पेटता पेटता विझलो कधी
माझे मलाच कळले नाही
दिला होता शब्द खरा
पण काय ते नीट आठवलेच नाही
या स्मृतीला कोण जाणे
कुणाचा विखारी दंश झाला
जो तो ओळखीचा असूनही
इथे मलाच परका झाला
कोणता हात धरू मी ?
कोणता सोडून देऊ ?
या हातांच्या विळख्यातच
माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला
समजत होतो धुरंधर स्वतःला
पण या हळव्या हृदयाने घात केला
मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास
पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला
इथेच घेतली समाधी मनाने
इथेच माझा अंत झाला
हाच तो विखारी दंश होता
ज्याने धुरंधर परागंदा झाला
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
प्रतिक्रिया
12 Aug 2019 - 3:22 pm | महासंग्राम
भारीच आवडलंय
12 Aug 2019 - 3:36 pm | जालिम लोशन
छान
12 Aug 2019 - 6:57 pm | खिलजि
त्रिवार धन्यन्यवाद
12 Aug 2019 - 11:55 pm | जॉनविक्क
पण नेमकं काय घडले अजिबात समजत नाही... नुसतीच कोड्यातली भाषा.
13 Aug 2019 - 11:47 am | खिलजि
मित्रा हि एका वेड लागलेल्या प्रेमपूजाऱ्याची कहाणी आहे .. सुरुवातीला बर्याच पोरी खेळलेल्या आहेत त्याने ... त्यापैकीच एक त्याला वेड लावून जाते .. बर्याच खोट्या आणाभाका घेऊन झाल्यात त्याच्या प्रेमामध्ये .. पण ह्या मुलीबरोबर नक्की शब्दांची काय देवाणघेवाण झालीय तेच त्याला आठवत नाही .. पोर जणू लावण्याची खानाचं म्हणायला हवी , जिने ह्या धुरंधर समजणाऱ्याला पार वेड लावून टाकलंय... तिने त्याची लायकी ओळखून लगेच स्वतःला सावरलं पण हा धुरंधर मात्र तिच्यामागे भरकटत गेला ..
13 Aug 2019 - 11:55 am | जॉनविक्क
ही कविता जेनेरिक म्हणता येतील अशी होती, त्यामुळे ती एका पेक्षा जास्त प्रसंगाना लागू होऊन नेमका कुठला प्रसंग तुला अभिप्रेत आहे याबाबत वाचकांचा नक्कीच गोंधळ उडू शकतो.
मिपाचा कवी ग्रेस वगैरे तर बनायचं नाहीना तुला ?
13 Aug 2019 - 12:03 pm | खिलजि
माझी लायकी नाही आहे रे तेव्हढे मोठे व्यक्तिमत्व होण्याची .. मला माझाच राहू देत आणि माझ्यातच मला शोधू देत .. एव्हढंच पुरेसे आहे ..