प्रसंग पहिला:
वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली. जर आपण फार हळू हळू खाल्लं तर भावाला जास्त पापडी खायला मिळेल आणि पापडी पण संपेल ह्या भीतीनं मी पण खायचा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात पापडीचा पूडा संपलाही. सगळे देखावे बघून झाल्यावर शेवटच्या बसने आम्ही घरी पोचलो. रात्री मला काही झोप लागेना. शेवटी रात्री दोन च्या सुमारास अंथरुणातच भडाभडा उलटी झाली. त्या दिवसापासून मला खूप आवडणाऱ्या पापडीबद्दल माझ्या मनात इतकी शिसारी निर्माण झाली कि आजतागायत मी पापडी खात नाही.
प्रसंग दुसरा:
वय वर्षे १३: मी सहावी सातवीत असतानाची गोष्ट. मे महिन्यात सगळ्यांच्या घरी चैत्रागौरी बसायच्या आणि शेजार पाजारच्या बायका हळदी कुंकवाला बोलवायच्या . गौरीची आरास, डाळीची कोशिंबीर, भिजवलेले काळे हरभरे आणि कैरीचं पन्ह यासाठी मी पण आई बरोबर सगळीकडं हळदीकुंकवाला जायचे. त्या वर्षी पण घरच्या हळदीकुंकवासाठी बनवलेली कोशिंबीर आणि पन्हे पोटभर हादडल्यावर परत सगळीकडं हळदीकुंकवाला आई बरोबर निघाले. जवळपास सात-आठ घरी बनवलेली वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर आणि पन्हे खाऊन पिऊन झाल्यावर त्या रात्री पोटात काहीतरी जाम 'केमिकल लोच्या' झाला आणि पोटातल्या कोशिंबीर आणि पन्ह्यानं पोटातून बाहेर येण्यासाठी बंड पुकारलं. त्यांच्या विनंतीला मान दिल्यांनतरच मला त्या रात्री झोप आली. त्या पुकारलेल्या बंडाचा विरोध म्हणून असेल पण आजही मी डाळीची कोशिंबीर, भिजवलेले काळे हरभरे आणि पन्ह्याला हातही लावत नाही.
प्रसंग तिसरा:
वय वर्षे अठ्ठा..... (बायकांनी वय सांगू नये म्हणतात): तर पनीर हा माझा वीक पॉईंट. जेवायला बाहेर गेलं तर स्टार्टर मध्ये पनीर, मेन कोर्स मध्ये पनीर पराठा, पनीर करी, पनीर बिर्याणी.. असं माझं पनीर प्रेम. तर हा किस्सा तेव्हाचा ज्या वेळी मी बेंगलोरला जॉब करत होते. भारतातल्या फूड, टेक्सटाईल आणि लेदर कंपन्यांची ऑडिट्स आणि इन्स्पेक्शन करण्याचं काम असल्यानं सारखं फिरायला मिळायचं. तर त्या वर्षी तामिळनाडूच्या तिरूपूर या ठिकाणी एका टेक्सटाईल कंपनीमध्ये ३१ डिसेम्बरला सरप्राईस इन्स्पेक्शन ठरवलं होतं. ३१ ला रात्री जवळपास ११ वाजता माझी परतीची बस होती.तिरूपूर हे टेक्सटाईल हब असल्याने कपडे अगदीच स्वस्त. तर संध्याकाळी काम संपल्यावर कपडे खरेदी करावी आणि तिथूनच बस पकडावी म्हणून मी ६ वाजता काम संपल्यावर खरेदीला निघाले. खरेदी संपल्यावर काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून तिथल्याच एक चांगल्या पंचतारांकित हॉटेलात गेले (पैसे कंपनी देणार होती ना म्हणून). तर ३१ डिसेंबर असल्याने त्यांनी मुख्य रेस्टॉरंट बंद ठेवले होते आणि बाहेर गार्डन मध्ये काही प्रोग्रॅम्स आणि कॉकटेल पार्टी चालली होती. जेवणाची सुरुवातही झालेली नव्हती त्यामुळं मी त्यांना फक्त माझ्यासाठी त्या मेनू मधील कुठलीही एक पनीर ची करी आणि रोटी घेऊन यायला सांगितली. एका मोठया हंडीमध्ये वेटरनं शाही पनीर करी आणली. काजू बदाम यांची ग्रेव्ही आणि वरून केसर, पिस्ता घातलेली पनीर करी आणली आणि नेहमीसारखी मी ती पोट भरून खाल्ली. ताटात काही सोडायचं नाही हे शिकवल्यामुळं आणि अर्थातच पनीर मनापासून आवडत असल्यानं शेवटची अर्धी उरलेली करी पण नुसतीच चमच्याने खाल्ली. नशिबानं त्या रात्री बसमध्ये उलटी झाली नाही पण त्यांनतर पनीर समोर दिसलं कि त्या रात्रीची घटना, त्या थोड्या "जास्तच" शाही असलेल्या पनीरचा वास माझ्या नाकात येतो. पनीर आता मी अजिबात खात नाही.
----------
"अति तेथे माती" या उक्तीचा आयुष्यात तीन वेळा अनुभव आलेला आहे. लहापणी आज्जी आजोबा, नंतर आई बाबा, नंतर नवरा आणि आता मुलगा पण "थोडं कमी खा", अन्न काही पळून जात नाही हवं तर थोड्यावेळाने किंवा उद्या उरलेलं खा" असं म्हणत असतात. ह्या आणि ह्यासारख्या अनंत सूचना लहानपणापासून ऐकत आल्यानं आणि खाण्याबाबतीत मी एवढा अतिरेक करत असल्यानं कुठंतरी माझ्या रक्तात "अतिरेक्या" चा Gene असल्याची मला खात्री झालेली आहे. त्यावर बऱ्याचदा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न फोल ठरल्याने अजूनही मी भरली वांगी, बासुंदी, भजी , काजू कतली ह्या आणि ह्यासारख्या अनेक खाद्यपदार्थांचा अत्यंत हिंसात्मक पद्धतीनं खातमा करून त्यांचा फडशा पडत असते.
दिवाळी आठवड्यावर आलीय. आत्तापर्यंत सगळ्यांच्या घरी फराळाची तयारी सुरु झाली असेल. साखरेचे, डाळीचे आणि इतर रोजच्या वापरातले डबे रिकामे करून त्यांची जागा आता फराळाच्या पदार्थांनी घेतली असेल. दिवाळीच्या चार दिवसांचा मेनू पण ठरवला गेला असेल. ह्या दिवाळीत आपण सर्वांनीही आपल्या "अतिरेकी" पणाला योग्य तो न्याय देऊन दिलखुलास आणि पोटफुलास हाणावे. फक्त ही आणि येणारी प्रत्येक दिवाळीच नाही तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जे हवे, जसे हवे, जितके हवे तेवढे मनसोक्त खायला मिळण्याएवढे आरोग्य, समृद्धी आणि संपत्ती लाभो हीच देवाचरणी अपेक्षा. आपणा सर्वाना दिवाळसणाच्या "अतिरेकी" आणि पोट फुटेपर्यंत शुभेच्छा.
प्रतिक्रिया
1 Nov 2018 - 1:06 pm | मुक्त विहारि
लेख आवडला ....
2 Nov 2018 - 8:46 am | माहितगार
छान लेख
1 Nov 2018 - 1:23 pm | चौथा कोनाडा
स्वत:ची मर्यादा गंमतीशीर पणे सांगणारा मस्त लेख !
खुसखुशीत आत्मकथन आवडलं !
झेपेल तेव्हढे बिनदिक्कत खा आणि दिवाळी साजरी करा, उत्साहात !
दिवाळसणाच्या पोटभर शुभेच्छा.
1 Nov 2018 - 2:26 pm | कलम
>>स्वत:ची मर्यादा गंमतीशीर पणे सांगणारा मस्त लेख !
खुसखुशीत आत्मकथन आवडलं !
धन्यवाद
1 Nov 2018 - 2:16 pm | चिर्कुट
>> वय वर्षे ८: तिसरी चौथीत आणि वय वर्षे १३: सहावी सातवीत
म्हंजे किमान एक वर्ष तरी गटांगळ्या खाल्या होत्या वाटतं :)
बाकी लेख उत्तम. हॉस्टेलच्या मेसमधे होणा-या खाण्याच्या पैजा आणि ते अतिरेकी खाणं आठवलं..
1 Nov 2018 - 2:25 pm | कलम
म्हंजे किमान एक वर्ष तरी गटांगळ्या खाल्या होत्या वाटतं :)
नाही हो. फक्त खायच्या बाबतीतच अतिरेकी पणा होता. अभ्यासात आम्ही ऑल राऊंडर.
शंकरपाळ्या खाता खाता लिहिलयं म्हणून काहीतरी लोच्या झाला असेल
बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
1 Nov 2018 - 2:30 pm | कलम
>>हॉस्टेलच्या मेसमधे होणा-या खाण्याच्या पैजा आणि ते अतिरेकी खाणं आठवलं..
बाकी होस्टेलच्या मेसमध्ये पैजा लावण्यासारखं जेवण खाण मिळतं हे वाचून डोळ्यात पाणी आलं.
2 Nov 2018 - 11:23 am | श्वेता२४
बाकी होस्टेलच्या मेसमध्ये पैजा लावण्यासारखं जेवण खाण मिळतं हे वाचून डोळ्यात पाणी आलं.
प्रचंड सहमत
2 Nov 2018 - 2:53 pm | कलम
आमच्या हॉस्टेल मध्ये पैज लावणं तर सोडाच पण पोट भरून खावं असं पण जेवण नसायचं.
माझी एक मैत्रीण जेवणात वाट्याण्याची उसळ केली कि एक एक वाटाणा ताटात वरून टाकून बघायची. जर "टणकन " आवाज आला तर तो वाटाणा बाजूला ठेवायची आणि नाही आवाज आला तर खायची. ;)
1 Nov 2018 - 2:30 pm | अनिंद्य
दिलखुलास आणि पोटफुलास :-) :-)
1 Nov 2018 - 3:03 pm | अथांग आकाश
अति तेथे माती हे शिर्षक जास्ती शोभलं असतं! लेख आवडला!
1 Nov 2018 - 3:38 pm | कलम
मी लहानपणी अशीच खायचे.... भस्म्या झाल्यासारखं ;)
1 Nov 2018 - 3:57 pm | अथांग आकाश
अशा प्रकारे का ? :-)
1 Nov 2018 - 5:42 pm | विशुमित
अति तिथे उलटी..!
हे कसं वाटतंय?
....
आम्ही आमच्या सासरवाडीत सुरवातीच्या काळात असेच भडाभडा वकलो होतो.
आजतागायत कोणी मला जास्त आग्रह करत नाही.
1 Nov 2018 - 4:36 pm | अभिजित - १
me too !!
1 Nov 2018 - 5:17 pm | चित्रगुप्त
पोट फुतेस्तोवर हादडण्याला आमचे जोरदार समर्थन. माझेपण काहीसे असेच होते, पण आता आपोआपच खाणे कमी झालेले आहे. तोंडातला जास्तीचा अर्धा घास सुद्धा काढून टाकतो.
एक जिज्ञासा: सांगलीला गणपति बघायला जायचे म्हणजे तुम्ही माधवनगरमधे रहात होता का?
जेवल्यानंतर डाव्या कुशीवर झोपावे - वामकुक्षी - याचा अनुभव घेतो आहे. उजव्या कुशीवर पहुडल्यास मळमळ आणि उलटीची भावना होते.
1 Nov 2018 - 5:27 pm | कलम
>>एक जिज्ञासा: सांगलीला गणपति बघायला जायचे म्हणजे तुम्ही माधवनगरमधे रहात होता का?
आम्ही बुधगावला राहायचो तेव्हा. जवळपास वीस वर्षांपूर्वी सांगलीला स्थायिक झालो.
>>जेवल्यानंतर डाव्या कुशीवर झोपावे - वामकुक्षी - याचा अनुभव घेतो आहे. उजव्या कुशीवर पहुडल्यास मळमळ आणि उलटीची भावना होते.
मी प्रयत्न करेन. पण झोप लागल्यावर कुशी आणि उशी आपोआप बदलतात. त्या बद्दल नंतर कधीतरी लिहीन.
1 Nov 2018 - 5:55 pm | सविता००१
असला अनुभव मात्र कधीच नाही आला. बहुतेक खूपच गुणी असणार मी.
पण आमच्या ऑफिस मधल्या ड्रायव्हर ची गंमत सांगते. तुम्ही तरी पापडीच्या किश्शाच्या वेळी लहान होतात. पण आमचा हा ड्रायव्हर चांगला तिशीतला. सरांबरोबर त्याला सतत कुठेकुठे जायला लागायचे आणि त्याचा गुरुवारचा उपास असायचा. सर शक्यतो आउट स्टेशन ला त्याला गुरुवारी नाही न्यायचे. त्याची पंचाईत नको खाण्यापिण्याची म्हणून. पण एका गुरुवारी खूप महत्त्वाचं काम आल्याने तो गेला सरांबरोबर. त्यांच्या मीटिंग्ज ना जाण्याअगोदर त्यांनी स्वतः याच्यासाठी १ किलो (हो, खरच) वेफर्स आणि भरपूर फळे आणली. मग सर गेले त्यांच्या कामाला आणि हा गडी लागला याच्या कामाला. दुसर्या दिवशी अॅड्मिट. इतका त्रास झाला त्याला.. आणि सर त्याला हॉस्पिटल मध्ये जाउन म्हणाले.. मूर्खा, मी तुला १ किलो वेफर्स दिले म्हणजे ते सगळे एकावेळी खायचे असं लिहून घेतलं होतं की काय तुझ्याकडून????
2 Nov 2018 - 2:58 pm | कलम
एक किलो चिप्स तर मी पण एका बैठकीत खाऊ शकते, आणि ते पण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट न होता... हम है ही स्ट्रॉंग ;)
3 Nov 2018 - 12:02 pm | सविता००१
अहो काहीही काय?
2 Nov 2018 - 4:25 am | सोन्या बागलाणकर
चकली सारखा खुसखुशीत आणि चवदार लेख!
हावरेपणाचा अनुभव नाही पण शाळेत असताना आम्ही मित्र मिळून गणपती देखावे बघायला रात्री निघालो होतो.
कोणीतरी सुचवले कि तिथला जैन दाबेलीवाला झक्कास दाबेली बनवतो. दाबेली माझी आवडती, मग काय हावऱ्यासारखी १ डझन दाबेली घेतली ४ मित्रात मिळून खायला.
पहिली दाबेली जेवढ्या घाईघाईने तोंडात कोंबली त्याच्या दुप्पट वेगात बाहेर काढली. पूर्ण तोंड पोळलं एवढी तिखटजाळ दाबेली होती. एका मित्राचा तर एवढा तिखट खाऊन घसा दुखायला लागला. उरलेल्या सगळ्या दाबल्या भटक्या कुत्र्यांच्या ताब्यात देऊन आम्ही देखाव्यांना राम राम म्हटला. तेव्हापासून एक पीस टेस्ट करून मगच जास्त सामान घ्यायची सवय लागली आहे.
2 Nov 2018 - 8:14 am | अर्धवटराव
खाण्या-'पिण्या'च्या बाबतीत आम्हिही 'अति' आहोत. पण सुदैवाने अजुनतरी कशाचीच शिरासी आलि नाहि. शिरासी घालवायची असेल तर एक उपाय करुन बघा. मरणाची भूक लागु द्या आणि मग थोडं पनीर/पापडी ट्राय करुन बघा. शिरासी गायब होईल.
2 Nov 2018 - 11:57 am | यशोधरा
शिसारी. :)
2 Nov 2018 - 10:56 pm | अर्धवटराव
कि आजकाल लक्ष(णं) काहि खरं नाय ;)
घरी, ऑफीसमधे हिच कंप्लेण्ट ऐकायला मिळते आजकाल... आता मिपावरसुद्धा.. :ड
2 Nov 2018 - 2:59 pm | कलम
मरणाची भूक लागेपर्यंत कसं थांबतात हो?
:)
3 Nov 2018 - 7:36 am | चामुंडराय
:)
2 Nov 2018 - 11:57 am | यशोधरा
मजेशीर लेख.
2 Nov 2018 - 12:41 pm | सिरुसेरि
छान आठवणी . सांगलीतील " बालाजी मिल " , "शिलंगण चौक " , " विजयंता " चे गणेशोत्सव देखावे आणी "त्रिमुर्ती भेळ " डोळ्यासमोर आले .
2 Nov 2018 - 3:00 pm | कलम
हो. खूप छान देखावे असायचे
3 Nov 2018 - 7:00 am | तुषार काळभोर
मी पण गॉड खाण्याला अति हावरट आहे. म्हणजे मी इमृती, जिलेबी, बुंदीचे लाडू, बुंदी, हे नरड्याशी येईपर्यंत , तेही उलटी होऊ न देता, खातो.
फक्त त्यानंतर बसप्रवास नाही पाहिजे!! ;)
3 Nov 2018 - 9:44 am | कलम
प्रतिसादाबद्दल धन्यवाद