जैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

जैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे

ऑगस्ट १९०६. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑयस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरात एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली, तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचे काही एक कारण नव्हते. ज्या घरात ती आजारी होती, ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिले जात असे. अशाच पर्यटकांपैकी तीसुद्धा तिच्या परिवारासमवेत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटायला आली होती. घर प्रशस्त आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे कोणत्याही पर्यटकास चटकन पसंत पडे. पण ऐन वेळी आजारी पडल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता. इतर सदस्य तिची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण तरी तिचा ताप काही केल्या उतरेना. लक्षणे टायफॉइडची (विषमज्वराची)असल्याचे बोलले जात होते. कारण इतरत्र टायफॉइडचे रुग्ण आढळले होते. वर्तमानपत्रातही टायफॉइडच्याच बातम्या येत होत्या. साथच असावी बहुधा. म्हणून रोगाच्या निदानाची घरातल्या लोकांनाच चटकन कल्पना आली. पण दुर्दैवाने घरातील इतरही सहा सदस्य लवकर आजारी पडले. अगदी त्याच लक्षणांसहित. आता मात्र बाब गंभीर होती. घरातील सगळेच आजारी पडलेत म्हटल्यावर कुणालातरी कळवणे गरजेचे होते. मग त्यांनी त्या घराच्या मालकालाच ही घटना कळवली. मालकही त्वरित आला. त्याला या घराचा मोबदला चांगला मिळत असे. घराची बदनामी होऊ नये म्हणून त्याने डॉ. सोबर्स यांना गाठले. डॉ. सोबर्स म्हणजे त्या वेळी टायफॉइडच्या निदानासाठी अतिशय प्रसिद्ध असे नाव होते. कारण या रोगावर त्यांचा भरपूर अभ्यास व तपासकार्य सुरू होते.

एकोणिसाव्या शतकात न्यूयॉर्क शहरात दर वर्षी टायफॉइडचे ४००० रुग्ण आढळत. दहापैकी एक रुग्ण दगावत असे. त्याची लक्षणे म्हणजे ताप, डोके दुखणे, हगवण लागणे, मानसिक संतुलन बिघडणे अशी होती. जंतुरोधक औषधी तोपर्यंत जास्त विकसित न झाल्यामुळे फक्त लक्षणरोधकच उपचार केला जाई. अशा उपचाराला तो जीवाणू काही बधेना. शहरातही विशेष अशी स्वच्छता नव्हतीच. मेलेल्या डुकरा-घोड्यांची कोणीही वेळेवर विल्हेवाट लावत नव्हते. कचरा वेळोवेळी साफ केला जात नव्हता. निर्वासितांचे लोंढे कमी -अधिक प्रमाणात सुरूच होते. प्रत्येक दशकात लोकसंख्या दुप्पट व्हायची, पण त्यांना तेथे सामावून घेण्याएवढी यंत्रणा सक्षम नव्हती. परिणामी साथीचे रोग सुरू झाले. निर्वासितांमुळे, अस्वच्छतेमुळे.

इकडे तोपर्यंत डॉ. सोबर्स यांनी त्या रोगट घरात येऊन तपासकार्य सुरू केले होते. बाह्यतपासणीवरून त्यांना काहीही गवसले नाही. त्यांनी घरातून भरपूर ठिकाणांवरून नमुने गोळा केले. कुठेही काही गैर आढळले नाही. अन्न तपासले, तेही जंतुविरहित निघाले. मग वाटले की सांडपाणी कदाचित पिण्याच्या पाण्यात येत असावे. टायफॉइडचे जंतू रुग्णाच्या विष्ठेमधून पसरत असल्यामुळे डॉ. सोबर्स यांची शंका रास्त होती. त्यांनी घराच्या सांडपाण्यात गडद रंगाचा डाय (रंग) टाकला. तो जर पिण्याच्या पाण्यात उतरला असता, तर पाणी दूषित आहे असा निष्कर्ष निघणार होता. पण पाणी एकदम स्वच्छ आले, रंगविरहित. या सगळ्या शहराचे सांडपाणी समुद्रात जाऊन तेथील अन्न दूषित होत असावे, म्हणून समुद्री अन्न तपासले गेले, तेसुद्धा जंतुविरहित निघाले. घरी रोज बाहेरून येणारे दूध तपासले, पण त्यानेही निराशा केली. जंतूंचा स्रोत काही डॉ. सोबर्स यांच्या हाती लागत नव्हता. पण डॉक्टरही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. आपल्या कामाप्रती अतिशय चिवट असलेला हा माणूस मांड्या ठोकून मैदानात उतरला.

घरी जाताच टायफॉइडच्या मागील काही घटना त्याने चाळल्या. एका बातमीने त्याचे लक्ष वेधले. त्यात टायफॉइड सर्वात लवकर अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात असा मजकूर होता. दुसऱ्या दिवशी त्याने परत घराची सर्व तपासणी केली. रोज खाल्ले जाणारे अन्न परत तपासले तरीही काहीच हाती लागले नाही. आता मात्र डॉक्टर निराश झाले, जंतू खरेच खूप सूक्ष्म जीव आहेत असे त्यांना वाटून गेले असावे. जाता जाता त्यांनी घरातील सदस्यांना एक प्रश्न विचारला, "अशी कोणी व्यक्ती जी या घरात येऊन गेलीय, पण माझी तिच्याशी मुलाखत अजून झाली नाही..." याचेही उत्तर नकारार्थी आले. दरवाजा उघडून डॉक्टर बाहेर पडणार, तोच आवाज आला, "आमची जुनी कुक (स्वयंपाकी) मेरी मलोन."

तीन आठवड्यांपूर्वीच मेरीने काम सोडले होते. नवीन कुक आताच आल्यामुळे त्यात डॉ. सोबर्स यांना विशेष रस नव्हता. बाकीचे सगळे नमुने नापास झाल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा वळवला मेरीकडे. मेरी आणि त्यांचा संबंध कधीपासून आला, तिचे वर्णन, शिक्षण इ. सर्व माहिती त्यांनी सदस्यांकडून काढून घेतली. ती त्यांना काय काय खायला घालत होती, याचीही त्यांनी यादी बनवली. यादीतील सर्व पदार्थ शिजवलेले होते. फक्त 'आइसक्रीम विथ फ्रूट स्लाइसेस' हा एकमेव अपवाद. टायफॉइड जंतू न शिजवता खाल्लेल्या अन्नामध्ये वाढतो आणि पसरतो. शिजवलेल्या अन्नात उष्णतेमुळे मरतो. फळे आणि आइसकीम घालून ती हा जो अपवादात्मक पदार्थ बनवायची, यापेक्षा जंतूंच्या वाढीसाठी दुसरे कुठलेच चांगलं माहेरघर नव्हते. या धाग्यावरून त्यांचा मेरीबद्दलचा संशय गडद झाला. पण मुख्य प्रश्न डॉ. सोबर्ससमोर हा होता की मेरीला शोधायचे कुठे? कारण त्या घरात तिचा ठावठिकाणा कुणालाही ठाऊक नव्हता.

३७ वर्षीय मेरी ही आयरिश कुक होती. ती अशाच पर्यटक वा गरजू परिवारांसाठी काम करायची. तिने मागील १० वर्षांत ८ परिवारांसाठी काम केले होते. पण यात ती कधी आजारी पडली नव्हती. ती ज्या घरात काम करत असे, तेथील सदस्य आजारी पडत, तोवर तिने काम सोडलेले असे. पण मग नंतर सदस्य आजारी पडतात म्हणून काय तिलाच जबाबदार धरायचे की काय? जी व्यक्ती एकदाही आजारी पडली नाही, रोज टणाटण उड्या मारत काम करते, ती व्यक्ती आजार - तोही साथीचा - कसा पसरवणार? डॉ. सोबर्स तिच्यावर निष्कारण आळ घेत होते की काय? की दुसरा कुठलाही धागा न मिळाल्यामुळे यातून काही मिळते का ते ताणून बघत होते? होते असे कधीकधी कुठलेही पर्याय समोर नसले की माणूस 'थोडी शक्यता आहे' हा पर्यायही सोडत नाही. त्यातच त्याला आशेचा किरण दिसतो. पण हे प्रकरण पूर्ण वेगळे होते. या प्रकरणाशी मिळतेजुळते प्रकरण त्यांनी वर्तमानपत्रात ४ वर्षांआधीच वाचले होते. एक बातमीत जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांनी लिहिले होते, "बेकर आजारी नसतानाही तो जंतू पसरवत होता." यालाच त्यांनी हेल्दी कॅरिअर (healthy carrier) म्हटले होते. जंतू शरीरात प्रवेश केल्यापासून पहिले लक्षण दिसण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे 'इन्क्युबेशन पिरियड' (incubation period). हा रोगपरत्वे बदलतो. टायफॉईडचा इन्क्युबेशन पिरियड ६-३० दिवसांचा असतो. मेरी आणि रॉबर्ट कॉख यांचा 'बेकर' हे सारखेच प्रकरण असणार, असा डॉ. सोबर्स यांना विश्वास होता. पण हे सिद्ध करण्यासाठी त्यांना मेरीचे चाचणीसाठी लागणारे नमुने आवश्यक होते, जे सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. जी व्यक्ती अजून सापडली नाही, तिचे नमुने कसे मिळणार?

व्यक्ती सापडत नाही म्हणून 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवणाऱ्यातला सोबर्स नव्हता. मेरी पार्क एव्हेन्यू भागात काम करत आहे हे पठ्ठ्याने १९०७मध्ये शोधून काढले. येथे ती ज्या घरात काम करायची, तेथेही एक लहान मुलगी आजारी पडली. रुग्णाच्य सर्व शुश्रुषेची जबाबदारी मेरीने उचलली. पण मेरीला काय माहीत तिच्यामुळेच बिचारी लहान मुलगी आजारी पडली म्हणून. याच घरात मेरी आणि डॉ. सोबर्स यांची पहिली गाठ पडली. डॉ. सोबर्स यांना तिच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. "तुमच्यामुळे भरपूर जणांचे प्राण वाचतील. माझ्याकडून नकळत किती मोठा साथीचा रोग पसरवला जात होता, मला कल्पनाही नव्हती. निदान झाल्यामुळे लवकर उपचारही करता येतील. मी तुमची खूप आभारी आहे" असे मेरी आपल्याला म्हणेल असा आशावाद डॉ. सोबर्स यांना वाटत होता. पण मेरीने आशावादाचा 'आ'सुद्धा दाखवला नाही. प्रत्यक्षात भेट झाल्यावर रक्त, विष्ठा, लघवी या नमुन्यांची मागणी करताच तिने त्यांना चक्क "पागल झालात की काय?" असे सुनावले. त्यांनी तिला विनंती करत म्हटले की, "तुमच्या शरीरात टायफॉइड नावाच्या रोगाचे जंतू वास करत आहेत. तुम्हाला कोणतेही लक्षण दिसत नसले, तरीही तुम्ही बाथरूममधून आल्यावर अन्न शिजवताना ते अन्नात प्रवेश करतात आणि तेथून जे अन्न खातात त्यांच्या शरीरात जातात." त्यावर ती खेकसत म्हणाली, "तुम्हाला काय म्हणायचे आहे की मी बाथरूममधून आल्यावर हात धूत नाही." तिचा दुर्गावतार पाहिल्यावरही सोबर्स आपला हट्ट सोडत नाही म्हटल्यावर तिने चाकू उगारत त्यांना घरातून अक्षरशः हाकलून दिले. "यानंतर जर असले प्रश्न घेऊन परत दिसलात तर याद राखा" असा सज्जड दमही देऊन टाकला. ती स्वतःला निरोगी समजत होती. तिचे म्हणणं होतं की, "मी कुक असताना कधी कोणाला काही झाले नाही, मी काम सोडल्यावर झाले तर यात माझी काय चूक? या वेळी तेथे जे कुक म्हणून काम करतात त्यांची तपासणी करा ना! माझ्या मागे का लागलात? कदाचित त्यांच्यामुळे पसरत असेल, कारण मला तर कधी साधा तापही आला नाही."

पुढच्या वेळी सोबर्स आपल्या सहकाऱ्याला घेऊन तिच्या घरी गेला. ती बाजारात गेली होती. ते दोघे तिची वाट बघत घराच्या बाजूलाच थांबले. ती येताच त्यांनी तिला परत विनंती करत म्हटले, "हे बघ मेरी, आपली काही दुश्मनी थोडीच आहे? तुझ्याकडून जो आजार पसरवला जात आहे, त्याचे उगमस्थान तूच आहेस. ही साखळी कुठेतरी भेदणे आवश्यक आहे. नाहीतर हाहाकार उडेल. आम्ही कुठे म्हणतोय की तू मुद्दाम करते आहेस म्हणून. ते तुझ्या नकळत होतेय, पण ते भयंकर आहे. कृपा करून आम्हाला मदत कर." पण मेरीचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता ती आरोग्यसंपन्न आहे म्हणून. "तुम्ही माझ्या मागावर बाजारातही होतात वाटते... एका अनोळखी महिलेचा पाठलाग कसा करू शकता तुम्ही?" असा संशय घेऊन तिने त्यांना परत हाकलून लावले.

१८९६. टायरॉन, आयर्लंडमधल्या एक गरीब लोकवस्तीच्या भागात मेरीचा जन्म झाला. त्या भागाकडे बघून मेरीच्या अस्वच्छतेची खातरी पटली असती, इतका तो भाग गलिच्छ होता. १८८३मध्येच तिने अमेरिकेत आपल्या काकांकडे कायमचे स्थलांतर केले होते. सुरुवातीला ती छोटे-मोठे काम करू लागली. इस्त्रीकाम, साफसफाई, हळूहळू स्वयंपाकही शिकली. हाताला चवही होती. अल्पावधीतच श्रीमंत, प्रतिष्ठित घरांच्या कुक कामाच्या ऑर्डर तिला येऊ लागल्या. ती एकदा घरात शिरली की संपूर्ण घराचा ताबा घेई. स्वयंपाकाबरोबरच सर्व व्यवस्थापनाची जबाबदारीही नीट पार पाडत असे. अवांतरही अनेक कामे ती करत असे. अशा लाघवी स्वभावामुळे भरपूर परिवारांमध्ये तिला विश्वासाचे स्थान दिले गेले. सर्व सुरळीत सुरू असताना डॉ. सोबर्स तिला आपला उगाच पाठपुरावा करत आहेत असं वाटत असे. सोबर्ससुद्धा एखाद्या स्त्रीला नमुन्यांसाठी जास्त जबरदस्ती करू शकत नव्हता. त्यालाही मर्यादा होत्या. त्या काळी इतरत्र घटसर्प, क्षयरोग, टायफॉइड, शीतज्वर, देवी इ. आजारांनी धुमाकूळ घातला होता. या सर्व साथीच्या रोगांच्या नियंत्रणाची जबाबदारी होती न्यूयॉर्क शहराचे हेल्थ कमिशनर डॉ. हरमन यांवर. डॉ. सोबर्स डॉ. हरमन यांना समक्ष भेटले आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. डॉ. हरमन यांनी पुढील सहकार्यासाठी डॉ. जोसफिन या महिला अधिकार्‍याची नेमणूक केली. महिला असल्याने पुढील कामे सोपी होतील असा कयास त्यामागे असावा. डॉ. जोसफिन यांनी एक रुग्णवाहिका, एक पोलीस जीप यांसह मेरी काम करत असलेल्या जागी धाड टाकली. तिला पाहताच डॉ. जोसफिन उद्गारली, "मी आरोग्य विभागाकडून आले आहे." हे ऐकताच काम करत असताना हातात असलेला चाकू उगारत ती म्हणाली, "मी कुठेही येणार नाही." चाकू तसाच रोखत मागच्या मागे घरात पळून गेली. पोलिसांच्या मदतीने डॉ. जोसफिन यांनी घराचा प्रत्येक कोनाकोपरा धुंडाळला, पण त्यांना काही मेरी सापडली नाही. शेवटी कंटाळून निघताना एका पोलिसाला कपाटाच्या फटीतून तिचा निळा ड्रेस अडकलेला दिसला. तिने स्वतःला कपाटात कोंडून घेतले होते. पकडल्यावर तिने भरपूर आरडाओरडा केला. पण काही फायदा झाला नाही. विलींग पारकर हॉस्पिटल येथे तिला पुढच्या उपचारासाठी रवाना करण्यात आले. यात तिच्या नमुन्यांद्वारे तिला टायफॉइड असल्याचे सिद्ध झाले. पण हे कसे शक्य आहे? एकही बाह्य लक्षण नसताना ती चक्क विष्ठेद्वारे रोग पसरवत होती. जेव्हा रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती त्या जंतूवर मात करते, तेव्हा जंतू मरतो आणि रुग्ण जगतो. जेव्हा जंतू रोगप्रतिकारशक्तीला पुरून उरतात, तेव्हा रुग्ण दगावतो. पण कधीकधी कोणीच जिंकत नाही. दोघेही आपापल्या सीमारेषा ठरवून घेतात आणि एकाच शरीरात सुखाने नांदतात. तेव्हा त्या शरीराची मेरी मलोन होते. तुम्ही हेल्दी कॅरियर बनलेले असता.

सोबर्स पुढच्या भेटीत तिला म्हणाले की, "तू मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दे. त्यावर मी एक पुस्तक लिहितो. माझ्यावर भरवसा ठेव त्या पुस्तकाची सगळी कमाई तुला देतो." ती मात्र त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसे. ती सरळ उठून बाथरूममध्ये जात असे ते जाईपर्यंत. दरम्यान तिच्या विष्ठेचे नमुने सतत पॉझिटटिव्ह येत राहिले. इतर रुग्ण व कर्मचारी यांना टायफॉइडची लागण होऊ नये, म्हणून मेरीला रुग्णालयातून नॉर्थ ब्रदर बेटांवर असलेल्या रिव्हरसाइड हॉस्पिटल येथे क्वारंटाइनमध्ये (quarantineमध्ये) ठेवण्यात आले. क्वारंनटाइन म्हणजे काय? तर आपण मोठमोठाल्या रुग्णालयात गेल्यानंतर तेथे आयसोलेशन (isolation) विभागाची वेगळी व्यवस्था पाहिली असेल. इतर रुग्णांना संसर्गजन्य रोगांची बाधा होऊ नये, म्हणून संसर्गजन्य रुग्णांना इतर रुग्णांपासून अलिप्त ठेवले जाते, त्याला आयसोलेशन म्हणतात. या विभागात रुग्णाला बरे होईपर्यंत सेवा दिली जाते. याचाच छोटा भाऊ म्हणजे क्वारंनटाइन. याचा शब्दश: अर्थ 'चाळीस दिवस' असा आहे. चाळीस दिवसच का? तर बहुतांश (सगळ्याच नाही) साथीच्या, संसर्गजन्य रोगांचा इनक्युबेशन पिरियड जास्तीत जास्त ४० दिवसांपर्यंत असू शकतो (इनक्युबेशन पिरियड म्हणजे काय, हे मागे सांगितलेच आहे). या ४० दिवसांनंतर त्यांची संक्रमणाची तीव्रता कमी होते. जवळपास नाहीच. म्हणून त्यानंतर त्यांना पुढील औषधोपचार घरी घेण्यास सांगण्यात येतो. तर अशाच एका क्वारंनटाइनमधे मेरीला ठेवण्यात आले. एकदम अलिप्त. इतिहासात त्या बेटावर प्लेगचे रोगी ठेवत होते. आता तेथे जास्तकरून क्षयरोगाचे रुग्ण होते. अलिप्ततेमुळे तिला खूप नैराश्य आले. ती कोणाशीही नीट बोलेना. ती रोगी आहे यावर तिचा विश्वासच नव्हता. हे जग आपल्या का मागे लागलेय हेच तिला कळेना. तेथील डॉक्टरांनी तिला पित्ताशय काढून घेण्याचा सल्ला दिला. त्यात जंतू जमा असावेत असा त्यांचा अंदाज होता. पण तिने साफ नकार दिला. तिला तो तिच्या जीवे मारण्याचा घाट वाटे. तेथूनही ती सोबर्सला आणि आरोग्य खात्याला पत्र लिहित असे की, "का मला अशी शिक्षा देताय? मी काय बिघडवलेय तुमचे? मी अशीच येथे राहिले, तर वेडी होऊन जाईन. ही जागा म्हणजे एखाद्या कारागृहापेक्षा कमी नाहीये." पण कुणाकडूनही प्रत्युत्तर आले नाही. त्यांच्या मते नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिचे बेटावर राहणेच आवश्यक होते. बिचारी मेरी. तिने आपल्या मित्राच्या साथीने 'ओ निल' या वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर लढाई खेळण्याचे ठरवले. त्यांनी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टात तिची सुटका करण्याची याचिका दाखल केली. त्यात असे म्हटले होते की, 'मी कधीच आजारी नव्हते. त्यामुळे मी कोणताही रोग पसरवू शकत नाही'. आता सर्व अमेरिकाभर मेरीची चर्चा होऊ लागली. वर्तमानपत्रातही तिच्या बातम्या 'टायफॉइड मेरी' म्हणून यायला लागल्या. न्यूयॉर्क शहरातल्या 'बॅक्टेरिया लॅब'चे प्रमुख डॉ. विल्यम पार्क यांनी नवीन संशोधनाद्वारे शहरात आणखी ४९ हेल्दी कॅरियर शोधून काढले. पण हे लोक कुक काम किंवा जेवणाशी निगडित कुठलेही काम करत नसल्यामुळे, ते रोग पसरवत आहेत असे अजूनतरी निदर्शनास आले नव्हते. परिणामी ते स्वतंत्र होते. मेरीसारखे अलिप्त नाही.

तिच्यासारख्या सापडलेल्या हेल्दी कॅरियर रुग्णांमुळे तिला सुटकेची आशा वाटू लागली. पण तरीही तिला तेथेच डांबून ठेवण्यात आले. बेटावरील काही अधिकाऱ्यांनी, तू दुसऱ्या राज्यात वेगळ्या नावाने राहत असशील तर तुझ्या सुटकेचे आम्ही प्रयत्न करू अशी विचारणा केली. पण तिने ठाम नकार दिला. मी आहे त्याच नावाने मरणार असे ठणकावून सांगितले. १९१०मध्ये न्यूयॉर्क शहराला नवीन हेल्थ कमिशनर लाभले, लेडर्ली. त्यांनी मेरीला मुक्त केले, पण एका अटीवर - ती कधीही कुक म्हणून काम करणार नाही. त्यानंतर तिने इस्त्री काम सुरू केले. सुटकेनंतर ४ वर्षे मेरी कुठे आहे, काय करत आहे याच्याशी कुणालाच काही देणे-घेणे नव्हते. टायफॉइडची प्रकरणेही थोडी आटोक्यात आली असे वाटत असतानाच एक घटना घडली.

१९१५मध्ये स्लोन मॅटर्निटी हॉस्पिटलमधे डॉक्टर, नर्सेस, स्टाफ आणि इतर रुग्ण टायफॉइडमुळे आजारी पडले. यात दोन जणांचे बळी गेले. परत डॉ. सोबर्स यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी या वेळी जास्त नमुने गोळा करण्याच्या फंदात न पडता, आवश्यक तेवढेच गोळा केले आणि सरळ कुक कोण अशी विचारणा केली. कुक त्या दिवशी आपले काम करून निघून गेलेली होती. पण तिचे नाव मिस ब्राऊन असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. "कुकच्या हस्ताक्षराचा एखादा नमुना असेल तर दाखवाल का?" या सोबर्सच्या प्रश्नावर तेथील कर्मचाऱ्याने तो लगेचच सादर केला. ते हस्ताक्षर पाहताच सोबर्स उडालाच.....ती चक्क मेरी मलोन होती. टायफॉइड मेरी. नाव बदलून येथे काम करत होती. नॉर्थ ब्रदर्स बेटावरून सतत येणारे तिचे पत्र वाचून सोबर्सला तिचे हस्ताक्षर पाठ झाले होते. तिला परत तिच्या घरातून उचलण्यात आले. या वेळी मात्र तिने कसलाही प्रतिकार केला नाही. तिला कुक काम खरेच आवडत असावे. म्हणून तिने परत त्याकडे वळण्याचा निर्णय घेतला असावा. आणि तशीही ती स्वतःला निरोगीच मानत असल्यामुळे कुक म्हणून काम करण्यात तिला तरी काहीच गैर वाटत नव्हते. अगदी मागच्या वेळेसारखीच परत त्याच बेटावर अलिप्ततेत तिची रवानगी करण्यात आली, ती कायमचीच.

पुढील काळात तेथेच बेटावर ती रिव्हरसाइड हॉस्पिटलमधल्या प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून काम करत राहिली. मध्ये पॅरॅलिसिसचा एक झटका येऊन गेला. ६९ वर्षांच्या आयुष्यात ती २६ वर्षे त्या बेटावर राहिली. १९३८ साली तिला तेथेच न्यूमोनियाने मरण आले. मरेपर्यंत तिने ५१ लोकांना तो रोग संक्रमित केला होता. त्यांपैकी ३ रुग्ण दगावले होते. अगदी शेवटपर्यंत ती स्वतःला निरोगी मानत राहिली आणि आपल्याकडून कुठलाही रोग संक्रमित होणे अशक्य आहे, कारण आपल्याला कधी साधा तापही आला नसल्याचा तिचा ठाम विश्वास होता. आजही बरे झालेल्या रुग्णांपैकी ३% रुग्ण काही काळासाठी कॅरियर म्हणून राहू शकतात. म्हणून बरे होऊनही ते रोग संक्रमित करू शकतात. आता हेल्दी कॅरियर नावाची संज्ञा वैद्यकीय शास्त्रात भरपूर प्रौढ झालीये. अशा रुग्णांचे लगेचच निदान होते आणि त्यांवर परिणामकारक उपचारही निघालेत. पण एक शतकाआधी ह्या गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नव्हत्या. फक्त सोबर्स, कॉख अशा शास्त्रज्ञांपुरत्याच त्या मर्यादित होत्या. लक्षण दिसली म्हणजे आजारी, नाहीतर निरोगी असा सर्वमान्य ठोकताळा होता. अशा काळात मेरीला स्वतःला निरोगी आहे असे वाटणे काही चूक नव्हे. पण वाईट या गोष्टीचे वाटते वैद्यकीय शास्त्र शेवटपर्यंत तिच्यातला हेल्दी कॅरियर तिला पटवून देऊ शकले नाही, तिची ती इच्छा नसावी किंवा तिच्या समजुतीबाहेरील ती गोष्ट असावी. पण तिने ते समजून उमजून किंवा कुक काम सोडून दिले असते, तर ती इतका चघळायचा विषय बनून राहिली नसती. तिचे पुढील आयुष्य सुकर झाले असते. वैद्यकीय शास्त्र आजच्याइतके प्रगत असते, तर मेरी आपल्या स्वतःच्या घरी ठणठणीत आयुष्य जगली असती.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवनवीन धातूंचा शोध लागत गेला. बऱ्याच गोष्टी विज्ञानामुळे साध्य झाल्या. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे दैनंदिन जीवन सुलभ झाले. विविध रोगांवर उपचार निघाल्यामुळे आयुष्य अधिक जगता येऊ लागले. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही दोन. दुसरी बाजू मात्र अंधारि. विज्ञानाने जसे प्रगतीचे रस्ते शोधून दिले, त्याचप्रमाणे अधोगतीच्या अंधारमय वाटाही त्याबरोबर जोडून दिल्या. आपण एकीकडे विविध रोगांवर उपचार शोधत होतो, तर त्याच रसायनांनी वा जीवाणूंनी अधिक लोकांचे जीवही घेता येतात हेही समजले. आवश्यक त्या मात्रेत औषध, पण जास्त मात्रा म्हणजे विष हेही विज्ञानच. आता तर ही रासायनिक आणि जैविक हत्यारे दहशतवाद्यांकडेही झाली असावीत. पुढचे महायुद्ध या हत्यारांनी लढले गेल्यास नवल ते काय? ही हत्यारे ना आवाज करत, ना त्यांना विशिष्ट रंग असतो, ना त्यांचा आकार अवाढव्य. तुम्हाला काही कळायच्या आत तुमचे वर जाण्याचे तिकीट आरक्षित झालेले असेल. या सर्व प्रगतीचे श्रेय अर्थातच विज्ञानाला आणि नीच मनुष्यप्राण्याला.

दूरदेशीचे उदाहरण कशाला हवे, आपल्याकडेच २०१५मध्ये, २ मिनिटांत बनणाऱ्या आपल्या आवडत्या खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा १७ पट जास्त शिसे (लेड) आढळले होते. इतक्या प्रसिद्ध मॅगीबाबतसुद्धा असे होईल असे वाटले नव्हते. तेव्हापासून कुठल्याही खाद्यपदार्थावर विश्वास टाकताना जीव धाकधूक होतो.

ही सर्व उदाहरणे झाली अपघाताने घडलेल्या घटनांची. पण काही घटना अतिरेकी परिणामांसाठी घडवल्या गेल्या आहेत. संहारासाठी जेव्हा या रसायनांचा आणि जैविक अस्त्रांचा वापर होतो, तेव्हा खरेच डोळे पांढरे होतात,. इतकी ही हत्यारे महाविध्वंसक आहेत. इतिहास अशा घटनांचा साक्षीदार आहेच. तोंडात आख्खा हात घालायला लावणारी अशीच एक घटना घडलेली आहे. त्यात समावेश असणारे मोठे लोक या घटना इतक्या बेमालूमपणे हाताळतात की जणू त्या योगायोग वाटाव्यात.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 'जिलाद सायन्सेस' नावाची औषधनिर्मिती करणारी एक कंपनी होती. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे उत्पादन थंडावले होते. बाजारातील मागणी घटली होती. एकूणच कंपनी डबघाईला आली होती. कामगार, अधिकारी हेसुद्धा हलाखीचे दिवस काढत होते. भरपूर दिवसांपासून त्यांना बोनस मिळाला नव्हता. पण अचानक पुढच्या वर्षी कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली. नुसती सुधारली नाही, तर कामगारांना, अधिकाऱ्यांनाही सुगीचे दिवस आले. कारण कंपनीचे शेअर्स बाजारात मागच्या वर्षीपेक्षा ७२०%नी वधारले होते. आता सगळ्यांना बोनस मिळणार होता. असा अचानक होणारा बदल काही जादूटोणा थोडी होता? बुडत्याला किनाऱ्यावर येण्यासाठी बड्या माणसाचा हात लागतो. येथेही तसेच झाले. एका बड्या व्यक्तीने कंपनीला किनारी लावले. कंपनीही सदैव त्या व्यक्तीच्या ऋणात राहिली. कोण होती ही बडी व्यक्ती? कोण होता कंपनीचा तारणहार?

कंपनी गोत्यात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी आरोग्यखात्याच्या अर्थसंकल्पात दणदणीत वाढ केली. यावरून त्यांना सामान्य नागरिकांच्या आरोग्याची किती चिंता आहे हे दिसत होते. नोव्हेंबर २००५मध्ये मेरिलँडमधल्या एका राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन 'जगापुढची आरोग्याची समस्या किती गंभीर आहे' याचे काळजीवाहू चित्र निर्माण करणारे भाषण त्यांनी ठोकले. यावरून आपण जागतिक आरोग्याबाबत किती सजग आहोत याचा त्यांनी भास निर्माण केला. त्याच कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHOचे) संचालकही उपस्थित होते. अमेरिकेचे निम्मे मंत्रीमंडळ, परराष्ट्रमंत्री सगळे सगळे होते. तेथेच त्यांनी आपण ७१० कोटी डॉलर्स जनहितार्थ खर्च करणार असल्याचे जाहीर केले. कोणत्याही सिनेटची वा अमेरिकन काँग्रेसची परवानगी न घेता. या भाषणात त्यांनी जगाला कोणत्या आजाराचा धोका आहे, तो टाळायचा असेल तर कोणत्या उपाययोजना कराव्यात, औषधे कोणती घ्यावीत, सगळे सांगितले. याच कारणासाठी तर ती कंपनी या व्यक्तीची ऋणी होती. बुशसाहेबांच्या याच भाषणामुळे कंपनीला किनारा सापडला (की अलगद आणून ठेवले होते). हा सगळा योगायोगही असू शकत नाही का? ही कंपनी फक्त एकाच प्रकारच्या औषधाचेच उत्पादन करायची. म्हणजे जेव्हा त्या औषधांची मागणी वाढेल तेव्हा जगभरात फक्त ही एकच ते औषध निर्मिती कंपनी होती. मग कंपनीच्या हितचिंतकांनी मिळतील त्या वाटांनी त्या उत्पादनाची जाहिरात सुरू केली. बुशसाहेबही त्यापैकीच होते की काय? छे....! योगायोग असणार, दुसरे काय? त्यात भर म्हणजे त्या कंपनीचा संचालक बुशसाहेबांचा अगदी सख्खा मित्रच, मग काय योगायोगच असणार नाही का?

त्या रोगाचे नाव होते 'बर्ड फ्लू', औषधीचे 'टॅमी फ्लू' आणि मंत्र्याचे नाव होते त्या वेळचे संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड. बुडत्या कंपनीला जर हे आरोग्य अर्थसंकल्पाचा टेकू लावत असतील, देशाच्या नागरिकांच्या आरोग्याचा पैसा जर लोक आपल्या फायद्यासाठी वापरात असतील, तर या अघोऱ्यांनी कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या रोगांचाच प्रसार केला नसेल कशावरून? अशा या खिसेभरू राजकारण्यांना फाशीपेक्षा जबर शिक्षा शोधावी लागेल. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांत सतत येणाऱ्या स्वाइन फ्लू, हगवण, काळपुळी या रोगाचे काय? की तेसुद्धा एखाद्या कंपनीच्या भरभराटीसाठी पसरवले जात आहेत? म्हणजे ही प्रगत राष्ट्रे गिनी पिग्ज म्हणून आपला वापर करतात की काय? अप्पलपोटेपणापायी सामान्य गरीब जनता साथीच्या रोगांमध्ये किडा-मुंग्यांसारखी मरते. पण साथीचे प्रयोग कालपासून थोडी सुरू झालेत? त्यांना खूप मोठा इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून जैविक आणि रासायनिक अस्त्रांचा वापर सुरू आहे. आता त्यावर जास्त प्रकाश पडतोय एवढेच. आपले पूर्वज तंत्रज्ञानाने जरी आपल्यापेक्षा मागे होते, तरी आपला कपटी स्वभाव आनुवंशिक आहे हे विसरता कामा नये. अशा आपल्या कपटी पूर्वजांची दानवी कारस्थाने पुन्हा कधीतरी...

संदर्भ -
१.युद्ध जीवांचे - गिरीश कुबेर
२. इतर माहिती आंतरजालावरून

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 11:22 am | कुमार१

टायफॉईड मेरी वैद्यकाच्या अभ्यासात वाचली होती.
इतर माहिती रोचक !

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 2:40 pm | तुषार काळभोर

बाकी नवनवे रोग (एड्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, झिका, इ) जे पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते आणि मागील काही वर्षांत दशकात जगभरात पसरले, ते मानवनिर्मितच असणार असा संशय मला नेहमीच येतो.

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 3:23 pm | सुधीर कांदळकर

छान, आवडले. अनेक, अनेक धन्यवाद.

हेपेटायटीस बी बद्दल पण तो मानवनिर्मित असावा असा मला संशय येतो. याची लस दहाबारा वर्षापूर्वी मुंबईच्या बाजारात आली होती. कसलेच वैद्यकीय ज्ञान नसलेला कुणीही माणूस, माजी नगरसेवकापासून कुणीही सोम्यागोम्या या लसीची जाहिरात करीत असे. प्रतिकारशक्ती किती काळ टिकते यावर थातुरमातुर उत्तरे मिळत. जाणकार यावर प्रकाश टाकू शकतील.

चित्रवाणी वाहिनीवर - बहुधा डिस्कव्हरी वा हिस्टरी - एक तासाचा चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवते.

सुबोध खरे's picture

12 Nov 2018 - 6:29 pm | सुबोध खरे

हेपेटायटीस बी बद्दलची माहिती खाली जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकात मिळेल
http://www.searo.who.int/india/mediacentre/events/2016/hepatitisb_birth_...
याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साधारण २०११ मध्ये सरकरने याच्या जाहिराती सार्वजनिक न्यासांवर करायला सुरुवात केली होती.
याचे तीन डोस घेतल्यास त्याच्याविरुद्ध निर्माण होणारी प्रतिकारशक्ती सध्यातरी कमीतकमी ३० वर्षे टिकते असे आढळून आले आहे जशी अजून वर्षे जातील तशी माहिती उपलब्ध होत राहील. विषाणूजन्य आजार असल्याने इतर विषाणूजन्य आजारांसारखी (उदा पोलियो) कदाचित आयुष्यभर टिकत असावी.
https://www.cdc.gov/hepatitis/hbv/hbvfaq.htm

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 3:34 pm | टर्मीनेटर

लेख आवडला.

टायफॉइड मेरीबद्दल वाचले होते, ते ह्या लेखानिमित्ते आठवले.
चांगलं लिहिलंय.

दिल्याबद्दल धन्यवाद...

छान, आवडले. लिहीत रहा.

मित्रहो's picture

11 Nov 2018 - 6:21 pm | मित्रहो

मला टायफाईड मेरी माहिती नव्हती

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2018 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक विषयावरील रोचक लेख.

जैविक अस्त्रे ही संज्ञा जरी नवीन असली तरी, त्यांचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे.

मूळ अमेरिकन (रेड इंडियन) जमाती इतर जगापासून अनेक सहस्त्र वर्षे वेगळे झालेल्या असल्यामुळे, त्यांच्यात युरोपियन लोकांत सामान्यपणे असलेले रोग नव्हते व अर्थातच त्या रोगांविरुद्धची रोगप्रतिकारक शक्तीही निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे, युरोपियन वसाहतवाद्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या रोगांना मूळ अमेरिकन सहज बळी पडत असत. ही गोष्ट ध्यानात आल्यावर, चलाख वसाहतवाद्यांनी जीवघेण्या रोगांच्या साथी पसरवून अनेक मूळ अमेरिकन जमाती नामशेष केल्या. पारंपारिक शस्त्रे वापरून केलेल्या युद्धापेक्षा हा प्रकार, वसाहतवाद्यांच्या दृष्टीने, कमी स्वमानवहानीचा, कमी खर्चाचा आणि जास्त सोपा होता.

ब्युबॉनिक प्लेग, देवी (स्मॉल पॉक्स), कांजिण्या (चिकन पॉक्स), कॉलरा, पडसे (कॉमन कोल्ड), घटसर्प (डिप्थेरिया), फ्ल्यू (इन्फ्लुएन्झा), मलेरिया, गोवर (मिझल्स), स्कारलेट फिवर, लैंगिक संक्रमित रोग (sexually transmitted diseases), हिवताप (टायफॉईड), टायफस, क्षयरोग (ट्युबरक्युलॉसिस), घटसर्प (परट्युसिस किंवा व्हूफिंग कफ), इत्यादी अनेक साथीच्या रोगांचा यासाठी मुद्दाम उपयोग केला गेला... काही वेळेस ते नकळतपणेही पसरले. असे म्हटले जाते की रोगांच्या साथींनी रेड इंडीयन लोकांची जवळ जवळ २५ ते ५०% टक्के लोकसंख्या मृत्युमुखी पडली असावी.

युरोपियन आक्रमकांनी या जैविक अस्त्रांचा हेतुपुर्र्सर उपयोग करताना अनेक क्रूर योजना कामी आणल्या... उदा : देवी (स्मॉल पॉक्स) च्या रोग्यांनी वापरलेली ब्लँकेट्स भेट देणे (१७६३ सालचा फोर्ट पिट्चा वेढा, इ) , रोगाने ग्रस्त युरोपियन लोकांना मूळ अमेरिकन लोकांच्या वस्तीवर भेटीस पाठवणे, इ.

एका प्रवादाप्रमाणे, कौटिल्याने प्लेगने ग्रस्त उंदीर सोडून अलेक्झांडरच्या सैनिकांमध्ये रोगराई पसरवली होती (खरे खोटे कौटिल्य जाणे).

गुल्लू दादा's picture

12 Nov 2018 - 5:22 am | गुल्लू दादा

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 10:34 pm | पद्मावति

रोचक. लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

12 Nov 2018 - 6:07 pm | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण, रोचक लेख!
स्वाती

आपल्या लेखाचे शीर्षक वाचून हे जैविक रासायनिक आणि आण्विक युद्धातील(Nuclear, Biological, & Chemical Defense) एक भाग असावा असे वाटले होते.
आणि जैविक युद्ध हे गरीब देशाचा अणुबॉम्ब असे म्हटले जाते. पण त्याचे परिणाम भयानक अनाकलनीय आणि अतर्क्य असे आहेत.

ब्रिटनच्या कोपऱ्यातील एका बेटावर (गृइनार्ड Gruinard Island) जैविक युद्धाची चाचणी म्हणून अँथ्रॅक्स या रोगाच्या जिवाणूच्या बीजाणूंचे फवारे मारले होते. त्यानंतर पुढची ५२ वर्षे हे बेट कोणत्याही सस्तन प्राण्यास वास्तव्य करण्यास अयोग्य झाले होते. यानंतर त्या बेटावरचे जैविक प्रदूषण स्वच्छ केल्यावर ते बेट वास्तव्य करण्यास योग्य म्हणून प्रमाणित केले गेले. हि सुरस आणि भयंकर कथा आपण खाली वाचू शकता.
https://en.wikipedia.org/wiki/Gruinard_Island

अजून एक भयावह कथा म्हणजे सुरत मध्ये १९९४ साली प्लेगची साथ आली होती त्यावेळेस दोन अमेरिकन "पर्यटक" सुरतेला भेट दिल्यानंतर नाहीसे झाले. लष्कराच्या गुप्तहेर खात्याने त्यांचा माग काढल्यावर असे लक्षात आले कि अमेरिकेतील सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ होते. आणि ते सुरतेत प्लेगच्या जिवाणूंचे नमुने घेऊन हळूच अमेरिकेत परत गेले. अमेरिका असे विविध देशात होणाऱ्या रोगांचे नमुने गोळा करून तेथे असणाऱ्या जनतेची प्रतिकार शक्ती विरुद्ध हे जिवाणू कसे काम करतात याचे गुप्तपणे संशोधन करत असावेत. म्हणजे भविष्यात त्या देशाच्या प्रतिकार्शक्तीला न जुमानणारे रोग तेथे फैलावता येतील किंवा तशी जैविक शास्त्रे निर्माण करत असावेत असा "कयास" आहे. दुर्दैवाने अशी माहिती तुम्हाला कुठेही जालावर सहजासहजी आढळणार नाही.
जैविक अस्त्रे हा एक मानवी इतिहासातील काळा अध्याय आहे असे म्हटले तरी चालेल.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2018 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे

रोचक माहीती. अतिरेकी लोकांनी जैविक अस्त्रे वापरल्या चा काही इतिहास आहे का? विषाणू किंवा जिवाणू बाँब तयार करुन त्याद्वारे विध्वंस घडवून आणण्याचा प्रयत्न यापुर्वी झाला आहे का?

मराठी कथालेखक's picture

13 Nov 2018 - 4:09 pm | मराठी कथालेखक

लेख आवडला
जैविक अस्त्रांच्या निमित्ताने - '२४' नामक मालिकेचे दुसरे पर्व या विषयावर आहे.. काहीशी अतिरंजित पण उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारी अशी मालिका.

पण मनात आणखी प्रश्न उभे राहिले. मेरी मलोनचा काळ हा प्रतिजैविके वापरात येण्यापूर्वीचा आहे. १. काटेकोर वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी असत्या तर बहुधा ती रोगवाहक/रोगवाहिका झाली नसती असे वाटते. नंतरच्या काळात आणखी रोगवाहक का सापडले नसतील?
२. नंतर विषमज्वराची लस बाजारात आली,
३. तसेच क्लोरोमायसेटीन नावाने क्लोरम्फेनिकॉल बाजारात आले, त्यानंतर अनेक ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविके बाजारात आली. त्यामुळे विषमज्वराने माणसे मरण्याचे प्रमाण नगण्य झाले असावे.

मुद्दे क्र. २ आणि ३ मुळे नंतरच्या काळात रोगवाहक सापडले नसावेत असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2018 - 12:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुद्दे क्र. २ आणि ३ मुळे नंतरच्या काळात रोगवाहक सापडले नसावेत असे वाटते.

रोगवाहक (अशी माणसे की ज्यांच्यामध्ये रोगजंतू असतात, पण त्यांच्यामध्ये रोगाची लक्षणे दिसत नाहीत) तयार होतच नाहीत असे नाही. पण, प्रतिजैवकांच्या सहज उपलब्धतेमुळे रोगाचा परिणामकारक व पूर्ण उपचार सहज साध्य झाला आहे. म्हणून..

१. रुग्णाचे रोगवाहकात रुपांतर होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे (शुन्य झालेले नाही) आणि

२. रोगाच्या परिणामकारक उपचारांमुळे, रोगप्रसारावर नियंत्रण येऊन, रोगाच्या साथी येणे खूपच विरळ झाले आहे.

वेगळ्या विषयावरचा लेख आवडला.
काही प्रतिक्रियांमधूनही चांगली माहिती मिळाली.

अतिशय माहितीपूर्ण लेख.

Prajakta२१'s picture

2 May 2020 - 12:19 am | Prajakta२१

छान मार्गदर्शन
आत्ताची हि साथ पण जैविक युद्धाचा भाग असल्याची शक्यता अनेक जण सांगत आहेत पण पुरावे नसल्यामुळे काहीच करता येत नाहीये
चीन मधील एकही बड्या व्यक्तीला हा रोग झाल्याचे ऐकिवात नाहीये ह्यावरून सध्याची साथ जैविक युद्धाचा भाग असे बऱयाच न्यूज चॅनेल्स वर सांगत आहेत ओरडून. २०१९ मध्ये कॅनडातील एका प्रयोगशाळेतून एका चिनी दाम्पत्याला डेपोर्ट करण्यात आले होते त्यांचयाबरोबर अजून हि काही लोक होते असे काहीसे एका चॅनेलवर एक तज्ज्ञ सांगत होते
जर असे असेल तर ह्याचा ऍंटीडोट पण असेलच तो खुला झाला तर सगळेच प्रश्न सुटतील