साहित्यः
दूध (म्हशीचे अथवा फुल्-क्रिम) - २ लिटर
तांदूळाचा रवा (इडली रवा) - १५० ग्रॅम (चहाचा एक कप किंवा एक मोठी वाटी)
खवा - १२५ ग्रॅम (पाऊण वाटी)
साखर - १ कप
वेलची पावडर - १/२ टी स्पून
गुलाब एसेन्स अथवा गुलाब जल - अंदाजाने
बदाम-पिस्ता काप - थोडेसे
चांदीचा वर्ख - सुशोभीकरणासाठी (वैकल्पिक -[Optional])
कृती:
खवा कुस्करून मोकळा करून ठेवा.
तांदूळाचा रवा पाण्यात एक तास भिजवून ठेवा (पाणी रव्याच्या पातळीच्या वर राहिले पाहिजे.)
२ लिटर दूध उकळण्यास ठेवा. दूध उकळून १-१/२ लिटर (अंदाजाने) झाले पाहिजे.
आंच कमी करून, भिजवून निथळवलेला रवा दूधात मिसळा.
रवा-दूध मिश्रण दाट होईस्तोवर ढवळत राहा.
दाट झाल्यावर खवा,साखर, वेलची पावडर आणि बदाम-पिस्ता काप त्यात मिसळा.
कस्टर्ड सारखे दाट होई पर्यंत ढवळा.
आता गॅस बंद करून फिरनी खाली उतरवा. आवडीनुसार गुलाब एसेन्स किंवा गुलाब जल मिसळा.
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
12 Feb 2008 - 2:46 pm | विसोबा खेचर
दाट झाल्यावर खवा,साखर, वेलची पावडर आणि बदाम-पिस्ता काप त्यात मिसळा.
आता गॅस बंद करून फिरनी खाली उतरवा. आवडीनुसार गुलाब एसेन्स किंवा गुलाब जल मिसळा.
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.
आहाहा! क्या बात है पेठकरशेठ.. लय भारी रेशिपी सांगितलीत बाकी! आणि तशी सोपी वाटते आहे, आता लौकरच करून पाहतो...! :)
फिरनीचा फोटूही सुरेख आला आहे. परंतु त्यात तो चमचा नसता ठेवलात तर बरं झालं असतं! तो चमचा उचलण्याकरता संगणकाच्या पडद्याकडे नकळत गेलेला माझा हात काचेवर आपटून परत आला! :))
फिरनी हा खास मुसुलमानी पदार्थ! जुन्या लखनवात उत्तम बिर्याणीनंतर मी उत्तम फिरनीही खाल्ली आहे! :)
पा कृ बद्दल अनेक धन्यवाद...
आपला,
तात्यामिया.
पेठकरशेठ, आमची अजून एक फर्माईश बरं का! आम्हाला बालूशाही अतिशय आवडते. मिपावर जमल्यास बालुशाहीचीही पा कृ आपण द्यावी ही इनंती..!
आपला,
(मारवाडी) तात्या.
12 Feb 2008 - 2:52 pm | umavaidya
खरच मस्त आहे ,फोटो पण मस्त!
12 Feb 2008 - 3:39 pm | स्वाती दिनेश
चित्र पाहून पाणी सुटले तोंडाला.. दिल तो पागल है..चित्रात शाहरुख खान खात असलेली फिरनी आठवली,:)
स्वाती
12 Feb 2008 - 9:25 pm | केशवसुमार
पेठकरशेठ,
सुंदर पाककृती आणि सुंदर फोटू.. तोंडाला पाणी सुटल..
आमच्या कडे रव्याची खीर श्राद्धाला करतात त्यामुळे मी फेरनी जरा वेगळ्या पध्दतीने करतो..
रव्याच्या एवजी मी मोकळा शिजवलेला बासमती भात घेतो.. कजू-बदाम-किशमीश- भरपूर प्रमाणात बाकी सगळी प्रक्रिया तुमच्या सारखीच.. अहाहा..
(सुग्रण)केशवसुमार
12 Feb 2008 - 7:55 pm | प्राजु
आहाहा..............
वा.. काय सुंदर फोटो आहे. आणि पाककृतीही उत्तम. सोपीही आहे. करेन लवकरच. पण केशव म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडेही तांदूळाच्या रव्याची खीर श्राद्धाला करतात. त्यामुळे मी ही मोकळा शिजवलेला भातच घालेन.
इकडे भारतीय हॉटेल्स मध्ये, स्वीट म्हणून गुलाबजाम आणि राईस खीर असते. ती ही बहुधा अशीच करत असावेत.
- प्राजु
12 Feb 2008 - 9:40 pm | चतुरंग
बराचवेळ तोंडातून शब्द येईना त्यामुळे असे झाले!
प्रभाकरपंत, फारच छान कृती आणि सुंदर प्रकाशचित्र! धन्यवाद!! (आपण उत्तम प्रकाशचित्रकारही आहात - चांदीचा वर्ख, पिस्ते आणि बदामाच्या कापांवरचा कॅमेर्याचा फोकस इतका अचूक आहे की क्या कहेने!)
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.
ह्यातल्या मातीच्या वाट्यांमधे तर खासच.
बंगालकडे 'मिष्टी दोही' (खापरात लावलेले गोड दही) असा एक प्रकार मिळतो - 'फिरनी' हा त्याच जातकुळीतला पण खवा, सुकामेवा, चांदीचा वर्ख ह्यामुळे आणखी राजस गुणाकडे जाणारा. हा पदार्थ करुन खायलाच हवा!
चतुरंग
12 Feb 2008 - 9:59 pm | वडापाव
वा!
खूपच छान!
पाणी सुटलं तोंडाला
आपला नम्र,
वडापाव
12 Feb 2008 - 10:00 pm | प्रभाकर पेठकर
श्री. तात्या,
फिरनी लागते बाकी झकासच. उत्तरप्रदेशातील फिरनी, आपली तांदूळाची खीर, दक्षिणेतील पायसम ही विविध प्रदेशांमधील छोटी मोठी भावंडेच आहेत.
बालूशाही मी एकदाच बनवली होती. मिसळपाववर पाककृती देण्याआधी पुन्हा एकदा करून पाहावी लागेल. जमली की ताबडतोब टाकतोच मिपावर.
प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
umavaidya,
प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
धन्यवाद स्वाती दिनेश,
फिरनी करून पाहा (म्हणजेच, खा!) मस्त लागते. घरगुती पार्टीसाठी मातीच्या मटक्यात (चित्रात दाखविल्याप्रमाणे) घालून सजवून थंड फिरनी सादर करावी. पाहुणे 'गाऽऽर' पडतील. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
श्री. केशवसुमार,
आमच्या कडे रव्याची खीर श्राद्धाला करतात.
ही रव्याची खीर नाही. तांदूळाचा रवा (इडली रवा) वापरलेला आहे. तांदूळाचा रवा न मिळाल्यास, आपला रोजचा बासमती तांदूळ भिजवून मिक्सरवर भरडसर दळून घ्यावा. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
प्राजु,
ही सुद्धा राईस खीरच आहे. तांदूळाचा रवा न मिळाल्यास, आपला रोजचा बासमती तांदूळ भिजवून मिक्सरवर भरडसर दळून घ्यावा.
प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
श्री.चतुरंग,
प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
12 Feb 2008 - 10:18 pm | वरदा
मस्तच आहे आमचं अगदी उलट. आम्ही भाताची खीर श्राद्धाला करतो त्यामुळे अशीच करुन पाहीन....पण साधा रवा आणि इडलीचा रवा ह्याच्या चवीत खूप फरक असतो का?
अवांतर-
कुणाला बदाम हलव्याची रेसिपि माहीत असेल तर सांगा ना मला...
12 Feb 2008 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर
साधा रवा आणि इडलीचा रवा ह्याच्या चवीत खूप फरक असतो का?
साधा रवा हा गव्हाचा रवा असतो, इडली रवा हा तांदूळाचा रवा असतो. त्यामुळे, इडली रव्याच्या खीरीची चव भाताच्या खीरीसारखीच असते.
12 Feb 2008 - 10:27 pm | स्वाती राजेश
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.:)
तोंडाला पाणी सुटले. आणि त्यात तो फोटो म्हणजे काही विचारुच नका.:)
अगदी पौष्टीक आणि सोपी आहे.
पण फोटो काढून मत्र आम्हाला जळवले.
खाताना आमची आठवण काढून खा.:)))
12 Feb 2008 - 10:33 pm | वरदा
आता कळ्ळं मग करतेच नक्कि..थँक्यु पेठकर काका...खूप छान आणि सोपी रेसिपी सांगितलीत्...सहज करता येईल अर्ध्या तासात....
13 Feb 2008 - 1:34 pm | नंदन
पाककृती आणि छायाचित्र. एक शंका - खव्याच्या ऐवजी रिकोटा चीजचा वापर करता येणे शक्य आहे का?
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
13 Feb 2008 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
अजिबात नाही .....
एक वेळ खवा टाळला तरी एक वेळ चालेल पण त्याऐवजी इतर काही वापरू नका.
13 Feb 2008 - 2:01 pm | मनिष
पुण्यात तुम्हाला कुठे भेटता येईल? मेसेज केलाय!
15 Feb 2008 - 7:33 pm | सुधीर कांदळकर
मातीच्या वाटीसकट खायला तयार आहोत. जर मिळाली तर. आमच्या एका कोकणी मुस्लिम मित्राकडे पण (वाटीशिवाय) खाल्ली होती. त्याची आठवण आली.
आणखी अशाच अनवट पाककृति येऊ द्यात. मजा येईल.
18 Feb 2008 - 5:53 pm | मनिष
मी सुद्धा करून पाहिली - फारच सुरेख झाली होती. मी थोडा (आगाऊपणे) बदल केला - तांदुळाच्या रव्यात ८-१० काजू टाकले आणि वर्खाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या. अफलातुन चव होती! :)
18 Feb 2008 - 7:12 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद मनिष,
मी थोडा (आगाऊपणे) बदल केला - तांदुळाच्या रव्यात ८-१० काजू टाकले आणि वर्खाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या. अफलातुन चव होती! :)
ह्यात आगाऊपणा काय? कुठलीही पाककृती आपल्या आवडीनुसार बदलून करून पाहावी. शक्यतो, पदार्थाच्या चवीचे जे सौंदर्य असते त्याला बिघाड येईल असे करून नये. (तसे केले तरी चालते. पण.....) त्याने त्याचे मुळच्या पाककृतीशी नाते तुटून एक सर्वस्वी नविन पाककॄती जन्म घेते. चांगली झाली तर उत्तमच. नाही झाली तर, 'ती मजा नाही आली...' असे इतरांना वाटते. (वाटेना का!)
काहीतरी वेगळे करून पाहण्याच्या छंदातूनच पाकशास्त्रात प्रगल्भता येत गेलेली आहे.
18 Feb 2008 - 7:53 pm | मनिष
काजू टाकल्याने वेगळिच पण शाही चव आली. :)
8 Dec 2013 - 6:37 am | रुस्तम
मस्त ....
8 Dec 2013 - 11:20 am | प्रभाकर पेठकर
अर्रर्रर्र...! केवढी जुनी पाककृती पुनरुज्जीवित केलीत. धन्यवाद.
8 Dec 2013 - 1:10 pm | रुस्तम
:)
8 Dec 2013 - 11:54 am | नगरीनिरंजन
पाककृती आणि सजावट भलतीच आवडली.
रसिकतेला सलाम तुमच्या._/\_
8 Dec 2013 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद, नागरीनिरंजन साहेब.
8 Dec 2013 - 1:10 pm | रुस्तम
+१
8 Dec 2013 - 1:26 pm | मुक्त विहारि
आणि अर्धांगीला फर्माइश केली.
मस्त लागली हो.
पेठकर काका धन्यवाद...
8 Dec 2013 - 1:57 pm | विजुभाऊ
पेठकर काका तुमच्या पाककृती ऑल्वेज फ्रेश असतात.
झकास
8 Dec 2013 - 3:02 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद मुक्त विहारी आणि विजुभाऊ.
9 Dec 2013 - 5:20 pm | सूड
तांदळाची खीर आमच्याकडे करतात ती नारळ वाटून घालून...अगदीच वेळ असेल हाताशी तर नारळाचं दूध घालतात. पण बहुतेकदा श्राद्धासारख्या प्रसंगीच करतात, सणावाराप्रसंगी नाही.
एरवी लहर आली की करुन खात असतो. आता दूध घालून करुन पाहायला हवी.