मला तुझी आठवण यायला कारण लागत नाही,
झोप लागावी म्हणून दिवसभर केलेल्या दगदगीचा शीण,
पाठ अंथरुणाला टेकताच वैरी होतो,
मी त्याला धरून ठेवायचं म्हटलं तरी निसटून जातो,
डोळ्यांच्या कडा ओल्या होणं,
मग जरा कमी कमी आवाजातले हुंदके,
मग उशीत डोकं खुपसून हमसाहमशी रडणं,
असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर
गोठलेली बोटं लिहू लागतात..
तुझ्या असण्याने खरंच फरक पडला असता का?
कुढत राहणं हा एखाद्याचा स्वभावच असेल तर?
हेवा वाटावा अशी असतात काही माणसं,
छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानणारी,
खुशमिजाज की असंच काही म्हणतात ना त्यांना?
त्यांच्याशी तुलना केली की मला मी सहन होत नाही,
तुझ्यासोबतच्या आयुष्याची पाहिलेली स्वप्नं,
मग त्या स्वप्नांचा झालेला चुराडा,
आणि आता नवी स्वप्नं पाहण्याची संपलेली इच्छा,
या सगळ्यांची उजळणी करून झाल्यावर,
मग गोठलेली बोटं लिहू लागतात..
फक्त एकदा तुला पुन्हा भेटायचंय,
तुला सांगायचं राहून गेलेलं बरंच काही सांगायचंय,
मी तुला तू मला विसरायचं 'नाटक' करावं लागू नये,
ही एवढीच अपेक्षा आहे फक्त..
तुझ्याशिवाय जगणं अगदी आनंदोत्सव वगैरे नसलं तरी
असह्य तरी नसावं इतकंच हवं आहे मला,
पण तू येणार नाहीस..
पण तू येणार नाहीस..
पण तू येणार नाहीसचं..
अशी स्वतःच स्वतःची खात्री करून घेतल्यावर,
मग गोठलेली बोटं लिहू लागतात..
प्रतिक्रिया
16 Apr 2019 - 9:39 am | सिक्रेटसुपरस्टार
या कवितेला का बरं प्रतिसाद नाहीत? काही चुकलं असेल तर तसं सांगा. पण कुणी काहीच सांगणार नसेल तर लिखाणात सुधारणा तरी कशी होणार?
16 Apr 2019 - 10:04 am | चांदणे संदीप
मला कवितेतलं विशेष कळत नाही नाहीतर सांगितलो असतो.
पण...
जर कुणी यावंसं वाटणार
येणारच नसेल
आणि, हे आत कुठेतरी
ठाऊकही असेल
तर न थांबता चालत रहावं
लिहू वाटलं तर लिहावं
कुणी हाती धरत नसेल, तर
आपलं गाणं, आपणच गावं!
Sandy
17 Apr 2019 - 1:28 am | सिक्रेटसुपरस्टार
धन्यवाद. तुमच्या कविता वाचल्या आहेत पूर्वी. छान लिहिता. कवितेतलं काही कळत नाही असं म्हणणं हा तुमचा नम्रपणा.
16 Apr 2019 - 11:33 am | सोन्या बागलाणकर
वाह मस्त!
"गारवा"च्या सौमित्र (किशोर कदम) यांची आठवण आली.
17 Apr 2019 - 1:29 am | सिक्रेटसुपरस्टार
धन्यवाद. पण सौमित्र बरोबर माझी बरोबरी योग्य नाही. थोडक्यात आम्ही ज्या शाळेत शिकतोय तिचे सौमित्र हेडमास्तर आहेत.
17 Apr 2019 - 1:41 am | सिक्रेटसुपरस्टार
आपल्या लिखाणाला भरभरून प्रतिसाद यावेत अशी अपेक्षा मुळीच नाही पण मिपावर प्रतिसादांच्या बाबतीत इतकी उदासीनता का आहे? जे आवडलं त्याला चांगलं म्हणावं, नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणावं, पण तुमची पोच लेखकांना मिळणं आवश्यक आहे. निकोप संवाद गरजेचा आहे. जर लिहिणार्यांना इथे लिखाण प्रसिद्ध करून आपण काहीतरी शिकतोय, काहीतरी मिळवतोय अशी भावना नाही मिळाली तर इथे का कुणी लिहीत राहील? माझा सदस्य आयडी ३२००० च्या पुढे आहे. त्यातले पीक टाईममध्ये कमीत कमी २० ऑनलाईन आहेत असे गृहीत धरले तर २ नवे प्रतिसाद एखाद्या कवितेवर कथेवर येणं इतकं अवघड का आहे? जर प्रतिसाद द्यायचेच नसतील तर इथे इतके सदस्य येतात कशाला?
17 Apr 2019 - 7:54 pm | भाकरी
वाचायला येतो मी ईथे. चांगली असेल कविता तर वेळ घालवतो तशी बोलायला. फाल्तू असेल तर का ? तुम्ही गोष्ट लिहुन कविता म्हणत देता! काहि कॉमा काढुन टिम्ब टाकलि, हे बघा
मला तुझी आठवण यायला कारण लागत नाही. झोप लागावी म्हणून दिवसभर केलेल्या दगदगीचा शीण पाठ अंथरुणाला टेकताच वैरी होतो, मी त्याला धरून ठेवायचं म्हटलं तरी निसटून जातो. डोळ्यांच्या कडा ओल्या होणं, मग जरा कमी कमी आवाजातले हुंदके, मग उशीत डोकं खुपसून हमसाहमशी रडणं, असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर गोठलेली बोटं लिहू लागतात. तुझ्या असण्याने खरंच फरक पडला असता का? कुढत राहणं हा एखाद्याचा स्वभावच असेल तर? हेवा वाटावा अशी असतात काही माणसं, छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानणारी. खुशमिजाज की असंच काही म्हणतात ना त्यांना? त्यांच्याशी तुलना केली की मला मी सहन होत नाही, तुझ्यासोबतच्या आयुष्याची पाहिलेली स्वप्नं, मग त्या स्वप्नांचा झालेला चुराडा आणि आता नवी स्वप्नं पाहण्याची संपलेली इच्छा, या सगळ्यांची उजळणी करून झाल्यावर मग गोठलेली बोटं लिहू लागतात. फक्त एकदा तुला पुन्हा भेटायचंय, तुला सांगायचं राहून गेलेलं बरंच काही सांगायचंय. मी तुला तू मला विसरायचं 'नाटक' करावं लागू नये, ही एवढीच अपेक्षा आहे फक्त. तुझ्याशिवाय जगणं अगदी आनंदोत्सव वगैरे नसलं तरी असह्य तरी नसावं इतकंच हवं आहे मला, पण तू येणार नाहीस. पण तू येणार नाहीस, पण तू येणार नाहीसचं अशी स्वतःच स्वतःची खात्री करून घेतल्यावर मग गोठलेली बोटं लिहू लागतात..
बरि नाहि हे ताइप करण्यासारखे वाटेल एवडि तरि बरि लिहाना !! नाहि येत कविता तर हि गोष्ट टाका चालेल.
17 Apr 2019 - 7:25 am | प्रमोद देर्देकर
इथे इतके सदस्य येतात कशाला?>>>>
तुमच्या छान छान कवितेचं विडंबन करायला .
17 Apr 2019 - 12:24 pm | सिक्रेटसुपरस्टार
हो ते तर दिसतच आहे. अनेक चांगल्या कवितांचे विडंबन वाचले मागच्या काही दिवसात. अती सर्वत्र वर्ज्ययेत याचा जरूर विचार करावा सर्व विडंबनकारांनी.
18 Apr 2019 - 5:55 pm | गामा पैलवान
सिक्रेटसुपरस्टार,
मला कवितेतलं फारसं कळंत नाही. एव्हढं माहितीये की तुमचा अनुभव वाचकांना आपलासा वाटला पाहिजे.
तुमच्या अनुभवात टोकदारपणा आहे का? की सपक आहे. पहिलं कडवं वाचल्यावर वाचकांच्या कुठल्या अपेक्षा जागृत होतात? त्या उर्वरित कवितेत पुऱ्या होतात का? हे प्रश्न तुमचे तुम्हीच विचारू शकता (असं मला वाटतं).
प्रस्तुत कवितेत प्रेयसीशी वियोग झालाय. असा कित्येकांचा होत असतो. कितीतरी जण असेच रडंत झोपतात. तुमच्या अनुभवात नेमकं नावीन्य काय? किंवा नावीन्य नसल्यास एकमेवत्व ( = uniqueness) आहे का? असल्यास ते काय आहे वा असावे? असे अनेक प्रश्न तुम्ही कल्पू शकता.
आ.न.,
-गा.पै.