माझं "पलायन" १३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
19 Jul 2019 - 6:31 pm

१३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री

माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप

माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना

माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

जानेवारी २०१९ ची मुंबई मॅरेथॉन! ए दिल है मुश्किल यहाँ, जरा हट के जरा बचके ये है बम्बई मैरेथॉन! अपेक्षेनुसार ही ईव्हेंट काही प्रमाणात भितीदायक वाटत राहिली. आणि प्रत्यक्ष ईव्हेंटच्या तुलनेत बाकी गोष्टी- जसं मुंबईतला प्रवास, मॅरेथॉनसाठी बिब कलेक्शन करणं अशा गोष्टींनी मानसिक दृष्टीने थकायला झालं. मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येपर्यंत बराच ताण वाटत होता. पण जेव्हा त्या विषयावर खूप वेळेस बोलणं झालं, अनेक प्रकारे विचार करून झाला, तेव्हा एका वेळी तो ताण हलका झाला. एक प्रकारे मन त्या ताणाला कंटाळून थकलं किंवा बोअर झालं. त्यामुळे मग आराम वाटला. आणि नंतर मॅरेथॉन तर फारच छान झाली. ह्या लेखमालेच्या पहिल्या लेखामध्ये त्या मॅरेथॉनचे अनुभव सांगितले आहेतच.

आता मॅरेथॉनच्या इतर पैलूंविषयी बोलेन. सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे लोकांनी सतत केलेलं कौतुक- सतत अनेक तास रस्त्यावर उभं राहायचं, पाणी, एनर्जाल, फळं हे देत राहायचं!! मोठी गोष्ट आहे. मुंबईच्या संस्कृतीचा हा एक भाग वाटला. मॅरेथॉनचा रूट जपानी दुतावासाच्या जवळून जातो, तेव्हा तेही प्रोत्साहन द्यायला येतात. ह्या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एलिट रनर्स (रेसर) सुद्धा बघता आले! सामान्य रनर्सच्या दोन तास नंतर सुरू करूनही ते खूप लवकर रेस पूर्ण करतात! माझ्यासारखे सामान्य रनर्स आणि ते रेसर्स ह्यांच्यात कदाचित संजय मांजरेकर आणि विरेंदर सेहवागच्या स्ट्राईक रेटमधलं अंतर असेल!


फोटो: इंटरनेटवरून साभार

मॅरेथॉनच्या उत्तरार्धामध्ये रस्त्यावर अनेक गोष्टी फेकल्या गेल्या. अनेक बाटल्या, एनर्जाल इ. चे पाउचही रनर्स फेकत होते. त्यामुळे रस्ता घसरायला होईल, इतका ओला झाला. पाणी पिऊन झाल्यावर हातात वजन नको म्हणून रनर्सना ते कचरा पेटीतही फेकता आलं असतं, पण असं कमी दिसलं. नंतर तर रस्त्यालगत कच-याचा थर जमला. बिचारे व्हॉलंटीअर्स तो नीट करण्याच्या प्रयत्नात होते.

फिनिश लाईनबद्दल तर काय सांगावं! एक खूप मोठं स्वागत सगळ्या रनर्सची वाट बघत होतं! विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक- सगळे स्वागताला होते. संपूर्ण रूटवर प्रोत्साहनच प्रोत्साहन मिळत होतं. बँड- बाजा, संगीत, चीअर अप करणारे वाटसरू, 'गो गो, यू कॅन डू ईट' ओरडणारे आणि ओरडणा-या! खरंच ही मॅरेथॉन रनिंगच्या जगातील एक विलक्षण जत्रा आहे! भारताच्या मॅरेथॉन जगतातली तर सर्वांत चमकदार आणि ग्लॅमरस मॅरेथॉन! त्या वातावरणाचा, त्या क्षणाचा अनुभव एकदा नक्की घ्यायला हवा! सी लिंकवर इतर वेळी कोणी पायी जाऊ शकत नाही, पण ह्या मॅरेथॉनमध्ये सी लिंकवर हजारो लोक पळाले! ह्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यामागचं एक कारण सीलिंकवर पळायला मिळेल, हेसुद्धा होतं! पळणा-यांमध्ये सगळे होते, समाजातल्या सगळ्या वर्गांमधले, सगळ्या वयोगटातले लोक दिसले! सत्तर- ऐंशी वर्षांचे रनरही खूप "हाय जोशात" पळत होते. रनिंगबरोबरच हे सर्व वातावरण, हा माहौल व रोमांच ह्यासाठीही ही मॅरेथॉन नेहमी लक्षात राहील. मला चीअरअप करण्यासाठी आलेले ओळखीचे चेहरे, ताई व जिजाजींनी केलेला सपोर्ट हे नेहमी लक्षात राहील!


फोटो: इंटरनेटवरून साभार

अशा प्रकारे मुंबई मॅरेथॉन सोहळा पूर्ण झाला आणि हाफ मॅरेथॉनच्या नंतर मी फुल मॅरेथॉनचाही 'फिनिशर' बनलो! आणि ख-या अर्थाने फिनिशर म्हंटलं पाहिजे. कारण माझी ही पहिली व अंतिम मॅरेथॉन होती. पुढे भविष्यात योग येईल तेव्हा एखाद्या मॅरेथॉनमध्ये व्हॉलंटीअर म्हणून सहभागी होईल किंवा आयोजनात सहभागी होईल. पण परत अशा ईव्हेंटमध्ये कधी पळेन, असं वाटत नाही. पळणं तर सुरू राहीलच, पण ईवेंटमध्ये पळण्याची इच्छा मात्र पूर्ण होऊन गेली आहे. एक प्रकारे स्वत:च्या क्षमतेचा साक्षात्कार झाला, आत्मविश्वास मिळाला. एखाद्या गोष्टीचा संकल्प करून ती कशी साध्य करता येते, हेसुद्धा शिकायला मिळालं. गमतीची गोष्ट म्हणजे ४२ च्या ऐवजी अनेकांच्या मोबाईल app ने हे अंतर ४४ किमी दाखवलं!

नंतर काही त्रास झाला नाही. मॅरेथॉन संपल्यावर दोन किमी चाललो होतो. संध्याकाळीही घरातच चाललो थोडं. दुस-या दिवशी सकाळी चार किलोमीटर रिकव्हरी रन केला. त्यामुळे पाय मोकळे होत गेले. अशा प्रकारे माझ्या रनिंगची सर्वांत मोठी ईव्हेंट पूर्ण झाली. पण रनिंग संपलं नाही. उलट, ख-या अर्थाने ठीक असं रनिंग तर इथून सुरू केलं. पुढेही धावणं सुरू राहिलं, त्यात प्रगतीही झाली व मजाही वाढत गेली.

पुढील भाग- माझं "पलायन" १४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानक्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

20 Jul 2019 - 6:30 am | आनन्दा

वाचतोय

मार्गी's picture

22 Jul 2019 - 10:50 am | मार्गी

धन्यवाद!!