गुन्हेगार!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
30 Oct 2019 - 5:35 am

गुन्हेगार!

एकेका श्वासाचा हिशोब मांडून केलेले आरोप
ती आरोपी असल्याचे सिद्ध करत होते ..ते !
"तिचं जगणं " हाच कसा गुन्हा असू शकतो…
नेहमीच ?

पण गीतेवर हात ठेवून तिनेही मान्य केले
की जगण्याचे विशेष असे काही कारण नाहीये!
" तो मर क्यो नहीं जाती ?"
तटस्थ लोकांनी प्रश्न विचारला!
नेहमीसारखाच !

"हवं तर मृत्युदंड देऊन टाका,
खूप हत्या केल्या आहेत मी !
एक ना अनेक इच्छा, आकांक्षा
मारल्या आहेत कित्येक वर्ष ,
अगदी चपखलपणे…!
कुणाला कसलाच सुगावा न लागू देता!"
ती हे बोलून हसू लागली, नेहमीसारखीच !

तिच्या 'असण्या'चा गुन्हा सिद्ध झाला
आणि जन्मठेप ठोठावण्यात आली,

"हट्टच असेल जगण्याचा
तर जगू शकते ती ...
पण अस्तित्व मागू नाही शकत या जगात!
असेच जगावे लागेल तिला,
असून नसल्यासारखे !
लपवावे लागेल स्वतःला काळोखात,
लोकांच्या गर्दी मध्ये बोलता नाही येणार
रोज अविरत काम करावे लागेल ,
मोबदला मागता नाही येणार,
थोडा सुद्धा आवाज नाही होता कामा,
कुणाची गैरसोय होणार नाही याची पण काळजी घ्यावी लागेल!
अदृश्य होऊन जगता आलं तर अजून चांगले !"

तिचे 'हसणे ' अजून लोभस होत गेले
........ नेहमीसारखेच !

"मृत्युदंड दिला असता, तर शेवटची इच्छा विचारावी लागली असती ना ! " गर्दी मध्ये कुजबुजत होते काही !

-------फिझा .

कविता

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

30 Oct 2019 - 7:41 am | चाणक्य

शेवटच्या ओळीसाठी सलाम.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2019 - 6:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!

तिचे 'हसणे ' अजून लोभस होत गेले
........ नेहमीसारखेच !

हे भन्नाट आहे.

वकील साहेब's picture

1 Nov 2019 - 3:02 am | वकील साहेब

शेवटची ओळ भन्नाट आहे.

जव्हेरगंज's picture

1 Nov 2019 - 8:13 pm | जव्हेरगंज

कडक!!