हे ही साहजिक आहे.
बोली भाषेतल्या कविता, कथा, कादंबरी आदींची दखल या परीक्षणांत घेतली जाते. भाषेतल्या संज्ञा, शैली, घाट, परिवेश, जीवन-जाणिवा, उपयोजन, मांडणी या अंगाने हे जबाबदार लेखक कलाकृतीच्या सौंदर्याचा वेध घेत साहित्य आस्वादाच्या दमदार घटकांगांवर लक्ष केंद्रीत करतात आणि कलाकृतीचे वाड्.मयीन मूल्यमापन वा अर्थनिर्णयन करू पाहतात. अनेक कलाकृतींचे आणि काही संशोधन ग्रंथांचे न्यूनत्वही ते नम्रपणे दाखवून देतात. पण याचवेळी त्यांच्यातील प्रेमळ माणूस विशिष्ट लेखकाच्या वा पुस्तकाच्या प्रेमात पडून- तटस्थतेचा भंग करू पाहतो. मीमांसेत अनाठायी विशेषणे लावल्याने समीक्षा व्यक्तीचगत पातळीवर येते व केवळ आस्वादाचे रूप धारण करताना दिसते. समीक्षेत जे भावनिक दूरत्व हवे असते ते हरवल्याने काही वेळा समीक्षा दुय्यम तर व्यक्तिेगत आस्वाद महत्वाचा होऊ लागतो.
विशिष्ट बोलीसंबंधीचे लिखाण वा त्या बोलीत झालेल्या लिखाणाबद्दल लिहिणे यात जागरूकता असण्याची गरज असते. उदाहरणार्थ, असे पुस्तक वाचून त्या बोलीचे भाषक नसलेल्या अभ्यासकांची दिशाभूल होऊ शकते. अशा पुस्तकात ज्या ज्या पुस्तकांवर लिहिले गेले एवढेच फक्तश त्या बोलीत लिहून झाले की काय? असा चुकीचा संदेश ती बोली बोलत नसलेल्या प्रमाणभाषकात जाऊ शकतो. (मात्र प्रमाणभाषेतील पुस्तकांचा असा आढावा प्रकाशित झाला तर अभ्यासकांना खरे-खोटे माहीत असते. म्हणून दिशाभूल होण्याचा संभव नसतो.) ज्यांनी अद्याप त्या विशिष्ट बोलीभाषेविषयी काही वाचले नाही अशा नव्या अभ्यासकांनीही त्या भाषेच्या परिचयासाठी केवळ हेच पुस्तक वाचले तर त्यांचाही गैरसमज होऊ शकतो. म्हणून या पुस्तकात (शेवटी का होईना) पूर्वसूरी त्या विशिष्ट बोली लेखक- संशोधकांची सूची देणे गरजेचे असते. (वाड्.मय इतिहासात ऐतिहासिक संदर्भ असलेल्यांचा अनुल्लेख करता येत नाही.)
म्हणून अशा बोलीभाषक लेखकांवर लिखाण करताना अगदी पहिल्यापासून सुरूवात असायला हवी असते. म्हणजे पूर्वसूरींपासून सुरूवात होऊन आताच्या काळापर्यंत यायला हवे. मग हे लिखाण काही खंडात करता आले तरी हरकत नाही. उदाहरणार्थ म्हणून विशिष्ट बोली भाषेत भरीव काम करणार्याी एखाद्या लेखकाचा उल्लेख अशा पुस्तकात आला नाही तर बिगर बोली वाचकांचा गैरसमज होऊ शकतो. हे इथे सविस्तर लिहिण्याचे कारण, बिगर बोली भाषकांनी केवळ असे एकच एक पुस्तक वाचले तर त्यांना ही वस्तुस्थिती कळावी. मात्र अशा परीक्षणांचे पुस्तक प्रकाशित करणारे लेखक हे जाणून बुजून करतात असे नाही. विशिष्ट पुस्तकांची परीक्षणे लिहून झालीत व इतरत्र प्रकाशितही झालीत, म्हणून हे परीक्षण लेखांचे पुस्तक प्रकाशित करू या, ही त्यांची भूमिका अशा पुस्तकांमागे असावी.
आपल्या विशिष्ट बोलीभाषेतला पहिला कवितासंग्रह, पहिली कादंबरी, पहिले सदर लेखन इत्यादी सहज उल्लेख लेखकाकडून केले जातात. पहिला, पहिली, पहिले ही विशेषणे काही परीक्षणकर्त्यांची आवडती विशेषणे होताना दिसतात. ती विशेषणे त्यांची आवडती असली तरी हरकत नाही, पण चुकीची असू नयेत. मात्र स्नेहाखातीर ‘पहिले’ विशेषण लावलेले हे लेखन त्या बोलीतले पहिले वहिले लेखन नसते, याची परीक्षणकर्त्या लेखकांनी खात्री करून घ्यायला हवी असते. म्हणून पुस्तक परीक्षणात तटस्थतेपेक्षा (लेखक वा त्या पुस्तकाबद्दल) जिव्हाळा वरचढ ठरत असल्याचे लक्षात येते. ‘पहिले’ या विशेषणासारखेच काही लेखकांचे ‘अस्सल’ या संज्ञेवर अतोनात प्रेम असल्याचे दिसून येते. ‘निखळ बोलीतले म्हणून स्थान द्यावे लागेल’, अशीही वाक्य वाचायला मिळतात. निखळ, अस्सल बोली, अस्सल शब्द, अस्सल शब्दकळा अशा ढोबळ संज्ञा सहजपणे लिहिल्या जातात. भाषेतली अस्सलता जी भाषाशास्त्राच्या आचार संहितेनुसार तकलादु ठरते. भाषेत अस्सल आणि कमअस्सल असे काही नसते, ही वस्तुस्थिती आहे. समीक्षेत खटकणारे संबोधनेही लेखक सहज वापरतात. नियतकालिकांतील संशोधनात्मक, ऐतिहासिक, गंभीर लिखाण एकीकडे तर सहजकविता, चुटके, गोष्टींना वाहिलेले फुटकळ नियतकालिक दुसरीकडे यांचे स्थान अधोरेखित करण्याचे काम आढावा घेताना का होईना अभ्यासकाला टिपायचे असते. याउलट वीस वर्षांपूर्वी विशिष्ट भाषिक चळवळीसाठी निघालेल्या नियतकालिकाची दखल शेवटी तर आताच्या एखाद्या व्यावसायिक अंकाची दखल आधी घेण्याचा चमत्कार अशा लेखात होताना दिसतो.
केवळ पुस्तक परीक्षणातच नव्हे तर भाषा संदर्भात लेख लिहिताना सुध्दा काही लेखक योग्य तो संदर्भ तपासून न पाहता हाती लागेल तो आताचा संदर्भ देऊन मोकळे होतात. उदाहरणार्थ, ‘मराठी प्रमाणेच अहिराणी ही देखील प्राचीन भाषा आहे’ असा संदर्भ देताना हे नेमके कोणत्या पूर्वसूरीने मांडले आहे, हे तपासून पाहण्याची तसदी अभ्यासक घेत नाहीत. जी पुस्तके आपल्या मित्रमंडळाकडून भेट आलेली असतात तीच फक्तद संदर्भासाठी वापरली जातात. या व्यतिरिक्तकचे संदर्भग्रंथ विकत घेऊन वा ग्रंथालयातून उपलब्धप करून संदर्भ शोधले जात नाहीत. म्हणून अशा लिखाणाची विश्वसार्हता संशयास्पद ठरते.
भाषेबाबत आप आणि पर असा भेदभाव मनात असला तर समीक्षा आणि मीमांसाही व्यक्तीपसापेक्ष काम करू लागते. आपल्या बोली भाषेवर (आणि ते ही फक्ता आपण राहत असलेल्या आसपासच्या भाषेवर) अतोनात प्रेम करत असल्याने जबाबदार लेखक बेसावधपणे असे लिहून जात असावेत. म्हणजे बोली ही एकच असली तरी लेखक ज्या भागात राहतो ती भाषा अस्सल आणि आजूबाजूची हीच बोली कमअस्सल अशा पध्दतीने लेखकाकडून लेखाची मांडणी केली जाते, ती आक्षेपार्ह आहे. आज भाषाविज्ञान एकमेकांपासून सर्वदूर असलेल्या सर्वच भाषा एकदुसरीला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे, याच वेळी उच्चशिक्षित असूनही काही लोक एकाच भाषेत दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असे अनुभवास आल्याने ह्या लेखाचा प्रपंच.
(‘मराठी संशोधन पत्रिका’ जानेवारी- फेब्रुवारी- मार्च 2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या चार लेखांपैकी हा एक. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
2 Feb 2020 - 10:24 am | डॉ. सुधीर राजार...
१९३ वाचक धन्यवाद
2 Feb 2020 - 8:32 pm | प्रमोद देर्देकर
लेख आवडला.
3 Feb 2020 - 11:18 am | डॉ. सुधीर राजार...
धन्यवाद
3 Feb 2020 - 9:55 am | माहितगार
समीक्षेची अस्सल समीक्षा करणारा लेख आवडला. सर्व समिक्षकांनी आवर्जून वाचावा, सर्व विद्यापीठांच्या एम.ए. अभ्यासक्रमात अभ्यासासाठी असावा असे वाटून गेले.
3 Feb 2020 - 11:19 am | डॉ. सुधीर राजार...
भाषा तिरकस आहे की काय सर?
3 Feb 2020 - 7:12 pm | माहितगार
तिरकस मुळीच नाही. मी सुरवातीपासून आपल्या लेखातील मांडलेल्या मतांचा समर्थक आहे. 'अस्सल' शब्दाला अधिक उपयोग आहेत. इतर लोक शुद्ध आणि अस्सल विशेषणांचा गैर उपयोग करतात म्हणजे तुमच्या लेखासाठी अस्सल हे विशेषण वापरुनयेच असे होत नसावे असे वाटते.
4 Feb 2020 - 12:32 pm | डॉ. सुधीर राजार...
धन्यवाद सर.