वजनदार!

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
24 Jun 2019 - 5:11 pm

(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" )

हरपता ती लेखनस्फूर्ती
हाटेले घालुनी पालथी
ओरपी लेखिका मिसळ
वर घेई मिठाई सुरती

भिववितो तिला तनुभार
स्वप्नि ते आकडे दिसती
निर्धार प्रतिदिनी करिते
'करु उद्याच सुरु भटकंती'

लेखिका म्हणे सुप्रहरी
'मैलाची मारू फेरी..'
पण कुठुनी ते होण्याला
कुणि दिसे तिज सखी प्यारी

गप्पांना येता बहर
गुपिते ती चावट कहर
व्यायाम राही बाजूला
वर वाया प्रातःप्रहर

व्यायाम जरी तो इष्ट
मैत्रीण तिची गप्पिष्ट
करि कुलंगड्या गावाच्या
'हा लागट, तो तर शिष्ट'

गप्पांतच घटिका सरती
त्या माघारी मग फिरती
घरि देती यजमानांना
त्या लोणकढ्यांच्या चळती

'किति खडतर होय भ्रमंती
पायाचे तुकडे पडती
करतो का कपभर मजला
तुज हस्तास असे चव ती'

पाघळतो नवरा अंमळ
शर्करा टाकितो सढळ
जे घटले होते ग्राम
ते परतुनी होती प्रबळ

काटा वजनाचा पाही
ती खट्टू होउन जाई
'हा बिघडुन गेला का रे?
आकडाच बदलत नाही!!'

नवरा छद्मीसा हसतो
'मज तसेच वाटे' म्हणतो
लेखिकेस येई भरुनी
वजनाचा विसरही पडतो

तिज सुहास्य उमले गाली
प्रतिभा की प्रभातलाली?
झणि लिहावया ती बसते
फतकल मारुनिया खाली

ये लेखनस्फूर्ती फिरुनी
चिंताढग जाती विरुनी
लेखणीस गमला रस्ता
लेखिका पुनः उडे गगनी

विनोद

प्रतिक्रिया

रबर लागवड कुठवर पोचली? भाग ३ कधी?

चलत मुसाफिर's picture

24 Jun 2019 - 9:26 pm | चलत मुसाफिर

टोमणा पोचला :-)

टोमणा नाही हो, खरेच विचारले.
दीडेक वर्षापूर्वी रबर लागवड पाहून आले, त्याचे दुष्परिणाम सुद्धा बघून आले. तेव्हा तुम्ही केली असल्यास तुमचा अनुभव काय हे विचारायचे / वाचायचे होते.
पैसा आणि गुंडगिरी ह्या जोरावर केरळी लोकांचे चांगलेच बस्तान बसले आहे काही भागांत.

चलत मुसाफिर's picture

28 Jun 2019 - 11:27 am | चलत मुसाफिर

हा हा हा! मला वाटले 'कविता करण्यापेक्षा रबर लागवड करा' असे सुचवताय की काय!

रबर लागवडीचे सध्या भिजत घोंगडे आहे. हवी असलेली सारी जमीन अद्याप मिळालेली नाही. आणि हातही जरा तंग झाला.

मला वाटले 'कविता करण्यापेक्षा रबर लागवड करा' असे सुचवताय की काय!

हायला! हे सुचवायला टोमणा कशाला? सरळ लिहिले असते की!

कोकणातल्या जमिनींचे त्रांगडे असते खरेच. शुभेच्छा तुम्हाला जमीन मिळण्यासाठी आणि रबर लागवड करण्यापेक्षा इको टुरिझम चे काही जमते का बघा, असे सुचवते. फायदाही असतो, जमीनही सुजलाम् सुफलाम्.

इरामयी's picture

24 Jun 2019 - 7:40 pm | इरामयी

व्वा! छान कृती.

यूट्यूबवरची तुमची निखारा मिसळ्सुद्धा मस्तच!

चलत मुसाफिर's picture

24 Jun 2019 - 9:27 pm | चलत मुसाफिर

डोक्यावरून गेले आहे. कसली मिसळ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2019 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार

निखारा मिसळीचा नादच खुळा,
भले भले लोक तिकडे आडवे होताना पाहिले आहेत.
पैजारबुवा,