भित्यापाठी ब्रम्हराक्षस

Primary tabs

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
13 Aug 2019 - 8:49 pm

भित्यापाठी ब्रम्हराक्षस
------------------------------------------------------------------------------------------------

नदीकाठचं वातावरणच वेगळं असतं. त्याचं सौंदर्य दिवसा वेगळं भासतं तर रात्री वेगळं. दिवसा लोकांची लगबग चालू असते . आयाबाया धुणं धूत असतात . पोरं धबाधब पाण्यात उड्या घेत असतात ,डुंबत असतात . कुठे कोणी गुरं खंगाळत असतं . दिवसा लख्ख प्रकाशात नजर लांबवर जाते . कुठे एखादा चुकार खंड्या असतो तर कुठे बगळ्यांची माळ.
पण नदीकाठचं वातावरण वेगळंच असतं; विशेषतः जेव्हा लोकांची गजबज नसते तेव्हा .प्रेमीजनांना तर फारच प्रणयरम्य भासणारं. मग तो दिवस असो किंवा रात्र.चांदण्यांनी बहरलेली रात्र असली तर मग काय ? प्रणयाला बहरच !
तुम्ही म्हणाल की मी नदीचं, नदी काठाचं एवढं वर्णन का करतोय म्हणून ? तर त्याचं असं आहे की - जाऊ दे, कळेलच तुम्हाला. . .
रात्रीची असली तरी प्रसन्न वेळ होती. आम्ही दोघे हातात हात गुंफून, एकमेकांच्या डोळ्यांत पहात, भान विसरून बसलो होतो. जोडीला पौर्णिमेचा चंद्र आणि टिपूर चांदणं. चंद्रप्रकाशात तिचा गौरवर्णी चेहरा काय उजळला होता. . .
मी तिला म्हणालो,”माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे !“
ती म्हणाली,” माझं सुद्धा !”
“पण तुझे वडील तर आपल्या जीवावरच उठलेत. त्यांना आपलं प्रेम… “
“हूंs प्रेमाला जात नसते ! हे या जात्यंध लोकांना कधी कळणार? “ ती म्हणाली .
"मला खूप भीती वाटते गं ! " मी काळजीच्या स्वरात म्हणालो
शेवटी- मी तिच्यापेक्षा हलक्या जातीचा होतो. तिला त्याचं काही वाटत नसलं, तरी इतरांसाठी ?. . .
माझी भीती पाहून तिच्याही डोळ्यात भीतीची लहर उमटली.
“तू - तू मला अगदी शेवटपर्यंत साथ देशील ?“ मी तिला अगदी जीव गोळा करून खूप, अपेक्षेने विचारलं .
“हो रे राजा - कायम ! “ , ती आश्वासकतेने म्हणाली .
माझ्या जीवाला किती मोकळं वाटलं ते एखाद्या मजनूला , एखाद्या रोमिओलाच कळू शकलं असतं.
आम्ही नदीकाठच्या एका मोठ्या खडकावर बसलो होतो ; जणू एखाद्या कासवाची प्रशस्त पाठच. शीतल वारं होतं. वाऱ्याने नदीत लहरींची नक्षी तयार होत होती. पाण्यात माशांची चंदेरी सळसळ सुरु होती . लांबून कुठून, रातराणीच्या फुलांचा सुगंध येत होता .समोरच्या काठावरील एका झाडावर असंख्य काजवे लुकलुकत होते.
इतकं सुंदर वातावरण होतं. प्रेमात भारून जायला लावणारं !. . .
अन मागे ? -
मागे अंधारात बुडालेली स्मशानभूमी होती. . . उरात भीती अन् मनात गूढ वाढवणारी . स्मशानभूमीच ती ! तिची जागाही नदीकाठालाच ना.
एका जळत्या चितेचा प्रकाश सोडता, स्मशानभूमी अंधारात बुडालेली. सरणावर पडलेला ,तो एकटा जळणारा मृतदेह ! माणूस कितीही मोठा असला तरी शेवटी तो एकटाच , हे जाणवून देणारा . चितेच्या ज्वाळांचा चटचटणारा आवाज . कवटी फुटल्याचा आवाज ऐकल्यावर निघून गेलेले त्या मृताचे नातलग , परिचित . अन त्यामुळे आता निर्मनुष्य असलेली स्मशानभूमी ! मनातले काळे विचार सळसळावेत तशी काळोखात बुडालेल्या झाडांची सळसळ. लांबून एखादा घुबडाचा घुत्कार तर कुठे भयाण कोल्हेकुई. तर मागे रातकिड्यांचं किर्रर्र पार्श्वसंगीत.
नदीकाठचं हे वातावरण तर खूपच वेगळं असतं !
आम्ही तिकडे गेलो . जावंच लागलं . . .तिच्यासाठी !
हे सगळं सांगण्यामागचं कारण म्ह्णजे -
तो चितेवरचा देह तिच्या वडलांचा होता.
आणि - हसण्याचा एक विकट ध्वनी त्या स्मशानशांततेत घुमला.
त्या मागोमाग एक अक्राळविक्राळ भूत आमच्या समोर उभं ठाकलं.
हा मात्र धक्काच होता . तिच्या वडलांचं भूत झालं होतं . . . मृत्यूनंतर थोड्याच वेळात .
आणि लगेच ते आमच्या समोर हजरही झालं होतं .
आम्ही घाबरलो . लगबगीने तिथून दूर गेलो. डोंगर उतारावरच्या निलगिरीच्या झाडांच्या दाटीत. पांढऱ्या बुंध्यांच्या रांगाच होत्या जणू. निलगिरीचा वास येत होता. मी एका झाडाला टेकून उभा राहिलो. ती माझ्या मिठीत. आमचे दोघांचे ऊर धपापत होते.
दोघेही चाहूल घेत होतो ; पण मागे काहीच नव्हतं .
आमच्या मनात त्या शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या संवादांची पुन: पुन्हा उजळणी चालूच असते. ते क्षण आम्ही परत परत जगत असतो ; कारण ते क्षण आणि ते संवाद. . . त्या कायम साथ देण्याच्या आणाभाका. . .
भूत झाल्यावरही ' ते 'आम्हाला भीती दाखवतच होते. आणि मी घाबरलो होतो.
च्यायला ! भीती कधीच गेली नाही आणि मागे लागलेले तेही. आधीपण अन आत्तापण.
मग भिणारी आम्ही - भुतं असलो म्हणून काय झालं ?
स्वातंत्र्य मिळून कित्ती काळ लोटला तरी सामाजिक उतरंडीमध्ये भिऊनच राहावं लागतं , वागावं लागतं . तीच भीती मेल्यावरही पाठ सोडत नव्हती.
जे जिवंतपणी तेच मृत्यूनंतरही. . .भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! और - जो डर गया वो मर गया !
तिच्या घरच्यांनी आम्हाला कायमच भीती दाखवली. तालेवार घराणं त्यांचं! गावात त्यांचं वजन होतं. दरारा होता. मी कायम घाबरतच राहिलो ; पण जेव्हा आम्ही ते दडपण झुगारून दिलं तेव्हा-
याच नदीत आम्हाला मारून फेकलं गेलं होतं आणि मग नंतर याच नदीकाठाला माझ्या भावाने सूड म्हणून तिच्या बापाला संपवलं .
आता कळलं ?. . . आम्ही कायम नदीजवळ , नदीच्या आसपासच कसे काय असतो ते !
फक्त - प्रेमाला सारं जग मोकळं असतं !. . .
ते भूत मात्र पुढे येऊ शकलं नाही. आमच्या पर्यंत पोचू शकलं नाही ! कुठल्या तरी चांगल्या शक्तीने त्याला रोखून धरलं होतं.
ते भूत त्या स्मशानाच्या हद्दीतच अडकून पडलं . त्याच्या जुनाट विचारांसहित !. . .
----------------------------------------------------------------------------------------------

बिपीन सांगळे

कथा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

13 Aug 2019 - 9:50 pm | जव्हेरगंज

खतरनाक लिवलंय की!

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 10:26 pm | जॉनविक्क

पद्मावति's picture

13 Aug 2019 - 10:29 pm | पद्मावति

वाह, मस्तंच.

प्रमोद देर्देकर's picture

14 Aug 2019 - 6:49 pm | प्रमोद देर्देकर

मस्त!
ही प्रेमळ भुताटकी आवडली .

ज्योति अळवणी's picture

14 Aug 2019 - 11:00 pm | ज्योति अळवणी

झक्कास! आवडली. शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Aug 2019 - 8:00 am | बिपीन सुरेश सांगळे

जव्हेरगंज ,
जॉनविक्क,
पद्मावति,
प्रमोद देर्देकर

नमस्कार आणि आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Aug 2019 - 8:01 am | बिपीन सुरेश सांगळे

जव्हेरगंज ,
नमस्कार आणि आभार .
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि कृतीबद्दल खूप आनंद आहे ,
पुन्हा धन्यवाद .

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Aug 2019 - 8:02 am | बिपीन सुरेश सांगळे

महासंग्राम ,
ट्विट केल्याबद्दल आभारी आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Aug 2019 - 8:04 am | बिपीन सुरेश सांगळे

ज्योतीजी ,
कथा आवडल्याबद्दल खूप आभार .

(काही लोकांनी कथा जमलीच नाहीये , अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत )