राँग वे पायलट

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

राँग वे पायलट

१७ जुलै १९३८ - पहाटे सव्वापाचला एक मोनोप्लेन न्यू यॉर्कच्या फ्लॉइड बेनेट फील्ड विमानतळावरून आकाशात झेपावले. या विमानाचा वैमानिक व एकमेव प्रवासी होता डग्लस कॉरिगन. तब्बल २८ तास अन १३ मिनिटांच्या विनाथांबा प्रवासानंतर ते विमान एका विमानतळावर उतरले. विमानाच्या बाहेर पडल्यावर भोवताली जमलेल्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून डग्लस म्हणाला, "आय ऍम डग्लस कॉरिगॉन. जस्ट गॉट इन फ्रॉम न्यू यॉर्क. व्हेअर ऍम आय? आय इंटेंडेड टू फ्लाय टू कॅलिफोर्निया."

आश्चर्याचा धक्का बसलेल्या विमानतळ कर्मचाऱ्यांकडून त्याला कळले की तो आयर्लंडची राजधानी डब्लिनच्या बाल्डोनेल विमानतळावर पोहोचला आहे. डग्लसच्या म्हणण्यानुसार त्याच्या विमानातल्या जुनाट कंपासच्या बिघाडामुळे त्याची दिशा पूर्णपणे चुकली अन तो पश्चिमेऐवजी पूर्वेकडे उड्डाण करत राहिला. हा विचित्र प्रकार जाणून घेतल्यावर कुणालाही वाटेल की डग्लसच्या कौशल्याबरोबरच त्याचे नशीबही थोर होते की तो अटलांटिक महासागर ओलांडून कुठल्याही अपघाताविना सुस्वरूप एखाद्या विमानतळावर पोहोचू शकला. परंतु डग्लसच्या या बहाणेबाजीवर त्या विमानवहन क्षेत्रातली मंडळी तसेच संबंधित अधिकारी अजिबात विश्वास ठेवत नव्हते.


आयर्लंडमध्ये पोहोचल्यावर विमानातून उतरताना - डग्लस कॉरिगन

याला कारण होते डग्लसचा पूर्वेतिहास. १९०७ साली टेक्ससमध्ये जन्मलेला आयरिश वंशाचा डगल्स फारसा महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखला जात नव्हता. शालेय शिक्षण अर्धवट सोडल्यावर तो कॅलिफोर्नियात बांधकाम क्षेत्रात काम करू लागला. १९२५ साली त्याने हौशी लोकांना छोट्या विमानातून फेरी मारण्यासाठी पैसे देताना पाहिले होते. स्वतःची उत्कंठा शमवण्यासाठी त्यानेही अडीच डॉलर्स खर्च करून त्यानेही अशा हवाई फेरीचा अनुभव घेतला. या विमान प्रवासाने प्रभावित होऊन त्याने स्वतः वैमानिक प्रशिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. उर्वरित वेळेत तो स्थानिक विमान मेकॅनिक्सना काम करताना पाहत असे. त्यांच्याकडून तो विमानाचे बारकावे शिकू लागला. उड्डाणाचे सुमारे २० धडे घेऊन झाल्यावर २५ मार्च १९२६ रोजी त्याने प्रथमच एकट्याने विमान चालवले.

डग्लस ज्या विमानतळावर विमान चालवायला शिकत होता, तिथे 'रायन एरॉनॉटिकल कंपनी' कार्यरत होती. त्यांनी डग्लसला नोकरी देऊ केली. अन डग्लसने नोकरी स्वीकारल्यावर त्यांच्या सॅन डिएगो येथील फॅक्टरीत त्याला कामावर पाठवण्यात आले. येथे त्याला एक मोठी संधी मिळाली. ती म्हणजे चार्ल्स लिंडबर्ग यांच्या स्पिरिट ऑफ सेंट लुईस या विमानाचा मेकॅनिक म्हणून काम करायला मिळणे. डग्लसने या विमानाचे पंख अन इंधनाच्या टाक्या, तसेच कॉकपिटमधले इंस्ट्रुमेंट पॅनेल बसवले. डग्लस व त्याचा सहकारी डॅन बर्नेट यांनी मिळून विमानाच्या पंखांची लांबी १० फुटांनी वाढवली. याने विमानाच्या एअर लिफ्ट क्षमतेत वाढ झाली. डिझाइनमधला हा बदल रायन कंपनीच्या विमानावर प्रथमच करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर स्पिरिट ऑफ सेंट लुईस आपल्या (न्यू यॉर्क ते पॅरिस) ऐतिहासिक उड्डाणासाठी सॅन डिएगोतून निघताना त्याचे चोक्स डग्लसने काढले होते (चोक्स - विमान उड्डाणासाठी तयार झाल्यावर त्याच्या चाकांना अडवून ठेवणारे अडथळे).


सॅन डिएगोतून न्यू यॉर्क साठी निघण्यापूर्वी चार्ल्स लिंडबर्ग स्थानिक अधिकार्‍यांशी चर्चा करताना

स्पिरिट ऑफ सेंट लुईसच्या न्यू यॉर्क ते पॅरिस यशस्वी उड्डाणानंतर डग्लस चांगलाच प्रभावित झाला. त्याने अशाच प्रकारची कामगिरी पार पाडण्याचा मनसुबा बनवला व आयर्लंड येथे जायचे ठरवले. त्याने आपल्या मित्रांना हा विचार बोलून दाखवला. १९२८ साली रायन कंपनीने आपले बस्तान सेंट लुईस इथे हलवले. डग्लस मात्र सॅन डिएगोलाच थांबला अन एका विमान प्रशिक्षण अकादमीत काम करू लागला. इथे सुमारे ५० विद्यार्थी उड्डाण करीत असत. त्यामुळे डग्लसला फक्त जेवणाच्या सुट्टीत सराव करायला मिळत असे. या कमी वेळेतदेखील तो उड्डाण केल्यावर कसरती करत असे.

डग्लसच्या कसरतींचे प्रकरण लवकरच कंपनीच्या लक्षात आले. कंपनीचे विमान कसरतींसाठी वापरण्यास त्याला मनाई केली गेली. यावर तोडगा म्हणून डग्लस लांबवरच्या शेतात जाऊन आपल्या कसरती करू लागला. अशाच प्रकारे त्याने अनेक ठिकाणी विमानांचे मेकॅनिक काम केले. अन आपल्या कंपन्यांची विमाने चालवून त्याने आपले कौशल्य वाढवले. १९२९ साली त्याला ट्रान्स्पोर्ट पायलटचा परवाना मिळाला. १९३० त्याने पूर्व किनार्‍यावर जाऊन आपल्या मित्रासह व्यवसाय सुरू केला. यात त्यांनी छोट्या गावांमधून विमान प्रवास सुरू केला. या व्यवसायात चांगले यश आले. काही वर्षे पूर्व किनार्‍यावर राहून तो परत पश्चिम किनार्‍यावर परतला. १९३३ साली त्याने $३१० खर्च करून एक जुने कर्टिस रॉबिन ओएक्स-५ प्रकारातील मोनोप्लेन खरेदी केले. हे विमान त्याने स्वतः चालवून घरी आणले. परत एक विमान मेकॅनिकची नोकरी त्याने धरली अन आपल्या मोहिमेसाठी विकत आणलेल्या विमानात सुधारणा करू लागला.


डग्लस स्वतःच्या विमानाबरोबर
त्याने व्हराईट व्हर्लविंड जे६-५ जातीची दोन इंजीन्स वापरून १६५ अश्वशक्तीचे एक नवे इंजीन तयार केले. तसेच काही जास्तीच्या इंधनाच्या टाक्याही जोडल्या. यानंतर त्याने ब्युरो ऑफ एअर कॉमर्सला आपल्या मोहिमेसाठी परवानगीचा अर्ज पाठवला. यात त्याने नमूद केले होते की त्याला न्यू यॉर्क ते आयर्लंड विनाथांबा विमान चालवायचे आहे. त्या वेळी त्याला असे करायला परवानगी नाकारली गेली. कारण त्याचे विमान इतक्या लांबच्या पल्ल्यासाठी पुरेसे सुस्थितीत नव्हते. परंतु त्याला देशांतर्गत उडायला परवानगी मिळाली. ही घटना होती १९३५ सालातली. कच न खाता डग्लसने पुढील २ वर्षांत आपल्या विमानात बरेच बदल केले. या काळात होणार्‍या कडक निर्बंधामध्येही त्याने अनेकदा परवानगीचे अर्ज केले. मात्र प्रत्येक वेळी त्याच्या हाती निराशाच आली. १९३७ साली मध्ये विमान वाहतुकीचे नियम इतके कडक झाले की त्याच्या विमानाचा परवानाही रद्द झाला. याबाबत त्याची निराशा त्याच्या आत्मचरित्रात स्पष्ट झाली आहे. जाणकारांचे असे मत आहे की याच काळात डग्लसचा विनापरवानगी अटलांटिक महासागर पार करायचा विचार पक्का झाला.

त्यानंतर एकदा डग्लसने एक आडाखा बांधला की संध्याकाळी उशिरा ब्रुकलिन न्यू यॉर्क इथे पोहोचायचे, जेणेकरून त्या विमानतळावरील काम करणारे लोक घरी परत गेलेले असतील. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन विमानात इंधन भरून घ्यायचे आणि उड्डाण करायचे. त्याच्या दुर्दैवाने विमानात तांत्रिक बिघाड झाला अन त्याचे न्यू यॉर्कला जाणे ९ दिवसांनी पुढे ढकले गेले. शेवटी विमान दुरुस्त करून परवानगीशिवाय तो न्यू यॉर्कला पोहोचला. परंतु मुळातच त्याला न्यू यॉर्कला पोहोचायला उशीर झाला होता, तोपर्यंत अटलांटिक महासागर ओलांडायचा (त्या वर्षातला) सुरक्षित काळ संपून गेला होता. नाइलाजाने डग्लस कॅलिफोर्नियाला परतला. ही ट्रीप केल्यावर त्याने आपल्या विमानाचे नाव 'सनशाईन' ठेवले. डग्लसचे दैव असे की या घटनेनंतर फेडरल अधिकाऱ्यांनी कॅलिफोर्नियाच्या विमान वाहतूक आधिकार्‍यांना कळवले की सनशाईन उडण्यास खूप धोकादायक आहे. याची परिणिती सनशाईनला ६ महिने उड्डाणास मज्जाव होण्यात झाली.

दरम्यान डग्लसने विमानाचे इंजीन पुन्हा दुरुस्त केले. या विमानावर आतापर्यंत त्याने सुमारे ९०० डॉलर्स इतका खर्च केला होता. त्याने एक संशोधनात्मक परवाना मिळवला. तसेच अमेरिकेत कोस्ट ते कोस्ट उडायची परवानगी घेतली. त्या परवानगीतही परतीच्या प्रवासासाठी काही अटी होत्या. ८५ मैल प्रति तासाच्या वेगाने उडत न्यू यॉर्कला पोहोचायला तब्बल २७ तास लागले. कमी वेगाने उडण्याचे एक कारण असेही होते की इंधनाची बचत व्हावी. यात आणखीन एक भानगड अशी झाली की इंधनाची गळती होऊन कॉकपिटमध्ये ज्वाळा निर्माण होऊ लागल्या होत्या. हा दिवस होता ९ जुलै १९३८चा.

१७ जुलैला डग्लसला परत कॅलिफोर्नियाला परतायचे होते. त्या दिवशी पहाटे ५:१५ला त्याने उड्डाण केले. त्यापूर्वी त्याने ब्रुकलिन विमानतळावरील (Floyd Bennett Field) मॅनेजरला (Kenneth P. Behr) कोणती धावपट्टी वापरू म्हणून विचारले. त्यावर त्या मॅनेजरने सांगितले की कोणतीही वापर, फक्त उड्डाण पश्चिम दिशेला करू नको जिकडे त्याचे आणि इतर व्यवस्थापकीय कार्यालये होती.

अखेर ३२० गॅलन इंधन आणि १६ गॅलन तेल घेऊन पूर्व दिशेला उड्डाण केले अन तो पुढे जातच राहिला. पूर्व दिशेने आकाशात झेपावल्यानंतर डग्लस लगेच पश्चिमेकडे वळताना दिसला नाही, याचे विमानतळावरच्या अधिकार्‍यांना आश्चर्य वाटले. डग्लसच्या मते तब्बल २६ तास उडाल्यानंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आली. त्याचे हे मत तितकेसे सुसंगत नव्हते. कारण तो असेही म्हणाला होता की १० तास झाल्यावर त्याचे पाय गारठले होते. इंधन गळतीमुळे कॉकपिटचा तळ निसरडा झाला होता. डग्लसने एका स्क्रू ड्रायव्हरच्या उपयोगाने कॉकपिटच्या तळाला एक छिद्र केले. ते एक्झॉस्ट पाइपच्या बरोबर विरुद्ध दिशेला केले होते, जेणेकरून इंधन गळून जाईल आणि हवेत असताना स्फोटाचा धोका टाळला जाईल.

आपल्या हातून 'चूक' झाली आहे हे जर खरेच त्याच्या लक्षात आले असते, तर त्याने खाली उतरायचा प्रयत्न केला असता. त्या उलट त्याने आपल्या विमानाचा वेग २०% वाढवला जेणेकरून तो लवकर पोहोचेल. यथावकाश १८ जुलैला तब्बल २८ तास आणि १३ मिनिटांच्या उड्डाणानंतर त्याचे विमान Baldonnel Aerodrome डब्लिन येथे उतरले. या संपूर्ण प्रवासात त्याच्याजवळ केवळ चॉकलेटचे २ बार, २ बॉक्स अंजिराचे बार आणि १ क्वार्ट पाणी एवढेच खाण्यापिण्याचे जिन्नस होते. त्याने जोडलेल्या जास्तीच्या इंधनच्या टाक्या कॉकपिटमध्ये समोर होत्या, त्यामुळे त्याला फक्त बाजूनेच बाहेरचे बघता येत होते. त्याच्याकडे रेडियो नव्हता आणि त्याचा कंपासही २० वर्षांपूर्वीचा होता.


बिघडलेल्या कंपासकडे निर्देश करताना - डग्लस


डब्लिन येथे पत्रकारांना सामोरे जाताना

पत्रकार H. R. Knickerbocker त्या वेळी डब्लिनच्या विमानतळावर डग्लसला भेटला होता. १९४१ साली त्याने लिहिले की, "अटलांटिक महासागर पार करणार डग्लस हा एकमेव नव्हता. त्याच्या ११ वर्षे आधी लिंडबर्गने हेच दिव्य पार केले होते. तरीही या दोन्ही मोहिमा खूपच वेगळ्या होत्या. लिंडबर्गने जेव्हा मोहीम केली, त्या वेळी त्या मोहिमेसाठी खास विमान बांधण्यात आले होते. भरपूर पैसा ओतला गेला होता. लिंडबर्गला मदत करणारे अनेक होते. तर डग्लसकडे असे काहीच नव्हते. त्याच्याकडे स्वतःची महत्त्वाकांक्षा, धैर्य आणि क्षमता होती. त्याचे विमानही बरेच जुने होते. कदाचित मी पाहिलेले असे अतिशय दयनीय होते. एखाद्या लहान मुलाने साबणाचे बॉक्स वापरून एखादे खेळणे तयार केले, त्याला रोलर स्केट्स जोडले असावेत असे ते विमान दिसत होते. विमानाचे नाक तर अनेक प्रकारची ठिगळे एकावर एक थर रचल्यासारखे दिसत होते. विमानाचे दार तर एका तार बांधून बंद केले होते. इंधनाच्या टाक्यांमुळे त्याला बाहेरचे अगदी कमी दिसत होते. त्याला बसायला नीट जागा नव्हती. अगदी पूर्ण वेळ गुडघे वाकवून बसल्याशिवाय पर्याय नव्हता. असे विमान घेऊन कुणी डब्लिनच्या विमानतळावरून उड्डाण करायला धजावेल असे मला वाटत नव्हते. अन अटलांटिक महासागर पार करणे तर फारच लांबची गोष्ट आहे."

अमेरिकन एव्हिएशन अधिकाऱ्यांनी डब्लिनच्या अधिकाऱ्यांना ६०० शब्दांचा संदेश तारेने पाठवला, (त्या काळात बिल वाचवण्यासाठी कमीत कमी शब्दांत तार पाठवली जात असे). ज्यात डग्लसने मोडलेल्या नियमांची जंत्री होती. या कारनाम्यानंतर डग्लसचा परवाना फक्त १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आला. तो आणि त्याचे विमान मग बोटीने परत मॅनहॅटन न्यू यॉर्कला परतले. ती तारीख होती ४ ऑगस्ट. त्याच्या परवाना रद्द होण्याच्या शिक्षेचा तो शेवटचा दिवस होता.


सनशाईन विमान बोटीतून उतरवले जाताना

इथे त्याचे अगदी जल्लोशात स्वागत झाले. दुसऱ्या दिवशी त्याच्या सन्मानार्थ मोठी मिरवणूक निघाली. तिला अलोट गर्दी झाली.


उघड्या मोटारीतून लोकांना अभिवादन करताना डग्लस


डग्लसचे न्यू यॉर्क शहरातर्फे अधिकृत स्वागत करण्यात आले. फोटोत डग्लसच्या डावीकडे न्यू यॉर्कचे तत्कालीन महापौर Fiorello H. La Guardia.


न्यू यॉर्क पोस्टने या बातमीचे शीर्षक आरशातले प्रतिबिंब वापरून कल्पकतेने छापले आहे.


डग्लसच्या स्वागताची वृत्तपत्रांतील दखल.

अशाच मिरवणुका नंतर शिकागोत व इतर शहरांतही निघाल्या. १९३०च्या दशकात आर्थिक मंदीने होरपळून निघालेल्या अमेरिकन सर्वसामान्यांना डग्लस त्यांचा नायक वाटणे साहजिकच होते.

डग्लसचे दैवत असलेला चार्ल्स लिंडबर्ग, ज्याच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याने ही मोहीम राबवली, त्याने मात्र या कार्याची दखल घेतली नाही. १५ डिसेंबर १९३८ रोजी डग्लसचे आत्मचरित्र 'That's My Story' प्रसिद्ध झाले. त्याने बर्‍याच 'Wrong way' उत्पादनांची जाहिरात केली, त्यात एक उलटे चालणारे घड्याळही होते. डग्लसने १९३९मध्ये .The Flying Irishman. नावाच्या त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटात स्वतःची भूमिका केली. त्यासाठी त्याला तब्बल ७५,००० डॉलर्स मिळाले.

अमेरिकेने जेव्हा दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला, त्या वेळी त्याने बॉम्बर जातीच्या विमानांचे परीक्षण केले होते. त्याने त्या वेळी एअर ट्रान्स्पोर्ट कमान्डमध्येही काम केले, ज्यांची जबाबदारी होती युद्धाच्या काळी युद्धसामग्री पोहोचवणे. १९४६ साली त्याने सिनेटसाठी निवडणूक लढवली, पण त्यात त्याला अपयश आले. त्याने मग काही काळासाठी कमर्शियल पायलट म्हणून काम केले. १९५० साली त्याने या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्याने मग कॅलिफोर्नियातील सॅन्टा अ‍ॅना येथे १८ एकर संत्र्याची बाग विकत घेतली. त्याच्या मृत्यूपर्यंत तो तिथेच आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहिला. खरे तर त्याला संत्र्यांच्या लागवडीबद्दल काहीच माहीत नव्हते. त्याने आपल्या शेजारी राहणार्‍या इतर बागायतदारांचे काम पाहून संत्र्यांचे उत्पादन घेतले.

१९६६ साली पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने ही बाग विकली. राहते घर मात्र त्याने स्वतःकडे ठेवले. त्याच्या बागेच्या जागेवर बनलेल्या वस्तीतल्या एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. १९७२ साली एका वैयक्तिक विमानाच्या अपघातात त्याच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे डग्लस एकांतात राहू लागला. १९८८ साली त्याच्या मोहिमेच्या सुवर्णमहोत्सवात तो उत्साहाने सहभागी झाला. त्याने उत्साही लोकांना त्याच्या विमानाला त्याच्या हँगरमधून काढून आणू दिले होते. विमानाचे इंजीनही चालू करून बघितले. डग्लसचा अतिउत्साह पाहता संयोजकांनी तिथे पोलीस बंदोबस्तही ठेवला होता. शिवाय विमानाचे शेपूट एका पोलिसांच्या गाडीला जखडून ठेवले, कारण न जाणो उत्साहाच्या भरात त्याने पुन्हा त्यात बसून उड्डाण केले, तर काय :-) .

यानंतर तो आपल्या विमानाच्या ठिकाणाबद्दल गोपनीयता पाळू लागला. कुणी म्हणे त्याने ते पूर्णपणे वेगळे करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून दिले होते, जेणे करून त्याची चोरी होऊ नये. ९ डिसेंबर १९९५ साली त्याचा मृत्यू झाला. आयुष्याच्या अंतापर्यंत त्याने कधीही कबूल केले नाही की त्याचा न्यू यॉर्क ते डब्लिन विनाथांबा प्रवास ठरवून केलेला होता.

संदर्भ - विकी व जालावरील इतर माहिती.
सर्व फोटोज जालावरून साभार.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

6 Nov 2018 - 10:21 am | महासंग्राम

क्या बात है, जबरदस्त झालाय लेख

विजुभाऊ's picture

6 Nov 2018 - 1:22 pm | विजुभाऊ

उत्कंठावर्धक लिहाण.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 2:44 pm | तुषार काळभोर

ठरवून केलेला असला तरी एकट्याने विमानातून अटलांटिक पार करणे हे स्पृहणीय आहेच!

समीरसूर's picture

6 Nov 2018 - 4:29 pm | समीरसूर

खूप सुंदर!

मला कोथरुड ते हडपसर हा रस्त्यावरचा प्रवास विनाथांबा जमत नाही; या पठ्ठ्याने अमेरिका ते आयर्लंड प्रवास विनाथांबा आणि तो ही एका खेळण्यासारख्या दिसणार्‍या विमानाने केला म्हणजे हा माणूस अचाटच होता. इंधन-बिंधन गळत होते, स्क्रू लावून त्याने ते तात्पुरते बंद केले, बसायला नीट जागा नाही...आणि २८ तास प्रवास आणि तो ही महासागरावरून!!??! काय एकेक नमुने असतात...

अर्थात या प्रवासापेक्षा कोथरुड ते हडपसर हा प्रवास खूपच अवघड आहे यात शंकाच नाही. पण आमचा कोण सत्कार करणार? इथे हजारो लोक हे दिव्य रोज पार पाडत असतात...

+१

त्याही पेक्षा अवघड, साधे झेब्रा क्रॉसिंगचा वापर करून रस्ता ओलांडणे आहे ...

असो,

रोज मरे त्याला कोण रडे.

अतरंगी वैमानिकाची सतरंगी कहाणी.
लेख आवडला.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 11:15 pm | मुक्त विहारि

मस्त माहिती ...धन्यवाद...

अतरंगी वैमानिक आणि त्याची रंजक कहाणी.

सविता००१'s picture

7 Nov 2018 - 5:21 pm | सविता००१

मस्तच लेख

बरखा's picture

7 Nov 2018 - 7:06 pm | बरखा

छान माहिती मिळाली. लेख आवडला.

प्रमोद देर्देकर's picture

7 Nov 2018 - 10:14 pm | प्रमोद देर्देकर

मस्त रंजक माहिती मिळाली.

सुधीर कांदळकर's picture

8 Nov 2018 - 5:33 am | सुधीर कांदळकर

हटके असे काहीतरी वाचायला मजा आली. धन्यवाद.

१९३०च्या दशकात आर्थिक मंदीने होरपळून निघालेल्या अमेरिकन सर्वसामान्यांना डग्लस त्यांचा नायक वाटणे साहजिकच होते.

कदाचित मंदीमुळेच त्याला स्पॉन्सर्स गावले नसावेत आणि विमानदुरुस्तीलाही त्याच्याकडे पैसे राहिले नसावेत.

हि माणसे अशी कशी बनतात कुणास ठाऊक . बाकी आमच्या पुण्यात असे अवलिये बरेच आहेत. त्यांना मात्र अशी प्रसिद्धी मिळत नाही ! मस्त लेख . आवडला.

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2018 - 11:15 am | प्राची अश्विनी

वेगळी माहिती. आवडली.

अनिंद्य's picture

12 Nov 2018 - 11:41 am | अनिंद्य

+ १

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2018 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनपेक्षित करामतीची सुंदर कहाणी !

पद्मावति's picture

13 Nov 2018 - 6:49 pm | पद्मावति

मस्तं लेख.

मित्रहो's picture

13 Nov 2018 - 7:40 pm | मित्रहो

पूर्णतः वेगळ्या विषयावरचा लेख. नवीन माहिती.
फक्त एक कळले नाही त्याने परवानगी न घेता उडण्याचे कारण काय? त्याला परवानी नाकारली असती का? का बरे परवानगी नाकारली असती.

श्रीरंग_जोशी's picture

14 Nov 2018 - 1:19 am | श्रीरंग_जोशी

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद. डग्लसच्या या कामगिरीबाबत प्रथम वाचले तेव्हाच याबाबत लेख लिहायची इच्छा निर्माण झाली होती. यंदाच्या दिवाळी अंकासाठी ते करु शकलो याबाबत समाधान वाटते. या लेखाचा समावेश दिवाळी अंकात केल्याबद्दल दिवाळी अंक समितीला मनःपूर्वक धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे आभार मानतो.

मित्रहो - या प्रकारचे विमान जमिनीवरुन उड्डाण करत असताना आपात्कालिन प्रसंगी मोकळ्या मैदानात उतरवणे शक्य असते परंतु समुद्रावर उड्डाण करताना ती संधीच नसते. इतके गंभीर दोष असणारे विमान अटलांटिक महासागर पार करण्यासाठी वापरणे म्हणजे आत्मघातकीपणाच म्हणता येईल.

मदनबाण's picture

18 Nov 2018 - 9:31 pm | मदनबाण

सुरेख लेखन...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bom Diggy... (Official Music Video) :- Zack Knight x Jasmin Walia

चिगो's picture

18 Nov 2018 - 11:53 pm | चिगो

एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.. असे वेडेच इतिहास घडवतात.

मराठी कथालेखक's picture

22 Nov 2018 - 12:13 pm | मराठी कथालेखक

लेख आवडला

अथांग आकाश's picture

22 Nov 2018 - 8:23 pm | अथांग आकाश

झकास! मजा आली वाचायला!
.

सस्नेह's picture

22 Nov 2018 - 9:42 pm | सस्नेह

रोचक लेख !

सौन्दर्य's picture

24 Nov 2018 - 12:19 am | सौन्दर्य

लेख अतिशय आवडला. मुंबई ते ह्युस्टन जवळजवळ १८ तासांचा अतिशय आधुनिक एअर लाईन्सच्या विमानातून प्रवास करताना देखील कित्येक वेळा भीती वाटते, इथे तर लुटुपुटूचे (आजच्या विमानांच्या तुलनेने) विमान घेऊन कोणतीही साधन सामग्री नसताना एव्हढे अंतर पार करायचे त्यासाठी सिंहाचेच काळीज लागते. इतक्या सुंदर लेखामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायचा हुरूप येतो.

आमच्या राँग वे पायलट हीरोला सलाम.

टिवटिव's picture

24 Nov 2018 - 1:25 am | टिवटिव

एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

माझीही शॅम्पेन's picture

13 Dec 2018 - 8:25 pm | माझीही शॅम्पेन

+८७९८७७८८७

राघव's picture

13 Dec 2018 - 11:16 pm | राघव

अरे वाह! छानच माहिती. हा डग्लस माहित नव्हता.
प्रथम मला वाटले हे बेडर वरचेच लेखन आहे. पण नंतर लगेच भ्रम दूर झाला. :-)