अश्वत्थ

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
9 Apr 2019 - 12:27 pm

अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे..
विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा..
सृष्टीतून जीवनरस शोषून घेत,
ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे..
प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून
मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत..
तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात
गाणी गात पानांना ऐकवतात..
जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने
जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात.. हिरवेपणा टिकवून अन्न तयार करतात..
निवृत्त मनाने गळून जातात
पिंपळाच्या मुळांचे अन्न होत मातीत मिसळतात..
लाल तजेलदार नाजूक पाने
वाऱ्यावर हलतात, कुतूहलाने जगाकडे बघतात

कुंभार माशी 4 पाने कातरते
फेऱ्या मारत घेऊन जाते..
तिच्या पिल्लांसाठी घर बांधायचं काम उत्साहात सुरू असत..

सर्वत्र जीवनाचा उत्सव सुरू आहे!

झाडाखाली पारावर..
काही माणसे बसली आहेत, एकटी, पेपर वाचत, वा तावातावाने वाद करत..
कुणी नोकरी नाही म्हणून चिंतेत,
कुणी मित्राशी पैशावरून भांडलेला..
कुणाच्या सुरकूतलेल्या चेहऱ्यावर
दुष्काळाचं सावट, मनात मुलीच्या लग्नाची काळजी..

सगळे जीवनोत्सवाच्या छायेत आहेत,
तरी त्यापासून वंचित..
त्यांच्या जगण्यातला उत्सवाचा आनंद हरपलेला, फक्त कोरडा व्यवहार शिल्लक उरलेला..

-अनुप

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

10 Apr 2019 - 5:04 pm | पद्मावति

मुक्तक आवडले.

अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे..
विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा..
सृष्टीतून जीवनरस शोषून घेत,
ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे..
प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून
मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत..
तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात
गाणी गात पानांना ऐकवतात..
जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने
जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात.. हिरवेपणा टिकवून अन्न तयार करतात..
निवृत्त मनाने गळून जातात
पिंपळाच्या मुळांचे अन्न होत मातीत मिसळतात..
लाल तजेलदार नाजूक पाने
वाऱ्यावर हलतात, कुतूहलाने जगाकडे बघतात

कुंभार माशी 4 पाने कातरते
फेऱ्या मारत घेऊन जाते..
तिच्या पिल्लांसाठी घर बांधायचं काम उत्साहात सुरू असत..

सर्वत्र जीवनाचा उत्सव सुरू आहे!

सुंदर. डोळ्यांपुढे चित्र उभं राहिलं.

सुंदर झाली आहे ... आवडली पण शेवट जरा थोडा वेगळा हवा होता असे राहून राहून वाटतेय..

अन्या बुद्धे's picture

11 Apr 2019 - 10:27 pm | अन्या बुद्धे

सुचवा की..

किमान दिशा तरी..

अन्या बुद्धे's picture

11 Apr 2019 - 10:31 pm | अन्या बुद्धे

मुक्तक..
आवडला शब्द..

प्रमोद देर्देकर's picture

14 Apr 2019 - 9:43 pm | प्रमोद देर्देकर

खूप सुंदर मुक्तक .
अजून झाडांवर लिहलेल्या कविता येवू द्या .