माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
27 Apr 2019 - 5:57 pm

५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

ऑगस्ट २०१७ मध्ये पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. त्यामुळे उत्साह व आत्मविश्वास वाढला. पण बरीच प्रगती बाकी आहे. कारण २१ च्या ऐवजी १९ किलोमीटरच पळू शकलो होतो व वेळही खूप जास्त लागला होता. जसं रनिंग करत राहीन, तसं त्यात सुधारणा होत जाईल. पण वेळ जरी जास्त लागला असला तरी इतकं अंतर पळण्याचा आत्मविश्वास आला. आणि हे फक्त शारीरिक नसतं. मनाचं टेंपरामेंटही हळु हळुच येतं. कुठलीही गोष्ट पुढे न्यायची असेल, तर त्यासाठी मनामध्ये काही टारगेट समोर असावं लागतं. कारण शक्यतो आपण समोर काही टारगेट असेल, तरच प्रयत्न करतो. कदाचित माझ्यापुढे सायकलिंगमध्ये सुधारणा करणं हे टारगेट नसतं, तर मीही रनिंगकडे वळलो नसतो!


त्यामुळे काही दिवसांनी ठरवलं की, आता सिंहगडाच्या घाटामध्ये पळून बघेन. सायकलच्या संदर्भात तर सिंहगड कठिण असा घाट आहे- जणू एक बेंच मार्क! सिंहगड सायकलीवर चढणं, हा एक अतिशय ऊर्जा देणारा अनुभव! सिंहगडचा पूर्ण घाट सायकल चालवत चालवत पार करण्यासाठी मला तीन वेळेस प्रयत्न करावा लागला होता. आता विचार करतोय की, इथे रनिंग करेन. कठीण तर असेलच, पण माझा स्टॅमिनाही नीट कळेल. सिंहगडावर पळण्याच्या आधी एकदा खडकवासला- गिरीनगर परिसरात १० किमी पळालो. ऑक्टोबरचे दिवस असल्यामुळे पाऊस नाहीय. पहाटे किंचित थंडी आहे! पहाटे अशा प्रसन्न वेळी पळणं खूपच मस्त वाटतंय! अहा हा! आणि ह्या परिसरात मिलिटरीचे काही युनिटस आहेत, सर्व रस्ता हिरवागार आहे! त्यामुळे इथे पळणं म्हणजे अगदीच रॉयल अनुभव आहे!

सिंहगड माझ्या भावाच्या घरापासून फार लांब नाही. पण घाटापर्यंत पोहचण्याच्या आधी मला आधी दिड किलोमीटर चालावं लागेल, त्यानंतर परत काही अंतर बसने जावं लागेल आणि मग परत एक किलोमीटर चालल्यावर घाट सुरू होईल. आणि घाट सुरू होतो तिथूनच रनिंग सुरू करेन. आदल्या दिवशी संध्याकाळी बिस्कीट, चिक्की, एनर्जाल हे घेऊन ठेवलं. सोलो पळणार असल्यामुळे सोबत पाणीही ठेवावं लागेल.

पहाटे पाचला निघालो. थॊडं स्ट्रेचिंग केलं. नंतर दिड किलोमीटर चाललो. थोड्या वेळातच बस मिळाली. मग बसमधून उतरल्यावर परत एक किलोमीटर चालून घाट सुरू होतो तिथे पोहचलो. त्यामुळे चांगला वॉर्म अप झाला. इथे प्रत्यक्ष रनिंगला सुरुवात केली. आत्तापर्यंत मस्त उजाडलं आहे. किंचित धुकंही आहे. वा! सायकलवर पहिल्या प्रयत्नात तर फक्त दिड किलोमीटर जाऊ शकलो होतो. त्यामुळे किती पळू शकेन, ही उत्सुकता आहे! आणि पळायला सुरुवात केल्यावर थांबावसं‌वाटलंच नाही. अपेक्षेच्या अगदी विपरित, खूप सहजपणे पळत गेलो. आरामात जात राहिलो. अर्थात् चढ तीव्र असल्यामुळे स्पीड फार कमी आहे. पण काही हरकत नाही! सिंहगडाच्या घाटात पळता येतंय!!

सिंहगड माझ्या सायकलिंगचा एक साक्षीदार आणि मार्गदर्शक! आज माझ्या रनिंगचाही साक्षीदार झाला! वाटेत काही सायकलिस्टही भेटले. पुढे एका जागी रस्ता बंद केला होता. दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अजिबात वाहतुक नाही! पायी जाणारे व सायकलवाल्यांना तर रस्ता खुला आहेच. आणि बाकीचा रस्ता आता खूप शानदार झालाय! जसा रस्ता वर चढत गेला, तसा दूरवरचा नजारा दिसू लागला. काहीच अडचण न येता पळत राहिलो. शेवटी सुमारे साडे- आठ किलोमीटरचा हा घाट पळून पार करायला पावणे दोन तास लागले! चढामुळे वेग अगदीच कमी आहे. थोडा वेळ वर थांबलो, पाणी- एनर्जाल- चिक्की घेतलं व चहाही घेतला. आता ऊन जाणवतंय.

चढताना काहीच त्रास झाला नव्हता, पण उतरताना मात्र कठीण वाटायला सुरुवात झाली. हळु हळु पाय दुखायला लागले. वाटेत जिथे रस्ता किंचित समतल किंवा थोडा चढाव असलेला आहे, तिथे बरं वाटतंय. पण सतत तीव्र उतार असल्यामुळे काही वेळाने पाय चांगलेच दुखायला लागले. लवकरच सारखं थांबायची वेळ आली. आणि १४ किलोमीटर पूर्ण होताना- अर्ध्याहून अधिक घाट उतरल्यानंतर पायी जाण्याची वेळ आली! सारखं थांबण्यापेक्षा पायी चालणं बरं वाटलं. पायी उतरताना मात्र काही अडचण आली नाही. घाटाचे शेवटचे तीन- चार किलोमीटर पायी पायीच उतरलो. असा हा जवळपास १७ किमीचा घाट पार झाला. १७ किलोमीटरचा घाट रनिंगमध्ये पूर्ण करताना सव्वा तीन तास लागले! तिथून एक किमी चालून पुढे आल्यावर डोणजे फाट्याला रिक्षा मिळाली. आणि जसा आलो, तसंच घरी जाताना परत दिड किलोमीटर चाललो. म्हणजे एकूण १४ किमी रनिंग झाली (उद्दिष्ट १७- १८ किमी घाटात रनिंगचं होतं) आणि बाकी आठ- नऊ किलोमीटर वॉक झाला. एकूण २२ किमी झाले. म्हणजे हीपण एक वेगळ्या प्रकारची हाफ मॅरेथॉनच झाली! रनिंगनंतर पायी चालल्यामुळे बरं वाटलं. नंतर दिवसात अनेकदा स्ट्रेचिंग केलं. योगासनंही केली.

ही धाव केल्यानंतर दुस-याच दिवशी माझे रनिंगचे प्रेरणास्रोत हर्षद पेंडसे ह्यांची भेट झाली! त्यांच्याकडून खार्दुंगला चॅलेंजचे अनुभवही ऐकायला मिळाले! अगदी कठीण परिस्थितीत त्यांनी ५३०० मीटर उंचीवर ७२ किमी रनिंग केली होती! विचार करूनच भिती वाटते! थोडा वेळ त्यांच्या सोबतही धावलो. पण नंतर परत पाय दुखायला लागल्यामुळे जास्त पळू शकलो नाही. दुस-या दिवशी परत पाय दुखण्यामागचं कारण नंतर कळालं. नियमितता कमी असेल, योग्य स्ट्रेचिंग नसेल, पायांचे मसल्स रनिंगसाठी तयार नसतील, तर असं होतंच. असो. पण अद्याप खूप शिकायचं बाकी आहे. सिंहगड घाट पळत जाऊ शकतो, ह्यामुळे आत्मविश्वास तर आलाच. स्टॅमिना वाढलाय, हेही जाणवलं. पण नंतर पायांना त्रास आणि लागलेला जास्त वेळ, हीसुद्धा जाणीव झाली. ही एक वेगळीच हाफ मॅरेथॉन झाली. मागे ऑगस्टमध्ये २१ पळालो होतो, तेव्हाही खूप वेळ लागला होता. नंतर जेव्हा कळालं की, एक endurance activity म्हणून हाफ मॅरेथॉनचं कट- ऑफ टायमिंग २ तास ४५ मिनिटे असतं तेव्हा तर जाणवलं! अरे, अजून तर मग माझी हाफ मॅरेथॉनच नाही झालीय! तेव्हा इच्छा झाली की, आता २१ किलोमीटर २ तास ४५ मिनिटांच्या आत पळायचं!

पुढील भाग- माझं पलायन ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

क्रीडाअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2019 - 8:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! हाच एक शब्द !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2019 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है.

-दिलीप बिरुटे

चामुंडराय's picture

27 Apr 2019 - 10:16 pm | चामुंडराय

मस्त ... :)

मार्गी सर, तुम्हाला सिंहगडाचा मावळा असा किताब देऊन गौरवण्यात येत आहे.

मार्गी's picture

29 Apr 2019 - 10:00 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! पण त्यात विशेष काहीच नाहीय. बेसिकच आहे. धन्यवाद चामुंडराय जी! :)

नया है वह's picture

2 May 2019 - 2:44 pm | नया है वह

+१