सर्पणाला एकदा पालवी फुटली
त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली
सर्पणच ते चुलीत जळायचेच होते
इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते
प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते
स्वगत सर्पणाचे ==
फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?
कधी राख होईन , हि भीती मनात
पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ
जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ?
उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी
ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी
कुणी तोडे पान, कुणा आवडे फुल
कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल
किती देऊ फळे , जरी आमुची बाळे
तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे
आम्ही वाढतो देण्यासाठी ते श्वास
ते श्वास घेता घेता घेती आमचाच घास
गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा
ते पाप फेडण्या पुनर्जन्म झाडाचा
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
प्रतिक्रिया
5 Jul 2019 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
कलपना आवडली,
असेच बकर्याचे, मनोगतही लिहिता येईल,
पैजारबुवा,
5 Jul 2019 - 4:27 pm | Yogesh Sawant
कोंबडीचे मनोगतही लिहा ना
5 Jul 2019 - 4:42 pm | महासंग्राम
कोंबडीला पाय फुटले
त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली
कोंबडीच ती चुलीत तंदुरी व्हायचीच
इतरांसारखेच चिकन होऊन पोटात जायचे होते
ग्रिलवर असेच पडून होते
स्वगत कोंबडीचे ==
फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?
कधी तंदूर होईन , हि ठेवुनी भीती मनात
पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ
जगावे वाढावे कोंबडीने ते कोणा प्रित्यर्थ ?
उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी
ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी
कुणी तोडे मान, कुणा आवडे तंगडी
अवघे आमचे जीवन इथे घाले लंगडी
कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल
किती देऊ अंडे , हिच आमुची बाळे
तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे
आम्ही वाढतो होण्यासाठी चिकन
ते ग्लास घेता घेता घेती आमचाच घास
गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा
ते पाप फेडण्या पुनर्जन्म कोंबडीचा
5 Jul 2019 - 5:41 pm | अभ्या..
आह्हा,
सुरेख मंबा. तुझमें है दम......
.
.
एकेक प्रिंट काढून सुगुणा, व्हेन्कॉब, बारामतीचिक, आमीरच्या सगळ्या दुकानात लावू आपण. ;)
पाम्प्लेटं छापून पोल्ट्रीत उधळू वेंकीजच्या.
5 Jul 2019 - 3:47 pm | जालिम लोशन
ऊत्तम
5 Jul 2019 - 6:00 pm | खिलजि
धन्यवाद सर्वाना ,, मस्तच प्रतिसाद आले आहेत .. मंदार शेट , थोडासा बदल करतो आहे .
5 Jul 2019 - 6:08 pm | खिलजि
हि घ्या मंदार शेट ,, आपल्या सर्वांच्या सेवेत सादर करीत आहे .. बाकी अजूनही इतरांच्या प्रतीक्षेत आहे ..
पै बु काका , या पावसाळी वातावरणात एक धमाकेदार तुम्ही सुचवलेल्या कल्पनेवर जोरदार काहीतरी आलंच पाहिजे .. एक रेकवेस्ट म्हणून समजा हवं तर
अंड्यातून एक कोंबडी बाहेर पडली
तीलाही जगण्यात मजा वाटू लागली
कोंबडीच ती चुलीत तंदुरी व्हायचीच
इतरांसारखेच चिकन होऊन पोटात जायचीच
खाटिकाच्या पिंजर्यात अशीच पडून होती
स्वगत कोंबडीचे ==
फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?
कधी तंदूर होईन , हि ठेवुनी भीती मनात
पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ
वाढावे कोंबडीने ते कोणा प्रित्यर्थ ?
उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी
ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी
कुणी तोडे मान, कुणा आवडे तंगडी
अवघे आमचे जीवन इथे घाले लंगडी
कुणी घेई जीव ,कमवून अंडी
देऊनही अंडी बनवती आमचीच हंडी
आम्ही वाढतो फक्त होण्यास चिकन
ते घास घेती थोडी मदिरा टाकून
गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा
ते पाप फेडण्या पुनर्जन्म कोंबडीचा
8 Jul 2019 - 9:35 am | महासंग्राम
Ewwwww एकदम कडक झालाय तंदूर आपलं कोंबडीचे मनोगत
वर्जिनल तर मस्तच लिहिलंय
5 Jul 2019 - 7:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही मस्तं !
5 Jul 2019 - 7:44 pm | गड्डा झब्बू
छान!!!
5 Jul 2019 - 8:03 pm | नाखु
वाचण्यास उत्सुक आहे.
एकदा कवीतेस धुमारे फुटले,तिलाही अर्थाची गोडी लागली.
आपणही बालक होवून बागडाव, आपल्याला वाचकाने कडेवर घ्यावं,लाड करावे, आचरटपणा केला तर रागवावे आणि खोडकरपणा हसून हसून स्विकारावा.
कवितेचे मनोगत
मी कितीही लयात आणि तालात असली तरी विडंबन होण्याचं प्राक्तन चुकणार नाही!
केशवकुमार तावडीतून केशवसुत सुटले नाहीत,मी तर अगदीच परावलंबी.
तुझ्या शब्दांच्या कपड्यात बांधून कधी अंग उघडे,तर कधी अंग तोकडे.
जुळवलेल्या जिलबीला चकलीचा खमंगपणा आणायचा तुझा अट्टहास असेलही.
पण हे कविश्रेष्ठ कविता आणि पीठाची गिरणी यात फरक आहे रे.
गिरणीत कामाला असलेल्या इसमाच्या सर्वांगावर पिठ पेरणी असते त्याच्याकडून आपलेच दळण आणायला लोक येतात.
तुझ्या काव्याच तसं नाही वाचकाला आवडली तर तो घेउन जातोच जातो पण सुगंध चार ठिकाणी नक्की शेअर करतो.
आणि तरी तुझी कवीता तुझ्यापाशी शाबूत असते कारण तीच पीठ झालेलं नसल्यानेच ती तुझ्याच अंतरंगात विरघळून गेलेली असते ती तू सुद्धा कधी काढू शकत नाहीस,झटकण्यासाठी!!
कविता तुझीच आहे फक्त तिला नैसर्गिकरीत्या फुलू दे,बाकी अर्थ,गेयता सारं फिजूल आहे आणि समीक्षक तो तर फितूर आहे का फिदा तेच कुणालाही कळले नाही...
वाचकांची पत्रेवाला नाखु
6 Jul 2019 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
काय जबरा लिवलय... या साठी माझाकडून तुम्हाला कोंढळकरची एक मस्तानी लागू झाली आहे.
पैजारबुवा,
6 Jul 2019 - 12:23 pm | खिलजि
पूर्णतः सहमत पै बु काकांशी .. जब्राट लिवलंय ...
6 Jul 2019 - 12:11 pm | खिलजि
नाखुकाका (महाराजा) , आपले सांगणे/बरसने , मी माझा गौरव समजतो . आपण माझ्या काही मोजक्या मिपाकरांच्या समूहात सामील आहात ज्यांना माझ्या मनाने पूर्णतः झेड सुरक्षा प्रदान केलेली आहे . एक चांगला कवी बनण्याची माझ्याकडे निश्चितच ती प्रतिभा नाही आहे... पण मी बघतो , या दोन डोळ्यांनी खोलवर बघतो .. आणि मग सुरु होतो एक कल्पनेचा प्रवास , त्यामध्ये कविता कुठेही येत नाही .. येते ती फक्त र द फ ची भाषा .. नैसर्गिक खुलण्याबाबत बोलायचे झाले तर ते बर्याचदा फारच किळसवाणे होते , त्यामुळे ते मी आंजावर टाकायचे टाळतो ..
वरील कल्पना मला मी दोन दिवसापूर्वी अंत्यविधीसाठी गेलो होतो तेव्हा सुचली .. सर्वजण शोकाकुल होते , बाजूलाच जाळण्यासाठी लाकडे उभी करून ठेवली होती , त्यातल्या काहींना पावसाच्या पाण्यामुळे पालवी फुटली होती .. दुर्दैवाने काही काळानंतर त्यांचेही राख होऊन जाणे अटळ होते .. हे सर्व पाहून आणि विचार करून हा कल्पनेचा खटाटोप झाला ... पण नाखुकाका असेच प्रतिसाद देत राहा , एक चांगली दिशा मिळते .. कदाचित त्यामधून शिकून पुढे काही भले तरी निश्चितच होईल ..
6 Jul 2019 - 12:32 pm | नाखु
आपल्या काव्याला उत्तर किंवा प्रतिसाद म्हणून नाहीच मुळी तर कवीतेला काय वाटतेय याचं मनोगत व्यक्त केले आहे.
चांगल्या अर्थवाही आणि दाहक वास्तव समोर आणाणर्या कवीता सुद्धा आवडतात पण प्रत्त्येक वेळी मीटरच्या बंधनात गेली की शब्द कवायती करत असल्यासारखे वाटते.
आपल्या खिलाडूवृत्ती ला मनःपूर्वक दाद दिली आहे.
वाचकांची पत्रेवाला नाखु
6 Jul 2019 - 12:42 pm | खिलजि
धन्यवाद नाखुकाका ,, आपले शुभाशीर्वाद असेच पाठीशी राहून देत . कधी चुकलो मुकलो तर शाब्दिक फटके दिले तरी चालतील पण प्रतिसाद देत राहा ....
6 Jul 2019 - 3:51 pm | जॉनविक्क
6 Jul 2019 - 4:25 pm | खिलजि
धन्यवाद जॉनविक्क साहेब , धन्यवाद
6 Jul 2019 - 5:28 pm | चंद्र.शेखर
मुळ कविता आणि प्रतिसाद दोन्ही खुप छान. आवडले
8 Jul 2019 - 5:17 pm | स्वलिखित
खिलजी ची आवडलेली पहिला वहिली कविता ....
8 Jul 2019 - 6:43 pm | खिलजि
जब्राट अभिप्राय ... आवडलं यातच सर्वकाही आलं .. धन्यवाद ..त्रिवार त्रिवार धन्यवाद .. आता अजून एक टाकली आहे ती एक डाव वाचा आणि कळवा बरे आपले म्हणणे ..
8 Jul 2019 - 7:39 pm | कुमार१
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही आवडले.
9 Jul 2019 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्पणाला एकदा पालवी फुटली
म्हणूनच, "सुक्याबरोबर ओले जळते" ही म्हण तयार झाली
9 Jul 2019 - 3:29 pm | खिलजि
आज चक्क कुमारसाहेबांची चक्कर झालीय इथे .. अहोभाग्य आमुचे म्हणावे .. धन्यवाद सर्व वाचक मान्यवरांना.. असेच आपले प्रेम मिळू देत ..