माझा संगीत प्रवास

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H
माझा संगीत प्रवास

मी कोणीहि गायक, वादक संगीतकार किंवा कवी इ. काहीही नाही. मला संगीतातील रागदारी इ. काहीही कळत नाही. केवळ संगीत ऐकणे एवढेच करणारा सामान्य माणूस आहे. मुळात मला संगीताची (ऐकायची) आवड कशी निर्माण झाली हे सांगण्याचाही हेतू नाही.

परंतु माझ्या आयुष्यात आलेलं काही प्रसंग आहेत, ज्यांच्याशी काही गाणी निगडित आहेत, त्याबद्दल हे चार शब्द आहेत.

वो भूली दास्तां....

एएफएमसीमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील पहिल्या टर्मला (१९८३) असताना आम्हाला रॅगिंग असे. त्याला तेथे ओरिएन्टेशन म्हणत. यात कोणत्याही मुलाला मारहाण किंवा काही शारीरिक त्रास दिला जात नसे. परंतु सिनियर्सची जर्नल्स लिहिणे, त्यांचे निरोप लेडीज होस्टेलला पोहोचवणे इ. बरीच कंटाळवाणी कामे असत. त्यातून सुटका मिळवण्यासाठी आम्ही वर्ग संपले की मागच्या मागे कुठेतरी बाहेर पळून जाणे यासारखे उपाय करत असू.

तेव्हा पुण्यात भैरोबा नाला रेसकोर्सच्या पुढे हडपसरपर्यंत काहीही वस्ती नव्हती. भैरोबा नाल्याच्या पुढे टपरीपेक्षा मोठी दोन-तीन हॉटेल्स होती. एका दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आम्ही चार जण एएफएमसीमधून मागच्या वाटेने त्यातील एका हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. मुळात सर्व जण भारताच्या वेगवेगळ्या भागांतून पहिल्यांदाच घर सोडून आलो होतो. त्यामुळे सगळेच होमसिक होते. त्यातून आपल्या खोलीवर जाता येत नाही, कारण तेथे गेलो तर कोणी तरी सिनियर आपल्याला काही तरी कामाला लावणार. सगळे आपल्या गणवेशात, केस चमन गोटा केलेले हॉटेलात आलो. सगळे उदास होते. आपण एएफएमसीला का आलो, याचा विचार करीत असलेले. चहा मागवला होता. तेथे रेडिओवर गाणी लागले होते.

बड़े रंगीन ज़माने थे, तराने ही तराने थे
मगर अब पूछता है दिल, वो दिन थे या फ़साने थे
फ़क़त इक याद है बाकी, बस इक फ़रियाद है बाकी
वो खुशियाँ लुट गयी लेकिन, दिल-ए-बरबाद है बाकी
कहाँ थी ज़िन्दगी मेरी, कहाँ पर आ गयी.

आजही हे गाणे ऐकले की मला पुण्याच्या सप्टेंबर महिन्यातील ती उदास दुपार आठवते.

ये मौसम रंगीन समा

एएफएमसीमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील तिसऱ्या टर्मला (१९८४) असताना संध्याकाळी आम्ही तीन-चार मित्र माझ्या खोलीमध्ये गप्पा मारत बसलो होतो. पुणे आकाशवाणीवर तेव्हा फार छान जुनी गाणी लागत असत. तेव्हा माझ्याकडे फिलिप्सचा सुंदर ट्रान्झिस्टर होता. त्याचा आवाज छान बुलंद होता. त्यावर 'जयमाला' हा 'फौजी भाईयोंके लिये' गाण्याचा कार्यक्रम लागला होता. मित्र एकंदर वर्गातील मुली आणि एक वर्ष ज्युनियर मुली याबद्दल गप्पा मारत होतो. तेव्हा हे गाणे लागले -

ये मौसम रंगीन समा ठहर ज़रा ओ जान-ए-जां
तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शरमाना
रुक तो मैं जाऊँ जान-ए-जां मुझको है इनकार कहाँ
तेरा मेरा मेरा तेरा प्यार सनम न बन जाए अफ़साना

माझा रूम पार्टनर सलील सिंह (हा लखनौचा होता) एकदम म्हणाला की "यार कोई लडकी ऐसे बोल दे रुक तो मैं जाऊँ जान-ए-जां मुझको है इनकार कहाँ
तो जिंदगी मी मजा आ जायेगा.

तेथे एकदम शांतता पसरली. एक जण हाय हाय करू लागला आणि ती रम्य सायंकाळ उदास होऊन गेली.

रात ने क्या क्या ख्वाब दिखाये

१९८७मध्ये आमचे एमबीबीएस पूर्ण झाले. आमचा ७५००० रुपयांचा बॉण्ड होता. ते पैसे भरले असते, तर लष्करात भरती होण्याची गरज नव्हती. आमच्या आईने वडिलांच्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून भरू म्हणून मला सांगितले होते.
पण मी लष्करात जायचे ठरवले होते. कारण आईवडिलांच्या आयुष्याची अर्धी कमाई देऊन बाहेर पडावे असे वाटत नव्हते आणि लष्कराबद्दल कुठेतरी आकर्षणही होतेच.

यानंतर आमच्या गुणांवर आम्हाला कोणती सेवा (नौदल, वायुदल की भूदल) हे ठरणार होते आणि त्यानुसार इंटर्नशिपला कुठे पाठवले जाणार होते ते ठरणार होते. एमबीबीएसची परीक्षा पास तर झाली होती. पुढे कुठे जाणार, आयुष्यात काय करणार हे सर्व धूसर होते. अशा स्थितीत मी माझ्या टेप रेकॉर्डरवर गाणी लावून रात्री दोनच्या निरव शांततेत गाणी ऐकत विचार करत बसलो होतो. तेव्हा तलत महमूदचे गाणे लागले -

दिल में दिल का दर्द छुपाये
चलो जहां क़िस्मत ले जाये -
दुनिया परायी लोग पराये
रात ने क्या क्या ख्वाब दिखाये.

इस मोड से जाते है

यथावकाश मला माझ्या गुणवत्तेवर नौदलात प्रवेश मिळाला आणि मुंबईत इंटर्नशिपही झाली. यानंतर आम्हाला नौदलाबद्दल ज्ञान देण्यासाठी गोव्यात वेरेमला असलेल्या नौसेना अकादमी जानेवारी १९८९मध्ये पाठवले. आम्ही एकंदर १२ जण होतो. त्यातील ९ जण तर माझ्या वर्गातीलच होतो. त्यामुळे आम्हाला तेथे एकमेकांशी समन्वय साधणे याला काहीच त्रास झाला नाही. फक्त नौसेना अकादमीमध्ये सकाळी साडेपाचला दिवस सुरू होत असे. त्यात पी टी आणि परेड असे. मग १० वाजता क्लासेस, ज्यात नौदलाचे डावपेच, वेगवेगळ्या जहाजांची, विमानांची, क्षेपणास्त्रांची, पाणबुड्यांची माहिती दिली जात असे.

परत दुपारी तलवार, बंदूक, (एंटरप्राईझ क्लास डिंगी, व्हेलर, कटर) इ. बोटी चालवायचे प्रशिक्षण असे करत करत संध्याकाळी सहापर्यंत पूर्णपणे पिचून जाईल असा अभ्यासक्रम होता. नौसेना अकादमीमध्ये कुठूनही कुठेही चालायला परवानगी नव्हती. धावतच जायचे.

सव्वासहाला परत येऊन आम्ही आंघोळ करत असू आणि त्यानंतर सर्व जण बारमध्ये जात असू. अर्थात बारमध्ये जायलासुद्धा गणवेशच असे. मला जी रूम दिली होती, ती एका सब लेफ्टनंटची होती. तो सुट्टीवर गेला होता. जाताना त्याने आपले सामान आपल्या कपाटात पॅक केले होते. पण त्याचा 'टू इन वन' मात्र तो माझ्यासाठी सोडून गेला होता. त्याच्याकडे आँधी चित्रपटाची कॅसेट होती. एका संध्याकाळी असाच श्रांत अवस्थेत आंघोळ झाल्यावर संध्याकाळचा गणवेश घालून मी ही कॅसेट लावून नौसेना अकादमीच्या मेसच्या खोलीच्या बाल्कनीत उभा होतो. तेव्हा समोर मांडवी नदी समुद्राला मिळते त्या भूशिराकडे पाहत होतो. तेथे चालत असलेल्या बोट क्रूझ इतर मच्छीमार जहाजे पाहत होतो. एकीकडे सूर्य नुकताच मावळलेला होता. त्याचा लालिमा पश्चिमेकडे होता. पूवेकडे पौर्णिमेचा पूर्णचंद्र उगवत होता आणि गाण्याच्या सुरुवातीला लताताईंचा आलाप
आ आ आ आ इतका आर्त स्वर ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

इस मोड़ से जाते हैं -
कुछ सुस्त क़दम रस्ते कुछ तेज़ क़दम राहें -

किशोर : पत्थर की हवेली को शीशे के घरौंदों में
तिनकों के नशेमन तक इस मोड़ से जाते हैं

आजही या गाण्याच्या सुरुवातीचा आलाप ऐकून मला मांडवी नदीवर उगवत्या पूर्णचंद्राची आणि गोव्याच्या दिवसांची आठवण ताजी होते.

सो गयी है सारी मन्ज़िलें

यानंतर लगेच, म्हणजे फेब्रुवारी १९८९मध्ये आम्हाला भूदलाच्या कोर्ससाठी फेब्रुवारीत लखनौला पाठवले. तेथे आमच्या एमबीबीएसच्या वर्गातील वायुसेना आणि भूदलात भरती झालेले वर्गमित्र एक वर्षांनी परत भेटले. बिछडे हुए यार फिर मिल गये.

हा कोर्स २ महिन्यांचा होता. यात आता भूदलाच्या रचनेबद्दल माहिती, डावपेच, शस्त्र, अस्त्र आणि युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये वैद्यकीय व्यवस्थापन आणि तयारी याबद्दलची साद्यंत माहिती दिली जाते. मुळात या कोर्समध्ये १०४पैकी ९५ तर आमचे एमबीबीएसचेच वर्गमित्र आणि मैत्रिणी होते. त्यामुळे हो कोर्स एखाद्या पिकनिकसारखा होता. अर्थात फेब्रुवारीमध्ये लखनौमध्ये भयानक थंडी होती. पहाटे साडेपाचला उठून ७-८ अंश तापमानाला पीटीसाठी जायचे हे फार कर्म कठीण होते. पण आम्ही सर्व आपल्या मोटरसायकल रेल्वेत चढवून घेऊन गेलो होतो. त्यामुळे मैदानापर्यंत जाणे-येणे इ. निदान सोयीचे होते.
संध्याकाळहि रिकामी असे. तेव्हा लोक ७ला बारमध्ये जात आणि रात्री दहापर्यंत जेवण उरकून झोपत असू.

एका शनिवारी रात्री आम्ही पंधरा-सोळा जण लखनौ शहरात 'तेजाब' हा नवीन आलेला सिनेमा पाहायला गेलो. साडेनऊला सुरू झालेला हा सिनेमा रात्री साडेबारा-एक वाजता संपला. तो संपल्यावर गप्पा मारत मारत निघून रस्त्यावर मोटरसायकल चालवत आम्ही तेजाबमधील गाणे गात चालवत होतो. पंधरा-सोळा तरुण लष्करी अधिकारी असल्याने चोरांची किंवा पोलिसांची अजिबात भीती नव्हतीच.

रात आई तो वो जिनके घर थे
वो घर को गये सो गये
रात आई तो हम जैसे आवारा
फिर निकले राहों में आ खो गये

इस गली उस गली इस नगर उस नगर
जायें भी तो कहाँ जाना चाहें अगर
ओ सो गयी है सारी मन्ज़िलें
ओ सारी मन्ज़िलें सो गया है रस्ता
सो गया ये जहां सो गया आसमान

वो जब याद आये बहोत याद आये

पुढे १९९१ साली एमडीला प्रवेश मिळाला. तसा परत पुण्याला आलो. यथावकाश माझे लग्न ठरले. (१९९२ जुलै). तिचे माहेर पनवेलला होते. मग आमचा साखरपुडा झाला. यानंतर आम्ही एकदा-दोनदा भेटलो. तेव्हा झालेल्या चर्चेत आमच्या गाण्याच्या आवडी जुळल्या, म्हणून तिने मला काही कॅसेट्स दिल्या. माझ्याकडे तेव्हा फिलिप्सची २००० वॉटची म्युझिक सिस्टिम होती. मला बराकीत १५ x १२ची एक खोली आणि मागे अटॅच्ड बाथरूम असे होते. मी तिला एसटीडी बूथवरून एक दिवस आड तरी फोन करत असे. तेव्हा रात्री १०नंतर पुणे ते मुंबई ३६ सेकंदाला एक रुपया असा एक चतुर्थांश दर असे. मी अर्धा तास बोलत असे आणि ५० रुपये झाले की थांबत असे. तेव्हा माझा पगार रुपये ६४००/- महिना होता आणि पेट्रोल साधारण १७-१८ रुपये होते. तरी आमच्या साखरपुडा आणि लग्न यात २ महिन्यांचेच अंतर होते. असा फोन करून परत आलो की उदास होत असे. जसे जसे दिवस जाऊ लागले, तसे तसे मन जास्तीत जास्त उदास होऊ लागले. एकदा असेच उदास होऊन रूममध्ये येऊन तिने दिलेली कॅसेट लावली. त्यात गाणे वाजू लागले -

आहटें जाग उठीं रास्ते हंस दिये
थामकर दिल उठे हम किसी के लिये
कई बार ऐसा भी धोखा हुआ है
चले आ रहे हैं वो नज़रें झुकाए
वो जब याद आए बहुत याद आए
ग़म-ए-ज़िंदगी के अंधेरे में हमने
चिराग-ए-मुहब्बत जलाए बुझाए

आज हे गाणे लागले की मला त्या सोलापूर रोडवरच्या बराकीतील ब्रह्मचार्‍याच्या मठीचीच आठवण होते.

मलमली तारुण्य माझे

ऑक्टोबर १९९२मध्ये आमचे लग्न झाले. मधुचंद्र आटपून आम्ही पुण्यात परत आलो. पुण्यात मला १० दिवसांनी सरकारी घर मिळाले २ बेडरूमचे. माझे कामाचे तास सकाळी ८ ते २ होते. न्याहारी करून जायचे आणि जेवणाला परत यायचे. मध्ये सुटी नाही. घरी आल्यावर मी रिकामा असे. आम्ही दुपारी झोपून संध्याकाळी तयार होऊन रोज कुठेतरी फिरायला जात होतो. बाहेर खाऊन पिऊन परत यायचे किंवा घरी परत येऊन जेवायचे. दोघेच असल्याने कोणत्याच गोष्टीचा ताणतणाव नव्हताच. बायको लहानपणी बर्‍यापैकी गाणे शिकली होती. एकदा आम्ही सारसबागेत फिरायला जाऊन परत आलो. तिने छानपैकी निळी साडी, त्यावर मॅचिंग कानातले-गळ्यातले असे घातले होते. परत आल्यावर मी तिला आग्रह केला की तू मला गाणे म्हणून दाखव. मग तिच्या मांडीवर डोके ठेवून मी आडवा झालो. तिने आपले लांब केस मोकळे ठेवून माझ्यासाठी गाणे म्हटले -

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !
मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे !
लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे

नाम गुम जायेगा

पुढे विशाखापटणम येथे तटरक्षक दलाच्या वज्र या जहाजावर आमचे पोस्टिंग झाले होते. मी तेव्हा जहाजावरून दक्षिण अंदमानच्या समुद्रात गस्तीवर होतो. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही निकोबारच्या पूर्वेला आलो आणि इंदिरा पॉइंटच्या दक्षिण-पूर्वेस गस्त घालत होतो. तेथून इंडोनेशिया फक्त ८० मैलावर होता. सूर्यास्त झालेला होता. आकाशात एक काळोखी भरून राहिली होती. वातावरण उदास होते. दोन दिवसांपासून काहीच करायला नव्हते. जहाजाच्या मागच्या बाजूस मी एकटाच उभा होतो. कुटुंबापासून दूर आल्याला दोनच दिवस झाले होते. आपल्या माणसांची आठवण सुरुवातीच्या काळात जास्त प्रकर्षाने होते. जसे दिवस जातात तसे मनसुद्धा स्वतःची समजूत घालते. आंतरराष्ट्रीय समुद्राच्या हद्दीत आम्ही गस्त घालत होतो. चहूकडे शांतता पसरलेली. समुद्रही शांत होता. अशा उदास वेळेस मी आपला वॉकमन आणला, त्यात टेप टाकली आणि चालू केला. लतादीदींच्या अत्यंत आर्त आवाजात गाणे सुरू झाले -

नाम गुम जायेगा
चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पहचान है

माझ्या अंगावर काटा आला. अशा कातरवेळेस जेव्हा मी पूर्ण एकटा होतो, तेव्हा लतादीदींचा आवाज किती आश्वासक वाटत होता. आपण भारतातच आहोत आणि त्या आपल्या पाठीवर थोपटत आहेत असाच भास झाला. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या बाईंचे आमच्यासारख्या कितीतरी एकाकी लोकांवर किती मोठे उपकार आहेत!

तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा

पुढे गोव्यात पोस्टिंग असताना माझ्या पत्नीला करियरमध्ये काहीच संधी नाही, म्हणून मी नौदलातून राजीनामा द्यायचा ठरवला. तीन वेळेला राजीनामा देऊनही मला सोडण्यास त्यांनी नकार दिला. या सगळ्या प्रक्रियेत अडीच वर्षे गेली. शेवटी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात भारतीय संघराज्य, संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौसेना यांच्याविरुद्ध रिट अर्ज दाखल केला. तो अर्ज दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने नौसेनाध्यक्ष यांना नोटिस जारी केली. त्यामुळे गोव्यापासून दिल्लीपर्यंत आग लागली आणि एकदम सगळी प्रणाली (system) माझ्या विरोधात गेली. लोकांनी मला प्रकरण न्यायालयात नेल्याबद्दल दूषणे दिली, माझ्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली गेली, मी टाकलेले सगळे क्लेम परत तपासून पाहिले गेले. मला लालूच दाखवली गेली आणि धमक्याही देऊन झाल्या. मी कशालाच बधलो नाही. त्यातून उच्च न्यायालयाने सुरुवातीपासून माझ्या बाजूने कल दाखवला होता. त्यामुळे संरक्षण मंत्रालयात आणि नौसेना मुख्यालयात बऱ्याच लोकांचा इगो दुखावला गेला होता. शपथपत्रात त्यांनी मला अनेक दूषणे दिली होती. मला भरपूर पैसे कमवायला देशाबाहेर जायचे आहे, नौदलाने त्याला प्रशिक्षण दिले असताना असे करणे म्हणजे देशद्रोह आहे इ. गोष्टी त्यात लिहिल्या होत्या. उच्च न्यायालयाने त्यांना एवढेच विचारले की त्याचा बॉण्ड आहे का? मी सांगितले, मी बॉण्ड तीन वर्षांपूर्वीच पूर्ण केला आहे.
उच्च न्यायालयाने विचारले, मग तुम्ही त्याला का जखडून ठेवले आहे? यावर काही उत्तर नाही.
त्यांनी उच्च न्यायालयात हर प्रकारे तारखा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उच्च न्यायालय त्यांना बधत नव्हते. तारीख मागितली की एक आठवड्यानंतरची सोमवारची तारीख देत असत. तारीख पे तारीख करण्याच्या प्रयत्नात अशा आठ तारखा झाल्या. परत तारीख मागितली तर नववी तारीख दोन दिवसांनंतरची बुधवारची दिली आणि बुधवारची तारीख शेवटची म्हणून सांगितले होते.

मी वास्कोहून स्वतःच्या मारुती कारने पणजीला न्यायालयात जात असे.
तेंव्हा कारमध्ये स्टिरिओ लावला, त्यात गाणे लागले.

तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा
तेरे सामने मेरा हाल है
तेरी इक निगाह की बात है
मेरी ज़िंदगी का सवाल है!

माझी स्थिती अशीच होती. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

आज जर निकाल बाजूने लागला तर ठीक आहे. अन्यथा भारताच्या कोणत्यातरी कोपऱ्यात आपले पोस्टिंग होईल आणि एक उदाहरण म्हणून इतर अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मला त्रास दिला जाईल.
शिवाय तुम्ही हरलात तर ज्यांची लढाई करायची हिम्मत नसते असे टिनपाट लोकही तुम्हाला हिणवून दाखवतात.

अकरा वाजता खटला उभा राहिला. सरकारी वकिलाने परत तारीख मागितली. यावर न्यायमूर्तीनी त्याला दुपारपर्यंतचा वेळ दिला. दुपारी जेवल्यानंतर परत खटला उभा राहिला. सरकारी वकिलांनी शपथपत्रात म्हटल्याप्रमाणे सव्वादोन तास माझ्यावर हर तर्‍हेचे आरोप केले. दोन्ही न्यायमूर्तीनी त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. जेव्हा सरकारी वकिलांचे म्हणणे संपले, तेव्हा दोन्ही न्यायाधीश उठले आणि आपल्या चेंबरमध्ये निघाले. आमच्या वकिलांनी त्यांना विचारले, "माय लॉर्ड, खटल्याच्या निकालाबद्दल काय?" त्यांनी "रिट अर्ज संपूर्णपणे मंजूर केला आहे आणि आम्ही सरकारला सर्जन कमांडर सुबोध खरे यांना नौदलाच्या नोकरीतून मुक्त करण्याचा हुकूम (writ of mandamus) देत आहोत" असे जाहीर केले.

माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी न्यायमूर्ती गेल्यावर कोर्ट रूमबाहेर आलो. माझ्या वकिलांनी माझे अभिनंदन केले आणि माझा बांध फुटला. मी अक्षरशः हमसून हमसून रडू लागलो. माझे वकील (तेव्हाचे अ‍ॅडव्होकेट जनरल) ए.एन.एस. नाडकर्णी यांनी मला जवळ घेतले आणि "डॉक्टर, असं काय करताय?" म्हणून समजूत काढली. त्यांना काय सांगणार की तीन वर्षे कशा अत्यंत मानसिक तणावात काढली होती. सिस्टिमशी युद्ध केल्याबद्दल फालतू लोकांकडून ऐकून घेतले होते. आणि वर हरलो असतो तर आयुष्यभर फालतू लोकांकडून ऐकून घ्यावे लागले असते.

तेरी इक निगाह की बात है
मेरी ज़िंदगी का सवाल है!
हे लोकांना कसे समजावणार होतो?

यावर भारतीय संघराज्य आणि संरक्षण मंत्रालय सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे खटला अडीच वर्षे चालला. त्यांनी बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी केल्या. उच्च न्यायालयाने वरच्या कोर्टात अपील करण्याची परवानगी नाकारली असताना सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज (special leave petition) केला. हा ९० दिवसांत करावा लागतो, पण हा मला गाफील ठेवण्यासाठी २१० दिवसांनी केला आणि ही दिरंगाई न्यायालयाकडून माफ करून घेतली. रिट अर्जाचे रूपांतर सिव्हिल सूटमध्ये केले, म्हणजे खटला आणखी रेंगाळला.

परंतु तोवर मी battle hardened soldier झालो होतो. यथावकाश मला सर्वोच्च न्यायालयातून सुटका मिळाली आणि आता मी मुंबईत स्थायिक झालो. पैसे मिळवले. मोठी म्युझिक सिस्टिम घेतली.

आजही अशी गाणी ऐकली की आयुष्याच्या त्या त्या टप्प्याच्या आठवणी ताज्या होतात.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

6 Nov 2018 - 12:42 pm | विजुभाऊ

वा क्या बात है. तुमचा सांगीतीक प्रवास बरेच काही सांगून जातो.
आजही एखादे गाणे ऐकले की ते ज्यावेळेस प्रथम ऐकले होते तो प्रसंग पुन्हा जगायला होते

वरुण मोहिते's picture

6 Nov 2018 - 4:15 pm | वरुण मोहिते

तंतोतंत. काही गाण्यांसोबत भावना असतात नेहमी.

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 5:27 pm | सुधीर कांदळकर

पण मी लष्करात जायचे ठरवले होते. कारण आईवडिलांच्या आयुष्याची अर्धी कमाई देऊन बाहेर पडावे असे वाटत नव्हते आणि लष्कराबद्दल कुठेतरी आकर्षणही होतेच.

हे फारच आवडले.

लोकांनी मला प्रकरण न्यायालयात नेल्याबद्दल दूषणे दिली, माझ्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली गेली, मी टाकलेले सगळे क्लेम परत तपासून पाहिले गेले. मला लालूच दाखवली गेली आणि धमक्याही देऊन झाल्या. मी कशालाच बधलो नाही.

हॅट्स ऑफ्फ आणि एक कडक सॅल्यूट. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 5:33 pm | तुषार काळभोर

काही गाणी आयुष्यभर साथ देतात.

सिरुसेरि's picture

6 Nov 2018 - 5:49 pm | सिरुसेरि

त्रासदायक अनुभव . आपल्या खंबीरपणा मुळेच या त्रासातुन बाहेर पडलात .

चौकटराजा's picture

6 Nov 2018 - 7:47 pm | चौकटराजा

आपण काय .. पयल्या पासून तुमचे फ्यान आहोत . हे लेखन मस्त जमले आहे .आपला लढाउपणा इथे अनुभवत असतोच मात्र आप॑ण तिथे दिलेला लढा ! ग्रेट !हनिमून मधे .. बहोत शुक्रिया... बडी मेहरबाबी ,,,, मेरी जिन्दगीमे हुजूर आप आये .... असे गाणे मग गायलात की नाही ?

अभ्या..'s picture

6 Nov 2018 - 8:42 pm | अभ्या..

मस्तच हो डॉक्टर साहेब,
एकच लंबर छंद.
समरसून जगताहेत लाईफ, हौर क्या होना?

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 9:35 pm | टर्मीनेटर

बडे अच्छे लगते है...
येह धरती...येह नदिया...
येह रैना ... और .....
आपके लेख.... _/\_

मूकवाचक's picture

29 Nov 2018 - 9:35 am | मूकवाचक

+१

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 9:20 am | यशोधरा

छान लिहिले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2018 - 9:49 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत आणि त्यांतील प्रसंगांना चपखल बसणारी सुंदर गाणी !

तुमच्या लढ्याच्या प्रसंगांचे उडत उडत उल्लेख अगोदर वाचलेले आहेत. आता हा "जसे झाले तसे" शैलीतला एकत्रित लेखाजोखा वाचून तुमच्याबद्दलचा आदर अजून दुणावला आहे !

सिस्टिमशी युद्ध केल्याबद्दल फालतू लोकांकडून ऐकून घेतले होते. आणि वर हरलो असतो तर आयुष्यभर फालतू लोकांकडून ऐकून घ्यावे लागले असते.

'सिस्टिम'ला शरण जाऊन रोज मरण्याचे जीवन जगत असणार्‍यांना, सिस्टिमशी दोन हात करणार्‍याबद्दल प्रचंड असूया असते. त्या असूयेचे रुपांतर चेष्टेत आणि विखारी टीकेत करून ते आपला नपुंसक राग व असूया शमवण्यासाठी करत असतात... कळत, नकळत.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 4:19 pm | मुक्त विहारि

सिस्टीमशी लढायला स्वतःचे धैर्य आणि घरच्यांचा (मानसिक आणि वेळ प्रसंगी आर्थिक) पाठिंबा हवाच.

(मामू इंजिनियर) मुवि

खटपट्या's picture

7 Nov 2018 - 8:12 pm | खटपट्या

खूप मस्त लेख डॉक्टर !!

मित्रहो's picture

9 Nov 2018 - 3:21 pm | मित्रहो

छान गाणी आणि त्या गाण्याच्या अनुषंगाने असनाऱ्या आठवणी आणि त्यातून उलगडनारा आयुष्याचा प्रवास. सारेच मस्त जमून आले.
तुमच्या लढयाला सलाम.

दुर्गविहारी's picture

9 Nov 2018 - 9:40 pm | दुर्गविहारी

कित्येक गाणी आणि काही प्रसंग यांचे अद्वैत होऊन एक स्वरचित्र कायमचे मनाच्या कप्प्यात लक्षात रहाते. तुम्ही दिलेल्या प्रसंगासारखुच उदाहरणे बहुतेकांच्या आयुष्यात असतील, पण तुम्ही त्यांना शब्दबद्ध केल्याबद्दल धन्यवाद.

व्वा, क्या बात हैं I

काही गाण्यांशी काही आठवणी जोडलेल्या असतात हे अगदी खरे !

तुमच्या त्या लढ्याबद्दल एकदा डिटेलवार लिहाच.

सुबोध खरे's picture

16 Nov 2018 - 9:33 am | सुबोध खरे

तुमच्या त्या लढ्याबद्दल एकदा डिटेलवार लिहाच.
ते लिहायचं आहेच कारण निवृत्तिवेतन आणि संतोष फंड (ग्रॅच्युइटी) सोडून केवळ स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारा लष्करात तरी मी आजवर एकटाच आहे.
पण लोकांना किती आवडेल हि शंकाच आहे.
"स्वतः सुखाय" म्हणून लिहीन असे म्हणतो आहे.

फेरफटका's picture

17 Nov 2018 - 2:04 am | फेरफटका

सुबोध जी, सैन्याबाबतीत सिव्हिलिअयन्स ना एक आधार, आदर, कौतुक ई. असतं. बरेच वेळा हे त्या जीवनाविषयी ऐकीव, वाचीव माहितीतून तयार होणार्या आकर्षणापायी असतं. त्यामुळे सैन्याविषयी त्याग, शौर्य, पराक्रम वगैरे गाथा नसल्यास आणी त्याहीपेक्षा, प्रतिकुल काही असल्यास, सहसा ते क्रिटीसाईझ केलं जातं.

परंतू, तुमच्या लिखाणामुळे, तुमची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे सैन्यविषयक कटु अनुभव जरी मांडले, तरी ते इथे well-received च असतील अशी खात्री वाटते.

लई भारी's picture

21 Nov 2018 - 11:04 am | लई भारी

हेच म्हणतो!

सुबोध खरे's picture

23 Nov 2018 - 8:22 pm | सुबोध खरे

कटू अनुभव सैन्य या संस्थेबद्दल नसून ती चालवणाऱ्या माणसांबद्दल आहेत. हि माणसे बाहेर असतात तशीच स्वार्थी, हेवेदावे असणारी, नियमाना आपल्या सोयीप्रमाणे वाकवणारी, अकार्यक्षम असली तरी सरकारी नोकरीत असल्याने कालानुरूप बढती मिळत गेल्याने वरिष्ठ झालेली अशी होती.त्यांच्याबद्दल आलेले अनेक कडू गोड अनुभव आहेत.
सैन्य हि संस्था जर सर्वच "चांगल्या माणसांनी" चालवली तर ती नक्कीच भारतातील सर्वात उत्तम संस्था/ प्रणाली म्हणून मानता येईल असे आजही ( निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यावर) मला वाटते. आजही ती भारतातील सरकारी खात्यात पहिल्या १० मध्ये नक्कीच गणता येईल अशी आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सैन्यात कोणत्याही खाजगी किंवा नागरी सेवेपेक्षा जास्त लोकशाही आहे. म्हणूनच मी एका वरिष्ठाला तुम्ही माझ्या १२ वर्षे अगोदर जन्माला आलात म्हणून जास्त अनुभव आहे यापेक्षा तुमचे कर्तृत्व काय? असे तोंडावर विचारू शकलो.( अशा तर्हेच्या सडेतोड गोष्टी मी नौदल प्रमुखांशी पण करू शकलो).
असो.

चांगला आहे लेख. 'रात ने क्या क्या ख्वाब दिखाये' खेरीज इतर सगळी गाणी माहित आहेत.

===
> पण लोकांना किती आवडेल हि शंकाच आहे.
"स्वतः सुखाय" म्हणून लिहीन असे म्हणतो आहे. > वेगळा लेख येऊद्यात. तुमचे स्वान्त सुखाय होऊन जाईल आणि लोकांची प्रतिक्रिया बघणेदेखील रोचक असेल ;)

अतिशय सुंदर लेख. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक वळणावर अशी गाणी साथ देतात. आपला प्रवास आवडला . मी आपला fan आहेच .

चित्रगुप्त's picture

10 Nov 2018 - 12:34 pm | चित्रगुप्त

गाणी आपण सगळेच ऐकत असतो, पण एकेका गाण्याशी निगडित आठवणी वाचायला खूपच छान वाटले.

आयुष्यात अशा पद्धतीने गाणी हि जीवनगाणी व्हावीत ! भारी .....

स्वाती दिनेश's picture

13 Nov 2018 - 2:02 pm | स्वाती दिनेश

गाणी आणि त्यांना जोडल्या गेलेल्या आठवणींची साखळी आवडली.
स्वाती

चांदणे संदीप's picture

13 Nov 2018 - 3:13 pm | चांदणे संदीप

खरेसर, सर्वात आधी तुमच्या लढाऊ बाण्याला सलाम!
तुमचा याआधीचा तलतवरील एक प्रतिसाद प्रचंड आवडला होता. हा लेखही तितकाच आवडला.

काही गाणी, प्रसंग, कथा, वाक्य हे तुम्हांला अनामिक ऊर्मि देतात. तो क्षण निभावून नेण्यास मदत करतात. सुरेख लेखन.

धन्यवाद!

Sandy

श्वेता२४'s picture

13 Nov 2018 - 3:36 pm | श्वेता२४

पुढे गोव्यात पोस्टिंग असताना माझ्या पत्नीला करियरमध्ये काहीच संधी नाही, म्हणून मी नौदलातून राजीनामा द्यायचा ठरवला/code>
या गोष्टीसाठी तुम्ही एवढी मोठी लढाई लढलात याबद्दल खरच तुम्हाला मानलं पाहिजे. तुमच अजवरच अभ्यासपुर्ण लेखन वाचलं आहेच पण हे वाचून अपल्याबद्दलचा आदर अधिकच वाढला

देशपांडेमामा's picture

13 Nov 2018 - 4:20 pm | देशपांडेमामा

खरय ! काही गाणी नॉस्टॅल्जिक करतात ...त्या काळात आणि आठवणीं मध्ये घेऊन जातात

गाणी आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी ..छान जमलाय लेख!

देश

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गाण्यांनी जणू लँडमार्कच रोवून ठेवलेले असतात, त्यांच्या आठवणी सुरेखच!

शेवटची सिस्टिमविरुद्धच्या लढ्याची आठवण अंतर्मूख करून गेली. असा लढा निकराने देणे वाचायला वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही याची जाणीव आहे. तरीही तुम्ही ठाम राहून विजय मिळवलात हे प्रेरणादायी आहे.

नाखु's picture

13 Nov 2018 - 7:52 pm | नाखु

एक कडक लेख

स्वगत: या फणसांने मुद्दाम (सडेतोडपणाचे आणि सतत पंगा घ्यायचे काटे) लावले तरी आतले जिंदादिली चे अवीट गोड गरे अगदी "खरे"आहेत.

वाचकांचीही पत्रेवाला नाखु

सुबोध खरे's picture

16 Nov 2018 - 9:35 am | सुबोध खरे

फणस खूप पिकल्याशिवाय त्यात गोडवा येत नाही हेच खरे -पु ल

सुबोध खरे's picture

16 Nov 2018 - 9:34 am | सुबोध खरे

सर्वाना धन्यवाद __/\__

वनफॉरटॅन's picture

16 Nov 2018 - 10:46 pm | वनफॉरटॅन

अत्यंत सुंदर लेख. तुम्ही हाडाचे 'सैनिक' आहात. शिवाय प्रत्येक गाण्याचं स्थान हे अत्यंत चपखल कसं आहे ह्याचं वर्णन फार मला फार भावलं. अतिशय दर्जेदार, साठवणीत ठेवण्यासारखा लेख. 'शिष्टम'बरोबर तुम्ही चिकाटीने दिलेला लढा हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. तुमचे असेच, संगीताबाबतचे लिखाण वाचायला अतिशय आवडेल.

कानडाऊ योगेशु's picture

19 Nov 2018 - 1:16 pm | कानडाऊ योगेशु

लेख आवडला. व तुमच्या लढ्याबद्दलही सलाम. परंतु आतापर्यंतच्या तुमच्या ज्या ज्या लेखात वा प्रतिक्रियेत नौदलाचा उल्लेख आला आहे तिथे तुम्ही नेहेमी तो आदरपूर्वकच केला आहे. ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला नौदलाकडुन आलेला असा अनुभव काहीसा धक्कादायक आहे. मला वाटते एरवी गावपातळीवर सरकारी सिस्टीमच्या विरोधात जाताना जशी पातळी सोडली जाते तशी पातळी नौदलाकडुन सोडली गेली नसावी.

पद्मावति's picture

19 Nov 2018 - 7:37 pm | पद्मावति

सुंदर लेख.

नूतन's picture

20 Nov 2018 - 4:03 pm | नूतन

वाचताना रंगून जायला झालं.

रणजित चितळे's picture

30 Nov 2018 - 10:47 am | रणजित चितळे

उत्तम . ही सगळी गाणी माझ्या आवडीची. हजार वेळा ऐकली तरी मन भरत नाही

आपण नेव्ही मध्ये आहे हे लेख वाचल्यावर कळले. माझ्या मुलाने नुकतेच नेव्ही बारावी नंतर
जॉईन केले.

लढ्याचा लेख वेगळा हवा होता.
पंधरा वर्षांत शॅार्ट कमिशन घेऊन दल सोडता येतं. म्हणजे खूप काळ जावा लागला असतात.

निनाद आचार्य's picture

4 Dec 2018 - 2:14 pm | निनाद आचार्य

जुनी गाणी खूप अर्थपूर्ण आहेत. मजा आली वाचून.
मला तुमचे आधीचेहि लेख खूप आवडले. आता लढ्याबद्दल लिहा एकदा.

मीअपर्णा's picture

6 Dec 2018 - 5:25 am | मीअपर्णा

क्या बात है! सुंदर आठवणी मांडल्यात.

जिन्क्स's picture

12 Dec 2018 - 8:03 pm | जिन्क्स

बाकी लेख आवडला. पण,

पुढे गोव्यात पोस्टिंग असताना माझ्या पत्नीला करियरमध्ये काहीच संधी नाही, म्हणून मी नौदलातून राजीनामा द्यायचा ठरवला.

पत्नीला करीयर मध्ये संधी नाही म्हणून तुम्ही नौदला मधून राजीनामा दिला? की इतर ही काही करणं होती? इतरकाही पर्याय नव्हता का? जसे की तुमचं पोस्टिंग अशा ठिकाणी जिथे पत्नीला करियर मध्ये संधी असेल? नौदलाच्या बाजूने विचार केला तर ते प्रत्येक cadet हा त्यांचा resource असतो आणि त्या resource वर त्यांनी भरपूर गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे ते कसे ही करून तुम्हाला सोडून जाण्यापासून परावृत्त केले तर चुकीचे काय केले? अशा केसेस मुळे इतर ही लोकांचाही मोराल डाउन होतो आणि चुकीचा पायंडा पडण्याची भीती पण असते.

सौन्दर्य's picture

13 Aug 2021 - 11:26 pm | सौन्दर्य

जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी आठवलेली गाणी मन हलकं करायला खूप मदत करतात. आपल्याला नेमकं जे म्हणायचे आहे तेच त्या गाण्यात एकवटलेले असते म्हणून मग अशी गाणी भावतात व आपल्या आयुष्याचा एक हिस्सा बनून राहतात.

अतिशय छान लेख. एकदम आवडला.