सुरनोळे

यशोधरा's picture
यशोधरा in पाककृती
20 Apr 2019 - 2:54 pm

लागणारे जिन्नस:

कलिंगडाच्या सालीचा आतील पांढरा गर - १ वाटी
तांदूळ - १वाटी
चिरलेला गूळ - २ टेस्पू
खवलेले खोबरे - साधारण पाव वाटी, थोडे कमी असले तरीही चालेल.
चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

पूर्वी आज्जी असताना काही अगदी टिपिकल पाकृ ती बनवत असे. कलिंगड आणले की एकदा तरी हे सुरनोळे बनत असत. एकदा कलिंगड आणले होते, तेव्हां ही पाकृ आठवली. नीटशी आठवेना म्हणून रसचंद्रिका ह्या पुस्तकाचाही आसरा घेतला. साधारण तशीच कृती पुस्तकातही दिलेली आहे.

तर, ही कृती -

१. एक वाटी तांदूळ ४-५ तास भिजत ठेवावे. सकाळी तांदूळ भिजत घातले की धिरड्यासाठीचे पीठ संध्याकाळी वाटता येईल.

२. कलिंगडाच्या सालीच्या आतील पांढरा गर काढून घेऊन अगदी बारीक चिरावा वा किसणीवर किसून घ्यावा. हा गर कापून घेताना अगदी सालीलगत कापू नये, तसे कापले की हिरव्या सालीचा कडूसरपणाही त्या गरात उतरेल आणि मग धिरडी कडू व्हायची शक्यता असते.

३. वाटताना, कलिंगडाचा गर, तांदूळ व ताजे खोबरे एकत्र वाटावे. त्यात गूळ घालावा व रात्रभर पीठ झाकून ठेवावे.

४. डोश्यासाठी पीठ असते तसे सरसरीत करावे. वाटताना खूप पाणी घालायची गरज नसते, कारण कलिंगडाच्या गरालाही भरपूर पाणी सुटते. ते वापरावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालावे. चवीपुरते मीठ घालावे.

५. दुसर्‍या दिवशी धिरडी काढावी.

वाढणी/प्रमाण: २-३ जणांसाठी

अधिक टिपा: 

गूळ घालून गोडसर बनवतात तसेच आले, हिरवी मिरची घालून तिखटही बनवता येईल.

रसचंद्रिकामधील टिपा -

१. थंडीच्या दिवसांत अर्धा कप दूध व अर्धा कप ताक मिश्रणात घालावे.
२. याचप्रमाणे काकडीची धिरडी बनवता येतात.

माहितीचा स्रोत: 

पारंपारिक व रसचंद्रिका हे पुस्तक.

मैत्रिणींकडून मिळालेल्या टिपा -

१. ज्वारीचं पीठ एक मोठा चमचा, बेसन एक लहान चमचा, तिखट, मीठ, लसूण कुटून, तीळ आणि थोडा गुळ मिक्स करुन, किसलेले कलिंगड / काकडी टाकून भिजवायचं. भाकरी थापतो तसं पीठ लावून थापायचं आणि तेल लावून भाजायचं. दही, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लोण्यासोबत खायचं. 

२. सालीच्या गराची पीठ पेरून भाजी पण अप्रतिम होते. कृती खास नाही. हिंग हळद मोहरीच्या फोडणीवर आधी गर परतून घ्यायचा. मग तिखट मीठ घालून वाफ काढायची. शिजल्यावर बेसन घालून परत वाफ आणायची.

वर भरपूर कोथिंबीर पेरायची. फारच मस्त होते. नागपूरकडे उन्हाळ्यात खूपदा होते. बहुतेक लसणाची फोडणी करतात.

३. पांढऱ्या गराची फोडी करून दुध्यासारखीही करता येते भाजी मूगडाळ वगैरे घालून. पाणीदार असल्यामुळे अवियलमधेही खपून जावं.

सगळ्यात शेवटचं: फोटो नाहीयेत. बिना फोटोंची पाककृती गोड मानून घ्या, अशी विनंती.

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

21 Apr 2019 - 1:00 pm | संजय पाटिल

पाकक्रुतीचा धागा... आणे फोटो नाहीत... =(
बादवे कलिंगडाच्या पांढर्या भागाचा पण उपयोग इतक्या प्रकारे होतो हे पहिल्यांदाच कळले..

पिंगू's picture

21 Apr 2019 - 3:12 pm | पिंगू

कलिंगडाच्या पांढर्‍या सालींपासून टुटीफ्रुटीसुद्धा बनवता येते.

यशोधरा's picture

22 Apr 2019 - 10:46 pm | यशोधरा

कशी?

टुटीफ्रुटीसाठी पपईचे काप करतात त्याएवजी कलिंगडाचा पांढरा भाग वापरावा. बाकी पाककृती तशीच.

नूतन सावंत's picture

22 May 2019 - 11:32 pm | नूतन सावंत

सुका जवला घालून भाजी पण मस्त होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2019 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

घावण, आंबोळ्या, काकडीची धिरडी, असे अनेक प्रकार मनसोक्त खाल्ले आहेत. पण, लहानपणी उन्हाळ्यात आजोळच्या कलिंगडाच्या साम्राज्यात जात असूनही हा प्रकार खाल्लेला नाही ! प्रयोग करण्याजोगा (म्हणजेच, करायला सांगण्याजोगा) आहे ! :)

यशोधरा's picture

22 Apr 2019 - 10:45 pm | यशोधरा

नक्की करून बघा प्रयोग.

चांगली कल्पना आहे. नक्की करून बघील. पण यावेळी कलिंगडाचा मौसम संपायच्या आत करायला हवं.

तुषार काळभोर's picture

21 Apr 2019 - 6:38 pm | तुषार काळभोर

तेपण इतकी हटके.

नाखु's picture

21 Apr 2019 - 11:30 pm | नाखु

आणले तर नक्कीच करुन पहावा असा पदार्थ.
छायाचित्रे असलीच पाहिजे.

अखिल मिपा पाककृती वाचा आणि जमेल तशी कराच संघाची किरकोळ मागणी

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Apr 2019 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त असावे हे प्रकरण...
हा पदार्थ माहित नव्हता...
करुन पहायला पाहिजे.
पैजारबुवा,

करून बघा आणि सांगा कसा वाटला.

प्रचेतस's picture

22 Apr 2019 - 10:35 pm | प्रचेतस

फोटो नाय तर पाकृ नाय.
बाकी पहिल्यांदाच ऐकले ह्या प्रकाराबद्दल. एकदम हटके.

यशोधरा's picture

22 Apr 2019 - 10:44 pm | यशोधरा

नाय त नाय!

नाखु's picture

23 Apr 2019 - 9:45 am | नाखु

कधीही फोटो पाहिल्याशिवाय होकार देत नाहीत असे सूक्ष्म निरीक्षण आहे.

ओळखीपाळखीतला आडगावी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

श्वेता२४'s picture

23 Apr 2019 - 2:16 pm | श्वेता२४

माझ्या मामीने हा प्रकार सांगितला होता तेव्हा आश्चर्य वाटले होते. तीची आजी अशा कलिंगडाच्या सालीच्या गराचे डोसे बनवीत असे (मामी हुबळीची). पण आता तुम्ही जी पाकृ दिलीय त्यावरुन त्या सुरनोळेच बनवित असाव्यात असे वाटते. वेगळी पाकृ. कधीतरी करुन बघेन.

पद्मावति's picture

24 Apr 2019 - 2:00 pm | पद्मावति

मस्तं प्रकार. करुन पाहणार नक्की.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2019 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीन फोटोची पाककृती फॉल असते. त्यामुळे कृती वाचली नाही. धन्यवाद. पुलेशु.

-दिलीप बिरुटे
(पाककृतीत फोटोवर फोकस असलेला मिपाकर)

यशोधरा's picture

24 Apr 2019 - 2:38 pm | यशोधरा

खिक! क्षमा केली आहे!

- फॉल पाकृ लिहिणारी.

अभ्या..'s picture

25 Apr 2019 - 4:39 pm | अभ्या..

कलिंगडाच्या पांढर्‍या सालींचे डोसे, केळ्यांच्या सालीची भाजी, दोडक्यांच्या शिरांची चटणी, फणसाच्या आठोळ्यांचे पीठ असले काही काही करणार्‍या लोकांचा मला भलता आदर आणि अभिमान वाटतो.

यशोधरा's picture

25 Apr 2019 - 5:56 pm | यशोधरा

दे टाळी! ह्या तुझ्या गुणामुळेच मला तुझे लै लै कवतिक वाटते बघ. :D

तुषार काळभोर's picture

25 Apr 2019 - 6:08 pm | तुषार काळभोर

फणसाच्या बिया भाजून लै भारी लागतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2019 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

फणसाच्या बिया भाजून मस्तच लागतात.

त्यांचे प्रत्येकी दोन तुकडे करून ते सोड्यांच्या कालवणात किंवा गवारच्या भाजीत घालून पहा, मजा आयेगा !

पैलवान भाऊ आणि एक्का काकांशी अगदीच शमत!

तुषार काळभोर's picture

25 Apr 2019 - 11:19 pm | तुषार काळभोर

आमच्या घरी सोडे नाही आवडत. गवारीच्या सुक्क्या भाजीत ट्राय करायला सांगतो.

ता.क. चला, आता फणस शोधणे आले!

अभ्या..'s picture

25 Apr 2019 - 11:23 pm | अभ्या..

मस्तच, एखादा चांगला कापा मिळाला की बिया आणि साले तुला ठेव. उरलेसुरले मला पाठवून दे. ;)

- दोडक्याच्या शिराच्या चटणीचा फ्यान

श्वेता२४'s picture

26 Apr 2019 - 12:03 am | श्वेता२४

उकडलेल्या पण छानच लागतात

इरामयी's picture

12 May 2019 - 8:27 pm | इरामयी

खिक् !

सगळ्याच बायका करतात. त्यात विशेष ते काय?

कंजूस's picture

25 Apr 2019 - 9:01 pm | कंजूस

अफलातून पाकृ.
अमच्या आइडीला परवडणारी आहे.
( विनोदी श्रेणी द्या रे)
---
काकडी आणि कलिंगड एकाच वर्गातील फळे आहेत त्यामुळे पाकृ अदलाबदल चालते॥
काकडीचा धोंडस प्रकार फार चांगला लागतो.

सनातनी's picture

25 Apr 2019 - 10:09 pm | सनातनी

पण यात पोषक घटक असतील का? कारण पांढरा भाग टाकावू असतो ना.

असतात. गुगल केलेत की माहिती सापडेल.

रेसिपी आवडली, आणि चांगल्या वेळेला दिलीत उन्हाळ्यात तशीही जास्त कलिंगड खाल्ली जातात. तेव्हा करून बघण्यात येईल :), धन्यवाद .

यशोधरा's picture

26 Apr 2019 - 9:44 am | यशोधरा

सर्वांचे आभार. _/\_

नंदन's picture

26 Apr 2019 - 12:48 pm | नंदन

फार दिवसांनी हा शब्द ऐकला, पाकृ मस्तच!

वर प्रतिसादांत यातले पाठभेद आले आहेतच (कलिंगडाऐवजी तंवस/काकडी, गुळाऐवजी तिखट थालीपीठ इ.) - किसलेल्या गरात बारीक रवा किंवा नारळाचा चव, जिरं-मिरच्या-आलं-कोथिंबीर इ. घालून कुरकुरीत धोडकही तयार करता येतात. त्याची पाकृ येथे पाहता येईलः

अभ्या..'s picture

26 Apr 2019 - 12:55 pm | अभ्या..

गर याद रहे...
कोटीबाज नंदनमालक गर पण सोडणार नाहीत.

यशोधरा तै , हे नवीनच वाचायला मिळालं .ते इतर मिपाकर म्हणतात त्याप्रमाणे फोटू असते तर चार चांद लागले असते या लेखाला .. आमच्या बायडीने काय बनवून खायला घातलं तेही कळलं असत खाण्या अगोदर .. फोटूही जुळवले असते आणि मगच चव घेतली असती ..

खिलजी अण्णा, येवढं काय नसतंय हो. डोसे, धिरडी डोळ्यांसमोर आणा. त्याप्रमाणेच असतं. मस्तपैकी तिखटवालं बनवा आणि हादडा!!

छान आहे रेसिपी...करुन बघेन