दिघी - आगरदांडा फेरी बोट

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
22 Apr 2019 - 5:09 pm

दिघी - आगरदांडा फेरीबोट (श्रीवर्धन ते मुरुड )

आताच (१९ एप्रिल २०१९ ) श्रीवर्धन ते मुरुड जाण्यासाठी मधल्या फेरीबोटीने ( दिघी - आगरदांडा फेरीबोट ) गेलो.
कोकणात सुटीत बरेच पर्यटक अलिबाग - श्रीवर्धन भागात पर्यटनासाठी जातात.
अलिबाग - नागाव - रेवदंडा -कोरलई - बारशिव बीच - काशिद बीच - नांदगाव - मुरुड रस्ता आहे, मुरुड ते दिघी खाडी आहे.
दिघी - दिवेआगर - श्रीवर्धन - हरिहरेश्वर रस्ता आहे. किंवा दिघी - बोर्ली पंचतन -श्रीवर्धन रस्ता आहे.

मुरुड ते दिघी खाडी पार करण्यासाठी एक लाँच सर्विस पुर्वीपासून होती. यातून प्रवासी जात होते पण गेल्या तीनचार वर्षांपुर्वी एक फेरी बोट सुरू झाली ( जंगली फेरीबोट) त्याने कार /बाइक वाल्यांची सोय झाली.
लागणारा वेळ आणि वेळापत्रक उपयोगी पडेल म्हणून माहिती देण्याचा विचार आहे.

फोटो १)
दिघी जेट्टीला उभ्या असलेल्या फेरी बोटीतून -

फोटो २)
श्रीवर्धन एसटी डेपोतील बसचे वेळापत्रक.
या पाटीवरच्या दिघी गाडीची वेळ उपयोगाची आहे. साधारण सवा तासाने (३३ किमि) बस दिघीला पोहोचते. बस स्टँडच्या बाजुलाच जेट्टी आहे. अर्ध्या तासाने फेरी बोट आगरदांडा जाण्यासाठी सुटते.

फोटो ३)
आगरदांडा जेट्टी येथील एक पाटी

(( या पाटीवरचे वेळापत्रक फसवे आहे. फोन नंबरचा काही उपयोग होतो का पाहावे.))

फोटो ४)
जंगली फेरी बोट आगरदांडा धक्क्याला लागताना प्रवाशांची उतरण्याच्या घाई.

------------------------
मागच्या आठवड्यात (१८-२० एप्रिल २०१९ ) श्रीवर्धन आणि रेवदंडा इथे जायचे होते.

सकाळी आठच्या दिघी बसने निघालो. बस समुद्राकडूनच्या शेखाडी - दिवेआगर रस्त्याने जात नाही. वरच्या डोंगरी रस्त्याने बोर्ली पंचातन मार्गे जाते. दोन्ही बाजूस आंब्याची कलमे दिसत होती. इकडचे आंबे अजून काढायला तयार व्हायचे होते. सवा नऊला दिघी जेटीजवळच्या स्टँडला पोहोचलो. बसमध्ये साताठ प्रवासी होते. उतरण्याची घाई करू लागलो तर कंडक्टरने सांगितले पावण दहाला सुटेल फेरी.

फेरीबोटीचे तिकिट ( रु २२) बोटीवरच मिळते. प्रवासी आणि बाइक्स अगोदर चढू शकतात. कार्स शेवटी घेतल्या. त्या रिवर्स करून आत न्यायला सांगतात. साधारणपणे जागा पाहता नऊ दहा कार्स आणि पंधरावीस बाइक्स राहतील इतकी जागा आहे. वरती एक डेकसुद्धा आहे. एकूण छान व्यवस्था आहे. फेरी प्रवासास पंधरा मिनिटे लागतात.

आगरदांडा जेटी हा नवीन धक्का मुरुडबाजुला बांधला आहे. या अगोदर छोट्या लाँचेस राजपुरी धक्का येथे जात. तिथून जंजिरा किला आणि मुरुड गाव/ बस डेपो जवळ आहे परंतू आता आगरदांडा येथेच जातात.
पंधरा मिनिटांत समोरच्या आगरदांडा जेटीला पोहोचलो. एक सिक्ससिटर लगेच भरून गेली. मग दुसरी मिळाली. वाटेत मुरुडकडून येणारी बस दिसली. आगरदांडा जेटी ते मुरुड गाव/बस डेपो दहाबारा किमी दूर आहे. अर्धा तास लागला. हा रस्ता वळणावळणाचा छान आहे. डेपोपाशीच ठाणे बस मिळाली आणि समुद्राच्या किनाऱ्याकडून दृष्य पाहात जात होतो. वाटेत काशिद , बारशिव मिनी बीच, सामिष खानावळी, कोरलई किला,असा पन्नासेक किमिचा प्रवास करून रेवदंड्यात पोहोचलो. पण रस्ता अरुंद आणि खडबडीत आहे. याचाच पुढे कोस्टल रोड होणार आहे. रेवदंडा ते अलिबाग नागाव मार्गे वीस किमी आहे.

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण धागा. धन्यवाद कंकाका.

प्रचेतस's picture

23 Apr 2019 - 6:51 am | प्रचेतस

माहितीपूर्ण.
रेवदंडा, कोर्लई ही गावे अतिशय सुंदर आहेत. दोन्ही बाजूला नारळी पोफळीच्या बागा. रेवदंड्याचा तट फोडूनच आजचा रस्ता केला आहे. कोर्लईतील लोक पोर्तुगीज, कोकणी, मराठी मिश्रित क्रिओल भाषा बोलतात. ऐकायला छान वाटते खूप. किल्ल्यावर पोर्तुगीज कोट ऑफ आर्म्स आहेत.

फेरीबोट नसती तर दिघी ते आगरदांडा हे अंतर जवळपास ५० किमीने वाढतं. मात्र त्या पट्ट्यात काही मिठागरं आणि मत्स्यतळी दिसतात, काहींमध्ये प्रॉन्सची शेती केली जाते.

शब्दानुज's picture

23 Apr 2019 - 1:30 pm | शब्दानुज

आम्ही सध्या याच भागात फिरत आहेत. आगरदांडा येथील वेळापत्रकाचा मी काढलेला फोटो टाकावा म्हणालो आणि हा धागा पाहिला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2019 - 1:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मळलेली वाट सोडून केलेला प्रवास आवडला ! मुख्य रस्ते सोडून असे आतवर गेल्यावरच कोकणचे खरे सौंदर्य नजरेस येते.

अभ्या..'s picture

23 Apr 2019 - 3:16 pm | अभ्या..

आम्ही दोघे १०० सीसी बाईकवरुन ताम्हीणीमार्गे व्हाया पास्को कंपनीचा रोड निझामपूर, माणगांव, म्हसळा, दिवेआगार असे गेलो. दिवेआगारहुन बोर्ली पंचतन ला फिरुन हायवेवरुन फिरलो पण येताना दिवेआगारपासून गेलो त्याच रस्त्याने परत आलो. ताम्हिणी रोड तर दिव्य आहेच पण मुळशीपुढेही सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण चालू असल्याने प्रचंड त्रास झाला. एक गाडी जाण्याइतका जुना रोड सोडून सर्व खणून ठेवलेले आहे. गाडी कमीतकमी १५० सीसी तरी हवीच असे वाटले. काही टर्न्स आणि चढ डेडली आहेत(कामे चालू असलेने). काही ठिकाणी रोड झाला आहे तो मात्र फस्क्लास आहे. आकाराने आणि दर्जाने पण चांगले काम चालू आहे. सर्वत्र अर्थ्मुविंग वेहिकल्स आणि डंपर फिरत असलेने लाल धुळीचे साम्राज्य आहे. पुणे ते दिवेआगार १६७ कीमी पोहोचायला ७ तास लागले. येताना थोडा कमी वेळ लागला. शाकाहारी असलेने कोकणात खाण्याची पंचायत झालीच. माणगांवात बाळाराम स्वीट्स नामक हॉटेलात चांगले खायला मिळाले.

गामा पैलवान's picture

23 Apr 2019 - 6:44 pm | गामा पैलवान

कंजूस,

माहितीबद्दल धन्यवाद. सहज एक विचार मनात आला की जी वाहने नौकेतनं नेतात त्यांचा विमा उतरवलेला असतो का? समजा नाव बुडाली तर?

आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

23 Apr 2019 - 7:23 pm | कंजूस

विमा असतो का वाहनांचा?

तरीच तो अटेंडंट ड्राइवरला विचारत होता आतच बसणार आहे का?

---------------
कोकण किनारा पाहिल्यास एक लक्षात येईल की सर्व किनाऱ्याकडच्या ठिकाणी पोहोचायला एक डोंगर ओलांडावा लागतोच. अगदी अलिबाग ते बांदा. एखाददुसरे अपवाद.

कंजूस's picture

23 Apr 2019 - 7:25 pm | कंजूस

माणगाव, वडखळ नाका आगरी जेवणासाठी प्रसिद्ध.

जालिम लोशन's picture

12 Jun 2019 - 6:07 pm | जालिम लोशन

चांगली माहिती. पण कुठुन गेला होतात? पुणे का मुंबई? कारण एसटी फार कमी आहेत.

पुणे का मुंबई? कारण एसटी फार कमी आहेत.

मुंबई .

चौकटराजा's picture

14 Jun 2019 - 12:22 pm | चौकटराजा

आपली कंजूस शैलीची सफर मस्त. मी रेवदंडा इथे गेलो आहे . इथे बिर्ला यांनी बांधलेले एक सुंदर मंदिर आहे. आता वेगळाच प्रश्न असा की सांप्रत व्हॉटस अप वर एक मेसेज फिरत आहे की ६५ वर्षांवरील नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढले की ४००० कि मी चा एस टी प्रवास फुकट ! यात काय गडबड आहे का ? माझ्या माहिती प्रमाणे स्मार्ट कार्ड फक्त रोकडा जवळ ठेवणे धोक्याचे म्हणून दिलेली सोय आहे .फुकट बिकट काही नाही !

चौकटराजा's picture

14 Jun 2019 - 12:24 pm | चौकटराजा

काही लोकांनी बोगस ज्येष्ठ नागरिक पास तयार केले असे झाल्यामुळे एस टी ने हा उपाय केला आहे असेही कळते !

कंजूस's picture

14 Jun 2019 - 4:02 pm | कंजूस

१) आता ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राऐवजी आधार कार्ड/किंवा पूर्ण जन्मतारीख असलेले ओळखपत्र दाखवावे लागते. (नोव्हेंबर १९५४ असेल तर डिसेंबर २०१९ पासून सवलत भाडे लागू होते.
२) पूर्वी जुलै महिन्यात सहाशे रु भरा, एसटीने (लाल डबा) कितीही फिरा हा पास होता. अर्थात जुलैमध्ये धार्मिक स्थाने फिरणारे फिरत असावेत.
३) एसटी प्रवास धार्जिणा (सोयीला हजर)असेल तर काही च त्रास नसतो. वेळेत तुमच्या ठिकाणी फेकून देते.
४) वेळेला पोहोचवणारे वाहन तेच खरे वाहन.
उदाहरणार्थ - हल्ली दुरांतो, एसी एक्सप्रेस,तेजस,वंदे (ही महाराऐ येणार आहे) , जनशताब्दी,राजधानी वगैरे गाड्यांंचे पर्याय आले आहेत. पण नवीन ठिकाणी संध्याकाळी/रात्री पोहोचून काही उपयोग नसतो. एखादी साधी गाडी जरी सकाळी जात असेल तर तीच उपयोगी असते.

फेरी बोटींचं वेळापत्रक M - Indicator या Appमध्ये सापडेल पण ते अपडेट केलेलं वाटत नाही. कोणी कारने इथे गेल्यास धक्क्यावर दीडदोन तास वाया जाऊ नये/फेरीबोट चुकू नये यासाठी लेख आहे.