कान्हा !
कुठून रे अक्षरं आणू?
कसे शब्द बांधू?
कश्या भावना गुंफू?
हजार नावं घेऊ?
का शब्दब्रह्म गाऊ?
तुळशींनी सजवू?
मनमखरात बसवू?
का पंचप्राणंच अर्पू?
सगळंच उष्टावलयंस तू ?
कशाचा नैवेद्य दाखवू?
निळाईसंग उत्तुंग आभाळी,
सावळदंग अभंग सावली,
मिस्कीलढंग अनंग माऊली,
मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।।
सावरीत मुग्ध अलगुज,
ऐकवीत गुप्त हितगुज,
खेळवीत मुक्त गाईगुजं,
प्रकटीत तृप्त आत्मगुज ।।
तुज प्रकाशे चेतविती,
संध्या या गर्भवती,
शुद्ध चैतन्या प्रसविती,
पुन्हा आकाशी उगविती ।।
जन्मांचा जन्म जिथे,
मृत्यूंचाचा मृत्यु जिथे,
दिशांचा अंत जिथे,
नियतीला खंत जिथे ।।
शब्दांना सारूनी मागे,
देहाला ठेवुनी जागे,
बुद्धीचे तोडूनी धागे,
येऊ का रे एकदा तिथे? ।।
नसे मी पुण्यवान पार्थ,
ना दुर्योधनाचा स्वार्थ,
ना गमे श्रद्धेचा आर्त,
न कळे ज्ञानाचा अर्थ ।।
सावत्र कर्म बांधलेली,
उलगडूनी हीन झाली,
धर्मकथा व्यर्थ गेली,
सहा श्वाने नीती नेली ।।
निलाजऱ्या जीवाने बांधली पूजा,
हसऱ्या तमाने रेखिल्या भुजा,
कोरड्या विवेके घेतल्या सजा,
पोरक्या मतीने जप सारा वजा ।।
तुझी गीता ठेवुनी माथी,
चाललो आम्ही वाळवंटी,
ज्ञानामृत ते असुनी हाती,
वणवणलो पाण्यासाठी ।।
का असा खेळ व्हावा?
तुझ्या या अंशाला ,
तुझ्याच मायेचा दंश व्हावा?
कृष्ण कृष्ण नाम घेता,
स्वर्ग इथे उष्ण व्हावा?
देऊळातल्या देणग्यांना,
हावऱ्या जीभांचा स्पर्श व्हावा?
का धर्म मर्म भगवा
वासनांनी उष्टवावा ।।
नको ती वांझ मुक्ती,
नको तो अगम्य स्वर्ग,
एकदाच या अवनी,
मनामनांत कृष्णजन्म व्हावा।
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
प्रतिक्रिया
23 Aug 2019 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रासंगिक आणि छान.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2019 - 10:06 pm | पद्मावति
खुप सुरेख.
23 Aug 2019 - 10:12 pm | जॉनविक्क
24 Aug 2019 - 9:01 am | यशोधरा
सुरेख!