सायकल दौरा पूर्वेचा घाट- असा घातला घाट २

मित्रहो's picture
मित्रहो in भटकंती
23 Sep 2019 - 8:07 am

या आधीचे भाग
पूर्वतयारी, part1,

मारेडमल्लीला डास असले तरी शरीर थकल्यामुळे मस्त झोप लागली. मारेडमल्लीचे जेवण पण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी मारेडमल्ली ते नरसीपट्टणम असे १३४ किमीचे अंतर कापायचे होते. मी आजपर्यंत कधीही सलग दोन दिवस शतक पूर्ण केले नव्हते. आजच्या रस्त्यात आदल्यादिवशी सारखे चढ नव्हते. पूर्ण सपाट जरी नाही तरी रस्ता सोपा होता. मारेडमल्लीवरुन आम्ही सकाळी सातला निघालो. आमचा पहिला पाडाव होता रंपाचोडावरम या गावात, नाष्ट्यासाठी. रंपाचोडावरम हे तसे महत्वाचे गाव आहे. आंध्र प्रदेशातील ITDA चे महत्वाचे कार्यालय येथे आहे. गोदावरीच्या एका बाजूला कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यातली मोठी शहरे तर गोदावरीच्या दुसऱ्या बाजूला दऱ्याखोऱ्यात, दुर्गम भागात वसलेली आदिवासींची गावे दिसतात.

waterflow

रंपाचोडावरमला पोहचायच्या आधीच सुंदर पाण्याचा साठा लागला मग काय पेडलींग बंद कॅमेरे सुरु. खिशातल्या फोनचा या रस्त्यांवर फोटा काढण्याशिवाय दुसरा उपयोग नव्हता नेटवर्क तर नव्हत. रंपाचोडावरमला बस स्टॉपच्या बाजूवरील टपरीवर आम्ही नाष्टा केला. तिथल्या गरमागरम मेदू वड्याची चव अजूनही जीभेवर आहे. भरपूर नाष्टा करुन कोणत्या गावांच्या पाट्या बघत पुढे जायचे याची नोंद करुन आम्ही निघालो. आदितीगल्ला, पापमपेटा, केडीपेटा आणि नरसीपट्टणम असा प्रवास होता. सर्वात महत्वाचे वळण होते रंपाचोडावरमला, इथे राजमुंद्रीकडे न वळता सरळ जायचे होते. एकदा ते केले कि पुढचा रस्ता सोपा होता. इथे चूक होण्याची शक्यता जास्त होती कारण राजमुंद्रीच हे मोठे शहर असल्याने बहुतेक वाहने तिकडे वळतात.

breakfast

सुरवातीला हा रस्ता अधूनमधून फुटलेला अशा काहीसा होता. नंतर छान झाला. दोन्ही बाजूला धानाची शेतं आणि मधून जाणारा डांबरी रस्ता आणि त्यावरुन जाणाऱ्या सायकली असे नयनरम्य दृष्य होते. या रस्त्यावर खूप नसली तरी रहदारी होती. मधेच तीन मोठी वडाची झाड लागली. वडाच्या झाडाखाली आम्ही थांबलो असताना तिथल्या काही स्थानिक मंडळींनी आमच्यासोबत सेल्फी घेतले. काही क्षण सेलिब्रिटी झाल्याचे फिल आले. क्षणाा सिलेब्रिटी दिवसभराचा सायकलस्वार.

baniyan

पिंजारी कोंडा धबधबा
वेगात सायकल चालवणारी मंडळी पुढे जाउन पापमपेट या गावात आमची वाट बघत होते. इकडली गावांची नांवे मला नेहमीच संभ्रमात टाकत होती. तिथून चार किमी दूर एक धबधबा आहे असे कळले. फार असा प्रसिद्ध धबधबा नव्हता. स्थानिक लोकांनी तिकडे जाऊ नका असे सांगितले पण क्या होता है जाके देखते है असा विचार करुन आम्ही सारे तिकडे निघालो. धबधबा खूप सुंदर किंवा भव्य होता असे नाही पण त्या धबधब्याखाली आंघोळ करुन सारेच ताजेतवाणे झाले. तिथे मस्त कॉफी झाली. शेवटी ही सायकलवर केलेली सहल आहे शर्यत नाही. सहल हा भाग जर मागे राहिला तर माझ्यासारख्यांसाठी सायकलींग मधली मजा निघून जाइल शर्यतीत भाग घेण्याची माझी लायकी नाही. या साऱ्यात तास दिडतास निघून गेला.

road

waterfall

आम्हाल तिथून निघायला साडे अकरा वाजले होते. रस्ता जरी रोलींग असला तरी जेवायचे ठरलेले ठिकाण केडीपेट अजून पन्नास किमी दूर होते. जेवायच्या वेळेपर्यंत तिथे पोहचणे शक्य होइल असे वाटत नव्हते. आंघोळी झाल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही फ्रेश होते. डोके शांत होते, फक्त पेडल मारायचे काम सुरु होते. दोन वाजता मात्र आतापर्यंत पोटात शांत झोप काढनाऱ्या कावळ्यांनी आपले अस्तित्व जाणवून द्यायला सुरवात केली. आता रस्त्यात कुठेतरी जेवण करावेच लागनार होते. एकदाचे जेवणाचे ठिकाण सापडले पण एक वेगवाण रायडर बराच पुढे निघून गेला होता. त्याला सोडून इतरांनी इथे जेवण घ्यायचे ठरले. प्रचंड भूक लागल्यानंतर रस्त्याच्या कडेने मिळनाऱ्या व्हेज मिलची चवच काही न्यारी लागते. तो भात, तो सांबार, तो पप्पु (दाल), त्या सुक्या भाज्या वाह आणखीन काय हवे. अन्नाची किंमत भूक लागल्याशिवाय कळत नाही असे का म्हणतात हे त्यादिवशी परत एकदा कळले.

route

route1

केडीपेट, नारसीपटणम
मस्त दाबून जेवण करुन आम्ही निघालो. जेवणाचा निर्णय किती योग्य होता याची लगेच प्रचिती आली. नंतर पुढे तीस किमी काही नव्हते. पावसाला सुरवात झाली होती. आता पाऊस फक्त पडत नव्हता तर बरसत होता. सोबत घेतलेल्या रेनकोटचा पहिल्यांदी उपयोग झाला. पाऊस, हिरवळ आणि पेडल याची अजब संगती जमली होती. माझ्या तंद्रीत केडीपेट कडे निघालो. केडीपेट या गावापासून जवळच स्वातंत्रपूर्व काळातील आदिवासी नेता सीता रामन राजू यांची समाधी आहे. केडीपेट मधे पुढे गेलेले थांबले असतील याची खात्री होती. मी त्यांना शोधतच होतो तर आवाज ऐकू आला.
“ओ भाईसाब चॉय हो जाये चॉय” आमच्या एका मित्राने चहाला चॉय म्हणायची सवय लावली होती.
“नेकी और पूछ पूछ” अशा पावसात चहाला नाही म्हणणे यासारखा दुसरा घोर अपराध नाही. दिवसातून फक्त दोन वेळा चहा पिणारी मंडळी सुद्धा पावसात चहाला नाही म्हणत नाही आम्ही तर चहाबहाद्दर. चहासोबत समोसे जिलेबी पण फस्त केली. वरुन त्यावर शेरा मारला
“हम तो ऑइली खाते नाही पर बॉइल्ड समोसा और शुगरलेस जिलेबीको ना नही कहते”

route2

आम्ही थांबलो म्हणून पावसाने थांबायचे काही कारण नव्हते तो आपला बिनाथांबा बरसत होता. अशा सपाट रस्त्यावर आम्ही पावसाला भिक घालनार नव्हतो. आम्ही पेडल मारीत पुढेच जात होतो. शेवटल्या दहा पंधरा किमी मधे सायकल जोरात दामटावी म्हणून पुढचा गियर टॉपमधे टाकायला गेलो तर पावसामुळे वरचा गियर अडकला होता. इच्छा असूनही हलक्या गियरमधेच सायकल चालवावी लागली. नारसीपटणम जवळ आल्यावर फोन वाजला, एसएमएस आला, भद्राचलम सोडल्यनंतर प्रथमच फोनला नेटवर्क सापडले होते. शहर आले. दोन किमी जात नाही तर शहरात प्रचंड गर्दी दिसली. आम्ही नरसीपट्टणमच्या मार्केट मधे होतो. गेली दोन दिवस संपूर्ण प्रवासात जेवढी माणसे बघितली होती तेवढी गर्दी त्या मार्केटमधे होती. गणपती असल्याने गर्दी जास्त होती. पण आता राइड संपली होती. मुक्कामाचे ठिकाण आले होते. दिवसाला १४२ किमी झाले होते.

गणपतीच्या काळात वाहने अडवून त्यांच्याकडून वर्गणी गोळा करण्याचा प्रकार संपूर्ण रस्त्यात दिसत होता. इथून पुढे विशाखापट्टणम पर्यंत तेच चित्र होते. सायकलस्वारांविषयी मात्र सहानुभुती दाखवून आम्हाला जायला मार्ग मोकळा करीत होते. नक्की कुठे ते आठवत नाही पण एक मात्र अपवाद निघाला. तो हात धुवुन मागे लागला, काहीनाही तर रुपया तरी द्या असे म्हणत होता. माझ्याकडे एक रुपया नाही सारे पैसे गाडीत आहे असे सांगून मी तिथून कसाबसा सटकलो.

दिवसाचा शेवट जरी गर्दीच्या प्रवाहाने झाला असला तरी मनात होती ती धबधब्याखाली केलेली आंघोळ आणि त्या पाण्याचा थंड प्रवाह

wf2

मुक्कामाचे ठिकाण

मारेडमल्ली: बर्ड नेस्ट रिसोर्ट

नारसीपटणम: श्रीकृष्ण पॅलेस
यातली काही चित्रे TheBikeAffair नी काढलेली आहेत.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

23 Sep 2019 - 4:22 pm | महासंग्राम

फोटो जबरदस्त आलेत, माहिती अजून डिटेल मध्ये येऊन द्या

प्रशांत's picture

24 Sep 2019 - 4:30 pm | प्रशांत

माहिती अजून डिटेल मध्ये येऊन द्या.

मित्रहो's picture

25 Sep 2019 - 12:10 pm | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
हा भाग मलाही पूर्णपणे नवीन होता त्यामुळे भागाविषयी फार माहीती नव्हती/नाही. साधारण चढइताराचा रस्ता, भरपूर नाष्टा, धबधबा त्यामुळे त्रास झाला नाही. हलक्या गियरमधे असल्याने सोपे होते. मला भिती होती उन्हाची पण त्यावेळेला पाऊस आला.
तरीही काही डिटेल देता आले तर प्रयत्न करतो.

सुरेख फोटो. छान लिहीत आहात.

मालविका's picture

23 Sep 2019 - 5:44 pm | मालविका

वाचतेय ! खूप मस्त आणि वेगळी सफर

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 6:53 pm | जॉनविक्क

सुधीर कांदळकर's picture

24 Sep 2019 - 7:25 am | सुधीर कांदळकर


मारेडमल्लीला डास असले तरी शरीर थकल्यामुळे मस्त झोप लागली.

डासांनी गावाचे नाव मारोडल्ला असे वाचले असावे.

ही सायकलवर केलेली सहल आहे शर्यत नाही. सहल हा भाग जर मागे राहिला तर माझ्यासारख्यांसाठी सायकलींग मधली मजा निघून जाइल

हौस आणि स्वयंप्रेरणा वा सेल्फ मोटीव्हेशन यांचा सुरेख मिलाफ तुमच्याकडे आहे. अभिनंदन. दोन्ही कायम ठेवा.

छान. धन्यवाद. पुलेशु

राजे १०७'s picture

24 Sep 2019 - 8:53 am | राजे १०७

सुपर!! निसर्ग तर काही च्या काहीच सुंदर आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2019 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सायकलसफर. फोटो एक नंबर !

मित्रहो's picture

24 Sep 2019 - 2:57 pm | मित्रहो

धन्यवाद महासंग्राम, यशोधरा, मालविका, जॉनविक्क, सुधीर कांदळकर, राजे १०७, डॉ सुहास म्हात्रे
निसर्ग खरच खूप सुंदर होता. अराकु सोडल तर इतर कुठलेही असे पर्यटन स्थळ वगैरे नव्हते त्यामुळे रस्ते रिकामे होते. सायकलींगला मजा येत होती.
हल्ली कॅमऱ्यात बरीच प्रगती झाली आहे त्यामुळे ते असले दृष्य अधिक परिणाकारक पणे टिपू शकतात.

जेम्स वांड's picture

19 Oct 2019 - 11:25 am | जेम्स वांड

प्रचंड भूक लागल्यानंतर रस्त्याच्या कडेने मिळनाऱ्या व्हेज मिलची चवच काही न्यारी लागते. तो भात, तो सांबार, तो पप्पु (दाल), त्या सुक्या भाज्या वाह आणखीन काय हवे.

हे जे तुम्ही जेवलात ते खरे रायलसीमा रुचिलू जेवण म्हणायला हवे! नाहीतर हैदराबाद मध्ये आंध्र मील्स म्हणून जो कालाकित्ता खायला देतात तो खाववत नाही देवा.

मित्रहो's picture

19 Oct 2019 - 12:06 pm | मित्रहो

हे एक महत्त्वाचे कारण असावे

प्रतिक्रियेसाठी आभार